संदिग्धता हा साहित्यगुण असतो का?

'सध्या काय वाचताय?' या धाग्यावरचा हा प्रतिसाद पाहून काही मुद्दे डोक्यात येत होते. त्या संदर्भात हे मुक्तचिंतन. 'द सेन्स ऑफ अ‍ॅन एंडिंग' ह्या पुस्तकाबद्दल लिहिताना 'शेवटपर्यंत उत्कंठा टिकवून ठेवली आहे; पण सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.' अशी प्रतिक्रिया वाचताच माझ्या डोक्यात 'म्हणजे चुकीचे प्रश्न विचारताय की काय?' अशी पृच्छा आली. त्याचं कारण थोडक्यात (आणि पुस्तकातले रहस्यभेद टाळून) असं देता येईल -

हे पुस्तक कशाबद्दल आहे? आपल्या आयुष्यात तरुणपणी घडलेल्या काही घटनांचा आपल्या डोक्यात जो नि:संदिग्ध असा अन्वयार्थ होता त्याची वैधता संशयास्पद आहे, असा साक्षात्कार एका वयस्कर माणसाला त्याच्या आयुष्याच्या जवळपास अखेरीला होतो. किंबहुना 'काहीतरी घडलं' ह्या पलीकडे जाणं, म्हणजे घटिताचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणं, किंवा त्यातल्या व्यक्तींच्या कृतींमागचे कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न करणंच व्यर्थ आहे की काय, असं त्याला अखेर वाटू लागतं. जगताना काहीएक तत्त्वं किंवा मूल्यव्यवस्था प्रमाणभूत मानून आपल्या कृतींसाठी त्यांचा आधार घेणं फोल आहे किंवा अशक्य आहे असं त्याला वाटू लागतं. त्याऐवजी माणसं त्या त्या वेळी जमेल तसं (हवं तसं किंवा वाटेल तसं नव्हे, तर जमेल तसं) वागत राहतात आणि नंतर त्या सगळ्यातून आपण तत्त्वं किंवा मूल्यं असं शाश्वत काहीतरी शोधत राहतो; पण मुळातच जगण्याला सुसूत्रता नसल्यामुळे ती सापडत नाहीत – किंवा सापडली असं वाटलंच तर त्या वाटण्यात आपण आपलीच फसगत करून घेत असतो असं भान कादंबरीच्या प्रथमपुरुषी निवेदकाला अखेर येतं.

आता असा ज्याचा सूर आहे अशा पुस्तकात नक्की काय काय घडलं ते किंवा पात्रांच्या वर्तनामागचा कार्यकारणभाव जर अखेरपर्यंत अव्यक्त किंवा अनिश्चित राहिला असेल तर तो पुस्तकाचा गुण समजावा की दोष?

असा गहन आशय असूनही कादंबरी बऱ्यापैकी रंजक करणं लेखकाला जमलेलं आहे हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, चार मित्रांचं हे वर्णन पाहा -

अॅलेक्सनं जर विटगेनस्टाईन आणि रसेल वाचला असेल, तर एड्रियननं काम्यू आणि नित्शे वाचला होता. मी जॉर्ज ऑरवेल आणि अॅल्डस हक्सली वाचला होता; कॉलिननं बोदलेर आणि दोस्तोयव्हस्की वाचला होता. हे फक्त किंचित अर्कचित्र आहे. होय, अर्थात आम्ही अहंमन्य होतो. पण नाहीतर तारुण्याचा उपयोग काय?

पण कादंबरी रंजक करण्यात एक धोका असतो. तो म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट असणाऱ्या वहिवाटीची ही साहित्यकृती आहे असा वाचकाचा समज होतो आणि अखेरीला सगळं स्पष्ट होईल अशी अपेक्षा ठेवून तो ते वाचतो. मग वर उल्लेख केल्याप्रमाणे अपेक्षाभंग होऊ शकतो.

