The King and I

संकीर्ण

The King and I

लेखक - अरविंद कोल्हटकर

मार्गारेट लँडनलिखित 'Anna and the King of Siam' ही १९४४ साली प्रसिद्ध झालेली बेस्ट-सेलर कादंबरी, त्यावर आधारित The King and I नावाचा ऑपेरा, त्याच नावाचा चित्रपट (१९५६), त्याच कथेवर आधारित 'Anna and the King' (१९९९) नावाचा चित्रपट अशा अनेक यशस्वी कलाकृतींमधून दाखविलेली मूळ कथा संपूर्ण काल्पनिक नाही. अॅना लिऑनओवेन्स ह्या खऱ्याखुऱ्या स्त्रीच्या आयुष्यावर ती बेतलेली आहे.

ह्या पुस्तकातील अॅना लिऑनओवेन्स (१८३१-१९१५) ही ब्रिटिश स्त्री ही ब्रिटिश सैन्यातील एका अधिकाऱ्याची विधवा तरुण पत्नी. तिचा पति थॉमस लिऑनओवेन्स हा वाघाची शिकार करण्यासाठी मलायातील जंगलात गेला असता वाघाने हल्ला केल्याने स्वत:च शिकार झाला. तरुण अॅना आणि तिची दोन लहान मुले - मुलगी एविस आणि मुलगा लुई - ह्यांना डोक्यावर काही छत्र उरले नाही. पण ह्या परिस्थितीपुढे न डगमगता अॅनाने सिंगापूरमध्ये एक लहान मुलांची खाजगी शाळा सुरू केली. तीन वर्षे ही शाळा चालविल्यावर एक अनपेक्षित संधि तिच्यापुढे चालून आली. सयामचा राजा मोंगकुत - सयामच्या चक्री घराण्यातील चौथा राजा, राम चौथा - आपल्या अन्तर्गृहातील अनेक राण्या आणि त्यांची मुले ह्यांना इंग्लिश भाषा आणि आधुनिक विषय शिकवू शकणाऱ्या शिक्षिकेच्या शोधात होता. त्याच्या सिंगापूरमधील एजंटाच्या मार्गे हा शोध अॅनापर्यंत येऊन पोहोचला. १८६०च्या दशकामध्ये पाश्चात्य जगात सयामबद्दल फार थोडी माहिती होती. कोठल्याच वसाहती सत्तेचा अद्यापि तेथे प्रवेश झालेला नव्हता. अशा अज्ञात देशात जायचे धाडस अॅना करते आणि मुलगी एविस हिला इंग्लंडात शाळेसाठी पाठवून ती स्वत: लहानग्या लुईसह बँकॉकला जाते. तिच्या बँकॉकमध्ये घालवलेल्या सहा वर्षांचा वृत्तान्त हा वर उल्लेखिलेल्या सर्व चित्रपटांमध्ये आणि अन्य कलाकृतींमध्ये दाखविला आहे. हे चित्रपट आणि ऑपेरामुळे 'अॅना लिऑनओवेन्स' हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले. मागासलेल्या सयाममधील पारंपारिक बुरसटलेल्या आशियाई विचारांविरुद्ध धाडसाने उभी राहिलेली स्वतन्त्र बाण्याची पाश्चात्य स्त्री असे तिचे चित्र ह्या कलाकृतींमुळे दूरवर पोहोचले. पूर्व विरुद्ध पश्चिम ह्या दोन मूल्यव्यवस्थांच्या संघर्षातील रोखठोक आणि शास्त्रीय पायावर उभ्या असलेल्या पाश्चात्य जगाचे ती प्रतीक ठरली. हे सर्व चित्रण एकांगी होते असे जरी आज वाटले तरी ते त्या काळाचे प्रातिनिधिक होते ह्यात शंका नाही.

❇︎

१८६२ ते १८६६ अशी सहा वर्षे बँकॉककमध्ये राहिल्यावर अॅना इंग्लंडमार्गे अमेरिकेला पोहोचली. तेथे तिने आपल्या सयाममधील वास्तव्यातील अनुभवांवर आधारित असे 'The English Governess at the Siamese Court' हे पुस्तक लिहिले आणि ते Atlantic Monthly ह्या प्रतिष्ठित नियतकालिकामधून चार भागांत प्रसिद्ध झाले. विषयाच्या नावीन्यामुळे त्या पुस्तकाला बरीच प्रसिद्धि मिळाली. कालान्तराने सयामच्या राजाच्या अन्तर्गृहामध्ये तिने ज्या गोष्टी पाहिल्या होत्या त्यांच्यावर आधारित आणि काहीसे काल्पनिक असे 'Romance of the Harem' नावाचे पुस्तक तिने लिहिले. स्त्रीहक्क चळवळ, गुलामगिरी अशा विषयांवर व्याख्याने देण्यासाठी तिला निमंत्रणे मिळू लागली. अशा लेखनामुळे आणि स्त्रीहक्क चळवळीत तिने भाग घेतल्यामुळे अमेरिका-कॅनडामध्ये तिला चांगली प्रसिद्धि मिळाली आणि तिची आर्थिक स्थितीहि सुधारली. प्रवासवर्णने लिहिणारी लेखिका, नाना विषयांवर गावोगावी फिरून यशस्वी भाषणे देणारी अशी तिची ख्याति पसरली.

शाळेत शिकवणारी अॅना अॅनाची शाळा

१८६६ ते १८७८ अशी बारा यशस्वी वर्षे तिने अमेरिकेत काढली. ह्या काळात तिची इंग्लंडमध्ये १८६६ साली शिक्षणासाठी ठेवेलेली मुलगी एविस ही शिक्षण संपवून तिला येऊन मिळते. येथे एविसला थॉमस फिश नावाचा बँकिंग क्षेत्रात चांगले नाव कमाविलेला तरुण भेटतो. त्याच्याशी लग्न करून एविस कॅनडामध्ये हॅलिफॅक्स ह्या शहरात स्थलान्तर करते आणि आपली आई अॅना हिलाहि तेथे बोलावून घेते. कॅनडामध्ये अॅनाचा वृत्तपत्रातील लेखनाचा आणि नाना विषयांवर व्याख्याने देण्याचा व्यवसाय सुरूच राहतो. येथे तिला Youth's Companion नावाच्या नियतकालिकाकडून रशियाप्रवासाची संधि मिळते. त्सार अलेक्झँडर दुसरा ह्याचा अनार्किस्ट विचाराच्या एका तरुणाने खून केल्यावर रशियामधील परिस्थिति कशी आहे अशी लेखांची मालिका लिहिण्याचे काम तिला मिळते. तदनंतर 'Life and Travel in India: Being Recollections of a Journey before the Days of Railroads' असे पुस्तक ती लिहिते आणि ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी म्हणून केलेल्या प्रवासाचे चित्रण ती त्यात दाखविते, हिंदुस्थानातील जीवनाच्या खऱ्याखुऱ्या चित्रणामुळे हे पुस्तक तत्काली तशा स्वरूपाच्या अन्य पुस्तकांमधून उठून दिसणारे ठरते. पुस्तकात सह्याद्रीचा बोर घाट आणि पुणे शहर ह्यांची विशेष प्रशंसा आहे, पुण्याचे संस्कृत कॉलेज, पुण्यातील युरोपीयन वस्तीचा कँपचा भाग ह्यांची जिवंत चित्रे ह्या पुस्तकामध्ये दिसतात. वानगीदाखल पुण्याच्या रस्त्याचे हे वर्णन पहा:

