Skip to main content

जर्मन वर्मन

3 minutes

अकरावी बारावी झाली तसा रुढार्थाने ज्याला अभ्यास म्हणतात त्या गोष्टींशी संबंध सुटलाच. पानेच पाने भरवून वह्यांच्या खरेदीला निमित्त करायचे पण थांबले. बारावीपर्यंतच्या पेपरांच्या वेळी "सर पुरवणी" (काही हुच्चभ्रु गाबडे 'सब्लिमेंट' असे म्हणायचे पण त्या शब्दाचा योग्य उच्चार वा अर्थ हुडकायचेही कष्ट आम्ही कधी घेतले नाहीत.) असे पुकारा करत पेपर संपेपर्यंत कागदाच्या ढिगांना दोऱ्यात ओवायचे. आम्हाला फार आदर असल्या स्कॉलरांचा. लांबच ठेवायचो आदरापोटी त्यांना... असो.

त्यानंतर लिहायची सक्तमजुरी संपली. म्हण्जे अस्मादिकांनी चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला ना..एखादा थिअरीचा पेपर असायचा पण तोही तीट लावण्यापुरता. बाकी आपला आवडता धंदा चित्रे काढणे. पाच सहा वर्षे सलग असे लिहिण्याचा रेकॉर्ड एखाद्या परिच्छेदाच्या वर नाही. आयुष्यातली घोकंपट्टी नावाचा प्रकारही संपलेला म्हणून रुढार्थाने ज्याला अभ्यास म्हणतात त्या गोष्टीशी संबध तुटला. हे तुटलेपण चालू राहिले महाविद्यालयीन जीवनापर्यंत. नंतर बाहेर पडलो तर काय कॉम्प्युटरे होती, सॉफ्टवेरं होती मग कशाला लागतेत रेघोळी कागद आणि ढिगभर पेनं. कुठतरी सह्या ठोकायला, फॉर्म भरायला तेवढा पेन लागायचा. वर्षे गेली तशी सलग काही कागदावर लिहायची सवयच होती ती विसरल्यात जमा झाली. श्रीलिपी वगैरे गोष्टींनी मराठीचा संपर्क होता पण व्यवसायापुरता. नंतर युनिकोड अन मोबाईल आयुष्यात आले तेव्हाही काहिहि लिहायचे म्हणले की नोटपॅड आपसूक ओपन व्हायचे. मराठी साईटसनी तेवढा विरंगुळा मिळवून दिला पण कागद पेन हे द्वैत सुटले ते सुटलेच. आयुष्यात शेवटी कधीतर मृत्यु्पत्रावर सही ठोकेन तेच आपले शेवटचे "करवियले" होणार ही खात्री होती.

पण नाही.

पेन, वह्यापुस्तके, कागदेफाइली, मास्तर मास्तरणी, वर्ग, अभ्यास अन खर्डेघाशी पुन्हा आयुष्यात येणार होती अन आलीच.

झाले असे की....

जर्मनीत आले की जर्मन शिकणे हाच पर्याय. तोही ऑनलाइन वगैरे बघितले, ड्युओलिंगोसारखे ॲप इन्स्टल करुन बघितले, युट्युबावर कित्येक व्हिडिओ पालथे घातले पण अंहं... नाही म्हणजे नाही. झेपेचना... स्पष्ट भाषेत सगळे वरनंच चाललेले. नुसते उगी फाटर म्हणजे फादर आणि मुटर म्हणजे आई, वासर म्हण्जे वॉटर आणि मिल्श म्हणजे मिल्क इतके सिंपल नाही जर्मन. थोडीफार व्होकॅब्युलरी वाढवून काहीही फरक पडेना मेंदूत. समोरचा जर्मन कायतरी बडबडत असायचा आणि आमची मजल डांकं बिट्टं च्या पुढे नाहीच. साधं फोनवर कॉल न लागल्यावर ती टेलिकोमवाली बाई काय म्हणते ते कळेना. परत सरकार म्हणतंय कायबी करा पण चार वर्षात इंटिग्रेशन तेवढं पूर्ण करा.

मग म्हणलं ओक्के. सरकार म्हणालं, कोर्स नीट पूर्ण केला तर निम्मी फीही परत देऊ. म्हणलं, चला... एवढीही मग्रुरी कशाला! अगदी परप्रांतीय रिक्षावाल्यांचा माज दाखवण्यात अर्थ नाही. त्यांना शिव्या द्याव्यात असे वाटत असले तर इथल्या राज ठाकरेचं ऐकायलाच पायजे.

