काळाकभिन्न

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

काळाकभिन्न

- शिरीन म्हाडेश्वर

"किती बदलली आहेत हल्लीची सलोन्स," वेटिंग एरियामध्ये 'इंडिया टुडे' चाळत वृंदाबाईंनी मनोमन विचार केला. संध्याकाळी जराशानं पाय मोकळे करायचे म्हणून बाहेर निघावं तर जान्हवीनं हट्टानं त्यांना स्वतःसोबत इथं ओढून आणलं होतं. उगा आजीचं मन रमवायला इकडेतिकडे नेत असते पोर. शेवटचं कधी गेलो होतो आपण एखाद्या पार्लरमध्ये हेसुद्धा त्यांना नीटसं आठवत नव्हतं. पूर्वी काही घरचं कार्य वगैरे असेल तर फेशिअलसाठी फेरफटका व्हायचा. वर्षा-दोनवर्षांतून एकदा. सुधाकर गेल्यापासून तेसुद्धा सुटलं. नीटनेटकं राहायचं, स्वतःची काळजी घ्यायची म्हणजे काय तर दुधाच्या सायीत बेसन आणि हळद घालून चेहरा धुवायचा नि वरून हलकंसं क्रीम. केसांचंही तसंच. आठवड्यातून एकदा बदाम आणि एरंडेलाचं तेल लावून वाफ घेतली नि न्हाऊन आलं की झालं. फिरून वेणीत घट्ट बांधले जायला वृंदाचे लांबसडक, घनदाट, काळेभोर केस तयार.

वृंदाबाई लहान असताना त्यांची आई संत्र्याच्या साली आणि शिकाकाई उन्हात वाळवत घालून, पावडर करून त्याचा लेप दर रविवारी केसांना लावून द्यायची. छोट्या वृंदाच्या काळ्याभोर गच्च केसांच्या हातात न मावणाऱ्या दोन मोठ्ठाल्या जाड वेण्या घालून देताना आईच्या कपाळावर आठ्यासुद्धा पडायच्या. वृंदाला स्वतःला न जमणारे वेणीचे वरचे दोनतीन पेड घालून झाले की आई गालातल्या गालात हसत अक्षरशः वेणी पुढे भिरकावून देत म्हणायची,

"वृंदे, अख्ख्या आठवले घराण्याचे केस डोक्यावर घेऊन जन्मलीस हो! आता नांदायला जाशील तिथे केस धुवावयास, वेणी घालून देण्यास मज नको बोलावूस."

सुधाकरना मात्र आपल्या बायकोच्या केसांचं मारे कौतुक. "वृंदा, तू प्लीज कधी केस कापू नको हं. हवं तर मी मदत करत जाईन वेणी घालायला आणि सोडवायलासुद्धा."

त्यांच्या मिश्किल डोळ्यातले खट्याळ भाव आठवले आणि स्वतःशीच हसत त्यांनी पुन्हा मासिकात लक्ष घातलं.

अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त होऊन आता पंचवीसेक वर्षं उलटली तरी तितक्याच उत्साहानं वित्तव्यवस्थेशी निगडीत एकनएक बातमी त्या वाचत असत. गव्हाळ वर्ण. उंच शिडशिडीत अंगकाठी. शिस्तीत चापूनचोपून नेसलेली कडक इस्त्रीची कॉटन कलकत्ता साडी. वयानुसार चेहऱ्यावर आलेल्या प्रौढत्वाच्या खाणाखुणा लपवायचा जराही प्रयत्न न केलेला सुरकुतलेला शांत धीरगंभीर चेहरा. त्यावरील मृदू भाव. नि या समीकरणात जराही न बसणारे, अजूनही लांबसडक, घनदाट, गच्च, काळेभोर राहिलेले वृंदाबाईंचे केस.

"अगं काय हे! एवढा शॉर्ट हेअरकट?"

लाडानं येऊन गळ्यात पडलेल्या जान्हवीचा गाल कौतुकानं कुरवाळत निघायच्या तयारीनं वृंदाबाई उठल्या.

"बाबाला आवडायचं नाही; पण वाढतील की पुन्हा! तुझीच नात आहे ना."

त्यांचं संभाषण ऐकत तिथं काउंटरवर काम करणारी जान्हवीच्याच वयाची असेल अशी मुलगी मिस्कील हसत वृंदाबाईंकडे एकटक पाहात होती.

