Skip to main content

निवळशंख पाणी

डॉ. रेवा दुभाषी ह्यांना मी तसा काही व्यक्तिशः ओळखत नाही पण त्यांचं लेखन मला आवडत राही. 

गोवा हा मला अगदीच प्यारा. 
तिकडे जाऊन सेटल व्हायची "सुरंगी" हार्मलेस फँटसी मी आणि बायको बरेचदा रंगवत राहतो. 

आणि हा गोवा रेवा दुभाषींच्या दिवाळी अंकांतील ललित लेखांत झुळूमुळू येत राह्यचा त्यामुळे मी त्यांचा फॅन झालेलो. साहजिकच त्यांनी जेव्हा निवळशंखची कॉपी पाठवली तेव्हा छान वाटलं. 
वाटलं की बाबा ह्या मराठी साहित्याच्या रम्य रंगीबेरंगी गदारोळात आपलीही लेखक / वाचक म्हणून सूक्ष्म का होईना पण काही जागा आहे. 
थोडं रिलेव्हंट आणि बरंच मस्त वाटलं :) 

पुस्तक अर्थातच आवडलं. 
बहुतेक सर्व लेखांत गाभ्याला गोवा आहेच शिवाय एक-दोघांच्या. 
अबोलीची वेणी, मौन पांघरलेले तळे आणि पाण्यातून वर येणारा गाव हे लेख हंस-मौजेत आधी वाचले होते. 

"पाण्यातून वर येणारा गाव" हा तेव्हाही फार आवडलेला. 
शीर्षक आधीच पुरेसं खुलासेदार असल्याने स्पॉयलर-चाचा होण्याचा गिल्ट न बाळगता थोडं विस्ताराने बोलता येईल. धरणामुळे पाण्याखाली गेलेला गोव्यातला गाव उन्हाळ्याच्या मे मयन्यात महिनाभरासाठी दरवर्षी वर येतो. 
त्या मयन्यात तिथे आपली मुळं आठवायला जाणारे गावकरी आणि त्यांच्या बिटर-स्वीट रिऍक्शन्स हा साधारण विषय. 
पण लेखिकेच्या स्वतःच्या संवेदनशील-कल्पनारम्य (अर्थात म्हणून तर लेखक लेखक असतो ना ... डहह!!!) इंटरप्रिटेशन्सनी हा लेख फारच बहारदार झाला आहे. 

गोवा गाभा नसलेले लेखही छान (परीघ आणि मुंबईचा पाऊस) 
आणखी एक गोष्टीसाठी रेवा मॅमना मनापासून दाद म्हणजे प्रत्येक लेखाचा शेवटचा पॅरा किंवा वाक्य ही फारच ऍप्ट उतरलीयत. 
चेरी ऑन केक म्हणावीत अशी. 
गणपतीला डोळे काढायचं वेगळंच कसब लागतं. 
तसंच समेवर वाक्यावर कथा-लेख संपवणं ही वेगळीच कला आहे असं मी व्यक्तिशः मानतो. 
उदाहरणार्थ ही काही... कोणत्या लेखाच्या शेवटी ते तुम्हीच शोधा. 
------- 
त्या रक्ताचा रंग अबोली असतो !
 ------- 
तिथे पडलेल्या काजऱ्याच्या फळाशी खेळात मी घरी जायला निघाले. 
------- 
मी पाहिलाय त्याला त्याच्या घरी जाताना खरेतर विरघळून जाताना ... आपल्या घरी असेच जायचे असते ना ? 
------- 
एकच छोटीशी तक्रार म्हणजे प्रस्तावनेत सर्व लेखांचा गोषवारा जास्तच तपशीलात सांगून टाकण्यात आलाय. सो तुम्ही माझ्यासारखे स्पॉयलर्स सिरीयसली घेणारे असाल तर शक्यतो आधी पुस्तक वाचून प्रस्तावना मग वाचा. पण पुस्तक जरूर वाचाच!