मॅडमजीके सेक्सी कारनामे

#ललित #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

मॅडमजी के सेक्सी कारनामे

- बं भा कटकोळ

"...आणि म्हणूनच हे सगळे आकडे बघितल्यावर सरळसरळ सिद्ध होतं की हा सिनेमा साफ झोपलाय. निर्माता, वितरक- सगळ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय.आपली बॉयकॉट मोहीम पूर्ण यशस्वी झालीय." सेवक समोरच्या कागदावरच्या आकडेमोडीकडं बघत विजयी मुद्रेनं उद्गारले.

सेवकांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणारे अधिकारी समाधानानं म्हणाले, "चांगलं झालं.आणि त्या दुसऱ्या सिनेमाचं काय?"

"तो तर सिनेमाच फालतू होता आणि तो फ्लॉप होणार हे निश्चित होतं. त्यामुळं आम्ही त्याच्या पटकथा-लेखिकेच्या पहिल्या नवऱ्यानं आपल्या धर्माची टिंगल करणारा एक विनोद सात वर्षांपूर्वी सोशल मिडियावर शेअर केला होता आणि तिनं त्याला 'लाफिंग इमोजीची रिऍक्शन' दिली होती असं शोधून काढलं. त्यावरून त्या सिनेमाविरुद्धसुद्धा बॉयकॉट मोहिम राबवली आणि सिनेमा पडल्याचं श्रेय आपल्याकडं घेतलं!"

"छान! आपल्या धर्माविरुद्ध, देशाविरुद्ध विधानं करणाऱ्याला अशीच शिक्षा मिळायला हवी. मग तो कोणीही का असेना. असे अपमान आपण कधी विसरायचे नाहीत, आणि आपल्या जनतेला कधी विसरू द्यायचे नाहीत. सध्या वरून, आपल्याला हेच आगीत तेल ओतत रहायचं काम देण्यात आलंय. कुठलाही कलाकार आपल्या धर्माविरुद्ध काहीही बोलला तर त्याच्या कलाकृतीवर बहिष्कार घालायचा. पूर्वी बोलला असेल तर ते उकरून काढायचं. सिनेमा असेल तर फ्लॉप करायचा, नाटक असेल तर पाडायचं, पुस्तक असेल तर प्रकाशित होऊ द्यायचं नाही… सगळ्यांना दहशत बसली पाहिजे. आपल्या धर्माला नावं ठेवायची कुणाची हिम्मतच होता कामा नये. यासाठी हवी ती सगळी मदत आपल्याला वरून मिळेल." अधिकारी बोलायचे थांबले. सेवकांनी लाचारीनं मान डोलावली.

"या बॉयकॉट मोहिमेवर चांगलं काम केलंत तुम्ही. मी वर कळवेन. तुम्हांला योग्य ते रेकग्निशन मिळेलच. बॉयकॉट मोहिमेचं पुढचं लक्ष्य ठरलं की कळवा मला," अधिकारी म्हणाले तशी सेवकांनी मान डोलावली.

"या आता. आम्हांला एका बैठकीला जायचंय - येत्या महिन्यात येणारे आपले सण कुठल्याही मर्यादा न बाळगता, ध्वनिप्रदूषण, हवाप्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, लोकांचं स्वास्थ्य यांसारख्या क्षुल्लक गोष्टींचा विधिनिषेध न पाळता कसे दणक्यात साजरे करता येतील याची चर्चा शहरातल्या नामवंत व्यक्तींबरोबर करायचीय. " अधिकारी म्हणाले, पण सेवक चुळबुळत तसेच बसून राहिले.

"काय झालं? अजून काही सांगायचंय का?" अधिकारी किंचित चढ्या आवाजात म्हणाले. कुठलीही बेशिस्त, टंगळमंगळ त्यांच्या कार्यप्रणालीत बसत नव्हती. सेवक थोडेसे हिरमुसले झाले. त्यांची अधिकाऱ्यांवर संपूर्ण निष्ठा होती. ते सांगतील ते कुठलाही प्रतिप्रश्न न विचारता खरं मानण्याइतकी भक्ती होती. अधिकारी ज्या पक्षाचा, समूहाचा भाग होते त्याचं अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी अशा सेवकांची त्यांना नितांत गरज होती. हे अधिकाऱ्यांनासुद्धा चांगलंच माहित होतं.