"आजी, तुमचे केस अजूनही किती लांब आणि दाट आहेत. तुमचं तुम्हाला आता डाय करायला जमत नसेल ना? आमच्याकडे हेअरडाय करायचे छान पॅकेजेस आहेत. महिन्यातून एकदा करावं लागतं का? टचअप तरी?"

त्यांच्या केसांवर टिप्पणी करणारी बरीच मंडळी येताजाता वृंदाबाईंना भेटत. पण एखादी गोष्ट गृहीत धरून थेट मुद्यावरच येणं म्हणजे... त्या थोड्याशा अडखळल्याच.

"नाही, मी कलर करत नाही."

"मग मेहंदी लावता का? पण मेहंदीचा रंग असा इतका काळभोर कसा?" काउंटरवरच्या मुलीचा अचंबित प्रश्न.

त्यांना असं कावरंबावरं होऊन नि अडखळताना पाहून मात्र त्या मुलीला आपण उगीच नको ते बोलतोय की काय असं वाटून गेलं. इतरही शंका दाटल्या. हेअर विव्हिंग असेल? नाहीतर कॅन्सर वगैरे? विग लावला असेल का? पण एवढ्या लांब आणि गच्च केसांचा विग या वयात का कुणी लावेल?

"तुम्ही मंडळी बघावं तेव्हा असे पॅकेजेस घेऊन का येत असता?" जान्हवीच्या आवाजात राग आणि नाराजी स्पष्ट झळकत होती.

"चांगली स्कीम होती म्हणून सांगितलं. सॉरी आजी. दुसरं काही कारण असेल तर मला कल्पना नव्हती," तिनं आपला उत्साह आवरता घेतला.

"अगं बाळ, असं काहीही नाहीये. पण आम्ही निघतो आता. चल बेटा जान्हवी. घरी जाऊन मला तुझ्या आईबरोबर जेवणाचं पण बघायचंय."

वृंदाबाई तिथून लगबगीनं निघाल्या खऱ्या; पण त्या मुलीचे प्रश्न मनात घोंघावत राहिले. तिच्या केसांना मान्यता न देणाऱ्या, बुचकळ्यात पडलेल्या अशा चेहऱ्यांची एव्हाना त्यांना सवय झाली होती. तरीही अधूनमधून होणारे असे प्रसंग अस्वस्थ करायचेच.

मध्यंतरी गुडघ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा महिनाभर त्या अंथरुणाला खिळून होत्या. सगळं पूर्ववत व्हायला तर कितीतरी महिने गेले. त्या काळात सुनेची एक लांबची आत्या भेटायला आली होती. अगदी छान बोलघेवड्या बाई. खूप गप्पा मारल्या दोघींनी. पण त्यांची नजर एकसारखी वृंदाबाईंच्या केसांकडे जात होती. जाताजाता म्हणाल्या,

"हे एवढं ऑपरेशन झालं तरी केस रंगवायचं सोडलं नाहीत तुम्ही. कौतुक वाटतं या वयात स्वतःला इतकं जपता त्याचं." कौतुकानंच म्हणाल्या असतील. आवाजात कोणताही भोचकपणा नव्हता. तरीही जरा टोचलंच ते.

मागच्या वर्षी कोविडच्या लाटेदरम्यान सगळं बंद होतं तेव्हा बाजूच्या फ्लॅटमधल्या गोखलेबाई बाल्कनीतून कुणाशीतरी फोनवर बोलत होत्या. उद्मेखून थोडंसं वरच्याच पट्टीत असावं.

"पिकलं पान. नवरा नाही. तरी काय मेली हौस ती केस रंगवायची! काय ती लांब वेणी. जरा वयाकडे तरी बघावं आपल्या. नातीला लावत असतील कामाला. लॉकडाउनमध्ये सगळ्यांनी वैतागून आपापले पांढरे केस पत्करले पण यांची मात्र निराळीच तऱ्हा. कधीही बघा आजींचे केस काळे ते काळेच. अशा काळातसुद्धा प्रायॉरीटी कशाला द्यावी हे कळत नसेल तर वय वाढून उपयोग काय!" एकेक शब्द खणखणीत कानावर पडूनही ऐकल्या न ऐकल्यासारखं करत वृंदाबाई बाल्कनीत तशाच स्तब्ध बसून राहिल्या होत्या.