The sedate and white-robed Brahmin; the handsome Hindoo; the refined and delicate Hindoo woman in her flowing graceful saree and red sandals (for in this city Mohammedan influence has not yet reached the point which it has in other parts of India, and the women are not cooped up in harems but are everywhere in the streets, temples, and bazaars); the pompously-dressed Musulman, Arab, and Mahratta horsemen completely armed, prancing along on their splendid chargers; ... emaciated devotees, fakirs, and mendicants of all denominations, some wholly nude, others clothed in the skins of wild beasts, and yet others covered with dust and paint and ashes of cow-ordure; fat lazy-looking Brahmanee bulls; Jews, Parsees, native Portuguese Christians, and occasionally a British Mahratta sepoy in his neat undress Uniform.

अशा प्रवासांमुळे आणि लेखनामुळे अॅना कॅनडामध्येहि लवकरच समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ति म्हणून ओळखली जाऊ लागली. Local Council of Women of Halifax आणि The Nova Scotia College of Art and Design अशा संस्थांशी तिचे नाव जोडले गेले. १९१५ साली वयाच्या ८३ व्या वर्षी हे यशस्वी आयुष्य माँट्रियाल शहरामध्ये संपले.

❇︎

ही गोष्ट स्फूर्तिदायक आहे ह्यामध्ये शंकाच नाही. १९व्या शतकाच्या मध्यावर एका परक्या प्रदेशामध्ये पतिनिधनानंतर दोन लहान मुलांसह एकटी पडलेली एक स्त्री स्वत:च्या पायावर उभी राहते आणि हिंमतीने आपल्या आयुष्याची इमारत पुन: उभी करते आणि लेखक, पत्रकार, प्रवासी अशी ख्याति कमावते हे कौतुकास्पद आहे ह्यात शंका नाही. परंतु असे यशस्वी जीवन जगलेल्या अॅनाचे यश हे तिने आपले पूर्वायुष्य दडविले होते ह्या एका खोटेपणावर अवलंबून आहे. खरी गोष्ट अशी आहे की अॅनाने आपले पहिले खरे आयुष्य संपूर्ण मिटवून टाकून त्याच्या जागी एक नवे काल्पनिक आयु्ष्य उभे केले होते. अॅना १९१५ साली जगातून गेली तोपर्यंत हे गुपित दडलेले राहिले. ते प्रकाशात आले १९५० च्या दशकात.

समाजाच्या लिखित आणि अलिखित नियमांनुसार एखाद्या व्यक्तीला इतरांपेक्षा खालचा दर्जा देण्यात येत असला तर त्या व्यक्तीने आपली ओळखच पुसून टाकून दुसरी नवी ओळख निर्माण करण्यात काय चुकीचे आहे? अॅना लिऑनओवेन्सची कहाणी अशीच आहे. जन्मातून निर्माण झालेली आपली जुनी ओळख लपवून त्याच्या जागी तिने एक नवी ओळख निर्माण केली. आपल्या अँग्लो-इंडियन 'half-caste, not quite white' गोताच्या जागी तिने पूर्ण नवे पण काल्पनिक 'white' गोत निर्माण केले. त्यातून आपल्या आयुष्यात तिने मोठी शिखरे पार केली पण त्याच्या मुळाशी तिने केलेली समाजाची एक फसगत होती. तिने हे जे केले ते योग्य का अयोग्य हे कसे ठरवणार?

❇︎

तुटपुंज्या उपलब्ध माहितीवरून अॅनाच्या पूर्वीच्या पिढ्यांची काही महिती जुळविता येते. तिचा आजा विल्यम (बिली) ग्लॅस्कॉट हा डेवनशरमधील हेथर्ली गावाच्या मेथडिस्ट चर्चच्या विकरच्या ५ मुलांपैकी एक. वडिलांजवळ फार पैसा नव्हता आणि 'मेथडिस्ट' ह्या तत्कालीन बंडखोर चर्चमध्ये असल्याने सामाजिक लागेबांधेहि नव्हते. अशा आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतील बहुसंख्य तरुणांप्रमाणेच २१ वर्षांच्या बिलीपुढे इंग्लंड सोडून कोठेतरी उपजीविकेसाठी आणि नशीब अजमावण्यासाठी जायचा पर्याय होता. तदनुसार ५ महिन्यांच्या समुद्राच्या प्रवासानंतर तो १८१० साली मुंबई बंदरामध्ये उतरला. ईस्ट इंडिया कंपनीच्या नेटिव इन्फन्ट्रीच्या चौथ्या रेजिमेंटमध्ये 'एन्सिन'ची (Ensign, म्हणजे सध्याचा सेकंड लेफ्टनंट) नेमणूक त्याला मिळाली होती. तत्कालीन ब्रिटिश सामाजिक उतरंडीमध्ये नेटिव इन्फन्ट्रीच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला विशेष स्थान नव्हते. ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारी कंपनी असल्याने तिच्या 'मर्चंट्स'ना डोईजड वाटतील असे अधिकारी न घेण्याची तिची प्रथा होती. 'रॉयल आर्मी'मधील उच्च पातळीच्या आणि सधन सामाजिक स्तरामधून आलेला 'Officer and Gentleman' कंपनीला नको होता. त्याऐवजी कमी शिकलेले आणि कमी पगारावर काम करायला तयार असलेले सामान्य इंग्रज घरांतील दुसरे-तिसरे-चौथे मुलगे आणि अनैतिक संबंधांमधून जन्मलेले तरुण, तसेच जगावरून ओवाळून टाकलेले चंगीभंगी तरुण अशांचीच मोठी संख्या ह्या सैन्यामध्ये होती. नेटिव इन्फन्ट्रीमधील सर्वसामान्य सैनिकहि असेच सामाजिक दृष्टीने पाहिले तर खालच्या पातळीवरील असत. युरोपात जन्मलेले कोणी येथे सैनिकाच्या दर्जावर काम करायला फारसे तयार नसत. त्यामुळे कंपनीचा भर पोर्तुगीज-हिंदुस्थानी मिश्रणातून जन्मलेल्या तरुणांवर - ज्यांना 'टोपाज' असे नाव होते - असे, नाहीतर संपूर्ण 'नेटिवां'वर असे.

