हठं विना राजयोगं

हठं विना राजयोगं राजयोगं विना हठः|
न सिध्यति ततो युग्ममानिष्पत्ते समभ्यसेत्||

हठप्रदीपिकेतल्या द्वितीय उपदेशातील शहात्तराव्या श्लोकाचा हा भाग आहे. सर्वसाधारण योगाभ्यासी मंडळींना हठप्रदीपिका माहीत नसली आणि त्यावाचुन फारसं काही अडत नसलं तरी या लिखाणाच्या अनुषंगाने त्याबाबत थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. परंपरेत योगाचे अनेक प्रकार मानले जातात. राजयोग, हठयोग, ध्यानयोग, नादयोग वगैरे. यापैकी हठयोग व राजयोग हे प्रमुख दोन मार्ग अनुक्रमे शरीर व मनाशी संबंधीत आहेत. याचा अर्थ हा की हठयोग हा प्रामुख्याने, शरीर, शारीरिक आसने, प्राणायाम, धौति, नेती, बस्तिसारख्या क्रिया यादिशेने जाणारा मार्ग, तर राजयोग हा मन, चित्त, बुद्धी, वृत्ति, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान याकडून समाधिकडे नेणारा मार्ग असा फरक या दोन्ही मार्गांमध्ये परंपरेने केला जातो. अशा तर्हेचा फरक जरी केला जात असला तरी खुद्द परंपरेनेच येथे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांकडे जाण्यापुर्वी एक मह्त्वाची गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे ती ही की हे प्रश्न, त्यांची उत्तरं, त्यामुळे निर्माण होणार्या विविध शक्यता, त्यातील खाचाखोचा हे सारं काही माहीत नसताना देखिल लोक योगाभ्यास करत आले. त्याचे फायदे त्यांना मिळत राहीले. पण म्हणून हे प्रश्न बिनमहत्त्वाचे नाहीत. काही एका विशिष्ट भुमिकेवर येण्यासाठी त्यांचा निश्चितपणे उपयोग आहे.

“हठयोगाशिवाय राजयोग सिद्ध होत नाही आणि राजयोगाशिवाय हठयोगात सिद्धि नाही यास्तव दोन्ही योगमार्गांचा योग्य असा अभ्यास करावा” असा वरील श्लोकाचा सर्वसाधारण अर्थ आहे. मात्र या साध्या अर्थातदेखिल बराच आशय लपलेला आहे. हा श्लोक अनेक गोष्टी सुचित करतो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हठयोग व राजयोग हे दोन पुर्णपणे वेगळे, स्वतंत्र मार्ग आहेत. दुसरी, केवळ एका मार्गाने गेल्यास संपूर्ण यश मिळत नाही. तिसरी, कुठल्याही एका मार्गात संपूर्ण यशस्वी व्हावयाचं असल्यास, दुसर्या मार्गाची मदत घ्यावीच लागते. चौथी, दोन्ही मार्ग परस्परावलंबी आहेत. पाचवी, योग सिद्ध होण्यासाठी दोन्ही मार्गांचा योग्य अभ्यास करावा. सहावी, कुठलाही एक मार्ग दुसर्यापेक्षा श्रेष्ठ नाही. सर्वसामान्य योगाभ्यासी मंडळींना वरील बाबी फारशा महत्त्वाच्या वाटणार नाहीत. परंतु जी मंडळी “आम्ही ध्यान करतो” म्हणत असतानाच आसनांना कळत नकळत खालचा दर्जा देतात किंवा सुरवातच प्राणायामापासुन करतात अशांना वरील निष्कर्ष खटकण्याची शक्यता आहे.

याला कारण आहे. शरीर म्हणजे स्थूल, मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म, मनाचा अभ्यास हा जास्त वरच्या दर्जाचा, शरीराकडुन सुरवात स्थूल बुद्धीची माणसं करतात. आसनं म्हणजे निव्वळ शारीरिक कसरत. हठयोग म्हणजे हट्टाने, जोरजबरदस्तीने केलेला योग. आसन प्राणायामापेक्षा ध्यान वरच्या दर्जाचे. अशा अनेक समजुती अशा मनोवृत्तीमागे असतात. ध्यानासाठी पद्मासनाची आवश्यकता नाही असं काही ठिकाणी आवर्जून सांगण्याची प्रथा आहे. यामागे जी माणसं पद्मासन करु शकत नाहीत त्यांचा उत्साह टिकावा असा चांगला उद्देश असेलही कदाचित पण त्यामुळे एकंदरीतच आसनं महत्त्वाची नाहीत, आसनांचा अभ्यास न केल्याने फारसं काहीच अडत नाही अशी समजूत मात्र वाढीस लागते. जी माणसं काही मर्यादेपर्यंत प्रयत्न करायला तयार असतात तीदेखिल आसनांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे ही सर्व माणसं आसनांच्या अभ्यासामुळे प्राप्त होणार्या असंख्य मनोकायिक लाभांपासून वंचित राहतात. आसन, प्राणायाम आणि ध्यानाचा विचार येथे फक्त तत्त्वतः करण्यात येत आहे हे लक्षात घेतलेले बरे. त्यातल्या तंत्रात शिरण्याची येथे आवश्यकता नाही. खरा प्रश्न आधी शरीर की आधी मन हाच आहे. राजयोग की हठयोग हा प्रश्न निव्वळ मार्गांचा नसून मनोवृत्तीचादेखिल आहे. याबाबत आपले परंपरागत ग्रंथ काय म्हणतात हे पाहणं उद्बोधक ठरेल.