"जे सांगायचंय ते न संकोचता बोला, माझ्याकडं थोडा वेळ आहे," अधिकाऱ्यांनी आवाजात मृदूपणा आणला. सेवकांची अस्वस्थता थोडी कमी झाली.

"आपल्याला बॉयकॉट करायला हवा अशी अजून एक गोष्ट आहे असं मला वाटतं," ते म्हणाले.

"कोणती गोष्ट?"

"अं… इंटरनेटवरची एक कॉमिक स्ट्रिप आहे," सेवक थोडेसे अडखळले.

"कॉमिक स्ट्रिप? म्हणजे लहान मुलांची?"

"नाही. उलट ती फक्त प्रौढांसाठी आहे. 'मॅडमजी के सेक्सी कारनामे' नावाची," सेवक अधिकाऱ्यांची नजर चुकवत पटकन बोलून गेले.

"काय अश्लील बोलताय हे तुम्ही?" अधिकारी एकदम शहारले.

"माफ करा. आपल्यासारख्या सगळ्या मोहांच्या पलीकडं गेलेल्या महान व्यक्तीसमोर असं बोलणं योग्य नाही. पण हेच नाव आहे त्या स्ट्रिपचं. मॅडमजी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्त्रीच्या अतिशय सवंग आणि उत्तान लैंगिक, व्यभिचारी चाळ्यांच्या तपशीलवार गोष्टी आणि बरोबर तितकीच तपशीलवार चित्रं असं याचं स्वरूप आहे."

"अरेरे, हे ऐकून खेद होतो आम्हांला. नक्कीच या मॅडमजीचं पात्र खुळचट लैंगिक व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं, तथाकथित लिबरल स्वभावाचं असणार. आपल्या आधीच्या प्रशासनानं कडक सेन्सॉरशिप आणली असती तर अशा स्ट्रिप्स इंटरनेटवर येऊच शकल्या नसत्या. पण आपण निव्वळ इतक्या कारणावरून बॉयकॉट कसा करणार?"

"नाही, बॉयकॉटसाठी अजून एक कारण आहे. या कॉमिक्समधली मॅडमजी एक विवाहित स्त्री आहे. तिचं खरं नाव जरी त्यांनी सांगितलं नसलं तरी ती ज्या वातावरणात रहाते त्यावरून ती आपल्याच धर्माची असल्याचं दिसतं. ती तिच्या पतीसमोर, सासू-सासऱ्यांसमोर पतिव्रता असल्याचं, विवाहित स्त्रीची सगळी कर्तव्यं पार पाडण्याचं नाटक करते. पण त्यांच्या मागं परपुरुषांबरोबर आणि परस्त्रियांबरोबर हवा तसा लैंगिक स्वैराचार करते. आणि हे सगळं अश्लील वर्तन करताना आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी - विशेषतः विवाहित स्त्रियांनी - कपाळावर, गळ्यात, केसांत, अंगावर जी आभूषणं घालणं अपेक्षित आहे ती सगळी मुद्दाम अंगावर ठेवते. तसं केल्यानं तिला अजूनच कामोत्तेजना मिळते असं दाखवलंय…" सेवक बोलायचे थांबले.

अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर सात्विक संताप दाटला होता. "शी, शी, किती गलिच्छ आहे हे. एकीकडं आपण स्त्रीच्या विकासासाठी, तिच्या अधिकारांसाठी झटतो. तिला सन्मान मिळावा म्हणून प्रयत्न करतो. आणि दुसरीकडं स्त्रीचं हे असलं रूप दाखवलं जातं? तेही आपल्या धर्मातल्या?" वास्तविक अधिकाऱ्यांना स्त्रियांबद्दल फारसा आदर होता किंवा फिकीर होती अशातला भाग नव्हता. धर्मोन्नतीला आयुष्य वहायचंय म्हणून त्यांनी खुद्द स्वतःच्या बायकोला कित्येक वर्षांपूर्वी वाऱ्यावर सोडलं होतं आणि तिची नंतर कधी साधी चौकशीही केली नव्हती. ते ज्या प्रशासनासाठी काम करत होते त्या प्रशासनानं अलीकडंच दुसऱ्या धर्माच्या स्त्रीवर अमानुष बलात्कार करणाऱ्या त्यांच्या धर्माच्या दोन आरोपींची शिक्षा विनाकारण माफ करून त्यांना सोडून दिलं होतं. तरीही हा विषय आला की अधिकारी 'स्त्रीशक्ती' वगैरे शब्द वापरून पाचेक मिनिटं शब्दांची पायडल्स मारून घेत. तेच त्यांनी यावेळीही केलं. सेवक लीनतेनं ऐकत राहिले.

