Skip to main content

ए.आय -२०२६

मागे अबापटांनी करोना डायरीज, असा विषय मांडला होता . २०२०/२१/२२ त जग करोनाच्या विळख्यात सापडलं होतं तेव्हा एक नव्-अस्तित्व आपल्या आजूबाजूला पसरत होतं. आता मागे वळून बघितलं तर कित्येक नोंदी ह्या अशक्य, असंभव वाटतात.

तद्वतच, ए.आय गेल्या काही वर्षांत झपाट्याने आपला एक अवयव बनत चालला आहे.
उ.दा. -
- मी गेल्या अख्ख्या वर्षात एकही ओळ कोड लिहिला नाही. सगळं काम ए.आय अवजारं वापरून, त्यांच्याशी संवादून, बोलून, धमकावून करून घेतलंय.
- वैयक्तिक आयुष्यातही "गूगल सर्च"ची जागा आता "गूगल ए.आय" मोड किंवा तत्सम चॅटबॉट ह्यानी घेतली आहे.

पण मजा म्हणजे २०२४ साली मी इतका ए.आय वापरत नव्हतो, आणि २०२५ साली मी हीच अवजारं वापरून जे काही करीत होतो, आज २०२६ साली त्याहून फार पुढे गेलोय.

तर ह्या अशा नोंदी तुमच्याकडे असतील तर जरूर लिहा.
जग फार झपाट्याने बदलणार आहे - आणि मागे वळून बघताना स्वतःच्याच नोंदी कदाचित अविश्वसनीय भासल्या, तर त्यात काही नवल नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/04/2026 - 06:36

अस्वला, उत्तम विषय आहे.

मी गेल्या महिन्यापर्यंत एआय वापरून कोड लिहायला तयार नव्हते. पण गेले ३-४ आठवडे पटापट काम करायचं म्हणून एआय वापरलं; शिवाय नक्की काय करायचं हे माहीत होतं त्यामुळे एआय बरळायला लागलं तरीही ते सहज थांबवता येत होतं. त्यामुळे काम किती पटापट झालं, आणि तेही मी एकटीच कोड लिहीत असूनही, याची जाणीव झाली.

अजूनही मी माहीत नसलेल्या गोष्टी एआयच्या हवाली करणार नाही. विशेषतः फार पॉप्युलर नसणाऱ्या विषयांमध्ये. उदाहरणार्थ, उपग्रहातून मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीला घेतलेल्या प्रतिमांचं काय करायचं - हे काम लवकरच सुरू करणार आहे. हे मला फार माहीत नाही आणि माझा एआयवर फार विश्वासही नाही. याबद्दल आणखी दोन वर्षांनी काय म्हणेन कोण जाणे!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/04/2026 - 06:40

गेलं जवळजवळ वर्षभर माझ्याकडे ऑफिससाठी मायक्रोसॉफ्ट कोपायलट आहे - कोडवालं निराळं. "ती चार महिन्यांपूर्वी अमका-फलाणा मजकूर असलेली स्लाईड बघितली होती, ती शोधून दे" अशा छापाच्या गप्पा रोजच चालतात.

स्लाईड सुंदर बनवण्याचं काम मी कोपायलटकडूनच करून घेते. ते सौंदर्य थोडं पॉर्नसारखं असतं - बघितल्यावर समजतं, पण नक्की काय हवं ते सांगता येत नाही.

ऑफिसच्या महत्त्वाच्या मिटींगांमध्ये मी नोट काढणं सोडून दिलं आहे; ते कामही आता कोपायलट करतं. जिथे कोपायलट वापरता येत नाही, तिथे फार चिडचिड होते बिनडोक कामं करायला पर्याय असूनही वापरता येत नाही म्हणून.