गेले ते दिन (भाग ३)

गोव्याला जायचे ठरल्यावर आम्ही इतरांना नाक खाजवून दाखवायला मोकळे झालो. जी काही दोनेक आठवड्यांची लेक्चर्स उरली होती ती आम्ही देवामंगेशाला दान करून टाकली आणि राहुल नि अलकामधले मॅटिनी-रेग्युलर असे मिळून चार शो पाहिले. तेवढ्यात शुक्रवार आला नि सगळे चित्रपट बदलले. मग परत चार पाहिले.
हे इंग्रजी चित्रपट पाहण्याचे होते असे, की गोव्यात फिरंगी खूप. त्यांतील एखादी गौरांगना जर आमच्यावर भाळली आणि तिने तसे सांगितले, तर आम्हांला कळायला नको? नाहीतर ती फर्ड्या इंग्रजीत तिचे प्रेम पोटातून ओठावर आणायची आणि आम्ही आमच्या फर्ड्या इंग्रजीत "हाफ पास्ट फोर" असे उत्तर देऊन मनगटावरचे घड्याळ चमकावत निघून जायचो. सगळे सिनेमे अमेरिकन असल्याने आमची तयारी अर्थातच अमेरिकन गौरांगनांपुरतीच मर्यादित होती.
पण गोव्यातल्या सगळ्याच गौरांगना भे़कड निघाल्या. आमच्याकडे नीटसे बघण्याचे धाडसही त्यांच्याकडून झाले नाही, भाळणे फारच लांब राहिले.
गोव्याला निकभिक येणार नव्हता. त्याचे डॅडी-मम्मी त्याला सिंगापूरला (त्याच्या भाषेत 'सिंगापो') घेऊन जाणार होते म्हणे. कोणकोण येणार आहेत याची चौकशी सुरू केल्यावर आमच्या कॉलेजमधून आम्ही दोघेच आहोत असे कळले. 'बीएमसीसी'मधून दोघे होते, पण ते आमच्या माहितीचे नव्हते. 'गरवारे'मधून चारजण होते. त्यात दोनजण प्रशांतचे मित्र. 'सप'मध्ये जाण्यासाठी नदी ओलांडावी लागली असती, जी आम्ही 'अलका', 'रीगल', 'प्रीती' आणि 'दरबार' या चार कारणांखेरीज कधीही ओलांडत नसू. 'वाडिया'ही नदीपलिकडेच. 'मॉडर्न'मधून कुणी आहे का हे विचारले नाही.
जाण्याच्या तयारीसाठी एनसीसी ऑफिसला गेलो तेव्हा आमच्या हातात एक दहापानी सायक्लोस्टाईल्ड फॉर्म देण्यात आला. त्यावर थेट राष्ट्रपतींच्या नावाने काही निवेदन करून खाली सही करायची होती. अशारीतीने राष्ट्रपतींबरोबर संबंध प्रस्थापित केल्यावर आम्हांला प्रवासाचे 'वॉरंट' देण्यात आले. तोवर 'वॉरंट' हे गुन्हेगारांच्या नावे निघते एवढेच माहीत होते. पण मिलिटरीत जाणे म्हणजे एका प्रकारच्या तुरुंगात जाण्यासारखेच आहे हे दर्शवण्यासाठी बहुधा त्याला 'वॉरंट' म्हणत असावेत.
त्यासोबत आम्हांला एक दांडगेदुंडगे 'किट' देण्यात आले. त्यात बरेच काही होते. एक भलीथोरली सॅक, त्यात एक चादर, एक कांबळे, जेवणासाठी आणि इतर कामांसाठी लागणारी भांडीकुंडी इत्यादी गोष्टी होत्या. अल्युनिमियमची थाळी नि एनॅमलचा मग बघितल्यावर मला भोंसला मिलिटरी स्कूलमधल्या दिवसांची आठवण आली. पण इथे नंतर कळले की एनॅमलचा मग हा सकाळचा चहा, दुपार/रात्रीच्या जेवणातली डाळ/पातळभाजी एवढ्यापुरताच वापरायचा नसून दाढी/अंघोळीसकट इतर 'मॉर्निंग अनमेन्शनेबल्स'साठीही तोच वापरायचा असतो.
गोव्याचा कँप हा 'नॅशनल ट्रेकिंग कँप' असा जाहीर करण्यात आलेला होता. त्यामुळे 'ट्रेकिंग'ची तयारी म्हणून आम्ही वेताळटेकडी सकाळ-संध्याकाळ चार-चार वेळा चढण्या-उतरण्याची सवय केली. तिचा खुद्द गोव्यात काहीच फायदा झाला नाही ते सोडा.
बघता बघता दसरा आला. त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्हांला निघायचे होते. सामानाची बांधाबांध केली. मी जरा जास्तच. कारण वडिलांची बदली अखेर पुण्याला झाल्याने दिवाळीला माझे कुटुंबीय पुण्याला कायमस्वरूपी येणार होते. थोडक्यात, माझे हॉस्टेलचे दिवस संपले होते. त्यामुळे खोली मोकळी केली. सामान तळेगांवला (तोवर बांधून झालेल्या) आउटहाउसमध्ये ढकलून दिले. आणि गोव्याला जाण्यासाठीचे सामान घेऊन हॉस्टेलला हऱ्याच्या खोलीसमोर दसऱ्याला दुपारी हजर झालो. हऱ्या गावातल्या त्याच्या मावशीकडे दुपारचा जेवायला म्हणून गेला होता तो पार संध्याकाळी उगवला. बाकीच्या खोल्यांतली ओळखीची मंडळीही त्यांच्या 'एलजी'कडे पुख्खा झोडायला गेली होती. मी बाहेरच्या कॉरीडॉरमध्ये येराझाऱ्या घालून घालून वैतागलो.
