उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ७
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीचा भाग बराच लांबल्याने, वाचनाच्या सोयीसाठी तेथील प्रतिसादाचे रुपांतर नव्या भागात करत आहोत.
=======
ओव्हन बद्दल वाचण्यासारखे काही.
Taxonomy upgrade extras
चव?
पंजाबी पंजाबी कुकने बनवल्यासारखे लागत होते काय? पंजाबी चवीची पुण्यात तशी मारामार आहे, एक ते देव अंकल्स किचन सोडले तर फारसे कुठे बरे पंजाबी मिळत नाही. सध्या फिनिक्स मार्केटसिटीमधे पंजाबी ग्रील नामक एक रेस्तरा चालु झाले आहे ते उत्तम आहे असे कळले पण ज्यांने सांगितले त्याचे माणशी बिल साधारणे १३००+ झाले होते त्यामुळे तो नाद सोडून दिला.
चांगली पंजाबी चव पुण्यात
चांगली पंजाबी चव पुण्यात 'शाहजी'ज पराठा हौस' इथे मिळेल. आपटे रोडवाल्या ब्र्यांचमध्ये जाऊ नका. किंमतीच्या नावाने वेणू आणि क्वांटिटी कमी. त्यापेक्षा वरिजिनल ब्र्यांचमध्ये जावा. दगडूशेठच्या जवळच आहे. सिटी पोष्ट रोडला नर्तकी हाटेलजवळ, तत्रस्थ गुरुद्वारा आणि तांबोळी मशीद नामक मशिदीपासून वॉकेबल अंतरावर आहे. मात्र गर्दी लै असते, शक्यतोवर रात्री ८-८:३० पर्यंत गेलात तर लौकर जागा मिळेल. पराठे सोडूनही अन्य भाज्या सुंदर मिळतात. सरसों का साग आणि मक्के की रोटी, झालंच तर अन्य काही भाज्या मस्ताड असतात एकदम.
अवांतरः शनिवार-नारायणादि पेठांकडून आलात तर पैल्यांदा बाजीराव, मग शिवाजी अन मग शाहजी असा उलटा प्रवास होतो.
माणशी १३००... अबब! देव
माणशी १३००... :O अबब!
देव अंकल्स किचन >> व्वा काय बोल्लात "मी" .... माझं हे फेव्हरेट ठिकाण. त्यांच्याकडे मिळणारं मक्के की रोटी आणि सरसो का साग तर क्या कहने, केवळ लाजवाब. आता लवकरात लवकर जावंच लागेल स्लुर्प!!!
पंजाबी जेवणाच्या बाबतीत 'भगत ताराचंद' मधे पण चांगलं जेवण मिळतं असं वाटतं. पण अर्थात मी पंजाबचं ऑथेंटीक जेवण कधी केलं नाहीये (किंवा पंजाब/उत्तर भारतात कधी गेलो नाहीये) त्यामूळे माहित नाही, पण भगत ताराचंद चं जेवण पुण्यातल्या इतर टीपीकल पंजाबी हॉटेल्स पेक्षा जरा वेगळं वाटलं.
+१
माझं हे फेव्हरेट ठिकाण. त्यांच्याकडे मिळणारं मक्के की रोटी आणि सरसो का साग तर क्या कहने, केवळ लाजवाब.
पुण्यात हे एवढं एकच ठिकाण माहित आहे, ठाण्याला वसंत विहार/इडन गार्डन पाशी एक पंजाबी चाचाची मेस/रेस्तरा/खानावळ होती, ते एक मस्त पंजाबी चवीचं जेवण होतं. इतरत्र कुठे असं खाल्ल्याचं आठवत नाही. भगत ताराचंद तितकसं आवडलं नव्हतं, गर्दीही फार असते.
भगत ताराचंद हे पंजाबी हॉटेल
भगत ताराचंद हे पंजाबी हॉटेल नाहिये.
कच्छि-राजस्थानी अशी स्पेशालिटी आहे.
तिथले मेथी मलई मटर मला अतिशय आवडते. शिवाय तुपात न्हालेल्या चपात्या खूप प्रमाणात आवडत नसल्या तरी एखाद-दोन खातोच.
शिवाय तेथील दाल, विशेषतः त्यावरील कांदा जसा मस्त कॅरमलाईज्ड असतो तसा क्वचितच मिळातो.
बाकी गर्दीशी सहमत.
मुंबईतील मुंबादेवी जवळचं वर्जिनलची सर मात्र कोणत्याही ब्रांचेसना नाही
गर्दीशी अगदी सहमत, त्यात
गर्दीशी अगदी सहमत, त्यात पुण्यातलं भगत ताराचंद अगदी लक्ष्मी-रोड वर असल्याने तर अजूनच अडचण. गाडी लावण्यासाठी वेळ आणि चिडचिड त्यात भ.ता. ला गेलं की तिथे निदान अर्धातास तरी वेटींग असतच. खूप वर्षात गेलो नाहीये ते ह्याच कारणांमूळे.
भगत ताराचंद हे पंजाबी हॉटेल नाहिये.
कच्छि-राजस्थानी अशी स्पेशालिटी आहे.
हे माहीत नव्हते, धन्यवाद. तरीच विचार करायचो हे इतर टिपीकल पंजाबी रेस्टॉरंट पेक्षा वेगळं कसं.
शिवाय तेथील दाल, विशेषतः त्यावरील कांदा जसा मस्त कॅरमलाईज्ड असतो तसा क्वचितच मिळातो.
