"Creative Pasts" : गए दिनोंका सुराग़

प्रा. प्राची देशपांडे लिखित "Creative Pasts" हा प्रबंधवजा ग्रंथ वाचून काही काळ उलटून गेला पण त्याबद्दल लिहायचे राहून गेले. राहून गेले म्हणा; त्याबद्दल लिहायला झेपेल असं वाटेना म्हणा. अलिकडे ते पुन्हा हाताशी लागलं. म्हण्टलं जमेल तशी ओळख करून द्यावी. म्हणून हे टिपण. संशोधनाच्या शिस्तीच्या अभावातून ते जन्माला आलेलं आहे त्यामुळे "आपणपण लिहायला काय जातं" असा त्याचा नूर आहे.

book cover

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आणि पुढे त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ दीडेकशे वर्ष अस्तित्वात असलेली मराठा राजवट - या घटनेचे पुढे आणखी दीड-दोनशे वर्षं महाराष्ट्राच्या समाजकारणावर झालेले परिणाम हा या प्रबंधाचा विषय. ब्रिटिश राजवटीमधल्या अनेकविध राजकीय प्रवाहांच्या संदर्भातलं या घटनेचं महत्त्व, त्याचा एक भाग म्हणून जन्माला आलेला नि पुढे फोफावलेला आणि एकविसाव्या शतकात सत्तारूढ होऊन बसलेला हिंदुत्ववादी प्रवाह, त्याच्याच जोडीने महाराष्ट्रातल्या आणि भारताच्या अन्य भागात विकसित होत गेलेला बिगरब्राह्मणी विचार आणि त्याचं राजकीय शक्तीमधे झालेलं संक्रमण या गोष्टीमागे असलेलं मराठा राजवटीच्या इतिहासाचं महत्त्व - या आणि अशा विविध गोष्टींचा परामर्श ग्रंथात घेतला आहे. या सार्‍याचं मग साहित्यादि गोष्टींमधे पडत गेलेलं प्रतिबिंब - नि त्याच्या बदलत्या छटा - यासारखे विषयही आले.

एखाद्या गोष्टीचा विषय आपल्या सर्वांच्या इतका जिव्हाळ्याचा असला नि त्यातून त्यावर विविध प्रकारे प्रकाश टाकला गेलेला असला, त्याची छाननी वेगवेगळ्या आणि डोळस प्रकारे केली गेलेली असली तर त्याचं वाचन हा निव्वळ ज्ञानवर्धक नव्हे तर गुंगवून टाकणारा अनुभव ठरू शकतो.

एक वाचक म्हणून माझ्या या लिखाणाचं स्वरूप "मला कायतरी सांगायचंय" या पेक्षा "मला नक्की काय कळालंय ते जरा तपासतो" असं आहे. त्यामुळे या इंग्रजी पुस्तकातलं मला एकदम जे मराठीत समजून घेता येणार नाही ते मूळ इंग्रजीतच उधृत करायचा धडाका लावणार आहे. उदाहरणार्थ ब्लर्बमधलं हे वाक्य भारी आहे: ...She traces the reproduction of the Maratha Period’s centrality to the making of a modern regional consciousness.

पुढे ब्लर्बमधला हा भाग मला आवडला :
She also shows how historical memory provided a space for Indians to negotiate among their national, religious and regional identities, pointing to history’s deeper potential in shaping politics within thoroughly diverse societies. हे वाक्य थोडं प्रमेयासारखं आहे. त्या प्रमेयाचा उलगडा पुस्तकातून कसा होतो ते पाहूया.

image
-----------
Introduction

यामधे अर्थातच विषयप्रवेश आहे. त्यात एकंदर मराठी समाजावर अगदी एकविसाव्या शतकापर्यंत पडत राहिलेला मराठा राजवटीचा प्रभाव हा भाग येतोच. इथे एक महत्त्वाचं विधान आलेलं आहे. लेखिका म्हणते : One of my principal arguments is that Maratha historical memory has been crucial not only to the creation of a modern regional Marathi identity in Western India but also to the successful articulation of that identity within wider Hindu and Indian national imaginations.