हऱ्या डुलत डुलत आल्यावर फोकळीच्याला भोसड भोसड भोसडला नि 'रोज बेकरी'त नेऊन त्याच्या खर्चाने चार वाटीकेक हाणले. हऱ्याला खरे तर दुपारचं जेवण ओव्हरफुल्ल झालेलं होतं. पण आपल्या पैशांनी कुणीतरी दुसरंच मज्जा करतंय नि आपण फक्त पोटावरून हात फिरवत बसून रहायचं हे काही त्याला मानवलं नाही. त्यामुळं त्यानेही चार वाटीकेक मारले. मग प्रत्येकी दोन क्रीमरोल (एका हातात एक) आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
क्रीमरोल जर मुली बघत बघत खाल्ले तर ते जास्त चांगले लागतात अशी हऱ्याची थिअरी होती. थिअरीबरोबरच पैसेही हऱ्याचे असल्याने माझी काहीच हरकत नव्हती. माझे पैसे घालून क्रीमरोल खायचा झालाच तर मी एकट्याने आणि दुसरे कुणी पाहण्यच्या आत पटकन खाण्यावर भर देत असे.
तर भानगड अशी झाली, की चार वाटीकेक नि वरचे दोन क्रीमरोल या भडीमारामुळे आमची शुगर शूट झाली नि आम्हांला भांग प्यायल्यासारखेच व्हायले. एकमेकांशी बोलतानासुद्धा आम्ही शनिवारवाड्यासमोर उभे राहून भाषण देत असल्यासारखे चढ्या आवाजात बोलायला लागलो. त्यात हऱ्याला कल्पना सुचली की दुकानांच्या पाट्या मोठ्याने वाचत जावे. 'कर्नाटक क्लब', 'जय जलाराम रद्दी डेपो' हे ठीक होते. पण 'पी आर वैद्य' या दुकानासमोर उभे राहून हऱ्याने जेव्हा त्यांचा लिलाव पुकारल्यासारखी खणखणीत हाळी घातली तेव्हा गल्ल्यावरचे मालक लगबगीने बाहेर धावत आले. कसाबसा हऱ्याला तिथून पळवत पुढे नेला. तरी जाता जाता त्याने 'वैशाली' नि 'दीवार'चा लिलाव पुकारलाच.
हॉस्टेलला परतल्यावर आम्ही पत्त्यांचा डाव मांडला. 'मेंढीकोट'चा अड्डा जमवायची दर दिवाळी-उन्हाळ्यातली आमच्या वेरवलीत परंपरा. तीच मी इथे हॉस्टेलला पुढे चालू केली होती. पण त्या रात्री कहर झाला. पहिले म्हणजे दाबून हाणलेल्या केक नि क्रीमरोलमुळे आमची पोटाची गरज पुढचे सहा-सात तास 'निल' लेव्हललाच रेंगाळली. इतर मर्त्य मानवांना भुका वगैरे लागत असल्याने आमचे पार्टनर्स बदलत राहिले. शेवटी मध्यरात्री माझा पार्टनर रत्नाकर नि हऱ्याचा पार्टनर मिलिंद असे गणित असताना आम्हां दोघांना भूक जाणवली मग रत्नाकर नि मिलिंदबरोबर 'गुडलक'ला चक्कर मारली. हऱ्याचे पाप अजून संपूर्ण फिटायचे होते त्यामुळे बिल त्यानेच द्यायचे होते. त्यामुळे मी ब्रूनमस्का, ऑम्लेट नि चहा अशी चरंती केली नि मग त्याला (त्याने बिल भरल्यावर) माफ करून टाकले.
दुसऱ्या दिवशी दुपारी पुणे स्टेशनला पोहोचायचे होते. त्याकाळी पुणे-गोवा रेल्वे येणेप्रमाणे असे - पुण्याहून दुपारी निघालेली ब्रॉडगेज रेल्वे अंधार पडल्यावर मिरजेला पोहोचे. तिथून गोव्याला घटप्रभा-अंकलगी-बेळगाव-लोंढामार्गे जाणारी मीटरगेज घ्यावी लागे. ती सकाळी मडगांवमार्गे वास्कोला पोहोचे. त्यामुळे पुण्याहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांकडे दोन रिझर्वेशन्स असत. पुणे-मिरजसाठी एक नि मिरजेहून पुढचे एक. अर्थात ही दोन रिझर्वेशन्सची भानगड खूप नंतर कळाली. सध्याला आमच्याकडे 'वॉरंट' होते.
आणि पुणे स्टेशनला पोहोचल्यावर कळले की रिझर्वेशनची चिंता करायचे कारण नव्हते, आमच्यासाठी पुण्याहून दोन अख्खे डबेच जोडले जाणार होते. आधीच तिथे जमलेल्या कॅडेटसच्या गर्दीत उत्साहाची पातळी धोक्याच्या वर होती. त्यात दोन अख्खे डबे म्हटल्यावर सगळेच चेकाळले. रेल्वे अजून यायची होती. घोषणा देण्याचे खूळ कुणाच्या डोक्यात आले कुणास ठाऊक, पण त्या सुरू झाल्या. 'महात्मा गांधी की जय', 'जवाहरलाल नेहरू की जय' या राष्ट्रीय घोषणा झाल्या. 'इंदिरा गांधी की जय', 'मुरारजी देसाई की जय' हेही झाले. मग गाडी 'वल्लभभाई पटेल की जय', 'लालबहादूर शास्त्री की जय', 'सुभाषचंद्र बोस की जय', 'लोकमान्य टिळक की जय' इकडे वळाली.
