Skip to main content

राशीभविष्य

ललित

बघ-रे गुरुजी, ज्योतिर्हॅलोजन, एमे (एंटायर ज्योतिष सायन्स) 

भविष्य तुमचंच आहे, वास्तवाकडे दुर्लक्ष करता आलं तर पाहा!

बघ-रे गुरुजी उवाच : ग्रहांची चाल आणि उजव्यांची ढाल

 

 

बघ-रे गुरुजी

मंडळी! यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी बघ-रे गुरुजी आपल्या सेवेस सादर झाले आहेत. गुरुजींच्या ज्योतिषविद्येची महती सांगावी तेवढी थोडीच ! ग्रहांची वक्री चाल, नक्षत्रांची युती, राहू-केतूंचे प्रताप, साडेसाती, पावणेआठी यांचा अभ्यास करता करता गुरुजींना एक शोध लागला : माणसाचं भविष्य ग्रहांप्रमाणेच राजकीय धारणांवरही अवलंबून असतं.


आता बघा ना : अर्थव्यवस्था घसरली तर नेहरूंची चूक असते, सुधारली तर वर्तमान नेतृत्वाच्या कुंडलीतील धनयोगाचा महिमा असतो. बेरोजगारी हा पूर्वजन्मीच्या पापांचा परिणाम असू शकतो, पण निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना निघाली की तो वर्तमान जन्मातील पुण्यप्रताप असतो. महागाईचं कारण जागतिक ग्रहदशा असते, तर शेअर बाजारातील तेजी हा राष्ट्राच्या भाग्योदयाचा संकेत असतो. ग्रहांची गणितं खोल असतात, पण मानवी धारणांचा तळच सापडत नाही.

 

बघ-रे गुरुजींनी यंदा बारा राशींचा सखोल अभ्यास केला आहे. त्यासाठी त्यांनी प्राचीन ज्योतिषग्रंथ, आधुनिक समाजमाध्यमं, निवडक वृत्तवाहिन्या, आणि भक्ताभक्तांच्या प्रतिक्रिया यांचा तुलनात्मक अभ्यास केला. जिथे आकडेवारी आडवी आली, तिथे तिला ग्रहांची चाट घातली. जिथे इतिहासाने प्रश्न विचारले, तिथे नक्षत्रांचा टेकू दिला.


या भविष्याचा उद्देश कोणत्याही राशीच्या जातकाला घाबरवण्याचा नाही. उलट, आपल्या विचारांतील ग्रहणं ओळखण्याचा आहे. कारण कुंडलीत मंगळ दोष असणं ही दैवाधीन गोष्ट आहे; पण गुरू चुकीचा निवडला तर चूक आपलीच असते. प्रत्येक असहमतीत शत्रू दिसणं हा वैचारिक दोष आहे. शनीची साडेसाती संपते कधीतरी, मात्र विवेकावर आलेली काजळी ब्रासो लावूनही जात नाही.

 

~ बघ-रे गुरुजी
 

मेष

राष्ट्राभिमानाचा अंगार

 

लग्नस्थानी मंगळ, दशमस्थानी सूर्य बलवान. तृतीयेश मंगळाची नवमस्थानावर सप्तम दृष्टी. राहूची दशमस्थानावर वक्रदृष्टी, बुध अस्तंगत. मंगळाच्या प्रभावामुळे प्रत्येक चर्चेचं युद्धात रूपांतर होईल; बुध अस्तंगत असल्याने प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याच्या देशभक्तीची परीक्षा घेतली जाईल.

 

या वर्षी तुमच्यात राष्ट्राभिमानाचं उधाण येईल. सकाळी उठल्याबरोबर देशासाठी काहीतरी करण्याची उत्कट इच्छा होईल. शेजाऱ्याच्या मुलाने इंग्रजी माध्यमात शिकण्याऐवजी मातृभाषेत शिकावं, हे आग्रहाने सांगा. तुमच्या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकू द्या – शेवटी राष्ट्राला हमझा अली मझारीही लागतात. देश संकटात आहे, हे तुम्हाला प्रत्येक बातमीतून कळेल. संकट नेमकं काय आहे, हे विचारणाऱ्याला तुम्ही देशद्रोही ठरवाल. शनीची साडेसाती सध्या तुमच्या वाणीवर आहे.

 

नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामापेक्षा तुमच्या निष्ठेची परीक्षा घेतील. मीटिंगमध्ये टार्गेटची आकडेवारी प्रतिकूल दिसल्यास प्राचीन भारतात विमानं होती, असा मुद्दा मांडा. मात्र विमानतळाच्या खर्चाचा प्रश्न आल्यास चर्चा दुसरीकडे वळवा.

