आज: भाषा व नाटक (राजीव नाईक यांच्या भाषणांचा सारांश)

[पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागातर्फे दर वर्षी रा. श्री. जोग व्याख्यानमाला सादर करण्यात येते. या वर्षी प्रख्यात नाट्यतज्ञ श्री. राजीव नाईक यांच्या तीन व्याख्यानांचा कार्यक्रम 20, 21, आणि 22 फेब्रुवारीला संपन्न झाला. त्या व्याख्यानांचा सारांश काढण्याचा हा प्रयत्न. त्यांनी व्याख्यानमालेत 'भाषा, जाण ही सापेक्ष असते' आणि 'लेखकाला ज्यांचं चित्रण करायचं आहे त्यांचा आवाज समजून घेता आला पाहिजे' हे मुद्देही मांडले होते. त्यामुळे राजीव नाईकांचा आवाज माझ्या सापेक्ष जाणीवेला किती कळला याची मर्यादा अर्थातच या लेखनाला आहे. त्यांच्या तोंडचा मला जाणवलेला आवाज आणि टिप्पण्यांतून माझा येणारा आवाज वेगळा दाखवण्यासाठी मी लिहिलेलं चौकोनी कंसांमध्ये आहे. त्यांच्या तोंडून येणारा आवाजही माझ्या कानांत पडलेला, आणि माझ्या शब्दांतून येणार असल्यामुळे काही ठिकाणी कदाचित त्यांनी न वापरलेले शब्द वापरले असतील. पण शक्यतो त्या आवाजाचं नुसतं अनुकरण करण्याऐवजी त्यामागचा भाव आणण्याचाही माझा प्रयत्न आहे. बोलताना एक जो मुक्तप्रवाह असतो, तो थोडा बदलून लेखन माध्यमात त्याला एक काहीसं सदिश रूप देण्याच्या प्रयत्नातही काही विचारांची मांडणी मागेपुढे झालेली असेल. या प्रयत्नांतून काही निसटलं असेल, पण ती माझी आणि या प्रक्रियेचीच मर्यादा म्हणावी लागेल.]

व्याख्यानमालेचा विषय आहे आज: भाषा व नाटक. यात तीन वेगवेगळे शब्द आहेत. प्रत्येक शब्द आधी स्वतंत्रपणे समजावून घेणं आवश्यक आहे. मग त्यांच्यातल्या परस्परावलंबनाचा, त्यांच्यातल्या नात्याचा, त्यांच्या जोडलेपणाचा विचार करता येतो.
आज म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीसाठी आज हा वेगळा असू शकतो. आज कशाला म्हणावं हे तुम्ही कोण आहात यावरून ठरतं. तेव्हा आपला स्व काय आहे, आपली आयडेंटिटी काय आहे याचा विचार केल्याशिवाय आजविषयी बोलता येत नाही. आज मूल्याधिष्ठित आणि वर्गाधिष्ठित असतो. आज व्यक्तिसापेक्ष असतो तसाच प्रत्येक संदर्भात आज वेगळा असू शकतो. कधी स्वातंत्र्योत्तर काळाला आज म्हटलं जातं, तर कधी साठोत्तरीला आज म्हटलं जातं. आजचा काळ कुठचा हे निश्चित करण्यासाठी 'काल'ची व्याख्या करावी लागते. कशापासून काहीतरी वेगळा असा आज आहे, हे सांगावं लागतं. कुठचा काल नाकारतो आहोत ते ठरवावं लागतं. या सगळ्यामुळे आजची व्याख्या ही आपल्या आजची व्याख्या बनते, आणि त्यामुळे त्याविषयीची चर्चा करणं कठीण बनतं. पण म्हणून अशी चर्चा करणं अशक्य आहे असं नाही, पण या सर्व सापेक्षतेचं, धूसरतेचं भान ठेवण आवश्यक आहे.

हे भान ठेवण्यासाठी आज, भाषा व नाटक यांच्याविषयी बोलताना आपला आज, आपली भाषा आणि आपलं नाटक या पद्धतीनेच मांडणी करावी लागते. आपल्या मूल्य, वर्ग, इतिहासानुसार जसा आपला आज बदलतो, तसं आपल्या भाषेबद्दल म्हणता येईल का? आपली भाषा म्हणजे नक्की कोणती भाषा? जर समाजातल्या प्रत्येकाचेच शब्द वेगवेगळे असतील, आपल्या शब्दांशी काहीच मिळतंजुळतं नसेल तर ती भाषा आपली होऊ शकत नाही. समाज तीमधून संवाद साधू शकत नाही. पण सगळेच जण हुबेहुब एकसारखे बोलायला तरी तेही चांगलं नाही. तेंडुलकरांची भाषा, बालकवींची भाषा ही वेगळी असते आणि तशी ती असायला हवी. एका बाजूला ही विविधतेची गरज आणि दुसऱ्या बाजूला संवादासाठी आवश्यक असणारं सामायिकपण अशा दोन परस्परविरोधी ताणांतून आजची, आपली भाषा घडते.

