द लास्ट ऑफ द जांगिल्स

"फाऊंड फूटेज" प्रकारचे सिनेमे तुम्ही कदाचित पहिले असतील - ब्लेअर विच प्रोजेक्ट वगैरे. त्यामुळे "फाऊंड नोटबुक" बद्दल सांगितलं तर तुम्हाला ते कपोलकल्पित वाटायची शक्यता आहेच. पण तरीही ही गोष्ट सांगायचं मी ठरवलं. नाहीतर या लॉकडाउनमध्ये त्या वहीचा विचार करकरून माझं डोकं दुखू लागेल.

तर, या गोष्टीची सुरुवात २०१८ मध्ये झाली. नोव्हेंबरमध्ये मी रशियात गेलो होतो, आमच्या डॉक्युमेंटरीच्या स्क्रिनिंगसाठी. सेंट पीटर्सबर्गमध्ये आयोजकांनी आमची राहायची उत्तम सोय केली होती - ऐतिहासिक हॉटेल 'अक्त्याबरस्काया'मध्ये. पण मॉस्कोत मात्र मी एका एअरबीएनबीमध्ये राहिलो होतो. दुपारचं स्क्रिनिंग आटपून एअरबीएनबीला परतताना मी एका दुकानात थांबून चीझ, ब्रेड आणि रेड वाईनची बाटली विकत घेतली. घरी पोहोचल्यावर जाडजूड बूट, लोकरीचा जाड ओव्हरकोट आणि स्वेटर काढून टाकून थोडा वेळ नुसताच बसलो. मग चहा करून प्यायलो, आणि दुपारच्या कार्यक्रमात भेट मिळालेलं पुस्तक चाळत बसलो. नऊ वाजले तेव्हा जेवायची तयारी सुरू केली. ब्रेड-चीझ एका प्लेटमध्ये काढून घेतलं, आणि वाईनची बाटली उघडण्यासाठी कॉर्कस्क्रू शोधू लागलो. किचन धुंडाळलं पण नो लक. मग होस्टला एअरबीएनबी ऍपवरून मेसेज करून विचारलं. "आय डोन्ट नो मॅन, परहॅप्स देअर माईट बी वन इन द बाल्कनी." त्याचा त्रोटक मेसेज आला.

रशियातल्या बाल्कनी म्हणजे अलिबाबाची गुहा आणि बुलडोझर फिरवलेलं सुपरमार्केट यांचा संगम असतो. जुने व्हॅक्युम क्लिनर, बटाट्याची पोती, तुटलेलं फर्निचर, काहीही तिथे सापडू शकतं. कॉर्कस्क्रू शोधताना कायकाय सापडत होतं - स्टॅम्पचे आल्बम, पायोनियरचे बिल्ले. अचानक मला एक सुबक वही दिसली. कुतूहलाने ती बाहेर काढून हॉलमध्ये ठेवली आणि परत कॉर्कस्क्रू शोधू लागलो. पंधरा मिनिटं शोधूनही कॉर्कस्क्रू सापडला नाही तेव्हा स्वत:लाच शिव्या देत मी किचनमध्ये आलो. वाईन फ्रिजमध्ये ठेवून, घरी नेण्यासाठी घेतलेली रुस्की स्तान्दार्द वोदकाची बाटली बबलरॅपमधून काढली आणि जेवायला बसलो. जेवण झाल्यावर टीव्ही लावायच्याऐवजी ती बाल्कनीतली वही घेऊन ती चाळू लागलो, आणि वोदकाची नशा ताबडतोब उतरली.