अचानक 'सतीश नायर की जय' अशी एक मिनी-घोषणा झाली. आम्हांला काही कळले नाही, पण काहीतरी वेगळे दिसते म्हणताना आम्ही ती उचलून धरली. दोन-चार आवर्तने झाली असतील-नसतील, एक पांढऱ्या हाफ-पँटीतला, कुरळ्या पण बारीक कापलेल्या केसांचा, गोरासा चाळिशीचा माणूस शिकारी कुत्र्याप्रमाणे 'ही घोषणा नक्की येते कुठून' याचा वास घेत हिंडू लागला. नंतर कळले की तो नेव्हल एनसीसीचा पेटी ऑफिसर सतीश नायर. पुण्यातून आर्मी, नेव्ही नि एअर फोर्स अशा तीनही एनसीसी युनिटसमधून कॅडेटस आलेले होते. त्यातल्या नेव्हलच्या मुलांनी हा उपद्व्याप केला होता. तेवढ्यात आमची रेल्वे फलाटाला लागली नि ते घोषणासत्र विझले.
रेल्वेत शिरलो. प्रशांतने तेवढ्यात गोखलेनगर-जनवाडीमधल्या एका अण्णा जगदाळेबरोबर सूत जुळवले होते. हा अण्ण्या म्हणजे एक सव्वासहाफुटी नि शंभर किलोचा रेडा होता. कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी उपयोगी पडेल असा. पुढच्या सगळ्या प्रवासात आमच्याही उपयोगी पडला. अण्ण्याबरोबर त्याचा लहान चुलतभाऊ बाबू होता. अकरावीत असलेले हे पाचफुटी कार्टे फार इब्लिस होते. आपल्या थोरल्या भावाच्या बळावर बाब्या कुणाचीही खोडी काढत असे. पण बाब्या सर्वार्थाने अण्णावर अवलंबून नव्हता, स्वतः मारामारी करण्यातही पटाईत होता. प्रशांतने अण्णाला हाताशी धरून एक अख्खे कंपार्टमेंट आमच्या ताब्यात घेतले. सामानाची प्रतिष्ठापना वरच्या बर्थवर करून तिथे कुणी बसायला येणार नाही याची तजवीज करून टाकली नि आम्ही खालच्या सिटांवर बसून नवीन ओळख झाल्यावर होतात तसल्या गप्पा सुरू केल्या. अण्णा मॉडर्न कॉलेजला होता नि बाबू गरवारेला. दोन जगदाळे एका कॉलेजला झेपले नसते.
रेल्वे अखेर निघाली. इंजीन कोळशाचे होते, त्यामुळे हळूहळू निघाली. अण्ण्या लगेच वरच्या एका बर्थवर जाऊन त्यावरचे सामान दुसऱ्या बर्थवर फेकून आडवारला नि घोरायला लागला.
फास्टर फेणेचे फुरसुंगी, खंडोबाची जेजुरी, ताशेवाल्यांचे वाल्हे असे ष्टॉप घेत डकांव डकांव करत गाडी नीरेला पोहोचली. तेव्हा तीन गोष्टी झाल्या.
(१) आमच्या कंटाळ्याचा कडेलोट व्हायला आला.
(२) 'कंटाळा वाढू लागला की मी अवतार घेतो' या थाटात अण्ण्या ऑरररर फूसस, डर्रर्रर्रप असले भयाकारी आवाज काढून जागा झाला. घोरणे संपवून लगेच ढेकर देऊन उठणारा माझ्या माहितीतला आजतागायत तो एकमेव प्राणी.
(३) हत्तीच्या सोंडेसारख्या पायपाने रेल्वे इंजिनात आणि डब्यांत पाणी भरण्याचे काम सुरू झाले.
आता तिसऱ्या गोष्टीचा पहिल्या दोन्ही गोष्टींशी तसा थेट संबंध जरी नसला तरी त्याची नोंद केली कारण एकतर त्या क्रमाने गोष्टी घडल्या, आणि दुसरे म्हणजे नाही म्हणता तसा थोडासा संबंध जुळलाही. झाले असे, की रेल्वेचा एक कर्मचारी गाडीच्या टपावर चढून हे पाणी भरण्याचे काम करीत होता. अण्ण्याचे कुतूहल जागृत झाले नि शरीराच्या बोजाला न शोभणाऱ्या चपळाईने तो टपावर चढला. जलभरण मोहिमेचे पोटभर निरीक्षण करून झाल्यावर तो खाली उतरला ते काही कल्पना डोक्यात रुजवूनच.
नीरा स्टेशन सोडल्यावर अण्ण्याने आम्हांला हाकारले, "चला रे, जरा हिंडून येऊ". कुठे? तर टपावर. तिथवर पोहोचण्याच्या पायऱ्या त्याने नीट पाहून घेतल्या होत्या. त्यामुळे चालत्या रेल्वेच्या दरवाजातून थोड्याफार धोकादायक कसरती करीत तो टपावर पोहोचलासुद्धा. अण्ण्याला जमते तर आपल्यालाही नक्की जमेल या विश्वासाने मग आम्हीही मागोमाग गेलो.
टपावरून दिसणारे दृष्य फारच मनोहारी होते. आमचा डबा शेवटून दुसरा होता, त्यामुळे कोळशाच्या इंजिनामधून निघणारा धूर आमच्यापर्यंत पोचण्याआधीच विरून जात होता. ऊन बऱ्यापैकी चटकदार होते, पण त्या उन्हाकडे लक्ष देण्याचे ते वय नव्हते. डोक्यावरच्या केसांना (होते तेव्हा!) उलटेपालटे करणारा झन्नाट वारा होता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्याखेरीज अख्ख्या रेल्वेच्या टपावर कुणीच नव्हते. आम्ही अगदी जल्लोष केला, शिट्ट्या मारल्या आणि नंतर शिमग्यातही उच्चारायला लाज वाटेल अशा बोंबा मारल्या.