मी येथे राजयोगासाठी पातंजल योगसूत्र आणि हठयोगासाठी हठप्रदीपिका व घेरंडसंहीता असे एकूण तीन ग्रंथ विचारार्थ घेतले आहेत. शिवसंहीता, गोरक्षसंहीता व इतर अनेक उपनिषदे जरी योगविषयाला वाहिलेली असली तरी वरील तीन ग्रंथ हे राजयोग, हठयोगासाठी सर्वसमावेशक आहेत. जो काही फरक यांत व इतर ग्रंथांत असेल तो काही तांत्रिक तपशिलांवर असेल. सूत्रबद्ध मांडणी हे प्राचीन संस्कृत ग्रंथांचं वैशिष्ट्य. ही सूत्र लहानशीच असतात मात्र यांत प्रचंड अर्थ लपलेला असतो. अधिकारी माणसं त्यावर भाष्य करुन सर्वसामान्यांसाठी तो अर्थ विशद करतात. याच परंपरागत पद्धतीत पातंजल योगसूत्राचा समावेश होतो. राजयोगाची परंपरा सांगणारा असा हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. योगाच्या कुठल्याही शाखेत एकमुखाने प्रमाणभूत मानला गेलेला हा प्राचीन ग्रंथ भगवान पतंजलींनी फक्त १९६ सूत्रांमध्ये आटोपला आहे. हा ग्रंथ अधिकारी व्यक्तींची भाष्यं व परंपरा यातुनच समजून घ्यावा लागतो. त्यामानाने हठप्रदिपिका, घेरंडसंहीता या ग्रंथात हठयोग तंत्राची तपशीलवार चर्चा केलेली आढळते. आसने, प्राणायाम व क्रियांची नावे दिलेली आहेत. त्यांचे लाभ वर्णिलेले आहेत. आहार विचाराचा मागोवा घेतलेला आहे. एकुणच यांची मांडणी पातंजल योगाप्रमाणे छोट्या सूत्रांत नसून येथे तपशीलांवर बराच भर देण्यात आलेला आहे.

पातंजलयोगाचा मार्ग हा “अष्टांगयोग” नावाने देखिल सुप्रसिद्ध आहे. ही आठ अंगे म्हणजे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. यम पाच आहेत. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य. नियम देखिल पाच आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान. यम, नियम, आसन, प्राणायाम यांची गणना बहिरंग योगात केली जाते तर धारणा, ध्यान, समाधी ही अंगे अंतरंग योगात येतात. प्रत्याहार हा दोन्ही अंगांना जोडणारा सेतू मानला जातो. पातंजल योगसूत्रात आसनांची नावे नाहीत. प्राणायामांचीही नावे नाहीत. फक्त त्यांच्या तंत्राशी संबंधीत सूत्रं आहेत. हठयोगातील क्रियांचा कुठेही उल्लेख नाही. काय खावं काय प्यावं याची चर्चा नाही. योग विषयाच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीवरच भर आहे. सर्वसाधारणपणे बोलताना “ध्यानधारणा” म्हणण्याची पद्धत असली तरी राजयोगात मात्र धारणा प्रथम आणि ध्यान नंतर असा क्रम आहे. शिवाय ध्यानापासून सुरुवात करणारी मंडळी आधीची सहा अंगं वगळून एकदम सातव्या भागावर उडी घेतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्याला येथे यामुळे होणार्या लाभ हानीचा विचार न करता या ग्रंथांची भूमिका काय आहे हेच फक्त पाहायचं आहे.

हठप्रदीपिकेत पाच उपदेश आहेत. ज्यात योगातील चार अंगांचा विचार केला आहे. आसन, प्राणायाम, मुद्रा व समाधी याबद्दल तपशीलवार माहिती पहिल्या चार उपदेशात मिळते. पाचव्या औषधीकथन उपदेशात योगाभ्यास करताना काही शारीरिक उपद्रव झाल्यास काय उपाय करावे याचा उहापोह आहे. योगाभ्यासाच्या फलप्राप्तीचे जागोजाग उल्लेख आहेत. यातील तांत्रिक भाग जरी क्षणभर बाजुला ठेवला तरी हठप्रदीपिकेचे ग्रंथकर्ते स्वात्माराम यांनी राजयोग, हठयोगाबद्दल केलेल्या काही मार्मिक विधानांचा विचार येथे करणे भाग आहे. ग्रंथाच्या सुरवातीला पहिल्याच श्लोकात श्रेष्ठ अशा राजयोगावर आरुढ होण्यासाठी आवश्यक अशा पायर्यांच्या जिन्याची उपमा हठयोगाला दिली आहे. या श्लोकाबद्दल बरंच बोलता येइल. हठयोगाच्या ग्रंथात आदीनाथ शंकराला नमन करताना पहिल्याच श्लोकात ग्रंथकर्त्यांनी राजयोगाचं श्रेष्ठत्व मोकळेपणाने मान्य केलं आहे. त्यावर आरुढ होण्यासाठी पायर्यांच्या जिन्याची भुमिका स्वतःकडे घेऊन ग्रंथकर्त्यांनी दाखवलेल्या प्रांजल नम्रपणाबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. यात सिद्ध होणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल ती ही की आधी शरीर की आधी मन यासंदर्भात प्राचीनांच्या मनात कसलाही गोंधळ नाही.