पण मग अशी अपेक्षाच अवाजवी असते का, असा प्रश्न मनात आला. अन् तेवढ्यात हा लेख वाचनात आला. कलाकृतीनं सुरुवातीला थोडं गोंधळात पाडलं तर ते चालू शकतं, पण अखेरीला सगळं स्पष्ट झालं पाहिजे अशी बहुतेकांची अपेक्षा असते. पण अर्थाच्या व्यामिश्रतेलाच त्यामुळे मर्यादा पडतात. संदिग्धतेची आपल्याला इतकी भीती का वाटते, असा प्रश्न या लेखात उपस्थित केला आहे. जगताना पुढे काय होणार हे माहीत नसतं; भूतकाळातही लोक नक्की का आणि कसे वागले याविषयी आपण नि:संदिग्ध नसतो. मग जगतानाचा हा संभ्रम साहित्यात का नकोसा वाटावा, असं म्हणत लेखक काही पाश्चात्य लेखक आणि त्यांच्या साहित्यातल्या संदिग्धतेचे दाखले देतो. वर तो असंही म्हणतो की संदिग्धतेमुळे एखादी कादंबरी आपल्याला अधिक विचारात पाडते आणि त्यामुळे ती आपल्यावर खोलवर परिणाम करून जाते.

याविषयी इथल्या वाचकांना काय वाटतं? संदिग्धतेमुळे दीर्घकाळ तुमच्या मनात रुतून राहिलेल्या साहित्याची अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

जे उघडपणे किंवा सुस्पष्टपणे व्यक्त केले आहे त्याच्यापलिकडे जाणारी आणि असे करताना कलाकृतीचा आस्वाद घेणारयाला विचार करायला प्रवृत्त करायला लावणारी कलाकृती मला नक्कीच अधिक प्रभावी वाटते; पुस्तकापेक्षा कला़कृती म्हणते आहे कारण कोणत्याही माध्यमासाठी हे लागू होते असे मला वाटते. संदिग्धता असल्याने आस्वादकाला कलाकृतीत अधिक डुंबता येते, अस्पष्ट जागांवर स्वतःचे अर्थ भरता येतात, कलाकाराला ते तसेच अभिप्रेत होते किंवा नाही या कसोट्यांवर स्वतःला पडताळून पहाता येते आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो त्या कलाकॄतीच्या अधिक जवळ जातो असे मला वाटते. शिवाय विचारांची परिपक्वता वाढेल तसतसे वयाच्या वेगवेगळ्या वळणांवर एकाच कलाकृतीचे वेगळे भान येऊ शकते आणि त्या कलाकृतीचा पुन्हापुन्हा आस्वाद घेता येऊ शकतो.

अर्थात नुसती संदिग्धताच असूनही चालत नाही कारण कलाकाराने काही ठिकाणी आस्वादकासाठी काही क्लूज ठेवलेले असावे लागतील किंवा पकड घेण्यासारखी शैली किंवा रंजकता असावी लागेल नाहीतर आस्वादकाचा त्यातला उत्साहच संपूनच जाऊ शकेल (हे आपले माझे मत). त्यामुळे संदिग्धतेपेक्षा अमूर्तता हा साहित्यगुण असू शकेल असे वाटते.

गंमत म्हणजे तुम्ही दिलेली लिंक उघ्डण्याआधी या विषयावरचे जे Usual Suspects मनात आले होते तीच उदाहरणे लेखकाने समोर ठेवली आहेत.

या व्यतरिक्त मला जे. एम. कूट्सी चा उल्लेख करावासा वाटतो. त्यांची फो(Foe), इन द हार्ट ऑफ द कंट्री वगैरे पुस्तके मनात अनेक दिवस रुतून बसली होती (खासकरून फो). विल्यम गोल्डिंग फार संदिग्ध आहे असे नाही पण विचार करायला प्रवृत्त नक्कीच करतो, 'द डबल टंग' सारखे रंजक पुस्तकही खूप विचार करायला लावते, वेगवेगळया संदर्भात ते पुस्तक हटकून आठवते, त्यामागची लेखकाची मांडणी सुस्पष्ट आहे पण एकच साधी गोष्ट कधीकधी अनेक गुंतागुंतीचे परस्परसंबंध, अनेक वेगवेगळ्या संदर्भात अधोरेखित करतात हा महत्वाचा भाग वाटतो, इथे संदिग्धतेपेक्षा अव्यक्त सुस्पष्टता अधिक अभिप्रेत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा आणि वरील रुची यांचा प्रतिसाद दोन्ही अतिशय रोचक. जमेल तसं लिहितो.