वाठार स्टेशन येईस्तोवर आमचे घसे बसायला आले. मग प्रशांतला एक झकनाट कल्पना सुचली. सिगरेट (प्रशांतच्या भाषेत 'बिडी') ओढली की घसा सुधारतो असा त्याने दावा केला. आमच्यापैकी प्रशांत फुक्या होता. मी पहिले धूम्रपान सातवीत केले होते (वेरवलीला बिवलकराच्या दुकानामागे घडलेल्या त्या रोमहर्षक घटनेविषयी पुन्हा कधीतरी). नंतर बारावीत पहिले सहा महिने निष्ठेने श्वेतांबरेची आराधना केली होती आणि त्यापुढे आर्थिक कारणांसाठी तिला काडीमोड दिला होता. त्यामुळे सध्या मी 'ready to be enticed' या श्रेणीत होतो. अण्ण्या नि बाब्या अनाघ्रात श्रेणीतले होते.
मगाशी लिहायचे विसरलो, पण आमच्यात एक कणेगांवकर कुलकर्णीही होता. म्हणजे होता तो साधा कुलकर्णीच, पण साध्या संभाषणामध्येदेखिल "आमच्या कणेगांवकर कुलकर्ण्यांमध्ये" असे पालुपद लावून तो सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या त्याच्या पणजोबांच्या मूळ गावाला अजरामर करायला पाहत असे. त्याच्या आजोबांपासूनच्या पिढ्या पुण्यात नारायणपेठेत वास्तव्य करून होत्या. तर हा कणेगांवकर कुलकर्णी 'triple refined Virgin' या श्रेणीत होता. या इरिटेटिंग प्राण्याला एकदा हिसका दाखवायला हवाच होता.
हा कणेगांवकर माधव काशिनाथ कुलकर्णी (ऊर्फ माकाकू) प्रशांतच्या दाव्याला बळी पडला. वाठार स्टेशनला सिगरेट होत्या त्या फक्त ब्रिस्टॉल आणि चारमिनार. मी माझा धूम्रपानाचा बेत पुढे ढकलला. प्रशा 'धूर निघाल्याशी कारण' या पंथाचा असल्याने त्याने चारमिनार घेतली. त्यातल्या दीड झुरक्यानेच कणेगांवकराचा जीव घाबरा झाला. त्याच्याहून आमचा. देहभान हरपून डोळ्यातून पाणी काढत ढसाढसा खोकणारा तो ढोल्या (गबदुल होता लेकाचा) टपावरून पडू नये म्हणून त्याला सावरण्याची कसरत करताना आमची त्रेधातिरपीट उडाली अगदीच. अण्ण्याला फारसे काही झाले नाही. तो बहुधा अनाघ्रात नसावा. बाब्याने थोरल्या भावाचा आदर म्हणून तेव्हा तरी ओढली नाही.
सातारा रोड स्टेशनला पोहोचेपर्यंत आरडाओरडा करून आणि उन्हामुळे आमची डोकी पारच भिरभिरायला लागली, सटक्यात रम चढावी तशी. त्या तारेत अण्ण्याने सातारा रोड स्टेशनच्या स्टेशनमास्तरला उगाचच शिव्या घालायला सुरुवात केली. अण्ण्याच्या शिव्या सोप्या नसत. त्याचे घर जनवाडीत होते, आजोळ वडारवाडीत आणि कॉलेज पोलिस॑लायनीशेजारी. त्या स्टेशनमास्तरने आईबहिणीवरून शिव्या ऐकूनही घेतल्या असत्या कदाचित. पण अण्ण्याने त्याच्या (म्हणजे स्टेशनमास्तरच्या) मावशीला आणि आत्याला केंद्रस्थानी ठेवून शिव्यांची माळ लावल्यावर मास्तरने थेट रेल्वे पोलिसालाच पाठवले. आम्ही एनसीसीचे असल्याने फक्त ताकीद मिळण्यावरच भागले. पण पेटी ऑफिसर नायरने त्यावरून आम्हांला बडबडायची संधी साधलीच. जरा वेळ मुकाट बसलो नि नायरबुवा डुलकायला लागल्यावर किर्लोस्करवाडीला परत टपावर गेलो.
एव्हाना सूर्य मावळायला सुरुवात झाली होती. संधिकालच्या त्या हुरहुरत्या प्रकाशात काहीही वात्रटपणा न करता गप्प बसावे अशी सुबुद्धी अण्ण्या बाब्यासकट सगळ्यांना झाली आणि आम्ही सगळेच वृद्धाश्रमातल्या पेन्शनरांसारखे निरागसपणे टपावर बसून राहिलो.
मिरज येईस्तोवर रात्र झाली. मिरजेतले माझे वास्तव्य संपून दहा वर्षेदेखिल झाली नव्हती, पण त्या दशकभराच्या काळात गाव, निदान स्टेशनाबाहेरचा भाग, फारच बदलल्यासारखा वाटला. काय बदलले आहे ते नीटसे समजत नव्हते, पण काहीतरी खूपखूप चुकते आहे असे जाणवत होते. नंतर उमगले - दुसरी/तिसरीतल्या मुलाच्या एकंदर उंचीमुळे सगळ्या जगाकडे बघण्याचा त्याचा कोन, आणि पर्यायाने दृष्टीकोन, अगदीच वेगळा असतो. लो ऍंगलने कॅमेरा लावल्यासारखा. सगळे 'मोठ्या माणसांचे' जग तुमच्या अंगावर आल्यासारखे वाटते. एकदा तुमची उंची पाच फुटांच्या वर गेली की मग सगळे 'नॉर्मल', काहीवेळेस जरा लहानच, वाटू लागते.