 

शुभ रंग: भगवा,  शुभ अंक: ५६.

 

वृषभ

रोकडाराजयोग

 

द्वितीयेश शुक्र एकादशस्थानी उच्चीचा. धनस्थानात गुरूची पंचम दृष्टी. षष्ठेश शनीचा व्ययस्थानाशी संबंध. शुक्राची कृपा तुमच्यावर आहे. संपत्ती वाढेल, शेअर बाजारात तेजी येईल, आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या कृपेने तुमच्या गुंतवणुकीला नवे क्षितिज मिळेल. फक्त सरकारी अनुदान, स्वस्त गॅस, सवलतीचं धान्य, कर्जमाफी यांचा विषय निघाल्यास बाजारव्यवस्थेच्या पवित्र तत्त्वांची आठवण करून द्या. आदम स्मिथचे स्मरण करा. स्वतःच्या व्यवसायाला करसवलत मिळेल यासाठी खटपट करा. ती देशाच्या विकासासाठी केलेली अपरिहार्य गुंतवणूक असेल.

 

या वर्षी तुमच्या घरात मोलकरणीच्या पगारवाढीवरून मतभेद होतील. महागाईचा दर कमी झाल्याचं तुम्ही वर्तमानपत्रात वाचलेलं असेलच. त्यामुळे घरकाम करणाऱ्या मावशींना पगारवाढ मागण्याचं काही कारण नाही. त्यांनी मात्र दूध, भाजीपाला आणि गॅसच्या किमती सांगायला सुरुवात केल्यास त्यांना भारत विश्वगुरू असल्याचे सांगावे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा योग आहे. 

 

शुभ रंग : सोनेरी,  शुभ अंक : २४.

 

मिथुन

डब्बल ढोलकीयोग

 

लग्नेश बुध राहूच्या नक्षत्रात. तृतीयेश सूर्य आणि बुध यांची युती. सप्तमेश गुरू वक्री; चंद्रावर राहूची दृष्टी. बुधाच्या प्रभावामुळे वक्तृत्वकला बहरून येईल. एकाच विषयावर दोन परस्परविरोधी मतं मांडण्याची विलक्षण क्षमता विकसित होईल. सकाळी तुम्ही फेसबुकवर गूळ पाडत मुक्त अभिव्यक्तीचा पुरस्कार कराल. दुपारी जंतरमंतर आंदोलकांच्या अभिव्यक्तीवर कायद्याने मर्यादा आणण्याची मागणी कराल. दोन्ही वेळा तुमची भूमिका तत्त्वनिष्ठच असेल.

 

समाजमाध्यमांवर तुमचा प्रभाव वाढेल. एखाद्या ऐतिहासिक घटनेचा संदर्भ न समजल्यास काळजी करू नका. अभ्यासासाठी तीन मिनिटांचा व्हिडिओ पुरेसा ठरेल. त्यातला वक्ता जितक्या आत्मविश्वासाने गॅस देईल, तितकं त्याचं संशोधन सखोल असेल हे जाणा. आपल्या विचारांना पुष्टी देणारी माहिती मिळाली की बुध प्रसन्न होतो.

 

या वर्षी एखादा डाव्या विचारांचा मित्र तुमच्याशी अर्थव्यवस्थेवर चर्चा करेल. त्याला खासगीकरणाचे फायदे सांगताना तुम्ही सरकारी अनुदानित शाळेतून घेतलेल्या शिक्षणाचा उल्लेख टाळा.

 

शुभ रंग : केशरी,  शुभ अंक : २.

 

कर्क

संस्कृतिचंद्रयोग

 

चतुर्थेश चंद्र नवमस्थानी. नवमेश गुरूची चतुर्थस्थानावर दृष्टी.  राहूचा चतुर्थस्थानी गोचर. केतू द्वादशस्थानी. चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे भावना उचंबळून येतील. इतिहासातील घोडचुकांच्या आठवणी तुम्हाला अस्वस्थ करतील. विशेषतः हजार वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल तुमची स्मरणशक्ती विलक्षण ताजी राहील. मात्र गेल्या आठवड्यात दिल्लीत घडलेल्या घटनांवर विचारल्यास स्मरणशक्तीवर राहूची सावली पडू शकते.