पुढच्याच श्लोकात स्वात्माराम योगी केवळ राजयोगासाठी हठयोगाचा उपदेश करीत आहेत असा उल्लेख आहे. “हठं विना राजयोगं राजयोगं विना हठः” या श्लोकाचा विचार यापूर्वीच झाला आहे. पुढच्या श्लोकाचा अर्थ पाहण्याजोगा आहे. अनेक मतांच्या गलबल्यामुळे गोंधळ उडुन राजयोग म्हणजे काय हे न समजणार्या मंडळींकरीता योगी स्वात्माराम यांनी हा ग्रंथ समजावून दिला आहे. राजयोगाचा नक्की अर्थ काय हे समजण्यासाठी हठयोगाच्या साधनेची सुरवातीला आवश्यकता असते असा जो ध्वनी या ग्रंथाच्या मांडणीतुन निघतो तो सर्वांनाच पटेल, रुचेल असे नाही. मात्र हठयोगाच्या साहाय्याने राजयोगाची साधना करता येण्याची शक्यता यात दिसुन येते हे नाकारण्याचे काही कारण नाही. यानंतर तिसर्या उपदेशात “राजयोगं विना पृथ्वी” म्हणजे आसनाशिवाय राजयोग, “राजयोगं विना निशा” म्हणजे कुंभकाशिवाय राजयोग व “राजयोगं विना मुद्रा” म्हणजे मुद्रांशिवाय राजयोग सिद्धी नाही असे स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे. या सार्या विवेचनात एकच मुद्दा प्रकर्षाने मांडलेला आढळतो. तो हा की राजयोग श्रेष्ठ आहे परंतु हठयोगाच्या अभ्यासाशिवाय त्यात सिद्धी प्राप्त होत नाही. घेरंडसंहितेचा विचार करताना सर्वप्रथम लक्षात येणारी बाब म्हणजे हा ग्रंथसुद्धा हठप्रदीपिके प्रमाणेच लहानसा असला तरी यात तपशीलाचा भाग हठप्रदीपिकेपेक्षा जास्त आहे. ग्रंथाचं स्वरुप निवेदनात्मक आहे. चंडकपालि या जिज्ञासू राजाला केलेला हा उपदेश आहे. घेरंडसंहितेत एकूण सात उपदेश आहेत. षटकर्मे, आसने, मुद्रा, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान व समाधी अशी सात अंगे यात वर्णिली आहेत. यातील चौथा उपदेश सर्वात लहान असुन फक्त पाच श्लोकात प्रत्याहाराबद्दल माहीती आहे. पाचवा उपदेश प्राणायामाबाबत असुन हा अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राणायामासाठी योग्य स्थान, ऋतु याचा विचार तर आहेच शिवाय काय खावे, काय प्यावे, काय वर्ज्य करावे यांची तपशीलवार चर्चा आहे. फार काय, भाज्यांची नावे सुद्धा दिलेली आहेत. सहावा व सातवा उपदेश अनुक्रमे ध्यान व समाधी बाबत आहे. घेरंडसंहितेत “राजयोग” हा शब्दच मुळी सातव्या म्हणजेच शेवटच्या उपदेशात येतो. येथे हठप्रदीपिकेप्रमाणे राजयोग व हठयोगाची मार्मिक तुलना नाही. मात्र समाधीयोगात अनेक तर्हेच्या समाधींचं वर्णन आहे. ध्यानयोग समाधी, नादयोग समाधी, रसानंद समाधी, लययोग समाधी, भक्तीयोग समाधी या क्रमाने शेवटच्या एका समाधीला “राजयोग समाधी” म्हटलं आहे.

हठयोगात सांगितलेला राजयोग, पतंजलींचा कशावरुन? घेरंडसंहितेत “राजयोग” हा शब्द वापरण्याची पद्धत पाहता राजयोग म्हणजे समाधीचाच प्रतिवाचक शब्द तर नसेल? हठयोगात सांगितलेला राजयोग आणि पतंजलींचा राजयोग यांत साम्य व फरक काय? हे व अशासारखे अनेक प्रश्न बर्याच जणांना पडण्याची येथे शक्यता आहे. मात्र आपल्याला त्यांची उत्तरे शोधण्याची आवश्यकता नाही. याचं महत्त्वाचं कारण, दोन्ही ग्रंथांवरुन हे निर्विवाद सिद्ध होतं की राजयोग ही पूढली पायरी आहे व हठयोग हा हठप्रदीपिकेत म्हटल्याप्रमाणे तेथे पोहोचण्याचा सोपान आहे. आपल्यासाठी तुर्तास हे पुरेसं आहे. तरीही याठिकाणी राजयोगाच्या संकल्पनेवर विचार करणं भाग आहे. राजयोग म्हणजे काय? परंपरेने या शब्दाचा वापर नक्की कशासाठी केला? राजयोग व हठयोगात कही साम्यस्थळे आहेत का? हठप्रदीपिकेतील चार अंगे, घेरंडसंहितेतील सात अंगे व राजयोगाचा अष्टांग योग यांचा कुठेतरी एकत्रित विचार करता येइल काय? या सर्व प्रश्नांचाही तदअनुषंगाने विचार करावा लागेल. आणि सर्वात शेवटी हठयोगाचा उपयोग राजयोग साधण्यासाठी सोपान म्हणुन केला जातो याचा अर्थ काय याचाही परामर्ष घ्यावा लागेल.

राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे. किंबहुना या दोन पायर्या नसुन आयुष्यभराच्या साधनेचा भाग आहे असं मला वाटतं कारण कुठल्या तरी एका क्षणी चला आता यम, नियम सिद्ध झाले, आता आसनाच्या अभ्यासाला लागुया अशी वेळ आयुष्यात येणं कठीण वाटतं. यम, नियम सिद्ध व्हायला किती काल लागेल हे कोण सांगणार? त्यामूळे यम, नियम हे योगसाधनेत कायमस्वरुपी बरोबरीनेच केले जात असावेत. राजयोगाबरोबरच हठयोगाच्याही व्याख्येचा विचार करणं अस्थानी ठरणार नाही. हठयोगाचा मूल अर्थ हट्टाने किंवा जबरदस्तीने केला जाणारा योग असा नसुन येथे “ह” म्हणजे सूर्य व “ठ” म्हणजे चंद्र असा या अक्षरांचा सूचक अर्थ आहे. सूर्य आणि चंद्र हे आपल्या आयुष्यातील द्वंद्वाचं प्रतिक आहेत. आयुष्यातील या दोन्ही महत्वाच्या बाजूंचा समतोल साधण्याचा मार्ग म्हणजे हठयोग असा हठयोगाचा खरा अर्थ आहे. हठयोगाचा हा उदात्त अर्थ लक्षात घेउनच आपल्याला पुढे विवेचन करायचं आहे. पातंजल योगसुत्र वाचताना हे जाणवतं की येथे तत्त्वज्ञानावर जास्त भर आहे. राजयोग हा मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येय गाठण्याचा मार्ग असला तरी सूत्रबद्ध स्वरुपातल्या या ग्रंथात भाष्याची गरज भासते. हठयोगात मात्र प्रत्यक्ष क्रियेवर भर असल्याने कृती करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. आसन, प्राणायाम, ध्यान यांची नावे आहेत. राजयोगाचं तत्त्वज्ञान हे एखाद्या शास्त्राप्रमाणे मांडलेलं असून, सूत्रबद्ध भाषेने ते जास्त रेखीव झाले आहे. हठयोगाचे ग्रंथदेखिल रेखीवपणात मागे नाहीत फरक इतकाच की येथे तपशीलांवर भर आहे. राजयोगात अष्टांग मार्गातल्या पहिल्या दोन पायर्या यम, नियम आहेत. या यम नियमात वैयक्तिक, सामाजिक, आणि नैतिक आचरण कसे असावे यांच्या सूचना आहेत. हठप्रदीपिकेच्या पाच, किंवा घेरंडसंहितेच्या सात अंगांमध्ये कुठलंही अंग हे यम नियमांना समर्पित केलेलं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा लावायचा काय की हठयोग फक्त शारीरिक बाबींनाच महत्त्व देतो? हठयोगात नैतिक आचरणाला फारसं महत्त्व नाही? हठप्रदिपिकेतले उल्लेख मात्र हठयोगात नैतिक आचरणाला अपरंपार महत्त्व असल्याचेच निदर्शक आहेत. पहिल्या उपदेशातल्या अडतिसाव्या श्लोकात सिद्धासनाचे महत्व सांगताना यमामध्ये मुख्य मिताहार, नियमामध्ये मुख्य अहिंसा त्याचप्रमाणे सर्व आसनांमध्ये सिद्धासन मुख्य आहे असे म्हटले आहे. पुढे सत्तावनाव्या श्लोकात नादाशी संबंध असलेला अभ्यास करणारी व्यक्ती त्यागी, बेताचा आहार घेणारी, ब्रह्मचर्य पाळणारी आणि योगाभ्यासात रस घेणारी असल्यास त्यात सिद्धी प्राप्त करते असे प्रतिपादन आहे.

हठयोगातील या उल्लेखांमुळे यम नियमांशी हठयोगाचा घनिष्ट संबंध आहे हे तर दिसुन येतच शिवाय या बाबतीत हठयोग आग्रहीदेखिल आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात येते. या आग्रही असण्याची बाब थोडीशी उदाहरणाने स्पष्ट केली पाहीजे. हठप्रदीपिकेच्या तिसर्या उपदेशात मुद्रांसबंधी विवेचन आहे. मुद्रांमुळे मिळणार्या लाभांचा विचार करतानाच पुढे चौर्याणवाव्या श्लोकात जे योगी पुण्यवान, धैर्यशील्, द्वेषरहित व तत्त्वाबद्दल जागरुक आहेत अशांनाच योगात सिद्धी मिळते, ज्यांची मने द्वेषभावनेने व्यापलेली आहेत अशांना योगात सिद्धी मिळत नाही असा स्पष्ट इशारा दिलेला आहे. राजयोग परंपरेनुसार यम नियमांना अष्टांग मार्गात अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान आहे. येथे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की हठयोगाने जरी एखादा संपूर्ण उपदेश यासाठी खर्च केलेला नसला तरी सिद्धींच्या निमित्ताने योग्य नैतिक आचरणाची आवश्यकता वारंवार आग्रहाने सांगितली आहे. किंबहुना त्याशिवाय योगात सिद्धी नाही असे सांगुन नैतिक वर्तणूकीच्या पावित्र्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असा स्पष्ट अभिप्राय देउन हठयोगकर्त्यांनी कसल्याही शंकेला जागा ठेवलेली नाही. हठयोग हा राजयोग गाठण्याचा सोपान कसा या प्रश्नाचा विचार करण्याआधी काही गोष्टी ज्या मी गृहीत धरल्या आहेत त्या स्पष्ट करणं योग्य. हठयोगातला राजयोग म्हणजे पातंजल योगसूत्र असेल, किंवा नसेलही. कदाचित प्रत्याहार, ध्यान, समाधी या अंतरंग योगालाच राजयोग म्हटलं जात असेल. वस्तुस्थिती काहीही असली तरी हठयोग हा मनाद्वारे अंतिम ध्येय गाठण्यासाठी सोपान म्हणुन वापरला जाण्याचा अर्थ काय या प्रश्नाच्या उत्तरात काही फरक पडत नाही.