+१ अगदी अगदी, माझ्या एका मित्राने ती पद्धत शिकून घेतली आहे :)
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मिळणारं ताक - अहाहा! कदाचित त्या ताकामुळेच मला ते ऑथेंटीक पंजाबी असावं असं वाटलं.
मी ताक पितो
>> जास्ती संस्कार केलेले ताक आवडत नाही. बादशाहीमध्ये मिळते ते ताक मला एकदम घरच्यागत वाटते आणि म्हणून आवडते. त्याच्या कितीही वाट्या पिऊ शकतो. ताकात प्रमाणापेक्षा जास्त जलजिरा, आलं, इ. घातल्यावर त्याचा विचका होतो असे (स्पष्ट) मत आहे.
ह्यावरून आठवलं. सोपानदेव चौधरींची एक कविता आहे - 'मी ताक पितो ताक पिणार' अशी काही तरी. मी तिच्या शोधात आहे. कुणाला मिळाली तर सांगा.
बर्गर बार्न कॅफे
गेल्या आठवड्यात ढोले पाटिल रस्त्यावर बर्गर बार्न कॅफे नामक ठिकाणी जाण्याचा योग आला.
कॉलेज पब्लिक ची बेक्कर गर्दी होती, त्यात आपण जरा म्हातारीच मंडळी गेलो आहोत असे वाटले. :)
लाल रंगाची सजावट, ७०-८० च्या दशकातले इंग्रजी रेट्रो म्युझिक..असा एकूण अॅम्बियन्स छान होता. (तिकडे अॅब्बा चे "डान्सिंग क्वीन" खूप वर्षांनी ऐकून वेडी झाले, लहान झाल्यासारखे वाटले, माझ्या लहान्पणी दादा/ताई मंडळींना या गाण्यावर नाचताना पाहिलेय!)
वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर, बेगवेगळ्या चवीचे "फझ" नामक पेय, फ्राईज आणि एक मेक्सिकन रोल मागवला होता. बर्गर बास्केट मध्ये सर्व केले जातात. बर्गर सगळेच चांगले होते, फ्राईज आणि फझ पण ठिकठाक पण खरी "डिश ऑफ द डे" मेक्सिकन रोल ठरली.
किंमती माफक होत्या. ४ बर्गर, ४ फझ, २ फ्राईज व १ रोल एवढे सगळे ११०० मध्ये बसले.
त्यांचे इतर रोल आणि प्लेटेड मील ( नॉनव्हेज मध्ये) हे प्रकार खाण्याकरता परत तिथे जाण्याचा इरादा आहे.
पुण्यात फ्रेंच
>> पुण्यात फ्रेंच चव ठीकठाक मिळू शकणारी ठिकाणे सुचवा प्लीज़.
फार उत्साहाची परिस्थिती नाही. तरीही -
१. ल प्लेझीर - भांडारकर रस्ता
२. ला बूशे दॉर - औंध, बोट क्लब रोड
३. आर्थर्स थीम - कोरेगांव पार्क
बंदच झाले? आम्ही मागे गेले
:O बंदच झाले? आम्ही मागे गेले होतो, तरी २ वार्षांआधी तेव्हा पाटी होती पण ते लोक बोलले थोड्याकाळाकरीता रिनोव्हेशन साठी बंद आहे. पण कायमचेच हे आज समजतेय.
@महाग - हो अगदी अगदी. मी जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हा फुकटच्या पार्ट्या उकळायलाच गेलोय त्यामुळे मेनूकार्ड्ची उजवी बाजू नेहमी फाट्यावर मारलीये ;)
फणसाचे गरे पिकून घरात फारच
फणसाचे गरे पिकून घरात फारच घमघमाट करत होते म्हणून काल-परवाचे दोन प्रयोगः
फणस पोळी (कोकणात मिळते तशी नाही, गूळपोळी सारखी, फुटाणाच्या पिठात कुस्करलेल्या फणसाचे गरे मिसळून तयार केलेल्या पुरणासहित)
फणस ब्रेड (बनाना ब्रेड च्या चालीवर - या आवडत्या रेसिपीत कुस्करलेल्या केळींऐवजी फणस वापरून. फणस इतका गोड होता, की साखर १/४ कपच वापरावी लागली. जायफळ आणि वॅनिला ऐवजी गोडला बॅलन्स म्हणून किसलेलं आलं आणि दालचिनी पूड वापरली )
त्या दोन वेगळ्या जातीच आहेत
त्या दोन वेगळ्या जातीच आहेत फणसाच्या. बरका फणस फार गोड आणि रसाळ असतो पण त्यातल्या बुळबुळीतपणाने आणि धाग्यांमुळे तो चावून गिळता येत नाही. च्युइंग गम किंवा वातड चिकनसदृश इफेक्ट होतो.
पण याचा रस जास्त प्रमाणात आणि स्वादिष्ट असल्याने तो गाळून घेतला आणि सुकवला की उत्तम गोड साठे बनते.
कापा फणस कमी गोड पण नुसता खाण्याइतका करकरीत असल्याने तो मुख्यतः थेट खायला वापरतात.
बाकी कोंकणात बरेच आयुष्य गेल्याने आणि घरांच्या चहूबाजूला कापेबरके फणसवृक्ष उभे असल्याने या फळाविषयी काही विशिष्ट मते झाली आहेत.