अधिकाऱ्यांचं बोलून झालं तसे सेवक मान डोलावून म्हणाले," अगदी योग्य बोललात तुम्ही. शिवाय आपल्या धर्माची स्त्री पतिव्रता असल्याचं नाटक करते आणि सगळी विवाहचिन्हं अंगावर लेवून व्यभिचार करते हा आपल्या धर्माचा अपमान नाही का झाला? म्हणून या कॉमिक्सवर आपण बॉयकॉट केलाच पाहिजे असं मला वाटतं. "

अधिकारी आपल्याच विचारांत गढून सेवकांकडं टक लावून बघत होते.

"पण तुम्हांला या कॉमिक्सबद्दल इतकी माहिती कशी?" त्यांनी विचारलं तसा सेवकांचा चेहरा चोरी करताना पकडला गेल्यासारखा पडला. ते चाचरत म्हणाले, "मी काही वर्षांपूर्वी सबस्क्रिप्शन घेतलं होतं, डिलिव्हरीच्या वेळी बायको माहेरी गेली होती तेव्हा असलं काहीतरी वाचायचा मोह झाला होता. आता मी नाही वाचत…"

"सबस्क्रिप्शन? म्हणजे लोक पैसे देऊन हे असलं गलिच्छ वाचतात?" अधिकारी चकित झाले.

"हो तर. चक्क लाखो सबस्क्रायबर्स असतील या स्ट्रिपचे. लोकांना मॅडमजीचे अश्लील कारनामे मिटक्या मारत वाचायला आणि बघायला आवडतात. फार प्रसिद्ध आहे ती!" आपल्यावरचा फोकस गेल्यामुळं हायसं वाटून सेवकांनी घाईघाईनं माहिती पुरवली.

अधिकारी म्हणाले," तुम्ही तेव्हा सबस्क्रिप्शन घेतलंत ही तुमची चूकच झाली. पण आता या स्ट्रिपवर बॉयकॉट मोहीम चालवून त्याचं प्रायश्चित्त करायची तुम्हांला संधी चालून आली आहे. आपली नेहमीची टीम घ्या आणि लागा कामाला. आठवड्याभरात ही स्ट्रिप बंद पडलीच पाहिजे. मला प्रगती कळवत चला."

अधिकाऱ्यांनी नवीन जबाबदारी अंगावर टाकल्यानं खूष होऊन सेवक निघून गेले.

***

बॉयकॉट कॅम्पेन जोरात सुरु झाला खरा, पण त्याला अपेक्षित प्रतिसाद काही मिळेना. नाही, म्हणजे सेवकांनी आपल्या टीमला हाताशी धरून #boycott_madamji, #no_horny_no_porny वगैरे हॅशटॅग ट्रेंड करायचा प्रयत्न केला. कॉमिक स्ट्रिपमध्ये मॅडमजीचं पात्र किती खालच्या दर्जाच्या लैंगिक हरकती करतं आणि त्यामुळं आपल्या धर्माचा कसा अपमान होतो याचं रसभरीत वर्णन करणारे संदेश व्हायरल केले, सोबत स्ट्रिपमधले थोडे स्क्रीनशॉट्स टाकले, आपल्या धर्मात पुरातन काळापासून कसा स्त्रियांचा सन्मान केला जातो हे वर्णन करून सांगणाऱ्या पोस्टीसुद्धा पाडून घेतल्या, काही येडचाप लिबरलांनी अपेक्षेप्रमाणं 'व्यक्तीच्या वैयक्तिक कामजीवनात धर्म आणणं कसं पुराणमतवादी आहे' यावर पोस्टी लिहिल्या, त्यावर सेवकांची टीम जाऊन त्या लिबरलांना ट्रोल वगैरे करून आली… हे सगळं यथासांग झालं, पण त्यामुळं कॉमिक स्ट्रिपवर कुणी बॉयकॉट करेना. कारण मुळात 'आपण पैसे भरून मॅडमजीचं सबस्क्रिप्शन घेतलंय' हेच कुणी उघडपणे मान्य करत नव्हतं. सबस्क्रिप्शन घेणाऱ्या बहुसंख्य लोकांनी ते घरच्यांपासून लपवून ठेवलं होतं. स्ट्रिप चालवणारी कंपनीसुद्धा संशय येऊ नये म्हणून सबस्क्रिप्शनचा चार्ज क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर 'मॅडमजी के सेक्सी कारनामे' या नावानं न लावता कुठल्यातरी इ-मर्कंडाइझच्या निरुपद्रवी नावानं लावायची. मग आता उघडपणे सबस्क्रिप्शन घेतलंय हे कबूल करून बॉयकॉट कोण आणि कसा करणार? त्यामुळं फोडणी तडतडतेय पण त्यात शिजवायला भाजीच नाही अशी या बॉयकॉट मोहिमेची अवस्था झाली. उलट या बॉयकॉट प्रकरणामुळं कॉमिक्सची फुकटची जाहिरात होऊन सबस्क्रायबर्सची संख्या वाढल्याची एक बातमी आली. एका स्वतःला हॉलीवूडचा भाचा समजणाऱ्या डायरेक्टरनं तर मॅडमजी हे मध्यवर्ती पात्र घेऊन तो एक ॲडल्ट मूव्ही बनवणार असल्याचं जाहीर केलं. अजून एका नेहमी वादग्रस्त कारणांसाठी चर्चेत असणाऱ्या नटीनं ती त्यातली मॅडमजींची भूमिका करणार असल्याचं सांगून स्वतःचे सेक्सी फोटोज टाकले. त्या नटीनं आणि डायरेक्टरनं एकत्र येऊन 'हा मूव्ही रिलीज होईल तेव्हा त्याला जरूर बॉयकॉट करा हं' असं खिजवणारे मेसेजेस पोस्ट केले. त्या नटीच्या फोटोंना बॉयकॉटवाल्या पोस्ट्सपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि सेवक चडफडले.

