Skip to main content

पडदा पडल्यानंतरचे कुरुक्षेत्र : प्रतिभा, संधी आणि ‘मी’

4 minutes

(रंगमंचावर गडद अंधार. दूरवरून युद्ध संपल्याचे, रडण्याचे आणि वाहणाऱ्या वाऱ्याचे क्षीण आवाज ऐकू येत आहेत. मंचाच्या मध्यभागी एक निळसर प्रकाशझोत पडतो. तिथे अर्जुन बसला आहे. त्याचे गांडीव धनुष्य त्याच्यापासून थोडे दूर, धुळीत पडले आहे. अर्जुन थकलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा उन्माद नाही, तर एक खोल ग्लानी आहे.)

अर्जुन : (स्वतःशीच, शून्यात पाहत)

धूळ खाली बसली… रणांगण शांत झालं… आणि मी जिंकलो. पण या विजयाचं ओझं पेलवत का नाहीये? आयुष्यभर ज्या गांडीवाने मला ‘सर्वश्रेष्ठ’ म्हणून ओळख दिली, आज त्याच्याकडे पाहताना हाताला कंप का सुटतोय?

(क्षणभर थांबून, स्वतःच्या उजव्या हाताकडे पाहतो.)

मी श्रेष्ठ धनुर्धर होतो, यात शंकाच नाही. पण माझ्या या श्रेष्ठत्वाला आकार देणाऱ्या परिस्थितीचा विचार मी कधी केला का? मला संधी मिळाली म्हणून मी श्रेष्ठ ठरलो, की मी श्रेष्ठ होतो म्हणून मला संधी मिळाली?

द्रोणाचार्यांचं गुरुकुल, राजपुत्र म्हणून मिळालेली प्रतिष्ठा, सरावासाठी उपलब्ध असलेली साधनं… मला शिकण्यासाठी अनुकूल वातावरण होतं. माझ्या क्षमतेला वाव मिळाला. पण… हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला आलं होतं का?

(रंगमंचाच्या डाव्या बाजूला एक पिवळा प्रकाशझोत पडतो. तिथे एकलव्य उभा आहे. त्याचा उजवा हात अंगठ्याविना आहे. चेहऱ्यावर कमालीची शांतता, पण डोळ्यांत एक निखारा आहे.)

एकलव्य : (अर्जुनाकडे न पाहता, प्रेक्षकांकडे पाहत)

तुझा प्रश्न रास्त आहे, अर्जुना. पण त्याचं उत्तर तुलाही माहीत आहे. तुझ्यासाठी गुरुकुलाची दारं उघडी होती; माझ्यासाठी ती माझ्या जन्माच्या ओळखीने बंद केली होती. तू गुरूंच्या छत्रछायेखाली शिकलास, मी मातीच्या मूर्तीला गुरू मानून जंगलात घाम गाळला. तुझ्या कौशल्याला राजमान्यता मिळाली आणि माझ्या कौशल्याची किंमत माझ्याच अंगठ्याच्या रूपाने वसूल केली गेली!

(थोडा पुढे येत.)

कधीकधी वाटतं, युद्धात पराभूत होणं सोपं असतं रे; पण स्पर्धेत उतरण्याआधीच निःशस्त्र केलं जाणं… हा पराभव प्रतिभेचा नसतो, तो व्यवस्थेच्या न्यायबुद्धीचा असतो.

(डावीकडचा प्रकाश मंद होतो. रंगमंचाच्या उजव्या बाजूला तांबूस प्रकाशझोत पडतो. तिथे कर्ण उभा आहे. कवच-कुंडले नसलेला, पण तेजस्वी. त्याच्या आवाजात वेदना आणि स्वाभिमान दोन्ही आहेत.)

कर्ण : (एक दीर्घ श्वास घेत)

एकलव्याचा तर अंगठा मागितला गेला; मला तर माझ्या कौशल्याची ओळख करून देण्याआधीच माझ्या कुळाचा दाखला मागितला गेला! रंगभूमीवर मी जेव्हा तुला आव्हान दिलं, तेव्हा माझ्या हातातील धनुष्यापेक्षा माझ्या वंशाची चौकशी अधिक महत्त्वाची ठरली.

(अर्जुनाकडे वळून.)