१. जुन्या प्रचंड बरक्या झाडांचे फणस उंचावरुन खाली पडताना एकटे पडत नाहीत. सोबत आणखी चारपाचांना घेऊन येतात.
२. उंचावरुन खाली पडल्याने ते न चुकता रप्पदिशी फुटतात आणि परिसरात घमघमाट करतात
३. चारपाच मोठे बरके फणस एकत्र खाली पडले की बराच मोठा आवाज होतो. शिवाय ती एक पीडाच वाटते कारण त्यांचं काहीही बनवणं अशक्य असतं त्यामुळे ते फेकून देणं भाग पडतं.
४. कोंकणात कोणीही एकमेकांना फणस देत नाहीत कारण कोणी तो अजिबात घेत नाहीत. त्यापेक्षा बोकड सोलून मटण बनवणं सोपं पडावं.
५. कच्च्या फणसाची भाजी, उकडलेल्या आठळ्या आणि तळलेले गरे हे फणसाचे तीन सर्वोत्तम पदार्थ आहेत असं वैयक्तिक मत आहे. बाकी डेरिवेटिव्ह (आईस्क्रीम, सांदणे, फणसपोळी इ इ) आत्तापर्यंत तरी फ्लॉप वाटले आहेत.
आता हे नवे पदार्थ करुन पहायला हवेत.
मला वाटतं कापा फणस वापरला,
मला वाटतं कापा फणस वापरला, कारण फार रसाळ नव्हता. पण इथे कापा-बरका ला काय म्हणतात माहित नाही. या कृतींसाठी गरे थोडे जास्त पिकल्यावर (उतरल्यावर) मऊ (आणि थोडे ट्रान्सलूसंट) झाले, तेव्हा ब्लेंडर ने एकजीव करून घेतले. किंचित गूळ घातला. मग हळूहळू फुटाण्याचं पीठ घालत घट्ट केलं. भाकरीच्या पिठासारखे थोडे मळून घेतले. रस काही काढला नाही. मग पुरण पोळी सारखं सारण घालून कणकेची पोळी लाटली.
नॉर्दर्न फ्रण्टियर
सोमवारी आगाखान प्यालेसजवळच्या 'नॉर्दर्न फ्रंण्टियर' नावाच्या हाटेलात जाऊन आलो. बर्यापैकी काश्मिरी पद्धतीचं काही तिथे मिळतं असे ऐकून गेलो होतो. पण मेन्युवर फारसं काही कश्मिरी दिसलं नाही. व्हेज मेन्यू तर फारच पंजाबी स्टाईल होता. जेवणाची चव मात्र छान होती.
१. अफगाणी(!) चिकन - वरुन मलईदार दह्याचं मॅरिनेड, आणि आत काजूची मसालेदार पेस्ट घातलेलं तंदुरी चिकन. तिखट आवडणार्यांनी ही डिश घेऊ नये, सपक वाटेल.
२. जाफरानी बोटी कबाब - छान लुसलुशीत होते, केशराचा फ्लेवर जरा जास्त वाटला (नाव जाफरानी असलं म्हणून काय झालं?).
३. कमळाच्या देठाचे तळलेले चिप्स - तोंडी लावायला मस्त लागत होते.
४. नादुर याक्नी - कमळाच्या देठाची दह्यात केलेली भाजी. मला विशेष आवडली नाही, बाकीच्यांना आवडली.
५. मलाई मकई टिक्की - बरी होती
६. पनीर हांडी(!) - चांगली चव, वर म्हटल्याप्रमाणे व्हेज मेन्यू तसा लिमिटेडच होता.
७. पेशावरी तरकारी बिर्यानी - साध्या व्हेज बिर्यानी सारखीच, पण चवीला जास्त माईल्ड, जास्त फ्लेवरफुल आणि चांगली होती.
७. मलाई कुल्फी / फिरनी - कुल्फी बकवास (कण्डेन्स्ड मिल्कचा डबा फ्रिजात ठेवल्यासारखी चव होती शिवाय अती गोड) / फिरनी ठीक (अगेन, कण्डेन्स्ड मिल्क खूप घातल्यासारखं वाटलं)
माणशी खर्च - ४०० रु. (अर्थात आम्ही १० लोक होतो)
अरे नॉर्दर्न फ्रंण्टियर ला
अरे नॉर्दर्न फ्रंण्टियर ला गेलात आणि 'कुरकुरी भेंडी' खाल्ली नाही, यु मिस्ड इट समथिंग टेस्टी सर. असो पुढल्यावेळी गेलात तर नक्की खा असं अगदी आग्रहाने सांगेन. नॉर्दर्न फ्रंण्टियर ची ती सिग्नेचर डीश म्हणायलाही हरकत नाही.
थोडक्यात पाकृ : भेंडीच्या बिया काढून त्याचे पातळ काप फ्राय केलेले असतात, बोले तो एक्दम क्रिस्पी आणि त्यावर चाट मसाला, तिखट, मीठ, कच्चा बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस. अहाहा - अप्रतिम लागतं चवीला (अत्ता लिहीतानाही पाणी येतय तोंडाला). रोटी बरोबर किंवा अगदी चकणा/स्टार्टर म्हणूनही असं 'पलक-झपकतेही' म्हणतात तसं मिनीटात संपतं :)
हा फोटो :
यालाच भिंडी राजस्तानी असेही
यालाच भिंडी राजस्तानी असेही म्हणतात अशी शंका आहे. भेंडी राजस्थानी या नावाने हुबेहूब वरील वर्णनाचा पदार्थ अनेकदा आवर्जून मागवून खाल्ला आहे. भेंडी ही औदासिन्यजनक वस्तू इतक्या चविष्ट कुरकुरीत रुपात समोर येऊ शकते याचा सुरुवातीला धक्काच बसला होता. दुर्दैवाने नंतर हा पदार्थ देणारं हॉटेलच बंद झालं.