आपली बॉयकॉट मोहीम कशी चाललीये याकडं अधिकारी लक्ष ठेवून असणार आहेत याची त्यांना कल्पना होती. उद्या त्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक होती. पण सेवकांना अधिकाऱ्यांसमोर आपलं अपयश कबूल करायचं नव्हतं. ते त्यांच्या पक्षाच्या कार्यप्रणालीत बसतच नव्हतं. पराजय झाला तरी आपण कसे जिंकलो, पीछेहाट होत असली तरी आपण कसे जगात आघाडीवर आहोत असं आक्रस्ताळेपणानं ओरडत रहायचं अशीच शिकवण त्यांना मिळाली होती. त्यामुळं आपली बॉयकॉट मोहीम अयशस्वी झालीच नाही असंच अधिकाऱ्यांना सांगणं त्यांना भाग होतं. त्यासाठीचा एक शेवटचा उपाय त्यांनी आपल्या अस्तनीत राखून ठेवला होता. आता त्यांनी तो अंमलात आणायचा ठरवला आणि आपल्या सेलफोनवरून एका नंबरला कॉल केला.

*****

"कशी चाललीये तुमची बॉयकॉट मोहीम? " सेवक समोर स्थानापन्न झाल्यावर अधिकाऱ्यांनी मुद्द्यालाच हात घातला.

"अं… आम्ही बरेच प्रयत्न केले, पण नक्की किती लोकांनी बॉयकॉट केला हे समजायला मार्ग नाही. कारण त्या वेबसाईटनं असली खालच्या दर्जाची करमणूक डिस्क्रिटपणे करवून घ्यायचा पर्याय लोकांना दिलाय. त्यामुळं आपण सबस्क्रायबर आहोत हे कुणाला उघडपणे कबूल करायची गरजच उरली नाहीये."

"मग तुम्ही काय केलंत?"

"मी काल सरळ त्या स्ट्रिपच्या मालकालाच फोन केला. त्याला म्हटलं तुझ्या सबस्क्रायबर्सची यादी दे. म्हणजे एकेकाला गाठून सबस्क्रिप्शन कॅन्सल करायसाठी धमकावता येईल."

"असं? मग काय म्हणाले मालक?" अधिकाऱ्यांनी सेवकांकडं रोखून बघत विचारलं.

