वास्तुविचार : पहाडापासून धुळीपर्यंत

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

वास्तुविचार : पहाडापासून धुळीपर्यंत - पुष्कर सोहोनी

- पुष्कर सोहोनी

पुण्याचं हरी मंदिर
पुण्याचं हरी मंदिर

कुठल्याही वास्तुप्रकल्पाचा अभ्यास केल्यावर त्याच्या बांधणीच्या काळातली संस्कृती, तंत्रज्ञान, समाजव्यवस्था, व आर्थिक परिस्थिती, असे अनेक ऐतिहासिक पैलू समजावून देण्याचे सामर्थ्य वास्तूमध्येच दडलेले दिसते. त्याबरोबर समकालीन सौंदर्याची संवेदनशीलतादेखील लक्षात येते. त्यामुळे स्थापत्याच्या इतिहासाचे प्रमाण हे मनूच्या कल्प आणि युगांच्या तुलनेने जरी नगण्य असले तरी संक्षिप्त पद्धतीने गेल्या काही हजार वर्षांतच जटील बदल नजरेस येतात. एका अर्थी फक्त दोन हजार वर्षांतच सत्ययुगातून कलियुगात होणार प्रवास दिसतो असे म्हणायला हरकत नाही.

भारतात ताम्रपाषाण युगापासून (३३००-१३०० इ.स.पू.) स्थापत्याची बरीच उदाहरणे आहेत. त्या कालखंडाच्या आधी भारतात मानवकृतस्थापत्याचा अभाव होता असे नाही, पण पूर्वनियोजित नागरीव्यवस्था ही सिंधू संस्कृतीतच प्रथम दिसून येते. मोहेंजो-दाडो व हडप्पा येथील नगररचना आणि त्यातील पाणी व स्वच्छता व्यवस्था पाहताच लक्षात येते की आपला वारसा त्या परंपरेशी अखंडता राखत नाही! ताम्रपाषाण काळानंतर उत्तर दख्खन प्रदेशात (आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात) महाजनपद, शालिवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, बहमनी, निजामशाह, आदिलशाह, मराठा स्वराज्य व साम्राज्य, आणि अखेरीस इंग्रज, अशा अनेक राजवटी आणि सत्ता आल्या आणि गेल्या. प्रत्येक राजवटीने आपली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख व सार्वभौम्य दर्शविण्याकरिता स्थापत्यात बदल घडविले. असे दिसून येते कि स्थापत्य हे राज्यकर्त्यांचे हेतू, आकांक्षा, व अस्मितांना प्रतिबिंबित करते. सर्वांनीच वास्तुकलेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक वास्तव व त्याचे विविध पैलू स्थापत्यातून प्रक्षेपित होणार असे लक्षात येताच सर्व राज्यकर्ते स्थापत्यावर एक माध्यम म्हणून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. विदर्भात वाकाटक राजवंश (२५०-५०० इ.स.) हे बौद्ध संघास प्रोत्साहन देण्याकरता अजिंठा येथील लेणीला दान देताना स्वतःचा वारसा देखील तयार करतायत ह्याची जाणीव पूर्णतः बाळगून होते. सद्‌भाव व भक्ती यांच्या जोडीने राजकीय प्रचार सुद्धा चालूच होता आणि असतो. त्या अर्थी कित्येक हजार वर्षात काहीच बदललेले नाही. हजारो वर्षांपासून राज्यकर्ते एकाच पद्धतीने कार्यरत आहेत. वास्तुशास्त्रातील दृक बदल हे फक्त तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञानात यांत दिसून येतात. आणि अनेक प्रसंगी तत्त्वज्ञान सौंदर्यशास्त्र म्हणून व्यक्त केले जाते.