सामायिक भाषा हा भौगोलिक समाजाला जोडणारा दुवा आहे. म्हणून भारतात भाषावार प्रांतरचना झाली. मात्र तीच भाषा दर दहा मैलावर बदलते, वेगळी बोली बनून येते. मग भाषेनुसार प्रांतरचना झाली तशी बोलीनुसार तालुका विभागणी झाली का? याचं उत्तर संमिश्र असावं, पण बहुतांशी नाहीच. मग या बोलींचं नातं आजच्या भाषेशी काय आहे? कालपेक्षा त्यात काय बदल आहे? तर आपल्याला असं दिसतं की अनेक बोली भाषा नष्ट होत आहेत. आणि प्रमाण भाषेच्या मुख्य प्रवाहात आपले काही थेंबही न टाकता नष्ट होत आहेत. शिक्षणातून भाषेचे संस्कार करण्याच्या, प्रमाण भाषा रुजवण्याच्या प्रक्रियेतच हे अंतर्भूत आहे. आपण जेव्हा भूगोल शिकतो, तेव्हा आपल्या कक्षा हळूहळू रुंदावत नेतो. म्हणजे प्रथम आपण आपलं गाव/शहर, आपला जिल्हा, आपलं राज्य, देश आणि जग अशा टप्प्याटप्प्यांनी शिकतो. भाषा शिकताना हे टप्पे येत नाहीत. मी कोण माझी भाषा कुठची, माझी बोली कुठची इथून सुरूवात होऊन ती सामावलेली प्रमाणभाषा आपण शिकत जात नाही. कारण प्रमाण भाषेचं बोलीभाषांशी असलेलं नातं त्या स्वरूपाचं नाही. वारली भाषा कितीही गोड असली तरी प्रमाणभाषेत ज्या वैज्ञानिक संकल्पना मांडता येतात का? मग ती भाषा टिकवून ठेवण्यासाठी वारल्यांनी प्रमाणभाषा न वापरता आपलं आयुष्य मर्यादित ठेवावं का? दुसऱ्या बाजूला, प्रमाणभाषा अंगिकारण्यासाठी वारल्यांनी आपल्या स्वच्या, आपल्या ओळखीच्या, आपल्या आयडेंटिटीच्या काही भागाचा बळी द्यावा का? ही आजची विविधता जपत एकात्मता साधण्याची रस्सीखेच आहे. तीतून निर्माण होणाऱ्या या प्रश्नांवर काही सोपं उत्तर नाही.

आजच्या नाटकाकडे बघतानाही आपल्याला आपलं नाटक म्हणण्यासाठी 'आपलं म्हणजे काय?' याचा विचार करावा लागतो. नाटक करण्यावर, त्याच्या भाषेवर, आणि ते कसं दिसतं यावर प्रत्येकाच्या आपलेपणाच्या चष्म्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, गोव्याकडचं नाटक जेव्हा मुंबईचे प्रेक्षक बघतात, तेव्हा त्यांना ते नाटक धीमं वाटतं. दारावरची घंटा वाजली, तरीही ही बाई उठून ते दार उघडायला इतका वेळ घेते, हे मुंबईकरांना पचनी पडत नाही. पण त्या प्रदेशात जो 'सुशेगाद'चा प्रभाव आहे त्यामुळे तो संथपणा नैसर्गिक असतो. तेव्हा नाटक सादर करताना ती व्यक्तिरेखा कोणाची आहे, ती मांडणी कोणी केली आहे, आणि ती कुठच्या प्रेक्षकासाठी केलेली आहे या सगळ्यांमुळे नाटकाचा परिणाम बदलतो. तेव्हा नाटक करताना किंवा पाहताना 'हे आपलं आहे का?' या प्रश्नाचं भान ठेवणं आवश्यक असतं. त्यामुळे आज आपण कोण आहोत, आजची भाषा काय आहे आणि तिचा नाटकाच्या भाषेवर, रंगभाषेवर कसा परिणाम होतो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

आपण आधी म्हटल्याप्रमाणे आज हा प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. तुम्ही कोण आहात? शहरी आहात की ग्रामीण? त्याने तुमचा आजकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुम्ही तुमच्या घरातले पहिले सुशिक्षित आहात का? की तुमच्या आजोबांचा वाडा गांधीवधानंतर जळला होता अशा कुटुंबातून तुम्ही आलेले आहात? की तुम्ही एखाद्या गावात वेठबिगारी करणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्मून शहरात आलेले आहात? की तुम्ही एखाद्या संस्थानिकाचे वारस आहात? या भिन्न पार्श्वभूमीतून येणारांचे आजकडे बघण्याचे दृष्टिकोन सारखे असणार नाहीत. गो. पु. देशपांडेंनी एके ठिकाणी म्हटलं आहे 'संगीत नाटक हे पराभूत ब्राह्मण्याचं नाटक आहे.' हे बरोबर की चूक असा विचार बाजूला ठेवून एक लक्षात घ्यायला लागतं की तुम्ही कुठच्या परंपरांचं, इतिहासाचं ओझं घेऊन आला आहात यावरून तुम्ही केलेलं आणि तुम्ही पाहिलेलं नाटक बदलतं.

यामुळे आज घडवणाऱ्या प्रवाहांचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आजच्या जगातले दोन मुख्य प्रवाह म्हणजे ग्लोबलायझेशन आणि आधुनिकोत्तरवाद. पैकी ग्लोबलायझेशनचा परिणाम आजच्या नाटकावर काय होतो? ग्लोबलायझेशनद्वारे एक सपाटीकरणाची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे प्रेक्षक कोणीही असो भारतीय असो, अमेरिकन असो, जपानी असो - तो आधी एक माणूस आहे. मानवाची मूलभूत दुःखं, सुखं, भावना, लालसा या सर्वत्र समान आहेत. दृष्टिकोनांवर असलेला संस्कृतींचा प्रभाव हळूहळू एकसमान होतो आहे. त्यामुळे एखादी कलाकृती ही संस्कृतींपलिकडे पोचून प्रभावी ठरू शकते. [या ग्लोबलायझेशनने 'आपण' या शब्दाची व्याप्ती वाढवलेली आहे. म्हणजे ग्लोबलायझेशनपूर्वीचा 'काल' बघितला तर तेव्हा कलानुभूतीत सांस्कृतिक भिन्नतेमुळे येणारा विसंवाद आज कमी झालेला आहे.]

