दुखवट्याचा ठराव
ज्या बॅटिंगच्या जोरावर भारत टेस्ट क्रिकेटमधला अव्वल संघ बनला होता तिचा नुकताच मृत्यू झाला. तशी गेले बरेच महिने तिची तब्येत तोळामासाच होती. इंग्लंडच्या दौऱ्यावर एकाही इनिंगमध्ये तिला ३०० च्या पलिकडे जाता आलं नाही. त्यामुळे अर्थातच ०-४ असा मार खावा लागला. मध्ये वेस्ट इंडिज वगैरे लोकांबरोबर किंवा भारतातल्या भारतात खेळून तिला जरा बरा काळ आल्यासारखं वाटलं. प्रकृती सुधारते की काय अशी आशा वाटायला लागली.
पण ऑस्ट्रेलियाची हवा काही तिला मानवली नाही. इंग्लंडमध्ये ३०० गाठताना मारामार झाली तशी आता २०० चा पल्ला गाठतानाच तिची दमछाक झाली. आता तिची दशा बघवत नव्हती. पहिल्या दिवशी बॅटिंग असो की दुसऱ्या दिवशी, थोडीशी हळूहळू पुढे जाते न जाते तो फेफरं येऊन पडत होती. एखाद दोन तासांपुरता चेहऱ्यावर तजेला दिसायचा, डोळ्यात पूर्वीसारखी चमक दिसायची. आता उभारी धरून चालते की काय असा संशय येई येईपर्यंत कधी अर्धांगवायू, कधी पाठीत सणक तर कधी चक्कर येऊन पडायची.
आता सर्वांनीच तिला मृत घोषित केलेलं आहे. लोकं तिच्याविषयी नाही नाही ते बोलायला लागले आहेत.
'कॉमेंटेटर्सनी आता हिल्फेनहाउस टू लक्ष्मण, नो रन असं म्हणण्याऐवजी हिल्फेनहाउस टू लक्ष्मण, नो विकेट असं म्हणायला हवं.'
'भारतीय बॅट्समननी म्युच्युअल फंडांप्रमाणे डिस्क्लेमर द्यायला हवा पास्ट परफॉर्मन्स डज नॉट गॅरंटी फ्यूचर परफॉर्मन्स'
शेवटी काय, रोज मरे त्याला कोण रडे. अति झालं आणि हसू आलं म्हणतात त्यातलीच ही गत.
तेव्हा आपण सगळे जण दोन मिनिटं शांतता पाळून तिला श्रद्धांजली अर्पण करूया, असा प्रस्ताव मी मांडतो.
(अर्थातच सचिन तेंडुलकरला यात धरलेलं नाही. इतर सगळे पंधरा वीस सरासरी वर ढासळत असताना साहेबांनी अठ्ठेचाळीसवर किल्ल्याचा एक बुरुज समर्थपणे लढवला आहे)
आंघोळ
मरणशय्येवर पडण्याआधी २०११ च्या सुरुवातीला घराच्या अंगणात स्टरॉईड्स घेऊन बागडणार्या रुग्णाची लक्षणं आम्ही तेव्हाच ओळखली होती त्यामुळे आमची आंघोळ तेव्हाच झाली आहे.
बाकी 'देव' पावला म्हणजे देव एक चतुर्थांश उरला असा नवा अर्थ जारी करावा असे आम्ही आवाहन करतो.
पुन्हा तेच...
मी हा दुखवट्याचा ठराव मांडला तेव्हा तिसऱ्या टेस्ट मॅचची दुसरी इनिंग सुरू झाली नव्हती. तीतही ८८ ला ४ विकेट बघून त्यावर आणखीनच शिक्कामोर्तब झालं. या ऑस्ट्रेलियन बोलर्सना सांगायला हवं, की सोडून द्या राव. मरे हुए को क्या मारना?
सेहवाग, गंभीर, द्रविड, लक्ष्मण, कोहली आणि धोनी या सहा बॅट्समनच्या मिळून गेल्या तेहतीस पूर्ण इनिंगमध्ये ६७५ रन झाल्या. प्रत्येकाने आपली सरासरी राखली असती तर किमान १५०० व्हायला हव्या होत्या.