इथे गाडी बदलून मीटरगेजमध्ये बसायचे होते. त्या कोलाहलात अण्ण्याचा चांगलाच उपयोग झाला. पाचेक मिनिटांत एका पार्टमेंटवर ताबा प्रस्थापित करून आम्ही जेवणाच्या विचाराला लागलो. आम्हांला एकेक पुरीभाजीचे पार्सल मिळाले होते, पण एकतर भूक खूपच लागली होती, एका पार्सलने काही झाले नसते. दुसरे म्हणजे बाहेरून खमंग वास नि आवाज येत होते. आणि तिसरे म्हणजे त्या पुऱ्या इतक्या प्राचीन दिसत होत्या की भूक लागलेली असूनही तिकडे लक्ष देववेना. 'माकाकु' मात्र बाहेर यायला तयार नव्हता. गाडी सुटण्याची भीती हे एक कारण. गाडी सुटण्याची अधिकृत वेळ अजून चाळीस मिनिटांनी आहे हे त्याने मानायला नकार दिला. मुख्य कारण हे, की माकाकु पक्का शाकाहारी होता. "अंडीसुद्धा खात नाही" छाप. चारमिनार प्रकरणानंतर आमच्यावर कुठलाही विश्वास ठेवायला तो तयार नव्हता. गाडी सुटायला वेळ आहे यावरही वा बाहेर बिन-अंड्याचे काही पदार्थ मिळतील यावरही. त्यामुळे तो सामानाची राखण करत बसून राहिला. कुणी रोलकॉल घ्यायला आलेच तर त्याला संदिग्ध उत्तर देऊन वेळ मारून न्यायला माकाकु समर्थ आहे अशी समजूत करून घेऊन आम्ही बाहेर गेलो.
बाहेर मुख्यत्वेकरून होत्या त्या बुर्जी-ऑम्लेटवाल्या हातगाड्या. मिरजेत तोवर तरी "आपण आणि 'ते'" अशी फाळणी झालेली नव्हती. त्यामुळे मेंदीने दाढ्या रंगवलेल्या आणि डोक्यावर मुसलमानी टोप्या घातलेल्या त्या मियाँमंडळींच्या व्यवसायाला आम्ही हातभार लावला. परत आलो तर माकाकुने माझे आणि प्रशांतचेही पुरीभाजीचे पाकीट उदरस्थ केले होते. तसेही ते खाण्याचा आमचा विचार नव्हताच. पण आता ते संपलेच आहे म्हणताना आम्ही त्याला फारच ताणला. अखेर आमच्या आरड्याओरड्याला घाबरून त्याने घरून आणलेला बेसनाच्या लाडवांचा डबा आमच्यापुढे केला. वीसेक लाडू होते. प्रत्येकाला कसेबसे पाचपाच मिळाले. प्रशा नि मी ढेकर देऊन 'माकाकु'ला माफ करते झालो. बाब्या आणि अण्ण्या राक्षसकुळातले असल्याने त्यांनी नंतर त्यांचे त्यांचे पुरीभाजीचे पार्सलही संपवले.
एव्हाना गाडी निघण्याची तयारी सुरू झाली. शिट्या वाजल्या आणि डकांव डकांव सुरू झाले. आमचा डबा पार शेवटून दुसरा होता. सगळी जनता झोपायच्या तयारीला लागली. किटमधून ब्लँकेट काढून बर्थवर पसरणे, बूट नीट बर्थखाली ठेवणे, उशाला कपड्यांचे गाठोडे वा तत्सम आकाराची वस्तू योजणे सुरू झाले. आम्हीही आपापले बिछाने घालून परत वरच्या मजल्यावर हवा खायला जायला सज्ज झालो. पेटी ऑफिसर नायर सगळीकडे राऊंड मारून गेला. शेवटी रायबाग-चिकोडीच्या आसपास कुठेतरी आम्ही परत वर बैठक जमवली. यावेळी फक्त जगदाळे बंधू, प्रशा आणि मी एवढेच होतो. माकाकु 'डोके दुखते आहे' म्हणून बाम फासून नि डोक्यावरून ब्लँकेट घेऊन गुडुप झाला होता.
एंजीन आमच्यापासून खूपच लांब होते. त्यामुळे पुढे पाहिले तर फक्त डब्यांची रांगच दिसत होती. आकाश निरभ्र नव्हते त्यामुळे चंद्र असूनही जेमतेम आम्हांला एकमेकांचे चेहरे दिसत होते. आणि वारा तर अगदीच भन्नाट होता. आम्ही दोघे विरुद्ध जगदाळे बंधू अशा भेंड्या सुरू झाल्या. मी नि प्रशा एका डब्यावर आणि बंधूद्वय दुसऱ्या डब्यावर. भेंड्या खेळणे तसे लुटूपुटीचेच होते. कारण घोंगावत्या वाऱ्यामुळे मला प्रशाचे बोलणेदेखिल नीट ऐकू येत नव्हते तिथे समोरच्या डब्यावरून अण्ण्या-बाब्या दुक्कल काय गाते आहे याचा बोध होणे अशक्यच होते. पण एकंदरीत मजा वाटत होती.
मी नि प्रशा एंजिनकडे पाठ करून बसलो होतो. मधून अधून आम्ही माना मागे वळवून पाहायचा प्रयत्न करीत होतो, पण फारसे काही उमगत नव्हते.