"तसं करता येणार नाही म्हणाले. सबस्क्रायबर्सची नावं अशी थर्ड पार्टीला देणं कायद्याच्या विरुद्ध आहे, कोर्टकेस होऊ शकेल. मीसुद्धा फार पुश केलं नाही कारण ते मालक आपल्या पक्षाला भरघोस निधी देत असतात. "

"कायदा, कायदा, कायदा! माझी तर अशी प्रार्थना आहे की लवकरच देशभरातले सगळे न्यायाधीश आणि सगळी न्यायालयं आपल्या अंमलाखाली येवोत, म्हणजे मग कायदा आपण हवा तसा वाकवू शकू. ते जाऊ दे, मग काय ठरवलंय तुम्ही? ही मोहीम आपण हरलो असं दिसून चालणार नाही!"

"नाही, हरायचं नाहीच. मला एक वेगळा मार्ग सुचलाय. तुम्हीच मला पूर्वी एक टेक्निक शिकवलं होतंत- व्हॉटअबाउटरी नावाचं. म्हणजे कुणी आपली चूक दाखवून दिली, गाडं आपल्यावर उलटायला लागलं तरीही आपण सरळ उत्तर न देता समोरच्यावर उलटे आरोप करायचे किंवा त्याला उलटे प्रश्न विचारत रहायचं. साधारण तसंच काहीसं आपल्याला इथं करता येईल."

"मला समजलं नाही."

"म्हणजे आत्ता या कॉमिक्समध्ये फक्त आपल्या धर्माच्या स्त्रीचं पात्र दाखवलंय. तिच्या वागण्यामुळं फक्त आपल्या धर्माचा अपमान होतो. मी मालकांना म्हटलं - यात तुम्ही बाकी धर्माच्या स्त्रियांची पात्रं का ऍड करत नाही? तीसुद्धा अशीच मॅडमजीसारखी व्यभिचारी आहेत; त्यांच्या धर्मात विवाहित, पतिव्रता स्त्रीकडून जसं वर्तन अपेक्षित आहे त्याची त्या स्त्रिया कुचेष्टा, पायमल्ली करत आहेत असं दाखवता येईल. मग तो त्या धर्मांचासुद्धा अपमान होईल. ते जास्त योग्य होणार नाही का? फक्त आम्हीच का म्हणून अपमान सहन करायचा?"

"म्हणजे कॉमिक्समध्ये मॅडमजीसारख्या छचोर, कामांध स्त्रियांची एक गँगच असणार?"

"हो, पण वेगवेगळ्या धर्मांच्या. म्हणजे सगळ्या धर्मांची सारखीच हेटाळणी होईल."

"हं! इंटरेस्टिंग आयडिया आहे. पण मालक तयार झाले का?"

"हो. म्हणजे मी त्यांना तयार केलं. त्यांनाही ते पटलं. उलट ते म्हणाले की अशानं सबस्क्रायबर्सची संख्या अजून वाढेल, आणि एकूण उत्पन्न वाढल्यामुळं आपल्याला अजून जास्त निधी द्यायचंही त्यांनी कबूल केलंय. "

अधिकारी थोडा विचार करून म्हणाले, "हा उपाय चांगला आहे. आपल्या बॉयकॉटच्या प्रेशरला बळी पडून त्यांनी हा असा निर्णय घेतला असं आपण सगळीकडं सांगू शकतो म्हणजे आपल्याला क्रेडिट मिळेल. शिवाय त्यांचंही उत्पन्न वाढेल आणि आपलीही आवक वाढेल."

"मीही अगदी असाच विचार केला! विन- विन सिच्युएशन!" सेवक म्हणाले.

"हं, हा बॉयकॉटसुद्धा तुम्ही चांगला हाताळलात," अधिकाऱ्यांनी सेवकांच्या पाठीवर हलकेच थाप दिली," आम्ही श्रेष्ठीना सांगू. तुम्हांला लवकरच योग्य तो फायदा होईल."

सेवकांनी लीनतेनं मान झुकवली. त्यांनी मान उचलली तेव्हा अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं.

"आपले विरोधक नेहमी आपल्यावर सेक्युलर नसल्याचा आरोप करतात. त्यांना म्हणावं बघा आम्हीही सेक्युलर आहोत. निव्वळ आमच्यामुळं या कॉमिक स्ट्रिपमध्ये सगळ्या धर्मांच्या स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळालं!" अधिकारी म्हणाले तसे सेवकही अधिकाऱ्यांसमोर त्यांना जितकं मोकळेपणानं हसणं इष्ट होतं तितक्या मर्यादा पाळून हसले.

