Skip to main content

शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ५

व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४

----

सोहिरोबानाथ अंबिये ह्या संतकवींच्या खालील ओळींचे इंग्रजीत भाषांतर कसे कराल?

दिसणे हे सरले
अवघे प्राक्तन हे नुरले
आलो नाही, गेलो नाही
मध्ये दिसणे ही भ्रांती

बॅटमॅन Tue, 07/07/2015 - 15:48

आध्यात्मिक साक्षात्काराचे वर्णन दिसते. कालातीत अवस्थेचा अनुभव, ज्यामुळे "आलो नाही गेलो नाही" अर्थात जन्ममृत्यू मिथ्या, "मध्ये दिसणे ही भ्रांती" = जग/आयुष्य हे मिथ्या.
तसा अनुभव आल्यामुळे कर्म-कर्मफल या भौतिक पायर्‍यांच्या पलीकडे गेलो. करायचे कर्म शिल्लक राहिले नाही, सबब प्राक्तन अर्थात पूर्वसंचित म्ह. मागील जन्मापासून आलेले कर्मांचे ओझे आता नुरले. त्यामुळेच 'दिसणे हे सरले' म्ह. नेहमीच्या भौतिक नजरेने आता पाहू शकत नाही. वगैरे.

===========================================

इंग्रजी भाषांतर.

The worldly vision fadeth away
As the desires no more hold their sway
Neither have I arrived nor will I depart
'tis nothing but an illusion at heart
To tell the journey between apart

चिंतातुर जंतू Tue, 07/07/2015 - 23:09

In reply to by बॅटमॅन

धन्यवाद. मूळ कवितेत एक थक्क करणारा साधेपणा आहे आणि अर्थगहनताही. शिवाय, अर्थ लावण्याची जबाबदारी काही प्रमाणात वाचकावर टाकलेली आहे. मला हे गुणधर्म शक्य तितके भाषांतरात उतरलेले आवडतील.

बॅटमॅन Tue, 07/07/2015 - 23:18

In reply to by चिंतातुर जंतू

वेल, दॅट इज़ द बेस्ट आय कॅन डू. बाकी मूळ व्हर्जनमध्ये अर्थ लावण्याची जबाबदारी वाचकांवर कितपत टाकलेली आहे? माझ्या मते फारशी नाही.

चिंतातुर जंतू Wed, 08/07/2015 - 00:13

In reply to by बॅटमॅन

>> बाकी मूळ व्हर्जनमध्ये अर्थ लावण्याची जबाबदारी वाचकांवर कितपत टाकलेली आहे? माझ्या मते फारशी नाही.

काय दिसणं सरलं, ते वाचकानं ठरवायचं आहे. पण, 'worldly vision'मध्ये ते अर्थनिर्णयन आधीच केलेलं आहे. 'प्राक्तन नुरणे' अर्थनिर्णयनाला अधिक खुलं आहे, पण 'desires no more hold their sway' अधिक स्पष्ट आहे.

बॅटमॅन Wed, 08/07/2015 - 00:56

In reply to by चिंतातुर जंतू

मेबी. मला वाटतं त्यानुसार त्यातल्या त्यात प्राक्तन नुरण्यापेक्षाही 'दिसणे हे सरले' ही ओळ जास्त ओपन एंडेड आहे.

बॅटमॅन Wed, 08/07/2015 - 00:55

In reply to by आदूबाळ

मेबी, पण मग "मध्ये दिसणे ही भ्रांती" ही ओळ येत नाय ना. भ्रांती आहे हे चौथी ओळ सांगते, पण काय भ्रांती आहे ते नाय कळत...

पिवळा डांबिस Wed, 08/07/2015 - 08:53

In reply to by बॅटमॅन

वेल डन, मिष्टर ब्याटम्यान!!!
बाकी याचं इंग्रजी भाषांतर नक्की कशासाठी करायचंय?
काय ओबामाला ऐकवणार आहांत?
या आमच्या चिंजंना उचापतीच फार!!!!
:)

गवि Wed, 08/07/2015 - 11:06

In reply to by पिवळा डांबिस

ओबामांसाठी:

मी हाय कोली, सोरिल्या डोली
वसईचे किनारी
मारतीन कोली हानल्यान गोली
गो चल जाऊ बाजारी

याचं इंग्रजी भाषांतर करायला हवंय..

चिंतातुर जंतू Wed, 08/07/2015 - 18:47

In reply to by पिवळा डांबिस

>> या आमच्या चिंजंना उचापतीच फार!!!!

तसं नव्हे हो, हुच्चभ्रू विचारजंतांना लिहितं करण्यासाठी आमचा हा खारीचा वाटा समजा (पक्षी: ट्यार्पी वाढवायला मालकांनी नेमलेले दिग्विजय सिंग हो आम्ही!)

आदूबाळ Wed, 08/07/2015 - 22:01

In reply to by चिंतातुर जंतू

ट्यार्पी वाढवायला चिंजंना नेमणे म्हणजे विपश्यनेची झैरात करायला निखिल वागळ्यांना नेमण्यासारखं आहे.