खूप मागे "नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्" या चित्रपटाबद्दल लिहिलं होतं त्यावेळी एका सभासदाबरोबर अगदी याच मुद्द्यावर चर्चा झाली होती :
http://mr.upakram.org/node/1099#comment-18332

त्या सभासदाचं वाक्य : "शेवट पर्यंत उत्कंठा ताणून धरुन तिथेच संपवला जातो. उगीचच प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरुन शेवटी 'शेवट निर्णायक चितारायचाच नाही' हे काही झेपले नाही."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

विषय प्रचंड अाहे. पण फार खोल चिखलात न रुतता सुचलेले काही मुद्दे मोघमपणे लिहितो.

जीवन संदिग्ध असतं अाणि तिथे नीट शेवट नसतात वगैरे मान्य. पण साहित्य म्हणजे जीवन नव्हे. त्या दोहोंचा संबंध काय असतो यावर बराच काथ्याकूट करता येईल, पण साहित्य ही मुद्दाम केलेली रचना असते अाणि त्यात craft चा भाग असतो यावर दुमत होऊ नये. उदाहरणार्थ, पारंपारिक रहस्यकथा किंवा पारंपारिक (सुखान्त असणारी) प्रेमकथा हे मानवनिर्मित प्रकार अाहेत अाणि नीटनेटका शेवट असणं हा त्यांच्या अंगभूत संकेताचा भाग अाहे. तेव्हा या संकेतांविरुद्ध भांडणं हे काहीसं विटीदांडूच्या नियमांविरुद्ध भांडण्यासारखं अाहे. (नियम अावडत नसतील तर दुसरं काहीतरी खेळा, किंवा स्वत:चा नवा खेळ तयार करा.) हे संकेत स्वीकारणाऱ्यांना जीवनातल्या संदिग्धतेची 'भीती' वाटते असं मुळीच नाही. ह्या संदिग्धतेची त्यांना जाणीव असते, पण ती कुठे 'वापरायची' अाणि कुठे नाही याचंही त्यांचं judgment असतं.

मला एक शंका अशी अाहे की शेवट स्पष्ट अाणि नीटनेटका असणं हा संकेत प्रबळ (dominant) असल्यामुळेच ज्या साहित्यकृती तो झिडकारतात त्या उठून दिसतात. जर प्रत्येकानेच संदिग्ध लिहायचं अाणि शेवट अधांतरी सोडून द्यायचं ठरवलं तर असंदिग्ध साहित्याचा भाव एकदम वधारेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

हा प्रश्न विचारण्याकरिता "द सेन्स ऑफ अ‍ॅन एन्डिंग" कादंबरी लोकस स्टँडी होऊ शकते की नाही? कादंबरीबाबत दुवा वाचून हे काही कळले नाही.

दुव्यानुसार कादंबरी "भाग एक" आणि "भाग दोन" अशा दोन विभागांत लिहिलेली आहे. पहिल्या भागात कथानायक एक कथानक सांगतो. दुसर्‍या भागात कथानायक त्याच आयुष्यातील घटनांपासून वेगळे कथानक गोवतो.

