शाकाहारी कोंबडी आणि भागिरथी

समोरच्या घरातल्या भाव्यांच्या मांजरीने भारी उच्छाद मांडला आहे. रोज खिडकीतून येऊन दुधाच्या पातेल्याला तोंड लावून जाते. तिला सांगून पहिले. ती ढिम्म लक्ष देत नाही. रोज मांसमच्छी खाणारी ती. तमोगुण वाढले आहेत झालं. हा भाव्या दिवसभर तिला घेऊन फिरतो 'माझी भागू, माझी भागाबाई' करत. पण त्या भागिरथी मांजरीवर संस्कार मात्र नाहीत. काय कामाचं ते प्रेम!

भाव्याला फोन केला ७ वेळा. वॉट्स अप वर मेसेजही टाकले. पण ना फोनला उत्तर. ना मेसेजला. तसं खरंतर माझा भागिरथीवर राग नाही. पण मुळापासून सुरुवात करावी लागते.
भागिरथी घुशी उंदीर खाणार
मग तिच्यातले तमोगुण अजूनच वाढणार.
आमची ही हमखास फ्रिज मध्ये दूध ठेवायला विसरते. "अहो, जरा दूध आत टाकता का?' ही मला रोज सांगणार
मी दुपारी सुडोकू सोडवत बसलेला असतो. मग ते सोडून मी दूध आत टाकायला जाणार.
मोडली ना माझी तंद्री!
सुडोकूने माझा मेंदू तल्लख राहतो. त्यात व्यत्यय येणार
मी रोज सोसायटीमध्ये संस्कारवर्ग घेतो. आणि बरोबरीने गणितही शिकवतो. ते काम खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. माझ्याकडे असलेलं ज्ञान मला पुढील पिढीला द्यायलाच हवे. नसते काही जणांकडे बुद्धी. पण आपल्याकडे आहे ना रामकृपेने! समाजासाठी तिचा वापर झालाच पाहिजे. जगाच्या उन्नतीसाठी खारीचा वाटा तो आपला. तेवढं तर करायलाच हवं. खरंतर प्रत्येक नागरिकाने ठरवलं तरच पुढची पिढी उत्तमरित्या घडेल.
या नरेंद्राला नाही शक्य १५ तास काम करणं. ठीक आहे . पण रोजचे १.५ तास देऊन तर ही पिढी घडवेन मी . मातीच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो. जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. आपोआप नाही तयार होत शिल्पं!
या सगळ्या समस्येचं मूळ भागिरथी, तिचा मांसाहार आणि त्यामुळे तिचे तमोगुण हाच आहे, हे लक्षात आल्यावर समस्येचं समूळ उच्चाटन करायचं मी ठरवलं. आणि एकदा ठरवलं या नरेंद्राने.. की जग इकडचं तिकडे झालं तरी तो ते करून दाखवतोच!

भागिरथी मांजरीला शाकाहारी बनवण्याबद्दल भाव्याशी बोलायला त्याला फोन केला. मग मेसेज पण केले. तो साला वॉट्सअप वर ती निळी खूण येऊ नाही देत. मग आम्ही काय वाट बघत बसायची? तेवढंच काम आहे का मला? हिला म्हटलं, तर ही बया म्हणते, 'स्पेस द्यावी लागते हो दुसऱ्याला.' च्यामारी! मी कुठे गेलो त्या भाव्याच्या स्पेस मध्ये? माझे गमबूट राहिलेले भाव्याच्या आणि आमच्या घराच्या मधल्या पॅसेजमध्ये तेही घेऊन आलो घरी. अजून कसली स्पेस देऊ आता ?

'भागिरथी, फिश फिश' असं मी तिला हाक मारायला सुरुवात केली. ती मांजर महाआगाऊ आहे. मुळीच लक्ष देत नाही. संस्कार नाहीत झाले. त्यापेक्षा कुत्रा बरा. मी नाही पाळणार असे प्राणी घरी.
तरी कधी वाटतं एखादी गाय असावी घरी.. गोमातेमुळे घराला शोभा येईलअगदी! मला लहानपणी इच्छा होती एक गाय पाळायची. कदाचित घरात जागा नव्हती म्हणून परवानगी नाही मिळाली. पण मग मी शेवटी एका बाटलीत ३ गांडूळे पाळली होती. अमर, अकबर आणि अँथनी नावाची. निसर्गाचा सहवास महत्वाचा!. चराचरात त्या भगवंताचा वास आहे . आपण फक्त नतमस्तक व्हायचं. पुढे माझे अमर अकबर अँथनी तिघेही वारले. त्यांची आपापसात खूप भांडणे व्हायची असं निरीक्षण होतं माझं .

