रिंगण - कामातुराणाम्

ज्यांना आसक्त तर्फे दरमहा भरणारे "रिंगण" माहीत नसेल त्यांच्यासाठी हे सांगणे अगत्याचे ठरेल की दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवार/रविवारी सुदर्शन रंगमंच, पुणे इथे 'रिंगण' या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या साहित्याचे अभिवाचन अनेक मान्यवरांतर्फे केले जाते. या रविवारच्या रिंगणात 'कामातुराणाम्' नावाचा प्रयोग होणार आहे असे समजताच या प्रयोगाला हजेरी लावायचीच असे ठरवले होते. त्यात माधुरी पुरंदरे, हृषीकेश जोशी व किरण यज्ञोपवीत हे तिघे अभिवाचन करणार असल्याने एका मर्यादेहून चांगला कार्यक्रम होईल याची खात्री होती. उत्सुकता होती की या वेळी नक्की कोणत्या वेच्यांचे अभिवाचन असेल. त्यात आजवरचा रिंगणचा अनुभव प्रत्यक्ष वाचनकर्त्यांच्या उत्तम वाचिक अभिनयाची खात्री असल्याने कामातुराणाम् साठी मीच आतूर झालो होतो.

गेल्या वेळच्या गर्दीच्या अनुभवामुळे तासभर आधीच पोचलो तरी आमच्यापेक्षाही अधिक आतूर मंडळी तिकिटविक्री सुरू व्हायची वाट पाहत उभीच होती असे दिसले. आता वर्षभर हे रिंगण चालू आहे आणि दरवेळी गर्दी आधीच्यापेक्षा अधिकच वाटते आहे हे बघून आनंदही झाला. (तशी कुजबुज नेहमीच्या प्रेक्षकांतही ऐकू आली). दरवेळेप्रमाणे सुदर्शनला येऊन रिकामे बसून तेथील नेहमीचे प्रेक्षक बघणे हा ही माझ्या आवडत्या विरंगुळ्याचा भाग आहे. अत्यंत अजागळ कपडे घातलेल्या अनेक जणांमध्ये जो जितका ढगळ कपडे घालेल तो अधिक चांगला कलाकार या दृष्टिकोनातून स्पर्धा चालू असते की काय न कळे! पण एकीकडे असे कलाकाराचा 'गणवेश' घातलेले काही तर दुसरीकडे खादी, खादी-सिल्क, टसर सिल्क, गजरे, सिल्कच्या किंवा स्टार्च केलेल्या कॉटनच्या साड्या, नाहीतर मधुबनी/वारली चितारलेल्या किंवा ज्यूट वगैरेच्या पर्सेस वगैरेंची वर्दळ सुरू असते. सुदैवाने पृथ्वी थिएटरच्या बाहेर असते तसे इथे प्रसिद्ध व्यक्ती येण्याजाण्याच्या वाटेवर उभ्या राहून आपली प्रसिद्धी मिरवत मात्र नसतात. उलट अनेक घोळक्यांमध्ये सध्या चाललेले प्रयोग, काही पुस्तके, नाटक-सिनेमे-पुस्तके यांतील नवे बदल, हे वाचलेस का, याला भेटल्यावर काय समजले वगैरे मोकळी आणि आनंददायी चर्चा मात्र चालू असते. (या उलट पृथ्वी थिएटरला येणारे फक्त कोणत्याही एका भाषेत न बोलता अत्यंत वरवरचे आणि नाटकी ढंगात काहीतरी सांगताना आढळले आहेत). असो तर या लेखनाचा उद्देश या दोन ठिकाणाची तुलना करणे हा नाही - पण लिहिताना वाहवत गेलो. तर असो.

ऐसीवरच्या सर्व आतुरांसह इतर प्रेक्षकांनी हॉल खच्चून भरला होता आणि अपेक्षेप्रमाणे वेळेवर प्रयोगाला सुरुवात झाली. मागे पडद्यावर "कामातुराणाम्" असे लिहिलेले - प्रोजेक्ट केलेले- होते व सभोवताली खजुराहो टैप चित्रे रेखाटली होती. समोर तीन आसने होती. उजवीकडे दोन शेजारी शेजारी तर डावीकडे एक. प्रत्येक आसनांसमोर एक ग्रंथ ठेवायला 'पोथीच्या आसनासारखा' (एक 'एक्स' आकारातील घडी घालून ठेवता येतो असा स्टँड - याला काय म्हणतात? रयाळ की घडवंची (ही घड्यांसाठी असते बहुधा) की अडणी (ही शंखासाठी ना?) ) एक स्टँड ठेवलेला.

माधुरीताई नेहमीप्रमाणे प्रसन्न चेहरा, त्यांच्या खास स्टाइलमध्ये साडी नेसून (आतपदर मुख्य वरील पदराच्या बाहेर आलेला - यावेळी विषयानुरूप म्हणून की काय कोण जाणे पण साडी जरा चमक असलेली व किंचित अधिकच चापूनचोपून नेसलेली; का मलाच तसे वाटले कोण जाणे? Wink ते असो. ), किरण यज्ञोपवीत सुती कुर्त्यात तर हृषीकेश जोशी खादीच्या शर्टामध्ये स्टेजवर आले. (हृषीकेश जोशींचे नाव आंतरजालावर ऋषीकेश, सुदर्शनला खाली बोर्डावर ऋषिकेश, तर मूळ प्रयोगात प्रोजेक्ट करतेवेळी हृषीकेश असे लिहिले होते. ते स्वतः बहुदा हृषीकेश असे लिहितात म्हणून लेखात तेच वापरले आहे.). अभिवाचनाची सुरुवात 'दि.बा.मोकाशी' यांच्या 'वात्स्यायन' या पुस्तकातील वेच्याने झाली. शंकर व पार्वती यांच्यातील संवाद माधुरीताई व किरण यांनी सादर केला. त्यानंतर खुद्द मल्लनाग वात्स्यायनाचे संवाद/स्वगत/माहिती हृषीकेशने सादर केली. सुरवातीपासूनच हृषीकेश जोशींची चलबिचल चालू असल्यासारखे वाटले. पहिली २-३ मिनिटे ते कशाने तरी अवघडले आहेत असेही वाटले (त्यांच्या बाजूला प्रकाश कमी होता अशी मला शंका आली.). मात्र नंतर स्थिरावल्यावर हे आपल्या नेहमीच्या बेफाम शैलीत त्यांनी सानुनासिक Smile अभिवाचन केले. या तीन कलाकारांनी पत्नी-सुखापासून वंचित राहणे शक्य न झाल्याने शेवटी वात्स्यायन पत्नीमागे तिच्या माहेरी जातो व त्याला त्याचे गुरू कामशास्त्रावर ग्रंथ लिहिण्याचा आग्रह करतात इथपर्यंतचे वर्णन करून या पुस्तकातील भाग एक संपवला.