या सपाटीकरणाबरोबर पोस्टमॉडर्निझम किंवा आधुनिकोत्तरवादामुळे एक वेगळाच परिणाम होत आहे. स्त्री-पुरुष, उच्चवर्गीय-कनिष्ठवर्गीय, काळा-गोरा अशी ध्रुवात्मक मांडणी पूर्वी होती. आधुनिकोत्तर काळापूर्वी, म्हणजे काल, या ध्रुवात्मक दृष्टिकोनांत मांडणी करून त्यावर आधारलेल्या व्यवस्था मोडून काढणारे व्यूह होते. चळवळी होत्या. आज, आधुनिकोत्तर काळात, हे व्यूह मोडून पडलेले आहेत. क्रांती नावाची गोष्टच नष्ट झालेली आहे. एक ध्रुव चांगला, दुसरा वाईट अशी मांडणी चुकीची ठरलेली आहे. सामाजिक सापेक्षतावादापोटी सर्वच ध्रुव खरे, कारण सत्य सापेक्ष असतं. मग कुठचंच खरं, कुठचं खोटं हेच सांगता येत नसेल; कुठचं चांगलं कुठचं वाईट हेच ठरवता येत नसेल, तर काय बदलणार? आणि बदलून काय आणणार? सामाजिक सापेक्षतावादात एक वैचारिक निर्धृवीकरण झालं. विज्ञानातील सापेक्षतावादामुळेही याला हातभार लागला. कारण सापेक्षता सिद्धांतात सत्य हे निरीक्षकसापेक्ष असतं असं म्हटलं आहे. [इथे सापेक्षतावाद समजण्यात काहीशी गल्लत होते असं माझं मत आहे. विज्ञानाचे नियम निरीक्षकसापेक्ष नसतात, भलेही मग काही मोजमापी निरीक्षकसापेक्ष होतील असं सापेक्षतावाद म्हणतो. म्हणजे मूलभूत सत्य, आणि ते बांधणारे नियम बदलत नाहीत हे सापेक्षतावाद सांगतो. दुर्दैवाने वस्तुमान, काळ या आपल्या दृष्टीने इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्यांचं मोजमाप बदलल्याचा धक्का जो बसतो, त्यातून 'सगळंच सापेक्ष' असा ढोबळ अर्थ काढला जातो.]

आधुनिकोत्तर जीवनात क्रांती करू पाहणाऱ्या चळवळी नष्ट झाल्या. चळवळींची एक भाषा असते, एक विचारसरणी असते. नाट्य, साहित्य निर्माण करण्याची शक्ती असते. यांतून मिळणारी आयडेंटिटी नष्ट झाली. मग एका बाजूला ग्लोबलायझेशनमधून दिसणाऱ्या चित्राशी आपल्या स्वला प्रयत्न करूनही जुळवता येत नाही; आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुळांशी नातं तुटत चाललं. विचारसरणींशी बांधलेली ओळखही विरली. या त्रिशंकू अवस्थेत मग आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एखाद्या गटाशी नातं सांगत ते लेबल स्वतःच्या माथी बळंच चिकटवण्याची पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे समूहाची ओळख नाही, स्वची ओळख नाही म्हणून गटाची ओळख 'मी अमुक गटाचा' म्हणून स्वतःलाच पटवली जाते, जगाला सांगितली जाते. संक्रमणाच्या काळातून जात असल्याने आपल्याला बाहेरचं जग दिसतं त्याचं अनुकरण नीट जमत नाही. हे भयावह आहे. आणि या त्रिशंकू अवस्थेचं काय करायचं यावर उत्तर नाही.

इथपर्यंत थोडा आज, आणि आपला आज, या कल्पनांचा विचार-विस्तार झाला. आता आपल्या भाषेचा विचार करू. ब्लूमफील्डच्या मते जी बोलली जाते तीच भाषा. म्हणजे भाषा आधी येते, ती बोलली जाते मग तिचं व्याकरण नोंदलं जातं. किंवा जिथे गरज असते तिथे बांधलं जातं. [मानवी वस्ती आणि शहराची आखणी हे उदाहरण मला याला समांतर वाटतं. आधी काही माणसं रहायला येतात, जगतात, आपला परिसर अधिकाधिक नीटनेटका करतात. सुरूवातीला सोपी, सहज, नैसर्गिक, इन्फॉर्मल व्यवस्था असते. जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी व्यवस्था आखीवरेखीव होण्याची गरज पडते. रस्ते लागतात, आसपास फूटपाथ लागतात, बंद गटारं लागतात, बिल्डिंगींसाठी विशिष्ट नियम लागतात... म्हणजे वस्ती आधी आणि मग व्यवस्थेचं व्याकरण त्या वस्तीभोवती तयार होतं.] कदाचित भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचंही असंच असू शकेल. नाटक असं करावं, असं म्हणण्यापेक्षा नाटक असं केलं जातं अशी ती प्रस्थापित नियमांची नोंद असू शकेल.

चॉम्स्कीने या नोंदीपलिकडे जाऊन म्हटलं की जगातल्या सर्व भाषांना एक सामायिक व्याकरण आहे. [म्हणजे प्रत्येक भाषेचं वरवरचं व्याकरण वेगळं असलं तरी ते तयार होण्याचे काही वरचे नियम (पराव्याकरण किंवा मेटाग्रामर) आहेत. इथे परत शहरांची उपमा देताना म्हणता येतं की शहरांचे नकाशे वेगळे असले तरी ती बांधण्याचे नियम (रस्ते, बिल्डिंगी, त्यांचं परस्पर नातं, शाळा, हॉस्पिटलं हे सगळं असणं) समान आहेत] आता असं युनिव्हर्सल ग्रामर नाटकाच्या किंवा कलानिर्मितीसाठी तयार करता येतील का? याचं उत्तर निश्चित नाही, पण एके काळी असे प्रयत्न होत होते खरे.

