अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद

अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद

- ऐसीअक्षरे

शुभा गोखले या मुंबईत काम करणाऱ्या प्रथितयश चित्रकार आहेत. चित्रकलेचं औपचारिक शिक्षण त्यांनी पुण्यातून घेतलं. त्यांनी श्री. गोपाळ देऊसकर यांच्याकडे ड्रॉइंगचं आणि श्री. सदाशिव गोरक्षकर यांच्याकडे मिनिएचर पेंटिंगचं शिक्षण घेतलं. बालगंधर्व कलादालन, पुणे; जहांगीर गॅलरी, मुंबई; ललित कला अकादमी, नवी दिल्ली; यशवंतराव चव्हाण गॅलरी, मुंबई अशा ठिकाणी त्यांच्या चित्रांचे एकल आणि समूह शोज झालेले आहेत. त्या जगण्यासाठी चित्रं काढतात आणि उदरनिर्वाहासाठी दागिने बनवतात. संगीत, काव्य, साहित्य यांमधून त्यांना प्रेरणा मिळते.

प्रास्ताविक
दिवाळी अंकाचा जो विषय आहे त्याला फार काटेकोरपणे न चिकटता तुमच्याशी अनौपचारिक गप्पा माराव्यात अशी इच्छा आहे. आपलं बोलणं त्याच्या अवतीभवतीचं असेल. तुमचं संस्थळ पाहिलं, तुमचं तिथलं लेखनही वाचलं आहे. आपलं इन्स्टॉलेशन या विषयावर सुरुवातीला थोडं बोलणं झालं. सुरुवातीला आपण जे बोललो त्यात तुम्ही तीन मुद्द्यांचा उल्लेख केलात. पहिलं म्हणजे, आजची स्थिती पाहता तुम्ही स्वतःला क्रॉसरोड्सवर पाहता आहात. तुम्ही स्वतः आणि कलेचा प्रांत विलक्षण काळातून जात आहे. दुसरा मुद्दा असा की, गेल्या वीसेक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेने गिअर बदलला. लोकांकडे बराच पैसा आला. उद्योगधंदे, शेअर बाजार, रिअल इस्टेट यांच्यात फरक पडला. अर्बन बूम आली. आणि याचं प्रतिबिंब लगेच कलेच्या क्षेत्रात पडल्याचं तुम्ही म्हणालात. त्यातून 'आर्ट फॉर इन्व्हेस्टमेंट' अशा प्रकारचा व्यवसायही सुरू झाला. कलाकृती विकत घ्यायच्या, साठवून ठेवायच्या आणि किंमत वाढली की जागेसारखं 'बाय लो सेल हाय' करायचं, असं करून काही लोकांनी त्यात स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं. परंतु हा फुगाही फुटला. तिसरा मुद्दा म्हणजे, तथाकथित पेज थ्री संस्कृती आली. परिणामी पुराचं पाणी घरात आल्याप्रमाणे प्रसिद्धी मिळाली आणि आता बाजार काही कलाकारांच्या नाकातोंडात जातो आहे.

तिथून पुढे प्रश्नांना सुरुवात करतो आहेत.

ऐसीअक्षरे - अंकाचा जो विषय आहे, त्यानुसार आपल्या खंडप्राय देशात अनेक गोष्टी घडून गेल्या आहेत. ढोबळमानाने गेल्या १०० वर्षांत कलाप्रांतामध्ये लाटांवर लाटा येऊन त्या विरूनही गेल्या आहेत. यात कलेचं लोकशाहीकरण झालं असं वाटतं का? पूर्वी कला ही फक्त ठरावीक लोकांपुरतीच होती. 'हा तुझा प्रांत नाही, तू गरीब माणूस आहेस. तर तू यात काही बोलू नकोस', असा काहीसा प्रकार होता. आता चित्रपट ही सामान्यांचीही कला झाली, कोणीही उठून चित्रपट बघू शकतं. तसं तुमच्या क्षेत्रात, दृश्यकलांमधे असं लोकशाहीकरण झालं का? झालं असेल तर कसं झालं?

शुभा - इतर कलांमध्ये ज्या प्रमाणात लोकशाहीकरण झालं, त्या प्रमाणात दृश्यकलांमधे झालेलं नाही. याचं कारण म्हणजे कलासाक्षरतेचा अभाव हे असू शकतं. अजूनही आपल्याकडे चित्रं का पाहायची, कशी पाहायची, त्यांतलं बरं-वाईट कसं ओळखायचं, ती विकत घेऊन भिंतीवर का लावायची असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत. आपण सिनेमा, नाटक पाहतो, संगीत ऐकतो, कथा-कविता वाचतो; पण एखाद्या कलादालनात जाऊन किती वेळा चित्रं पाहतो? कलावंताला भेटून त्याच्या चित्रांबद्दल कितपत चर्चा करतो? याचं मूळ कारण म्हणजे आपल्याकडली सदोष शिक्षणपद्धती हे असू शकेल. शाळेत चित्रकला, हस्तकला हे विषय बऱ्याचदा ऑप्शनला टाकलेले किंवा नाईलाज म्हणून शिकण्याचे विषय असतात. पाश्चात्त्य देशांत मी जेव्हा जेव्हा म्युझियम्स किंवा आर्ट गॅलरीजमधे जाते, तेव्हा तिथे एका कोपऱ्यात अगदी सात-आठ वर्षांपासूनच्या वयोगटांतील मुलांचे समूह एखाद्या चित्रासमोर बसलेले दिसतात. आणि त्यांच्या बालसुलभ बुद्धीला रुचेल असं काहीतरी त्यांचे शिक्षक त्या कलाकृतीबद्दल सांगताना दिसतात. मुलं अगदी मजेत त्या चित्राचा आस्वाद आणि आनंद घेताना दिसतात.

पुढे आपल्याकडच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचं तर काही विचारूच नका. मेडिसीन, इंजिनियरींग, मॅनेजमेंट अशी एखादी दिशा पकडली की इकडेतिकडे बघायला वेळच नाही! युरोप किंवा अमेरिकेत वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेणारा विद्यार्थी सिरॅमिक पॉटरी, क्रिएटिव्ह रायटिंग असे विषय घेऊ शकतो. पाश्चात्त्यांचं आपण नको त्या गोष्टींमध्ये अनुकरण करतो, त्याऐवजी अशा गोष्टी आपण कधी शिकणार? यातून सगळेच कलावंत तयार होतील असं नाही. पण रसिक नक्कीच निर्माण होतील. आर्ट इज व्हेरी रिलॅक्सिंग अ‍ॅण्ड थेरपॉयटिक... निदान छंद म्हणून तरी ती जोपासता येईल.

कलाशिक्षण पद्धतीमध्ये तर खूपच मागासलेपणा आहे. अजूनही अमका कमर्शिअलचा, अमका आर्किटेक्चरवाला, अमका फाईन आर्टचा, असे, खरं म्हणजे एकमेकांशी घनिष्ट संबंध असलेले, पण एकमेकांमध्ये संवाद राखू न शकलेले, विभाग बनले आहेत. हा जातिभेद नष्ट होणं गरजेचं आहे. कारण या सर्व कला एकमेकांना पूरक असतात. आज जगातील कलाविश्वात अनेक माध्यमं आलेली आहेत; इन्स्टॉलेशन आर्ट, कन्सेप्चुअल आर्ट, परफॉर्मन्स, व्हीडिओ, साउंड, असे खूप प्रयोग दृश्यकलांमधे होत आहेत. जुन्याबरोबर यांचाही अभ्यासक्रमात समावेश असला पाहिजे.

आशेचा किरण एवढाच की, आपल्याकडे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगानं प्रगती होते आहे. इंटरनेटमुळे आज तुम्ही घरबसल्या कुठल्याही कलाप्रकाराबद्दल माहिती मिळवू शकता. आर्ट व्हीडिओजमधून प्रात्यक्षिकं बघू शकता. फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअर्समधून स्वतः डिजिटल आर्टचे प्रयोग करू शकता. सोशल नेटवर्किंग साईट्समधून कलावंत आणि रसिक एकमेकांशी थेट संवाद साधू शकतात. चित्रकला ही थेट असल्यानं तिला भाषेचा अडसर नसतो. कुठल्याही देशातील कलावंताच्या कलाकृती, अगदी एक बटण दाबून, तुम्ही पाहू शकता. हेही नसे थोडके!

ऐसीअक्षरे: आजच्या कलेच्या प्रांतात काय बदल झाले आहेत?

शुभा: एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मॉडर्न आर्टची सुरुवात झाली. कॅमेऱ्याचा शोध लागला आणि कला वेगवेगळ्या विचारधारांमधून (isms) बदलत गेली. कला अमूर्त झाली आणि साधारण १९६० च्या सुमारास रोमन लिपीमधे, पॉप आर्टमधे तंत्रज्ञानाचा मोठा वापर करून पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात, मूर्तरूपात दिसली (Brash commercial imagery). आधुनिकोत्तरवादामधे फोटो रिअलिझम, कन्सेप्चुअल आर्ट आल्या, तिथे कलाकृतीमागच्या कल्पनेला जास्त महत्त्व प्राप्त झालं. पुढे या सर्वांची सरमिसळ होत गेली.

आपल्याकडे पूर्वी खरंतर कला म्हणजे जीवनाचंच एक अविभाज्य अंग होतं. रोजच्या जीवनात वापरण्याच्या वस्तू, भांडी, आडकित्ते, विळ्या, दिवे, हे सर्व कलात्मक होतं. भित्तिचित्रं, देवळांतली चित्रं-शिल्पं, ग्रंथांतली लघुचित्रं असे कलेचे अनेक आविष्कार पाहायला मिळतात. ब्रिटीश सरकार आलं आणि कला जीवनापासून वेगळी होऊन भिंतीवर जाऊन बसली. रविवर्म्याने हिंदू पुराणांतील विषय आणि पाश्चात्त्य तंत्र वापरून चित्रं काढली. त्या चित्रांचे प्रिंट्स (oliographs) काढले आणि घरोघरी देवादिकांची चित्रं पोहोचवली. पण आपण काय केलं? त्या तसबिरींना हार घालून त्यांच्यासमोर हात जोडून डोळे मिटले! कला म्हणून त्यांकडे फार कमी पाहिलं गेलं.

पुढे बेंगॉल स्कूल, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप यांतील कलावंतांनी फक्त पाश्चात्त्यांचं अनुकरण न करता आपली भाषा शोधायचा प्रयत्न केला. जगाशी संपर्क जसजसा जास्त सोपा होऊ लागला, तसतसे तिकडचे वारे इथेही परिणाम दाखवू लागले. इन्स्टॉलेशन आर्ट, कन्सेप्चुअल आर्ट हे प्रकार फार वेगानं इथे आलेले आहेत. आणि काळाबरोबर राहण्यासाठी कलादालनं अशा कलाप्रकारांना जास्त प्रोत्साहन देऊ लागलेल्या आहेत. कलावंतांसाठी हा थोडासा अवघड काळ आहे असं वाटतं. माझ्या वयाचे, साधारण पन्नाशीचे, स्वतःची थोडीफार चित्रओळख बनवलेले कलाकारही गोंधळून गेले आहेत. 'आपण जे करतो आहे ते जुनं, आउटडेटेड झालंय का?' असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींनी केव्हाच हत्यारं खाली ठेवली आहेत. ज्यांचा स्वतःच्या कलेवर विश्वास आहे, त्यांची कलासाधन चालू आहे न डगमगता! एक कलाकार म्हणून क्रॉसरोड्सवर उभं असण्याची भावना मला वैयक्तिक पातळीवर अलीकडे प्रबळपणे होते. आतून जोपर्यंत संकेत मिळत नाही, तोपर्यंत फक्त प्रवाहाबरोबर जायचं म्हणून नवीन प्रकारचे आर्ट फॉर्म्स करावेत असं मला वाटत नाही. प्रयोग जरूर करावेत, नवीन तंत्रज्ञान वापरावं; पण दुसरा करतो म्हणून आपण केलं, तर ते हमखास फसतं. शेवटी दर्जेदार असेल तेच टिकेल, मग माध्यम कोणतंही असो, ही खात्री आहेच.

ऐसीअक्षरे - तुमच्या बोलण्यातून असं आलंय की, एक प्रकारची आर्थिक तेजी आलेली होती, ती आता ओसरली आहे.