भाव्याला गाठला जिन्यात.म्हटलं, 'अरे तिचा मांसाहार बंद कर बाबा. तमोगुण वाढतात.' तो म्हणाला, 'असं करूया आपण, तूच दे भागीला रोज खायला.'
अशी विश्वासाने जवाबदारी टाकली की माझी छाती एकदम ५६ इंच फुलून येते.

भागिरथीचे खाण्याचे वेळापत्रक आणि मेनू मी तयार केला. मांजरांसाठी दीक्षित, दिवेकर यांनी अजून काही उपक्रम केलेला दिसत नाही. मी कधीच स्वयंपाक घरात पाऊल नाही टाकत पण भागीसाठी मी तेही केलं. ' माझं नाव लग्नानंतर बदलून भागिरथी ठेवायला माझी ना नव्हती' ही म्हणाली. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

भागिरथीला गाजर, टोमॅटोची कोशिंबीर खायला घालायचा प्रयत्न केला.
डॉक्टरच्या डोक्यावर परत पैसे आपटावे लागले. हातावर, नाकावर बँडेज आले ते वेगळेच.

कोंबडीला जर अगदी तिच्या जन्मापासून शाकाहारी बनवले असेल किंवा फक्त दाणे खायला दिले असतील ( किडेमुंग्या नाही) आणि ती कोंबडी मांजरीला खायला दिली तर मांजरीच्या वागण्यात, आचरणात बदल दिसेल का?

नरेंद्र बरवे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोज खिडकीतून येऊन दुधाच्या पातेल्याला तोंड लावून जाते.

रोज मांसमच्छी खाणारी ती.

आणि तेच तोंड नंतर दुधाला लावते? काही शिवाशीव, सोवळेओवळे वगैरेंचा विधिनिषेध आहे की नाही?

मी दुपारी सुडोकू सोडवत बसलेला असतो.

सुडोकू हे हिंदू परंपरेत नक्की कोठे बसते म्हणे?

पण मग मी शेवटी एका बाटलीत ३ गांडूळे पाळली होती. अमर, अकबर आणि अँथनी नावाची.

अमर एक वेळ ठीक आहे, परंतु, (पाळीव गांडुळांना का होईना, परंतु) अकबर आणि अँथनी अशी नावे एका कट्टर हिंदू परंपरावाद्याने द्यावीत?

घरचेच भेदी निघाले, म्हटल्यावर…

भागिरथीला गाजर, टोमॅटोची कोशिंबीर खायला घालायचा प्रयत्न केला.

टोमॅटो म्लेंच्छ. हिंदुपरंपरेत बसू नयेत.

डॉक्टरच्या डोक्यावर परत पैसे आपटावे लागले. हातावर, नाकावर बँडेज आले ते वेगळेच.

भागीरथीला प्रणाम! (बाकी काही नाही, तरी आपल्या (मार्जार)परंपरेला चिकटून राहिल्याबद्दल, आणि ती परंपरा बदलण्याच्या प्रयत्नांचा निकराने प्रतिकार केल्याबद्दल.)

(दुसरी गोष्ट: ‘भागीरथी’मधला ‘गी’ दीर्घ. संस्कृतात, नि मराठीतसुद्धा. एका हिंदुपरंपराभिमान्याने मूलभूत संस्कृत शुद्धलेखनाबाबत एवढा हलगर्जीपणा दर्शवावा, याहून मोठा दैवदुर्विलास आणखी कोणता?)

कोंबडीला जर अगदी तिच्या जन्मापासून शाकाहारी बनवले असेल किंवा फक्त दाणे खायला दिले असतील ( किडेमुंग्या नाही) आणि ती कोंबडी मांजरीला खायला दिली तर मांजरीच्या वागण्यात, आचरणात बदल दिसेल का?