 

या वर्षी तुम्ही संस्कृतीरक्षणाच्या मोहिमेत सहभागी व्हाल. पाठ उघडी ठेवावी की नाही, भाषा कशी असावी, आणि अस्सल भारतीय कोणाला म्हणावं, याबद्दल तुमची मतं ठाम असतील. मात्र मुलाने परदेशात शिक्षण घ्यावं, सून नोकरी करणारी असावी, आणि मुलीने लग्नाआधी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, अशी आधुनिक अपेक्षा तुम्ही बाळगाल. संस्कृतीची व्याख्या घराबाहेर वेगळी आणि घरात वेगळी असणं, हेच तुमचं या वर्षी वैशिष्ट्य राहील.

 

शुभ रंग : मोरपंखी,  शुभ अंक : ७०.

 

सिंह

नेतृत्वाचा सूर्ययोग

 

लग्नस्थानी सूर्य दिग्बली. दशमेश मंगळाची लग्नस्थानावर दृष्टी. एकादशेश बुध सूर्याच्या निकट येऊन अस्तंगत. सूर्य तुमचा स्वामी असल्याने नेतृत्वगुण या वर्षी शिखरावर असतील. तुम्ही सभेत बोलायला उभे राहिलात की लोकांनी ऐकावं, असाच ग्रहांचा संकेत आहे. त्यांनी प्रश्न विचारले तर मात्र तुमची फाफलू शकते. कारण प्रश्न विचारणं आणि नेतृत्व करणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

 

राजकीय क्षेत्रात तुमची भरभराट होईल. नेत्याच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करताना तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील. या लवचीकतेमुळे तुमच्या विचारांची कंबर कधीच दुखणार नाही. कार्यालयात तुम्ही लोकशाही पद्धतीने काम होईल, असं जाहीर कराल. त्यानंतर सर्वांनी तुमच्याशी सहमत व्हावं, यासाठी बैठक बोलवाल. विरोधी मत असणाऱ्या लोकांचा मत देण्याचा अधिकार रद्द कराल किंवा त्यांना सभात्याग करायला भाग पाडू शकाल. बैठकीच्या इतिवृत्तात  एकमत झाल्याचा पुरावा असेल.

 

शुभ रंग : पांढरा,  शुभ अंक: १.

 

कन्या

सोयीस्कर पुरावायोग 

 

लग्नेश बुध षष्ठस्थानी राहूयुक्त. पंचमेश शनीचा बुधाशी षडाष्टक योग. नवमेश शुक्र मानभंगाच्या प्रतीक्षेत. या वर्षी तुमचं विश्लेषणकौशल्य उत्तम राहील. विशेषतः आपल्या मताशी सहमत असलेलेच तज्ज्ञ शोधण्यात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. हवामानबदलाबद्दल बोलताना तुम्ही एखाद्या उद्योगपतीचं मत उद्धृत कराल, अर्थव्यवस्थेवर बोलताना चित्रपट अभिनेत्याचा व्हिडिओ दाखवाल, आणि वैद्यकीय प्रश्नावर आध्यात्मिक गुरूचा सल्ला घ्याल. बुधाची कृपा अशीच असते.

 

विज्ञान आणि परंपरा यांचा समन्वय करण्याचा योग आहे. एखादी गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली नसेल, तर तिचं महत्त्व आध्यात्मिक असल्याचं घोषित करा. सिद्ध झाली असेल, तर आपल्या पूर्वजांना हे आधीच माहीत होतं, असं सांगा. दोन्ही परिस्थितींमध्ये विजय तुमचाच आहे, लक्षात ठेवा. 

 

नोकरीत एखादा सहकारी आकडेवारीसह तुमचं मत खोडून काढेल. त्याच्या कौटुंबिक अडचणींबाबत कार्यालयात कुजबुज मोहीम उघडा. काहीच पुरावा न मिळाल्यास त्याला फुरोगामी म्हणा.

 

शुभ रंग : करडा,  शुभ अंक : १०१.

 

तूळ

समतोलाचा शुक्रयोग

 

लग्नेश शुक्र दशमस्थानी. सप्तमेश मंगळाची चंद्रावर अष्टम दृष्टी. षष्ठेश गुरू आणि द्वादशेश बुध यांचा संबंध. शुक्राच्या प्रभावामुळे न्याय, समतोल, आणि सौंदर्य यांच्याविषयी तुमची आस्था वाढेल. प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे, असं तुम्ही म्हणाल. मात्र एका बाजूला प्रचंड सत्ता आणि दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिक असेल, तर दोन्ही बाजू सारख्याच आहेत, असं मानण्याचा मोह टाळा. 