शुभा - कलेचा प्रांत विलक्षण काळातून जात आहे. गेल्या वीसेक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं गिअर बदलला. लोकांकडे बराच पैसा आला. उद्योगधंदे, शेअर बाजार, रिअल इस्टेट यांची तेजी होती. अर्बन बूम आली आणि या सगळ्यांचं प्रतिबिंब लगेच कलेच्या क्षेत्रात पडल्याचं दिसलं. कलाकारांनी चांगल्या असलेल्या नोकऱ्या धडाधड सोडल्या आणि ते पूर्णवेळ चित्रकलेकडे वळले. चित्रांच्या किंमती अस्मानाला भिडलेल्या होत्या. स्क्वेअर फुटावर चित्राची किंमत विचारली जाऊ लागली. कलेचं अतिव्यावसायिकीकरण झालं. जो फुगा फुगला होता, तो कालांतराने फुटला. हे एका दृष्टीनं बरं झालं. कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात उगवाव्यात, तसे कलाकार, कलादालनं उगवलेली होती. चित्रं विकली जात होती, म्हणून कोणीही उठून चित्रं काढत होते. पण आता त्या त्सुनामीमुळे आलेला फुगा फुटला आहे; त्यात नॉर्मलायझेशन होत आहे.

ऐसीअक्षरे - या त्सुनामीत काही नुकसान झालं का?

शुभा - होय. निश्चितच. 'आर्ट फॉर इन्व्हेस्टमेन्ट' म्हणून ज्यांनी निव्वळ कलाकारांच्या सह्या पाहून चित्रं विकत घेतली, ते पस्तावले. किंमत दुप्पट होईल एवढाच विचार त्यांनी केला होता. दिवसभर घरात हे चित्र बघवत नाही, अशीही कबुली अनेकांनी दिली आहे. कलाकारांवरही याचा विपरीत परिणाम झाला. जे विकलं जात आहे, ते काढण्यात त्यांचा वेळ जात होता. कलादालनं, ऑक्शन हाउसेसनीसुद्धा मार खाल्ला. या सगळ्यातून स्थिरावायला वेळ लागला. आता स्थैर्य आलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

ऐसीअक्षरे - चित्रपट हे माध्यम लोकांचं माध्यम बनलं. लोकांच्या तोंडावर गाणी खेळतात. "लता काय गायली!" किंवा "सलमानने काय भारी काम केलंय!" असं लोक म्हणतात. हे चित्रपट आणि संगीताच्या बाबतीत झालं. तसं दृश्यकलांच्या बाबतीत का झालं नसावं? आपल्या शिक्षणात तर संगीतावर किंवा चित्रपटांवरही फार भर नसतो.

शुभा - शैक्षणिक क्षेत्रातली अनास्था हे एक कारण झालं. ते सोडलं तर कलाकारच जबाबदार आहेत. आम्हीही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नसावा. लोकांच्या आवडीच्या पर्यायांमधे दृश्यकलांचा नंबर शेवटचा असतो. शिवाय हे करायचं म्हणजे सुबत्ता पाहिजे. कलावंतासाठी आणि रसिकांसाठी हे खर्चीक माध्यम आहे. पण 'देखने के लिये पैसा नहीं पडता ना?' अहो घेऊ नका, पण निदान बघाल तरी!

कलावंतांना सरकारचंपण हवं तेवढं पाठबळ मिळत नाही. होतकरू कलावंतांसाठी शिष्यवृत्ती, स्टुडिओसाठी जागा कमी दरात देणं, इत्यादी गोष्टी होणं आवश्यक आहे. पब्लिक आर्टसाठी मान्यता दिली पाहिजे.

ऐसीअक्षरे - कलेकडे रंजन म्हणून पाहिलं जातं. चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जातात, रेकॉर्ड्स झिजतात. पण चित्रांवर पैसे खर्च होत नाहीत.

शुभा - "गायतोंड्यांच्या किंवा आरांच्या एखाद्या चित्रासमोर मी तासभर उभा राहिलो आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं," असं कोणी म्हणालं तर मी खरंच पाय धरीन त्याचे! पण हे पोहोचलंच नाहीये. कारणं शोधणं महत्त्वाचं आहे. मी माझ्या परीनं हे करायचा प्रयत्न करते आहे. फेसबुकवर आले, कारण हा सोशल मिडीया आहे. मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. लोकांना प्रश्न असतात. थोडं वाचून कळू देत, थोडं बघून कळू देत, लोकांच्या डोळ्यांसमोर प्रतिमा येऊ देत. धिस इज ए व्हेरी नाइस वे टू रीच आउट.

ऐसीअक्षरे - या अनुषंगानं निरीक्षण असं आहे की, अगदी गावखेड्यातही सिनेमा पोहोचला आहे, रेडिओ या माध्यमातून गाणंही घरोघर पोहोचलं आहे. पण चित्रकलेसाठी ठरावीक ठिकाणीच जावं लागतं. चार मोठ्या शहरांमधेच कलादालनं आहेत. असं का आहे?

शुभा - चित्रं दाखवायची तर पायाभूत व्यवस्था पाहिजे. भिंती पाहिजेत, ठरावीक प्रकारचा प्रकाश हवा. छोटंसं का होईना, हे सगळं असावं लागतं.

ऐसीअक्षरे - एके काळी लागू नाटक करायचे. नंतर त्यांनी 'रूपवेध' संस्था काढली. ते फक्त 'NCPA'मधेच प्रयोग करायचे. लोकांनी तक्रार केली. आमच्याकडेही नाट्यगृह आहेत आणि आम्हाला 'NCPA'ला येणं जमत नाही. तुम्ही इथे का येत नाही? शेवटी त्यांनी लोकांच्या मागणीला मान्यता दिली. लोकांच्या इच्छेचा विजय झाला. हे चित्रकलेच्या बाबतीत होणार नाही का?

शुभा - प्रत्येक वेळेस दक्षिण मुंबईतच जावं लागतं असं नाही. इतर अनेक ठिकाणी आता कलादालनं निघाली आहेत. नागपूर, नाशिक अशा ठिकाणीसुद्धा ती दिसत आहेत. पण लोकं कलादालनाकडे वळत नाहीत. सहज फिरायला मॉलमधे जातील, पण शेजारी असणाऱ्या कलादालनात जाणार नाहीत. लोकांना सवय लावायला पाहिजे, हा रोजच्या आयुष्याचा भाग बनायला हवा. तसं होत नाही, तोपर्यंत दालनं काढून काय उपयोग? ती चालायला पाहिजेत. लोकं आलेच नाहीत तर काय करणार?

असे प्रयत्न काही कलाकारांनी केले आहेत. सुधीर पटवर्धनांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. अभिजात कलाकारांना घेऊन त्यांनी महाराष्ट्रात फिरतं प्रदर्शन केलं. हे असे प्रयत्न झाले, तरी त्यात सरकारी पाठिंबा काहीही नाही. या प्रयत्नांना पुरेसं प्रोत्साहन मिळत नाही.

ऐसीअक्षरे – निव्वळ गल्लाभरू प्रकारचे सिनेमे असतात, ते कला म्हणून थोर असतात असं नाही. कलासमीक्षक, चोखंदळ लोकांना आवडतात ते सिनेमे फार गल्ला कमावतात असंही नाही. चित्रपटसृष्टीला काही प्रमाणात सरकारी पाठबळ मिळतं. दृश्यकलांबाबत बोलायचं झालं तर रविवर्म्याची चित्रं दिसतात. फेसबुकावर पाहिलं, तर लोकही आपापल्या कुवतीनुसार तलाव, समुद्र, हिरवाईचे फोटो टाकतात. पण चांगली स्ट्रीट फोटोग्राफी दिसत नाही. चित्रांच्या बाबतीत तुम्हांला हे जाणवतं का? जे खरोखरच चांगलं, दाखवण्यासारखं आहे, त्याला फार गिऱ्हाईक नाही. गोग्गोड वाटेल असं काही खूप प्रमाणात खपतं. हे फोटो, चित्रपटांच्या बाबतीत दिसतं, तसं दृश्यकलेच्या बाबतीत तुम्हांला काही दिसतं का?

शुभा - आमच्या फॉर्ममधेसुद्धा पॉप्युलर गोष्टी आहेत. सदाबहार विषय म्हणजे गणपती, बुद्ध, राजस्थानी बायका. कोणीही उठावं आणि काढावं. सहज जमतं म्हणून असेल कदाचित! मगाशी आपण ज्या आर्थिक तेजीबद्दल बोललो, त्या तेजीच्या काळात क्लासला जाऊन लोकांनी फक्त बुद्ध आणि गणपती काढले. लँडस्केपही त्यातलेच. माझी या फॉर्म्सबद्दल तक्रार नाही. हे सर्व विषय अतिशय कलात्मक रीतीने काढणारे लोक आहेत. पण त्यांच्या ज्या स्वस्त आवृत्त्या मिळतात, त्या खूप वाईट असतात. जरा बघितलं तर लक्षात येईल की, या लोकांना बुद्धाबद्दल काही माहीत नाही, गणपतीबद्दलही काही माहीत नाही. कशाबद्दलच विशेष काही माहीत नाही. लोकांनाही वाटतं की, आपण एक चित्र लावलंय. पाच-सहा हजारांत, स्वस्तात मिळालं म्हणून, कलेला प्रोत्साहन देण्याचा आव आणला जातो. मूलभूत तांत्रिक बाबींचीही उणीव असते, पण त्यांबद्दल काहीच आस्था नसते. चांगलं-वाईट कळत नाही, तोपर्यंत कलेला प्रोत्साहन देण्यात काही अर्थ नाही. मी पाहिलेला सगळ्यांत विनोदी प्रकार म्हणजे, काही कळत नाही ना, मग अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग घ्यायचं.

ऐसीअक्षरे - प्रत्येक क्षेत्रात कोणी ना कोणीतरी मोठा, थोर माणूस असतो. चित्रपटक्षेत्रात सत्यजित रे आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचले नाहीत असंही नाही. पण त्यांच्या काळात त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय दिग्दर्शक, चित्रपट होते. अशा प्रकारची व्यवस्था दृश्यकलांच्या क्षेत्रात आहे का? ज्यांना शुभा गोखलेंची चित्रं समजत नाहीत, त्यांच्यासाठी काही सोपं आहे आणि ते प्रसिद्ध झालंय असं दिसत नाही. त्याचं कारण काय असेल?

शुभा - आपल्याकडे थोडं प्रशिक्षण घेऊन स्वतःला इंटिरियर डिझायनर म्हणवून घेणारे लोक असा एक प्रकार बोकाळला आहे. ते तुमच्या घराची सगळी सजावट करून देतात. ज्या घरात राहायचंय, त्यात काही लोक जराही रस दाखवत नाहीत. हेच लोक तुमच्या घरात काय लावायचं ते ठरवतात. काहींना चित्रकलेतलं समजतं. बजेट आणि ग्राहकाची आवड यांचा विचार करून चांगली चित्रं आणणारेही आहेत. बाकीचे बहुतेकसे 'चीपर बाय दी डझन' जे काही मिळतं ते लावतात. मला खंत ही वाटते की, या सजावटीमधे कलात्मक मूल्य काहीच नसतं. आणि मग ग्राहकांना वाटतं, 'अरे वा, आपल्याकडे चित्र लावलेलं आहे.' त्यावर लोकं केवढेतरी पैसे खर्च करतात याचा त्रास होतो.