चिमणराव Tue, 07/07/2015 - 21:24

हे फोटो पुस्तकाचे
( कॅापी राइट १९६२ च्या पुस्तकास नसावे बहुतेक तरी शंका असल्यास फोटो उडवावेत )

मुखपृष्ठ

२)आतील पान

चिंतातुर जंतू Wed, 08/07/2015 - 11:45

In reply to by धनंजय

आशय आणि घाट दोन्हींच्या सर्वात जवळ जाणारं म्हणून हे भाषांतर आवडलं. उदा: बॅटमॅनच्या किंवा जयदीपच्या 'vision' ह्या निवडीपेक्षा 'seeing'मध्ये सहजसाधेपणा आहे. फक्त, 'receded', 'Predestiny' आणि 'conceded' ऐवजीसुद्धा असेच काही चपखल साधेसहज पर्याय आवडतील. (अर्थात, 'प्राक्तन' हा शब्ददेखील काही सहजसाधा नाही, हे मान्यच.)

चिंतातुर जंतू Wed, 08/07/2015 - 11:54

In reply to by रोचना

'प्राक्तन'साठी मोल्सवर्थ Fate, fortune, destiny असे अर्थ देतो. ते मानले, तर Fate कदाचित सर्वात साधा आहे.

जयदीप चिपलकट्टी Wed, 08/07/2015 - 05:59

सोहिरोबानाथ अंबिये ह्या संतकवींच्या खालील ओळींचे इंग्रजीत भाषांतर कसे कराल?
दिसणे हे सरले

अवघे प्राक्तन हे नुरले

आलो नाही, गेलो नाही

मध्ये दिसणे ही भ्रांती

The vision is gone
What was writ, is withdrawn
I wasn't here, nor have I left
The vision in-between is a mirage.

प्रसन्ना१६११ Wed, 08/07/2015 - 13:48

तिन्ही अनुवादकांना माझा नमस्कार!
विशेषतः बॅटमॅन ने त्वरीत केलेला अनुवाद खूप छान!
'अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरीभजनावीण काळ घालवू नको रे' या ओळींचाही अनुवाद वाचायला आवडेल.

पिवळा डांबिस Fri, 10/07/2015 - 02:54

In reply to by बॅटमॅन

तसं म्हंटलं तर जमाना ला सोसायटी हा इंग्रजी प्रतिशब्द होऊ शकेल.
पण जर इंग्रजांचा इतिहास पहिला तर ते त्यांना जे काही बरंवाईट करायचं ते गुपचूपपणे करून मोकळे होतात!
"जमाना क्या कहेगा" ची फारशी चिंता इंग्रज करत नाहीत!!!
;)

धनंजय Fri, 10/07/2015 - 10:13

In reply to by बॅटमॅन

लोगों का काम है कहना...
आणि
ज़माना क्या कहेगा?

यांच्यात फारसा फरक आहे का?

नसल्यास "what will people say" ही इंग्रजी उक्ती चालून जावी.

अजो१२३ Fri, 10/07/2015 - 11:07

In reply to by बॅटमॅन

जमाना शब्दाचे १. एक विशिष्ट काळ, २.संदर्भातले सोडून समाजातले अन्य लोक, ३.एका विशिष्ट काळातील लोक, ४.त्यांचे विचार, आचरण आणि ५. त्यांच्या अपेक्षित प्रतिक्रिया असे अर्थ काढता येतील.
सुस्पष्ट काळ आणि सुस्पष्ट लोक अशा दोन्ही टिंज असणारा शब्द इंग्रजीत नसावा.

जमाना क्या कहेगा मधल्या अभिप्रेत जमान्यासाठी पॉप्यूलेस हा शब्द सर्वात जाईल.

चिंतातुर जंतू Fri, 10/07/2015 - 13:41

In reply to by बॅटमॅन

>> पण "ज़माना क्या कहेगा" या ओळीसाठी काय शब्द असेल?

आधी 'छोड दो आंचल'चं चपखल इंग्रजी काय कराल ते सांगा, मग जमान्याला बघून घेऊ.

बॅटमॅन Fri, 10/07/2015 - 13:54

In reply to by चिंतातुर जंतू

अगोदर जमाना बघू, आँचल तर अन्ट्रान्सलेटेबल वाटतो आम्हांला.

घाटावरचे भट Fri, 10/07/2015 - 16:15

In reply to by बॅटमॅन

याचं करा बरं भाषांतर -

ठाडी रहो ब्रजनार सुंदरवर,
रुप की घटा छटा नयी छबीली,
जाही देख मोही नारी नर

अतिसुंदर दृगमान ललित लखी
कांनन में सोहे मोतियन लर

;-)

बॅटमॅन Fri, 10/07/2015 - 16:40

In reply to by घाटावरचे भट

May you be beautiful as ever, o damsel of Braj;
Thou art ever new, fresh and vivacious;
Luring men & women alike toward thee.

तूर्तास इतकेच सुचते आहे.

बाकी दुसर्‍या कडव्यात "लखी" हा काय प्रकार आहे ते कळालं नाही त्यामुळे तूर्त तिथे पास.