निसर्गाचे नियम असतात काही. लहानग्या रोपट्याचं झाड होतं. डेरेदार होतं. मग फुलाफळांनी लगडायला लागतं. वर्षं सरतात नि खोडाचं वठणं स्वाभाविक होऊन जातं. निसर्ग हळूहळू आवरतं घेत असतो. म्हाताऱ्या, वठलेल्या, आखुडलेल्या, सुकलेल्या झाडाची एकच फांदी नेहमी हिरवीगार राहिली तर? पण फरक असा की झाडांना नसतात असे चौकटीतले नियम! निसर्गाचं रूप समजायचं नि सोडून द्यायचं नाहीतर देवत्व द्यायचं आणि उदोउदो करायचा. प्रश्नार्थक भुवई उठते ती फक्त चालत्याबोलत्या माणसांसाठीच.

"आजी, कसला विचार करतेयस?" वृंदाबाई एकदम भानावर आल्या.

"जान्हवी, तू मला कधी का विचारलं नाहीस माझ्या केसांबद्दल?"

"नाही विचारावंसं वाटलं. तुला सांगायचं असेल तेव्हा सांगशील असंच वाटायचं नेहमी." एवढ्या लहान वयातही तिच्यामध्ये असलेल्या सामंजस्याचं वृंदाबाईंना खूप कौतुक वाटलं. स्वतःहून मनातलं काहीतरी सांगावंसं वाटलं.

"तुला माहीतेय जान्हवी, तुझ्या आजोबांना माझे केस खूप आवडायचे. नेहमी अशीच लांबसडक वेणी घाल असा आग्रह करायचे. केस कधी गळायचे नाहीत. आणि त्यांना आवडतात, मला स्वतःला आवडतात म्हणून कापायची कधी गरजही वाटली नाही. पण साठी झाली, सत्तरी ओलांडली तरी ना कधी एक केस गळला ना वाढायचा थांबला. मग माझं मलाच हळूहळू नवल वाटायला लागलं. आपल्यामध्ये हे काहीतरी वेगळं आहे हे समजायला लागलं. कधीकाळी भरपूर जपावेसे वाटायचे. अजूनही वाटतात. पण आता थोडे खुपायला लागलेत. केसांपेक्षा जास्त बघणाऱ्यांच्या नजरा. नजरेतले प्रश्न. नाही म्हणायला अधूनमधून इंच दोन इंच कापत असते मी. पण तुला सांगते, अगदी दुसऱ्या दिवशी अक्षरशः जादूची कांडी फिरवल्यासारखे ते दुप्पट वेगानं वाढतात. नव्या दमाने. एक वेळ मी कापून दमेन, पण माझे केस वाढायला नाही दमायचे. विलक्षण ताकद आहे त्यांच्यात. भीती वाटावी इतकी."

"आणि तुझा एकही केस कधीच पांढरा झाला नाही ना!"

"नाही गं बाळ. झाला असता तर बरं झालं असतं ना?" आजीच्या डोळ्यांत टचकन पाणी आलेलं पाहून जान्हवीनं अधिक खोलात शिरायचा प्रयत्न केला नाही.

***

"डॉक्टर, तुम्हाला नक्की वाटतं की यावर काही उपचार नाही?"

"वृंदाबाई, आपण बोललोय याबद्दल सविस्तर. तुमच्यामध्ये असा काहीही दोष नाहीये ज्यावर उपाय असावा. अकाली पांढरे झालेले केस काळे करण्याबाबत संशोधन झालंय पण एखाद्याचे केस पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये कधीच पांढरे न होणं, न गळणं, कापल्यावर लगेचच दुप्पट वाढणं यावर विशेष काही संशोधन नाही. करोडो लोकांमध्ये क्वचित एखादीच अशी केस असावी त्यामुळे क्लिनिकल हिस्टरीसुद्धा उपलब्ध नाही. आणि तसं पाहायला गेलं तर हा काही दुर्धर आजारही नाही. एका दृष्टीनं हे वरदानच म्हणावं लागेल. नाही का?"

"नव्वदीच्या उंबरठ्यावर आलेलं असताना ही अशी गोष्ट वरदान नाही राहात डॉक्टर," मानही वर न करता एक वृंदाबाईंनी एक मंद सुस्कारा टाकला आणि जमिनीकडे पाहत त्या बोलत राहिल्या.