खरंतर या प्रकाराऐवजी कलाविद्यार्थ्यांची चित्रं घेता येतील. त्यांच्या किंमतीही फार नसतात. त्यांच्याकडून ताजं, सुंदर काहीतरी मिळतं. पण ते सोडून प्रसिद्ध चित्रांची नक्कल करायला सांगतात. नवीन कलाकार जे तयार होत असतात, त्यांना चरितार्थासाठी काहीतरी करावं लागतं; मग ते अशा नकला करून देतात. आपल्याला हवं ते चित्र, हवा तो आकार; भिंतीवर करा म्हटलं तर तेही, देतात करून. असेही खूप लोक भेटतात. चांगले कलाकारही माहीत आहेत. मुंबई-पुण्याच्या बाहेरून आलेले हे लोक असतात, छोट्या शहर- गावांकडून. त्यांना मुंबईत टिकून राहायचं असतं. मी बऱ्याचदा त्यांना म्हणतेही, "हे तुम्ही पोटासाठी करा. त्याबद्दल काही तक्रार नाही. पण स्वतःची शैली विसरू नका." काही जण स्वतःचा आवाज टिकवून ठेवू शकतात, काही जणांना नाही जमत. मलाही असंख्य लोकांनी विचारलेलं आहे, "अमक्या चित्राची, पिकासोची नक्कल करून देशील का?" हे दुर्दैवी आहे. कॅलेंडरवरचं चित्रं हुसेनचं आहे, म्हणून फ्रेम करून लावलं जातं, पण एखाद्या कलाकाराचं मूळ चित्र मिळत असेल, तर त्याकडे लोक दुर्लक्ष करतात. मूळ चित्र आणि प्रत यांच्यातला फरक समजत नाही. माझा प्रिंट्सवर आक्षेप नाही. चांगली चित्रं अजरामर आहेत, ती मूळ चित्रं आपण नाही मिळवू शकत. पण अत्यंत छान प्रिंट्स मिळू शकतात. अभिजातता आणि लोकप्रियता यांच्यातलं द्वंद्व टोकाचंच असतं.

त्यात व्हॅन गॉग सगळ्यात लोकप्रिय; त्याची चित्रं आहेतच दर्जेदार! एका क्लबच्या कॉफी शॉपमधे सगळीकडे व्हॅन गॉगचे प्रिंट्स. त्या माणसाकडे पाव घ्यायला पैसे नव्हते. आणि खाण्याच्या ठिकाणी प्रिंट्स लावलेले होते. मी त्या कॅफेटेरियातल्या माणसाला म्हटलं, "मला घास गिळवत नाही रे एवढा व्हॅन गॉग बघून!" मी थोडी जास्तच संवेदनशील आहे या बाबतीत, पण हा विरोधाभास मला नोंदवावासा वाटला.

ऐसीअक्षरे – आज कला ही एक प्रतिष्ठेची बाब आहे, कलाकाराला योग्य स्थान मिळतं, कलेवर लोकांना पोट भरता येतं. १०० वर्षांपूर्वी बालगंधर्व नाटकं करायचे, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. चांगल्या घरांतल्या स्त्रिया रंगमंचावर दिसू नयेत अशी परिस्थिती होती. अशी प्रक्रिया तुमच्या क्षेत्रात झाली का? पन्नास-साठ वर्षांपूर्वी खेड्यातल्या माणसाने चित्रकलेचा विचारही केला नसता, त्या वर्गातले लोक चित्रकलेकडे येत आहेत असं तुम्हांला वाटतं का?

शुभा - यात माझं अगदी व्यक्तिगत निरीक्षण सांगते. मी पुण्याला कला महाविद्यालयात होते तेव्हाची ही गोष्ट. जातींबद्दल बोलणं अनुचित वाटतं, पण हा विषयच तसा आहे. ब्राह्मणांच्या घरातले खूप कमी लोक या क्षेत्रात यायचे. 'गोखले' आडनावाची मी एकटीच होते. हा मूळ मुद्दा. पूर्वीच्या वर्णव्यवस्थेमधे हातानं काम करणं ब्राह्मण लोकांना माहीतच नव्हतं. माझा नवरा मला गमतीत म्हणतोच, "मी नाही असे मातीत, रंगात हात घालू शकत. अप्रगत लोक वाटता तुम्ही!" पण कलेचा इतिहास किंवा थिअरी त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे.

ब्राह्मण मंडळी सगळी बुद्धिजीवी. ते अजूनही दिसतं, पण हा फरक कमी होताना दिसतो. शिक्षण सर्वांना घेता येतं, त्यामुळे सरमिसळ होताना दिसते. माझ्या वेळेस ही लोकं आर्किटेक्ट्चरला असायची. त्यानंतर कमर्शियल आर्टला लोक जायचे. पेंटिंगला येणारे कमी. अशी ही कला-वर्णव्यवस्था होती. मुली तर शिक्षण - मॅट्रिक आणि लग्न यांच्यामधला काळ घालवायला, रुखवतं बनवायला कलाविद्यालयात यायच्या. घरीही कसं असायचं की, ही शिवण जरा बरं करते, रांगोळी बरी काढते म्हणून मग कलाविद्यालय. आणि गणित वगैरेंमधे गतीच नाही म्हणूनही कलाशाखेला. हे मी सांगत्ये माझ्या काळातलं. १९७५ साली मला मॅट्रिकला गणित आणि विज्ञानात खूप चांगले मार्क असूनसुद्धा मी फाईन आर्ट्स घेणं हे मी सोडून सगळ्यांनाच मूर्खपणाचं वाटलं होतं!

ऐसीअक्षरे - युरोपातले कलाकार जसं करतात, तसं, त्या तोडीचं करणं प्रतिष्ठेचं ही संकल्पना थोडी बदलत असावी का?

शुभा - होय. आपल्याकडे हे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्सपासून सुरू झालं. त्यांच्यावरही पाश्चात्त्य प्रभाव होता, पण हळूहळू तेही भारतीय कलेकडे वळायला लागले. तिथून ही सुरुवात झाली. मधल्या काळ युरोपियन कलेची नक्कल करण्याचा होता. आता भारतीय कला भारतकेंद्री, इनवर्ड टर्निंग होते आहे.

आपली कलापरंपरा, आपली लोककला ह्या अतिशय समृद्ध आहेत. प्रत्येक प्रांतात वेगवेगळं कौशल्य आणि शैली दिसते. पण पाश्चात्त्यांचं अनुकरण करताकरता आपल्याला आपल्यातल्या ताकदीचा विसर पडला. आपल्या मातीतूनच आपण प्रेरणा घेतली पाहिजे असं मला वाटतं. ट्रायबल आर्ट ही हीन न समजता तिला भारतीय कलाप्रवाहांमध्ये गणलं गेलं पाहिजे. पिकासोसारख्या प्रतिभावंतानेसुद्धा आफ्रिकन लोककलेतून प्रेरणा घेतली होती.

आज काही कलाकारांनी लोककलाकारांबरोबर, मिनिएचर पेंटिंग्ज करणाऱ्यांबरोबर एकत्रित कामं केलेली आहेत. अभिजात कला आणि लोककला यांचा अत्यंत सुंदर मिलाफ त्यांच्या कामात बघायला मिळतो. आर्ट कोलॅबरेशन हा दोन उर्जांचा संगम आहे. त्यातून फार दर्जेदार आणि परिणामकारक कलाकृती निर्माण होऊ शकतात.

ऐसीअक्षरे - चित्रपटजगतामधे जसे प्रतिष्ठेचे महोत्सव - कान (Cannes), सनडान्स, टोरंटो असे चित्रपट महोत्सव - आहेत, तसे दृश्यकलांच्या बाबतीत कोणते आहेत?

शुभा - बिनाले दर दोन वर्षांनी घडतात. त्रिनाले तीन वर्षांतून एकदा. वेगवेगळ्या ठिकाणी ते होतात. गेल्या वेळेस ते केरळात होतं. दिल्लीला, मुंबईला आर्ट फेअर्स होतात. कलाक्षेत्राचे विद्यार्थीही तिथे जातात. दिल्लीत मला पुण्याचे विद्यार्थी भेटले होते. वेगवेगळ्या ठिकाणच्या दुबई, सिंगापूर, व्हेनिस, इ. गॅलरीज येऊन आपल्याकडचा संग्रह दाखवतात. प्रगती मैदानासारख्या मोठ्या ठिकाणी ही फेअर्स असतात. पण तिथे मोठा भर अगदी प्रतिष्ठित चित्रकारांवर असतो किंवा इन्स्टॉलेशन आर्टवर असतो. इथे थोडा इम्बॅलन्स दिसतो. त्यातही राजकारण असतं; कोण स्वतःला लोकांच्या नजरेसमोर नीट आणू शकतं हे असतं, इतर सर्व क्षेत्रांत असते तशी कंपूशाही इथेही असते, पण खूप कामही बघायला मिळतं.

ऐसीअक्षरे - जसे 'टेड'वर संगीताबद्दल व्हीडीओ आहेत, धनश्री पंडित-राय यांच्यासारखे लोक सामान्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत समजावं म्हणून प्रयोगशाळा घेतात; तसं आर्ट अ‍ॅप्रिसिएशन हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रकला, दृश्यकलांच्या बाबतीत काही होतं का?

शुभा - खूप कमी होतं; काही डेमॉन्स्ट्रेशन्स आणि माहिती मिळते. व्हिज्युअल आर्ट इज व्हेरी सब्जेक्टिव्ह, म्हणून ते एकांगीपणे बघता येत नाही. माझा शो असतो, तेव्हा मी तिथे असण्याची काळजी घेते; ज्यांना कोणाला माझ्याशी बोलण्याची इच्छा असेल, प्रश्न असतील त्यांना बोलता येतं. पण आणखी एक असं की, दृश्यकलांमधे चांगल्या चित्राच्या अर्थातच खूप शक्यता असतात. हे अर्थ व्यक्तीप्रमाणे बदलतात. समजा, माझं मीराबाईचं चित्र आहे, मी त्याला तसं शीर्षक दिलं, तर दर्शकही त्याच दृष्टीने बघायला सुरुवात करतात. प्रत्येकाला त्यांची स्वतंत्र मतं, अर्थांच्या शक्यता असाव्यात. मी दर्शक आणि चित्र यांच्या मधे येत नाही. चित्र पहा, स्वतःची मतं बनवा आणि मग मी तुमच्याशी बोलेन. चित्र एकाच पद्धतीने पाहून त्याचं आकलन पूर्ण होत नाही. आपण जे चित्र पाहतो, ते आपलं चित्र असतं. कलाकाराला काय वाटतं ही पुढची गोष्ट आहे. या विषयाचं शिक्षण हवं, ते अशा पद्धतीचं हवं. चित्र म्हणजे फक्त रंग, पोत, कंपोझिशन, एवढंच नाही; तांत्रिक बाबींचीहीपण थोडी माहिती पाहिजे. पण हे चित्र मी पाहिलं, तर ते मला कसं वाटलं हे महत्त्वाचं आहे. अगदी कवितेच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. कवीला काय म्हणायचं आहे हे नंतर पहा. कविता वाचल्यावर तुम्हांला काय वाटलं याकडे लक्ष द्या. एक रसिक म्हणूनही समजायला पाहिजे की, चित्रं पाहावं कसं. कला जाणून घेताना हे शिकलं पाहिजे. प्रत्येकाच्या अनुभवावरून कलाकृतीचे अर्थ निराळे निघतात. पुढे आपल्यातूनच त्याच्या अर्थाचे आतले पदर उलगडू शकतात.

ऐसीअक्षरे - ग्रेस यांचा प्रभाव तुमच्यावर पडल्याचं तुम्ही म्हणता. याबद्दल काही सांगू शकाल का?

शुभा - 'कालनिर्णय'च्या लेखात मी यावर तपशीलवार लिहिलेलं आहे. (लेख) 'देहस्पंद' नावाची जी चित्रमालिका मी बनवली, त्यात स्त्रियांची न्यूड्स आहेत. मी सुरुवातीला 'पपेट्स' नावाची चित्रमालिका चितारली, ह्युमन बीइंग्ज अ‍ॅज पपेट्स, अशी. 'पपेट्स' ही माझी पहिली थीम. त्यात मी मानवी शरीररचनेची खूप मोडतोड केली. बाहुल्या कशाही वागतात, त्याचा खूप फायदा घेतला. मला तेव्हा कळसूत्री बाहुलीसारखं वाटत होतं. ७-८ वर्ष अशी चित्रं काढल्यावर मला कळसूत्री बाहुली असल्यासारखं वाटणं बंद झालं. इट वॉज आउट ऑफ माय सिस्टिम. पुढे शरीररचना नीट करायला हवी होती. मग पुन्हा मानवी शरीरं चितारायला सुरुवात केली. त्यात न्यूड्सला पर्याय नाही. 'चिन्ह'साठी जो लेख लिहिला तो या प्रक्रियेबद्दलच आहे. (लेख) तेव्हा मी एकीकडे न्यूड्स करत होते आणि एकीकडे ग्रेस आणि कबीर. असा दोघांचा एकत्र प्रभाव माझ्यावर पडला होता. कबीराची 'झीनी चदरिया' ही जी संकल्पना होती, म्हणजे शरीररूपी चादर, ती माझ्या विचारप्रक्रियेत होती. ग्रेस सरांची कविता मेटाफिजिकल पातळीवर आहे असं मला वाटतं. 'लज्जेसाठी शरीर पांघरून उभी सखी तिमिरात'. मला तरी असं वाटलं की, कबीर आणि ग्रेसची कविता आणि माझी चित्रलिपी समांतर जाते आहे.