"समाधाना"ची बाब
"भिंत" द्रविडचा एक नवाच विक्रम आता पोतडीतून बाहेर आला. गेल्या दहा डावापैकी आठ डावात 'त्रिफळाचित' झाला आहे पठ्ठ्या. शिवाय अॅलन बॉर्डरचा आतापर्यंतचा ५३ वेळा 'त्रिफळाचित' झालेला फलंदाज हा 'विक्रम' राहुलबाबाने त्रिफळ्याची ५४ नंबरी खेळी करून मागे टाकला.
[समाधानाची बाब म्हणजे कुठेतरी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहोत.]
हॅ हॅ हॅ
सदर व्यक्ती (ब्याटिंग) मेली आहे हे मान्य नसल्याने दुखवटा पाळला नाही.
प्रत्येकच संघ आपल्या घरात दादा असतो. कुठच्यातरी काळात तो दुसर्याच्या घरातही दादागिरी करू शकतो. पण बहुतेक काळात तो स्वतःच्या घरातच दादा असतो.
भारतातल्या फुटणार्या आणि स्पिनला साथ देणार्या खेळपट्ट्या या ऑस्ट्रेलियातल्या किंवा दक्षिण आफ्रिकेतल्या छातीपर्यंत चेंडू उसळणार्या खेळपट्ट्यांपेक्षा कमी स्पोर्टिंग असतात हे मान्य नाही.
हीच ब्यॅटिंग, याच खेळपट्ट्या...
तसं नाही, घरी वाघ आणि बाहेर शेळी असा आक्षेप नसून एकेकाळी वाघ आणि आता शेळी अशी तक्रार आहे. जवळपास हीच ब्याटिंग २००३ मध्ये याच खेळपट्ट्यांवर खेळत होती. सेहवाग, द्रविड, तेंडुलकर, लक्ष्मण होतेच. (कोहलीच्या ऐवजी गांगुली होता, आणि गंभीरच्या ऐवजी आकाश चोप्रा होता.) तेव्हा यांच्यातल्या एकेकट्याने डबल सेंच्युऱ्या हाणल्या होत्या. तीनतीनशेच्या पार्टनरशिप्स झाल्या होत्या महाराजा... बरं त्यावेळची ऑस्ट्रेलियन बोलिंग काही कमीची नव्हती. मक्ग्रा, शेन वॉर्न, ब्रेट ली वगैरे दिग्गज होते.
२०११
एकूण २०११ हे वर्ष फार वाईट गेलं. भीमण्णा गेले, देवसाब गेले, जगजीतसिंगजी गेले आणि आता भारतीय क्रिकेटनेही शेवटचा श्वास घेतला. या वाईटपणाचा हँगओव्हर २०१२ मध्येही जाता जात नाही. लिंबूपाणी घेतलं, काळी कॉफी घेतली, अॅस्पिरीनचा गोळ्या तर काल रात्रीच घेतल्या होत्या, पण अशक्तपणा, थकवा, तोंडाला कोरड, डोळ्यांवर झापड आणि डोक्यात 'वाँव वाँव...' असे आवाज...
तेंडुलकरची शंभरावी शंभरी टीव्हीवर बघावी, भारतीय संघाने टेस्ट सीरीज ड्रॉ करावी, वन डे सीरीज तीन-दोन अशी जिंकावी ... कायकाय स्वप्ने होती. स्वप्ने बघायचीच तर कद्रूपणा कशाला? जमीनीवर झोपून अडचण का? वचने किं दरिद्रता?
राजाभाऊ, सगळीच स्वप्ने काही खरी होत नाहीत. जे झाले त्याला पिरगाळून फेकून द्या. उद्याचा सूर्य नवा असेल. आणखी थोडी कॉफी घेता?
स्वप्ने बघायचीच तर कद्रूपणा
स्वप्ने बघायचीच तर कद्रूपणा कशाला?
:) अगदी असेच काहिसे पुलंचे वाक्य यथार्थ वाटल्यानेच स्वाक्षरीत लावले आहे
बाकी मुळ शोकप्रस्तावाला अनुमोदन नाही. होतं असं कधीकधी नेहमी त्याला काय करणार.. धावांचे फेरे घेता येत नसले तरी दैवाचे फेरे का कुणला चुकलेत.. नशीबच चालत नाही म्हटल्यावर ब्याट चालणारच कशी!
त्या कांगारुंनी इतकं मोहरुन जायला नको. आमच्याकडला पौषात म्याच ठेवलीत म्हणून! .भारतात या म्हणावं.. मग बघतो :P
+१ सहमत आहे
खरेच श्रद्धांजली द्यायला हवी आपल्या क्रिकेट संघाला.