अजिंठा/
अजिंठ्याची बौद्ध लेणी

पण दोन हजार वर्षांत स्थापत्यात बदल झाला यात वाद नाही. कालखंड मन्वंतरापेक्षा खूपच लहान असला तरी परिवर्तन तितकेच मोठे आहे. एवढा बदल ह्याचा विचार जर केला, भाजेच्या बौद्धलेणीपासून ते व्हिक्टोरिया टर्मिनसपर्यंत, तर काही विशिष्ट ठोकळ बदल लक्षात येतात. ह्या बदलांचा राज्यकर्त्यांच्या प्रवृत्ती व हेतूंशी संबंध नाही. उदाहरणार्थ, इमारतींचा पाया हा सतत लहान होत गेला आणि वर तोललेले अंग हे मोठे होत गेले. त्यामुळे मंदिरासारखी उंच इमारत बांधायची झाली तर फक्त निमुळता शंकू हा एकाच आकार नाही राहिला. आता खाली मोकळी जागा आणि खांबांचा वापर करून त्यावर पेललेले अजस्र वस्तुमान अशी वास्तुप्रथा रूढ झाली आहे. तेराव्या शतकातले सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचे शिखर भव्य करताना उंच बांधण्यात आले आणि त्या वास्तूला लाभलेली उंची ही केवळ भक्कम आदिस्थान, जाड दगडी भिंती, आणि निमुळते शिखर, यांमुळेच शक्य झाली. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्रातील शहरांमध्ये जमिनीचे भाव लक्षात घेता तळमजला हा देखील क्षेत्रफळासाठी मूल्यवान आहे हे लक्षात घेऊन, नाजूक खांबांवर उंच इमारतींची उभारणी करण्यात येते. त्यामुळे आता अनेक गगनभेदी वास्तूंचा पाया जमिनीवर कमीत कमीत जागा व्यापतो.

गोंदेश्वर
सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर

तसेच दोन हजार वर्षांत वास्तूंची उंची सातत्याने वाढत गेली आहे. अर्थातच जसे दोन हजार वर्षांत स्थापत्याचा आकार व प्रमाण वाढत गेले तशीच वास्तुप्रकल्पांत जटिलता वाढत गेली. विविध प्रकारच्या सुविधा आणि पद्धती, जसे वातानुकूलित व्यवस्था, अग्निशमनाचे साहित्य, बांधकाम कायद्याशी निष्ठा, व्यावहारिक अर्थ, हे सर्व आता अटळ आहेत.

श्रीगोंदा यादवकालीन मंदिर
श्रीगोंद्याच्या यादवकालीन मंदिराची भिंत

हे आहेत मोठ्या कालावधीत सतत एकाच दिशेने होणारे बदल, आणि त्यामुळे जोवर बौद्धिक व्यवस्था किंवा विचार सारणीत क्रांतिकारक परिवर्तन होत नाही तोवर हीच दिशा धरून इमारती अधिक उंच, कमीतकमी पाया असलेल्या, आणि आणखी जटिल होणार ह्याबाबत शंका नाही. छोटे तपशीलवार बदल हे तर शतकांत आणि दशकांत होतात, आणि त्यांची दिशा नेहमी स्थिर नसते. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत नागरी वाड्याचे बांधकाम करायचे असले तर आराखडा सोपा होता. जमिनीच्या परिघाला धरून बांधकाम आणि आत चौक, एका अथवा अनेक. त्यामुळे उजेड व हवा प्रामुख्याने आतून येत असत. ब्रिटिश पद्धतीचे बंगले आले आणि त्यांची नगररचना पद्धती राबवली गेली. कायद्याशी निष्ठा ठेवण्यासाठी सर्वांची स्वतंत्र निवासस्थाने जमिनीच्या मध्यभागी बांधली जिथे एकेकाळी चौक योजला असता. आणि पारंपरिक इमारत ज्या ठिकाणी बांधली गेली असती तिथे आता बाग आली. एक स्थापत्य परंपरा उलटली. पण एक कायदा बदलला तर परत वास्तुस्थिती बदलायची शक्यता राहते. असो. पण सर्व बदल आहेत त्यातून आपण काय निष्पन्न केले? गजबजाट, आवाज, तारांचे गुंते, आणि बकालपणा हीच आपली संस्कृती झाली आहे. महत्त्वाकांक्षा उच्च आणि चांगल्या राहणीच्या आहेत पण वास्तव काही दुसरेच आहे. हा परस्परविरोध सध्याच्या वास्तुरचनेत दिसतो.

दोन हजार वर्षांत काय साध्य झाले आहे? बांधकामाचा दगड आणि वास्तुरचनेचा हेतू हे दोनही घटक लहान झाले आहेत. दगड हा आदिभौतिक आणि वास्तुविचार हा बौद्धिक.