ते मी ठरवून केलं असं काही नाही. हे असं घडत गेलं. हे सगळं सबकॉन्शसच्या पातळीवर सुरू राहतं. चित्रात कधी कवितेच्या ओळी येतात. या ओळी स्पष्ट वाचता यायच्या. तुम्हांला मराठी समजतं, म्हणून तुम्हांला ते काही शब्द कळतील. हे तीन-चार वर्षांचं काम आहे. सुरुवातीच्या चित्रांमधे या ओळी स्पष्ट वाचता यायच्या, मग सुलेखन (caligraphy) हा एक कलाविष्कार होत गेला. पण माझ्यासाठी ती कविता होती, पण चित्रात ती चित्रलिपी बनून येत होती.

मला काही कलाकार विचारतात, "तू ही अशी विधानं कशी करतेस?". पण माझं काम असंच होतं, मला हे असंच वाटतं. हे माझे अनुभव आहेत. प्रत्येकाची विचारप्रक्रिया आणि अभिव्यक्ती वेगळी असते.

कलाकाराला जरूर भेटावं, त्याचे विचार समजून घ्यावेत; पण सुरुवातीला भेटू नये. चित्र आधी दर्शकाचं असतं, नंतर कलाकाराचं. आपलं मत आधी तयार करावं.

माझं चित्र मला सात-आठ वर्षांनी वेगळं वाटेल. चित्रात आणि माझ्यात अंतर आल्यावर चित्रातून वेगळ्या गोष्टी दिसायला लागतात. मी विषय घेऊन काम करत नाही. मी आधी चित्रं काढते आणि मग त्यातून काही थीम आहे का, मला हे असं कशामुळे करावसं वाटतंय असा विचार करते. उदा: मी कमळंच का काढत होते? माझं ते ऑब्सेशन असतं म्हणून, एवढं एकच उत्तर असू शकतं. ऑब्सेशन, पॅशन एवढं होतं की, मी स्टुडिओच्या बाहेर छोटा तलाव केला. त्यात कमळं रुजवायचा प्रयत्न केला. पुण्यावरून कमळं आणून पाहिली. एकदा ज्ञानेश्वरांचं 'रुणुझुणु रे भ्रमरा' ऐकलं, तेव्हा एक वेगळाच अर्थ मला जाणवला. तुम्हांला त्यात आणखी काही वेगळा अर्थ सापडू शकतो. त्यामुळे चित्राचा अर्थ सांगणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्याला एक अर्थ नसतो; असूच नये एक अर्थ.

एक गमतीशीर उदाहरण सांगते. माझं एक चित्र आहे, एका बाईच्या खांद्यावर कोकिळा आहे. (चित्र) माझ्या स्टुडिओच्या बाहेर एक कोकिळेचं पिलू पडलेलं होतं, अर्धमेलं झालेलं. माझ्याकडे कोणीतरी आले, त्यांनी हे दाखवलं. ते आत आणलं. माझा मुलगा पक्षिनिरीक्षण करतो, पण तो नेमका शिक्षणासाठी नुकताच कोलकात्याला गेला होता. त्याला फोनवर विचारलं. त्यानं सांगितलं, "'SPCA'ला फोन कर आणि मधल्या वेळात साखर-पाणी-मीठ पाज त्याला." त्या वेळेला इझलवर हे बाईचं चित्र होतं आणि तिचा खांदा मोकळा होता. माझ्या दृष्टीनं ते चित्र पूर्ण झालेलं होतं, वाळायला ठेवलेलं होतं. मग ते लोक गेले. मी आणि कोकिळा दोघीच राहिलो. मी त्या 'SPCA'च्या लोकांची वाट पाहत होते. पक्ष्याला बाहेर ठेवलं असतं, तर मांजरींनी लगेच त्याला खाल्लं असतं. शेवटी तोही जीव आहे, त्याला नाही असं सोडून देऊ शकत. पाणी-साखर पिऊन ते पिल्लू मस्त फडफडायला लागलं. स्टुडिओ छोटासा, आता मलाही भीती वाटायला लागली. मग मी दार बंद करून बाहेर आले, पिल्लाला आत राहू दिलं. मग 'SPCA'ची व्हॅन आली आणि ते लोक पिल्लाला घेऊन गेले. तीन-चार दिवसांनी कोकिळेची प्रतिमा त्या चित्रावर आली. या चित्राची अशी सरळ सोपी कथा मी सांगू शकते. त्यानंतर सहा-एक महिन्यांनंतर मी हे चित्र पाहत होते, मधल्या काळात कोकिळा असणारी पाच-सहा चित्रं काढली. नंतर मला लक्षात आलं, मी तेव्हा 'एम्प्टी नेस्ट सिण्ड्रोम'मधून जात होते. म्हणून अतिशय कम्पॅशनेटली ओंजळीत धरलेला पक्षी, असं ते आलं. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचे असंख्य अर्थ असू शकतात. जाणिवे-नेणिवेचा खेळ असतो सारा.

ऐसीअक्षरे - थोडा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या काळातल्या लोकांसमोर असणारी आव्हानं तुम्ही सांगितलीत. एका प्रकारे तुम्ही एका जंक्चरला आहात. आत्तापर्यंत तुम्हांला यश मिळालं, तुमच्या चित्रांना मागणी आहे आणि अजूनही चित्र काढणं सुरूच आहे. याच्या पुढचा रस्ता काय असेल याबद्दल तुम्हांला काय वाटतं?

शुभा- चित्रं काढणं ही माझ्यासाठी जगण्याची पद्धत आहे. ही जीवनावश्यक गोष्टच आहे. श्वास घेण्याएवढी सहज आणि उत्स्फूर्त. मला चित्रं काढताना मजा येते, त्यातून आनंद मिळतो. चित्रं काढणं म्हणजे माझ्यासाठी रंगात खेळणं आहे. 'कम्पोझिशनचा विचार कर', इ. इ. प्रकारच्या सूचना मला बरेच लोक करतात. करता करता ते होईलच. रियाज सुरू राहतो. मी स्वतःवर कधीही सक्ती करत नाही. एवढ्या वेळात एवढी चित्रं काढायची असं मला जमत नाही. मी स्वतःला कोणतीही बंधनं घातली नाहीत. त्यामुळे मला ताणही येत नाही. नशिबाने मला कोणाबद्दल ईर्ष्याही वाटत नाही. चित्रं काढताना मला कुणाची स्पर्धा वाटत नाही, त्यामुळे असुरक्षिततेची भावना येत नाही. एखादं छानसं नाटक बघितल्यासारखे मी इतर कलाकारांचे शोज पाहू शकते. त्यांची कला समजून घेण्याचा प्रयत्न करते. चांगली नाटकं, चित्रपट, शोज, चांगलं साहित्य, संगीत या सगळयांतून आपण खूप समृद्ध होत राहतो. शेवटी हे सगळं कशासाठी असतं, तर आनंदासाठी, नाही का? बाकी रोजच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी, दु:ख, ताणतणाव असताताच. पण एखादं चांगलं गाणं ऐकून, चित्र काढून त्या सगळ्याचा निचरा होऊ शकतो. लोकांनी चित्राची प्रशंसा केली, ती विकत घेतली, तर तो मला मिळालेला बोनस असतो.

मी लोककला पाहते. दागिने बनवते, त्यात या कलांचा समावेश करण्याचा प्रयत्न करते. उदा: माझी 'पपेट्स' मस्त विकली जात होती, तेव्हा मी ते बंद केलं. लोक म्हणाले, "तुझ्यासारखी मूर्ख बाई तूच असशील. आत्ता या चित्रांना मागणी आहे." पण मी नाही करू शकले. मी माझ्यासाठी नाही करू शकत, तर लोकांसाठी काय करणार? "मला पपेट करावी असं वाटत नाही," एवढंच एक उत्तर माझ्यापाशी होतं. आतून ते येत नसताना तेच तेच करत राहिलं, तर ती कला राहत नाही. तेव्हा डोळे बंद करून 'पपेट्स' काढून मी अजून एक बंगला बांधला असता. पण त्याला काही अर्थ नसता. आता मी तेच मोटिफ्स, फॉर्म्स पुन्हा वापरते आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने. आर्ट आणि क्राफ्ट, कला आणि कलाकुसर यांच्यात एक सीमारेषा असते. आता मी कलाकुसरीमधे, माझ्या दागिन्यांमधल्या पेण्टेड पेण्डण्ट्समधे तेच फॉर्म्स वापरते आहे.

ऐसीअक्षरे - आयकॉनिक चित्रं, स्क्रीम किंवा व्हॅन गॉचे जोडे, हे कसं बनतं? त्याचा काही फॉरम्युला असेल का? अशी चित्रं बनण्याचा काळ उलटून गेला आहे का?

शुभा - आयकॉनिक चित्रं ही मुळात प्रभावी आणि परिणामकारक असतात. पण त्याच्याच जोडीची अनेक समकालीन चित्रं, किंबहुना त्याच कलावंताची इतर काही चित्रं हीदेखील, त्याच तोडीची असतात, पण शेवटी मार्केटिंग आणि प्रेझेण्टेशन हापण भाग आहेच ना. एकच प्रतिमा तुम्ही सतत दाखवत राहिलात, तर ते स्मरणात राहू शकतं. वेगवेगळया संदर्भांत, जाहिरातींत, माहितीपटांत हे व्हिज्युअल लोकांसमोर आलं, साहित्यात त्याचे वारंवार उल्लेख आले, तर ते आयकॉनिक बनत जातं. (या बाबतीत मोनालिसाबाईंची पी. आर. एजन्सी फारच जबरदस्त आहे. Smile )

आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि मार्केटिंगच्या युगात हे जास्त शक्य आहे. चित्र हे फक्त भिंतीवर लावण्याच्या पलीकडे जाऊन आज चित्रांचा वापर कुशन कव्हर्स, कोस्टर्स, माउस पॅड्स, मग्ज, छत्र्या, टी-शर्ट्स यांसारख्या वस्तूंवर केला जातो. युरोप, अमेरिकेत म्युझियम्सबरोबर शेजारी आर्ट शॉप्स असतात. तिथे या वस्तू मिळू शकतात.

अॅमस्टरडॅममधल्या व्हॅन गॉच्या म्युझियम शॉपमधे गेल्यावर पुन्हा एकदा विरोधाभास दिसतो… ज्या कलावंताचं एकही चित्र त्याच्या हयातीत विकलं गेलं नाही, त्याची चित्रं असणाऱ्या प्रिंट्स आणि वस्तू घ्यायला लोकांची रांग! व्हिन्सेंट, जिथे कुठे असशील तिथून एकदा बघ रे हे सर्व...

ऐसीअक्षरे – ज्यातून दृश्यकलेसंदर्भात अधिक माहिती मिळेल, जाणीव समृद्ध होईल असं कोणतं जर्नल तुम्ही सुचवाल?

प्रश्न - आज बाजारात 'Art India', 'Art and deal', 'Take on art', 'Marg Publication'चे अंक इ. अनेक कलाविषयक नियतकालिकं उपलब्ध आहेत. ती जरूर वाचा. त्यांत कलाकारांच्या मुलाखती, चित्रं बघायला मिळतील. जगात होणाऱ्या वेगवेगळ्या आर्ट इव्हेण्ट्सची माहिती मिळेल.

इंटरनेटवर तर जगातल्या कुठल्याही कलाकाराची, कलाकृतीची माहिती मिळू शकेल. ते बघत, वाचत रहा. आणि मुख्य म्हणजे शक्य असेल तेव्हा, कलादालनात प्रत्यक्ष कलाकृतीचा आस्वाद घ्या. कलावंतांशी मनमोकळी चर्चा करा. तुमचं तुम्हांलाच ठरवता येईल की, तुम्हांला कोणतं चित्र आवडतं ते.