त्या वहीत पानंच्या पानं भरून लिहिलेली टिपणं होती. पहिल्या पानावर सुबक पण थरथरत्या अक्षरात लिहिलेलं नाव होतं - प्योत्र वासिल्येव. ती टिपणं म्हणजे बहुतेक लेखकाने आत्मचरित्रासाठी काढलेल्या नोंदी असाव्यात. रशियनचं माझं जुजबी ज्ञान आणि कर्सिव्ह हस्ताक्षर ओळखायला करावी लागणारी कसरत यामुळे ऑनलाईन यांडेक्स डिक्शनरीत बघत अर्थ लावून तो माझ्या लॅपटॉपमध्ये टाईप करायला फार वेळ लागत होता. तीनपर्यंत जागून मी बारा पानंच पूर्ण करू शकलो. पुढचे दोन दिवस सकाळ-संध्याकाळ बसून मी अनुवादाचा कच्चा मसुदा पूर्ण केला. तात्पुरतं शीर्षक होतं - "द लास्ट ऑफ द जांगिल्स".

आता "द लास्ट ऑफ द जांगिल्स" हे नाव जे फेनीमोर कूपरच्या "द लास्ट ऑफ द मोहिकान्स"वरून सुचलं असं तुम्हाला वाटलं असेल तर ते खरंच आहे. त्या क्षणी मला खरंच दुसरं शीर्षक सुचलं नाही. तर, त्या वहीतल्या नोंदी आणि त्या संदर्भात गूगल करून मिळालेली माहिती, यांवरून एकसंध केलेली ही प्योत्र वासिल्येवची गोष्ट.

सोविएत नौदलाचं मध्यम आकाराचं एक जहाज पॅसिफिक महासागरातून हिंदी महासागरात आलं होतं. मलाक्काच्या सामुद्रधुनीतून वायव्येच्या दिशेने बाहेर पडल्यावर वाऱ्यांची दिशा पाहून कप्तान इवान चेरनेन्कोने आधी उत्तरेला जाऊन नंतर डंकन पॅसेजमधून पश्चिमेला जाण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या हा ब्रिटिश भारताच्या अखत्यारीतला समुद्र होता, पण रटलँड बेटाच्या तीन किलोमीटर दक्षिणेला या सुदूर ठिकाणी गस्त घालणारी ब्रिटिश जहाजे असायची शक्यता फारच कमी होती.

सोविएत जहाज लाटा कापत चाललं होतं, आणि अचानक डोलकाठीवरच्या खलाशाची आरोळी आली, "बोट अहेड." ड्युटी ऑफिसर फर्स्ट मेटने आपल्या दुर्बिणीतून पाहिलं, तेव्हा लाटांवर हिंदकळणारी बोट त्यालाही दिसली. बोट कसली, लहानसं होडकं होतं ते. तेही कोणत्या विशिष्ट दिशेने जात नव्हतं, एकाच जागी लाटांवर वरखाली डचमळत होतं.

फर्स्ट मेटने कप्तानाला कळवलं आणि त्याच्या आदेशानुसार एक लाईफबोट घेऊन तो आणि दोन खलाशी त्या होडक्याकडे गेले. होडक्यात एकच माणूस निपचित पडला होता. त्याचा श्वास चालू आहे हे तपासून फर्स्ट मेटने त्याला आपल्या लाईफबोटमध्ये ठेवून जहाजावर आणलं, आणि कप्तानाला रिपोर्ट दिला:

"कॉम्रेड कप्तान, होडक्यामध्ये एक व्यक्ती आढळली. पुरुष. आफ्रिकन वंशाचा असू शकेल. उंची सुमारे पाच फूट. वय सुमारे पंधरा वर्षं. तो बेशुद्ध आहे त्यामुळे अधिक चौकशी करता आली नाही."

कप्तानाने आपल्या पाईपचा झुरका घेतला आणि पुढील सूचना दिल्या, "त्याला डेकवर सावलीत ठेवा. शक्य असल्यास पाणी पाजा. त्याच्या जवळपास कोणीही धूम्रपान करू नका."