रोचना Mon, 13/07/2015 - 11:32

In reply to by घाटावरचे भट

कोणाची कविता आहे ही?
'ठाडी रहियो' वाचलं की मीना कुमारी डोळ्यासमोर येत येतीय. त्यामुळे ब्रजनार सुंदरवर फारच खटकतय :-)

बॅटमॅन Fri, 10/07/2015 - 12:11

@ धनंजयः होय, दोहोंत फारसा फरक नाही. बाकी तुम्ही दिलेली उक्ती म्हणजे इंड्यन फ्रेज़च आहे तश्शी इंग्रजीकृत केलेली वाटतेय, ती अगोदरपासूनच तिथे आहे का? आयदर वे अर्थ चपखल आहे, फक्त ओरिजिनबद्दल विचारायचे होते.

@अजो: अर्थ बरोबरच. पॉप्युलेसही चालून जावा.

गवि Fri, 10/07/2015 - 16:50

In reply to by बॅटमॅन

त्या नतद्रष्ट रिमिक्समुळे मूळ गाण्याची चाल गाडली गेली. एकदा तर मला प्रयत्न करुनही मूळ चाल म्हणता येईना. क्या करेगा आ.. असंच डोक्यात फिट्ट झाल्तं.

१. रिमिक्स प्रकाराविषयी घाऊक तिटकारा नाही. लेस्ली लुइसचे काहीकाही आवडतात.

बॅटमॅन Fri, 10/07/2015 - 16:51

In reply to by गवि

हा हा हा, खरंय.

तदुपरि नतद्रष्ट ही शिवी कशी काय असू शकते? की खालमुंडी पाताळधुंडी याच्याशी कनेक्षण आहे?

रोचना Mon, 13/07/2015 - 11:33

मागे धनंजय आणि नंदन बरोबर "इंपरेटिव" चा मराठीत चांगला अनुवाद कसा होऊ शकेल याची थोडी चर्चा झाली होती. ती या भाषांतरचर्चेवरून आठवली. इथे काही दासबोधातल्या ओव्या आहेतः मूळ ओवींतल्या शब्दांची 'इकॉनोमी' राखून त्यांच्या उपदेशपर स्वराचा कसा अनुवाद करता येईल?

शुद्ध नेटके ल्याहावे, लेहोन शुद्ध शोधावे
शोधोन शुद्ध वाचावे, चुको नये

अति वाद करूं नये, पोटीं कपट धरूं नये
शोधल्याविण करूं नये, कुळहीन कांता

समईं यावा चुकों नये, सत्वगुण सांडूं नये
वैरियांस दंडूं नये, शरण आलियां

(ह्या फक्त नमुन्यादाखल घेतल्या आहेत)

रोचना Wed, 22/07/2015 - 11:43

In reply to by अजो१२३

मला ओव्यांमधील "इंपरेटिव मूड" (do it!) म्हणजे आदेशार्थी शैलीबद्दल (असे करावे, तसे लिहावे, शोधावे) विचारायचे होते. अशा ओव्यांच्या इंग्रजी भाषांतरात, मूळ ओवीच्या शब्दांच्या काटकसरीला अनुसरून हा आज्ञार्थ कसा आणता येईल?

चिंतातुर जंतू Wed, 22/07/2015 - 13:02

In reply to by रोचना

>> अशा ओव्यांच्या इंग्रजी भाषांतरात, मूळ ओवीच्या शब्दांच्या काटकसरीला अनुसरून हा आज्ञार्थ कसा आणता येईल?

काटकसरीचं सांगता येत नाही, पण one ought to ह्यात तो अर्थ येईल का?

रोचना Wed, 22/07/2015 - 16:17

In reply to by चिंतातुर जंतू

Ought बरोबरच आहे, पण ओवीत वापरून दाखवता येईल का?
धनंजयने केलेला अनुवाद सध्या हाताशी नाही, नंतर डकवते, पण त्याच्या सल्ल्यावरून मी असा प्रयत्न केला होता:

Precise and neat be the writing, the written text corrected
Right be the reading, errors avoided

यात मूळ ओवीतला terseपणा असमाधानकारकपणे का असेना, येतो. त्यात "ought" अभिप्रेत आहे हे मान्य, पण One ought to write neatly and correctly खूप शब्दबंबाळ वाटतं.

अति वाद करूं नये, पोटीं कपट धरूं नये
शोधल्याविण करूं नये, कुळहीन कांता
Don't prolong arguments, or bear malice within
Take a wife after ensuring her free of sin

किंबहुना सर्वसुखी Thu, 23/07/2015 - 00:25

In reply to by रोचना

करू नये , जाऊ नये हे आज्ञार्थकापेक्षा विध्यर्थ आहे असे म्हटले तर? जसे सत्यं ब्रूयात् : सत्य बोलावे !!
(संस्कृतात विधिलिङ् असा स्वतंत्र लकारच आहे, पण तो स्वतंत्र चर्चेचा धागा होईल, तेव्हा ते असो!)

रोचना Thu, 23/07/2015 - 10:07

In reply to by किंबहुना सर्वसुखी

म्हणजे desiderative mood का? हो, बहुतेक आज्ञेपेक्षा उपदेश आहेत म्हणता येईल.
पण अजून किती प्रकारे या शैलीचा अनुवाद होऊ शकतो याबद्दल कुतूहल आहे.

बॅटमॅन Wed, 22/07/2015 - 17:07

In reply to by रोचना

Argue not ad infinitum,
Nurse not malice within,
Take not a lowly wife unheeded.

Fail not to be of use when needed
Abandon not thy righteousness ever
Punish not thy surrendered enemies

पहिली ओवी मात्र बाउन्सर जातेय. टर्सपणा काही केल्या आणता येत नाहीये.