ऐसीअक्षरे - हिंदी चित्रपटात मोठ्या प्रमाणात चित्रांचा वापर केलेला दिसत नाही. पण तद्दन व्यावसायिक 'दिल चाहता है' आणि निराळा प्रयोग म्हणावा अशा 'धोबी घाट'मधे चित्रांचा काही प्रमाणात वापर झाला. असं काही आणखी होण्याची शक्यता तुम्हांला दिसते का, जसं पाश्चात्त्य चित्रपटांमधे होतं?

शुभा - अजून तरी या बाबतीत जाण खूपच कमी आहे, असं दिसतं. नाटकांच्या बाबतीत मी सुचवलंही होतं. काचेवर चित्रं काढतात, तशी मी अक्रॅलिकवर, मागच्या बाजूनं चित्रं काढते. एक-दोन तरुण नाटककारांना मी म्हटलं, तुम्ही नेपथ्यासाठी हे असं काही वापरणार असाल, तर मी तुमच्यासाठी काम करायला तयार आहे (कोलॅबरेशन आर्ट!). एखादं चित्र आहे आणि ते नेपथ्यात भिंत म्हणून वापरलं, असं काहीतरी. पण अजून कोणी असे प्रयोग करायला तयार नाहीये. सुधीर पटवर्धनांच्या चित्रांचं नाट्यरूपांतर - चित्रगोष्टी - म्हणून त्यांनी एक प्रयोग केला होता. असे प्रयत्न चालू आहेत. पण अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे; होताना दिसत नाहीये. सगळ्या कला आपापसांत निगडीत असतात.

साधारण पंचवीस वर्षांपूर्वी असा प्रयोग केला होता, भीमसेन गात आहेत आणि एम. एफ. हुसेन चित्र काढत आहेत; पण मी ते पाहिलेलं नाही. मी त्याबद्दल बोलणं योग्य नाही. अलीकडे मी काही असे प्रयोग पाहिले की, त्यांत गायकाने सूर लावला - नाही लावला, तोच तिकडे चित्र काढायला सुरुवात झाली. प्रयोग करतात, पण आयोजन करणाऱ्यांना यातलं काही माहीत नसेल, तर ते फसतं! बटण दाबलं आणि झाली चित्र काढायला सुरुवात; असं असेल, तर त्यातून चांगलं चित्र नाही काढता येत. मी जे असे प्रयोग पाहिलेत, त्यांत हे काही जमलंय असं वाटलं नाही.

पण प्रात्यक्षिकं जरूर व्हायला हवीत. प्रत्यक्ष रंगवताना, चित्र काढताना लोकांनी पाहिलं, तर त्यांना त्यात रस वाटू शकेल. पण हे सगळ्यांना जमतंच असं नाही. माझ्यासारखी बाई करू शकत नाही. घेतला कॅनव्हास आणि केली सुरुवात, अशी हुकमी चित्रं मला काढता येत नाहीत. हा माझ्यातला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे! पण अनेकांना हे छान जमतंही आणि ते चांगले कलाकार आहेत. त्यांनी हे जरूर करावं. शिल्पं बनवावीत, चित्रं काढावीत. सार्वजनिक ठिकाणी, जसं शिवाजी पार्कच्या एखाद्या कोपऱ्यात, हे झालं पाहिजे. निवांतपणे कलाकाराला काम करताना पाहता यावं. मागे हुसेनचा ऐंशीवा वाढदिवस झाला तेव्हा असं मस्त आयोजन केलं होतं. हा माणूस पाच तास शिवाजी पार्कवर चित्र काढत होता, ऐंशीव्या वर्षी. त्यांना काही त्रास होत नव्हता कोणाचा. लोकं येत-जात होते, संगीत सुरू होतं आणि मोठ्या कॅनव्हासवर त्यांनी चित्र काढलं. आणि असंख्य लोक त्या कलाकृतीच्या निर्मितीचे साक्षीदार झाले.

हे असं अधिक प्रमाणात व्हायला पाहिजे. लोकं पैसे मिळवण्यात एवढे गुंतले आहेत... धावपळ असते; पण थोडा वेळ असाही खर्च व्हावा.

ऐसीअक्षरे - तुमच्या 'Quest' या चित्रमालिकेसंदर्भात प्रश्न आहे. ती चित्रं पाहून असं वाटलं की, बाई एखाद्या बाईकडे पाहते आहे. तिचा चेहेरा दिसतो आहे, विचार दिसत आहेत, पण शारीर अस्तित्त्व जाणवत नाही. असे काही विचार तुमच्या डोक्यात होते का?

शुभा - मी बाई आहे, मी बाईची चित्रं काढली. स्वकथन असेल, तर न ठरवता चित्रांमधे खूप साम्य दिसतं. माझ्या चित्रांमधे ते तसंच झालेलं आहे.

स्त्रीवादाबद्दल म्हणायचं, तर माझा समानतेवर विश्वास आहे. पीडीत स्त्रिया जशा असतात, तसे मी चिक्कार पीडीत पुरुषही पाहिलेले आहेत. आता बरीच समानता येते आहे. कट्टर स्त्रीवादी म्हणवून घेणाऱ्यांना नक्की काय हवंय हे मला समजत नाही. स्वतःची क्षमता ओळखून त्यानुसार वर्तन असण्यापेक्षा, श्रेष्ठ ठरण्याचा अट्टाहास का? स्त्रीला समानतेनं आणि आदरानं वागवावं हे मलाही पटतं. पण स्त्री-पुरुषांमधे नैसर्गिक भेद आहेत. स्त्री ही मनाने अधिक शक्तिवान असते, तर पुरुष शरीरानं असं मला वाटतं. मी बाई आहे म्हणून मी बाईची चित्रं काढली, एवढंच.

मी पुरुषांच्या मानसिकतेचा फार विचार केलेला नाही असंही असेल. पण 'नायक' म्हणून एक चित्रमालिका मी काढली. माझ्या आयुष्यात आलेले, मला भेटलेले आणि ज्यांचा माझ्यावर प्रभाव पडला असे, अशा पुरुषांची चित्रं त्यात आहेत. यात माझ्या मुलांचाही समावेश आहे. स्वतःमधलंच इतकं व्यक्त व्हायचं शिल्लक आहे की, अजून त्याचाच विचार चाललेला असतो. हीच बाब मुंबईच्या 'पुरुषस्पंदन' नावाच्या नियतकालिकाच्या दिवाळी अंकातल्या लेखातही आलेली आहे. (लेख) हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्यातही हे आवर्जून आलेलं आहे. 'पपेट्स' ही मालिका करताना त्याच्यामागे असलेले लैंगिक अंडरटोन्स जाणवलेले नव्हते. ते मागाहून जाणवले, अशा स्वरूपाची कबुली मी त्या लिखाणात दिलेली आहे. या अशा गोष्टी शेवटी जाणिवे-नेणिवेच्या पातळीवरच खेळत असतात आणि ते कुठल्या ठोकताळ्यात बसवता येणं शक्य नाही. मी तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगानं या उत्तरात पुरेसं विवेचन केलेलं आहे अशीच मला आशा आहे.

ऐसीअक्षरे - तुमची मुलाखत प्रसिद्ध करताना तुमची चित्रं इथे देणं उचित ठरेल. तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर असलेल्या तुमच्या चित्रांपैकी काही इथे आम्ही देतो आहोत. तशी परवानगी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. तुमच्या मुलाखतीवर आमच्या वाचकांच्या प्रतिक्रिया येतील. त्यांच्या काही प्रश्नांना, शंकांना उत्तरं तुम्हांला देता येतील. धन्यवाद.

शुभा - जाता जाता कवी ग्रेस यांचा एक उतारा मी उद्धृत करू इच्छिते. कलावंत आणि रसिक ह्या दोघांसाठीही तो डोळ्यात अंजन घालणारा ठरेल आणि बघताबघता तुम्हांला अंतर्मुख करून टाकेल...

"एखाद्या कलावंताने आपली निर्माणक्षमता संपल्याच्या विदारक जाणिवेने स्वतःचा अंगठा कापून टाकावा हे मी समजू शकतो -
पण कलावंताचा अंगठा हा कोणाही सम्राटाचा मालकी हक्क कसा होईल? तरीही हे होतेच -
एकलव्याचा अंगठाही असाच एका हिंस्र सत्तेचा बळी! अशा लहानथोर सत्ता सतत आंधळी सत्ता गाजवीत असतात म्हणूनच, कलावंताच्या बांधिलकीचा अटीतटीचा प्रश्न होऊन बसतो.
इथेच, रसिकांच्या बांधिलकीचाही प्रश्न यायला हवा. आपल्या अभिरुचीलाही बांधिलकी हवी,
विशिष्ट स्वर हवा, दिशाही हवी.
दहा प्रकारच्या गोष्टी आवडणे शक्य आहे. पण त्यातही आत्म्याला खंजिरासारखी भेदून जाणारी एखादी असतेच ना!
दिशाहीन विदग्धतेच्या हव्यासाने आज सगळीकडे अभिरुचीचे अवमूल्यन होते आहे.
अंधारात फार संयमाने दिवा ठेवावा लागतो!
अंधारात फार संयमाने दिवा ठेवावा लागतो,
ही ओळ काय मी केवळ एखाद्या लहरी थिल्लर तिडकीत लिहिली असेल?
दिव्याची जपणूक आणि अंधाराची बूज राखतो मी.
संवेदना रक्तबंबाळ झाल्या तरीही
माझे इमान ढळत नाही, माझ्यापुरते.
एक दिवा जपायचा तर आयुष्य पुरत नाहीये मला
आणि इथे तर झुंबरेच्या झुंबरे लावण्याची अहमहमिका सुरू आहे.
तमसोः मा ज्योतिर्गमय हे सूत्र लिहिणाऱ्या
कवीचे आंतरिक आर्तच जर गवसणार नसेल
तर आंधळेपणाने असे मंत्र उच्चारावेच कशाला?
हे तर अंगठा कापून घेण्यापेक्षाही निर्घृण होईल."

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

गेले बरेच दिवस निवांतपणे पुन्हा एकदा मुलाखत वाचून यावर प्रश्न विचारावेत असं म्हणत होतो, आज मुहुर्त लागला.

मुलाखत आवडली. चित्रकलेच्या निर्मितीबाबत, प्रभावांबाबत एका जाणत्या आणि प्रथितयश कलावंतांकडून आलेले शब्द म्हणजे पर्वणीच.

इतर कलांमध्ये ज्या प्रमाणात लोकशाहीकरण झालं, तेवढं दृश्यकलांमधे झालेलं नाही. याचं कारण म्हणजे कलासाक्षरतेचा अभाव हे असू शकतं.

लोकशाहीकरण म्हणजे नक्की काय हे मला कळलेलं नाही. गेल्या दोन दशकांत आंतरजाल आणि कॅमेरे यांमुळे सामान्यांना दिसणारी चित्रं आणि सामान्यांनी छायाचित्रांच्या माध्यमांतून काढलेली चित्रं यांचा अक्षरशः स्फोट म्हणावा असा झालेला आहे. याला लोकशाहीकरण आणि दृक्कलासाक्षरतेची मूळाक्षरं गिरवणं म्हणता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> लोकशाहीकरण म्हणजे नक्की काय हे मला कळलेलं नाही. गेल्या दोन दशकांत आंतरजाल आणि कॅमेरे यांमुळे सामान्यांना दिसणारी चित्रं आणि सामान्यांनी छायाचित्रांच्या माध्यमांतून काढलेली चित्रं यांचा अक्षरशः स्फोट म्हणावा असा झालेला आहे. याला लोकशाहीकरण आणि दृक्कलासाक्षरतेची मूळाक्षरं गिरवणं म्हणता येईल का? <<

मला वाटतं की मुलाखतीत पुढे जे म्हटलं आहे त्यावरून ते स्पष्ट व्हावं. सर्वासामान्यांनी चित्रं/छायाचित्रं काढणं हा एक भाग झाला, पण बहुतेकांना ते कला म्हणून अभिप्रेत नसतं. म्हणजे मित्रांबरोबर किंवा कुटुंबाबरोबर लग्नसमारंभात, वाढदिवसाच्या सोहळ्यात, हॉटेलात किंवा सहलीला वगैरे गेलं आणि त्याचे फोटो काढून फेसबुकवर किंवा फ्लिकरवर टाकले, तर ती कला आहे असा दावा कुणी करताना दिसत नाही. ह्याउलट 'तुमचं ते आधुनिक चित्रकला वगैरे काय ते आम्हाला कळत नाही बुवा' असं म्हणून 'कले'कडे काहीशा दूरत्वानं, किंबहुना छद्मीपणानंसुद्धा पाहण्याचा अनेकांचा कल दिसतो. मग त्याला कलेचं लोकशाहीकरण झालं असं कसं म्हणणार, असं गोखले ह्यांना म्हणायचं असावं असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्याउलट 'तुमचं ते आधुनिक चित्रकला वगैरे काय ते आम्हाला कळत नाही बुवा' असं म्हणून 'कले'कडे काहीशा दूरत्वानं, किंबहुना छद्मीपणानंसुद्धा पाहण्याचा अनेकांचा कल दिसतो.