काही भाषातज्ञ म्हणतात की तुमची भाषा कुठची यावरून तुमची अनुभूती आणि तुमचा दृष्टिकोन ठरतो. म्हणजे एका अर्थाने आपण भाषा वापरत नाही, तर भाषा आपल्याला वापरते. ऑस्टिन आणि सर्ल यांच्या मते भाषेचा वापर हा एक पर्फॉर्मन्स आहे. मानवी भावनांचा आविष्कार हा तिचा उद्देश नाही. तर भाषा वापरणाराला जग बदलण्यासाठी, आसपासच्या माणसांची मनं बदलण्यासाठी वापरता येणारं ते एक आयुध आहे. नाटकातली भाषा ही कादंबरीच्या भाषेपेक्षा वेगळी असते. नाटकात एक पात्र दुसऱ्याला कथा सांगतं अशा सरळ [लीनियर?] नरेटिव्हपेक्षा एकाने कथा सांगणं, दुसऱ्याने विचार करणं, तिसऱ्याने ते ऐकून गैरसमज करून घेणं अशा मल्टिलिंग्वल नरेटिव्ह वापरला जाताना दिसतो.

विज्ञानाच्या आणि कलेच्या भाषेत प्रामुख्याने फरक असतो तो नेमकेपणाचा. अर्थाचा रोखठोकपणा ही वैज्ञानिक भाषेची गरज आहे, तर नेमकेपणाचा अभाव, एकाच कथनातून अर्थाचे अनेक पदर मांडण्याची क्षमता हे कलाभाषेचं बलस्थान आहे. शब्दांपलिकडे जाऊन भाषाशास्त्रज्ञ पराभाषिकाचाही अभ्यास करतात. म्हणजे एकाच सरळसोट वाक्याचे देहबोली, स्वर यांच्या फरकांमुळे अनेक अर्थ होऊ शकतात. 'मी हिंदू आहे' हे चेहरा पाडून '(काय करणार) मी हिंदू आहे...' अशा निराश स्वरात म्हणता येतं. किंवा छाती फुगवून '(अभिमानाने म्हणा) मी हिंदू आहे' असंही म्हणता येतं. या पराभाषिकामुळे नाटकाची भाषा ही अधिक अर्थवाही बनते. लेखक, दिग्दर्शक, नट या साखळीतून सामान्य लिखित भाषेचं रंगभाषेत रूपांतर होतं. ती निव्वळ नाटककाराची लिखित भाषा राहत नाही.

काही कादंबऱ्यांना कोकणात प्रादेशिक कादंबऱ्या म्हटलं जातं तर देशाकडे त्यांना ग्रामीण म्हटलं जातं. प्रादेशिक किंवा ग्रामीण ही लेबलं, ती कोण लावतो आहे त्यावरून ठरतं. पुन्हा एका अर्थाने सगळ्याच वेगवेगळ्या प्रदेशांच्या म्हणून प्रादेशिक म्हणता येतात. दुसऱ्या पद्धतीने बघायला गेलं तर शहरी मानसाचं, प्रवाहांचं चित्रण करणाऱ्या त्या नागर आणि शहरी-नाही-त्या पार्श्वभूमीवरचे म्हणजे ग्रामीण अशी मांडणी करता येते. ग्रामीण व्यक्तिरेखा निर्माण करण्यासाठी लेखक किंवा नाटककाराला काय करावं लागतं? नुसते बोलीचं, ढबींचं अनुकरण केल्याने ती व्यक्तिरेखा उभी राहते का? बाख्तिनने भाषा आणि आवाज असा फरक केलेला आहे. भाषा म्हणजे लिहिलेले शब्द, किंवा रंगभाषा - ज्यातून कलाकृतीला काही सांगायचं असतं ती. आवाज म्हणजे त्या विशिष्ट पात्राचा, किंवा व्यक्तिरेखेचा आत्मा. बाख्तिन पॉलिफनीची कल्पना मांडतो. त्याच्या मते अनेक वेगवेगळे आवाज एकत्र येऊन भाषा बनते. बाख्तिनच्या मते नुसतंच शब्दांचं अनुकरण करून पुरेसं नाही. त्या व्यक्तीमत्वाचा आवाज ओळखावा लागतो. नाटकात हा आवाज सादर करताना आणखीन अडचण येते ती नटाची. टिळकांवर नाटक असेल तर आपण टिळकांचा आवाज ऐकतो आहोत की त्यासाठी कास्टिंग केलेल्या दुसऱ्या कोकणस्थ ब्राह्मणाचा? कादंबरी आणि नाटकाची तुलना करताना तो म्हणतो की कादंबरीच्या आकारामुळे चित्रणाला एक मोठा पट मिळतो. मात्र नाटक हे छोटं असतं. त्यात सम्यक चित्रण करता येत नाही. मोजक्याच पात्र, प्रसंग आणि जागेमुळे नाटक काय सांगू शकतं यावर मर्यादा येते, कादंबरी मात्र खूप मोठा पट मांडू शकते. म्हणून कादंबरी हा श्रेष्ठ कलाप्रकार आहे. बाख्तिनच्या मांडणीला विरोध - त्याने सांगितलेली नाटकाची मर्यादा - त्रोटकपणा - हेच नाटकाचं सामर्थ्य आहे. तसंच बाख्तिनचीच आवाजाच्या कमअस्सलतेची तक्रार कादंबरीच्या निवेदकाच्या आवाजालाही लागू पडते.