धारणा, ध्यान, समाधी यांचा समावेशा तर अंतरंग योगात होतो. त्यामुळे यांना प्रतिष्ठा आहे यात काहीच नवल नाही. परंतु प्राणायामासारख्या शारीरिक क्रियेभोवती देखिल जे वलय आहे ते आसनांभोवती नाही. यम नियमांना हठयोगात किती प्रतिष्ठा आहे हे वर आलंच आहे. प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, समाधी हे देखिल राजयोग व हठयोग या दोन्ही ठिकाणी प्रतिष्ठा पावले आहेत. ध्यानाचा उल्लेख हठयोगात तपशीलाने आला असल्याकारणाने धारणेचा विचार येथे वेगळ्याने केलेला नाही. कळीचा मुद्दा हा आसनांचा आहे. पातंजल योगसूत्रात आसन स्थिर व सुखमय असावे असे म्हटले आहे. याचा अर्थ नीट समजवून घ्यायला हवा. धारणा व पुढे ध्यानासाठी स्थैर्य आवश्यक आहेच परंतु त्यात दीर्घकाल बसण्यासाठी आसन हे सुखकारक, सुखमयही असणे आवश्यक आहे. हठयोगाची सारी गरज या ठिकाणी एकवटून आली आहे. नुसत्या आसनासाठीच नाही तर प्राणायामासाठीही योग्य व स्थिर बैठकीची गरज आहे. फार काय, यम, नियमांच्या पालनासाठीसुद्धा शारीरिक स्थैर्याची आवश्यकता आहे. शरीराला त्रास होत असताना, ते दु:खण्याखुपण्यामुळे बेजार झाले असताना यम नियमांचे पालन अशक्य नसले तरी कठीणच जाणार. यासाठी मुळातच राजयोगाच्या साधनेसाठी एका विशिष्ट दर्जाच्या शारिरीक क्षमतेची गरज आहे असे दिसुन येते आणि या गरजेच्या पूर्ततेची हमी हठयोग देतो. आसने व क्रिया यांच्या साहाय्याने हठयोग अंतर्बाह्य शरीर शूद्धी घडवुन आणतो. त्यायोगे राजयोगाचा पुढील प्रवास सुकर, सुलभ, निर्धोक व सुखकर होतो.

मात्र यातुन जर कुणी असा निष्कर्ष काढला की आसनांमुळे फक्त शारिरीक फायदेच मिळतात तर ते चुकीचं ठरेल. आसनांचे फायदे हे मनोकायिक आहेत. आसनांपासून प्राप्त होणार्या मानसिक लाभांना अंत नाही. अलिकडे मानसिक विकारांत मेंदुतील रसायनांचा असमतोल ही संकल्पना वारंवार वापरली जाते. या रसायनांचा मूल स्रोत नलिकाविरहीत ग्रंथी हा असतो. या नलिकाविरहीत ग्रंथींच्या स्वास्थ्यावर आसनांचा होणारा सकारात्मक परिणाम हा आता विज्ञानाला मान्य झालेला आहे. याबाबत प्रख्यात जगप्रसिद्ध योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार याचे मत अभ्यासण्याजोगे आहे. आपल्या “योग एक कल्पतरु” या पुस्तकात ते म्हणतात ” शरीर स्थिर ठेवण्यासाठी प्रथम त्यातील सर्व विकार व विकृती बाहेर काढावी लागतात. शरीराचे सामर्थ असे असावे लागते की, त्यात साधना पेलण्याची ताकद येईल व धारणा ध्यान करताना स्थैर्य येईल. वात, पित्त, कफ हे त्रिदोष शरीराचे नियंत्रण करतात. तेव्हा त्यांच्यात संतुलन ठेवावे लागते व पंचवायूंना कब्जात आणावे लागते. तसेच सप्तधातूंचे प्रमाण संतुलित असावे लागते. या सर्व अंतर्गत क्रिया व्यवस्थित असल्या तरच ध्यान साधते आणि हे साधण्यासाठी आसनाभ्यासाची जरुरी असते.” आपलं अवघं जीवन योगविद्येला वाहिलेल्या आचार्यांच्या या वक्तव्यानंतर खरंतर कसलीही शंका मनात राहू नये.

या सर्व पूर्वसूरींच मत लक्षात घेता हेच दिसून येतं की शरीराला डावलून मनाचा अभ्यास होणं कठीण आहे. योगाभ्यासासाठी देखिल शरीराला दुय्यम लेखुन, सुरवात मनाकडून केल्यास यश प्राप्त होणं कठीणच. आरोग्याची सर्वसामान्य व्याख्या येथे उपयुक्त ठरणार नाही कारण सर्वसामान्य स्वस्थ व्यक्तीकडुन तासभर विशिष्ट आसनात स्थिर बसण्याची अपेक्षा नसते. योगाभ्यासात अपेक्षित असलेलं शरीर स्वास्थ्य हे वेगळ्या दर्जाचं आहे. उच्च दर्जाच्या योगाभ्यासासाठी असलेल्या मागण्या देखिल वेगळ्या आहेत. तेथील निकष वेगळे आहेत. या गोष्टी लक्षात घेणं भाग आहे. तर मग हठयोगात मनाचं महत्त्व काय? असा प्रश्न सहज पडु शकतो. यासाठी “राजयोगमजानन्तः केवलं हठकर्मिणः” असे म्हणून हठयोगकर्त्यांनी या प्रश्नाचे नि:संदीग्ध उत्तर देउन ठेवले आहे. राजयोग न जाणता केवळ हठयोग करणार्यांचे परिश्रम सफल होत नाहीत. “एतानभ्यासिनो मन्ये प्रयासफलवर्जितान्” असे सांगुन मानसिक आत्मिक प्रगतीलाच खरे महत्त्व आहे अशी हठयोगकर्त्यांची शिफारस आहे. यासार्या गोष्टी लक्षात घेता असे दिसून येते की प्राचीनांनी शरीराचं महत्त्व पूर्णपणे जाणलं होतं. त्यांच्या मनात आधी शरीर की मन असा कसलाही गोंधळ नव्हता. योगाभ्यासाची सुरवात शरीराकडूनच व्हायला हवी असाच अभिप्राय यातुन व्यक्त होतो असं मला वाटतं.