हे बरोबरच आहे. मात्र माझा मुद्दा असा होता की शंभर वर्षांपूर्वी चित्रं पहायला मिळणं हा अनुभव अत्यंत मर्यादित होता. त्यामुळे ते माध्यमच अगदी मोजक्या लोकांच्या हातात होतं. त्यामुळे चित्रासाठीची मांडणी, रंगसंगती, पोत, त्यातून येणारा संदेश या सगळ्याचा विचार करायचा असतो याची जाण सामान्यांना कमी होती. याउलट आता अधिक चित्रं डोळ्यासमोर येतात. साहजिकच चांगलं-वाईट काय याची जाण समाजपातळीवर वाढायला हवी. फेसबुकावर टाकलेले कौटुंबिक फोटो कला म्हणून काढलेले नसले तरी दुसऱ्या बाजूला अनेक हौशी लोक सुंदर फोटो यावेत यासाठी प्रयत्न करताना दिसतात. एके काळी असे हजारो प्रयत्न करणं, त्यातून एखादा टक्का वेळा यशस्वी होणं फारच थोड्यांना परवडण्यासारखं होतं. आता तसं राहिलेलं नाही. चित्रांवर प्रोसेसिंग करून ती अधिक चांगली बनवण्याचा प्रयत्न करणं हेही अनेकांच्या आवाक्यात आलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येकच जण कलाकृती निर्माण करतो असं नाही. म्हणूनच मूळाक्षरं गिरवणं हा शब्दप्रयोग वापरला आहे.

'तुमचं ते आधुनिक चित्रकला वगैरे काय ते आम्हाला कळत नाही बुवा'

लोक अधिक सुशिक्षित होत असताना जर वाङमय अधिक क्लिष्ट होत गेलं तर त्याला लोकशाहीकरणाच्या अभावापेक्षा कलेचं एलिटीकरण झालं असं म्हणणं योग्य ठरणार नाही का? एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये ठेवलेलं 'लाल चौकोन' टाइप चित्र लाखो रुपयांना का विकलं जातं, त्या गॅलऱ्या ती चित्रं मुळात का विकत घेतात, आणि प्रदर्शन का करतात.... या सामान्यांच्या सामान्य प्रश्नांना जर उत्तरच द्यायचं नाही असं ठरवलं तर तो दोष दृक्कलेच्या संपूर्ण क्षेत्राचा ठरतो. कदाचित गोखलेंना असंच काहीसं म्हणायचं असावं. मात्र शब्दप्रयोगातून तो दोष सामान्यांवर पडलेला दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोक अधिक सुशिक्षित होत असताना जर वाङमय अधिक क्लिष्ट होत गेलं तर त्याला लोकशाहीकरणाच्या अभावापेक्षा कलेचं एलिटीकरण झालं असं म्हणणं योग्य ठरणार नाही का?

जरूर नाही. तसे सांगता येईलच असे नाही.

एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये ठेवलेलं 'लाल चौकोन' टाइप चित्र लाखो रुपयांना का विकलं जातं, त्या गॅलऱ्या ती चित्रं मुळात का विकत घेतात, आणि प्रदर्शन का करतात.... या सामान्यांच्या सामान्य प्रश्नांना जर उत्तरच द्यायचं नाही असं ठरवलं तर तो दोष दृक्कलेच्या संपूर्ण क्षेत्राचा ठरतो.कदाचित गोखलेंना असंच काहीसं म्हणायचं असावं. मात्र शब्दप्रयोगातून तो दोष सामान्यांवर पडलेला दिसतो.

बिङ्गो!!!!!!

(कलानिरक्षर) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या बाईंच्या स्त्री प्रतिमा फार पिळदार आणि masculine वाटतात. हे मुद्दाम आहे की अनवधानाने ते कळायला मार्ग नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> याउलट आता अधिक चित्रं डोळ्यासमोर येतात. साहजिकच चांगलं-वाईट काय याची जाण समाजपातळीवर वाढायला हवी. <<

असं व्हायला हरकत नाही किंवा असं व्हावं अशी अपेक्षा ठीक, पण मराठी माणसांकडे पाहता असं होताना दिसत नाही असं मात्र वाटतं.

>> फेसबुकावर टाकलेले कौटुंबिक फोटो कला म्हणून काढलेले नसले तरी दुसऱ्या बाजूला अनेक हौशी लोक सुंदर फोटो यावेत यासाठी प्रयत्न करताना दिसतात. एके काळी असे हजारो प्रयत्न करणं, त्यातून एखादा टक्का वेळा यशस्वी होणं फारच थोड्यांना परवडण्यासारखं होतं. आता तसं राहिलेलं नाही. चित्रांवर प्रोसेसिंग करून ती अधिक चांगली बनवण्याचा प्रयत्न करणं हेही अनेकांच्या आवाक्यात आलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येकच जण कलाकृती निर्माण करतो असं नाही. म्हणूनच मूळाक्षरं गिरवणं हा शब्दप्रयोग वापरला आहे. <<

एक अपेक्षा किंवा इच्छा म्हणून हेही ठीकच आहे. तंत्रात होणारा बदल किंवा असं 'व्यक्त' होण्याचं वाढतं संख्याशास्त्रीय प्रमाण वगैरेसुद्धा ठीकच असेल. पण 'फोटो सुंदर यावेत यासाठी प्रयत्न' आणि ह्याच माध्यमातून व्यक्त होण्याची आतून वाटणारी असोशी किंवा तीव्र इच्छा ह्यांत मूलभूत फरक असणार असं वाटतं. उदाहरणार्थ, अवधूत डोंगरेंच्या लेखातून त्यांचा जो छायाचित्रकार म्हणून प्रवास दिसतो तो हौशीच आहे. पण त्यात ती असोशी दिसते. सोशल मीडिआवर मुख्यत्वे मित्र-हितचिंतकांनी भरभरून लाईक करणं वगैरे गदारोळात अशी असेल नसेल ती असोशी हरवून जाण्याचा धोका दिसतो.

>> लोक अधिक सुशिक्षित होत असताना जर वाङमय अधिक क्लिष्ट होत गेलं तर त्याला लोकशाहीकरणाच्या अभावापेक्षा कलेचं एलिटीकरण झालं असं म्हणणं योग्य ठरणार नाही का? <<

माहीत नाही. पन्नास वर्षांपूर्वी 'कोसला' आली. आजची मराठी कादंबरी तिच्याहून वेगळे रूपबंध आणि आशयाचे प्रयोग करत नसेल, तर मराठी कादंबरीत साचलेपण आलं आहे असं मी म्हणेन.

>> एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये ठेवलेलं 'लाल चौकोन' टाइप चित्र लाखो रुपयांना का विकलं जातं, त्या गॅलऱ्या ती चित्रं मुळात का विकत घेतात, आणि प्रदर्शन का करतात.... या सामान्यांच्या सामान्य प्रश्नांना जर उत्तरच द्यायचं नाही असं ठरवलं तर तो दोष दृक्कलेच्या संपूर्ण क्षेत्राचा ठरतो. <<

माहीत नाही. कलेचाच काय, पण कसलाही बाजार मांडला की त्याला त्याची गती असते आणि त्याचे चढउतार असतात. त्याचा कलास्वादाशी आणि कलाकाराशी संबंध असेलच, असं नाही. मला तरी असं दिसतं की आसपासचे बरे कलाकार फार तर त्यातून आपोआप मिळणारा आर्थिक फायदा घेतात, पण त्यांना तो बाजार समजतोच असं नाही. किंबहुना तो त्यांच्या आकलनाबाहेरच असतो असं बहुतेकदा वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुलाखत छानच आहे. पण चित्रं कसं बघावं ह्याचं कोणी मार्गदर्शन करेल का? एका चित्रातून वेगवेगळे अर्थ निघू शकतात पण चित्र बघताना ती पहायला लागणारी दृष्टी कशी विकसीत करायची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

दिवाळी अंकाच्या मुलाखती घेणार्‍याचे अनेक आभार मानण्याची वेळ आहे, एवढे नेमके प्रश्न विचारण्यामागे असलेले श्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं व्हायला हरकत नाही किंवा असं व्हावं अशी अपेक्षा ठीक, पण मराठी माणसांकडे पाहता असं होताना दिसत नाही असं मात्र वाटतं.

हे वैयक्तिक निरीक्षण इतपतच स्वीकारार्ह विधान आहे. कारण याची मोजमाप करण्यासाठी निकष काय ठेवायचे हा प्रश्नच आहे. पण चित्रनिर्मितीची साधनं अधिक लोकांकडे आली आहेत, आणि त्यांचा परिणामही दिसतो आहे. उदाहरणार्थ, ऐशीच्या दशकात काढलेली लोकांची छायाचित्रं पहा. घरगुती छायाचित्रंही बहुतेक वेळा प्रोफेशनल फोटोग्राफरकडून काढली जायची. त्यांपेक्षा आजकालची सामान्य माणसांनी काढलेली कितीतरी चित्रं चांगल्या दर्जाची असतात. याचं एक कारण म्हणजे आजकाल अधिक लोकांना शंभर फोटो काढून त्यातले आवडलेले तीन प्रकाशित करणं जमतं.

ऐशीच्या दशकातले सर्वसामान्य सिनेमे पहा. त्यांमधला रंगांचा वापर, रचनेतला बटबटीतपणा, आणि चित्राची क्वालिटी याचा विचार करा. त्या दर्जाचं चित्रीकरण असलेले चित्रपट आज चालणं शक्य नाही. याचं कारण सर्वसाधारण माणसाची 'नजर' सुधारलेली आहे. दृक्कलांबद्दल मराठी माणूस अनभिज्ञ आहे असं म्हणणं सोपं आहे, पण या चित्रस्फोटामुळे काही प्रमाणात त्याची जाण उंचावली आहे हे नाकारता येत नाही.

उदाहरणार्थ, अवधूत डोंगरेंच्या लेखातून त्यांचा जो छायाचित्रकार म्हणून प्रवास दिसतो तो हौशीच आहे. पण त्यात ती असोशी दिसते.

इतर सर्व गुणांप्रमाणे असोशीचंदेखील नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन असतंच की. त्यामुळे या डिस्ट्रिब्यूशनच्या अधिक असोशी टोकाकडच्या माणसांपैकी पूर्वीपेक्षा जास्त लोकांना व्यक्त होण्याची माध्यमं परवडतात, वापरता येतात. मला खात्री आहे की असोशीने फोटो काढणारांच्या आल्बम्सची तुलना केली तर वीस-तीस वर्षांपूर्वी असलेल्या फोटोंच्या संचापेक्षा आजचा संच प्रचंड प्रमाणात मोठा असेल. (यावर संच मोठा झाला, पण सौंदर्य वाढलं नाही वगैरे संपूर्ण व्यक्तिनिष्ठ प्रत्युत्तर देता येईलच...)