शिवाजीने निर्माण केलेली राजवट, ही मराठा राजवट. भारतीय उपखंडात अनेक शतकानंतर निर्माण झालेली हिंदु राजाची ती राजवट होती आणि या पैलूचे पडसाद बृहद् स्वरूपाच्या हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी राजकीय विचारांमधे पडले हे इथे सूचित केलेलं दिसतं. हे कसं मांडलं गेलेलं आहे ते आपण पाहू.

इथे या ग्रंथाच्या आणखी एका उद्दिष्टाचा उल्लेख करायला पाहिजे. हे उद्दिष्ट इतकं ठळक आहे की पुस्तकाच्या शीर्षकाचा संबंध तिथे येतो. तर ते उद्दिष्ट आहे मराठा राजवटीसंदर्भातल्या ऐतिहासिक कागदपत्रांबरोबर सार्वजनिक स्मृतींद्वारे नोंदल्या गेलेल्या गोष्टींचा धांडोळा घेणे. (यामधे मग बखरी, सनदी, खलिते इत्यादि राजव्यवहारसंदर्भातली डॉक्युमेंट्स आली, पत्रव्यवहार आले, देशीविदेशी विद्वानांची संशोधनं आलीच) - आणि मुख्य म्हणजे या दोन गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध, साम्याबरोबर त्यांच्यात असलेला विरोध, याचा पडताळा करणे. "क्रिएटिव्ह पास्टस्" या शीर्षकाचा संबंध इथे येतो. म्हणजे इतिहासाच्या नोंदीबरोबर, त्या नोंदींच्या साधनांची उलटतपासणी आली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कालखंडातलं जनमत काय होतं, लोकांमधे काय प्रवाद असतील, साहित्यादि गोष्टींमधे त्याचं खरंखोटं प्रतिबिंब कसं पडलं असेल त्याची छाननी करायची आणि दोन्हीची तुलना करायची. म्हणजे इथे खरोखरच पोवाडे आणि अशा बर्‍याच गोष्टींपासून सुरवात करून कथाकादंबर्‍या, नाटकसिनेमेपर्यंत गाडी येते आणि त्यातल्या गोष्टींचा "अधिकृत" आणि "अक्याडमिक" पातळीशी साम्यविरोध कसा असतो आणि मुख्य म्हणजे मुख्य विचारधारा त्यातून कधी विस्तार पावते.

हे बऱ्यापैकी रोचक आहे यात शंका नाही. मात्र, हा प्रकार छाती दडपून टाकणारा आहे असे मजसारख्या सामान्य वाचकाला वाटलं तर त्यात नवल ते काय? आणि याचबरोबर, "अरे! हे या आधी कसकाय कुणाला सुचलं नाही!" असंसुद्धा इथे मला वाटलंच.

ग्रंथातून या उद्दिष्टाची पूर्ती कशी होत जाते हे समजून घ्यायचा माझा प्रयत्न आहे.

एक गोष्ट इथे नमूद करतो. प्रस्तुत पुस्तक वाचताना, इतिहासाचा अभ्यास म्हणजे इतिहासाच्या साधनांचा अभ्यास असं माझं मत बनत गेलेलं आहे. म्हणजे असं की टेक्स्टबुकांतून वगैरे प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास आपल्याला शिकवला जातो. (माझा इतिहास शिकण्याचा संबंध यत्ता १०वीला संपला त्यामुळे माझं हे विवरण अगदीच शालेय आहे.) प्राची देशपांडे यांचं हे लिखाण वाचताना, डझनावारी प्रकाराची शेकडो कागदपत्रं आणि ग्रंथ त्यांनी हाताळलेले दिसतात. यातून जे मांडायचं आहे त्यात इतिहासाच्या या साधनांची सत्यासत्यता तत्कालीन उपलब्ध असलेल्या अन्य साधनांच्या/कागदपत्रांच्या संदर्भात तपासणं हे इतिहासकाराचं प्रमुख काम आहे असा माझा समज झाला आहे. त्यामुळे या ग्रंथात हिस्टरिओग्राफी (historiography) या संज्ञेचा उल्लेख पदोपदी येतो. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. )

एक छान गोष्ट म्हणजे या सुरवातीच्या धड्यामधेच पुस्तकाच्या उर्वरित भागांंमधे काय काय येणार त्याचा नकाशा दिलेला आहे.