अतुल ठाकुर

संदर्भः
आरोग्यासाठी योग – योगाचार्य सदाशिव प्र. निंबाळकर
योग एक कल्पतरु – बी. के. एस. अय्यंगार
हठ-प्रदीपिका – स्वात्माराम योगी अनु. – व. ग. देवकुळे
घेरंड संहिता – अनु. – व. ग. देवकुळे

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

हेरंडसंहिता, हठप्रदिपिका, पतंजलि वगैरे ग्रंथ सगळ्यांनी वाचले आहेत आणि हठयोग व राजयोग महत्त्वाचे कसे? यावर अखिल भारतातस चर्चा चालु असल्याने या लेखनाची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे अश्या अध्यारूतावर आधारित लेख वाटला.

खरं सांगायचं तर अजिबात कळला नाही Sad
क्षमस्व!

आणि हो, ऐसीवर स्वागत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वागताबद्दल आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

माहीतीपूर्ण व रोचक लेख आहे. आवडला.

रामकृष्ण मिशनच्या प्रतीकाची (लोगो) आठवण झाली. -


The wavy waters in the picture are symbolic of Karma, the lotus of Bhakti, and the rising-sun of Jnana. The encircling serpent is indicative of Yoga and awakened Kunadalini Shakti, while the swan in the picture stands for Paramatman. Therefore, the ideal of the picture is that by the union of Karma, Jnana, Bhakti and Yoga, the vision of the Paramatman is obtained'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभारी आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

अय्यंगार ह्यांना भेटायचं कसं ते कुणी सांगेल का प्लीझ?
त्यांनी अनेक अवघड केसेसमध्ये अगदि चमत्कार म्हणता येइल ह्या पद्धतीने इफेक्ट्स दाखवले आहेत.
मला माझ्या पाठिच्या दुखण्यासाठी त्यांना वैयक्तिक भेटायचे आहे.
महत्प्रयासाने मी जो संपर्क क्रमांक मिळवला तो थेट त्यांचा नव्हता.
फोनवरील व्यक्ती कोण पाहिजे, कशाला पाहिजे, माझ्याशी बोला अशा सूरात बोलली.
मोठे लोक स्वतः फोन घेत नाहित. त्यांचे सहकारी "काय काम आहे" असे विचारतात, आणि पुढच्या लेवलला जाउ देत नाहित हाच नेहमईचाच अनुभव आला.
तुम्हाला योगासनं शिकायचीत तर अजून सहा महिन्यांनी एक बॅच सुरु होत आहे, ती जॉइन करा असे उत्तर आले.
आपल्यापैकी कुणाचा वैयक्तिक परिचय आहे का?
मला मोजून ५ मिनिटे पुरेशी आहेत.
माझी केस जरा वेगळी आणि विचित्र आहे. थेट पाठ दुखत नाही पण लोच्या पाठीतच आहे.
कुणी सांगितलं तर बरं होइल.
किंवा अय्यंगारांसारखेच कुणी इतर तरबेज योगगुरु असतील तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मन जर सुरवातच करणार असाल तर लहानमोठे (प्रावीण्याच्या दृष्टीने) गुरु नक्कीच चालून जावेत. अय्यागांरच हवेत असा आपला आग्रह नाही हे ऐकून बरे वाटले.

मला सूर्यनमस्कार सुरु करायचे आहेत. १/२ वर्षापूर्वी प्रयत्न केलेला. खूप आवडले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला माझ्या दुखण्यासाठी स्पेसिफिक तपासणी,सल्ला हवा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पाठीचे दुखणे असल्यास सर्वसाधारणपणे पुढे वाकण्याची आसने करणे टाळतात इतके सांगु शकतो. बाकी योगाभ्यासच करायचा असल्यास एखाद्या योगवर्गाला जाऊन सुरुवात करणे चांगले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

पाठीचे दुखणे असल्यास सर्वसाधारणपणे पुढे वाकण्याची आसने करणे टाळतात इतके सांगु शकतो

पाठीच्या वरच्या भागाचे दुखणे असेल तरच हे लागू पडते. पुष्कळाना, विशेषतः स्त्रियांना पाठीच्या खालच्या भागी दुखते. स्नायूंच्या कमजोरीमुळे असे थोडेच दुखत असेल तर तेथील स्नायूंना व्यायाम होईल अशी बेताने मागे वाकण्यची आसने उपयोगी असतात. (मागे कमान करणे वगैरे नाही)पण खालची पाठ जास्त दुखत असेल तेव्हा मागे वाकण्याच्या आसनांचा फायदा न होता उलट अजूनच दुखते. अशा वेळी तेथील बाक उलटा वळवण्याच्या आसनांनी बरे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सौ टका साची बात.
मार्जारासन छान वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्य नि पाठवत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टंकनदोष सुधार सुचवतो :
> हठं विना राजयोगं राजयोगं विना हठः
ऐवजी
> हठं विना राजयोगो राजयोगं विना हठः
असे.
----------------

वाचनीय व्हावे, म्हणून सुचवणी : पहिल्या परिच्छेदात निबंधाचा हेतू, लक्ष्य असलेला वाचकगण असे काहीतरी आले, तर निबंधातील सूत्र धरून वाचण्यास मदत होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

सर्वसामान्यांच्या (माझ्यासारख्या) दृष्टीने शास्त्रांचे दोन प्रकार मानता येतील. १. पौर्वात्य मूलाचे आणि चिकित्सापद्धती फारशी तार्किक नसणारे. २. पाश्चात्य मूलाचे आणि अतिशय सुसंगत चिकित्सापद्धतीने अभ्यासलेले.

पैकी पहिल्या प्रकारात मला केवळ आयुर्वेद (थोडाफार) बरा वाटतो. अ‍ॅलोपॅथी जे करू शकली नाही ते त्याने माझ्या पित्ताबद्दल केले. पण बाकी शास्त्रांबद्दल अजूनही काही आस्था निर्माण झाली नाही. म्हणून इथे पास.