दुर्योधनाने मला अंगदेशाचं राज्य देऊन प्रतिष्ठा दिली खरी; पण ती प्रतिष्ठा उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली होती. तुला तुझं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मोकळं आकाश मिळालं, आणि मला मात्र आयुष्यभर स्वतःच्या पात्रतेचे पुरावे देत राहावं लागलं. जर आपल्या दोघांनाही एकाच गुरुकुलात समान संधी मिळाली असती, तर कदाचित आज कुरुक्षेत्राचा इतिहास वेगळा असता!

अर्जुन : (व्याकुळ होऊन उठतो.)

म्हणजे माझा विजय हा केवळ माझ्या पराक्रमाचा नव्हता… तर त्यामागे एक संपूर्ण व्यवस्था उभी होती, जी माझ्यासाठी अनुकूल होती आणि तुमच्यासाठी प्रतिकूल? प्रतिभेचा खरा पराभव ती नष्ट झाल्यावरच होतो असं नाही; ती अस्तित्वात असूनही तिला संधी नाकारली जाते, तेव्हाही होतो!

(तिघांवरचे प्रकाशझोत हळूहळू एकत्र येतात आणि अचानक विझतात. रंगमंचावर शांतता पसरते. जड मखमली पडदा हळूहळू खाली येतो.)

⸻

(घड्याळाचा गजर वाजतो. पहाटेचे पाच वाजले आहेत. मी दचकून जागा होतो. ते कुरुक्षेत्र, तो रंगमंच, ते संवाद… सगळं एका स्वप्नाचा भाग होतं. खोलीत शांतता आहे; पण डोक्यात विचारांचं वादळ अजूनही सुरू आहे.)

मला आठवतो तो नऊ वर्षांचा मुलगा. शेताच्या बांधावर वडिलांसोबत उभा असलेला. एका बाजूला वाहणारा नाला आणि दुसऱ्या बाजूला बांधलेला छोटासा बंधारा. त्या बंधाऱ्यात साचलेल्या पाण्याचा दाब पाहून त्याच्या मनात एक कल्पना आकार घेत होती. ‘तुषार सिंचन’ म्हणजे काय, हे त्याने कधी पाहिलंही नव्हतं; तरी त्या साचलेल्या पाण्याच्या दाबावर संपूर्ण शिवारात पाण्याचे तुषार उडवता येतील, असं त्याला वाटत होतं.

वर्गात हुशार असणारा, इतिहासाच्या पुस्तकात रमणारा तो मुलगा मोठ्या प्रकल्पांविषयी ऐकून भारावून जायचा. “संपूर्ण गावाचा कायापालट करणारे असे मोठे प्रकल्प कोण राबवू शकतं?” या प्रश्नाचं उत्तर ‘कलेक्टर’ मिळालं आणि तो मनोमन जिल्हाधिकारी होऊनही गेला!

पण स्वप्नांना नेहमीच गुरुकुल मिळतं असं नाही.

दहावीपर्यंतचा शैक्षणिक प्रवास पार पडला आणि तिथेच परिस्थितीच्या वाऱ्याने दिशा बदलली. घरच्या आर्थिक ओढाताणीपुढे आणि लवकरात लवकर कमावते होऊन कुटुंबाला आधार देण्याच्या अदृश्य दबावापुढे ते स्वप्न मागे पडलं. पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या वाटा दूर होत गेल्या. त्याऐवजी दहावीनंतर लवकर नोकरी मिळवून देणारा व्यावहारिक अभ्यासक्रम निवडून, कोवळ्या वयातच नोकरीच्या रणांगणावर उतरावं लागलं.

आज जेव्हा उच्च शिक्षण पूर्ण करून, तीन ते सहा वर्षे केवळ अभ्यासासाठी देत प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर पोहोचलेल्या समवयस्कांशी तुलना होते, तेव्हा स्वप्नातला तो रंगमंच पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहतो.

त्या यशस्वी तरुणांचे कष्ट नक्कीच मोठे आहेत. त्यांच्या परिश्रमांबद्दल तिळमात्र शंका नाही. पण माणसाचं मूल्यमापन करताना त्याच्या वाट्याला आलेल्या परिस्थितीकडे डोळेझाक कशी करता येईल? एकाला वर्षानुवर्षे अभ्यासासाठी वेळ देता येतो, तर दुसऱ्याला त्याच वयात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारावी लागते. अशा वेळी दोघांच्या यशाची तुलना केवळ त्यांच्या अंतिम पदावरून किंवा मिळवलेल्या गुणांवरून करता येईल का?