पिवळा डांबिस Thu, 23/07/2015 - 10:21

In reply to by बॅटमॅन

Take not a lowly wife unheeded.
याऐवजी,
Take not a lowly bride, unheeded.
हे कसं वाटतं? कारण,
Once a bride becomes a wife, she is no longer lowly!

(च्यायला, आम्हाला काय चिंजंनी झपाटलं की काय? ह्या अश्या विषयांवर येऊन प्रतिक्रिया द्यायला लागलो!!!!)
:)

Nile Wed, 22/07/2015 - 20:46

In reply to by रोचना

शुद्ध नेटके ल्याहावे, लेहोन शुद्ध शोधावे
शोधोन शुद्ध वाचावे, चुको नये

अति वाद करूं नये, पोटीं कपट धरूं नये
शोधल्याविण करूं नये, कुळहीन कांता

कृपया असल्या ओळी मराठी संस्थळांवर लिहू नयेत, लोकांना वाईट सवयी लागतात. संपादकांनो, लक्ष घाला रे, काय झोपा काढताय काय?

मेघना भुस्कुटे Wed, 22/07/2015 - 11:11

In reply to by अनुप ढेरे

मूळचा वंश कुठला आहे त्यावर फरक करतात का म्हणजे? कदंब देशी, गुलमोहर एक्जॉटिक, साकूरा फॉरिन - असं?

पिवळा डांबिस Wed, 22/07/2015 - 11:16

In reply to by अनुप ढेरे

अनिवासी भारतीय फॉरिन नसतात! त्यांची पोरं ही फॉरिन!!
बाकी अनिवाश्यांमध्ये अनेक एक्जॉटिक पाहिल्या आहेत!!! ;)

रोचना Wed, 22/07/2015 - 11:12

In reply to by मेघना भुस्कुटे

दोन्ही समानार्थी आहेत, पण एक्झॉटिक मधे सहसा अपरिचित गोष्ट, व्यक्ती, बाब वगैरेंबद्दल आकर्षण, कौतुहल अभिप्रेत असते. सहसा म्हणते कारण तो शब्द नकारार्थी सुद्धा वापरलेला पाहिला आहे. वर आपल्याकडे "फॉरेन"लाच या अर्थाने वापरले जात असे (वा! फॉरेनहून आणलेले दिसते!), पण तसा तो शब्द सर्वत्र इंग्रजी बोलीत तसा वापरला जात नसावा.

मेघना भुस्कुटे Wed, 22/07/2015 - 11:19

In reply to by रोचना

हां. व्याख्या पाहून तरी असंच वाटलं होतं. विदेशी मुळाचा / मूलविदेशी आणि परदेशी / परकीय असं भाषांतर केल्यास अर्थछटेतला फरक काही अंशी तरी पकडता येईल का?

रोचना Wed, 22/07/2015 - 11:48

In reply to by मेघना भुस्कुटे

भाजीपालांच्या प्रजातीबद्दल असले तर हो, हरकत नाही. कारण एक्जॉटिक प्रजातींच्या संदर्भात सर्रास वापरले जाते, त्यात बेंद्रिणीचा आकर्षकपणा अभिप्रेत नाही!

मेघना भुस्कुटे Wed, 22/07/2015 - 11:20

In reply to by पिवळा डांबिस

अं? बेन्द्रीण फॉरिन का म्हणे? बिचारीनं पालेकरांच्या म्हराटी सिनेमात कामपण केलंय. ;-)

पिवळा डांबिस Wed, 22/07/2015 - 11:23

In reply to by मेघना भुस्कुटे

तरीपण ती फारिनच!!
आता आम्ही तुम्हाला 'आभ्यास वाढवा' असं म्हणणं म्हणजे काजवेने सूरजको बत्ती दिखानेके माफिक हय!!!
:)

पिवळा डांबिस Wed, 22/07/2015 - 11:31

In reply to by मेघना भुस्कुटे

सुलोचनाबाई (चांगल्या अर्थाने) देशी आणि एक्जॉटिकही!!!
मॉड्रिक्षितच काय पण गेला बाजार अश्विनी भावे देखील देशी!!!
उगीच पाट मांडून परदेशात ग्येलं म्हंजी काय मानूस फारिन व्हत नाय मेघनाताय!!!
:)

मस्त कलंदर Wed, 22/07/2015 - 19:20

In reply to by पिवळा डांबिस

"पाट" आणि "लग्न" यात फरक आहे. माझ्या माहितीप्रमाणे मुहुर्तावर लागणारे, सर्वांच्या उपस्थितीतले ते लग्न आणि बिजवराशी केलेला विवाह किंवा एकूणातच दुसरेपणावरचे मोठा गाजावाजा न करता केले जाते तो "पाट". "पाट लावणे" त्यामुळे शिवीसारखा वापरला जाणारा वाक्यप्रचार आहे. काही खानदानी(!) मराठा जातीच्या लोकांमध्ये दुसरेपणाच्या बायकोच्या संततीसोबत लग्न करणे कमीपणाचे मानत. आता इतर महाराष्ट्राचे माहित नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात वर्/वधू गावातला आहे की वाडीत (अगदीच लहान खेडे) यावरूनही लग्ने मोडत. सध्या परिस्थिती बदलली असावी अशी आशा आहे.