नोकरी मिळाल्यावर पुढचा शोध बायकोचा. येथेहि नेटिव इन्फन्ट्रीच्या कोणा 'एन्सिन'ला गोरी बायको मिळणे अशक्यच होते. त्या काळात एकतर अशा तरुण इंग्रज अविवाहित मुली हिंदुस्थानात दिसणे दुर्मिळ होते कारण आफ्रिका खंडाला वळसा घालून हिंदुस्थानात पोहोचायला ५ ते ६ महिने लागत. त्यातून एखादी चुकूनमाकून आलीच तर तिची नजर 'वर' म्हणजे 'मर्चंट्स'कडे लागलेली असे, कारण बायको आणि कुटुंब सांभाळण्याइतका पगार त्यांनाच मिळत असे. नेटिव इन्फन्ट्रीचा कोणी 'एन्सिन' तिच्या नजरेच्या खालीच असे. त्यामुळे अशा 'एन्सिन' दर्जाच्या अधिकाऱ्यांना आपला शोध येथीलच अँग्लो-इंडियन आणि धर्माने ख्रिश्चन अशा युरेशियन मुलींकडे वळवावा लागे. बिलीलाहि ह्याच गटातील बायको मिळाली असणार पण तिची कोठेच नोंद झालेली नाही. अशा बायका, ज्यांना 'wife' न म्हणता 'lady' किंवा 'a lady not entirely white' असे उल्लेखिले जाई, ह्यांची सरकारदप्तरामध्ये दखलच घेतली जात नसे, जरी अशा 'lady' बरोबर लग्नाच्या बायकोसारखे राहणे हे सार्वत्रिक होते आणि त्याला मूक संमतीहि होती. अशा 'युरेशिअन' बायका 'on the strength' नसत. तसेच 'नवऱ्या'बरोबर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना कधीकाळी कायमच्या वास्तव्यासाठी इंग्लंडला जायला मुभा असेल असे मानले जात नसे. उच्चनीचतेच्या कल्पनांनी जखडलेल्या तेव्हाच्या ब्रिटनमध्ये अशा बायका आणि त्यांची मुलेबाळे ह्यांच्याकडे 'काळ्या नेटिवां'पेक्षा फार वेगळ्या रीतीने पाहिले जात नसे. नोकरी संपल्यावर गोऱ्या नवऱ्याला इंग्लंडला परतायचे असेल तर त्याने आपली हिंदुस्थानातली बायको आणि मुले हिंदुस्थानातच सोडून एकट्यानेच परत जावे अशी अपेक्षा होती आणि तदनुसार बरेचजण वागतहि असत.

अशीच कोणी 'lady' बिलीला मिळाली होती हे निश्चित कारण तिच्यापासून झालेल्या त्याच्या तीन मुलामुलींचे उल्लेख पुढे मिळतात. ह्याच उल्लेखांवरून असेहि ठरवता येते की बिलीचे हे 'लग्न' १८१४ च्या सुमारास झाले असावे. ह्या 'लग्ना'तून त्याला पुढच्या ४-५ वर्षात दोन मुली आणि एक मुलगाहि झाला. मुलाचा जन्म होण्याआधीच बिलीच्या रेजिमेंटकडे, पर्शियन आखातामध्ये कंपनीच्या जहाजावर छापे घालणाऱ्या अरब चाच्यांचा बन्दोबस्त करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि रेजिमेंट मुंबई सोडून आखाताकडे रवाना झाली. त्या मोहिमेत बिलीला १८२१ साली आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी त्याचे वय अवघे ३२ वर्षांचे होते. बिलीच्या मृत्यूनंतर त्याच्या अनाम बायकोने काय केले आणि आपल्या तीन मुलांचा सांभाळ कसा केला ह्याबाबत काहीच माहिती नाही. मात्र एव्हढे खरे की लग्नायोग्य अशा अँग्लो-इंडियन आणि धर्माने ख्रिश्चन मुलींची संख्या कमी असल्याने आणि त्यांच्या अपेक्षाहि तशाच असल्याने सैन्यातील खालच्या पातळीवर काम करणारा नवरा त्यांना मिळणे अवघड नसे. असा कोणी 'नवरा' गाठून बिलीच्या विधवा 'lady'ने आपली आणि आपल्या तीन मुलांची सोय लावली असणार असा तर्क करता येतो.

❇︎

असाच पुढे बिलीची सर्वात थोरली मुलगी मेरी अॅन हिला थॉमस एडवर्ड्स् हा नवरा मिळाला आणि तिच्या वयाच्या १३व्या वर्षी त्यांचे लग्न मार्च १५, १८२९ ह्या दिवशी ठाण्याच्या सेंट जेम्स चर्चमध्ये झाले. हा थॉमस इंग्लंडमधील ग्रामीण भागातील अर्धशिक्षित आणि असंस्कृत तरुण होता. अशांना इंग्लंडमध्ये काहीच भवितव्य नव्हते आणि म्हणून त्याने हिंदुस्थानात कंपनीची नोकरी स्वीकारली होती. त्यावेळी तो सर्वात खालच्या पातळीचा साधा सैनिक असावा. गावंढळ म्हणता येईल असा नवरा आणि मिश्र वंशाची त्याची बायको, जिची आई कोण आणि कोठली ह्याचा काही पत्ता नाही, ह्यांचे हे लग्न सामान्यातले अतिसामान्य ठरायच्या लायकीचेच होते. एव्हढ्या वेळेपर्यंत थॉमसची प्रगति शिपायापासून सार्जंट - (सध्याचा शब्द 'हवालदार' ) येथेपर्यंत झाली होती आणि त्याचे दल, बाँबे सॅपर्स अ‍ँड मायनर्स, हे मुंबईहून अहमदनगरला पाठवले गेले होते. ह्या वेळेस ते दल अहमदनगर-शिरूर-पुणे-मुंबई असा रस्ता बांधण्याच्या कामावर नेमले गेले होते. शिरूर (Seroor) हे गाव त्या दिवसात इंग्रज सैन्याचे एक महत्त्वाचे ठाणे होते.