सुरवातीला लेखिका आपल्या पेशवाईकालीन बखरींकडे वळते. बखरींनी काय काय नि कुठल्या संदर्भातली माहिती नोंदवली आहे याबद्दल विवेचन आहेच. पण महत्त्वाचं असं की, लेखिका म्हणते की काही झालं तरी बखर निर्माण करणारे लोक हे सत्ताधीशांच्या सावलीत वावरणारे होते आणि ही गोष्ट बखरींचं एक साधन म्हणून वापरताना आपण ध्यानात ठेवायला हवी.

त्याच्या पुढच्या भागात अभ्यासविषय दिसतो तो असा की या प्रकारच्या साहित्यातून, तत्कालीन सत्तेचं विकेंद्रित स्वरूप, सत्ता वाटून घेणारे घटक, त्यांचं वैविध्य आणि शिवाजीच्या रूपाने अस्तित्वात आलेल्या (आणि नंतरही टिकलेल्या) सत्ताकेंद्राशी असणारे या विविध, विस्कळित स्वरूपाच्या घटकांचे नातेसंबंध यांचं प्रतिबिंब या तत्कालीन साहित्य नि कागदपत्रांमधे कसं पडतं त्याचा घेतलेला वेध.

यानंतर लेखिकेचा मोहरा वळतो तो ब्रिटिश राजवटीच्या मराठी सत्तेशी आलेल्या संबंधाकडे. मग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणावर, समाजकारणावर, इतिहासाच्या अभ्यासापासून ते इतिहासाच्या आकलनापर्यंत आणि मग पर्यायाने महाराष्ट्रातल्या लोकांच्या विचारसरणीवर पडत गेलेला ब्रिटिश राजवटीचा प्रभाव याकडे गाडी येते. "आपण कोण?" या मराठी प्रदेशातल्या लोकांच्या सामूहिक आकलनावर ही दशकानुदशकं चालत असलेली प्रक्रिया काम कसं करत होती? यातून कुठल्या व्यक्ती, विचार, संस्था, राजकीय विचारप्रणाली इत्यादि इत्यादि गोष्टी एकमेकांवरच्या क्रिया-प्रतिक्रिया म्हणून अस्तित्त्वात आल्या आणि कार्यरत राहिल्या? याचा घेतलेला हा वेध. हे सर्व विवरण तीन मोठमोठ्या आकाराच्या भागामधे आलेलं आहे. "आपले पूर्वज थोर होते" या (गंमतीदार) वाक्याचं परकी सत्तेच्या संदर्भात अस्तित्त्वात आलेलं भान ("म्हणजे आम्हीसुद्धा थोर आहोतच" अशी त्याची निर्माण झालेली नि हाहा म्हणता अवाच्यासवा मोठी झालेली स्वप्रतिमा!) आणि त्याचा एका मोठ्या समूहमनावर शंभर सव्वाशे वर्षं पडलेला प्रभाव.

मात्र याचबरोबर, मराठा सत्तेच्या इतिहासाकडे पहाताना तिचं स्वरूप समजून घेताना या घटनेकडे अभ्यस्त दृष्टीकोनाने पाहणारे प्रवाहसुद्धा निर्माण झाले. या गोष्टीची नोंदसुद्धा लेखिका घेते. रामकृष्ण भांडारकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, वि का राजवाडे, महात्मा फुले यांच्या या कालखंडातल्या कामगिरीची, या व्यक्ती आणि संस्था ज्या मुद्द्यांना मांडतात, त्यांचं एकमेकांशी असणारं सहमती-असहमतीचं स्वरूप याचा अभ्याससुद्धा इथे केला गेलेला आहे. या निमित्तानं १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून जे वैचारिक वातावरण निर्माण झालं आणि त्याची नाळ शेवटी विसाव्या शतकातल्या समाजकारणावर जोडली गेली त्याचा परामर्ष इथे घेतला गेलेला आहे.