 

या वर्षी तुम्हाला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची संधी मिळेल. तुमच्यावर टीका होईपर्यंत तुम्ही या स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक राहाल. त्यानंतर टीका करणाऱ्याचा हेतू, त्याला मिळणारं फॉरेन फंडिंग, त्याची जात, धर्म वगैरे तपासा. कुठेतरी काहीतरी सापडेलच. मुद्द्याला उत्तर देण्यापेक्षा हे सोपं असतं.

 

कौटुंबिक जीवनात मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान संधी देण्याचा निर्णय घ्याल. पण मुलाने घरकाम केलं आणि मुलीने गाडी दुरुस्त केली, तर थोडं अस्वस्थ वाटू शकतं. 

 

शुभ रंग : किरमिजी,  शुभ अंक : ५०.

 

वृश्चिक

कारस्थानाचा राहूयोग

 

अष्टमस्थानी राहू-मंगळ युती. अष्टमेश बुधाची द्वादशस्थानावर दृष्टी. चंद्र केतूच्या नक्षत्रात. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या मनात संशयाची ठिणगी पडेल. देशातील प्रत्येक समस्येमागे एकेक जागतिक कारस्थान आहे, असा निष्कर्ष तुम्ही सहज काढाल. बेरोजगारी, महागाई, प्रदूषण, पेपरफुटी या सगळ्यामागे कुणीतरी अदृश्य हात असणारच. 

 

तुमच्या समाजमाध्यम खात्यावर गोपनीय माहितीचा वर्षाव होईल. एका संदेशात देशाचं उज्ज्वल भवितव्य उलगडेल, दुसऱ्यात शेजारच्या देशाचा कट उघड होईल. “बिकाऊ मीडिया तुम्हाला हे दाखवणार नाही” असं लिहिलेलं असेल, तर डोळे झाकून विश्वास ठेवा.

 

कौटुंबिक जीवनात पत्नीने विचारलेल्या, “आज स्वयंपाक तू कर” या विधानात तुम्हाला पाश्चात्त्य संस्कृतीचा नंगानाच जाणवेल. काळजी करू नका. भाकरी करता आलीच(च्च) पाहिजे. 

 

शुभ रंग : काळा,  शुभ अंक : ३३.

 

धनु 

परंपरेचा गुरूयोग

 

नवमेश गुरू स्वगृही किंवा उच्च राशीत. द्वादशेश मंगळाची नवमस्थानावर दृष्टी. केतू नवमस्थानी. बुध वक्री. गुरूच्या कृपेने धर्म, परंपरा, आणि संस्कृतीविषयी तुमची आवड वाढेल. तुम्ही प्राचीन ग्रंथांचा चटाचटा संदर्भ द्याल, ऐतिहासिक परंपरांचा पटापटा गौरव कराल, आणि जीवनातील प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्या संस्कृतीत असल्याचं झटाझटा सांगाल. प्रत्यक्षात तो ग्रंथ कुठे मिळतो, त्यात नेमकं काय लिहिलं आहे, आणि त्याचा आजच्या प्रश्नाशी काय संबंध आहे, हे मुद्दे गौण आहेत.

 

या वर्षी परदेशप्रवासाचा योग आहे. पाश्चात्त्य देशांतील स्वच्छ रस्ते, सार्वजनिक वाहतूक, शिस्तबद्ध व्यवस्था आणि उत्तम नागरी सुविधा पाहून तुम्ही प्रभावित व्हाल. मात्र हे रस्ते प्राचीन भारतातून लुटलेल्या संपत्तीतून बनवले आहेत जे जाणवून तुम्हाला वाईट वाटेल. 

 

नोकरदार वर्ग ऑफिसचं इंटरनेट वापरून प्राचीन ज्ञानाचा अमर्याद साठा डाऊनलोड करेल. पण आधुनिक सोयी वापरण्याची वेळ आली की मात्र परदेशी तंत्रज्ञानाच्या मोबाईलचा आधार घेईल.

 

शुभ रंग : निळा, शुभ अंक : १०००

 

मकर

कष्ट-भांडवलाचा शनीयोग

 

दशमस्थानी शनी स्वगृही. द्वितीयेश गुरूचा एकादशस्थानाशी संबंध. षष्ठेश बुध व्ययस्थानी. शनीच्या प्रभावामुळे कष्ट, शिस्त आणि जबाबदारी यांना महत्त्व प्राप्त होईल. तुम्ही स्वतःच्या यशाचं श्रेय मेहनतीला द्याल. त्यात गैर काहीच नाही. मात्र दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळाली नाही, ती गरीब घरात जन्मली किंवा तिला दर्जेदार शिक्षण मिळालं नाही, तर तिने आणखी मेहनत करायला हवी होती, असा निष्कर्ष काढाल.