कप्तानाच्या सूचनांचे अर्थातच पालन झाले. सापडलेल्या मुलाला थोड्याथोड्या वेळाने पाणी देण्यात आले. दोन तासांनंतर त्याला जाग आली, पण उठून बसायचे त्राण त्याच्यात नव्हते. भेदरलेल्या डोळ्यांनी तो इकडेतिकडे बघत होता. कप्तानाने आणि खलाशांनी त्याच्याशी इंग्रजी, फ्रेंच आणि चिनीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्या भाषा कळत नव्हत्या असे भासले.

त्याच्यासाठी थांबून राहणे शक्यच नव्हते. कप्तानाने निर्णय घेतला, "आपला प्रवास चालू ठेवा. याचं काय करायचं ते नंतर बघू."

हिंदी महासागर पार करून, केप ऑफ गुड होपला वळसा घालून जहाज उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. एव्हाना त्यांना सापडलेला मुलगा उठून बसू शकत होता. त्याला दिलेल्या खलाशांच्या शिध्याला त्याने हातही लावला नाही. पण खलाशांनी कधी ताजे मासे पकडले तर मात्र तो भाजलेले मासे खात असे. हे कळल्यावर त्याच्यासाठी रोज मासे पकडण्याचा उद्योग खलाशांनी सुरू केला. आपल्याला ठाऊक असलेली कोणतीही भाषा त्याला येत नाही हे कळल्यावर खलाशांनी त्याला जहाजावरच्या गोष्टी दाखवून त्यांचे रशियन शब्द शिकवायला सुरुवात केली. त्यातील काही शब्द तो मुलगा लवकरच शिकला; परंतु क्रियापदे आणि विशेषणे त्याला बिलकुल कळत नव्हती. पण खलाशांनी त्याला दिलेल्या "वान्या" या नावाला उत्तर द्यायला मात्र तो शिकला.

मजल दरमजल करत सोविएत नौदलाचे जहाज मुरमान्स्कला पोहोचले. या कालावधीत वान्या पाव खायला आणि चहा प्यायला शिकला होता. तो कोण, कुठला, त्या होडक्यात एकटाच कसा आला हे कोडे मात्र अजून सुटले नव्हते. वान्यासोबत संवाद साधण्यासाठी त्याला भाषा शिकवणे क्रमप्राप्त होते. यासाठी, मुरमान्स्कवरून वान्याला लेनिनग्राडला घेऊन जायचा निर्णय कप्तान चेरनेन्कोने घेतला.

मुरमान्स्क बंदरावरील सरकारी कर्मचाऱ्यांना कप्तान चेरनेन्कोने वान्याची माहिती दिली. सरकारी चक्रं फिरू लागली; पण निर्णय येईपर्यंत वान्याला मुरमान्स्कमधील एका हॉटेलमध्ये ठेवायचं असं कप्तान चेरनेन्कोने ठरवलं. तीन दिवसांनी मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक कोन्स्तंतीन द्यूबोव्ह त्यांच्या एका सहकाऱ्यासह मुरमान्स्कला पोहोचले, आणि त्यांनी वान्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला.

प्रोफेसर द्यूबोव्ह व त्यांचे सहकारी भारतातील आणि आग्नेय आशियातील काही भाषा जाणत होते. हिंदी, तामिळ, मलाय आणि बर्मीज या सर्व भाषा त्यांनी वापरून पहिल्या, पण वान्या यापैकी कोणतीही भाषा बोलत नव्हता.

वान्याची उंची, शरीरयष्टी, वर्ण, केस या सर्वांवरून प्रोफेसर द्यूबोव्ह यांनी तो अंदमान बेटांवरील किंवा मलायामधील एखाद्या जमातीचा सदस्य असावा असा निष्कर्ष काढला. त्याचा रक्तगटदेखील त्यांना तपासायचा होता पण त्यापूर्वी वान्याचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते. त्यासाठी त्याला हळूहळू रशियन भाषा शिकवावी व त्या प्रक्रियेत त्याच्याकडून माहिती मिळवावी असा निर्णय प्रोफेसर द्यूबोव्ह यांनी घेतला. हे सर्व मुरमान्स्कला करणे कठीण होते, त्यामुळे वान्याला मॉस्कोला न्यायचे असे ठरले. वान्याला शोधणाऱ्या सोविएत नौदलाच्या जहाजावरील एक खलाशी त्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याला ओळखीचा चेहरा दिसत राहावा म्हणून त्याच्यासोबत मॉस्कोला जाणार असेही ठरले. कप्तान चेरनेन्कोने वीस वर्षाच्या कॅडेट अलेक्सान्द्र खोलीन याची या कामासाठी निवड केली.