एखाद्या व्यक्तिरेखेचा 'आवाज पकडणं' हे कठीण आहे. माझं आयुष्य जर शहराच्या चाळीत गेलेलं असेल तर मी वेठबिगाराचा आवाज कसा पकडू शकेन? केवळ कोणा वेठबिगाराची ओळख करून घेणं, त्याचं आयुष्य जवळून पाहणं हे पुरेसं नाही. कारण त्यात निव्वळ अनुकरणाचा धोका असतो. जोपर्यंत अनुकरणाबरोबरच त्या आवाजाशी तन्मय होता येत नाही तोपर्यंत नाटकाचा दर्जा उंचावू शकत नाही. भाषांतरातही ही अडचण येते. 'न्हाय'चं इंग्रजीत भाषांतर करताना नुसत्या शब्दाला शब्द ठेवून पुरेसं नाही. त्यामागची वेदनादेखील पकडता आली पाहिजे. आणि ती संस्कृतीनिहाय असू शकते. याचा अर्थ आपण एखाद्या वातावरणात जगलेलो नसू तर त्याविषयी लिहिताच येणार नाही का? याचं उत्तर छातीठोकपणे 'नाही' असं देता येत नाही. मात्र हे कठीण असतं, आणि त्यासाठी कष्ट, जाण आणि प्रतिभा यांची गरज असते.

नाटक हे कादंबरीप्रमाणे निवेदनात्मक नसून संवादातून फुलतं. त्यामुळे प्रेक्षकाला माहिती द्यायची तर ती संवादातूनच द्यावी लागते. त्यामुळे संवाद कृत्रिम आणि रसभंग करणारे होऊ शकतात. ते टाळण्यासाठी नाटककाराला क्लृप्त्या लढवाव्या लागतात. जसं की मैत्रिणी एकमेकींचा इतिहास सांगत बसल्या तर ते कृत्रिम होतं. तेच जर त्या एखादा फोटो आल्बम घेऊन बसल्या तर ही माहिती नैसर्गिकपणे बाहेर येते. नाटक हे केवळ लेखकाचंच नसतं तर दिग्दर्शक, नट, नेपथ्य यांतून तयार होणाऱ्या रंगभाषेत ते बोलतं. दुर्दैवाने बहुतांश नाटकं ही काहीशी लीनियर प्रक्रियेने तयार होतात - आधी नाटककार लिहितो, मग दिग्दर्शक नटांना घेऊन ते बांधतो, आणि मग नेपथ्य येतं. फार थोडे लेखक-दिग्दर्शक या सगळ्याचा विचार करून नाटक लिहिताना दिसतात.

आजचा विचार करून झाल्यावर प्रश्न पडतो की उद्या काय असेल? समानतेकडे जाणाऱ्या जगाचे आज आपण नागरिक असू तर उद्याच्या जगाची भाषा काय असणार आहे? व्यवहारासाठी इंग्रजी आणि अभिव्यक्तीसाठी सिनेमा पुरेसा आहे का? नाटकं बघताना आपल्यापर्यंत जर ती भाषा पोचणार नसेल, किंवा त्या भाषेतून त्या आवाजांतून पोचणारं दुःख हे आपण 'अहाहा, किती हे सुंदर दुःख' इतकंच म्हणून एंजॉय करणार आहोत का? नाटकापेक्षा आज सिनेमा तयार करणं सोपं होत चाललेलं आहे. तयार केल्यावर अनेक प्रयोग करणं सिनेमाच्या बाबतीत जितकं सहज शक्य असतं तितकं नाटकाचं नसतं. त्यामुळे नाटक हे माध्यम केवळ खाजगी अभिव्यक्तीसाठी होऊन राहणार आहे का? हे व असे अनेक प्रश्न उभे राहतात. या प्रश्नांचा अर्थ समजून घेण्यासाठी देखील आज आपण भाषा आणि नाटक यांकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे.

[या तीन व्याख्यानांकडे मी वेगळ्या अपेक्षा घेऊन गेलो होतो. विशेषतः रंगभाषेबद्दल - म्हणजे नाटकात येणाऱ्या शब्दांपलिकडे ते एक दृक्श्राव्य माध्यम म्हणून लिखित-बोली भाषेपलिकडे कशी विधानं करू शकतं याबाबत मला एक दृष्टिकोन अपेक्षित होता. तसंच भाषा व नाटक ही दोन अभिव्यक्तीची माध्यमं आहेत. आणि ती जनसामान्यांपर्यंत पोचतात पुस्तकातली अक्षरं होऊन, किंवा स्टेजवरचे जितेजागते कलाकार होऊन. म्हणजे इतर माध्यमांवर उभी राहत. ही पायाखालची जमीन आज बदलत असताना त्या बदलांचा परिणाम आज भाषा आणि नाटक यांवर कसा होतो आहे हेही समजून घ्यायला आवडलं असतं. अर्थात पाउण तासांच्या तीन व्याख्यानात एवढा मोठा आवाका माववणं शक्य नाही हेही खरंच आहे. श्री. राजीव नाईकांनी या विषयांवरही कधी बोलावं अशी इच्छा व्यक्त करतो.]

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

ठीक. पण वक्ता कुठल्याही एका मुद्द्यात खोलवर शिरला आहे असं निदान वृत्तान्त वाचून तरी वाटलं नाही. त्यातसुद्धा आधी चॉम्स्की, मग सर्ल, मग बाख्तिन असं नुसतं 'name-dropping' करून मारून नेलेलं आहे असं कुठेकुठे वाटलं, आणि असं करत असताना काही ठिकाणी गल्लत झाल्यासारखी वाटते. उदाहरणार्थ, चॉम्स्कीच्या मते सगळ्या मानवी भाषांना एक साचा सामायिक आहे हे खरं, पण हा साचा म्हणजे काही स्वतंत्र भाषा नव्हे, आणि त्याचा स्वत:चा असा शब्दसंच देखील नाही. युनिव्हर्सल ग्रामरमध्ये (असं काही असेलच तर) हवालदाराला पत्तासुद्धा विचारता येणार नाही, मग नाटक करणं बाजूलाच राहो.