इथं पिडां काकांनी पाट मांडणं म्हटलंय, पण तरीही हा वाक्यप्रचार आठवला म्हणून लिहिलं झालं. :-)

बॅटमॅन Wed, 22/07/2015 - 19:53

In reply to by मस्त कलंदर

पाट लावणे आणि पाट मांडणे यात फरक आहे बहुधा. पाट मांडणे म्ह. चूल मांडण्यापैकी तर नव्हे?

पिवळा डांबिस Wed, 22/07/2015 - 22:11

In reply to by मस्त कलंदर

आम्हाला चांगल्या अर्थाने लग्न लावणे असंच म्हणायचं होतं.
पण जर काही वाईट अर्थ नकळत ध्वनित झाला असेल तर त्याला आमचं ग्रामीण भाषेचं अज्ञान कारणीभूत आहे.
आणि त्याबद्दल क्षमस्व.

मस्त कलंदर Thu, 23/07/2015 - 00:20

In reply to by पिवळा डांबिस

तुम्ही पाट मांडणेच म्हणाला आहात असं मी शेवटच्या ओळीत लिहिलंय. फक्त त्यावरून जे आठवलं ते 'शब्दच्छटा-अर्थ' या विषयाला वाहिलेल्या धाग्यावर लिहिलंय हो..

ऋषिकेश Thu, 23/07/2015 - 08:34

In reply to by मेघना भुस्कुटे

एक्जॉटि़क आणि फॉरिन

मी सहसा एक्जॉटिकला नवखे या अर्थछटेने वापरतो तर फॉरीन हे बाहेरचे/परके इत्यादी.

देशी/फॉरीन दोन्ही गोष्टीही एक्जॉटिक असु शकतात असा माझा समज आहे. हे बरोबर का?

धनंजय Thu, 23/07/2015 - 14:19

In reply to by मेघना भुस्कुटे

अजब, परदेशी.
The idea sounds exotic.
The idea is foreign to me.
कल्पना अजब आहे.
कल्पना माझ्या गावची नाही (परदेशी शब्दाकरिता या संदर्भात पर्याय).

मेघना भुस्कुटे Thu, 23/07/2015 - 14:42

In reply to by धनंजय

अजब आणि अनवट हे दोन्ही शब्द आवडले.

हे इथे थेट संबंधित नाही. पण त्याबरोबरीनं सुरस आणि चमत्कारिक ही जोडीनं नांदणारी दोन विशेषणंही आठवली.

बॅटमॅन Thu, 23/07/2015 - 14:47

In reply to by मेघना भुस्कुटे

सुरस आणि चमत्कारिक हे शब्द जसे वापरले जातात त्यात अपरिचितपणा अभिप्रेत नाहीसे वाटते.

मेघना भुस्कुटे Thu, 23/07/2015 - 14:57

In reply to by बॅटमॅन

'चमत्कारिक'मध्ये नाहीय? काय की. तसंही हे थेट संबंधित नाहीच. अजब, अनवट, अनोखा यांवरून आठवलं, इतकंच.

बॅटमॅन Thu, 23/07/2015 - 15:01

In reply to by मेघना भुस्कुटे

इन अ सेन्स आहे. पण त्यातही सरप्राईज एलेमेंटच जास्त आहे असे वाटते. प्रत्येक अपरिचित गोष्ट चमत्कारिक नसते आणि व्हाईसे व्हर्सा.

नंदन Thu, 23/07/2015 - 15:58

जे जे आपल्या देशातलं/संस्कृतीतलं/भाषेतलं नाही; त्याबद्दल वाटणारं परकेपण/दूरस्थपणा/भीती + त्यापासून सावधान राहण्याचा इशारा + त्याच वेळी त्यातल्या काही गोष्टींच्या नावीन्याबद्दल (अजनबी = अरेबिकमध्ये फॉरेनर) किंवा वैचित्र्याबद्दल (स्ट्रेंज!) वाटणारं आकर्षण - याचं प्रतिबिंब भाषेतही पडलेलं दिसून येतं. 'फॉरेन' हा ढोबळ विदेशीपणा दाखवणारा शब्द, पण 'एक्झॉटिक' हा त्यापैकी जे आकर्षक, वेगळं वाटतं ते दर्शवणारा शब्द असावा, असं वाटतं. (याच संदर्भात स्ट्रेंजर२,३, आऊट-लँडिश हे शब्दही पहा.)

'फॉरेन' हा foris या लॅटिन शब्दावरून आला आहे. शब्दशः अर्थ दाराबाहेरचा. (संस्कृत दार - रशियन द्वेर - लॅटिन foris ही सारी प्रोटो-इंडो-युरोपियनची अपत्ये.)

'एक्झॉटिक'चीही व्युत्पत्ती साधारण तशीच असली (exo-), तरी हा शब्द तुलनेने नवीन आहे. शेक्सपिअरच्या नाटकांत 'फॉरेन' अनेकदा आढळतो, पण 'एक्झॉटिक' अजिबात नाही. 'एक्झॉटिक'चा इंग्रजीत शिरकाव १६२०च्या आसपास, म्हणजे शेक्सपिअरच्या मृत्युनंतर काही वर्षांतच झालेला दिसून येतो.

