Skip to main content

गोष्ट

एक गोष्ट लिहीन म्हणतो
पहाटेच्या कोवळ्या उन्हात
आनंदाने डोलणार्‍या फुलांची

सूर्य माथ्यावर येऊन थांबेल तेव्हा
जगांची अदलाबदल सुरू झालेली असेल
जुन्या वाटा बुजून नवीन रस्ते बनू लागलेले असतील
काठांवर फुलारून येत असतील
मोहांच्या नवीन मालिका

सुरू झालेली प्रत्येकच गोष्ट
संपणारी असते कधीतरी
तशा संपू लागतील या मालिका देखील,
कधी तरी, दिवसाच्या शेवटच्या प्रहरात

रात्रींच्या अंधारात;
सगळेच दुवे हरवून जातील, बुडून जातील
आठवणींच्या गल्लीबोळा
रस्ते, घरे आणि नदीकाठ

सभोवताली जमून येतील
सांगण्याजोग्या हजार गोष्टींचे ढीग
वर्षांबरोबर वाहत आलेली सुख दःखे
आणि काहीबाही

मी ओलांडून मागे जाईन म्हणतो
या भिंती आणि कुंपणे
सरून गेलेले हंगाम
ऋतूंची हजार चक्रे
एका कोवळ्या पानाच्या शोधात

एक गोष्ट लिहीन म्हणतो,
पहाटेच्या कोवळ्या उन्हात आनंदाने डोलणार्‍या फुलांची
हजार हातांनी
जीवन वेचून घेणाऱ्या पहाटवार्‍याची....

अनंत ढवळे

राजेश घासकडवी Thu, 27/10/2011 - 15:49

कविता आवडली. जीवनाला एका दिवसाची उपमा देणं तसं नवीन नाही. पण अंदाज ए बयान आवडला. माथ्यावरच्या सूर्याबरोबर सुरू होणाऱ्या जगांच्या अदलाबदली आणि रात्रीच्या अंधारात हरवून जाणारे आठवणींचे गल्लीबोळ, नदीकाठ हे शब्दप्रयोग खूप आवडले.

क्रेमर Thu, 27/10/2011 - 20:07

सुरूवातीच्या ओळींत मोनेचे एखादे चित्र पाहिल्यासारखे वाटले. नंतर काळवंडलेल्या छटांची चित्रे तरळून गेली. शाळेत पाठ्यपुस्तकांतून समोर येणारे जग पुन्हा पहायला जावेसे वाटले.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/11/2011 - 01:15

In reply to by क्रेमर

कविता तर आवडलीच पण क्रेमरची प्रतिक्रियाही आवडली. एकूणच कवितांच्या बाबतीतली माझी समज "ऐसीअक्षरे"वरच्या कवी आणि आस्वादक सदस्यांमुळे वाढते आहे. अशाच कविता वाचायला मिळू देत.

सुबोध साने Tue, 01/11/2011 - 21:26

प्रतिमासमृद्ध अशा या कवितेचा एकूण पोत आणि इम्पॅक्ट छान आहे. एखाद्या चांगल्या पेंटिगसारखी आवडली.

............सा… Tue, 01/11/2011 - 23:28

>> एक गोष्ट लिहीन म्हणतो,
पहाटेच्या कोवळ्या उन्हात आनंदाने डोलणार्‍या फुलांची
हजार हातांनी
जीवन वेचून घेणाऱ्या पहाटवार्‍याची....>>

अप्रतिम!!!