ह्या लग्नातून त्यांना दोन मुली झाल्या, थोरली एलायझा आणि धाकटी अॅना हॅरिएट ऊर्फ अॅना, आपली चरित्रनायिका. अॅनाचा जन्म डिसेंबर २६, १८३१ ह्या दिवशी अहमदनगर येथे झाला. मात्र आपल्या दुसऱ्या मुलीचा चेहरा पाहणे थॉमसच्या नशिबात नव्हते, कारण अॅनाच्या जन्माच्या काही दिवसच आधी जुलै ३१, १८३१ ला वयाच्या २८-२९व्या वर्षात त्याला मृत्यु आला आणि अॅनाची आई मेरी अॅन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी संपूर्ण निर्धन अवस्थेत दोन मुली पदरात घेऊन विधवा झाली. (हिंदुस्थानात आलेले इंग्रज अल्पायुषी ठरणे त्या काळात सवयीचेच होते. साप चावण्यापासून अतिसार-कॉलरा-देवी येणे-मलेरिया येथपर्यंत कोणत्याहि कारणाने त्यांना अल्पवयातच मृत्यु येणे सर्वांच्या सरावाचे होते.) मेरी अॅनला वैधव्याचे चटके फार सोसावे लागले नाहीत. गोऱ्या इंग्रज मुली सर्वसामान्य इंग्रज सैनिकाला मिळणे अशक्यप्राय होते हे खरे पण युरेशियन (half-caste) मुलींची संख्याहि मर्यादित होती आणि अशी एखादी मुलगी लग्नाच्या बाजारात फार दिवस मोकळी अडकून पडायची शक्यता नव्हती. थॉमसच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांच्या आत जानेवारी ९, १८३२ ह्यादिवशी तिचे लग्न पॅट्रिक डोनॅह्यू नावाच्या कॉर्पोरल (सध्याचा नाईक) दर्जाच्या तरुणाशी झाले. मेरी अॅनचे पॅट्रिकबरोबरचे दुसरे लग्न मात्र सुखाचे ठरले. काळाच्या मानाने पॅट्रिक दीर्घायुषी ठरला. ५५ वर्षे जगून तो ऑक्टोबर ३०, १८६४ ह्या दिवशी मरण पावला. ह्या वेळेपर्यंत मेरी अॅनला आणखी मुले झाली आणि त्यांपैकी पाच मोठी होऊ शकली. पॅट्रिकनेहि नोकरीत बढत्या मिळवून, तसेच खाजगी कामे मिळवून आर्थिक पाया मजबूत केला होता. त्याच्या मृत्यूच्या वेळी हे कुटुंब, पॅट्रिकच्या दोन सावत्र मुलींसह, पुण्यातील खडकी कँटोनमेंटमध्ये स्वत:च्या घरात राहण्याच्या सुस्थितीला येऊन पोहोचले होते. राहत्या घराशिवाय पॅट्रिकने भाड्याने देण्यासाठी आणखी दोन घरे जवळच बांधली होती.

खडकीतील ७ वर्षांच्या मुक्कामाचा अॅनाने चांगला लाभ घेतला. उच्च प्रकारच्या बुद्धिमत्तेची तिला चांगली देणगी होतीच. खडकीतील रेजिमेंटल शाळेमध्ये तिला तत्कालीन धर्तीचे चांगले शिक्षण मिळाले. त्यामुळे इंग्लिशमध्ये चांगले लेखन-वाचन ती करू लागली. कँटोनमेंटमध्ये असलेल्या अठरापगड वातावरणामुळे मराठी आणि हिंदुस्थानी ह्या दोन्ही भाषा तिला अवगत झाल्या. इतकेच नव्हे तर कसे कोणास ठाऊक पण ती संस्कृतहि शिकली. ह्या संस्कृतचा तिला पुढच्या आयुष्यामध्ये अमेरिका आणि जर्मनीमध्ये लाभ झाला. तिच्या संस्कृत प्रावीण्याचा तिच्या उत्तरायुष्यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख सापडतो. पॅट्रिकच्या १८६४ मधील मृत्यूनंतर त्याची विधवा मेरी अॅनने पुण्यातील सर्व जायदाद विकून पुन: मुंबईत राहण्यास सुरुवात केली. तिचा भाऊ विल्यम ग्लॅस्कॉट आणि तिचे मुलगे विल्यम आणि वॅन्ड्री हे आधीच नोकरीव्यवसायासाठी मुंबईत आलेले होते. १८५३ मध्ये मुंबईत रेल्वे सुरू झाल्यावर त्यांना रेल्वेमध्ये तिकीटचेकरच्या कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या. त्यांच्या ‍अँग्लो-इंडियन असण्यावर हे अधिकृत शिक्कामोर्तबच होते कारण रेल्वेतील ह्या नोकऱ्या त्या काळात अँग्लो-इंडियनांसाठी राखीव होत्या.

ह्या वेळेपर्यंत तिची दुसरी मुलगी अॅना हिंदुस्थानाबाहेर गेल्याला २० वर्षे झाली होती आणि आता ती अमेरिकेत राहून आपले दुसरे पुस्तक लिहिण्याच्या मागे होती. तिच्या अन्य अँ‍ग्लो-इंडियन भाईबंदांना त्या दिवसांमध्ये अशक्यप्राय अशी गोष्ट तिने करून दाखविली होती आणि ती म्हणजे आपले 'अँग्लो-इंडियन' हे 'half-caste' गोत सोडून स्वत:ला 'white' गोताचे ठरवून घेण्यात ती यशस्वी ठरली होती. अॅना म्हणजे अॅना हॅरिएटने आयुष्यात एकदाच आणि एकाच व्यक्तिवर प्रेम केले. थॉमस लुई लिऑनओवेन्स हा आयरिश तरुण जॉन ओवेन्स आणि मेरी लिऑन ह्या मध्यमवर्गी प्रॉटेस्टन्ट आयरिश जोडप्याचा मुलगा. १८४० च्या दशकात आयर्लंडमध्ये बटाटा पिकावर मोठा रोग पडला आणि शेती व्यवसाय पूर्णतः उध्वस्त झाला. बेकार आयरिश तरुणांचे लोंढेच्या लोंढे देश सोडून बाहेरच्या दिशेकडे पाहू लागले. बहुतेक जण पश्चिमेस अमेरिकेकडे गेले. काही पूर्वेस हिंदुस्थानाकडे वळले. २१ वर्षांचा थॉमस लुई लिऑनओवेन्स १८४७ च्या पुढेमागे हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर मुंबईमध्ये उतरला.