जेव्हा मी माझ्यासारख्या हजारो तरुणांच्या या व्यावहारिक चौकटीकडे पाहतो, तेव्हा आमच्या प्रत्येकाच्या आत कुठेतरी दडलेला ‘एकलव्य’ आणि ‘कर्ण’ जाणवतो. जणू घरच्या जबाबदारीने आमच्या स्वप्नांचा अंगठा मागून घेतला होता आणि स्पर्धेच्या मैदानात उतरण्याआधीच परिस्थितीने आमची पात्रता ठरवून टाकली होती.

मी खिडकीबाहेर पाहतो. पहाटेच्या धुक्यात शहर हळूहळू जागं होत आहे. नाटकाचा पडदा तर कधीच पडला होता; पण एक प्रश्न मात्र अजूनही रंगमंचावर तसाच उभा आहे—

प्रतिभा व्यक्तीमध्ये जन्म घेते; पण तिला बहरण्याची संधी समाज आणि परिस्थिती ठरवतात. मग जेव्हा एखादं स्वप्न अपुरं राहतं, तेव्हा तो पराभव नेमका कोणाचा असतो? त्या व्यक्तीचा… की तिला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची पुरेशी संधी न देणाऱ्या व्यवस्थेचा?

Node read time
4 minutes

'न'वी बाजू Thu, 26/11/2026 - 03:22

प्रतिभा व्यक्तीमध्ये जन्म घेते; पण तिला बहरण्याची संधी समाज आणि परिस्थिती ठरवतात. मग जेव्हा एखादं स्वप्न अपुरं राहतं, तेव्हा तो पराभव नेमका कोणाचा असतो? त्या व्यक्तीचा… की तिला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची पुरेशी संधी न देणाऱ्या व्यवस्थेचा?

Short answer: अर्थात त्या व्यक्तीचा! (म्हणजे, यात कोणाचा ‘पराभव’ वगैरे असलाच, तर. ‘व्यवस्थे’चा वगैरे नक्कीच नव्हे.)

(‘व्यवस्था’ न्यूट्रल असते. ‘व्यवस्थे’ला काहीही ‘स्टेक’ वगैरे नसतो. (म्हणजे, व्यक्ती जर यशस्वी झाली तर त्यातून होणारे फायदे ओरपायला ‘व्यवस्था’ सरसावणार नाही, असे नाही. परंतु, व्यक्तीच्या यशाअपयशाशी ‘व्यवस्थे’ला घेणेदेणे नसते; ‘व्यवस्था’ त्यात इन्व्हेस्टेड नसते.))

(बाकी, पाल्हाळिक/निबंधात्मक उत्तर मूड झाल्यास पुन्हा कधीतरी.)

'न'वी बाजू Thu, 26/11/2026 - 03:45

तुमच्या (एका वेळेच्या) मिलियन स्पर्म्सपैकी फार फार तर एखादा (तोही ‘संधी’ मिळाली तर, आणि त्यातूनही झालाच तर) ‘यशस्वी’ वगैरे होतो. बाकीचे नऊ लाख नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव हे काही कमी सक्षम असतात, अशातला भाग नसतो.

तर प्रश्न असा आहे, की त्या नऊ लाख नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णवांचे ‘अपयश’ हा तुमचा ‘पराभव’ मानावा काय?

जाता जाता: An unrealized potential cannot be counted as a loss. (And least of all that of the system.) पाहा विचार करून.

किशोर पाटील Thu, 26/11/2026 - 08:53

धन्यवाद, ‘न’वी बाजू. डार्विन आणि आकडेमोडीचा हिशेब भारीच!

पण शर्यतीआधी कुणाला रथ द्यायचा, कुणाला घोडा अन् कुणाचा अंगठा कापायचा, हे ठरवायचं आणि निकाल मात्र सगळ्यांच्या कर्तृत्वावर लावायचा?

Unrealized Potential मोजता येत नसेल, मान्य! पण संधी कुणाला मिळाली आणि कुणाला नाकारली, एवढा साधा हिशेब तर करता येतो की!

रथात बसून दुसऱ्याच्या धावण्याचा वेग मोजणं सोपं असतं; पण रथाची सोय आणि अंगठा कापल्याचा हिशेब विचारला की न्यूट्रॅलिटीचा मुखवटा गळतो!