मिरजेला आम्ही कॅपस्टनचे पाकिट खरेदी केले होते. त्यातली एक पेटवायच्या उद्योगाला मी नि प्रशा लागलो. माझ्या दोन हातांनी मी 'योगक्षेमं वहाम्यहम' ची खूण केली. प्रशाने त्याचा एक हात लावून त्या घरट्याला अजून बंदिस्त केले आणि दुसऱ्या हाताने पटकन काडी पेटवून ती घरट्यात आणून सिगरेटला आग लावायच्या तयारीला तो लागला. चारदोन काड्या तशाच विझून गेल्या.
रेल्वे 'खडंग-खडाडाक' अशा लयबद्ध चालीने मार्गक्रमणा करीत होती. पुढून येणाऱ्या त्या आवाजात काही बदल झाल्याचे अंधुक जाणवले. ते नीट कळेपर्यंत बाब्याने प्राणभयाने मारलेली "खाली वाका" अशी आरोळी सगळ्या वाऱ्याला मागे सारत कानात घुसली. विचार करायच्या आधी आमची डोकी प्रतीक्षिप्त क्रियेने खाली वाकली. सिगरेट गळून पडली.
काय झाले होते? नदीवर लोखंडी गर्डर्सचा जो पूल असतो (इंग्रजी M वा W हे अक्षर एकामागोमाग एक लिहिल्यावर जसे दिसेल तसे दिसणारा) तो आमच्या मार्गात आला होता. डब्यात आणि गर्डर्समध्ये दोन-तीन फुटांचेच अंतर होते. आम्ही खाली वाकलो नसतो तर शिरच्छेद अटळ होता. बाब्याला अचानक समोर धोका दिसल्यावर कार्ट्याने प्रसंगावधान राखून बोंब मारली आणि अण्ण्याच्या गळ्यात पडून त्याचे डोके खाली झुकवले.
संकट किती अंतरावरून चुकवले आम्ही? मी वारा लागतो म्हणून डब्यावरती गडद खाकी टोपी घालून बसलो होतो. मी खाली वाकताना डोक्यावर अचानक प्रगटलेल्या गर्डरचा स्पर्श त्या टोपीला झाला नि टोपी पडली. खाली नदीचे पाणी क्षीणपणे चमकत होते.
पूल चांगलाच लांब होता. आम्हांला तरी तो तसा वाटला. तशात प्रशांत घसरायला लागला त्यामुळे मला बिलगला. मी डब्याच्या टपावर जे वाट्या उपड्या घातल्यासारखे दिसते त्यातल्या एकाला घट्ट धरून ठेवले होते म्हणून बरे. अखेर पूल संपल्यावर धडाडत्या छातीने लळत-लोंबत खाली उतरलो.
खाली डब्यात सगळीकडे दिवे मालवून निजानीज झालेली होती. बर्थवर आडवे झाल्यावर हुडहुडी भरून आल्यागत झाले. आमचे काही बरेवाईट झालेच असते तर किती काळानंतर सहप्रवाशांना कळाले असते? बेळगावला नाहीतर लोंढ्याला कुणी आमचा कंपार्टमेंट रिकामा का या कुतूहलाने बघितले असते तरच. आणि सामान एकीकडे ठेवून पोरे दुसरीकडे कुठे झोपली असतील अशी कुतूहल वाटणाऱ्याची समजूत पटली असती तर? थेट गोव्याला गेल्यावर रोलकॉल घेतानाच.
मॅरेथॉन पळाल्यावर येते तशी ग्लानी अचानक दाटून आली आणि मी अलगद झोपेत शिरलो. जाग आली ती बाब्याच्या आरड्याओरड्याने. पहाटेचे पाच वाजले असतील. बाब्या आरडत का होता, तर दूधसागरचा धबधबा पाहण्यासाठी. पहाटेच्या अंधारात दिसला असा नाही नीटसा, पण त्याचा घोंगावणारा आवाज मात्र मनात भरला.
उजाडता उजाडता रेल्वे मडगांवला पोहोचली. स्टेशनवर उतरून रोलकॉल झाला. मग आम्हांला बेसकँपला घेऊन जाणाऱ्या ट्रकची वाट बघत बसलो. तेवढ्यात अण्ण्याला शोध लागला की स्टेशनसमोरच एका खोपटवजा रेस्टॉरंटमध्ये आंबोळी मिळतात. मग ट्रक येईस्तोवर आंबोळी सांबार खाऊन तृप्त झालो.
गोव्याची हवा तिथे उतरल्या उतरल्या आमच्या स्वागताला हजर होती. शब्दांत सांगणे कठीण आहे, पण जे गोवाप्रेमी आहेत त्यांना मान्य होईल की गोव्यातली दमट हवा ही किनारपट्टीवरील इतर ठिकाणच्या दमट हवेपेक्षा वेगळीच असते. त्यात थोडा माडीचा वास, थोडा काजू भाजल्याचा वास, थोडा आंब्याचा पातेरा जाळल्याचा वास, थोडा ताज्या माशांचा वास असे मिश्रण असते. अगदी घामाघूम व्हायला झाले तरीही कुठेतरी ते घामाघूम होणे मुंबईत वा पनवेलीत घामाघूम होण्यापेक्षा खूपच सुसह्य असते. आणि तिथल्या संस्कृतीतला 'सुशेगात'पणा हवेतूनही तुमच्या तनामनात भिनत राहतो. माझ्यासाठी तरी गोव्यात उत्तमोत्तम सामिष पदार्थ (मासे, पोर्क, बीफ, मटन), अद्वितीय पेये (फेणी, किंग्स बिअर) या गोष्टी मिळतात हा बोनस. तिथली हवा आणि 'सुशेगात'पणा एवढेदेखिल पुरेसे आहे... असो.