हे सर्व सांगण्याचं कारण असं की दृक्कलांबाबत लोकशाहीकरण चालू आहे. मात्र अव्हांगार्द कलावंत - विशेषतः कुंचला वापरणारे - हे सामान्य जनतेपासून त्याहून अधिक वेगाने दूर जात आहेत का? असा प्रश्न आहे. संगीतातही लोकशाहीकरण चालू आहे, प्रयोग चालू आहेत. मात्र बहुतांश उच्च दर्जाचं मानलं गेलेलं संगीत ऐकून सामान्य व्यक्ती 'याला संगीत का म्हणावं? यात नक्की सौंदर्य काय आहे?' असा प्रश्न विचारताना दिसत नाहीत. चित्रकलेबाबत, इन्स्टॉलेशन आर्टविषयी विचारतात. दृक्कलेची भाषा इतकी बोजड, कठीण का होत चाललेली आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> ऐशीच्या दशकात काढलेली लोकांची छायाचित्रं पहा. <<
>> ऐशीच्या दशकातले सर्वसामान्य सिनेमे पहा. <<
>> याचं कारण सर्वसाधारण माणसाची 'नजर' सुधारलेली आहे. दृक्कलांबद्दल मराठी माणूस अनभिज्ञ आहे असं म्हणणं सोपं आहे, पण या चित्रस्फोटामुळे काही प्रमाणात त्याची जाण उंचावली आहे हे नाकारता येत नाही. <<

तंत्र बदलत राहणं आणि त्यानुसार कलाविष्कारात काही बदल आपोआप होत जाणं हे कोणत्याही तंत्राधिष्ठित माध्यमाबाबत जवळपास अपरिहार्य असतं. तांत्रिक बदलांमुळे आविष्कारात सफाई आली म्हणून आस्वादकाची जाण उंचावेलच असं मात्र नाही. किंबहुना, अनेकदा असं दिसतं की चकचकीतपणाला चांगलं म्हणण्यापलीकडे समज वाढलेलीच नाही. असो. समज वाढली असेल, तर मला आनंदच आहे. त्याचा पुरावा मला तरी फारसा कुठे दिसत नाही. इतरांनी दाखवून दिला तर मी तो आनंदानं तपासेन.

>> अव्हांगार्द कलावंत - विशेषतः कुंचला वापरणारे - हे सामान्य जनतेपासून त्याहून अधिक वेगाने दूर जात आहेत का? असा प्रश्न आहे. संगीतातही लोकशाहीकरण चालू आहे, प्रयोग चालू आहेत. मात्र बहुतांश उच्च दर्जाचं मानलं गेलेलं संगीत ऐकून सामान्य व्यक्ती 'याला संगीत का म्हणावं? यात नक्की सौंदर्य काय आहे?' असा प्रश्न विचारताना दिसत नाहीत. चित्रकलेबाबत, इन्स्टॉलेशन आर्टविषयी विचारतात. दृक्कलेची भाषा इतकी बोजड, कठीण का होत चाललेली आहे? <<

एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह - मुळात हे लक्षात घ्यायला हवं की दृश्यकलांबाबत मराठी माणसाच्या मनात एक प्रकारची तुच्छता होती आणि त्या तुच्छतेचा एक – स्पष्टच शब्दांत सांगायचं तर – माज होता. ती तुच्छता आणि तो माज संगीताबाबत नव्हता. नटूनथटून मराठी मध्यमवर्गीय कुटुंबं संगीत नाटकं, संगीताच्या मैफली वगैरेंना जायची आणि अजूनही जातात. भारतीय दृश्यकलांच्या इतिहासातलं अतिशय महत्त्वाचं 'बॉम्बे स्कूल' जिथे जन्मलं त्या मुंबईत पुष्कळ चांगली प्रदर्शनं होत असतात, संगीत नाटकाच्या किंवा संगीताच्या मैफलीच्या एका तिकिटापेक्षा अशा प्रदर्शनात जाणं चांगलंच स्वस्त, किंबहुना अनेकदा फुकटच असतं. एन्.जी.एम्. ए.मध्ये नुकतंच टागोरांच्या चित्रांचं मोठं प्रदर्शन भरलं होतं. तिकीट – दहा रुपये फक्त. पण एखाद्या प्रदर्शनाला असं समारंभपूर्वक वगैरे जाऊ दे, पण आवर्जून जाणारे मराठी लोक आजदेखील तुरळकच दिसतात. पु.लं.सारख्या लोकप्रिय आणि रसिक वगैरे समजल्या जाणाऱ्या लेखकाच्या लिखाणातसुद्धा दृश्यकलांविषयीची ही तुच्छता आढळते. थोडक्यात, दृश्यकलांकडे असं तुच्छतेनं पाहण्याला मराठी माणसाच्या मनात एक प्रकारची प्रतिष्ठा आहे. गंमत म्हणजे ज्या काळात पु.ल. मराठी मनाचा ताईत वगैरे होते, त्याच काळात गायतोंडे, बरवे, पळशीकर, कोलते अशा आडनावांचे लोक (आणि पंढरपुराहून मुंबईत आलेले हुसेन वगैरे) भारतीय दृश्यकलेत मोठी देदीप्यमान कामगिरी बजावत होते. किंवा, वर गोखले उद्धृत करतात ते ग्रेस 'दुधाला उकळी फुटली की त्यावर साय धरते. तसा कार्यकारणभाव माझ्या कवितेत सापडणार नाही' (म्हणजे थोडक्यात, माझी कविता दुर्बोधच आहे) असं म्हणत होते आणि तरीही, त्यांच्या दुर्बोध समजल्या जाणाऱ्या कवितांनादेखील, चाहता वर्ग लाभत होता. तो पु.लं.च्या चाहत्यांइतका संख्येनं मोठा नसेलही, पण दुर्लक्ष करावा इतका संख्येनं नगण्यदेखील नव्हता. मग दृश्यकलांसाठीच मराठी माणसाच्या मनात हा दुजाभाव का, असाही प्रश्न विचारता येईल. खरी गंमत तर पुढेच आहे - आजच्या पी. आर.च्या जगातला आव्हॉं-गार्द कलाकार कधी नव्हे इतका समाजाभिमुख आहे. अनेक लोकप्रिय दिवाळी अंकांमध्ये गेली काही वर्षं सातत्यानं दृश्यकलांविषयी लिखाण येतं आहे. तरीही अजून त्याच त्या जुन्या तक्रारी पाहून असं खरंच वाटू लागतं की मराठी माणसाला दृश्यकलांबाबत असं म्हणायला (म्हणजे बोजड, सामान्य जनतेपासून दूर वगैरे) आवडतंच की काय? असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पु.लं.सारख्या लोकप्रिय लेखकाच्या लिखाणातसुद्धा दृश्यकलांविषयीची ही तुच्छता आढळते.

दृश्यकला/शास्त्रीय संगीत जाणणार्‍यामधे इतरांबद्दल असलेली तुच्छता सार्वत्रिक आढळणारी बाब आहे, त्यामुळेच 'उच्चभ्रु' वगैरे लेबल लावले जाते, हि भावना तितकीशी अन्योन्य नाही, आपल्याला ह्यातलं काही कळत नाही इतपत भावनेला पु.लंनी पाठिंबा दिल्याने तुच्छतावाद थोडाफार वाढीस लागला असल्याबद्दल मात्र सहमत आहे.

नटूनथटून मराठी मध्यमवर्गीय कुटुंबं संगीत नाटकं, संगीताच्या मैफली वगैरेंना जायची आणि अजूनही जातात. भारतीय दृश्यकलांच्या इतिहासातलं अतिशय महत्त्वाचं 'बॉम्बे स्कूल' जिथे जन्मलं त्या मुंबईत पुष्कळ चांगली प्रदर्शनं होत असतात, संगीत नाटकाच्या किंवा संगीताच्या मैफलीच्या एका तिकिटापेक्षा अशा प्रदर्शनात जाणं चांगलंच स्वस्त, किंबहुना अनेकदा फुकटच असतं. एन्.जी.एम्. ए.मध्ये नुकतंच टागोरांच्या चित्रांचं मोठं प्रदर्शन भरलं होतं. तिकीट – दहा रुपये फक्त.

संगीत नाटकं, मैफलीमधे काय ऐकायचं किंवा त्याचा आनंद घेणं मध्यमवर्गीय माणसाला शक्य आहे, पण 'पुष्कळ चांगल्या' प्रदर्शनात 'आनंद' कसा घ्यायचा हे ह्या मध्यमवर्गीय माणसाला ठार काही केल्या कळत नाही. उदाहरणार्थ - एन्.जी.एम्. ए.मध्ये नुकतंच टागोरांच्या भरलेल्या प्रदर्शनातील ह्या चित्रात काय पहायचं हे कळतच नाही. अशा बाबतीत खर्च हा मुद्दा दुय्यमच ठरेल.

ग्रेस 'दुधाला उकळी फुटली की त्यावर साय धरते. तसा कार्यकारणभाव माझ्या कवितेत सापडणार नाही' (म्हणजे थोडक्यात, माझी कविता दुर्बोधच आहे) असं म्हणत होते आणि तरीही, त्यांच्या दुर्बोध समजल्या जाणाऱ्या कवितांनादेखील, चाहता वर्ग लाभत होता. तो पु.लं.च्या चाहत्यांइतका संख्येनं मोठा नसेलही, पण दुर्लक्ष करावा इतका संख्येनं नगण्यदेखील नव्हता. मग दृश्यकलांसाठीच मराठी माणसाच्या मनात हा दुजाभाव का, असाही प्रश्न विचारता येईल

ग्रेस ह्यांच्या कविता मंगेशकरांनी गाण्याच्या माध्यामातून लोकप्रिय केल्या, तसं भाग्य इतर कोणत्या दुर्बोध लेखकाला/कवीला मिळाल्याचा संदर्भ आहे काय?

तरीही अजून त्याच त्या जुन्या तक्रारी पाहून असं खरंच वाटू लागतं की मराठी माणसाला दृश्यकलांबाबत असं म्हणायला (म्हणजे बोजड, सामान्य जनतेपासून दूर वगैरे) आवडतंच की काय?

जुन्या तक्रारींच निरसन फारच कमीप्रमाणात झालेलं असल्याने तक्रार आहेच, पण तसं आवडतं का तर माहित नाही पण फरक नक्कीच पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> उदाहरणार्थ - एन्.जी.एम्. ए.मध्ये नुकतंच टागोरांच्या भरलेल्या प्रदर्शनातील ह्या चित्रात काय पहायचं हे कळतच नाही. <<

टागोरांची चित्रकला सुरू झाली, ती मुळात त्यांच्याच हस्तलिखितांवर 'डूडलिंग' करत. उदा : हे पाहा -

कधी कधी बंगाली लिपीत असणारे आकारच टागोर सुलेखनासारखे अधिकाधिक शोभिवंत करत गेले. तर कधी शाईचे डाग आणि त्यातून त्यांना दिसणारे आकार त्यांनी अधिकाधिक रेखीव करत नेले. प्रदर्शनात ह्याची उदाहरणं होती. ते पाहिले तर हे लक्षात येतं की त्यातून टागोरांना अनेकदा कपोलकल्पित प्राणी-पक्षी म्हणता येतील असे आकार दिसत. त्यातून मग हळूहळू त्यांनी अशा अद्भुत जीवसृष्टीतल्या प्रतिमा स्वतंत्रपणे चितारायला सुरुवात केली. तुम्ही दुव्यात दिलेलं चित्र त्याचंच एक उदाहरण आहे. प्रदर्शनासोबत आर. शिव कुमार ह्यांनी बनवलेला कॅटलॉग विक्रीला होता. त्यात त्या आकारांविषयी विस्तृत विवेचन आहे असं मला स्मरतं. कदाचित आजही तो कॅटलॉग एन्. जी. एम्. ए.मध्ये विक्रीला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता हेच पहा, टागोरांच्या मी दिलेल्या दुव्यातल्या चित्राला किती इतिहास आहे, तुमचं हे सुरेख विवेचन त्या चित्रात 'आम्हाला' दिसत नाही आणि कॅटलॉग खर्चाचं गणित बिघडवतं.

हे सगळं सगळ्यांनाच समजलं पाहिजे हा आग्रह अस्थानी वाटतो, कला लोकाभिमुख झाली पाहिजे हे खरं, मग आपोआप ज्याना गती आहे ते त्याच्याकडे ओढले जातीलच, लोकाभिमुख होण्यासाठी कलाकारांचा सहभाग अधिक पाहिजे असंही वाटतं.

जाता-जाता - चंद्रमोहन कुलकर्णींची काही मुखपृष्ठं-चित्रे अगम्य वाटतात, ज्या मासिकांवर ती असतात त्यां मासिकांमधे एक पान रसग्रहणाचं असावं असं वाटतं.