वान्या रशियात पोहोचला तेव्हा जून महिना चालू असल्याने तापमान २० डिग्री सेल्सियसच्या आसपास होते, त्यामुळे त्याला थंडीवाऱ्याचा त्रास झाला नाही. त्याला राहण्यासाठी शहराबाहेर एका रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संकुलात प्रशस्त घर देण्यात आले. खोलीनदेखील तिथेच राहत असे. घरामागे मोठी बाग होती आणि एक छोटा तलावही होता. वान्या बराचसा वेळ पोहण्यात घालवत असे, आणि इतर वेळात बागेमध्ये बसून राहत असे. फक्त झोपण्यासाठी तो घरात जात असे.

वान्या हुशार होता आणि घरातील नवीन गोष्टी वापरण्यात तो लवकरच पारंगत झाला. त्याला रशियन भाषा शिकवण्यासाठी एक अनुभवी शिक्षक येऊ लागले. सैबेरियामधील विविध जमातींमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव होता. वान्या हळूहळू भाषा शिकू लागला. लिपीची ओळख करण्याऐवजी त्याला रशियामध्ये बोलायला शिकवावे असे प्रोफेसर द्यूबोव्हने ठरवले होते. वान्याची प्रगती बघायला आणि त्याच्याशी संवाद साधायला ते आठवड्यातून दोन दिवस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये येत होते.

पुढील काही महिन्यांत वान्या जुजबी संवाद साधू लागला. त्याच्याशी बोलून मिळालेल्या माहितीने प्रोफेसर द्यूबोव्ह चकित झाले.

त्याचा जन्म एका बेटावर झाला होता. त्याचे वडील वयस्कर होते आणि आई तरुण होती. वान्याचे खरे नाव तापे-अजा होते. बालपणीच त्याच्या जमातीत फार कमी - सुमारे पंधरा - जण होते, आणि पुढील काही वर्षांत आजाराने त्यातील बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. अखेरीस तापे-अजा व त्याचे म्हातारे वडील हे दोघेच शिल्लक राहिले. मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांनी तापे-अजाला सांगितले, "मी आता फार जगणार नाही. मी मेलो की इथे थांबू नकोस. समुद्रकिनाऱ्यावर जा. इतर जमातींचे लोक कधीतरी येतात त्यांना शोध आणि त्यांच्यासोबत रहा."

तापे-अजाने वडिलांचे ऐकले. त्यांच्या मृत्यूनंतर तो समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि तिथे राहू लागला. मासे मारून आणि कंदमुळं गोळा करून तो आपली भूक भागात होता. काही दिवसांनी तिथे दुसऱ्या जमातीचे लोक होड्यांमधून आले. खाणाखुणांनी त्यांच्याशी संवाद साधून तापे-अजाने आपण एकटेच आहोत हे त्यांना सांगितले. पुढील काही महिने तो त्यांच्यासोबत राहिला आणि होडी चालवायला आणि त्यातून मासेमारी करायला शिकला. पण ते लोक त्यांच्या मूळ बेटावर परतले तेव्हा मात्र तापे-अजा आपल्या बेटावरच राहिला. काही दिवस असेच गेल्यावर मात्र त्याला ती रिकामे बेट खायला उठले; आणि एक तकलादू होडी बांधून तो त्या जमातीच्या शोधात निघाला. दिशा समजू न शकल्याने तो समुद्रात गोलगोल फिरत राहिला आणि बरोबर घेतलेले नारळ संपल्यावर तहान-भुकेने व्याकूळ होऊन त्याला ग्लानी आली. त्यानंतर कधीतरी त्याला मोठ्या बोटीने उचलून घेतले आणि त्याचे प्राण वाचवले.