पाश्चात्य शास्त्रांबद्दल तेच आहे. सुसुत्रता आहे पण परिपूर्णता नाही. पण तिथे योग्य ती चर्चा जरूर करता येते. म्हणून जवळजवळ ९०% असे तत्त्वज्ञान मान्य करून मी चालतो.

योग आणि पाश्चात्य शास्त्र यांचा मेळ घालून , पाश्चात्य शास्त्राच्या पद्धतीने काही लिहिले जाईल तर ते अधिक रोचक वाचेल. अगदी प्राथमिक संबंध सुद्धा. (विज्ञान योगशास्त्र एक विज्ञान म्हणून मान्यच करत नाही. ते का करावे म्हणून एखादा मूलभूत लेख, इ) चालेल.

बाकी, आपले स्वागत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अतुल ठाकुरजी, आपल्याला जमल्यास एखादा "सूर्यनमस्कारावर" लेख/मालीका लिहावा/वी ही विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्र्यांचं साष्टांग नमस्कार वाचलंय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हाहाहा मी त्यातल्या एका पात्राच्या सूर्यनमस्काराबद्दालच्या फॅनॅटीक/ऑबसेसीव्ह आस्थेबद्दल ऐकलं आहे. कोणीतरी वाक्य उधृत केले होते. पण आठवत नाही. त्याचा एसेन्स मात्र लक्षात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्र्यांनी ही कॅरॅक्टर औंधचे तत्कालीन राजेसाहेब भवानराव पंतप्रतिनिधि ह्यांच्यावरून बेतली आहे असे वाचल्याचे आठवते आणि ते सहज शक्य आहे.

भवानराव पंतप्रतिनिधि हे एक प्रागतिक विचाराचे संस्थानिक होते. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, कलांना उत्तेजन, निवडणुका आणि लोकशाही असे अनेक बाबींबद्दल ते वाखाणले जात. व्यायाम आणि विशेषेकरून सूर्यनमस्कार हा त्यांचा असाच एक आवडता विषय. सूर्यनमस्कार संस्कृति विद्यार्थ्यांमध्ये रुजावी म्हणून ते प्रयत्नशील असत आणि त्यासाठी शाळाशाळांमधून सूर्यनमस्कार स्पर्धाहि ते भरवत असत. (अशाच एका स्पर्धेत भाग घेतल्याची आठवण माझ्या ८५ वर्षांच्या आत्याजवळ आहे.)

भवानरावांच्या अतिरेकी सूर्यनमस्कारप्रेमाचे विडंबन करण्यासाठी हे पात्र 'साष्टांग नमस्कार' नाटकात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय मी माहीती शोधली असता मायबोलीवर अशा प्रकारचा संदर्भ आढळला.
इतर व्यायामप्रकारांबद्दल माहीत नाही पण सूर्यनमस्काराने अतोनात ओजस्वी (चीअरफुल/रेडिअन्ट) वाटते हा अनुभव आहे. दुसरा एक आवडता प्रकार म्हणजे ३० मिनीटाचे "सर्कीट ट्रेनींग" - सुपर्ब!!!
पण सूर्यनमस्कार ते सूर्यनमस्कारच. कालच "धर्म" सिनेमात पाहीलेला प्रसंग - चतुर्वेदी उशीरा जेवणार असतात कारण त्यांची पूजा व काही विधी पार पडायचे असतात. तेव्हा बायको काळजी करते. ते म्हणतात - मी ब्राह्मण आहे. माझ्या आत्म्याला आधी भिक्षा घालणार.आता ते ब्राह्मण वगैरे अवांतर सोडा तो मुद्दा नाही पण सूर्यनमस्कार केल्यावर , फक्त शारीरीक व्यायम नाही तर आत्मिक/आंतरीक समाधान मिळते. ते मात्र सर्कीट ट्रेनींगमध्येही मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चतुर्वेदी उशीरा जेवणार असतात कारण त्यांची पूजा व काही विधी पार पडायचे असतात. तेव्हा बायको काळजी करते. ते म्हणतात - मी ब्राह्मण आहे. माझ्या आत्म्याला आधी भिक्षा घालणार.

ओहो! 'कारण शेवटी आम्हीं भटेंच! त्याला काय करणार?' ही (पु.ल.प्रणीत) एक्सक्यूज याही बाबतीत लागू पडते तर!

पण सूर्यनमस्कार ते सूर्यनमस्कारच.

शंका: 'पूजा आणि काही विधी' आणि सूर्यनमस्कार यांचा नेमका संबंध काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंतरीक समाधान हा कॉमन मुद्दा भाऊ!!! तुमी बी लैच शंका काडून र्‍हायले Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मात्र यातुन जर कुणी असा निष्कर्ष काढला की आसनांमुळे फक्त शारिरीक फायदेच मिळतात तर ते चुकीचं ठरेल. आसनांचे फायदे हे मनोकायिक आहेत. आसनांपासून प्राप्त होणार्या मानसिक लाभांना अंत नाही.

“राजयोगमजानन्तः केवलं हठकर्मिणः”
योगाभ्यासाची सुरवात शरीराकडूनच व्हायला हवी असाच अभिप्राय यातुन व्यक्त होतो असं मला वाटतं.
आवडल आणि पटल देखिल
माहीतीपूर्ण लेखाबद्दल आभारी आहे.
अष्टांगयोग, बहिरंग, अंतरंग योगाबद्दल अजून खोलात जाऊन वाचायला आवडेल.