"डॉक्टर, केस रंगवण्यामध्ये काहीही वाईट नाही हो. अतिशय वैयक्तिक निर्णय असतो तो. पण त्यासारख्या साध्या गोष्टीला मी आयुष्यात एवढं प्राधान्य देत असेन असा माझ्याबद्दलचा समज दिसला ना, की अगदी कासावीस व्हायला होतं. कुणी स्पष्ट बोलून दाखवतं, तर कुणी सूचक. काहींच्या चेहऱ्यावर दिसतं. सूनही आता पन्नाशीत आलीये. तिचेही केस पांढरे व्हायला लागलेत. गळायला लागलेत. असूया अशी नाही; पण विंचरल्यावर फणीत आलेले स्वतःचे केस बघून जरा जास्तच चिडचिड करते. अनैसर्गिक वाटावं इतकं जे विचित्र दिसतंय त्याकडे डोळे विस्फारून बघणारच ना सगळे."

"अनैसर्गिक? अहो जे जे म्हणून निसर्गानं घडवलं आहे ना, ते ते सगळं नैसर्गिक. समलिंगी संबंधांना अजूनही कित्येकजण अनैसर्गिक म्हणतात. निसर्गाचा भाग असलेल्या दोन व्यक्तींमधलं नातं माणसांनी आखलेल्या सामाजिक, सांस्कृतिक चौकटींमध्ये बसत नसेल एक वेळ. पण अनैसर्गिक नाही. तुमचे केस 'आउटलायर' असतील पण अनैसर्गिक निश्चितच नाहीत. केसांशी निगडित तुमचा एखादा जीन इतरांपेक्षा थोडासा वेगळा आहे इतकंच."

"मान्य आहे डॉक्टर; पण हे आउटलायर असणंच खटकतं. आपण सर्वांपासून वेगळं उठून दिसावं अशी इच्छा नसते कधीतरी. भवतालच्या गर्दीचा आपण एक भाग असावं, त्यात मिसळून जावं असं वाटतं. आपल्या आजूबाजूच्या माणसांनी आपल्या केसांची नोंदही न घेता आपल्याला भेटावं, आपल्याला जसं आहे तसं स्वीकारावं असं वाटतं. पण सगळ्यांची नजर आधी केसांपाशीच थांबते. तुम्हाला सांगते डॉक्टर, ऐन विशीत डोक्यावरचे सगळे केस पांढरे झाले असते तर ते तसेच घेऊन वावरण्यासाठी जे धैर्य लागलं असतं ना, त्यापेक्षा जास्त बळ मला आता लागतं. हा लांबलचक काळा पसारा घेऊन मिरवताना."

"मला पूर्णपणे समजतंय तुमचं म्हणणं आणि तुमची व्यथासुद्धा. दुर्दैवानं माझ्याकडे याचा तोडगा नाही. पण हो, एखाद्याकडून 'स्वीकारलं' जाण्याइतकी सत्ता ज्या व्यक्तींना तुम्ही देताय ती मंडळी तेवढी सक्षम आहेत का याचा विचार मात्र एकदा जरूर करा, वृंदाबाई."

काही वर्षांपूर्वी डॉक्टरांशी झालेल्या त्या भेटीनंतर वृंदाबाईंनी मनाशी ठरवून टाकलं होतं. यापुढे या विषयाचा त्रास करून घ्यायचा नाही. तसंही कित्येकांच्या तुलनेत आपली ही तगमग अगदी हृदय पिळवटून टाकणारी अशी नाहीच. पण इतकं जाणीवपूर्वक ठरवूनही कालच्या प्रसंगानंतर मात्र तोच जुना सल त्यांना पुन्हा जाणवला. एखादी दुखरी नस असावी तसा रात्रभर ठुसठुसत राहिला. पार्लरमधली ती मुलगी, सूनबाईची आत्या, शेजारच्या गोखलेबाई, मंडईत भेटणारे लोक, लग्नमुंजबारशाला भेटणारे नातेवाईक... या सगळ्यांच्या प्रश्नार्थक मुद्रांची नोंद घेत घेत किती थकलोय आपण. हो माझं वय वर्षं सत्याऐंशी आहे आणि तरीही माझ्या डोक्यावरचा एकन्एक केस कधीही न गळता अजूनही लांबलचक काळा राहिला आहे. जगातल्या असंख्य अगणित सत्यांपैकी हे ही एक सत्य नाही असू शकत?

***

पहाटे पहिल्या प्रहराच्या खूप आधीच वृंदाबाईंना जाग आली. नेहमीप्रमाणं त्यांनी चहाचं आधण ठेवलं. घरातली मंडळी उठायच्या आधी बाल्कनीत झोपाळ्यावर बसून एकटीनं चहा घ्यायचा हे आताशा त्यांचं ठरलेलंच होतं. हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीचं काचेचं दार उघडावं तर वाऱ्याची एक अलवार झुळूक आली. चित्त प्रसन्न करणारी. रेडिओवर त्यांची आवडती भूपाळी लागली होती. बाहेर अजूनही काळोख होता. स्वतःचे अतिशय आवडणारे केस पूर्ण मोकळे सोडायचं धाडस दिवसाढवळ्या त्यांना चुकूनही कधी झालं नव्हतं. त्या अंधारात मात्र त्यांना शांत निश्चिन्त वाटत होतं. कुणी रोखून पाहील अशी धुकधुक वाटत नव्हती.