तापे-अजा सापडला त्या जागेवरून तो रटलँड बेटाचा रहिवासी असावा असा निष्कर्ष प्रोफेसर द्यूबोव्ह यांनी काढला. उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे, तो जांगिल जमातीचा असावा असा कयास त्यांनी बांधला.

तापे-अजाला - म्हणजेच वान्याला - पुन्हा रटलँड बेटावर सोडणे शक्य नव्हते. आणि ते शक्य असते तरीही त्याला एकट्याला त्या बेटावर पाठवणे म्हणजे क्रौर्याची परिसीमा झाली असती. त्याला मॉस्कोमध्येच वाढवायचे असा निर्णय प्रोफेसर द्यूबोव्ह यांनी घेतला. वान्याला हे सांगितल्यावर त्यानेही तयारी दर्शवली.
पुढील काही वर्षे वान्या शिकत होता. अंगभूत हुशारीमुळे तो रशियन भाषेत पारंगत झाला. त्याला उदरनिर्वाहाचं साधन मिळावं यासाठी त्याला कारखान्यातील यंत्रांची निगा राखण्याचंही प्रशिक्षण दिलं गेलं. पुढील चाळीस वर्षं वान्या हे काम करत होता. त्याला "प्योत्र वासिल्येव्ह" या नावाने इंटर्नल पासपोर्ट देण्यात आला. वान्याने आपल्या इतिहासाबद्दल मात्र प्रोफेसर द्यूबोव्ह आणि त्यांचे सहकारी यांशिवाय कोणालाही कधी सांगितलं नाही. कारखान्यातले सहकारी त्याला रवांडा किंवा काँगोचा रहिवासी समजत असत; पण त्याला कोणीही भेदभावाची वागणूक दिली नाही.

१९७५ साली वान्या सेवानिवृत्त झाला. त्याला एक छोटी अपार्टमेंट आणि पुरेशी पेन्शन मिळत होती. त्यानंतरच्या काळात त्याने आपल्या जमातीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. १८९५ सालानंतर ब्रिटिश भारताच्या प्रशासनाच्या नोंदींमध्ये जांगिल व्यक्ती दिसल्याची नोंद नाही. १९३१ च्या खानेसुमारीत "१९०७ पासून जांगिल दिसले नाहीत" एवढीच त्रोटक नोंद आहे. वान्याने निष्कर्ष काढला, की जांगिल जमातीचा तो अखेरचा सदस्य आहे - द लास्ट ऑफ द जांगिल्स.

(एअरबीएनबीच्या होस्टला मी विचारलं तेव्हा त्याच्याकडून थोडी माहिती मिळाली. १९८९ मध्ये त्याच्या वडिलांना ही अपार्टमेंट मिळाली होती. त्यापूर्वी तिथे राहणारा आफ्रिकन व्यक्ती १९८८ मध्ये हृदयविकाराने मृत्यू पावला होता. याखेरीज तो काही सांगू शकला नाही. १९८८ मध्ये तिथे राहणारे शेजारी आता हयात नव्हते, किंवा सोविएत संघाचं विभाजन झाल्यावर निरनिराळ्या देशांत आणि शहरांत विखुरले होते. 'द लास्ट ऑफ द जांगिल्स'चा वेध घेण्याचा मार्ग पूर्णपणे खुंटला होता.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पण मग त्या कॉर्कस्क्रू विना बाटली कशी उघडली?
- हे उगाच.
------------------
गोष्ट पुढेपुढे वाचतच गेलो इतकी रंगली.
गोष्टीत नेहमीचच्याच अपेक्षित घटना न घडल्याने उत्सुकता वाढतच राहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मग त्या कॉर्कस्क्रू विना बाटली कशी उघडली?