दौलताबाद हमाम
दौलताबादच्या हमामच्या दगडी भिंतीचा भाग

दौलताबादची जामी मशीद
दौलताबादच्या जामी मशिदीची दगडी भिंत

आज एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी वास्तुकार जरी एक असली तरी तिला विविध तांत्रिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे व त्यांच्याशी अनेक प्रकारची भागीदारी करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मोठ्या वस्तूंची उभारणी यांत भांडवलदारांची मोठी भूमिका झाली आहे आणि पूर्वीच्या विद्वान वास्तुकारांचे स्थान बहुतेक मोठ्या स्थापत्यप्रकल्पांमध्ये इतर लोकांनी घेतले आहे. बांधकाम म्हणजेच स्थापत्यकला असा गैरसमज झाल्याने कंत्राटदार अथवा प्रशासक हेच स्वतःला वास्तुकार समजू लागले आहेत आणि अर्थातच स्थापत्याचा एकूण भारतात दर्जा घसरला आहे. चांगल्या वास्तुरचनेचा आधार हे वास्तुविचार व वास्तुतत्त्वज्ञान असतात; आणि बांधकाम हे स्थापत्याचे एक अविभाज्य अंग असून त्याच्या मर्यादा भांडवल आणि तंत्रज्ञानाने ठरतात. विचार आणि कल्पकता यांना मात्र मर्यादा नसतात. स्थापत्य तत्त्वज्ञानाशी निगडित आहे, तर बांधकाम तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. पुंजीपती दोन्हींवर सत्ता चालवतात कारण त्यांना तत्त्वज्ञानात, तंत्रज्ञानात किंवा कुठल्याच ज्ञानात रस नसतो. त्यांच्यासाठी कुठलाही पदार्थ, व्यक्ती, वस्तू, वास्तू, यांचे मूल्य फक्त पैशात होते. त्यामुळे चांगली वास्तुरचना, चांगले बांधकाम, यापेक्षा चांगला दाम हे स्थापत्याचे मूलमंत्र झाले आहे. विकास नियंत्रणाचे (डेव्हलपमेंट कन्ट्रोल) नियम पुढाऱ्यांनी बिल्डर्सच्या दबावाखाली बदलून घेतले आहेत. ते नियम आता वास्तुकारांचे काम करतात. बांधकामातली काटकसर केंद्रस्थानी ठेवणारे पुंजीपती हे अभियांत्रिकी निर्णय घेतात. त्यामुळे चुकीची ध्येये घेऊन इमारती बांधल्या जात आहेत आणि त्यांच्या मागे वैचारिक भूमिका नाही.

आता बात राहिली दगडाची. वास्तुविद्येत प्रबळ आणि प्रचंड विचार ह्यांचा जसा आज चुराडा झाला आहे तसेच मोठ्या खडकांची स्थापत्यात आज धूळ करण्यात येते. महाराष्ट्रात एकेकाळी स्थापत्याची भव्यता ही अखंड पाषाणात कोरून केलेल्या वास्तूंची होती. अनेक ठिकाणांपैकी घारापुरी व वेरूळ येथील लेणी अशा रीतीने स्थापिल्या आहेत की अख्खा डोंगर हीच बांधकामाची सामग्री होती. पूर्ण डोंगराच्या आकाराचा पाषाणच कोरला आणि नको असलेला दगड काढून टाकल्यावर साक्षात भव्यता उरली. कैलास मंदिरानंतर एक-दोन शतकांत अंबरनाथ व औंढ्या नागनाथसारखी मोठी मंदिरे बांधण्यात आली. ही जरी पहाडातून बनविली नसली तरी बांधकामात वापरलेले शीळ हे प्रचंड आकाराचे आहेत आणि प्रत्येक दगड हलवायला अनेक माणसे आणि पशूंची गरज भासली असणार. पण ह्या प्रकारचे श्रम मात्र त्यानंतर हजार एक वर्षांत मावळले आणि मोठ्या मंदिरांचा काळ हा राजकीय अर्थव्यवस्थेत बदल झाल्याने समाप्त झाला; आता विविध वेगळ्या वास्तू दगडात बांधण्यात आल्या. यांत मंदिरांचा पण समावेश होता पण त्यांचे प्रमाण वेगळे होते.