काळोखाचा डोह काहीही आपलंसं करतो. उजेडाला मात्र तर्काच्या, पायंड्यांच्या, समजुतींच्या पलीकडे काहीच उमजत नाही. काळोख स्वतःमध्ये चराचर सामावून घेतो. उजेड सतत प्रश्न विचारत राहतो. स्पष्टीकरण मागत राहतो.

पहाटेच्या त्या अंधारात वृंदाबाईंनी हलकेच वेणीचे पेड सोडवले नि लांब काळ्या केसांच्या बटा त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर रुळू लागल्या. झोपाळ्यावर बसून हलके झोके घेत त्यांनी केस अजून मोकळे केले नि केसांच्या बटा वाऱ्यावर भुरभुरायला लागल्या तशी लटक्या रागानं नाक फुगवून वेणी घालणारी आई त्यांना आठवली. प्रेमभरल्या कौतुकमय नजरेनं वेणीत गुलाबाचं फूल माळणारा सुधाकर आठवला. प्रत्येक केस अजूनही लहानपणी होता तितकाच लांबसडक,काळाभोर, रेशमी तलम धाग्यासारखा. कुठेही वार्धक्याच्या चांदीचा वर्ख न लागलेला.

"आज्जी! किती सुंदर दिसतेस गं तू अशी मोकळ्या केसांमध्ये," बाल्कनीच्या दारापाशी जान्हवी डोळे चोळत उभी होती.

वृंदाबाईंचा सुरकुतलेला वृद्ध चेहरा आणि त्यावर घोट्यापर्यंत आलेले मोकळे लांब काळे केस. पण जान्हवीच्या नजरेला काहीच वेगळं भासत नव्हतं.

लहानपणापासून जान्हवीनं आजी पहिली होती ती अशीच. काळ्याभोर लांबसडक दाट केसांमधली. त्याचं विशेष नवल वाटायचं नाही. मोठं होत गेल्यावर इतरांच्या पांढऱ्या, विरळ केसांच्या आज्या दिसू लागल्या आणि हळूहळू आपल्या आजीचे केस हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे तिला जाणवायला लागलं होतं. आजी म्हणजे म्हातारी झालेली परिकथेतली लांब केसांची रॅपुन्झेल तर नव्हे असंही तिला अधूनमधून वाटे. पण आजीच्या मांडीवर डोकं ठेवून बाबाच्या नि आजोबांच्या गमतीजमती ऐकत, तिचा मऊशार लोण्यासारखा सुरकुतलेला हात लाडानं डोक्यावरून फिरला की ती चारचौघांच्या आजीसारखीच आहे याची तिला खात्री पटे.

वृंदाबाईंनी आज जान्हवीला तिथं पाहूनही नेहमीप्रमाणं लगबगीने केस बांधले नाहीत. तिच्या उरल्यासुरल्या प्रश्नावलीचं उत्तर द्यायला आज त्या तयार होत्या. पण जान्हवी हसत त्यांच्याकडे सरसावली आणि काहीच न बोवृंदा शांतपणे येऊन त्यांच्या मांडीवर झोपाळ्यावर पहुडली. आईच्या, सुधाकरच्या डोळ्यांमध्ये असायचं तेच प्रेम आज वृंदाबाईंना आपल्या नातीच्या डोळ्यांत दिसलं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणारं शुद्ध बावनकशी प्रेम. कोणतंही स्पष्टीकरण न मागणारं, एक समजूतदार शहाणीव असलेलं प्रेम. आपण जसे आहोत तसं आपल्याला असू देणारं प्रेम.

रेडिओवरच्या गाण्यात स्वर मिसळून, जान्हवीच्या माथ्यावर हलके हलके थोपटत मोकळ्या केसांमध्ये वृंदाबाई मंद गुणगुणू लागल्या. उजाडायला सुरुवात झाली होती. स्वतःचा प्रत्येक काळाकभिन्न केस अखेरीस आज लख्ख उजेडात वृंदाबाईंनी स्वतः मान्य केला होता.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

छान कथा.
फार आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0