साधारण १८९० ते १९४०च्या कालखंडामधे राष्ट्रीय विचारसरणीने मूळ धरलं. वर्तमानपत्रं, पुढाऱ्यांची भाषणं, संस्थांचा जन्म आणि त्यांच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादाचा पुरस्कार झाला. हा राष्ट्रवाद ब्रिटिश सत्तेविरोधातला होता आणि मराठा सत्तेच्या इतिहासात, शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या स्मरणात या राष्ट्रवादाला भरपूर इंधन मिळालं. वर्तमानपत्रादि (उपरोल्लेखित) गोष्टींपासून, ते पुढे नाटकं, पोवाडे, मेळावे, संगीत इत्यादि बहुविध गोष्टींमधे या सर्वाचं प्रतिबिंब कसं पडत गेलं आणि या सर्व गोष्टींमुळे समाजाची धारणा कशी होत गेली? या सर्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे शिवाजीप्रणित मराठी सत्ता ही एतद्देशीयांची राजवट आणि पर्यायाने देशभक्तीचं महत्त्वाचं प्रेरणास्थान कसं आहे? हे परतपरत येत राहिलं. या गोष्टींचा आढावा यातल्या भागात आपल्याला पहायला मिळतो.

इथे लेखिका एका मर्मस्थळाचं विवेचन करते. "महाराष्ट्र धर्म" नावाच्या (मूळ समर्थ रामदासकृत वचनातून आलेल्या) शब्दांचं पुनरुज्जीवन या कालावधीत झालं आणि वेगवेगळ्या विचारपद्धतीच्या लोकांनी शिवाजीमहाराजप्रणित मराठी सत्तेच्या घटनेचा आपापल्या विचारसरणीनुसार लावलेला अर्थ कसा होता, याचं चपखल उदाहरणं देऊन विवरण करते. म्हणजे असं की, त्या काळातले जे जहाल हिंदुत्ववादी होते, त्यांनी "शिवाजी हा मुसलमानी सत्तेचा पाडाव करणारा हिंदु राजा होता" अशी मांडणी केली. त्यामानाने जे काहीसे मवाळ - मात्र अर्थातच राष्ट्रवादी - होते, त्यांनी "एतद्देशीयांनी परकी सत्तेविरुद्ध उभं केलेलं राज्य" असा अर्थ लावला. आणि तत्कालीन मार्क्सवादी वगैरे लोकांनी "शिवाजी हा तळागाळातल्या मजूरादि लोकांचं, उन्नयन करणारा, त्यांच्याबद्दल विशेष कणव असणारा राजा होता" असा अर्थ प्रतिपादित केला. थोडक्यात सर्वांना या घटनेचं ऐतिहासिक महत्त्व निर्विवादपणे मान्य होतं, मात्र त्याचं राजकीय ब्रँडिंग कसं आपापल्या सोयीने केलं त्याचा सोदाहरण इतिहास येतो. तो रंजक आहे.

इसवीसन १९०० नंतर महाराष्ट्रात उदयाला आलेल्या तथाकथित अब्राह्मणी चळवळींचा परामर्ष मग घेतलेला आहे. या अब्राम्हणी विचारधारेमधे प्रामुख्याने मराठा, कुणबी जातीचं प्रतिनिधित्व होतं असं दिसतं. या विचारसरणीने तत्कालीन ब्राह्मणी विचारपद्धतीवर टीका केली, नेतृत्वामधे आणि विचारसरणीमधे असलेल्या ब्राह्मणांच्या भरण्याकडे लक्ष वेधून घेतलं, त्यातल्या विसंगती दर्शवल्या. १९२०-३० पर्यंत अब्राह्मणी विचारसरणी, चळवळ, संस्था, वर्तमानपत्रं या सर्वांना समाजात स्थान मिळालं. गमतीची गोष्ट म्हणजे ब्राह्मणांच्या प्रभावाची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आलेल्या या चळवळीच्या विचारधारेत, "शिवाजी हा मराठा राज्यकर्ता होता" या गोष्टीवर (अर्थातच!) भर दिलेला असला तरी "तो एक हिंदु राजा होता; त्याने एक हिंदु साम्राज्य निर्माण केलं" हे देखील महत्त्वाचं त्या विचारसरणीत महत्त्वाचं होतं हे लेखिका दर्शवते. थोडक्यात "ब्राह्मण" या आयडेंटिटीला नाकारताना, "हिंदु" ही आयडेंटिटी मात्र या गैरब्राह्मणी चळवळीला अंगिकाराविशी वाटलीच. ब्राह्मण-अब्राह्मण चळवळीतल्या या या साम्याचा किंवा कॉमन ग्राउंडचा संबंध मग पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी ब्राह्मण-अब्राह्मणांनी एका झेंड्याखाली येण्याकडे कसा येतो, याचा निर्देश लेखिका करते.