त्याहीपेक्षा महत्त्वाचे, रशियात रेड वाईन??? कितपत असणार?

असो. कमिंग ब्याक टू युअर क्वेश्चन, कॉर्कस्क्रू न मिळाल्याकारणाने, लेखकाने (प्रोव्हायडेड, या कथेतील 'मी' हा लेखकच आहे, हे गृहीत धरून) रेड वाईन पिण्याचा कार्यक्रम रहित करून, ती बाटली रेफ्रिजरेटरमध्ये फेकून दिली, आणि त्याऐवजी, खास घरी घेऊन जाण्यासाठी म्हणून विकत घेऊन ठेवलेली 'ठेवणीतली' उंची (?) वोद्काची बाटली बबलरॅपमधून बाहेर काढली, असा उल्लेख कथेत कोठेतरी आलेला आहे. (मात्र, रेफ्रिजरेटरमध्ये टाकून दिलेली रेड वाईनची (रशियन!!! हं!) बाटली लेखक (सोयिस्करपणे) रेफ्रिजरेटरमध्येच विसरून गेला, की त्याने ती जाता जाता मोस्क्वा नदीत फेकून दिली, याचा ज़िक्र मात्र लेखकाने मोठ्या खुबीने टाळला आहे. चालायचेच!)

रेड वाईनची बाटली उघडण्यासाठी कॉर्कस्क्रूची गरज भासू शकावी. वोद्काची बाटली उघडण्यासाठी कॉर्कस्क्रूची गरज भासण्याचे कारण दृग्गोचर होत नाही.

(वाईनच्या बाटलीस बहुतांश वेळा बूच असते. म्हणजे, बुचाऐवजी फिरकीचे झाकण असलेल्या वाईनच्या बाटल्याही दृष्टीस पडतात, नाही असे नाही, परंतु त्या तुलनेने क्वचित. वोद्काच्या - किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कोठल्याही हार्ड लिकरच्या - बाटलीला मात्र इन्व्हेरिएब्ली फिरकीचे झाकण असते.)

(हाय कंबख्त, तू ने पी ही नहीं!)

----------

असो. ष्टोरी आवडली. खिळवून ठेवणारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रशियात रेड वाईन??? कितपत असणार?

जॉर्जियातून आलेली उत्तम रेड वाईन मॉस्कोत सुपरमार्केटात मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुंदर ! आवडले !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रशियातल्या बाल्कनी म्हणजे अलिबाबाची गुहा आणि बुलडोझर फिरवलेलं सुपरमार्केट यांचा संगम असतो. जुने व्हॅक्युम क्लिनर, बटाट्याची पोती, तुटलेलं फर्निचर, काहीही तिथे सापडू शकतं. कॉर्कस्क्रू शोधताना कायकाय सापडत होतं - स्टॅम्पचे आल्बम, पायोनियरचे बिल्ले.

तुम्हाला 'गाढवाची गांड' असे म्हणायचे होते काय? नि सभ्यपणामुळे म्हणायला लाजलात? कारण तीही एक अशी जागा आहे की जिच्यात वाटेल ती व्यक्ती नि वाटेल ती वस्तू हमखास सापडते. कारण, कोणी ना कोणी, कधी ना कधी ती तेथे धाडून दिलेलीच असते.

(आत्यंतिक सर्वसमावेशक जागा. किंवा, आमच्या दिवंगत आजोबांच्या शब्दांत, museum nonpareil.)

----------

असो. ष्टोरी आवडली, याचा ज़िक्र इतरत्र केलेलाच आहे. हा वरील चावटपणा उगाचच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीले आहे. हे वाचून कुतुहलाने लास्ट ऑफ द मोहिकन्स बद्दलही माहिती वाचली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक गोष्ट आहे. खरी आहे का, अशी शंका सतत येत राहते, पण त्याचं उत्तर अजिबात देऊ नकोस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.