अर्थात हा तिन्ही भाषणांचा मिळून त्रोटक वृत्तान्त आहे, आणि प्रत्यक्षात ती यापेक्षा बरीच लांब असणार याची मला जाणीव आहे.

नाटकात हा आवाज सादर करताना आणखीन अडचण येते ती नटाची. टिळकांवर नाटक असेल तर आपण टिळकांचा आवाज ऐकतो आहोत की त्यासाठी कास्टिंग केलेल्या दुसऱ्या कोकणस्थ ब्राह्मणाचा?

हा आक्षेप कळला नाही. मग तसा तिसऱ्या रिचर्डचा, लिंकनचा किंवा ज्ञानेश्वरांचाही आवाजही आपल्याला ऐकता येणार नाही. दर वेळी ऐकावा लागेल तो नटाचाच. कुठल्याही ऐतिहासिक व्यक्तीवर नाटकसिनेमा काढू नये असा याचा अर्थ वक्त्याला अभिप्रेत असणं शक्य नाही.

नाटकापेक्षा आज सिनेमा तयार करणं सोपं होत चाललेलं आहे. तयार केल्यावर अनेक प्रयोग करणं सिनेमाच्या बाबतीत जितकं सहज शक्य असतं तितकं नाटकाचं नसतं. त्यामुळे नाटक हे माध्यम केवळ खाजगी अभिव्यक्तीसाठी होऊन राहणार आहे का?

सिनेमा करणं 'सोपं' असतं हे तितकंसं पटत नाही, कारण एकतर बहुतेक वेळा त्याला खर्च तुलनेने खूपच जास्त येतो. (सुदर्शन रंगमंचावर केल्या जाणाऱ्या नाटकाच्या निर्मितीखर्चात सिनेमाच्या एका दिवसाच्या शूटिंगचाही खर्च भागणार नाही.) आणि सिनेमाचे अनेक प्रयोग जास्त सहज शक्य असणं ही काही नवी गोष्ट नव्हे. शेसव्वाशे वर्षांपूर्वी सिनेमा अस्तित्वात आला जवळजवळ तेव्हापासूनची ही परिस्थिती आहे. पण त्यामुळे नाटक हे माध्यम 'खाजगी अभिव्यक्तीसाठी'च उरणं असं अजून तरी झालेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

पण वक्ता कुठल्याही एका मुद्द्यात खोलवर शिरला आहे असं निदान वृत्तान्त वाचून तरी वाटलं नाही.

हे बरोबर आहे. एक विशिष्ट दिशेने मांडणी करण्यापेक्षा भाषा आणि नाटक यांबाबत विचार करण्यासाठीची चौकट तयार करणं हा प्रयत्न वाटला. ते स्वतः भाषाशास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे भाषणांचा गाभा हा शब्द-भाषा, तिचं स्वरूप याभोवती राहिला. पाउण तासांच्या तीन भाषणांत निरनिराळ्या भाषातज्ञांची नुसती तोंडओळख करण्यापलिकडे जाणं शक्य नव्हतं. चॉम्स्कीने नवीन भाषा तयार केली असं तेही म्हणाले नाहीत, आणि या लेखातही तसा निर्देश झालेला नाही.

पण एकंदरीत ठाम विधानं झाली नाहीत हे खरं आहे. बहुतेक बाबतीत 'याचं सोपं उत्तर नाही, पण अमुकअमुक गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे' या स्वरूपाची विधानं त्यांनी केली.

हा आक्षेप कळला नाही.

मलाही तो नटाच्या आवाजाचा मुद्दा नीटसा कळला नाही. बाख्तिनचा 'कादंबरी ही नाटकापेक्षा श्रेष्ठ का असते' हा मुद्दा समजावून सांगताना त्यांनी हा युक्तिवाद केला. (त्यांचा खरंतर बाख्तिनच्या मांडणीला आक्षेप आहे. मलाही ती पूर्णपणे कळली असं नाही - आणि जी समजली ती आक्षेपार्हच वाटली.)

शेसव्वाशे वर्षांपूर्वी सिनेमा अस्तित्वात आला जवळजवळ तेव्हापासूनची ही परिस्थिती आहे. पण त्यामुळे नाटक हे माध्यम 'खाजगी अभिव्यक्तीसाठी'च उरणं असं अजून तरी झालेलं नाही.

हेही मान्यच. खरं तर नाटकांच्या बाबतीत प्रेक्षक सस्पेंन्शन ऑफ डिसबिलिफ करायला चटकन तयार असतात. याउलट सिनेमाचं तंत्रज्ञान तुलनेने स्वस्त झाल्यापासून सिनेमाकडून तांत्रिक अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग तसा तिसऱ्या रिचर्डचा, लिंकनचा किंवा ज्ञानेश्वरांचाही आवाजही आपल्याला ऐकता येणार नाही.>> इथे त्यांनी 'आवाज' हा शब्द इंग्रजीतील Voice या अर्थी वापरला होता, ध्वनि किंवा sound या अर्थी नव्हे. इंग्रजीतील Voice या शब्दाला निव्वळ ध्वनिपलिकडे मत, इच्छा, भावना आणि मुख्य म्हणजे व्यक्तित्व अशा अनेक 'व्यक्त होऊ पाहणार्‍या' अर्थच्छटा लागू होतात. जेव्हा नाटकातील पात्राचा आवाज असे म्हटले तेव्हा जसा शोषितांचा आवाज, कष्टकर्‍यांचा आवाज असा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्या व्यक्तित्वाशी, जीवनपद्धतीशी निगडित गोष्टींबाबत बोलणे असा त्याचा अर्थ घेतला जातो तसाच त्या विशिष्ट पात्राला सर्वांगाने उभे करताना त्यात येणार्‍या देहबोलीसकट ध्वनि वगैरे असा एकत्रित 'आवाज' असा अर्थ इथे घ्यायला हवा.