यावरून अदूर गोपालकृष्णन् च्या "अनन्तरम्" चित्रपटाबद्दलची ऐकीव माहिती आठवली. चित्रपटात मध्यंतरापूर्वी कथानायकाच्या आयुष्यातील काही घटना गोवून अथपासून इतिपर्यंत कथानक सांगितले जाते. त्यावरून अन्य पात्रांबाबत आपली काही धारणा होते, घटना सुसूत्र वाटून कथा पूर्ण झाल्यासारखे वाटते. मध्यंतरानंतर कथानायकाच्या आयुष्यातल्या मधल्यामधल्या घटनांचे कथानक आपल्याला कळते. या मधल्या घटना कळल्यामुळे पात्रांबाबत आपली आदली धारणा कमालीची बदलते. ही कथा संपल्यानंतर अजून एक दृश्य शेवटी दाखवले आहे. चित्रपटातला एक मुलगा नदीच्या घाटावरच्या पायर्‍यांवर एकटाच खेळत असतो. आधी एक-तीन-पाच असे आकडे म्हणत एखाद-दुसरी पायरी सोडत उड्या मारतो. मग पुन्हा सुरुवात करून दोन-चार-सात... अशा वेगळ्या पायर्‍यांचे क्रमांक म्हणत उड्या मारतो. सारांश असा की चित्रपटात सांगितलेल्या दोन पर्यायी कथांपेक्षाही वेगळे पर्याय असू शकतात... जीवन संदिग्ध असते... परंतु या चित्रपटातही "जीवन संदिग्ध असते" हे पटवून दिलेले आहे, आणि आणि हे रचनेचे सुयोग्य इतिवाक्य आहे.

राशोमोन चित्रपटातही जंगलात नेमके काय झाले हे शेवटपर्यंत संदिग्ध राहाते. तरी चित्रपट संपतो तेव्हा "रहस्य संदिग्ध राहिले, तरी जे दिग्दर्शकाला या रचनेत म्हणायचे होते, ते त्याने पूर्णपणे म्हटले" हे स्पष्ट होतेच.

"द सेन्स ऑफ अ‍ॅन एन्डिंग" मध्ये "जीवन संदिग्ध आहे" हा बोध असेल, पण कादंबरीचा शेवट रचनेच्या दृष्टीने अपूर्ण आहे, असे दुव्यावर वाचायला मिळाले नाही.

अगदी "मग ते सर्व सुखासमाधानाने राहू लागले" असे वाक्य परीकथेच्या शेवटी लिहिले असले तरी सर्व प्रश्न संपल्याची शाश्वती नसते. (हिमगौरीची सावत्र आई अशी दुष्ट कशी बरे झाली?) जेन ऑस्टेन, चार्ल्स डिकन्स वगैरे मंडळी कादंबरीच्या शेवटच्या प्रकरणात पात्रांच्या पुढच्या आयुष्याचा गोषवारा देतात. पण गोषवारा हा आदल्या गुंतागुंतीपेक्षा उथळ आहे, हे कधीकधी ते लेखकच म्हणतात. पूर्णपणे नि:संदिग्ध समाप्ती पारंपरिक कथानकांतसुद्धा क्वचित कुठे सापडते.

आणि संदिग्धता हेच कथानक बनवणार्‍या लेखकाला सुद्धा शेवटचे वाक्य लिहिताना काही कल्पना द्यावी ही छापील मजकूर खरोखर संपला, आणखी पाने होती ती फा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अर्थात नुसती संदिग्धताच असूनही चालत नाही कारण कलाकाराने काही ठिकाणी आस्वादकासाठी काही क्लूज ठेवलेले असावे लागतील किंवा पकड घेण्यासारखी शैली किंवा रंजकता असावी लागेल नाहीतर आस्वादकाचा त्यातला उत्साहच संपूनच जाऊ शकेल (हे आपले माझे मत). त्यामुळे संदिग्धतेपेक्षा अमूर्तता हा साहित्यगुण असू शकेल असे वाटते. <<

ह्याच्याशी सहमत. मात्र संदिग्धता आणि अमूर्तता यांत मी फरक करेन. उदाहरणार्थ - 'कोसला'मध्ये सांगवीकर रस्त्यावर मेलेल्या जनावराच्या धुडावर घोंगावणाऱ्या माशांचं वर्णन करतो - हयात अमूर्तता आहे असं कदाचित म्हणता येईल, कारण ह्या प्रतिमेचा सांगवीकराच्या 'गोष्टी'शी संबंध नाही. पण सांगवीकराची बहीण मेलेली आहे हे नि:संदिग्धपणे आणि हे वर्णन येण्याआधी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. ह्या प्रतिमेचा त्या घटनेशी संबंध लावण्याची जबाबदारी वाचकाची आहे. हयाउलट जर नक्की काय घडलं आहे हेच स्पष्ट नसेल, किंवा कार्यकारणभाव स्पष्ट नसेल तर त्याला मी संदिग्धता म्हणतो आहे. त्या दृष्टीनं धनंजयचा 'राशोमॉन'चा किंवा 'अनंतरम'चा दाखला संदिग्धतेसाठी अधिक योग्य आहे.