बेसकँप मडगांवजवळ नावेलीमधल्या रोजरी हायस्कूलमध्ये होता. मागल्या मोठ्या मैदानात एका कोपऱ्यात झापे लावून आणि चर खणून सामायिक स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली होती. विरुद्ध कोपऱ्यात रसोई होती. मधले मैदान परेडसाठी. रहायला शाळेच्या खोल्यांतली बाके काढून जागा तयार केली होती. प्रशा अंडर ऑफिसर नि मी कॉर्पोरल म्हणताना आम्ही रुबाब गाजवत आमच्या चमूसाठी एका कोपऱ्यातली हवेशीर खोली पटकावली. माकाकु लान्स कॉर्पोरल होता. आम्ही तिघे सोडता 'सेकंड महाराष्ट्र'मधून बाकी सारे कॅडेटसच होते.
आधी नाश्ता करून रोलकॉल झाला. मग सामान नीट लावल्यावर अंघोळी आणि तत्सम कृत्ये, मग जेवण. कँप गोव्यात असला तरी आचारी मिलिट्रीचेच होते. त्यामुळे पीठमाखल्या अर्ध्याकच्च्या रोट्या, 'कुणाच्या बापाला कळणार नाही' अशा पैजेवर केलेली अगम्य भाजी, भाताचे ढेकूळ आणि डाळपाणी द्वैत बाळगणारे वरण. पुण्याचा एअरफोर्स एनसीसीचा एक अरोरा म्हणून मुलगा होता. तो आर्मी कुटुंबातून आलेला होता, आणि असे चारदोन कँप आधीच करून आलेला होता. त्याने ट्रिक शिकवली. अल्युमिनियमच्या थाळीत आधी भाताचे ढेकूळ घ्यायचे. ते फोडून त्यावरच डाळ नि भाजी घालायची. एनॅमलच्या मगमध्ये जास्तीची भाजी घेऊन ठेवायची. आणि रोट्या हातातच घेऊन तुकडे तोडत थाळीतल्या काल्याबरोबर खायचे. 'माकाकु'ला हे अजिबातच झेपले नाही. शेवटपर्यंत तो थाळीत एका कोपऱ्यात भात, त्यावर डाळ, मगमध्ये भाजी आणि थाळीच्या दुसऱ्या भागात रोट्या असे 'नीट' जेवायचा प्रयत्न करीत राहिला.
जेवणानंतर कँप कमांडंट कर्नल चोप्राने सगळ्यांना मधल्या चौकात एकत्र केले. "डिसप्लन, आग्या का पालन, भारत माँ के सपूत, जोश और फुर्ती के साथ" असले बरेच काही शब्द वापरून त्याने आम्हांल तासभर पिडले. शेवटी "इस कँप की डिसप्लन सुभेदार हरमिंदरसिंह के मजबूत कंधोंपर है" असा डायलॉग मारून 'सुभेदार हरमिंदरसिंह' हा साडेसहाफुटी धिप्पाड सरदारजी आमच्यासमोर पेश करण्यात आला. "सुभेदारसाहब, कुछ बोलना है बच्चोंको?" या कर्नल चोप्राच्या प्रश्नाला सुभेदारसाहब जे उत्तरले ते धोक्याची घंटी घणाघणा वाजवून गेले. "नही जी, मुंहसे क्या बोलना? मेरे तो हाथ ही बोलते है".
दुपारी जरा डुलकी काढली. गोव्यात मी पहिल्यांदा येत नव्हतो; आधी आलेलो तो कुटुंबियांसमवेत 'मोगल लाईन्स'च्या बोटीने मुंबईहून. चोवीस तासांच्या त्या प्रवासाबद्दल नंतर केव्हातरी. पण एकट्याने गोव्यात येण्याची ही पहिलीच वेळ होती. संध्याकाळी जरा बाहेर पडून जवळपास भटकंती करावी असा बेत शिजला. बाब्याने शोध लावला होता की शाळेच्या मुख्य दरवाजावर जरी पाहरा होता तरी स्वच्छतागृहाच्या एका कोपऱ्यातून कुंपण ओलांडून एका छोट्या गल्लीत निघता येत होते. संध्याकाळचा चहा झाल्यावर त्यातून सटकलो. नासिकला भोंसला मिलिटरी स्कूलमधूनही अशा चोरवाटा धुंडाळल्या होत्याच.
संध्याकाळी रोलकॉलला आम्ही वेळेत परतलो नाहीच तर 'माकाकु'ला सांगून ठेवले होते की "आमच्यातल्या एकाची तब्येत बरोबर नसल्याने अंडर ऑफिसर आणि कॉर्पोरल त्याला घेऊन औषधे आणायला गेले आहेत" असे जाहीर कर. तब्येत बरोबर नव्हती बाब्याची. थोरला भाऊ म्हणून काळजी घेण्यासाठी अण्ण्या त्याच्यासोबत येणे अगदीच तार्किक होते.
आम्ही बाहेर निसटलो नि गल्ल्याबोळांतून हिंडत सुटलो. अस्सल गोव्याच्या परंपरेप्रमाणे त्या गल्लीबोळांतूनदेखिल छोटछोट्या झोपड्यांमधील 'बार' भरपूर होते. मी आणि प्रशांत एकमेकांकडे नुसते पाहत होतो. अखेर त्याचा धीर सुटला. त्याने खिशातून नाणे काढले नि मला म्हणाला, "छापा की काटा"? मी म्हटले "छापा". त्याने नाणे उडवले ते नेमके एका गटारात पडले.