बिली ग्लॅस्कॉटच्या वेळची १८१० सालची मुंबई आता बदलली होती. मराठी सत्तेचा पाडाव होऊन ब्रिटिशांची सत्ता आता पूर्णपणे हिंदुस्थानाभर पसरली होती आणि तिला चांगले स्थैर्य आले होते. १८३० साली सुवेझपासून वाफेची जहाजे मुंबईकडे येऊ लागल्याने प्रवासाचा वेळ ६ वरून २ महिन्यांवर आला. ह्याचा परिपाक म्हणजे व्यापार वाढला होता आणि ह्या वाढत्या व्यापाराचा लाभ घेण्यासाठी अनेक ब्रिटिश आणि अन्य देशांच्या कंपन्यानी आणि उद्योगांनी आपली कार्यालये मुंबईत उघडली होती. अशा कार्यालयांकडून चांगले इंग्रजी लिहिता-वाचता येणाऱ्या कारकुनांना आणि प्रतकारांना - (Copyist, टायपिस्टचे काम अजून निर्माण झाले नव्हते. सर्व प्रती हातानेच कराव्या लागत) - चांगली मागणी होती आणि उपजीविकेचा हा नवा मार्ग थोडेफार शिक्षण झालेल्या कनिष्ठ मध्यवर्गीय ब्रिटिश आणि अँग्लो-इंडियन तरुणांना उपलब्ध झाला होता. आयर्लंडमधून आलेला थॉमस लुई लिऑनओवेन्स आणि मेरी अॅनचा भाऊ विल्यम ग्लॅस्कॉट हे दोघेहि एकाच कार्यालयामध्ये लागले होते आणि समवयस्क असल्याने त्यांची चांगली मैत्रीहि निर्माण झाली होती.

आपल्या धाकट्या बहिणीला तसेच भाऊ विल्यम ह्याला भेटण्यासाठी मेरी अॅन मुंबईला आली त्यावेळी अ‍ॅनाहि तिच्याबरोबर आलेली होती. विल्यमचा मित्र थॉमस आणि अ‍ॅना हे पहिल्या दर्शनातच एकमेकांकडे आकृष्ट झाले आणि काही महिन्यांच्या प्रियाराधनानंतर डिसेंबर २५, १८४९, ख्रिसमसच्या दिवशी १७ वर्षांची नवतरुणी अॅना आणि २३ वर्षांचा थॉमस लिऑनओवेन्स हे पुण्यामधील सेंट मेरी चर्चमध्ये पतिपत्नी झाले. लवकरच त्यांना एक मुलगी झाली आणि हे एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दांपत्य आनंदाने आपल्या गिरगावातील छोट्या घरात आनंदाने राहू लागले.

तेव्हाचे गिरगाव आजच्या तुलनेने वेगळे होते. त्या वेळी कंपनीचे वरचे अधिकारी, सरकारातील उच्चपदस्थ आणि पैसेवाले खाजगी कंपनीवाले भायखळा, माझगाव आणि मलबार टेकडीवर मोठ्या बंगल्यामध्ये राहात असत. मध्यम आणि कनिष्ठ इंग्रज कुटुंबे किल्ल्याच्या भिंतीबाहेर गिरगावात जरा गर्दीगर्दीनेच राहात असत. अशी दोनतीन वर्षे आनंदात गेली. थॉमसला पगार तसा फार नव्हता पण दोघांचीहि राहणी साधी होती आणि होता तो पगार पुरत होता. त्यांच्या ह्या सुखाला एक काळी झालर असावी. अॅनाची आणि तिच्या मुलीची 'अँग्लो-इंडियन' अशी सामाजिक ओळख आणि उच्च-नीचतेच्या आणि वांशिक श्रेष्ठतेच्या समजुतीने पछाडलेल्या तत्कालीन वातावरणात राहणे अॅनाला दिवसेदिवस अवघड होऊ लागलेले असावे किंवा मर्यादित संधीच्या हिंदुस्थानाच्या पलीकडे आपल्या नशिबाची पारख करून पाहावी असे थॉमसला वाटले असावे. अशा काहीतरी कारणांमुळे त्यांनी हिंदुस्थान सोडून ऑस्ट्रेलियाला जायचे ठरविले. विल्यम ग्लॅस्कॉटनेहि तोच निर्णय घेतला आणि डिसेंबर १८५२ मध्ये मुंबई बंदरातून त्यांनी सिंगापूरची बोट पकडली. सिंगापूरची ब्रिटिश वसाहत तेव्हा नुकतीच आकाराला येऊ लागली होती. तेथे थोडे दिवस राहून मार्च १८५३ मध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर १८२९ मध्ये अस्तित्वात आलेल्या 'स्वान रिवर कॉलनी' येथे दाखल झाले. (ह्या कॉलनीचेच परिवर्तन नंतर पर्थ शहरामध्ये झाले.) एव्हाना त्यांची दोन्ही मुले जग सोडून गेली होती.