पुस्तकाच्या पुढच्या काही भागांमधे लेखिका समाजशास्त्रीय भिंगातून या गोष्टींकडे पाहाताना दिसते. ब्रिटीश राजवटीबरोबर, समाजातल्या स्त्रिया, दलितवर्ग, शोषित-वंचित स्तरातल्या लोकांच्या सामाजिक उन्नयनाच्या प्रक्रियेला एका अर्थाने सुरवात झाली. एकंदरीतच समाजाच्या "आधुनिकते"कडे प्रवासाला सुरवात झाली. या काळातल्या सामाजिक मूल्यांच्या वेगाने बदलणाऱ्या प्रवाही स्वरूपाचं वर्णन करताना आधुनिकता आणि परंपरागत मूल्ये यांच्या घुसळणीमधे "महाराष्ट्रीय", "मराठी" असणं या ओळखीचाही वाटा कसा होता, त्यात समाजातल्या वेगवेगळ्या समाजातल्या स्त्रीपुरुषांनी आंगिकारलेल्या विचारसरणीमधे कसे बदल होत होते, कुठल्या ऐतिहासिक स्त्रीपुरुषांच्या प्रतिमा म्हणजे त्यांचे तत्कालीन आदर्श होते, नेहमीच्या वापराच्या बोलीपासून ते लिखित वाङ्मय, वर्तमानपत्रादि गोष्टींपर्यंत इतिहासाच्या पाऊलखुणा कशा उठलेल्या दिसतात आणि त्यातून संक्रमणशील समाजाचं दर्शन कसं होतं याचं विचेचन त्यापुढील भागामधे येतं.

मराठा राजवटीच्या प्रभावाचा एकंदर परिणाम हिंदुत्वाच्या विचारसरणीला दृढ करण्यात कसा झाला, किंबहुना हिंदुत्ववादामागची ती प्रमुख प्रेरणा कशी होती, आणि विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत ही विचारसरणी अधिक प्रसरणशील आणि लोकप्रिय होत होत शेवटी एकविसाव्या शतकात सत्तापालट करून प्रमुख सत्ताकेंद्र कशी बनली याचा निर्देश लेखिका करते. मात्र, हिंदुत्वाच्या पसाऱ्याची सुरवात, त्याची प्रेरणा ही शिवाजीमहाराजप्रणित मराठा सत्ता कशी होती या गोष्टींनी पुस्तकाचा समारोप होतो.

-----
धडा १ : Bakhar Historiography

या भागाच्या सुरवातीला लेखिका “बखर” शब्दाच्या आणि बखरवाङ्मयाच्या उत्पत्तीमागच्या गोष्टी सांगते. पंधराव्या शतकापासून लिहिल्या गेलेल्या (पण सतराव्या शतकाच्या शेवटापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत सर्वाधिक रचल्या गेलेल्या) सुमारे २०० बखरींबद्दल, त्यांच्यातल्या ऐतिहासिक नोंदींबद्दल आणि त्याचबरोबर पुराणकथासदृष स्वरूपाबद्दल, तारीखवारांच्या अचूकतेच्या अभावाबद्दल, त्यांच्या अस्ताव्यस्तपणाबद्दल ती ओळखवजा लिहिते. बरंचसं अहवालात्मक स्वरूप - विशेषकरून मुलुखगिरीला गेलेल्या सैन्याच्या आघाडीवरून स्वगृही पाठवलेले अहवाल - असलेल्या या कागदपत्रांबद्दल जदुनाथ सरकार, वि का राजवाडे आदिंच्या आत्यंतिक नावडीबद्दल लेखिका सांगते. ही हेटाई अर्थातच त्या कागदपत्रांच्या विश्वासार्हता, अचूकता यांच्या अभावामुळे, त्यांच्यातल्या बातमीदारी आणि पुराणसदृष कथानकाच्या सरमिसळीमुळे, सत्ताधाऱ्यांबद्दलच्या हांजीहांजीपणामुळे - आणि त्यामुळे लिहिलेल्या अवाच्या सवा लिखाणामुळे आलेली आहे.