तेव्हा व्युत्पत्तीच्या दृष्टीने 'एक्झॉटिक' हा 'फॉरेन'चा उपसंच म्हणता येईल; पण ज्या काळात तो इंग्रजीत रूळला, तेव्हाच्या घडामोडी लक्षात घेतल्या तर एक्झॉटिकला जी 'हौ एक्सायटिंग!' छटा आहे, तिचा काही प्रमाणात उलगडा होऊ शकेल.

सतराव्या शतकाच्या सुरूवातीचा काळ म्हणजे युरोपियनांच्या दृष्टीने नवीन खंडांत बस्तान बसवण्याचा आणि बाजारपेठा पादाक्रांत करण्याचा काळ. त्यातही याचे नेतृत्व स्पेन-पोर्तुगाल या कॅथलिक देशांकडून उत्तरेतल्या प्रॉटेस्टंट देशांकडे - इंग्रजांपेक्षाही डचांकडे - आले होते. (पहा: डच रिव्होल्ट). ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (१६००), डच ईस्ट इंडिया कंपनी (१६०२), ऑस्ट्रेलियाचा शोध (१६०६), जेम्सटाऊन वसाहत - मेफ्लॉवर (१६०७-१६२०), मॅनहॅटन बेटावर फोर्ट अ‍ॅमस्टरडॅम उभारणे (१६२५) ह्या घटना याच काळातल्या.

या 'किनारा तुला पामराला' वृत्तीचा परिणाम केवळ व्यापारी आणि सत्ताधीश वर्गावरच झाला नाही, तर सामान्य लोकांनाही बाजारात अप्रूपाच्या गोष्टी आढळून यायला लागल्या. मसाले, मौल्यवान धातू, कधीही न पाहिलेले प्राणी आणि वनस्पती, बटाटे, चहा अशा अनेक गोष्टी. या गोष्टी परक्या असल्या तरी त्यांच्याबद्दल औत्सुक्य अधिक असावं आणि ती छटा दर्शवणार्‍या 'एक्झॉटिक'चा इंग्रजीत परिणामी चंचुप्रवेश झाला असावा, असा तर्क लढवता येऊ शकेल.

अर्थात, आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात 'एक्झॉटिक' गोष्टी फॉरेन असतीलच असं नाही. एके काळी Toblerone ची चॉकलेटं ज्या मराठी मध्यमवर्गाला एक्झॉटिक वाटत; त्याला कदाचित महाराष्ट्रातलीच एखादी अनवट पाककृती (खापरोळ्या?/कळण्याची भाकरी?/चिकन भुजिंग?) एक्झॉटिक वाटत असेल.

तळटीपा:

१. अरेबिकमध्ये غريب (घरीब) म्हणजेही स्ट्रेंज/फॉरेन. तुर्की भाषेत त्याचाच garip (उच्चारी: गरीप) होतो आणि त्याला मूळ अर्थासोबतच गरीब (poor) ही छटाही येऊन मिळते. कदाचित 'पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन' अशा परदेशातून आलेल्याच्या निष्कांचन समूहाला उद्देशून ती आली असेल. मराठी/हिंदी/उर्दूमध्ये 'अर्थात' मुदलाऐवजी व्याज आलेलं दिसतंय :).

२. फ्रेंच L’Étranger चे इंग्रजीत The Outsider किंवा The Stranger असे भाषांतर होते. (पहा: फ्रेंच अल्जिरियन नायक असणारी कामुची कादंबरी. La tendre indifférence du monde इत्यादी.)

३. इजिप्तमधून पहिल्यांदा मिडीयन (सध्याचे पश्चिम सौदी अरेबिया) प्रांतात पळून आलेला मोझेस जेव्हा तिथल्या पुजार्‍याच्या मुलीशी लग्न करून यथावकाश जेव्हा बाप बनतो, तेव्हा त्याने काढलेल्या उद्गारांचं भाषांतर सध्याच्या इंग्रजीत "I have become a foreigner in a foreign land" किंवा "I have become a stranger in a strange land." असं होतं.

त्या मुलाचंही नाव तो Gershom असं ठेवतो. हिब्रूत Ger = stranger/परका (अरेबिक घैर/غير, मराठी गैर ह्या नकारार्थी प्रत्ययाचा प्रत्यय) + shom = तिथला.

४. फोरास रोडचे नावही याच अर्थाने (foris-दाराबाहेर-ख्याली) लॅटिनोद्भव असावे काय? शक्यता कमी वाटते.

५. "O wonder! How many godly creatures are there here! How beauteous mankind is! O brave new world, that has such people in't."

हे 'द टेम्पेस्ट'मधले प्रसिद्ध उद्गार. यातला 'brave' कदाचित एक्झॉटिकच्या अर्थछटेजवळ जातो. एरवी शॉर्टकट म्हणून, त्या काळात हा अर्थ दर्शवण्यासाठी सरसकट एखाद्या गोष्टीच्या नावात 'इंडिया'ची भर घातली जात असे - त्याचीही उदाहरणं शेक्सपिअरच्या नाटकात काही ठिकाणी दिसतात.