भेंडी ही औदासिन्यजनक वस्तू
भेंडी ही औदासिन्यजनक वस्तू इतक्या चविष्ट कुरकुरीत रुपात समोर येऊ शकते याचा सुरुवातीला धक्काच बसला होता
अ ग दी तंतोतंत सहमत गवि.
मीही भेंडी कधीच एवढ्या प्रेमाने (आणि हावरटपणाने) खात नाही. पण नॉर्दर्न फ्रंण्टियर मधे गेलं की मेनू कार्ड हतात पडण्याआधी कुरकुरी भेंडी ऑर्डर होते :) घरी अजून करून पाहिली नाहीये, बरं आठवलं - करेन लवकरच :)
नॉर्दर्न फ्रंटियर एकेकाळी
नॉर्दर्न फ्रंटियर एकेकाळी हपीसच्या जवळ असल्याने नेहेमी जाणं व्हायचं. मलाई कुल्फी व्यतिरिक्त प्रतिसादाशी बहुतांशी सहमत. माझ्या आठवणीप्रमाणे नॉर्दर्न फ्रंटियरमध्ये त्यांनी स्वतः बनवलेली मलई कुल्फी काही विशिष्ट दिवशीच मिळते - एरवी प्याकेज्डवाली मिळते. बाद.
नॉर्दर्न फ्रंटियरबाहेरचा पानवाला अत्यंत भिकार आहे. अतिशय मर्यादित आणि कमी प्रतीचा माल ठेवतो. त्यापरीस थोड्या तंगड्या तोडून / पेट्रोल जाळून एरिन नगरवाला शाळेच्या गल्लीत जावे. तिथले बरे आहेत.
विकांताला दोन हाटिलात गेलो
विकांताला दोन हाटिलात गेलो होते. बाणेर रोडचं राजवाडा आणि म्हात्रे पुलाजवळचं हार्वेस्ट फार्म.
दोन्ही "टिपिकल" पंजाबाळलेलं तीन ग्रेव्ह्यांचे काँबिनेशन देणारी हॉटेले. दोन्हीकडे कंपनी मात्र छान असल्याने जेवण दुय्यम होते.
खाणे वाईट नाही, रादर सर्वसामान्य पंजाबीछाप हॉटेलांपेक्षा चांगले आहे. मात्र वेगळा असा कोणता पदार्थ नाही.
बरीच मोठी गँग असल्यास मात्र ही दोन्ही हॉटेले चांगली कारण बरीच कपॅसिटी आहे + भरपूर पार्किंग आहे!
------
नॉर्थ इंडीयन म्हणजे पंजाबी - तीन मसाला पेस्ट्सचं काँबिनेशन - सोडून किंवा पराठे सोडून इतर काही खिलवणारी हॉटेले कोणती आहेत?
का उत्तरेत सगळे खाणे असेच एकसुरी असते?
काश्मिरी खाणे विचारल्यावरही काश्मिरी पुलाव आणि रोगन जोश यापुढे गाडी सरकत नाही. माझ्या एका मैत्रिणीने गोड्यापाण्यातील माशांची काश्मिरीपद्धतीने केलेला एक कबाबसम पदार्थ आणला होता, तसे काही ऑथेंटिक काश्मिरी कुठे मिळते?
पूर्व युपी व बिहारमधील मत्स्याहारही (गोड्या पाण्यातील) वेगळा आहे, त्याचा स्वाद पुण्यात कुठे मिळेल का?
कालच्या धुव्वादार पावसात
कालच्या धुव्वादार पावसात बाणेर रोडवरील 'जलेबी जंक्शन' (ज.जं) इथल्या गरम गरम जीलब्या हादडल्या. जीलबी हा प्रकार तसा फार आवडत नाही पण ज.जं मधल्या जीलब्या आवडल्या. आकाराने छोट्या, क्रिस्पी आणि विशेषतः कमी गोड त्यामुळे आवडल्या असाव्यात. तिथला रबडी-जीलबी प्रकार ही मस्त आहे. (बाकी त्यांचे समोसा, कचोरी, वडा-पाव हे स्नॅक्स टाईप पदार्थ अजिबात चांगले नाहीत आणि किंमतही फार जास्त आहे , १५ रु. नग समोसा).
सांदण
उन्हाळ्यामुळे घरातील केळी फारच लवकर पिकली. धनंजय यांची पाककृती वापरुन ह्या पिकून काळ्या झालेल्या केळ्यांचे सांदण केले. धनंजय यांच्या पाककृतीत दोन बदल केले - अ. (उष्मांक कमी करण्यासाठी) वेगळे सारण केले नाही. ब. हळदीची पाने अनुपलब्ध होती.
तरीही प्रकार अत्यंत स्वादिष्ट झाला होता.