आता सगळी मदार सचिनवर आहे
आजही ऑस्ट्रेलियाने ६०० धावांचा टप्पा ओलांडून डाव घोषित केला आहे.
त्यांना आपल्या मेलेल्या संघाच्या क्षमतेचा एव्हाना पूर्ण अंदाज आलेला दिसतो आहे.
त्याचीच परिणती म्हणून
भारतीय संघाने ७.२ ओव्हर्सच्या आतच ३१ धावांत २ गडी गमावले
सेहवाग १८ बॉल १८ धावा
द्रविड पुन्हा एकदा बोल्ड बाय हिल्फेन्हास
भारतीय क्रिकेटला माझीपण श्रद्धांजली... :^&^
द्रविड पुन्हा एकदा बोल्ड बाय
द्रविड पुन्हा एकदा बोल्ड बाय हिल्फेन्हास
अरे तो आज कसा आऊट झाला रे.. किती दुर्दैवी असावं?! पण एकूण मेंटॅलिटीतच प्रॉब्लेम आहे! लेगस्टंपवरची हाफव्हॉली डिफेण्ड करायला जाऊन यॉर्कर करून घेतला राहुलनं पर्थ टेस्ट मध्ये! मिडविकेट बाऊंडरीशिवाय दुसर्या कोणत्याही जागी दिसण्याची लायकी नव्हती त्या डिलिव्हरीची! 'कोषगते द्विरेफे' झालेलं आहे सगळ्यांचंच.
आपापल्या घरी जो तो शेर असतो वगैरे सगळं खरंय पण म्हणून व्हिजिटिंग टीमनं शेळी व्हायलाच हवं का? पॅटिन्सन म्हणाला ते काही खोटं नाही, आपले बॅट्समन त्यांच्या बोलर्सना घाबरल्यासारखेच वाटतात. पुन्हा त्या कोहलीचं वॉर्नरला "It will be altogether a different story when you come to India!" असं म्हणणं म्हणजे कहरच आहे!
मी तसा प्रचंड आशावादी आहे, डाय-हार्ड सपोर्टर म्हणा हवंतर. पण खरंच आता पुरे म्हणायची पाळी आली आहे.
जाता जाता : मरणोन्मुख झालेल्या रिकी पॉण्टिंगला आपण पुनरुज्जीवित केलं आहे. तो टेस्ट्समध्ये चौदा हजारी (अन कदाचित पंधराही) मनसबदार होणार. :)
सांगा बरे!
आता पौष संपल्याने ही म्याच डॉ होण्या इतपत चांगले ग्रह फिरले असतील का? का सागरने जी शुक्र-गुरु-चंद्र युती घडवून आणली आहे त्यामुळे पुन्हा सगळं फिस्कटेल?
शुक्र आणि चंद्राची युती फ़ळाला येणार
ऋ,
उद्या २६ जानेवारी आहे, तेव्हा अॅडलिडच्या खेळपट्टीवर "शुक्र आणि चंद्राची युती" "गुरु"च्या शुभदृष्टीमुळे सचिनचे महाशतक बघावयास मिळणार असे दिसते आहे. :)
सचिन ने फक्त पहिला १ तास हा युतीला "गुरु" चे आशिर्वाद मिळेपर्यंत टिकून राहिले पाहिजे. ते जमले तर महाशतक नक्की :)
तेंडुलकर आउट
त्यातल्या त्यात एक गडी चांगला खेळत होता तोही आउट झाला. पण काळजी करण्याचं कारण नाही,
Fall of wickets 1-26 (Warner, 6.5 ov), 2-31 (Marsh, 9.6 ov), 3-84 (Cowan, 25.5 ov)
Fall of wickets 1-26 (Sehwag, 5.1 ov), 2-31 (Dravid, 6.6 ov), 3-78 (Tendulkar, 31.2 ov)
आपलंही हुबेहुब त्यांच्यासारखंच चाललेलं आहे, तेव्हा आपल्याही ६०० रन्स होतील...
सहमत
आहे. दोन मिनिटे कळफलक न बडवता मूक श्रद्धांजली वाहिली गेली आहे.
अवांतर - स्पोर्टिंग टाईम्स ह्या ब्रिटिश वृत्तपत्राने १३० वर्षांपूर्वी घातलेल्या श्राद्धाची प्रत. दवणीय भाषेत बोलायचे तर ह्याच राखेतून अॅशेसच्या परंपरेच्या फिनिक्सने झेप घेतली :) -