सेवक निघून गेले आणि अधिकारी आपल्या बेडरूममध्ये आले. या खोलीत अन्य कुणालाही प्रवेश नव्हता. त्यांनी दार लावून घेतलं आणि ते पलंगावर शांतपणे बसले. मागचे काही दिवस फारच धकाधकीचे गेले होते. आपला धर्म कसा धोक्यात आहे याची खरीखोटी उदाहरणं शोधून काढायची, त्यावरून समाजात तेढ वाढवायची, द्वेष पसरवायचा, सतत 'आपण विरुद्ध ते' हा संघर्ष धगधगत ठेवायचा ही त्यांची आवडती कामं असली तरी त्याचाही त्यांना काहीवेळा शीण यायचाच. तसंच आत्ता झालं होतं. आज त्यांना थोड्या विरंगुळ्याची गरज होती. त्यांनी आपला वैयक्तिक लॅपटॉप काढला. त्यावरून त्यांनी 'मॅडमजीके सेक्सी कारनामे' च्या वेबसाईटवर लॉगिन केलं. हेच त्यांच्या विरंगुळ्याचं आवडतं साधन होतं. वेबसाईटच्या अनेक डिस्क्रिट सबस्क्रायबर्सपैकी तेही एक होते. जेव्हा सेवकांनी हे बॉयकॉट प्रकरण काढलं होतं तेव्हा आपण सबस्क्रायबर आहोत हे उघडकीला आलं तर किंवा त्याहीपेक्षा आपल्याला जबरदस्ती अनसबस्क्राइब करावं लागलं तर काय करायचं म्हणून ते आधी काळजीत पडले होते. पण सुदैवानं त्यांना त्यातलं काही करावं लागलं नव्हतं त्यामुळं आता ते निर्धास्त झाले होते.

वेबसाईटच्या मुख्य पेजवरचं, आपण विवाहित असल्याच्या सगळ्या खुणा अंगावर बाळगून विवस्त्रावस्थेत पहुडलेल्या आणि शरीरातून आणि नजरेतून बघणाऱ्यांना जबरदस्त आव्हान देणाऱ्या मॅडमजींचं चित्र बघून ते लगेचच उद्दिपित झाले. आता लवकरच मॅडमजींसारखी अजून स्त्रीपात्रं या कॉमिक्समध्ये येतील या जाणीवेनं ते खूष झाले. कमरेचं वस्त्र सैल करून ते पलंगावर आडवे पहुडले आणि मॅडमजींच्या सेक्सी कारनाम्यांचा मनापासून आस्वाद घेण्यात रममाण होऊन गेले.

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

गोष्ट आवडली.

( पूर्ण काल्पनिक असती तर आणखी आवडली असती. )

"आपले विरोधक नेहमी आपल्यावर सेक्युलर नसल्याचा आरोप करतात. त्यांना म्हणावं बघा आम्हीही सेक्युलर आहोत. निव्वळ आमच्यामुळं या कॉमिक स्ट्रिपमध्ये सगळ्या धर्मांच्या स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळालं!"

हे शस्त्र इतर ठिकाणी वापरता येईल का? ह्यावर उहापोह होणं गरजेचं आहे.
म्हणजे "हिंदू क्षयझ गोष्टी करतात हे संस्कृतीला सोडून आहे", ह्याचा प्रतिवाद म्हणून इतर धर्मीयांनाही स्वत:सोबत खेचून पुरोगामी बनवायचं.
अर्थात फुल्यांपासून सगळे हेच करत आले होते- पण ते आता खास उजव्या लोकांना गळी पडेल असं सांगायचं.
असो. काहीही लिहितोय मी.

(बं.भा. क़टकोळ - तुमच्या ह्या लेखाला २ जणांनी ५ तारे दिले होते हो! पण बहुतेक प्रतिक्रिया द्यायला लाजले असावेत, हॅ हॅ हॅ)

धन्यवाद अस्वल! एकदाची एक तरी प्रतिक्रिया आली! मला भीती वाटत होती की दिवाळीतल्या भाकड दिवसासारखी माझी गोष्टसुद्धा अंकातली भाकड वेंट्री ठरते का काय. ती नामुष्की तरी वाचली हा हा हा..... बाकी तुमची कल्पना चांगली आहे.

तर प्रतिक्रिया पाहिजेत, नाही काय? प्रतिक्रिया पाहिजेत, अं!

सांगू का चिपलकट्टींना? सांगू? आँ?

पाहा हं! नंतर मग तक्रारी चालणार नाहीत, सांगून ठेवतोय!