>>पारंपारिक रहस्यकथा किंवा पारंपारिक (सुखान्त असणारी) प्रेमकथा हे मानवनिर्मित प्रकार अाहेत अाणि नीटनेटका शेवट असणं हा त्यांच्या अंगभूत संकेताचा भाग अाहे. तेव्हा या संकेतांविरुद्ध भांडणं हे काहीसं विटीदांडूच्या नियमांविरुद्ध भांडण्यासारखं अाहे. (नियम अावडत नसतील तर दुसरं काहीतरी खेळा, किंवा स्वत:चा नवा खेळ तयार करा.) <<

हे बरोबर आहे; त्यामुळेच पारंपरिक रहस्यकथा किंवा प्रेमकथा यांपेक्षा वेगळी कथनं (नॅरेटिव्ह्ज) (उदा : स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस) विसाव्या शतकात जन्माला आली. त्यांनी कथनाचे हे जाचक नियम (नीटनेटका शेवट वगैरे) बदलले.

>>शेवट स्पष्ट अाणि नीटनेटका असणं हा संकेत प्रबळ (dominant) असल्यामुळेच ज्या साहित्यकृती तो झिडकारतात त्या उठून दिसतात. जर प्रत्येकानेच संदिग्ध लिहायचं अाणि शेवट अधांतरी सोडून द्यायचं ठरवलं तर असंदिग्ध साहित्याचा भाव एकदम वधारेल.<<

मला असं वाटतं की हा संकेत प्रबळ असण्यामागे बहुसंख्य वाचकांच्या अपेक्षा तशा असण्याचा भाग आहे. इयन मक्युवन किंवा स्टीग लार्सनसारखे लेखक हे संकेत पाळून लोकप्रियता आणि रसिकप्रियता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात, तर इतर काही जण ते झिडकारतात. संकेत झिडकारले की लोकप्रियतेत घट होते. मग अशा अल्पसंख्य साहित्याला उठून दिसण्यासाठी वेगळे काही गुण अंगी असावे लागतात असं म्हणता येईल. निव्वळ संकेत झिडकारून लक्ष वेधून घेणंही आता संकेत झिडकारण्याइतकंच जुनं झालं आहे असं वाटतं.

>>"द सेन्स ऑफ अ‍ॅन एन्डिंग" मध्ये "जीवन संदिग्ध आहे" हा बोध असेल, पण कादंबरीचा शेवट रचनेच्या दृष्टीने अपूर्ण आहे, असे दुव्यावर वाचायला मिळाले नाही.<<

असं माझंही मत नाही. कारण? कारण निवेदकाला अखेर ही जाणीव होते की घटिताचे सर्व तपशील आपल्याला मिळणार नाहीत; इतकंच नव्हे, तर ते शोधण्याचा आटापिटाच व्यर्थ आहे. 'माझ्याकडून झालेल्या काही चुका मला समजल्या असं वाटतंय, पण आणखी काय काय चुकलं असेल?' असा प्रश्न निवेदकाच्या मनात रेंगाळत राहतो. आयुष्य लांबत जातं तशा आयुष्यातल्या न समजलेल्या गोष्टी साठत जातात; त्यांमागची आपली जबाबदारी वाढत जाते : समजल्या असत्या तर आपण काहीतरी वेगळं वागलो असतो आणि आपल्यामुळे घटनाक्रम बदलला असता ही जाणीव आणि म्हणून आलेली - म्हणजे आपलं आकलन कमी पडलं म्हणून असं घडलं ही - आलेली जबाबदारीची जाणीव. आणि त्यातून आपली अस्वस्थता वाढत जाते ही जाणीव निवेदकाला होते. निवेदन सुरू होतं तेव्हा ही जाणीव त्याला नसते. ह्या जाणिवेनं तो अधिक प्रगल्भ होतो. अपूर्णतेची जाणीव हे एक प्रकारचं पूर्णत्व म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संदिग्धता हा साहित्यगुण असतो का?