प्रस्तुत अभ्यासाकरता या दोनेकशे दस्तऐवजांपैकी चार बखरींचा अभ्यास लेखिकेने केलेला आहे. शिवाजीच्या मृत्युनंतर आलेली "सभासदाची बखर", १८११ च्या सुमारास प्रकाशित झालेली शिवचरित्रात्मक "चिटणीसाची बखर", १८१८ च्या सुमारास आलेली, एकंदर पेशवाईचा लेखाजोखा मांडणारी "पेशव्याची बखर" आणि अर्थातच पानिपताबद्दलची सुप्रसिद्ध "भाऊसाहेबाची बखर".

यापुढे लेखिका "पेशव्यांची बखर" मधला एक उतारा नोंदते. ही नोंद नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर केवळ तीन दिवसांनी लिहिलेली अहवालवजा नोंद आहे. त्यात गारद्यांच्या कटाची इत्थंभूत माहिती आहे. रघुनाथरावाच्या सुरू झालेल्या राजकीय हालचालींबद्दलची माहिती आहे. मात्र रोचक बाब अशी की रघुनाथरावाशी निष्ठा राखणाऱ्या व्यक्तींची नावं सांकेतिक पद्धतीने या पत्रव्यवहारात येतात.

त्याच्यापुढच्या भागात सभासदाच्या बखरीमधे छत्रपती राजारामाला उद्देशून असलेल्या पत्राचा एक भाग येतो. (सभासदाची बखर हीच मुळी राजारामाने काढलेल्या आदेशातून निर्माण झालेली आहे.) त्यात राजारामालाच उद्देशून असलेला काहीसा दीर्घ असा शिवाजीगौरवपर मजकूर आहे.

राजारामानेच काढलेल्या आदेशातून सभासद ह्यांनी त्याच्याच वडलांच्या थोरवीची गाथा लिहिणं, चिटणीसांनी त्याच ग्रंथाचा ऐवज जवळजवळ पुनरावृत्त करणं या सर्वातून बखर ह्या गोष्टीच्या मर्यादा लेखिका अधोरेखित करते. इतर काही बखरींमधून् पुराणकथासदृष वातावरण, किस्से, कहाण्या या सर्वांचं स्वरूप बखरीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह करणारं आहे - तसं अनेकांनी कठोर शब्दांत केलेलं आहे याच्या वेगवेगळ्या नोंदी लेखिका करते. मात्र बखरींच्या ह्या मर्यादांसकट त्यांच्याकडे पाहाण्याचा सम्यक् असा दृष्टीकोन लेखिका आणते. माझ्यामते हे असं शहाणं लिखाण हा या पुस्तकाचा ठेवा आहे.

बखरींच्या संदर्भात विवेचन करताना लेखिका आपल्या , या प्रबंधवजा लिखाणाच्या "क्रिएटिव्ह पास्ट्स् " शीर्षकातून जो सूर पकडायचा प्रयत्न करते आहे त्याकडे परत वळताना दिसते. एकंदरीतच बखरींमधे घटना क्रमवारी येतात, वेगवेगळ्या शकावल्यांच्या अनुरूप वेगवेगळे घटना प्रसंग येतात. त्यातल्या व्यक्तींची वर्णनं येतात, ज्यांचं चरित्र लिहायचं त्यांना विभूतीस्वरूप दिलं जातं. मग शिवाजीला भवानी तलवार साक्षात देवीने दिली वगैरे गोष्टीही त्यातच येतात. शिवाजीने वेगवेगळे पराक्रम गाजवले त्यावेळी औरंगजेब खासगीत काय म्हणाला ते उद्गार येतात. पानिपताचं इत्थभूत वर्णन करताना अमुक निर्णय कसे, "विनाशकाले विपरितबुद्धी" होते इत्यादि गोष्टी येतात. ही सगळी सरमिसळ म्हणजे भूतकाळाची जणू पुनर्निर्मिती आहे असं लेखिकेचं म्हणणं आहे. इतिहासाचं आकलन करायचं तर ह्यातल्या सांगोवांगीच्या गोष्टींना अंधपणे स्वीकारू नये हे बरोबर; परंतु या अशा चित्रणांमधून तत्कालीन मूल्ये, वेगवेगळ्या घटकांचे परस्परसंबंध, राज्यव्यवस्थेचं स्वरूप यावर प्रकाश पडत राहातो. यातून जे आकलन होतं ते कोरड्या सनावळ्या आणि कागदपत्रांच्या याद्या आणि कलमांची मांडणी यातून होणार नाही. बहुमुखी, बहुपेडी अशा गोष्टींच्या एकसमयावच्छेदेकरून पाहिलेल्या लोलकातून इतिहासाचा पोत उमजतो - असं एकंदर म्हणणं आहे.