> +१००. व्याख्यान हे अगदीच तोंडओळख स्वरूपाचे झाले. खरंतर पूर्ण तीन तास हाती असताना अधिक खोलात जाणे शक्य होते असे मला प्रामाणिकपणे वाटते. तसेच विषयाचे व्याख्यानामधे थोडी प्रेक्षकशरणता जाणवली. यामुळे अनेकदा वकृत्वाचा प्रवाह खंडित झालेला दिसला. फार तुट्क तुटक असे काही जमा करून आणावे लागले अशीच भावना झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

> खात्री देता येत नाही पण माझ्या आठवणीप्रमाणे ते वाक्य ''संगीत नाटक हे पराभूत ब्राह्मणांचं नाटक आहे.' असं होतं. तसं नसेल नि खरंच 'ब्राह्मण्य' असा शब्द वापरला गेला असेल तर गो.पुं.शी असहमती व्यक्त करायला हवी. पण इथे विषयांतर नको म्हणतो नि थांबतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

एकुण अनुभव अनेक प्रश्न निर्माण करण्यात यशस्वी झाला तरी त्याची उत्तरे देणे सोडाच पण ती देण्याच्या दृष्टीने कोणते कोणते विचारव्यूह मांडून पाहता येतील याचाही फारसा विचार व्याख्यानातून उमटला असे मला वाटले नाही. तसेच तीनही परिमाणांचा स्वतंत्रपणे बराच उहापोह झाला तरी त्यांची गुंफण करत एक निश्चित मांडणी अशी झालीच नाही. थोड्या स्पष्ट शब्दात सांगायचे तर आमची अभ्यासाची नुसती तयारी झाली, प्रत्यक्ष अभ्यास अजून बराच अवकाश आहे हे जाणवले.

चित्रपटाची नि नाटकाची तुलना नि नाटकाचे खासगी अभिव्यक्तीचे माध्यम होऊन राहणे वगैरे तुलना सर्वस्वी अस्थानी वाटली. खरंतर व्याख्यानाचा विषय पाहता हा मुद्दा गैरलागू होता.

यात 'आज' 'भाषा' आणि 'नाटक' अशी तीन परिमाणे विचारात घेतलेली असल्याने एक संभाव्य दृष्टिकोन म्हणजे 'काळानुसार नाटकाच्या भाषेत घडत गेलेले बदल' हा असू शकत होता. अर्थात इथे 'काल' म्हणजे Chronological time अपेक्षित आहे, म्हणजेच 'आज'शी संबंधित अतिशय संकुचित व्याख्या घेतलेली आहे. कारण नाईक यांनी म्हटल्याप्रमाणे 'आज' याला Chronological time चे जसे परिमाण आहे तसेच भौगोलिक, सामाजिक नि व्यक्तीचे परिमाणही आहेच. पण हरकत नाही निदान एका संकुचित व्याख्येच्या आधारे का होईना त्या संक्रमणाची मांडणी, कारणमीमांसा मला अपेक्षित होती. ती झालीच नाही. भाषेची झाली पण 'बदलां'ची मीमांसा झाली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मार्मिक अन नेमके!
(आपल्याला न कळलेल्या मसुद्याला असे म्हणायचे अस्ते असे नुक्तेच शिक्लो आहे. Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे आमच्यापर्यंत असं सोप्यात पोहचवण्यासाठी राजेशचे आभार.

एखाद्या व्यक्तिरेखेचा 'आवाज पकडणं' हे कठीण आहे. माझं आयुष्य जर शहराच्या चाळीत गेलेलं असेल तर मी वेठबिगाराचा आवाज कसा पकडू शकेन? केवळ कोणा वेठबिगाराची ओळख करून घेणं, त्याचं आयुष्य जवळून पाहणं हे पुरेसं नाही. कारण त्यात निव्वळ अनुकरणाचा धोका असतो. जोपर्यंत अनुकरणाबरोबरच त्या आवाजाशी तन्मय होता येत नाही तोपर्यंत नाटकाचा दर्जा उंचावू शकत नाही. भाषांतरातही ही अडचण येते. 'न्हाय'चं इंग्रजीत भाषांतर करताना नुसत्या शब्दाला शब्द ठेवून पुरेसं नाही. त्यामागची वेदनादेखील पकडता आली पाहिजे. आणि ती संस्कृतीनिहाय असू शकते. याचा अर्थ आपण एखाद्या वातावरणात जगलेलो नसू तर त्याविषयी लिहिताच येणार नाही का? याचं उत्तर छातीठोकपणे 'नाही' असं देता येत नाही. मात्र हे कठीण असतं, आणि त्यासाठी कष्ट, जाण आणि प्रतिभा यांची गरज असते.

ह्या एका गोष्टीवर विलास सारंग ह्यांनी 'लिहिता लेखक' मधे एक लेख लिहिला आहे, तो वाचल्यामुळे 'मात्र हे कठीण असतं, आणि त्यासाठी कष्ट, जाण आणि प्रतिभा यांची गरज असते.' ह्यापलिकडे आवाज पकडण्यासाठी नक्की काय करावं लागतं आणि मराठी साहित्यविश्व नेमकं का कमी पडतं ह्याबद्दल विलास अधिक तपशीलात लिहितात जे वाचण्यासारखे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाटच पाहत होतो.
सारांशलेखन रोचक आहे - सगळे कळलेच असेही नाही.