टागोरांच्या चित्रकलेबद्दल सांगितल्याबद्दल आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी, अगदी!!! कलाकारांनी एखादी ष्टेप पुढे येणे अवश्य आहेच. प्रेक्षक काय, तसेही बिनडोकच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता 'होमर' म्हंटल्यावर १० पैकी ९ वेळा कोण 'सिम्प्सन' का? असंच विचारलं जातं, आता त्यांत त्यांची काय चुक?

तुम्ही होमर जाणता तर तुम्ही म्हणाल 'ये पिएसपिओ नही जानता'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ह्हा ह्हा, चपखल उधारण!!!!! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलाखतीत तीन वेळा दर्शक शब्द वाचला. पाहणारा आणि काढणारा ह्यांच्याशिवाय चित्र दाखविणाराही आणखी कोणी असतो की काय, असे वाटले. हा शब्द मुलाखतीतल्या उत्तरातून जसाच्या तसा लेखात आला असावा. असा ह्या ठिकाणी चुकीचा वाटणारा शब्द (मला तरी फार वाटतो ब्वॉ!) संपादकीय संस्कारांतून बदलला जावा (उदा. प्रेक्षक) अशी अपेक्षा असते, की मुलाखत देणाऱ्याची अभिव्यक्ती म्हणून तसाच ठेवणे अपेक्षित असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाखत फार छापील / पुस्तकी वाटू नये म्हणून काही गोष्टी बदलू नयेत, तशाच ठेवाव्यात असं माझं मत आहे. अर्थात, 'दर्शक' चुकीचा असता, तर तो बदलायला माझी काही हरकत नसती. पण माझ्या माहितीनुसार - 'दर्शक' आणि 'प्रेक्षक' या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो (मागे मी धातूंचे अर्थ पाहून नक्की करून घेतलं होतं. आता संस्कृत कोशाची लिंक हुडकून द्यायला वेळ नाही, स्वारी. नंतर मिळाल्यास देईन. किंवा इतर कुणी द्यावी. किंवा तुम्हीच शोधून पाहा. :प).

अवांतरः दूरदर्शननं मात्र या एकाच अर्थाच्या शब्दांना मुद्दामहून वेगळ्या संदर्भांत वापरून दोघांना दोन अर्थछटा देण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. समोर प्रत्यक्ष उपस्थित असणारे ते प्रेक्षक. प्रक्षेपण पाहणारे ते दर्शक. (अतिअवांतरः असंच रेडिओवाल्यांनी 'सीमा' नि 'सरहद्द'चं करायचा प्रयत्न केला. आंतरराज्यीय 'सीमा', देशाला मात्र 'सरहद्द'.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोश दोन्ही अर्थ दाखवतायत खरे. मी आजपर्यंत मराठीत बघणारा तो प्रेक्षक आणि दाखवणारा तो दर्शक अशाच अर्थाने हे शब्द वापरले आहेत. मार्गदर्शक, पथदर्शक, दिग्दर्शक ह्या शब्दांतून दाखवणारा असाच अर्थ प्रतीत होतो. पाहणाऱ्याला दर्शक असा शब्द हिंदीत वापरला जातो हे माहीत आहे. ह्याच प्रभावातून मराठीतही लोक प्रेक्षकाच्या ऐवजी दर्शक असा शब्द वापरत असावेत असे मला वाटते.
बॅटमॅन, तसेच आणखी कोणी ह्यावर काही सांगेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोशगत अर्थ येस, पण जण्रल वापरताना तरी जो पाहतो तो ऐवजी जो दाखवतो तो असाच अर्थ मराठीत प्रचलित आहे असे वाटते. जो पाहतो तो या अर्थी दर्शक वापरत असतील तर तो हिंदी प्रभाव आहे असेच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही मुलाखत फोनवर झाली. बहुतांश भाग मी लिहून काढला. आणि शुभा गोखलेंनी त्यातल्या दुरुस्त्या पुन्हा हाताने लिहून पाठवल्या.

त्यात दर्शक हा शब्द मी वापरला. प्रेक्षक म्हणताना त्यात थोडा आलिप्तपणा वाटला; उदा: पिटातले प्रेक्षक, किंवा जे फक्त पहातात आणि सोडून देतात, असं काही. आस्वादक असाही एक शब्द आठवला, पण तो अर्थ तिथे अभिप्रेत नव्हता. म्हणून दर्शक हा शब्द वापरला. (शुभाताईंनी तो बदलला नाही, हे त्याचं स्पष्टीकरण नाही.)

दिग्दर्शक, दूरदर्शक असे शब्दही ऐकलेले आहेत. पण एका शब्दाचा एकच अर्थ असावा असं मला वाटलं नाही. (मुलाखतीला शीर्षक देतानाही त्यांच्या बोलण्यातला हा भाग मला फार आवडला, म्हणून उचलला.) व्यक्तिशः, अमका शब्द अशा अर्थाचा जास्त वाटतो म्हणून तशा अर्थाने वापरू नये, असा विचार करण्याचं "पातिव्रत्य" किंवा "पावित्र्य" माझ्या कुवतीपलिकडचं आहे. ज्या मुद्रितशोधक/संपादकांच्या डोळे, कीबोर्डाखालून हे लेखन गेलं त्यांनी शब्द बदलला असता, (अजूनही) बदलला तरी मला फार राग-लोभ नाही.

या शब्दाचा अजून थोडा विचार करता, देवाचं दर्शन घेणारा माणूस भक्त असतो, तिथे बघणं या क्रियेचा संबंध फारसा रहातच नाही असंही लक्षात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ती तुच्छता आणि तो माज संगीताबाबत नव्हता.

तुच्छता हा शब्द अस्थानी वाटतो. कलाकार आणि सर्वसामान्य आस्वादक यांमध्ये दरी होती, आणि अजूनही आहे एवढंच म्हणता येईल. पण ती का आहे, आणि ती ओलांडण्याची जबाबदारी कोणावर आहे हा मूळ प्रश्न बदलत नाही. ती जबाबदारी शांतपणे 'लोकांना आमच्या कार्याची थोरवी कळत नाही याला कारण त्यांची आमच्याकडे बघण्याची तुच्छतेची भूमिका' असं म्हणून लोकांवर ढकलणं हे एलिटिस्ट आयसोलेशनचं सुंदर उदाहरण वाटतं. पण पुन्हा, ही सर्वच वैयक्तिक मतं असल्यामुळे काहीच ठाम म्हणता येत नाही. 'लोक चित्रकलेपासून फटकून का रहातात?' या विषयावर अभ्यास केला आहे का कोणी? मला माहीत नाही, कारण मी या क्षेत्रातला जाणकार नाही. पण शुभा गोखलेंनीही अंदाजच सांगितले आहेत.

कदाचित असंही असेल मूलतः संगीतकला ही चित्रकलेपेक्षा कलात्मक अनुभव देण्यासाठी अधिक प्रभावी माध्यम आहे. स्वरांनी जितका मनावर परिणाम होतो, तितका ब्रशस्ट्रोक्सनी होत नसेल. तसं असेल तर मग सामान्यांकडे तुच्छतेची भावना आहे, शिक्षणपद्धतीच सदोष आहे, किंवा प्रस्थापित कलाकारच समाजापासून दूर रहाण्यात धन्यता मानतात वगैरेपैकी काहीच म्हणण्याची गरज पडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ती का आहे, आणि ती ओलांडण्याची जबाबदारी कोणावर आहे हा मूळ प्रश्न बदलत नाही. ती जबाबदारी शांतपणे 'लोकांना आमच्या कार्याची थोरवी कळत नाही याला कारण त्यांची आमच्याकडे बघण्याची तुच्छतेची भूमिका' असं म्हणून लोकांवर ढकलणं हे एलिटिस्ट आयसोलेशनचं सुंदर उदाहरण वाटतं.

चपखल अन नेमके!!! फक्त ते उदाहरण सुंदर बिंदर कै वाटत नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'लोक चित्रकलेपासून फटकून का रहातात?'

असा प्रश्न बोलताना त्यांना वारंवार विचारला गेला. आणि त्यांनी एक ठोस असं उत्तर दिलं नाही. या घटकाची चूक आहे, असं नाही.
त्याचा मला लागलेला अर्थ असा की ही चूक कोणा एका घटकाची नाहीच. ही एक प्रक्रिया आहे, अनेक गोष्टी, निर्णय, समाज घटकांची त्यात थोडीथोडी 'चूक' आहे, प्रत्येकाची जबाबदारी १०-२०% असं काहीसं.

---

शुभा गोखले आणि मनीषा साठे या दोघींच्या मुलाखती वाचताना एक गंमत जाणवली. शुभा म्हणतात, चित्रं विकत घ्यायची जबरदस्ती नाही, फुकट दिसत असेल तरीही लोकं चित्रं बघायलाही तयार होत नाहीत. दुसरीकडे मनीषाताई डान्स शोज, त्यांची लोकप्रियता आणि एकूणच नृत्य हा कलाप्रकार किती 'लोकप्रिय' आहे, याबद्दल बोलतात. पण पुन्हा दोघींचं निरीक्षण (तक्रार हा शब्द जास्त तीव्रतेचा वाटला.) एकच आहे, व्यवस्थित अभ्यास करून, फक्त उत्तम आहे तेच दर्शक/प्रेक्षक/आस्वादकांसमोर आणू, असं म्हणणारे फारच कमी. किंवा चांगले नसणाऱ्या कलाकारांनाही मार्केट, प्रत्यक्ष पैशाचं किंवा अप्रत्यक्ष दर्शकांचं, आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> शुभा म्हणतात, चित्रं विकत घ्यायची जबरदस्ती नाही, फुकट दिसत असेल तरीही लोकं चित्रं बघायलाही तयार होत नाहीत. <<

माझाही अनुभव असाच आहे.

>> ती जबाबदारी शांतपणे 'लोकांना आमच्या कार्याची थोरवी कळत नाही याला कारण त्यांची आमच्याकडे बघण्याची तुच्छतेची भूमिका' असं म्हणून लोकांवर ढकलणं हे एलिटिस्ट आयसोलेशनचं सुंदर उदाहरण वाटतं. <<

पण असं नक्की कोण म्हणतंय? म्हणजे मी म्हणत असेन आणि तुम्हाला ते पटत नसेल, तर मला फाट्यावर मारा. (तसाही मी कलाकार नाहीच, त्यामुळे इथे 'आमचं कार्य' काहीच नाही.) पण निदान वर्षाकाठी काही प्रदर्शनं, काही चित्रं तर पाहा. त्यांनी कुणाचं काय घोडं मारलंय? वाचलेली पुस्तकं, ऐकलेलं संगीत आणि पाहिलेल्या सिनेमांबद्दल लोक लिहितात, तसं दृश्यकलाविष्कार पाहून काय वाटलं ते सांगा. तुच्छता नसेल, तर ती नाही हे कृतीतून दाखवून देणं खूप सोपं आहे. मला तसं दिसलं तर खूपच आनंद होईल.

>> ही सर्वच वैयक्तिक मतं असल्यामुळे काहीच ठाम म्हणता येत नाही. <<

>> शुभा गोखलेंनीही अंदाजच सांगितले आहेत. <<

सचिन कुंडलकरांच्या लेखातलं पुणेरी मध्यमवर्गाचं वर्णनसुद्धा हेच म्हणतंय. माझ्या परिसरातही असंच चित्र होतं. इथे मध्यमवर्गातलेच लोक वावरतात. त्यांचा अनुभव वेगळा असेल, तर मलासुद्धा तो ऐकायला आवडेल. किंबहुना, असाच विचार करून दिवाळी अंकाच्या टिपणात स्वानुभवाविषयी लिहायचं आवाहन केलं होतं. मात्र, आपण ज्या परिसरात लहानाचे मोठे झालो, आणि आपण ज्या परिसरात आपल्या मुलांना वाढवतो त्यातल्या कलाव्यवहाराविषयी इथल्या नियमित लेखकांपैकी कुणीच सांगितलं नाही. अजूनही मला त्याविषयी वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आज बरेच दिवस वाचायची शिल्लक ठवेलेली ही मुलाखत वाचली.
कित्येक वाक्यांवर नुसती सहमतीच नाही तर टाळ्या वाजवून अनुमोदन करायची तीव्र इच्छा झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!