६. 'अपूर्वाई'तल्या या ओळींपैकी ही शेवटची ओळ एक्झॉटिकपणाची भावना अचूक पकडते, असं वाटतं:

बोटीच्या डेकवर आलो. रुमाल फडफडत होते, डोळ्याला लागत होते. आलिंगने दिली - घेतली जात होती. काही हिंदी कचांनी गोर्‍या देवयान्या आणल्या होत्या. त्यांच्या चेहर्‍यावर 'गोल्डन जर्नी टु समरकंद'मधल्या प्रवाशांचे कुतूहल होते.

मेघना भुस्कुटे Thu, 23/07/2015 - 16:06

In reply to by नंदन

या विविधरंगी माहितीचा समुच्चय, ती एका अर्थपूर्ण पटावर रेखाटण्याची क्षमता, त्यासाठी लागणारा टंकनधीर... यांमुळे दिपून जाऊन नमस्कार घ्या, असं म्हटलं असतं. पण आदराहून मौज वाटल्याची, मज्जा आल्याची भावना तीव्र आहे. त्यामुळे रोचक दिली आहे.

राही Thu, 23/07/2015 - 19:23

In reply to by नंदन

किती संदर्भ ! किती माहिती! अगदी चौफेर फेरफटका आहे. वाचल्यावर अगदी 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' असे वाटले.
जा.जा. 'घरीब' चा 'मघरेब'शी दूरान्वयाने संबंध असेल का?
आणि 'फॉरेन'चा 'फिरंग' किंवा 'फरहंग'शी?

नंदन Fri, 24/07/2015 - 13:35

In reply to by राही

हे सूर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे! ;)

- 'मघरेब' हे 'घर्ब'= पश्चिम वरून आलं आहे. 'घरीब'शी कदाचित दूरचा संबंध असेल. (अरेबिकमधली इतर 'म'नामं.) बाकी पाच वेळच्या नमाजांपैकी मघरीब ही चौथी (सूर्यास्तानंतरची) प्रार्थना. (पहिली पहाटेची म्हणजे 'फज्र'. 'म्हैस'मधल्या उस्मानशेठचा 'काय फज्जरशी आमची हिते उनान निस्ती तरफरतरफर चालली हाय' हा त्रागा आठवावा!)

- 'फिरंगी' हे फ्रेंचांना (पर्यायाने समस्त युरोपियनांना) उद्देशून, (franc) फारसीतून आलेलं लोण(वर्ड) दिसतंय. (डचांना उद्देशून जुन्या मराठीतलं 'वलंदेज' हीदेखील फ्रेंच hollandaisची फारसी आवृत्ती असावी.)

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 14:10

In reply to by नंदन

(डचांना उद्देशून जुन्या मराठीतलं 'वलंदेज' हीदेखील फ्रेंच hollandaisची फारसी आवृत्ती असावी.)

https://en.wikipedia.org/wiki/Holland#Etymology_and_terminology

इथे पाहता हॉलंड परगण्याकडील लोक स्वतःला हॉलंडर्स असे म्हणवून घेत असे दिसते. र जवळजवळ सायलेंट असल्यामुळे तिथून वलंदे/वलंदेज हा शब्द आला.

वैसेभी फ्रेंच ईस्ट इंड्या कंपनीचा भारतातील शिरकाव १६६० नंतरचा तर डचांचा १६०० पासून आहे, मोर स्पेसिफिकली पाहिले तर वेंगुर्ल्याची डच फ्याक्ट्री १६३७ सालीच स्थापन केली गेली. त्यामुळे फ्रेंचांच्या थ्रू किंवा हा शब्द आला नाही असे वाटते. फारसी फर्मानांत याचे रूप पाहिले पाहिजे.

(डचांना डच असे नावही मुळात इंग्रजांनी दिलेले आहे. ते स्वतःस नेदरलँडर्स असेच म्हणवून घेत. तिथल्या भाषेला plaatduits अर्थात तळ-जर्मन असे नाव होते, त्यातला duits हे deutsch चे रूप तेवढे इंग्रजीत शिल्लक राहिले.)

अवांतरः डेन्मार्कवाल्यांसाठीचे रूप आहे 'डिंगमार'. पण आज्ञापत्रात फक्त एका ठिकाणीच हा उल्लेख येतो. अन्य ग्रंथांत कुठे असल्यास माहिती नाही.

नंदन Fri, 24/07/2015 - 14:46

In reply to by बॅटमॅन

डचांना डच असे नावही मुळात इंग्रजांनी दिलेले आहे. ते स्वतःस नेदरलँडर्स असेच म्हणवून घेत. तिथल्या भाषेला plaatduits अर्थात तळ-जर्मन असे नाव होते, त्यातला duits हे deutsch चे रूप तेवढे इंग्रजीत शिल्लक राहिले.

रोचक! याच्या उलटा प्रकार अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनिया राज्यात आहे. तिथल्या जर्मन भाषक स्थलांतरितांच्या भाषेला आज 'पेन्सिल्व्हेनिया डच' म्हटलं जातं.

वेंगुर्ल्याची डच फ्याक्ट्री १६३७ सालीच स्थापन केली गेली. त्यामुळे फ्रेंचांच्या थ्रू किंवा हा शब्द आला नाही असे वाटते. फारसी फर्मानांत याचे रूप पाहिले पाहिजे.