ऑस्ट्रेलियामध्ये आपला जम बसविण्याचा त्यांनी चारपाच वर्षे प्रयत्न केला. अॅनाने एक शाळा उघडली आणि थॉमसने पर्थच्या उत्तरेला पोर्ट ग्रेगरी येथे इंग्लंडातून पाठवलेल्या गुन्हेगार लोकांच्या कॉलनीत काही नोकरी मिळवली. ह्याच काळात त्यांची एविस नावाची तिसरी मुलगी आणि लुई नावाचा चौथा मुलगा जन्माला आले. हे दोघे मात्र दीर्घायुषी ठरले. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हाची वस्ती मुख्यत्वेकरून ब्रिटनमधील तुरुंगातून कायमच्या हद्दपारीवर आलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची अधिककरून होती. आपल्या मुलांना हे वातावरण योग्य नाही असे थॉमस आणि अॅना ह्यांना वाटले असावे आणि त्यांनी पुन: स्थलान्तर करण्याचे ठरविले आणि १८५७ साली पेनांग ह्या सिंगापूरपासून जवळच असलेल्या वसाहतीकडे त्यांनी आपले लक्ष वळविले. तेथे थॉमसला एका हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली होती. दोन वर्षे थॉमसने ही नोकरी केली पण काही आजाराचे निमित्त होऊन मे १८५९ मध्ये त्याचे आयुष्य संपले आणि विधवा अॅना दोन लहान मुलांसह एकाकी पडली. परत मुंबईला परतायचे आणि दुसऱ्या नवऱ्याच्या शोधाची वाट पाहायची हा सर्वसामान्य पर्याय तिच्यासमोर होताच पण तो न निवडता तिने दुसराच एक मार्ग निवडला. तिने जे केले त्यामुळे तिच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली. आपला अँग्लो-इंडियन भूतकाळ पूर्णपणे पुसून टाकून गोऱ्या वर्णाची ब्रिटिश स्त्री ही आपली नवी ओळख निर्माण करण्याचे तिने ठरविले आणि स्वत:साठी आणि आपल्या मुलांसाठी नवा भविष्यकाळ घडविला. आपले 'अँ‍ग्लो-इंडियन ' हे गोत विसरून 'वरच्या स्तरातील इंग्लिश स्त्री' हे गोत तिने आपल्यासाठी निर्माण केले. समाजाची अशी 'फसवणूक' करून तिने आपल्या अणि आपल्या मुलांच्या जीवनाला संपूर्ण वेगळे वळण दिले. ह्या वेळेस तिचे वय ३० वर्षांचे होते.

ह्यासाठी आवश्यक अशी आपल्या भूतकाळाची एक 'कथा' तिने बनवली आणि आपल्या दोन लहान मुलांसह जून १८५९ मध्ये पेनांगहून आलेल्या 'हूगली' ह्या बोटीतून सिंगापूरमध्ये पाऊल ठेवले. त्या 'कथे'मधील अॅना ही जन्माने १०० टक्के ब्रिटिश, सामाजिक दृष्ट्या समाजाच्या वरच्या थरातील तर दिसायला हवी होतीच आणि तरीहि ती चालू क्षणाला अकिंचन का आहे आणि तिच्यामागे तिच्या कुटुंबाची काहीच मदत नाही ह्याचेहि उत्तर त्या गोष्टीतच असायला हवे होते. त्या कथेवरून धागा काढून त्या मार्गाने तिच्या मागे सोडलेल्या मुंबईतील कुटुंबाचा संबंध कोणाच्या लक्षात येईल आणि ती वरच्या वर्गातील ब्रिटिश स्त्री नसून मिश्र वंशाची आहे हे समजण्याची शक्यताहि नाहीशी व्हायला हवी होती.

❇︎

तिच्या ह्या 'कथे'नुसार तिचा जन्म वेल्समधला होता, तिचे वडील कॅप्टन क्रॉफर्ड ह्यांना शिखांशी १८४५-४९ ह्या काळात झालेल्या युद्धामध्ये वीरमरण आले होते. त्यावेळी ती आणि तिची बहीण ह्या दोघीं शिक्षणासाठी वेल्समध्येच होत्या. (हे तत्कालीन प्रथेला धरूनच होते.) इकडे हिंदुस्तानात तिच्या विधवा आईने एका लोभी व्यक्तीशी पुनर्विवाह केला होता आणि आपल्या दोन पोरक्या मुलींना हिंदुस्थानामध्ये परत बोलावून घेतले होते. हिंदुस्थानामध्ये तिला मेजर थॉमस लिऑनओवेन्स हा पति मिळाला पण तिच्या लोभी सावत्र बापाला हा विवाह मान्य नसल्याने कुटुंबात दुफळी निर्माण होऊन तिचा आपली आई आणि सावत्र बाप ह्यांच्याशी सर्व संबंध तुटला होता. विवाहानंतर अॅनाला एक मूल हिंदुस्थानातच झाले होते पण ते लवकरच अल्पवयात मरण पावले. तिची आईहि तेव्हाच वारली. आपल्या पतीसह अॅना वेल्सला परतली. ब्रिटनमधील वास्तव्यात तिला आणखी दोन मुले झाली. नंतर तिच्या पतीला पेनांगमध्ये नवी नोकरी मिळाली. तेव्हा अॅना आणि कुटुंब पेनांगला राहण्यास आले पण तेथे वाघाची शिकार करण्यासाठी गेलेला तिचा पति स्वत:च वाघाची शिकार झाला. मधल्या काळात हिंदुस्थानात शिपायांचे बंड होऊन अनेक ब्रिटिश बँका बुडाल्या त्यात लिऑनओवेन्स कुटुंबाची सगळी बचत धुवून निघाली. माहेर आणि सासर असे दोन्ही आधार तुटलेली आणि निष्कांचन अॅना आता स्वत:च्या हिंमतीवर मुलांसह आयुष्य पुन: उभारण्यासाठी सिंगापूरला आलेली आहे. ती स्वत: शिकलेली आहे, आतापर्यंत वरच्या दर्जाचे आयुष्य जगल्यामुळे त्या आयुष्याची आणि त्याच्या चालीरीतींची तिला पूर्ण जाणीव आहे. अशाच सामाजिक दर्जाच्या कुटुंबातील मुलामुलींसाठी शाळा चालू करण्याचा तिचा इरादा आहे.