सुरुवात सरकारमान्य भाषाकेंद्र हुडकण्यापासून झाली.

घरापासून जवळ चालत जाणेबल, संध्याकाळ तिथंच खपली तर बरं, एका दिवसात चार चार तास व्हावेत जेणेकरुन लवकर संपावी सजा असा विचार करुन अल्पमोली, बहुगुणी, अर्धी पेंडी खाऊन बावीस लिटर दूध आणि १५ किलो गोमय देणारी गोमाता हुडकण्यात आली. गोमातेचे नाव इनलिंग्वा.

मोक्याचे ठिकाण हो एकदम. स्टेशनाच्या अलिकडेच, तळ्यासमोर, पोस्टाच्या वर इतका सिंपल पत्ता.

पहिल्याच दिवशी रजिस्ट्रेशन वगैरे करताना फार काही येणाऱ्या संकटांची चाहूल लागली नाही, फार काही लिहावेही लागले नाही. चार सह्या ठोकल्या आणि चार महिन्यानी ह्या ह्या दिवशी येवा असा प्रेमळ निरोप घेऊन आम्ही परतलो. थंडीत एकावर एक दोन जॅकेटं चढवून प्रवेश घेतलेला पण प्रत्यक्षात शाळा सुरू होईपर्यंत जर्मनीने थंडीची चादर आवरती घ्यायला सुरुवात केली होती. साध्या कपड्यावर एक जास्तीचे अस्तर घेऊन पोहोचलो तेंव्हा आठ नंबरच्या खोलीत जावा असा स्पष्ट इंग्लिशमधे (शेवटची इंग्लिश हं, त्यानंतर ती बाई कधी त्या भाषेत बोलली नाही.) मिळाला. सोबत गृहमंत्रालयाने आदिदासची सॅक, दोन पेनं,दोन वह्या, पाण्याची बाटली, एक्स्ट्रा रुमाल आणि इनलिंग्वाने दिलेली दोन जाडजूड पुस्तके असा संरजाम मोठ्या प्रेमाने दिलेला होता, सेफ्टीपिनने एक पतंगी रुमाल छातीवर टोचणे फक्त बाकी होते.

शाळा सुरेख, सुबक. वर्ग तितकेच सुबक आणी आधुनिक. मोट्ठी स्क्रीन आणि मॅकबुक घेऊन बसलेली रुपेरी केसाची फ्राऊ अन समोर सगळी वेगवेगळ्या वयोगटातली मल्टीनॅशनल जनता बघून आपली शशी गोडबोले झालेली आहे आणि आता आपला 'जर्मन वर्मन' चा पिक्चर सुरु होणार आहे ह्याची खात्री पटली.

......

क्रमश:

Node read time
3 minutes

'न'वी बाजू Mon, 13/07/2026 - 00:57

परत सरकार म्हणतंय कायबी करा पण चार वर्षात इंटिग्रेशन तेवढं पूर्ण करा.

इंटिग्रेशन?

समजले नाही.


असो. लेख(माला) रोचक.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 13/07/2026 - 03:02

In reply to by 'न'वी बाजू

अहो, ते समाजात सामावणं ह्या अर्थानं आहे इंटिग्रेशन. तुम्ही शब्दांचं डिफरन्सिएशन करू नका!

पहिला भाग आवडला. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

'न'वी बाजू Mon, 13/07/2026 - 03:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

…चार वर्षांत इंटिग्रेशनची अपेक्षा, तीही सरकारकडून, म्हटल्यावर, ते दीर्घकाळाकरिता/कायमचे तेथे गेले आहेत, किंवा कसे, याबद्दल कुतूहल वाटले, इतकेच.

असो. शुभेच्छा. (लिखाणाकरिताही, आणि तेथील वास्तव्या/वाटचालीकरिताही.)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 13/07/2026 - 04:11

In reply to by 'न'वी बाजू

आणि जर्मनीत कुठे? 

(माझ्या उगाच भोचक चवकश्या! तिथल्या घरांमध्ये बरेचदा स्वयंपाकघर नावाचा ठोकळा येतो, आणि भांडी घासायच्या सिंकमध्ये फक्त नळ असतो आणि तोटीसुद्धा नसते, असं जर्मन लोकांकडूनही ऐकून आहे. असल्या गमतीशीर गोष्टी तुला बघायला मिळाल्या असतीलच. लिही सवडीनं.)