फार कशाला, प्रस्तुत कोंबडी तुम्ही (पक्षी: श्री. नरेंद्र बरवे यांनी) जरी खाल्लीत, तरी तुमच्या (पक्षी: श्री. बरवे यांच्या; तसे पाहायला गेले, तर कोंबडी हादेखील एक पक्षीच आहे, एतदर्थ हे स्पष्टीकरण.) शाकाहारास त्याने यत्किंचितही बाधा येणार नाही.

गोमाता गवत खाते; आम्ही (अधूनमधून, परवडेल तशी) गोमाता(सुद्धा) खातो. म्हणजे, ट्रान्झिटिविटीच्या न्यायाने, आम्हीदेखील (अप्रत्यक्षरीत्या का होईना, परंतु) गवतच खातो. गोमाता शाकाहारी, आम्हीही शाकाहारी!

(तसे पाहायला गेले, तर सकल अन्नसाखळ्यांच्या मुळाशी जाऊन पाहिल्यास, साखळीच्या मुळाजवळची पहिली सजीव प्रजाती ही वनस्पतिवर्गात मोडावी. म्हणजे, ट्रान्झिटिविटीच्या न्यायाने, सकलचराचरसृष्टी शाकाहारी! दुर्दैवाने, फार थोड्या जणांना हे कळते किंवा पटते. चालायचेच.)

(आम्ही राहातो त्या देशात गोमांस (त्यातही चांगल्या प्रतीचे गोमांस) हे सर्वात महाग मांसांपैकी असते, म्हणून परवडण्याचा प्रश्न. भारतवर्षाच्या अत्यंत विपरीत अशी ही परिस्थिती आहे. पण लक्षात कोण घेतो? आमच्या देशात जर मोदीजी असते, तर या समस्येबद्दल त्यांनी नक्की काहीतरी केले असते, याबद्दल मला खात्री आहे. परंतु, आमच्या देशाच्या नेत्यांना दूरदृष्टी नाही, जनहिताची चाड नाही, हे आमचे दुर्दैव! दुसरे काय?)

(आमच्या गोमांसभक्षणाबद्दल म्हणाल, तर आपल्या पुरातन आर्यपरंपरेतील यज्ञसंस्कृतीत, यज्ञात गोमातेचा (किंवा वृषभपित्याचा) बळी देण्याची प्रथा होती, इतकेच नव्हे, तर बळीतील गोमांसाच्या सर्वोत्कृष्ट तुकड्यांवर (यज्ञाचे पौरोहित्य करणाऱ्या) ब्राह्मणाचा अग्रहक्क असे, असे वाचलेले आहे. आता, पुढे ही प्रथा (आपल्या इतर अनेक परंपरांप्रमाणे) विलयास गेली, हे हिंदभूचे दुर्दैव! मात्र, एक कट्टर आर्यपरंपराभिमानी या नात्याने आम्ही या विलयास गेलेल्या परंपरेचे जर पुनरुज्जीवन केले (इतकेच नव्हे, तर कर्मधर्मसंयोगाने एका ब्राह्मणकुळात आम्हांस जन्म प्राप्त झालेला असल्याकारणाने, गोमांसाच्या सर्वोत्कृष्ट तुकड्यांवर आपला जन्मसिद्ध अधिकार जर सांगितला), तर आम्ही काय वाईट केले? (काहीही वाईट केले नाही!))

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिवो जिवस्य जिवनम -- असे काहीतरी आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे .. विसरलात का?

आता त्या मांजरीने, तुम्ही तिच्यावर (शाकाहाराची) जबरदस्ती करत होता म्हणून "पेटा" कडे तक्रार केली म्हणजे मग?
तातडीने मेनका गांधीना क्षमायाचनेचे पत्र लिहा बघू ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आहार वरून धर्माला टार्गेट.ते पण विज्ञान युगात.
चुकीच्या आहाराचे समर्थन धर्म आडून.
पण एका पण व्यक्ती ल आहार नक्की काय असावा.
माकड वटवाघूळ,कुत्री,मांजरी, डुक्कर,आणि बाकी जनावरे आहारात असण्याचे फायदे तोटे अगदी पेशी लेव्हल ल जावून ठरवणे आताच्या युगात अपेक्षित आहे
पण लोकांना भलत्याच गोष्टीत खूप इंटरेस्ट आहे.
माणसाची खरेच किव वाटते.

निसर्गाने बुध्दी प्रदान केली पण ती बुध्दी वापरण्याची कुवत मात्र माणसाला दिली नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0