प्रशांतने हार मानली नाही. "मागच्या वेळेस मी जिंकलो होतो, त्यामुळे या वेळेस छापाच पडला असता. तू बोल".
"चल एकेक ग्लास बिअर घेऊ या" मी तत्परतेने वदलो.
अण्ण्या या 'जादूचे द्रव्य' प्रकरणातून कसा कुणास ठाऊक, अलिप्त होता. बाब्याचा काय हिशेब होता देव जाणे, पण तो अण्ण्याच्या पुढ्यात काही घेणे शक्य नव्हते. पण नुसते बरोबर यायला दोघेही उत्साहात तयार होते. का ते नंतर लक्षात आले. आम्ही बिअर ढकलत असताना दोघेही काजू खात बसले. बिअरपेक्षा काजूचेच पैसे जास्त गेले.
आम्ही निवांतपणे प्रत्येकी एकेक बिअर, दोन दोन कॅपस्टन आणि बऱ्याचशा वायफळ गप्पा असे करून बेसकँपला परतलो तोवर रोलकॉल संपलाही होता. आम्ही दोघेही मूठमूठ बडीशेप बैलाच्या तन्मयतेने रवंथ करीत परतलो होतो. त्याआधी बिअरनंतर अर्धाअर्धा कच्चा कांदाही कराकरा चावला होता. त्यामुळे आता आलाच तर वास कांद्याचाच येईल या विचाराने आम्ही तसे आश्वस्त झालो होतो. पण जमलेच तर शक्यतो त्या खवीसासमोर मुद्दामहून जाणे टाळावे या विचाराने आम्ही गुपचूप आमच्या प्लॅटूनमध्ये घुसून उभे राहिलो. आसपास चौकशी केली तेव्हा कळाले की प्रत्येकाची मोजणी न करता हरमिंदरसिंग "सब ठीक, सब हाजिर"? असा नारा देत सगळ्यांसमोरून भराभरा चालत गेला. 'माकाकु'ने काही आम्ही अनुपस्थित असल्याचे तोंड उचकटून सांगितले नाही. या पावट्याने असे का केले असेल? त्यालाच विचारावे म्हणून पुढच्या रांगेत पाहिले तर तो नाही. मग दिसले की तो मैदानाच्या कोपऱ्यात हरमिंदरसिंगसमोर उभा राहून काहीतरी बोलायचा प्रयत्न करीत होता.
"एवढा लटलटतोय का रे तो?" मला शंका आली. "सकाळी गेला नव्हता पाकिस्तानला. आता हरमिंदरसिंगसमोर उभा राहिल्यावर एकदम कळ आली असेल ती दाबतोय" प्रशांतने तत्परतेने उत्तर दिले. काहीतरी बोलणे झाले आणि हरमिंदरसिंह तरातरा आमच्या प्लॅटूनसमोर आला. मागोमाग माकाकु. आम्ही शक्य तेवढ्या साळसूदपणे उभे राहिलो. हरमिंदरने फटाफट आमची गिनती केली आणि चपळाईने मागे वळून 'माकाकु'चे थोबाड फोडले. "मा@#@#, सुव्वरकी औलाद, गिनतीतक नही आती, चले @# हिलाते एनसीसीमे. @#@# समझ रखा है मुझे? फिरसे अगर होशियारी दिखाई तो रातभर परेड करवाऊंगा".
थोबाड फुटण्याच्या आवाजाने सगळीकडे असलेली शांतता एकदम तिपटीने वाढली. पाचेक मिनिटे झाल्यावर हरमिंदरसिंगने "परेड डिसमिस" अशी ऑर्डर सोडली.
मग कळले काय झाले होते ते. हरमिंदरसिंग समोरून "सब ठीक, सब हाजिर"ची ललकारी देत जात असताना 'माकाकु'ला आम्ही गैरहजर असल्याचे सांगायला धीर झाला नाही. त्यामुळे तो गप्प बसला. पण नंतर हरमिंदर दूर गेल्यावर भीती कमी झाली आणि सदसद्विवेकबुद्धीची टोचणी वाढायला लागली. अखेर फारच टोचायला लागल्यावर तो "चार गैरहजर" असा रिपोर्ट करायला हरमिंदरकडे गेला. हरमिंदरला का कुणास ठाऊक, माकाकु त्याची खेचतो आहे असा संशय आला (हा एक निखालस विनोद होता ते सोडा; बेडूक सिंहाची खेचणार!). तरातरा तो आमच्याकडे आला नि आमची गिनती केल्यावर त्याचा संशय खात्रीत परावर्तित झाला. परिणामस्व॑रूपी 'माकाकु'च्या कानाखाली गणपती निघाला. खोटे असो वा खरे, काय ते लौकरात लौकर बोलून टाकावे, उगाच 'सांगू की नको' करत बसू नये हा धडा 'माकाकु'ला चांगलाच परिणामकारकरीत्या मिळाला. असे आम्हांला तरी वाटले.

गेले ते दिन (भाग १)
गेले ते दिन (भाग २)
गेले ते दिन (भाग ४)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा! हे जंक्शान काम झालं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझे पैसे घालून क्रीमरोल खायचा झालाच तर मी एकट्याने आणि दुसरे कुणी पाहण्यच्या आत पटकन खाण्यावर भर देत असे.

ROFL आई ग्ग!!

माझ्या दोन हातांनी मी 'योगक्षेमं वहाम्यहम' ची खूण केली.

हाहाहा कळलं Smile
____
क-ह-र!!! एकदम झकास वाटला हा भागही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह....दरवेळेस वाचतो..आणि प्रत्येक वेळेस तितकीच मजा येते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाही भाग मस्ताड !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0