माझ्या मते होय..

या गुणाचा उपयोग लेखकाने कसा केला आहे त्यावर तो त्या लेखनापुरता सद्गुण/दुर्गूण म्हणता यावा Smile म्हणजे काही वेळा या गुणामुळे रसभंग होऊ शकतो तर काहीवेळा या संदिग्धतेतच अधिक रसनिष्पत्तीची शक्यता असते / वाढते.

हा केवळ लेखनातच नाही तर बहुतांश कलाकृतीतील गुण असावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लघुकथांमध्ये प्रस्तावात अपेक्षित संदिग्धता वारंवार आढळते. कादंबरी शारीर पातळीवर ज्या बिंदूवर संपते तेव्हा कादंबरीतील पात्रं, कथानक संदिग्धावस्थेत आहेत किंवा नाहीत यामुळे कादंबरीच्या आस्वादात काही फरक पडतो असे मला क्वचितच जाणवले आहे. संदिग्धता हा गुण-अवगुण यावर चर्चा करावी असे काही आहे की निव्वळ कादंबरी/कलाकृतीच्या तंत्राचा एक भाग म्हणून त्याबद्दल वाचक/आस्वादकसापेक्षता स्विकारून टाकावी याविषयी मी संदिग्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुकताच Netflix वर Footnote नावाचा इस्रायली चित्रपट पाहिला आणि प्रस्तुत धाग्याच्या संदर्भात त्याची आठवण झाली.

चित्रपटाचे कथानक येथे पाहता येईल. एकाच क्षेत्रात काम करणार्‍या वडील-मुलगा अशा दोन प्राध्यापकांमधील ताणतणावांची ही कथा आहे. आपल्याहून आपला मुलगा अधिक लौकिक यश मिळवलेला आहे ह्याची वडिलांना असूया वाटते. आपल्या वडिलांच्या कामाची पुरेशी दखल घेतली जात नाही असे मुलाला मनोमन वाटते आणि त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान त्यांना मिळावा ह्यासाठी तो आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहे. त्या वर्षीचा सन्मान मुलाला द्यायचे ठरते पण काही चुकीमुळे तो वडिलांच्या नावे जाहीर केला जातो. हळूहळू ही गोष्ट दोघांच्याहि ध्यानात येते. अखेर पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर कोण जातो हे दिग्दर्शकाने संदिग्ध ठेवले आहे.

२०१२ च्या ऑस्करच्या Best Foreign Language Film गटात अखेरच्या यादीपर्यंत हा चित्रपट पोहोचला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>संदिग्धतेमुळे दीर्घकाळ तुमच्या मनात रुतून राहिलेल्या साहित्याची अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का?<<

याची काही उत्तरं वर मिळाली. उदा : कूट्झी, गोल्डिंग (साहित्य), अनन्तरम्, राशोमॉन (चित्रपट). मराठीत अशी काही उदाहरणं कुणी सांगू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>संदिग्धतेमुळे दीर्घकाळ तुमच्या मनात रुतून राहिलेल्या साहित्याची अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकाल का?<<

एक 'चुकीच्या प्रकारच्या' संदिग्धतेमुळे लक्षात राहिलेलं उदाहरण अाहे. 'रणांगण' या कादंबरीमध्ये चक्रधर अाणि हॅर्टा एकमेकांशी कुठल्या भाषेत बोलतात हे मला कधी कळलेलं नाही. सगळ्या नैसर्गिक शक्यता बेडेकरांनी स्वत:च बंद करून टाकलेल्या अाहेत. ती एकदा म्हणते की मला इंग्रजी येत नाही, अाणि तो म्हणतो की मला जर्मन किंवा फ्रेंच येत नाही. ती युरोपियन असल्यामुळे मराठी हा पर्याय नाही. मग आता काय राहिलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

वर बर्याच जणांनी म्हटलच आहे की संदिग्धता हा कोणत्याही कला कृतींचा गुण धरला जाऊ शकतो. कवितांमध्ये माझ्यामते या गुणाचा वेगवेगळ्या प्रकारे (कवितेतल्या गोष्टित सुरुवात, शेवट, अर्थं याबाबत संदिग्धता) उपयोग केलेला असतो.