आत्ताच फ्रेंच दूतावासात एका
आत्ताच फ्रेंच दूतावासात एका पार्टीत फ्रेंच चवीने बनविलेले शाकाहारी स्टार्टर्स खाल्ले. चविष्ठ होती. सोबतीला भारतीय आणि फ्रेंच संस्कृतीची चर्चा करत (बिड्या फुकत) (सॉफ्ट) ड्रिक्स घेतली. मजा आली.
------------
नंतर सरवण भवन मधे १४ लघुइडल्यांची एक डिश असते ती खाल्ली. आत्माराम तृप्त झाले.
नाम्बोल पकोडे
परवा (आता महिना झाला) इम्फाळजवळ नाम्बोल येथे पकोडे (भजे) खाल्ले. मी शाकाहारी असल्याने कांद्याच्या पातीचे, पनीरचे, गोबीचे, बटाट्याचे, इ इ पकोडे खाल्ले. कांद्याच्या पातीचे भजे लैच सॉल्लिड होते. ते गाव मणिपूरचे पकोडा सेंटर आहे. लोक दूरदूरन पकोडे खायला तिथे जातात, किंवा रस्त्यात अवश्य थांबतात. अर्थात आमच्या सुपुत्राने मांसाहारी पकोड्यांवर ताव मारला. म्हणजे चिकन पकोडे. माशांचे (कि मास्यांचे?), अंड्यांचे, शिंपल्याचे पकोडे सुद्धा एकेक प्लेट मागवलेले. पण अन्य सार्ञा कुटुंबीयांची नि अधिकतर ग्राहकांची पसंद काय असावी? ? ? गोगलगाय पकोडे !!! ती म्हणे डेलिकसी आहे. तिच्यासोबत आलेल्या चटण्या अव्वल दर्जाच्या होत्या. त्या मी माझ्या पकोड्यांसोबत वापरल्या. शिवाय ईशान्य भारताची किंग मिरची खाल्ली. केसर जितके खातात त्याच्या वीसपट कमी आणि तीही मिठात बूडवून खाल्ली तरच खैर असते. पण तिचा स्वाद अतुलनीय आहे.
सर्वात रोचक म्हणजे सासूबाई हॉटेलबाहेर बाकावर बसलेल्या. त्यांच्या कृष्णभक्त वैष्णव समजूतीनुसार सर्व काही गैरमासे वर्ज्य आहे.
तुम्ही मांसाहारी (भात +मासे +
तुम्ही मांसाहारी (भात +मासे + चिकन) असाल तर कोणताही वशिला आवश्यक नाही. शाकाहारी असाल तर (तिकडे म्हणजे मणिपूरमधे) हॉटेल इंफाल, नि इतर २-३ खूप उत्तम (२*, ३*, इ) हॉटेल्स आहेत. आपल्या हाताने शिजवून, किंवा स्थानिक डेलिकसीज खायच्या असतील तर आमचे मणिपूरी पाहुणे तुमची सहर्ष मदत करतील. तुम्हाला खरोखरीच रस असेल माझ्या मेहुणींपैकी एक तुम्हाला मणिपूर फिरवून देखिल आणेल (हिल ड्रिस्त्रिक्ट्सचा अपवाद - सेक्यूरिटी रिजन्स.
बाय द वे, गोगलगायीचे पकोडेच नव्हे तर तिकडे तिची भाजी पण बनवतात. आमचा एक पाहुणा खात होता तेव्हा त्याच्या वाटीतून दगडांचे वरण असावे तसा आवाज माझ्या शाकाहारी कानांवर येत होता.
बाकी ते खाणे तिथे मुळीच महाग नसावे. मी गोगलगायी नि शिंपले ६० रु किलो भावाने विकत घेतलेले.
अच्छा
तुम्हाला खरोखरीच रस असेल माझ्या मेहुणींपैकी एक तुम्हाला मणिपूर फिरवून देखिल आणेल
भरपूर रस आहे पण वेळ नाही. पण पुढे-मागे वेळ मिळाला की तुम्हाला व्यनि करेन. बाकी, यासाठी तुमच्या मर्जीत रहायचे असेल तर वाद घालताना साधारण किती वेळ विरोध केलेला चालतो तुम्हाला ते सांगा. म्हणजे एखाद-वेळेस तुमच्याशी वाद घालायचा की मणिपूरसाठीची मर्जी सांभाळायची अशी परिस्थिती निर्माण झाली की विरोध करण्याचं थांबवेन. :ड
माझं मत
>> यासाठी तुमच्या मर्जीत रहायचे असेल तर वाद घालताना साधारण किती वेळ विरोध केलेला चालतो तुम्हाला ते सांगा. म्हणजे एखाद-वेळेस तुमच्याशी वाद घालायचा की मणिपूरसाठीची मर्जी सांभाळायची अशी परिस्थिती निर्माण झाली की विरोध करण्याचं थांबवेन.
तसे आमचे जोशी चांगलेच पुरोगामी आणि उदारमवादी आहेत. त्यामुळे त्यांना खुशाल विरोध करा हवा तितका ;-)
पुरोगामी उदारमतवाद्यांची लक्षणे
>> तुमचं हे म्हणणं मानून मी उद्या त्यांच्याशी भरपूर वाद घातला आणि त्यांची मर्जी गमावून बसले तर मला मणिपूर फिरवून आणेल अशी मेव्हणी तुम्हाला आहे का? असल्यास तुमचे हे मत ग्राह्य धरेन. अन्यथा नाही.