त्या काळात मध्यमवर्गी ब्रिटिश स्त्रीने व्यवसाय वा नोकरी करणे अशक्यप्राय होते तेव्हा अशा स्त्रीने करण्याजोगा एक सर्वमान्य व्यवसाय म्हणजे नर्सरी शाळा चालविणे अथवा एखाद्या सधन कुटुंबात लहान मुलांची गवर्नेस होणे. तदनुसार सिंगापूरमधील छोट्या ब्रिटिश गटामध्ये अ‍ॅनाला अशाप्रकारे थोडेसे काम मिळू लागले आणि उपजीविकेची तिची चिन्ता अंशतः दूर झाली. सिंगापूरचे पुढचे तीन वर्षांचे वास्तव्य अॅनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरले. एकतर तेथील ब्रिटिश समुदायात तिचा 'कुलीन स्त्री' (gentlewoman) म्हणून स्वीकार झाला. त्याबरोबरच तिला स्वत:ला बरेच काही नवे पाहायला आणि शिकायला मिळाले. सिंगापूरच्या दिवसांमध्ये तेथेच राहणाऱ्या 'कॉब' नावाच्या कुटुंबाशी तिचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. हे कुटुंब अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावरील बॉस्टनपासून सुमारे ७० मैल दूरच्या बार्नस्टेबल ह्या छोट्या गावात अनेक पिढ्या काढलेले असे होते. कॉब कुटुंबातील फ्रँक कॉब हा तरुण मुलगा गुलामांच्या प्रथेचा विरोधक, स्त्रियांच्या मतदानहक्कांचा समर्थक आणि अमेरिकेमध्ये तेव्हा चर्चेत असलेल्या सर्व डाव्या विचारांचा समर्थक होता. तो लिंकनभक्त होता आणि अमेरिकेत पडत असलेल्या उत्तर विरुद्ध दक्षिण ह्या दुफळीची त्याला चांगली समज होती. त्याच्याकडून अॅनाला इमर्सनचे निबंध, अंकल टॉम्स केबिन अशी पुस्तके वाचायला मिळाली. अ‍ॅनाला विचारांचे हे सर्व विश्व नवीन होते आणि तिच्या स्वभावाशी ते मिळते असल्याने तिने ते पूर्ण आत्मसात् केले. सिंगापूरमधील वास्तव्यामुळे तिच्या विचारविश्वाच्या सीमारेषा रुंदावल्या. 'शुद्ध रक्त' आणि 'सामाजिक स्थान' ह्या कल्पनांचे वैय्यर्थ्य तिला आता व्यवस्थित जाणवले आणि आपल्या स्वत:च्या अंगभूत सामर्थ्याची जाणीव झाली. जन्माने मिळालेल्या उच्चनीचतेच्या 'ब्रिटिश' विचारांऐवजी समता आणि व्यक्तिस्वातन्त्र्यावर आधारलेले अमेरिकन विचार जाणून तिच्या नकळत तिचा अमेरिकेकडे ओढा होऊ लागला. आणि ह्याच वेळेला तिच्या समोर एक वेगळीच अनपेक्षित संधि निर्माण झाली.

१८६१ मध्ये सयाम देशामध्ये - आताचे थायलंड - मोंगकुत (Mongkut) राजा सत्तेवर होता. अजूनहि मध्ययुगात अडकून पडलेल्या सयामची आता कोठे पाश्चात्य संस्कृति, विचार आणि प्रगति ह्यांच्याशी तोंडओळख होऊ लागली होती. उलट बाजूस पाश्चात्य देशांनाही सयाम देश दुसऱ्या ग्रहावर असल्यासारखाच होता. काही मिशनरी सोडले तर जवळजवळ दुसऱ्या कोणासच सयामची माहिती नव्हती. मोंगकुतला सयामच्या आधुनिकीकरणाची आवश्यकता जाणवत होती. त्या दृष्टीने मिशनरी शाळांना त्याने संमतीहि दिली होती पण मिशनरी शिक्षणातील खुल्या आणि छुप्या धर्मप्रसाराला त्याचा विरोध होता. आपल्या अनेक पत्नी आणि अंगवस्त्रे, तसेच त्यांची मुलेमुली ह्यांना इंग्लिश भाषा आणि काही आधुनिक विषय, धर्म मध्ये न आणता, शिकवू शकणाऱ्या कोणा शिक्षिकेची त्याला आवश्यकता वाटत होती. त्यासाठी आपल्या सिंगापूरातील एजंटाला त्याने कामास लावले होते पण सिंगापूर, पेनांग अशा वसाहती तेव्हा नवीन असल्याने तेथील ब्रिटिश वस्तीहि अगदी थोडी होती त्यामुळे अशी, मागे कुटुंबाचा पाश नसलेली आणि अनिश्चित काळापर्यंत सयाममध्ये शिक्षिका म्हणून राहायला तयार असलेली कोणी ब्रिटिश स्त्री, अजूनपर्यंत मिळाली नव्हती. अॅनाने सिंगापूरमध्ये नर्सरी शिक्षिका म्हणून थोडे नाव कमावल्यावर एजंटाकडून तिला सयामला जाण्याबद्दल विचारणा आली.

आर्थिक स्थिति सुधारण्याची ही सुवर्णसंधि हातात आल्यावर अॅनाने त्वरेने हालचाल केली. आपली साडेसात वर्षांची मुलगी एविसला शिक्षणासाठी इंग्लंडात पाठवायची तिने तयारी केली. त्या काळात ते अगदी अलीकडे २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत पूर्वेकडील देशांमध्ये नोकरीव्यवसायासाठी राहणारे पालक ६ वर्षापासून मुलामुलींना शिक्षणासाठी इंग्लंडकडे आपल्या नातेवाइकांजवळ अगर वसतिगृह शाळांमध्ये सरसहा पाठवत असत. अॅनाने एविससाठी केलेली व्यवस्था त्याला धरूनच होती. अॅनालाहि नव्या नोकरीवर बँकॉकमध्ये लवकरच रुजू व्हायचे होते म्हणून एविसला कॉब कुटुंबाच्या स्वाधीन करून ती तिकडे रवाना झाली. कॉब कुटुंबीयांनी एका इंग्लंडला निघालेल्या चांगल्या कुटुंबाच्या स्वाधीन तिला केले. त्यांच्याबरोबर ती ऑक्टोबर १८६२ मध्ये इंग्लंडमध्ये पोहोचली आणि १८६३ च्या जानेवारी महिन्यात मिसेस् किंगच्या वसतिशाळेत दाखल झाली. अँग्लो-इंडियन अॅनाचे एक स्वप्न - मुलीला इंग्लंडातील शाळेत पाठवायचे - आता पुरे झाले. आई आणि मुलगी ह्यांचे हे विलग राहणे पुढची सहा वर्षे चालत राहिले. स्वत: अॅना आपल्या पाच वर्षांच्या मुलाबरोबर सयामला १८६२च्या प्रारंभी पोहोचली होती. ह्या पुढची अॅनाची जीवनकथा लेखाच्या सुरुवातीस दिलेली आहे.

❇︎

अॅनाचा पुसून टाकलेला 'अँग्लो-इंडियन' भूतकाळ कित्येक दशके पुसलेलाच आणि अज्ञात कसा राहिला आणि त्याच्या जागी दुसरा 'ब्रिटिश उच्चवर्गीय' भूतकाळ कसा चिकटवला गेला ही एक मनोरंजक कहाणी आहे. 'The English Governess at the Siamese Court' (१८७०) आणि 'Romance of the Harem' (१८७३) ही पुस्तके अॅनाने १९व्या शतकाच्या दुसऱ्या भागामध्ये लिहिली आणि त्यामुळे तिला मिळालेली ख्याति नंतरच्या काळात कमी होत गेली. अॅनाचा १९१५ मध्ये मृत्यु झाल्यानंतर तिची आठवणहि मागे पडली होती. तिला उजाळा मिळाला तो मार्गारेट लँडन ह्या लेखिकेच्या 'Anna and the King of Siam' ह्या १९४४ साली प्रसिद्ध झालेल्या बेस्ट-सेलर कादंबरीमुळे. मार्गारेट आणि केनेथ लँडन हे अमेरिकन प्रेस्बिटेरिअन मिशनरी जोडपे १९२७-३७ ह्या काळामध्ये सयाममध्ये मिशनरी काम करीत होते. तेथे अ‍ॅनाची दोन पुस्तके मार्गारेटच्या वाचनात आली. त्यामुळे अॅनाविषयीचे तिचे कुतूहल चाळवले गेले. तदनंतर कित्येक वर्षानंतर योगायोगाने अॅनाच्या मुलीची मुलगी - हीहि एलिस फिश - तिच्या संपर्कात आली आणि आपल्या आजीच्या आगळ्यावेगळ्या आयुष्याची गोष्ट मार्गारेटकडून लिहिली जावी अशी इच्छा तिने दाखविली. तिच्या ताब्यात असलेला एक आठ पानांचा अॅनाच्या आयुष्याचा वृत्तान्त, जो स्वत: अ‍ॅनानेच लिहून ठेवला होता, तो तिने मार्गारेटकडे सोपविला. अॅनाच्या स्वत:च्या शब्दांमध्ये तिचे पूर्वायुष्य असे घडले:

I believe that I was born in Wales, in the old homestead of an ancient Welsh family named Edwards, the youngest daughter of which, my mother, accompanied her husband, Thomas Maxwell Crawford, to India, while I was left in charge of an eminent Welsh lady, Mrs. Walpole, a distant relative of my father, to be educated in Wales.

Soon after the arrival of my parents in British India, my father was appointed aide-de-camp to Sir James Macintosh who was then in command of the British troops sent to Lahore, to quell the Sikh rebellion, where, while in the act of performing some military duty, he was cut to pieces by Sikhs who lay in wait for him. My mother married again. Her second husband with Colonel Rutherford Sutherland were my guardians and the executors of my Father's will.

At the age of fifteen I went out to my mother, who was then in Bombay with her husband, who held a prominent position in the Public Works Department. My mother was in very delicate health. Unable to endure the domestic tyranny of my stepfather, and having an independent income of my own, I travelled with some dear friends, the Reverend Mr. and Mrs. George PercyBadger, to Egypt, visited Damascus, Jerusalem, sailed down the Nile, that flows through old, hushed Egypt, and its sands like some grave, mighty thought threading an unravelled dream; ascended the First and Second Cataracts; in fact, I went to visit everything that was worth-seeing, — the pyramids, Luxor, Theves, Karnak, etc., etc.

On my return to Bombay in 1851, I married Thomas L. Leonowens, a British officer holding a staff appointment in the Commissariat office, which marriage my stepfather opposed with so much rancor that all correspondence between us ceased from that date. When I was only eighteen, the death of my mother and my first baby came upon me with such terrible force that my life was despaired of, and my husband embarked with me on a sea voyage to England. But the ship 'Alibi' went on some rocks, through the carelessness of the captain, I believe, and we were rescued by another sailing vessel and taken to New South Wales. Here I buried my second baby, an infant son, and still dreadfully ill, we took a steamer for England and finally settled down at St. James's Square, London for nearly three years.

My husband's repeatedly extended leave of absence having expired, we returned with our two children to Singapore, where he was appointed. Here I commenced the study of Oriental languages with my husband under native teachers, but our life was again disturbed by the Indian Mutiny, and we suffered more than ever, not only in the heartrending calamities that befell some of my nearest relatives, and the just retribution that seemed to overtake us as a nation, but in the failure of several India banks, especially the Agra bank, in which the bulk of my fortune was deposited by the executors of my father's will.

❇︎

हा वृत्तान्त मार्गारेट लँडनच्या 'Anna and the King of Siam' ह्या १९४४ साली प्रसिद्ध झालेल्या बेस्ट-सेलर कादंबरीमध्ये शिरला आणि तेथून सिनेमा-ऑपेरामार्गे सर्व जगापुढे आला. पण तो जवळजवळ संपूर्णपणे कपोलकल्पित होता आणि खऱ्याखोट्याचे बेमालूम मिश्रण होता. तिचे खरे पूर्वायुष्य येथे वर वर्णिल्याप्रमाणे होते आणि त्याच्यावर खोटे आयुष्य चिकटवले गेल्यामुळे संपूर्ण झाकलेले होते. सयाम-थायलंडशी परिचित असलेल्या काहींना अॅनाला नोंदविलेल्या तपशीलांमध्ये काही संशयास्पद दिसल्याने त्यांनी आणखी संशोधन केले आणि अ‍ॅनाचा खरा वृत्तान्त आता जगापुढे आला आहे. ह्या संशोधनाच्या तपशीलाकडे येथे विस्तारभयामुळे जात नाही.

ह्या खोट्या आयुष्यामुळे अॅनाला उजळ माथ्याने ब्रिटिश उच्च समाजात मोकळेपणे वावरता आले. पहिले गोत आणि पहिली नाती सोडून तिने दुसरे गोत आणि नाती कल्पनेमधून निर्माण केली आणि त्याचा उत्तम उपयोग करून तिने आपले आणि आपल्या मुलांचे उत्तरायुष्य उज्ज्वल बनविले.

(सूझन मॉर्गन लिखित 'Bombay Anna' ह्या पुस्तकावर आधारित.)

❇︎❇︎

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. नव्वद सालाच्या आसपास कोणी सत्तर पंचाहत्तरीतला म्हातारा भेटला की मी विचारत असे की तुम्हाला काही इथल्या ब्रिटिशांच्या गोष्टी आठवतात का? काय करायचे,कसे राहायचे वगैरे.मला फार उत्सुकता असायची.आपल्याकडे धाडस हा प्रकार त्यावेळी जरा कमीच ऐकू येत असे पुरुषांकडून तर बायकांची गोष्टच सोडा.लहानपणी ज्या सलूनमध्ये जात असे तिथे एक केरळी न्हावी होता तो सांगायचा या केवळ एका कलेने मला निरनिराळ्या देशांत जाता आले. खूप भाषाही आल्या. मला त्याचे फार अप्रुप वाटायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0