अवांतर : सध्याच्या परिस्थितीत केजरीवालाचा राजयोग त्याच्या हठयोगामुळे(तुम्ही मांडलेला हठयोग नव्हे) धोक्यात येण्याची शक्यता दिसतेय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. किती समजला, हे सांगणे कठीण तरी ही बाकी हठं विना राजयोगं राजयोगं विना हठः आताच बघायला मिळाला. थंडीत पावसात रस्त्यावर भिजून आणि झोपून आपण किती हट्टी आहोत हे राजाने दाखविले. कदाचित तोंडाचा ताबा सोडणे ही राज हठाचे एक लक्षण असावे (प्रकाश टाकावा ही विनंती)

राजाच्या 'हठा पायी हजारों बाबूंना गेले दोन दिवस कित्येक किमी पायी चालावे लागले. सर्वांचे पोट थोडे कमी झाले. (राज योगाचा फायदा प्रजेला ही होतो) . स्लीप डिस्क मुळे पाठ थोडी दुखत असते. तरी ही सोमवारी मेट्रो बंद असल्या मुळे एका भरगच्च बस मध्ये traffic जाम असल्या मुळे तब्बल अडीच तास उभे राहण्याच्यातपश्चर्येचे पुण्य ही लाभले. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपरोध पोचला अन आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या धाग्यावरून एक मजेदार आठवण जागी झाली.

दोनएक वर्षांपूर्वी आमच्या संस्कृत गटामध्ये लेस मॉर्गन नावाच्या अमेरिकन व्यक्तीकडून एक पृच्छा आली. तो स्वात्मारामांच्या 'हठयोगप्रदीपिका' ग्रंथावर एक इंग्रजीत पुस्तक तयार करीत होता. त्यात वापरलेल्या संस्कृत लिखाणाच्या शुद्धतेसाठी त्याला काही साहाय्य हवे होते आणि असे साहाय्य देणारा कोणी आहे काय असा शोध तो घेत होता. हे कार्य अंगावर घेण्याची तयारी मी दर्शविल्यामुळे त्याचा आणि माझा संपर्क आला.

आं.जा.च्या माध्यमातून आमच्या तदनंतर बर्‍याच चर्चा होऊन अनेक सुधारणा मी त्याला सुचविल्या आणि चुकाहि दुरुस्त करून दिल्या. (येथे हे विशेष नमूद करावयास हवे की त्याचे संस्कृतचे ज्ञान संपूर्ण अमेरिकेतच मिळविलेले होते तरीपण त्यांची संस्कृतची समज चांगलीच उच्च होती. तरीहि खास भारतात वाढलेल्यांना दिसणार्‍या गोष्टी त्याला माहीत नव्हत्या. उदा. रघुनाथशास्त्री कोकजे ह्या जुन्या प्रसिद्ध लेखकाच्या एका पुस्तकाचा आधार अनेक जागी घेतला आहे. मूळ प्रकाशनपूर्व सूचीमध्ये लेखकाच्या नावाचा उल्लेख सर्वत्र 'शास्त्री' असा केलेला होता कारण त्याच्यापुढे हे नाव 'कोकजे, रघुनाथशास्त्री' असे होते. त्यावरून त्याची अशी समजूत झाली होती की 'शास्त्री' हेच त्यांचे आडनाव आहे ) 'Croaking Frogs: A Guide to Sanskrit Metrics and Figures of Speech'अशा नावाचे हे पुस्तक आता प्रसिद्ध झाले आहे. (प्रस्तावनेमध्ये साहाय्यासाठीच्या अभारप्रदर्शनामध्ये माझेहि नाव आहे. 'Croaking Frogs' हे शब्द वेदांमधील बेडकांप्रमाणे रटत मन्त्र म्हणणार्‍या ऋषींच्या उल्लेखावरून बेतलेले आहेत.)

ह्या पुस्तकाच्या वरील शीर्षकावरून माझी आणि त्याची बरीच चर्चा झाली. पुस्तकामध्ये स्वात्मारामांच्या योगशिक्षणाबाबत खूपच मजकूर आहे पण तितकेच वजन 'हठयोगप्रदीपिके'मध्ये वापरलेल्या वेगवेगळ्या वृत्तांच्या शास्त्रीय वर्णनाला दिलेले आहे. मी त्याला असे पटवायचा प्रयत्न करीत होतो की 'संस्कृत वृत्तांवर तुला काही लिहायचे असेल तर जरूर त्यासाठी एक वेगळे पुस्तक तू लिही, पण हठयोगाच्या चर्चेत संस्कृत वृत्तांना काही विशेष स्थान आहे असे मला दिसत नाही. भारतात मेनलाईन संस्कृत अभ्यासात वृत्तांच्या अभ्यासासाठी 'हठयोगप्रदीपिका' ह्या ग्रंथाकडे कोणी वळत नाही. वृत्तांची चर्चा आणि योगाची चर्चा ह्यांना समान महत्त्व देऊन तू अमेरिकेतील योगाभ्यासकांचे लक्ष विचलित करशील. त्यांना संस्कृत वृत्तांच्या सखोल ज्ञानाची काही आवश्यकता जाणवते असे दिसत नाही.'

पण त्याने आधीच हे सगळे लिखाण करून ठेवले होते आणि म्हणून त्याने योगावरील हे पुस्तक अखेर वर दिलेल्या शीर्षकानेच छापून आणले आहे. पुस्तकाच्या शीर्षकामुळे त्याच्या आत स्वात्मारामांच्या योगाचा काही विशेष अभ्यास आहे असे अजिबात जाणवत नाही. उलटपक्षी, संस्कृत वृत्तांचा अभ्यास करू पाहणार्‍या अमेरिकनास - असल्या esoteric विषयाचा अभ्यास करणारे लोक संख्येने किती असतील ह्याची कल्पना नाही - पुस्तकात संस्कृत काव्यरचनेचे मानदंड अशा कालिदासप्रभृति लेखकांना वगळून सर्व उदाहरणे स्वात्मारामांच्या 'हठयोगप्रदीपिके'तील का आहेत हे एक कोडे पडेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0