मीसुद्धा जोशींप्रमाणे पुरोगामी उदारमतवादीच आहे. त्यामुळे नेहमीच धादांत खोटी विधानं करत असतो ;-)
अनावश्यक डिटेल्ससाठी उर्जा
अनावश्यक डिटेल्ससाठी उर्जा खर्च न करणे वेगळे आणि धांदात (हा अनुस्वार आमच्याकडे धावरच देतात) खोटे बोलणे यांचा परस्परसंबंध नाही.
" ज्यावेळी वास्को द गामा गुजरातेत आला...." हे वाक्य युरोपीयांच्या आगमनाचे भारतावरील परिणाम या सदराखाली विशिष्ट संदर्भात सांगताना
ब देशाचा क पदस्थ ड संबोधित वास्को द गामा फ जहाजाने ग वर्षी ह महिन्यात ज तारखेला ल वाजता आजच्या गोवा राज्यात न गावात प बंदरात र लोकांसमवेत आऐइइइइइ हे ऐवज घेऊन ओएइऔऔइओ या लोकांसमवेत ... .... .... आला.
या दोन्ही वाक्यांचे महत्त्व सारखेच असते. आता लोकांना किती शाणपणा दाखवायचा हा व्यक्तिगत प्रश्न असतो.
तसे आमचे जोशी चांगलेच
तसे आमचे जोशी चांगलेच पुरोगामी आणि उदारमवादी आहेत.
वास्तवात हे एका अर्थानं नाकारता येणार नाही. ऐसीवर येण्यापूर्वी मी स्वतःस पुरोगामी नि उदार असेच (मनात) म्हणे. मी यापूर्वी मीमराठीवर लिहि तेव्हा गवि म्हणालेले कि ऐसी हे उदार, पुरोगामी, विज्ञानवादी, गंभीर, इ इ स्थळ आहे. मीमराठीवर काहीतरी तांत्रिक समस्या येऊन ते बंद पडले तेव्हा नेमक्या याच कारणांनी मी माझे ३ वर्षे जुने मिसळपावचे लेटंट खाते सोडून ऐसीवर नवे खाते उघडले.
पण पुरोगामीत्व हे सुंदर, कल्याणकारी, समतावादी, मानवी, हळवे, महान मानवी मूल्यांची जोपासना करणारे, मंगल, इ इ असेल अशी माझी कल्पना होती. इथे प्रत्यक्षात मात्र पुरोगामीत्वाचे प्रेझेंटेशन रुथलेस, सार्या सुंदर मानवी मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करणारे, कमालीचे सिनिकल, मानवाला बुद्दिमत्ता गेल्या ३०-४० वर्षात आली आहे असे मानणारे, ईश्वरविरोधी नि ईश्वरप्रणित मांगल्यविरोधी तर नव्हेच पण निसर्गाच्या सम्यकतेवर आघात करणारे, मागचा हिशेब चुकता करण्यासाठी मागचे सगळेच नासक्या नजरेने पाहणारे, ज्यांची पार्श्वभूमी हायफाय नाही त्यांना वेचून वेचून अपमानित करणारे, शास्त्राची चर्चा करू न इच्छिणारे , इ इ इ आढळले.
तेव्हा मी सरळसरळ स्वतःस प्रतिगामी म्हणायला चालू केले आणि आणि दुसरी बाजू मांडायचा प्रयत्न करू लागलो. ती मिळमिळीतपणे मांडली तर खैर नाही म्हणून मी ती खूप आवेशाने मांडतो.
कॉफी संपली कि आहेच संसार नि ऑफिस.
वेलकम अॅनिडे
वाद हा नेहमी मुद्दा संपेपर्यंत घालावा असं माझं मत आहे. अर्ध्यावर वाद सोडायचा असेल तर वाद चालू करण्यात अर्थ नाही. एक घाव दोन तुकडे करून बाजूला व्हावं. शिवाय मी नेहमी "मुद्द्याशी" वाद घालत असतो, व्यक्तिशी नाही. वाद घालणारा व्यक्ति प्रामाणिकपणे आपले खरे मत मांडत आहे, ते मत माझ्यामते चूकीचे (किंवा बरोबर) आहे तेव्हा त्याचे म्हणणे त्याने कशे मॉडिफाय कराबे, क्वालिफाय करावे वा मागे घ्यावे वा मला माहिती पुरवावी, माझे गैरसमज दूर करावेत वा माझ्या लॉजिकमधला दोष दाखवून द्यावा, वा सबब वादाचे स्वरुपच असे आहे कि यावर चर्चाच होऊ शकते निर्णय नाही इथेपर्यंत दोघे बोलणारे यावेत.
------------------
मला किती विरोध केलेला चालतो याचं उत्तर आहे - So long as I keep believing that you are arguing honestly and so long as I keep believing you are consistent. चर्चेत मला समोरचा प्रामाणिक नाही आणि कंसिस्टंट नाही हे ही ऐकायला तयार नाही असे माझे मत होते तेव्हा मी स्वतःच एक्झिट मारतो. तो बिंदू शोधायची तुम्हाला गरज नाही.