शक्य आहे. भाषेचा प्रवास हा असाच डचमळत, हिंदकळत होत असतो ;)

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 20:33

In reply to by नंदन

याच्या उलटा प्रकार अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनिया राज्यात आहे. तिथल्या जर्मन भाषक स्थलांतरितांच्या भाषेला आज 'पेन्सिल्व्हेनिया डच' म्हटलं जातं.

येस्सार!

भाषेचा प्रवास हा असाच डच मळत, हिंद कळत होत असतो

;)

एक दुरुस्ती अगोदरच्या प्रतिसादातः प्लाट्स = प्लेस, फ्लॅट नव्हे. तस्मात तळ-जर्मन हा अर्थ सकॄद्दर्शनी बाद वाटतोय, पण त्यासदृश शब्द इतरत्र वाचल्याचे स्मरते. सापडला की तो संदर्भ देतो.

राही Fri, 24/07/2015 - 14:49

In reply to by बॅटमॅन

आणि वेंगुर्ला हे नावही van पासून सुरू होणार्‍या एका डच शब्दापासून आले आहे अशी माहिती वेंगुर्ल्यातल्या एका वृद्ध आणि विद्वान गृहस्थांनी वाचकांच्या पत्रव्यवहारात त्या मूळ नावासह दिली होती हे आठवते.

बॅटमॅन Fri, 24/07/2015 - 14:55

In reply to by राही

हे खरे वाटत नाही, कारण डच साधनांतच वेंगुर्ल्याचे स्पेलिंग wingurla, wingola असे येते. त्यामुळे van अर्थात ऑफ नामक डच प्रत्ययाशी याचे कही देणेघेणे आहे असे दिसत नाही.

राही Fri, 24/07/2015 - 15:10

In reply to by बॅटमॅन

डच साधनात जर वेंगुर्ला हा किंवा यासम उल्लेख असेल तर तोच मूळ शब्द असावा.
तत्कालीन मराठीत ग्रामनामे सहसा नपुंसकलिंगी 'एं'कारान्त असत. माजिवडें, तळोजें, सुपें, ठाणें, बडोदें वगैरे. मराठीत वेंगुरलें हा शब्द असावा आणि डचांनी वेंगुर्ला केले असावे कदाचित इतकेच काय ते.

नंदन Fri, 24/07/2015 - 14:57

In reply to by राही

आणि वेंगुर्ला हे नावही van पासून सुरू होणार्‍या एका डच शब्दापासून आले आहे अशी माहिती वेंगुर्ल्यातल्या एका वृद्ध आणि विद्वान गृहस्थांनी वाचकांच्या पत्रव्यवहारात त्या मूळ नावासह दिली होती हे आठवते.

याबद्दल शक्य झाल्यास वाचायला आवडेल. एका अर्थी, हेच मूळ गाव (आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्याचं हक्काचं ठिकाण) असल्याने अधिक उत्सुकता आहे.

पिवळा डांबिस Sat, 25/07/2015 - 01:33

In reply to by नंदन

एका अर्थी, हेच मूळ गाव

म्हणान आजपासून तुझां नांव 'नंदन व्हान गुर्लेकार'!!!!
:)

राही Fri, 24/07/2015 - 14:42

In reply to by नंदन

मघरेब दिशा, मघरीब नमाज ह्यांचा संबंध सूर्याच्या पश्चिमेकडे जाण्याशी आहे हे साधारण ठाऊक होते.
फरहंग या नावाची पारसी-इराण्यांची हॉटेले पूर्वी असायची. त्याचा अर्थ थोडासा एक्झॉटिक सारखा होतो असे एका पारश्याने सांगितले होते. पण अर्थात पारसीच तो. काय सांगेल नि काय नाही. (पारसी, उर्दू, अरेबिक मध्ये -आणि इंग्लिशमध्येही- 'i' चा उच्चार कधी कधी 'अ'ला जवळचा असा होतो हे आहेच. आशिक-आशक, आसिफ-आसफ, इर्शाद-अर्शद वगैरे)
वलंदेज हा उघड उघड डचांच्या मायदेशाच्या हॉलंड या इंग्लिश आणि hollandais या फ्रेंच नामकरणाशी नाते सांगणारा शब्द आहे. मला वाटते 'आज्ञापत्रा'त हा शब्द आहे.
बाकी लोण(वर्ड) आवडलं. आणि सूर्य-काजवा दृष्टांतही.

नंदन Fri, 24/07/2015 - 15:00

In reply to by राही

गूगलून पाहिल्यावर फरहंगचा अर्थ 'शब्दकोश' असा दिसतो आहे. गूगल ट्रान्स्लेट मात्र कल्चर, सिव्हिलायझेशन, आणि त्यानंतर डिक्शनरी असे अर्थ दाखवतं आहे. ओळखीच्या फारसी भाषकाला विचारून पाहतो.

नंदन Wed, 05/08/2015 - 01:23

In reply to by राही

न्यू यॉर्करमधल्या एका लेखात 'घर्ब'चा उल्लेख वाचला, म्हणून तो इथे डकवतो आहे.

America, particularly, haunts Iran. One of the world’s first great powers—the Persian Empire spanned three continents—it is both infatuated with and infuriated by the current superpower. Khomeini preached the dangers of gharbzadegi, which translates as “Westoxication” or “West-struckness,” in music, theatre, movies, art, and society. “Iran has been hurt more by Westernized intellectuals than by any other group of men,” he said.