मुंबई विद्यापीठाची फोर्टमधली इमारत
मुंबई विद्यापीठाची फोर्टमधली इमारत

गड, किल्ले, महाल, राजवाडे, मशिदी, दर्गे, हे सर्व बांधताना महाराष्ट्राची खास ओळख म्हणून काळा पाषाण वापरलाच पण आता चिरे हे अजून लहान झाले होते. इंग्रज वसाहत काळापर्यंत हे चिरे साधारण विटेच्या आकाराचे झाले. विसाव्या शतकात बांधकाम तंत्र सिमेंटकडे वळले आणि सर्व ठिकाणी री-इंफोर्ज्ड सिमेंट काँक्रीटच्या इमारती होऊ लागल्या. आता दगड फक्त खडी म्हणून उपयुक्त होता आणि सिमेंट करताना तर त्याचा चुरा वापरतात. मुंबई शहरातच हे परिवर्तन दिसून येते. मुंबईजवळ घारापुरीमध्ये शिवमंदिर अखंड डोंगरात कोरले आहे, आणि पुढच्या शतकांमध्ये बांधकामाचे दगड हे लहान होत गेले. व्हिक्टोरिया टर्मिनसमध्ये चिरे वापरले आणि गेटवे ऑफ इंडियामध्ये देखील पारंपरिक चिरेबंद बांधकामाचा ठसा राखून ठेवायचा प्रयत्न होता. पण त्यानंतर बांधलेल्या अंबानी कुटुंबाच्या 'अँटीला'त दगडाचा फक्त चुरा करून पोर्टलॅंड सिमेंट वापरण्यात आले आहे. पाषाणाची खडी झाली तशीच विचारांच्या शिळेचीसुद्धा धूळ झाली. हेच आपले स्थापत्याच्या बाबतीतले मन्वंतर.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पहिले हे मुख्य माध्यम आहे. दुसरे हे भरताड (filler) आहे.

१९८० सालात भातसा धरण( धरणाची भिंत) बांधले तेव्हा दगडाच्या चुऱ्याचा वापर केला गेला. म्हणजे मोठे दगड रचून मधल्या भागंत दगडाचा चुरा सिमेंटात मिसळून भरले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिती खूप चांगली आहे.
पण "विचारांच्या शिळेचीसुद्धा धूळ झाली", हे नीट कळले नाही.
"चांगली वास्तुरचना, चांगले बांधकाम, यापेक्षा चांगला दाम हे स्थापत्याचे मूलमंत्र झाले आहे", हा शोक फक्त गेल्या काही दशकांत होतो आहे, की दर पिढीत होतो, याबद्दल कोणी अभ्यास केला आहे का?
उदाहरणार्थ, पॅरिसमध्ये आयफेल टॉवर बांधत असताना तो अतिशय कुरूप आणि कलाहीन असल्याबाबत अनेक प्रसिद्ध कलाकारांनी तक्रार केली होती.
मलाही अँटिलाची इमारत कुरूप वाटते, हे मान्य करतो. पण तिचा आकार नावीन्यपूर्ण unique आहे, हे मात्र मला जाणवते. हा आकार काटकसर दाखवतो, याबाबत काही बोलबाला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बांधकामाचा दगड आणि वास्तुरचनेचा हेतू हे दोनही घटक लहान झाले आहेत.

हे विधान अजिबातच पटले नाही. मौर्यकालीन स्तूप हे विटांचे असत. चौथ्या पाचव्या शतकातील गुप्त काळातील मंदिरांचे बांधकाम प्रामुख्याने विटांचे केले होते.. जिथे ज्याची विपुलता तशी तशी बांधकामे असत. हंपीतील कित्येक मंदिरांचे, वाड्यांचे बांधकामात विटा वापरलेल्या आजही दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे आणखी काही विचारणे कामाचे नाही. छापील माध्यमातील लेख असतात त्यातही लेखाशेवटी दिलेल्या इमेलला विचारणा करून लगेच उत्तर येते हा अनुभव घेतला आहे. (मटासोडून. कारण तिथे matasamvad@..... हा पत्ता असतो तो मेल पोहोचत नाही.)

फेसबुक पेजला उत्तर येत असेल.?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0