------------------
आता प्रश्न राहिला मर्जी बॅलॅन्स करायचा. खरंतर असं म्हणायची पाळी येऊ नये. मी नेहमी प्रत्येक ऐसीकराच्या मर्जीत राहू इच्छितो. ९९% वेळा मी तसा प्रयत्न करतो आणि १००% वेळा करावा अशी माझी इच्छा असते. वादामधे भूमिकांमधे फरक असेल तर वाद हा गरम झाला पाहिजे असे माझे मत आहे. आपण सगळे शिकलेले सुसंस्कृत लोक आहोत. तेव्हा वादाची पातळी न घालवता तापमान कसे वाढवावे यावर माझा जोर असतो. गप्प राहून, न कळून घेऊन, खोडसाळपणा करत राहिल्याने मला चीड येते. माझ्याशी वाद करणाराची मला कधीही चीड येत नाही. पण कोणी मला वादात प्रामाणिकपणे चारी मुंड्या चीत केले तर माझा त्या माणसाबद्दलचा आदर दुणावतो. दुसर्या वेळी त्याचे मत मी अधिक भक्तीने वाचतो. पण जी खुस्पटे काढतो त्यातली इनकंसिस्टंसी हेरून वाद योग्य वेळात नेमका नियंत्रणात आणणे माझ्या विरोधकांना कठिण राहिले आहे.
-----------------
इन द लाईट ऑफ यूर क्वेरी, इतकं लिहिणं आवश्यक नव्हतं. पण तरीही माझे प्रतिसाद बरेच एक्ट्रीम असतात म्हणून अशा गाईडलाइन्स कोठेतरी टाकायच्या त्या टाकल्या.
--------------------
बाय द वे, इथल्या विरोधाचा आणि मणिपूरला जायचा काही एक संबंध नाही. माझ्यासाठी इथले वाद "ओवर द कॉफी" गप्पा आहेत. अस्मिता नाहीत.
काल बायकोला ऐसीवरचे हे दोन
काल बायकोला ऐसीवरचे हे दोन प्रतिसाद नि उपप्रतिसाद (नि खरडवहीतला काही भाग) वाचून दाखवले. तिचा मणिपूरी लोकांचा एक चाकूम म्हणून फेसबूकवर ग्रूप आहे नि त्यात ती अनेक नामी डिशेस टाकत असते. मग ती म्हणाली कि मी ऐसीवरपण फोटो टाकते. त्यासाठी आता मी गुगलड्राइव मधे एक marathisites नावाचे फोल्डर अॅड करतो. त्याचे परमिशन सेटिंग्ज पब्लिक ठेवतो. मग त्यातला जो फोटो इथे डकवायचा आहे त्यासाठी -
१. L img 2. Insert Edit image 3. R img पैकी नक्की कोणते बटन वापराचे. शिवाय फोटोच्या टायट्ल मधे थेट मराठी टंकता येत नाही. लँडस्केप आणि पोर्ट्रेत फोंटोंसाठी length and width सेटिंग्ज काय ठेवायच्या?
मणिपूरची आहारपद्धती इतकी भिन्न आहे कि या सगळ्या डिशेस ऐसीकरांना वाचताना मजा येईल.
मदत
>> १. L img 2. Insert Edit image 3. R img पैकी नक्की कोणते बटन वापराचे. शिवाय फोटोच्या टायट्ल मधे थेट मराठी टंकता येत नाही. लँडस्केप आणि पोर्ट्रेत फोंटोंसाठी length and width सेटिंग्ज काय ठेवायच्या?
L img व R img हे लेफ्ट जस्टिफाय, राइट जस्टिफाय फॉर्मॅटसाठी आहेत. आपल्या इच्छेनुसार त्यांपैकी कोणतेही अथवा Insert Edit image वापरा. 'पूर्वदृश्य' पाहिलेत तर फरक लक्षात येईल.
फोटोच्या शीर्षकात देवनागरी टंकण्यासाठी एखादा देवनागरी कळफलक वापरावा लागेल. उदा : इनस्क्रिप्ट, गूगल मराठी इनपुट वगैरे.
length and width सेटिंग्ज - साधारण ३००-४०० विड्थचे फोटो प्रतिसादांत ठीक दिसत असावेत. हाइट दिली नाही, तर अॅस्पेक्ट रेशोप्रमाणे आपोआप अॅडजस्ट होते.
इतर मित्रलोक्स फ्रेंच
इतर मित्रलोक्स फ्रेंच दूतावासात स्टार्टर्स, इम्फाळमधे गोगलगाय पकोडे आणि इटलीत सापासारखा मासा खात असताना आम्ही इकडे हपीसच्या कॅन्टीनात फवे खात बसलो असणे म्हणजे दुर्दैव नाहीतर काय?!
हा धागा मानवतेच्या दृष्टिकोनातून बंद करावा अशी व्यवस्थापनाला विनंती.
व्यवस्थापक खुद्द टांझानियात मगरीच्या शेपटीचे सूप अथवा बैलाच्या शिंगाचा चहा भुरकत बसले असतील तर मग राहूदे.. :)
आलू बोंडा
आता आलू बोंड्याचे कौतुक ते काय पण बर्याच वर्षांत खाल्ला नव्हता. अगदी नावही विसरून गेलेलो. परवा (यावेळेस बरोब्बर परवा) (फर्स्ट?) इंडीया प्लेस नावाच्या नोईडातल्या मॉल मधे श्रीरत्नम नावाच्या मिश्र (मांसाहारी सोडून मिश्र) हॉटेलमधे सहकुटुंब गेलेलो. तिथे मेनूवर आलूबोंडा पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. उदगीर ते परंडा* बस बार्शीला खूप वेळ थांबायची नि सारे प्रवाशी स्थानकाच्या कँटीनमधे नाश्ता करायचे. आमचे अण्णा त्यावेळी भजे,पुरी भाजी नि आलू बोंडे मागवत. तो वाफाळणार्या सांबारात बुडवलेला बोंडा, त्यात मधे मधे दिसणारे धन्याचे दाणे, कडीपत्त्याची पाने, ताटातल्या नारळाच्या, टमाट्याच्या, दाळीच्या चटण्या... . खणकून भूक लागलेली असायची आणि कँटीनमधल्या त्या सुवासाने तोंडाला इतके पाणी सुटलेले असायचे कि हात धुतल्यानंतर टेबलावर बसून अन्य ग्राहकांचे सांबर फुरकणारे तोंड पाहत पाच मिनिटे काढणे देखिल कठीण वाटे. फूंकून सांबर थंड होई पण आतले बटाट्याचे गोळे जेव्हा तोंडात फुटत खाण्याची तेव्हा टाळूला आग लावत. जे भावंड जास्त खाते त्याला मातापिता जास्त अन्न देतात असे कायसे सूत्र मला त्यावेळीही माहित असावे. एकिकडे खायची घाई नि दुसरीकडे ती आग. दोन्ही एकत्र सांभाळणे मुश्किल पडत असे. शिवाय आमच्या डोक्यात उदगीरच्या फिक्स्ड क्वांटीटी डिशेसनी त्यावेळेस जी काय समीकरणे बसवली होती त्यानुसार ते घाईघाईत येऊन अख्खा बाउल पुन्हा भरत अधिकचे वाढले जाणारे सांबार म्हणजे अहाहा...
जनरली मला, लहाणपणीची भूक आता नसल्याने म्हणा वा अन्यथा म्हणा, असा नोस्टेल्जिक आयटम खूपदा डीसैल्यूजनमेंट देऊन जातो. मात्र श्रीरत्नमने इतक्या कालांतराने त्याच चवीची यशस्वी आठवण करून दिली. दोन मोठमोठाले बोंडे पोटात रिते करून तृप्त होता झालो.
-----------------
अवांतरः-
*उदगीर आणि परंडा हे दोन्ही तालुके पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात होते. अखंड उस्मानाबाद जिल्ह्याची ती पूर्वपश्चिम दोन टोके होती. पण या मराठवाड्यातील दोन गावांमधील रस्त्यावर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिह्याचा शेपटासारखा (खरे एक दुसरा आकार, पण असो) भाग घुसला आहे. त्याचे टोक तालुका बार्शी. अण्णा म्हणायचे कि आपण मूळचे बार्शीचे. ईथल्या भगवंताच्या मंदिरातले मुख्य पुजारी, इ.इ.इ. मग बार्शीत आलो असताना आमचे भगवतांचे दर्शन घेणे आले. शिवाय आपल्या पूर्वजांचे गाव म्हणून मला बार्शीबद्दल ममत्व नि अभिमान वाटे. त्याच्याही थोडीशी चव त्या आलू बोंड्याला यायची.
काही पटकन आथवणारे फरकः १.
काही पटकन आथवणारे फरकः
१. कव्हरच्या पीठाच्या निर्मितीतील फरक. भोंड्याचे कव्हर मेदुवड्याप्रमाणे डाळी भिजवून वाटून केलेले असते. तर बटाटवड्याचे थेट बेसन घाटून
२. कव्हरच्या पीठाच्या साहित्यातील फरक. बटाटवड्यात फक्त बेसन असते. भोंड्यात उडीद डाळ, उकडे तांदूळ वगैरे घटक असतात
३. सारणाच्या घटकांतील फक्र. बटाटवड्याच्या सारणात अनेकदा आले, लसूणच नव्हे तर काहिंकडे कांदाही असतो, तसेच मिरचीचा तिखटपणा असतो. आलुभोंड्यात सहसा हे घटक नसतात शिवाय मिर्याचा तिखटपणा असतो.
पटकन इतके आठवले. अजून इथले तज्ज्ञ सांगतिलच! :)
जेरुसलेम आर्टीचोक लाटक्स
योगायोगाने कालच जेरुसलेम आर्टीचोक लाटक्स (Latkes) बनविले होते तेंव्हा फोटोही काढले. ह्या कृतीत थोडेफार फेरफार करून वापरली. लाटक्स हा प्रकार आवडीचा आहे आणि त्यात बटाट्याहून वेगळा स्वाद असलेले जेरुसलेम आर्टीचोक्स वापरल्याने मजा आली. आम्ही ते क्रेम फ्रेश आणि टोमॅटोच्या चटणीबरोबर खाल्ले. जेरुसलेम आर्टीचोक्स बटाट्याला पर्याय म्हणून बर्याच पाककृतीत वापरता येतात.
पॉटभर
गेल्या रविवारी ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट येथे नविनच उघडलेल्या "पॉटभर" ह्या मालवणी रेस्टॉरन्टात गेलो होतो. यांची घंटाळीतदेखिल शाखा आहे पण तिथे कधी गेलो नव्हतो.
बोंबिल फ्राय - छान
तिसर्या मसाला - छान
खेकडा मसाला - सुमार
वडे - सुमार (थोडे करपले होते)
आंबोळी - अत्युत्तम (एकदम लुसलुशीत)
तांदळाची भाकरी - ठीक
सोलकढी - ठीक
किंमत - वाजवी (तिघांच्या "पॉटभर" जेवणाचे रु. ७०४ फक्त!)