पण प्रतिसाद वाचायला नी त्यातील चर्चेचा आस्वाद घ्यायला उत्सुक आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> सिनेमा करणं 'सोपं' असतं हे तितकंसं पटत नाही

'आज'ची व्याख्य जशी स्पष्ट करायला हवी, तद्वत 'सोपं'ची व्याख्याही स्पष्ट करायला हवी. आज नाटक करताना अनेक अडचणी येतात त्यात 'एकत्र बसून तालीम करणं आणि मग प्रत्यक्ष प्रयोग करत फिरणं' ह्यासाठी नटांची (आणि इतरांचीही) तयारी नसणं ही एक मोठी अडचण असते. सगळेच लोक एकाच वेळी अनेक गोष्टींत (पोटासाठी सीरियल करायची, सिनेमे करायचे, शिवाय जाहिराती वगैरे) व्यग्र असतात. सिनेमाच्या शूटींगच्या तारखा आधी ठरल्या असतात आणि तेवढेच दिवस (आणि तेदेखील आपलं काम असेल तेवढ्यापुरतंच) त्यात घालवावे लागतात. नंतर लोक मोकळे होतात. आजच्या जगण्याच्या व्यवधानांनुसार आणि गतीनुसार हे सोयीचं पडतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> चित्रपटाची नि नाटकाची तुलना नि नाटकाचे खासगी अभिव्यक्तीचे माध्यम होऊन राहणे वगैरे तुलना सर्वस्वी अस्थानी वाटली. खरंतर व्याख्यानाचा विषय पाहता हा मुद्दा गैरलागू होता.

'नाटक', विशेषतः नाटक करणाऱ्या लोकांच्या 'आज'च्या संदर्भात पाहिलं तर हे मुद्दे कळीचे ठरतात. त्यामुळे हे अस्थानी वाटलं नाही.

>> यात 'आज' 'भाषा' आणि 'नाटक' अशी तीन परिमाणे विचारात घेतलेली असल्याने एक संभाव्य दृष्टिकोन म्हणजे 'काळानुसार नाटकाच्या भाषेत घडत गेलेले बदल' हा असू शकत होता. अर्थात इथे 'काल' म्हणजे Chronological time अपेक्षित आहे, म्हणजेच 'आज'शी संबंधित अतिशय संकुचित व्याख्या घेतलेली आहे. कारण नाईक यांनी म्हटल्याप्रमाणे 'आज' याला Chronological time चे जसे परिमाण आहे तसेच भौगोलिक, सामाजिक नि व्यक्तीचे परिमाणही आहेच. पण हरकत नाही निदान एका संकुचित व्याख्येच्या आधारे का होईना त्या संक्रमणाची मांडणी, कारणमीमांसा मला अपेक्षित होती. ती झालीच नाही. भाषेची झाली पण 'बदलां'ची मीमांसा झाली नाही.

पण व्याख्यात्याचा विचार वेगळा होता हे तुमच्याच म्हणण्यावरून (आणि घासकडवींच्या वृत्तांतावरूनही) स्पष्ट होत आहे. म्हणजे 'काळानुसार नाटकाच्या भाषेत घडत गेलेले बदल' असा विषय / मांडणी व्याख्यात्याला अभिप्रेतच नव्हती. त्यामुळे तुम्हाला अभिप्रेत मांडणी / मीमांसा न होणं स्वाभाविक वाटतं.

जाता जाता : शिवाय, ही तुमची अपेक्षा पुरेशी आधुनिकोत्तर नाही; तद्वत ती कालबाह्य वाटली (ह. घ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

> प्रश्न केवळ वाटण्याचा आहे. मुळात तीन परिमाणे घेऊन मांडणी करणे अपेक्षित असता 'चित्रपट' हे चौथे परिमाण त्यात आणणे जर अस्थानी वाटत नसेल तर 'आज' ची तुलना 'काल' शी करणे अस्थानी का वाटावे? किमान ते एकाच अक्षावर तरी आहे, सर्वस्वी नवे परिमाण तरी नाही. शिवाय मुळात तीन तासांचा वेळ जर मर्यादित वाटत असेल अनेक मुद्दे केवळ स्पर्श करून सोडून द्यावे लागत असतील तर आणखी एक नवे परिमाण आणून पुन्हा गणिती नियमाने तुलनांच्या शक्यता का वाढवाव्या हा व्यवहार्यतेचा आणखी एक मुद्दा आहेच.

> अगदी शक्य आहे. पण कालासंदर्भात विचार करताना 'आज' बाबत बोलताना जर आज नि काल हे एकाच अक्षावर असल्याने त्यांच्यात तुलनात्मक मांडणी अपेक्षित असणेही अगदीच अस्थानी नसावे, खास करून चित्रपटासारखा ज्याला 'लॅटरल कंपॅरिजन' म्हणतात तशी तुम्हाला सुसंगत वाटेल असेल तर ही तुलनाही ग्राह्य मानायला हरकत नाही. अर्थात तुम्ही म्हणता तसे चर्चेचा स्कोप हा शेवटी व्याख्यात्याचा अधिकार आहेच, त्याला अभिप्रेत काय आहे हे त्यानेच ठरवायचे आहे. पण प्रेक्षकालाही ते शीर्षकाशी, विषयाशी सुसंगत आहे की नाही हे आपल्यापुरते ठरवू द्यायला हरकत नसावी.

> हॅ हॅ हॅ, ती पुरेशी आधुनिकोत्तर व्हावी म्हणून डाव्या हातात गंडा नि उजव्या हाती गुरुदक्षिणेची थैली घेऊन केव्हाचा तयार उभा आहे. आमचा 'गुरु' पावतच नाही बघा. कदाचित गुरु-शिष्य परंपरा आधुनिकोत्तर काळात काही नवे रूप घेऊन उभी असावी अशी हल्ली शंका येऊ लागली आहे. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de