संदिग्धतेचा जवळ जवळ अजिबात वापर न केल्याचं उदाहरण म्हणून 'घरोंदा' हा चित्रपट मला द्यावासा वाटतो. कथेत येतं तशी (म्हण्जे सामान्यत: आपल्याला पुढे काय होईल याबद्द्ल लेखक कधी दिशाभूल करतो, किंवा अनेक शक्यता समोर ठेवतो, मग आपण उस्तुकतेने काय होईल याची वाट पाहातो वगैरे...पण यात अगदीच प्रेडिक्टेबल आहे सगळं) 'शब्दशः' या चित्रपटातली पात्र वागतात. मला तरी हा, या गुणाच्या अभावामुळे, फसलेला चित्रपट वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मृणाल सेन दिग्दर्शित १९८३ मधील "खंडहर" सिनेमा संदिग्ध होता अशी आठवण आहे. किंबहुना तो त्यामुळेच लक्षात राहीला.
http://omarsfilmblog.blogspot.com/2011/05/kandahar-ruins-dir-mrinal-sen-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदिग्धता किंवा अनपेक्षितता हा नक्कीच गुण आहे.
आता एखाद्या रागात मला जे दिसेल ते दुसऱ्याला दिसेल असे नाही पण overall मूड किंवा रिझल्ट तसा सेमच असतो .
शब्द हे सगुण, त्यांना त्याचा अर्थ आहे पण सुरांना नाही,तो अर्थ ऐकणाऱ्याने लावायचा.(पुलंचे एक वाक्य असे काहीसे होते की गवई तरी वेगळे काय करतो ?सा लावतो मग रे लावतो आपल्याला वाटते आता कोमल गंधार लावेल पण तो डायरेक्ट पंचमावर जातो त्यावेळेला मिळते ते अनपेक्षिततेचे सुख आणि अपेक्षाभन्गाचा आनंद ! प्रत्येक कलाकृतीत असा थोडा फार भाग असतोच,अन्यथा पूर्णपणे ते पुस्तक बांधून पण ठेवू शकणार नाही आणि आपण वाचणार नाही .
जर का संपूर्णपणे प्रेडी़क्टेबल ठेवले किंवा २+२=४ असे ठेवले तर गोष्ट कलाकृती न राहता नियमांनी बांधलेले गणित होऊन जाईल.
अस्पष्टसे नियम हे काहीसे मिठाच्या प्रमाणासारखे म्हणता येतील वापर परफेक्टच झाला पाहिजे, कमी जास्त होऊन मजा जाईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वेटींग फॉर गोदो" - पार डोक्यावरुन गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाप्रस्ताव तसंच रुची, जयदीप, धनंजय आणि चिंजंचे प्रतिसाद आवडले.

'पिपात मेले ओल्या उंदिर' देखील रूपकात्मक असल्यामुळे दुर्बोध असल्याचा आरोप झाला. या प्रकारच्या दुर्बोधतेला संदिग्धता म्हणता येईल का? माझ्या मते हो.

संदिग्धता आणि रूपकात्मकता यात कधीकधी गल्लत होण्याचा संभव असतो. उत्तम लेखक निव्वळ रूपकांतच बोलतो, त्यामुळे त्या कथेत/कवितेत नक्की अमुक का झालं याचा प्रश्न पडू शकतो. मात्र त्या रूपकांचा अर्थ लावला (हा एकाच प्रकाराने लावता येतो असं नाही - किंबहुना अनेक समर्थ अर्थ लावता येणं हे कलाकृतीचं बलस्थान आहे) तर काहीतरी हाती लागू शकतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0