मागाल पुन्हा प्रतिक्रिया?

प्रतिक्रिया पाहिजेत, म्हणे!

(असो चालायचेच.)

या निमित्तानं साहित्यनिर्मितीमागची प्रेरणा काय असावी - स्वानंद की लोकानुनय? यावर एक मौलिक व मार्मिक चर्चा घडावी ही अपेक्षा...

साहित्यनिर्मितीमागील प्रेरणा स्वानंद ही असावी हे ठीकच आहे. (नव्हे, हेच उचित आहे असे प्रतिपादण्याचे धाडस करू इच्छितो.) दिवाळी अंकामागील (पक्षी: दिवाळी अंक काढण्यामागील) प्रेरणा मात्र जर निव्वळ स्वानंद हीच जर होऊ लागली, तर मात्र अंमळ कठीण आहे, इतकेच.

असो.

>>> सगळ्यांना दहशत बसली पाहिजे. आपल्या धर्माला नावं ठेवायची कुणाची हिम्मतच होता कामा नये.

अत्यंत मिळमिळीत लेख.

कारण ज्या धर्माबद्दल तुम्हाला दहशत आहे असे तुम्ही म्हणता आहात ते लोक थेट "सर तन से जुदा" करतात, बायकॉट वगैरे काही करत नाहीत. तुमची देखील त्या दहशतीमुळे हिम्मत नाही झाली त्या धर्माचं नाव घेण्याची.

तुमची देखील त्या दहशतीमुळे हिम्मत नाही झाली त्या धर्माचं नाव घेण्याची.

तुमची झाली काय? मग उगाच त्यांनाच का बरे नावे ठेवता?

स्वानंदासाठी जरी अंक काढला तरी हिंदुत्ववादी येऊन "परानंद" दिल्याशिवाय सोडत नाहीत!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येऊ देत! आता जरा बरं वाटलं. 'याचसाठी केला, होता अट्टाहास' वगैरे...

+१

तुमची झाली काय?

प्रश्न माझ्या हिम्मतीच्या नाहीच.

धागालेखकाला सर-तन-से-जुदा होण्याची दहशत आहे.

न बा तुम्ही थोर आहात !!!
कोणाच्याच बरोबर नसून फक्त राईट (म्हणजे "उजवा" अर्थात नव्हे तर "बरोबर") च्या बरोबर असणं हे असीधारा वगैरे व्रत आहे.
लव्ह यु !!!
आता ह्या माझ्या कॏतुकानंतर माझाही पाणउतारा करा प्लीज तर तुम्ही खरे!!!

…काही नाही. (निदान, तसे असण्याची गरज नाही.)

कसे असते ना, की ते “बरोबर” वगैरे जे असते ना (म्हणजे, असे काही जर असलेच, तर), त्याच्या डोक्यावर आपल्या बरोबर राहण्याची जबाबदारी एकदा का टाकून दिली, की मग आपल्या डोक्याला ताप नसतो. मग आपल्याला जे योग्य वाटेल, ते करावे. एखादवेळेस “बरोबर”ला आपल्या बाजूस राहायला नाही जमले, त्याची डोकेदुखी, माझी नव्हे!

(सांगण्याचा मतलब, मी नेहमी आणि/किंवा प्रयत्नपूर्वक “बरोबर”च्या बाजूने असतो, असा माझा स्वतःचा दावा नाही. का राव उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवताय?)

हे ही ठीकच!

प्रतेक ठिकाणी जात,प्रतेक ठिकाणी धर्म .
पुरोगामी हे कट्टर प्रतिगामी च आहेत आणि प्रतिगामी खरे तर योग्य मार्गावर आहेत.
भारतातील धर्म द्वेष,जातीय द्वेष नष्ट होवू नये ही काही स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या लोकांची च इच्छा आहे.
संजय सोनवणे ह्यांनी ह्या वर मस्त लेख लिहला आहे

मामा, वैश्विक, AI, नियती, रोगजंतू, युद्ध, माणूस कसा नालायक आहे .. हे सगळं राहिलं.

संजय सोनावणी म्हणल्यावर मला अवकाश ताण सिद्धांतच आठवतो. आमचे एक (निरागस) मित्र त्याला 'सावकाश घाण' म्हणतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचे एक (निरागस) मित्र त्याला 'सावकाश घाण' म्हणतात.

हीच! हीच ती ब्राह्मणी मनोवृत्ती!

अप्रतिम कथा आहे ही!