बखरींच्या या भागाच्या समारोपापाशी लेखिका त्यांच्याबद्दल जे म्हणते ते मूळ इंग्रजीतूनच देतो. ते छान आहे आणि त्याचा गोषवारा देण्याच्या नादात त्याचं मर्म हरवेल अशी भीती वाटते.

The Bakhars certainly form part of the “ecumene”, the broader world of communication described by C. A. Bayly. At the same time, they emerged through and circulated in the legal and bureaucratic world that had developed over the preceding centuries in the Marathi Deccan. By the early nineteenth century they embodied a historiographic practice that made the narrative sense of the recent past through literary frames familiar to the Marathi bureaucratic literati and appropriate to the writer’s analysis of the specific events under consideration. They were also created with certain conventions of authentication and narration that were recognized and accepted within this bureaucratic world. A central feature of bakhar historiography was the tension between the narrative of power, putting forward claims to legitimacy on behalf of various actors in the Maratha political environment, and a more detached, critical voice that commented, from within a moral universe, on historical actors, events and outcomes.

(क्रमश:)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

क्रमश: वाचून असेच चांगले अजून वाचायला मिळणार याचा आनंद झाला. बखरीबद्दलची मते विचार करायला लावतात.
सध्याच्या वर्तमानपत्रांतील बातम्या वाचताना देखील आपण बखर वाचत आहोत, असं वाटायला लागतं. शिवाजी महाराजांच्या आस्तित्वाचा तत्कालीन महाराष्ट्राला जेवढा फायदा झाला नसेल तेवढा आत्ताच्या काही राजकीय शक्तींना झाला आहे. या शक्तींच्या बद्दल बखरी लिहिणे आत्तापासूनच चालू आहे. अजून शंभर दोनशे वर्षांनी, या शक्ती देखील कशा लोकोत्तर, प्रजाकल्याणकारी आणि महाराजांच्याच योग्यतेच्या होत्या, याचे इतिहासाच्या पुस्तकात धडे असतील, यांत शंका नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचलं होतं तेव्हा आवडल्याचं आठवतं आहे. ते मराठीत यायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

लेख आवडला.

(मात्र मला आता जरा लांबलचक मराठी वाचताना मुद्रितशोधन आणि संपादकीय सूचना केल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे मी माझंच नुकसान करून घेत्ये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राबा,

लेख आवडला.

मालिकेतील पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत आहे.

राजगड आणि रायगड या शिवाजीच्या दोन राजधान्यांच्या परिसरात आज राहणाऱ्या लोकांत (इतर महाराष्ट्रीयांच्या तुलनेत) या collective memory चा प्रभाव मी पाहिलेला/अनुभवलेला आहे. त्यासंबंधी पुन्हा केंव्हातरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

आज दलित शिवाजी महाराजांकडे कसे बघतात? (कृपया "डोळ्यांनी" असे उत्तर देऊ नये!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

The Bakhars certainly form part of the “ecumene”, the broader world of communication described by C. A. Bayly. At the same time, they emerged through and circulated in the legal and bureaucratic world that had developed over the preceding centuries in the Marathi Deccan. By the early nineteenth century they embodied a historiographic practice that made the narrative sense of the recent past through literary frames familiar to the Marathi bureaucratic literati and appropriate to the writer’s analysis of the specific events under consideration. They were also created with certain conventions of authentication and narration that were recognized and accepted within this bureaucratic world. A central feature of bakhar historiography was the tension between the narrative of power, putting forward claims to legitimacy on behalf of various actors in the Maratha political environment, and a more detached, critical voice that commented, from within a moral universe, on historical actors, events and outcomes.>>>तुम्ही हा उतारा चपखल दिलाय पण लेखिकेने त्याआधी जे, इतिहास लिहिण्याची आधुनिक पद्धत आणि स्मृती यांच्यावर लिहिलं आहे त्याचा संदर्भ याला आहे. तो भाग थोडा यायला पाहिजे असं आपलं माझं चार आण्याचे मत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

चार चांदण्या दिल्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता