धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स
आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स.
हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले. अतिशय उत्तम कथा,वळणा वळणाची, अनेक धक्के आणि फ्लॅशबॅक असलेली. अनेक परिकथेतील पात्रे आणि कथांचे भाग एकत्र करून कथा साकारली आहे.
कथानायक पुस (Puss) हा एक साहसवीर असतो आणि एका साहस मोहीमेच्या वेळी एका शहरात येतो. त्यावेळी त्याला समजते जॅक आणि जील ह्या भावंडांकडे तो लहानापासून शोधत असलेल्या 3 जादूच्या बिया (Magic Beans) आहेत. हे जॅक आणि जील महाभयानक आणि कुप्रसिद्ध असे दुष्प्रवृत्तीचे असतात. पुस रात्री त्यांच्याघरी त्या जादूच्या बिया चोरायला जातो. पण तिथे त्याला एक मुखवटा (Mask) घातेलेली आकृती आड येते आणि तो त्या बिया चोरू शकत नाही. त्या आकृतीचा पाठलाग करत तो एका अड्ड्यावर पोहोचतो. तिथे ती आकृती त्याला द्वंद्वाचे आवाहन देते.साधेसुधे नव्हे तर "डान्स फाइट"चे, म्हणजे नाचत नाचत मारामारी. ह्या मारामारीच्या शेवटी त्याला कळते ती आकृती म्हणजे 'किटी सोफ़्टपॉन' नावाची एक मांजरी आहे.
तीच्या मागे-मागे जाता जाता त्याला त्याचा लहानपणीचा मित्र भेटतो. हा मित्र म्हणजे 'ह्म्प्टी अॅलेक्झांडर डम्टी', ह्म्प्टी डम्टी कवितेतील अंडे. तो पुसला मदतीची याचना करतो. पण पुस त्याला झिडकारून निघून जातो. मग आपल्याला कळते की किटी ही हम्प्टीची मैत्रीण आहे. ती हम्प्टीला विश्वास देते की ती पुसला परत आणू शकते.
ती पुसकडे जाते आणि त्याला त्याच्या रागाचे कारण विचारते. मग येतो एक फ्लॅशबॅक......
पुस अणि हम्प्टी 'सॅन रिकार्डो' नामक एका खेड्यात एका अनाथा आश्रमात एकत्र वाढलेले असतात. तिथे पुस हम्प्टीचे बाकीच्या टग्यांपासून नेहमी रक्षण करत असतो त्यामुळे त्याचा खास मित्र असतो. हम्प्टीला 3 जादूच्या बिया हव्या असतात. त्या बियांची एक राक्षसी वेल होणार असते जी आकाशाच्या पलीकडे जाऊ शकते. तिथे एक मोठा राजवाडा असतो आणि त्यात सोन्याचे अंडे देणारा हंस असतो. तो हम्प्टीला हवा असतो. तो पुसला त्याच्या ह्या मोहिमेत सामावून घेतो. मग हे दोघे मिळून जादूच्या बिया मिळवण्यासाठी लोकांच्या घरात घुसणे माफक चोर्याकरणे असे प्रकार करू लागतात. एकदा पुस एका म्हातारीला एका वळूपासून वाचवतो. ती म्हातारी त्या शहरातल्या एका प्रतिष्ठित आणि पोलीस पाटलाची आई असते. पुसचा जाहीर सत्कार केला जातो आणि त्याला 'सन्मानाचे बूट' दिले जातात. त्या दिवसापासून तो लोकांना मदत करू लागतो आणि हम्प्टीला टाळू लागतो.
एके रात्री हम्प्टी त्याला फक्त एक शेवटची मदत करायची विनंती करतो. पुस मान्य करून त्याच्याबरोबर जातो. पण हम्प्टी 'बॅन्क ऑफ सॅन रिकार्डो' वर दरोडा घालायला पुसला घेऊन गेलेला असतो. पुसला हे कळते तेव्हा तो खूप रागावतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. बॅन्केतला बझर चालू होऊन पोलीसपाटील पोलिसांसोबत तिथे पोहोचलेला असतो. ते पुसच दरोडा घालायला आलेला आहे असे समजतात. पुसला पळून जाण्याशिवाय गत्यंतर नसते. हम्प्टी त्याला स्वतःला त्याच्याबरोबर घेऊन जाण्याविषयी विनवतो. हम्प्टीचे स्वप्न साकार करायला फक्त पुसच त्याला मदत करू शकतो असे विनवूनही पुस त्याच्यावर रागावून पळून जातो. पण तो कायमचा सॅन रिकार्डोचा 'वॉन्टेड' होऊन जातो. त्याच्या ह्या भटक्या आयुष्याला हम्प्टी जबाबदार आहे असे त्याला वाटत असते.
आता किटी आणि हम्प्टी पुसची समजूत काढण्यात यशस्वी होतात. मग ते जॅक आणि जील कडून त्या बिया चोरतात आणि त्या आकाशातल्या राजवाड्यात पोहोचतात. सोन्याचे अंडे देणारे हंसाचे पिलू आणि सोन्याची अंडी घेऊन परत पृथ्वीवर येतात. पण परत आल्यावर त्यांची गाठ पडते जॅक आणि जीलशी. इथून कथेला एक धक्कादायक वळण येते. हंसाचे पिलू जमिनीवर आणल्यामुळे अजाणतेपणी एक भयंकर धोकाही त्यांनी ओढवून घेतलेला असतो. तो धोका आणि धक्कादायक वळण काय हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायलाच हवा.
Antonio Banderas (पुस), Salma Hayek (किटी), Zach Galifianakis (हम्प्टी) ह्यांचा आवाजाने नटलेला हा सिनेमा लक्षात राहतो तो अतिशय सुंदर आणि इंटेलिजेंट 3D एफेक्ट्समुळे.
पुस किटीचा पहिल्यांदा पाठलाग करतो पाठलाग एकदम थरारक झालाय. त्यानंतर 'डांस फाईट' म्हणजे तर कळस आहे. सालसाच्या आणि चा..चा..च्या बीट्स वर किटीच्या अदा आणि स्टेप्स म्हणजे उफ्फ्फ...निव्वळ माइंड ब्लोईंग.
त्यानंतर जॅक आणि जीलकडून 3 बिया चोरीचा सिक्वेंस ही मस्तच. त्या बियांपासून राक्षसी वेल तयार होऊन आकाशातल्या राजाराजवाड्यात जाणे आणि परत येणे एवढे थरारक आहे की माझी दोन्ही मुले माझे हात इकडून तिकडून पकडून बसले होते. 3D एफेक्ट्स एवढे प्रभावीपणे वापरलेत की आपल्या डोळ्यासमोर सगळे घडते असे वाटते. प्रत्येक पात्राचे डिटेलिंग तुफान आहे,अगदी बारीक सारीक तपशीलही मस्तच चितारले आहेत.
काही काही डायलॉग्स मोठ्यांसाठी आहेत. म्हणजे ते फक्त मोठ्यांना कळतील असे आहेत. ते सोडले तर बच्चे कंपनीला गुंगवून ठेवण्यात हा ऍनिमेशनपट एकदम यशस्वी ठरतो. तर बच्चेकंपनीला खूश करायचे असेल तर आणि त्यांच्याबरोबर वेळ आनंदात घालवायचा असेल तर नक्की बघण्यासारखा, "पुस इन बूट्स"
पस आणि किटी सोफ़्टपॉन
ह्म्प्टी अॅलेक्झांडर डम्टी
प्रतिक्रिया
'श्रेक' चा पुस् ना?
अरे हा तर आपल्या 'श्रेक' चा पुस् आहे ना?
बघायला पाहिजे.. डाऊनलोडायला लावतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेश, डाऊनलोड तर करच पण ३D
ऋषिकेश,
डाऊनलोड तर करच पण ३D मध्ये बघायला मिळाला तर नक्की बघ. ३D एफेक्ट्स अफलातून आहेत.
बर्याच ३D अॅनिमेशनपटांनंतर ३D साठी आवडलेला हा अॅनिमेशनपट आहे.
- (अॅनिमेशनपटांचा चाहता) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
ह्म्म्
ह्म्म कसा वेळ मिळतोय बघायला लाहिजे.. या आठवड्यात MI4 पण आहे
पुढ्च्या आठवड्यापर्यंत हा पुस् निघुन जायचा
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
श्रेकमध्ये
श्रेकमध्ये पाहिला होता तेव्हा छोट्याशा रोलमध्ये भयंकर इंप्रेस करून गेला होता. विशेषतः एक सीनमध्ये त्याला मारायला लोक आल्यावर भयंकर क्यूट निरागस मांजरीच्या पिलासारखा चेहरा करतो तेव्हा. आता कधीतरी बघायला हवा.
सोकाजी, चित्रपट ओळख आवडली.
सोकाजी, चित्रपट ओळख आवडली. आत्तापर्यंत पाहिलेल्या अॅनिमेशनपटांपैकी काही नंतर डीव्हीडीवरही पाहिलेत. पण मोठ्या पडद्याची मजा मोठ्या पडद्यातच आहे.
अदिती
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.