 

या वर्षी तुम्ही स्वावलंबनाचा पुरस्कार कराल. सरकारने नागरिकांना मदत करणं म्हणजे लोकांना आळशी बनवणं, असं तुम्हाला वाटेल. टॅक्स भरताना अपार दुःख होण्याचा संभव आहे. कार्यालयात कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून अधिक काम करून घेण्याची वेळ येईल. त्यांना सांगा की कठोर परिश्रमानेच प्रगती होते. स्वतःच्या कामाच्या वेळा मात्र लवचीक ठेवा. 

 

निवृत्तीच्या नियोजनात तुम्ही काटकसरीचा सल्ला द्याल. पेन्शन, आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षेचा विषय निघाल्यास मात्र आपल्या दीर्घ सेवेनंतरच्या हक्कांची आठवण होईल.

 

शुभ रंग : राखाडी.  शुभ अंक : ९ ते ५.

 

कुंभ

स्वातंत्र्यराहू योग

 

लग्नस्थानी शनीची दृष्टी. तृतीयस्थानी राहू; बुध एकादशस्थानी. पंचमेश बुधाचा राहूशी नवपंचम संबंध. या वर्षी तुमच्या विचारांत क्रांतिकारक बदल घडतील. तुम्ही जुन्या व्यवस्थेला प्रश्न विचाराल, प्रस्थापित विचारांना आव्हान द्याल आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार कराल. अर्थात, तुमच्या गटातील सर्वांना हे स्वातंत्र्य लागू असेल. विरोधी विचारांच्या व्यक्तींनी तेच केल्यास तुम्हाला अनुशासनपर्वाची आठवण होईल.

 

तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांमुळे तुमचा प्रभाव वाढेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तुम्ही लेख पाडाल, चित्रं हाणाल. यंत्राने तयार केलेली माहिती तुमच्या विचारांशी जुळली, तर ती आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल असेल. न जुळल्यास त्यात पक्षपात आहे, असा ग्रहांचा संकेत असेल.

 

सामाजिक प्रश्नांवर तुमची भूमिका प्रगतिशील असेल. मात्र जात, वर्ग, लिंग, किंवा धर्माच्या आधारे होणाऱ्या भेदभावाचा प्रश्न तुमच्या स्वतःच्या गटापर्यंत आला, तर त्याची गुंतागुंत अचानक वाढेल. अन्यायाविरोधात उभं राहणं अवघड असतं, आणि अन्यायातून आपल्याला मिळणाऱ्या फायद्यांकडे त्रयस्थपणे पाहणं त्याहून कठीण.

 

शुभ रंग : हिरवट.  शुभ अंक : २१.

 

मीन

करुणेचा गुरूयोग

 

लग्नेश गुरू द्वादशस्थानी. षष्ठेश सूर्याची नवमस्थानावर दृष्टी. सप्तमेश बुध राहूच्या नक्षत्रात. गुरू आणि नेपच्यूनच्या प्रभावामुळे तुमच्यात करुणा, आध्यात्मिकता, आणि परोपकाराची भावना वाढेल. गरीब, वंचित, आणि दुर्बल घटकांविषयी तुम्ही भरभरून बोलाल. त्यांच्या कल्याणासाठी योजना असाव्यात, असंही तुम्हाला वाटेल. मात्र त्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात कोणाला मिळतो, याचा हिशेब मागितला तर तुम्ही त्याला राजकारण म्हणाल.

 

या वर्षी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आहे. दानधर्म करा, अन्नदान करा, आणि सामाजिक उपक्रमांना हातभार लावा. पण गरिबांना मदत करताना त्यांच्या गरिबीची कारणं समजून घेण्याचाही प्रयत्न करा. प्रत्येक समस्येवर दान हा कायमस्वरूपी उपाय नसतो. कधी न्याय्य वेतन, दर्जेदार शिक्षण, किंवा सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिक उपयोगी ठरते.

 

कौटुंबिक जीवनात तुमची सहनशीलता वाढेल. घरातील स्त्रीने स्वतःच्या हक्कांबद्दल बोलायला सुरुवात केली, तर तिच्या त्यागाचं कौतुक करण्याऐवजी तिच्या मागण्याही ऐका. करुणा म्हणजे दुसऱ्याला गप्प बसवण्याची गोड पद्धत नव्हे.

 

शुभ रंग : जांभळा,  शुभ अंक : १२.