त्यानंतर 'गाथा सप्तशती' या 'ह.आ.जोगळेकरांच्या" दीर्घ टीकेतील काही भाग त्यांनी अत्यंत नेटाने सादर केला. मिश्किल शैली आणि या विषयाशी संबंधित तत्कालीन प्राकृतातील अतिचावट व विनोदी गाथा व त्यावरील संक्षिप्त टीका किरण व माधुरीताईंना अश्या काही ढंगात व टेचात सादर केल्या की श्रोत्यांमध्ये हसण्याची आवर्तने निर्माण होत होती. (व्यभिचार करता आला नाही तर नवर्‍याशी केलेल्या संभोगावर समाधान मानावे अश्या अर्थाची एक गाथा सर्वाधिक हशा मिळवून गेली. तर लपून संभोग करताना पाळायचे नियम सर्वाधिक वाहवा!) मला हा भाग या कार्यक्रमातील सर्वात अधिक आवडला Smile . अतिशय नेमका सूर, वाचिक अभिनयाची नजाकतभरी पेशकश, नेमक्याजागी पॉज, वाचनाचा नखरेल ढंग यांनी या मराठीतील आद्य ग्रंथाबद्दलचे कुतूहल तर चाळवलेच शिवाय सभेचा नूरही पालटला. त्यानंतर नंबर होता "शुक बहात्तरी" या अजरामर पुस्तकाचा. पतीचा डोळा चुकवून व्यभिचार करावयास निघालेल्या स्त्रीला तत्सम प्रकार करूनही बचावणार्‍या इतर चतुर स्त्रियांच्या विविध कथा सांगून तिला व्यभिचारापासून परावृत्त करतो. त्यावेळी रोज रात्री सांगितलेली एक अशा बाहत्तर कथा (म्हटल्या तर कथा, म्हटल्या तर चावटिका) असे या पुस्तकाचे स्वरूप. त्यापैकी दोन कथा या मंडळींनी तितक्याच दमदारपणे सादर केल्या. त्यानंतर "आनंद साधले" यांच्या "आनंदध्वजाच्या कथा" ओलांडून पुढे जाणे या विषयावरील कोणत्याही कार्यक्रमाला शक्य नव्हतेच, आणि इथेही त्यांची एक कथा ज्या ताकदीने सांगितली गेली तिचा समावेश नसता तर कार्यक्रम अपुरा राहिला असता असेच वाटून गेले.

शेवटी पुन्हा दि.बा.मोकाशी यांच्या वात्स्यायनातील, वास्त्यायनाच्या कामशास्त्रावरील पंडितमित्रांशी झालेल्या चर्चा, त्यातून स्त्री व पुरुष हे कामक्रिडेत सारख्याच आनंदाचे भागीदार असतात व दोघांनाही कामशास्त्र शिकणे कसे गरजेचे आहे असा त्या काळी अतिशय नवा ठरलेला सिद्धांत, त्याचे ग्रंथ लिहिणे आणि एकूणच त्याची कामशास्त्राबद्दलची मते असा काहीसा गंभीर; मात्र या विषयातील अत्यंत महत्त्वाचा भाग या वाचनात मांडला गेला. "नव्या बौद्ध धर्माच्या पगड्याखाली आलेल्या काही धर्मांधांनी कामशास्त्रावर टिका सुरू केली आहे व हळूहळू याचा अभ्यास बंद होईल. या विषयाच्या अज्ञानामुळे व बोलण्याच्या चोरीमुळे हे प्रकार कमी होणार नाहीतच उलट विकृती व गैरप्रकार वाढीस लागून जनांमध्ये दु:ख पसरेल" अशी भिती वात्स्यायनाला जेव्हा वाटते तेव्हा त्या भावनेने आजही आत खोल कुठेतरी वाईट वाटते.

भारतीय इतिहास, संस्कृती आणि साहित्य यांत असलेले संगीत, क्रीडा याच बरोबरीने असलेले कामशास्त्राचे महत्त्व सद्य समाज विसरला आहे किंवा माहीत असूनही तो त्याकडे काणाडोळा करतो आहे. अशावेळी चावटिका असो किंवा शृंगारकथा असोत किंवा कामशास्त्रावरील गंभीर चर्चा असो हा विषय दुर्लक्षिणे जाऊच द्या त्यात अधिकाधिक खुलेपणाने चर्चा आवश्यक आहे आणि अशावेळी या "कामातुराणाम्" सारख्या प्रयोगाने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

field_vote: 
0
No votes yet

अहाहा! आभार. कार्यक्रम पाहणे शक्य झाले नाही याची हुरहुर ताफा जाणे नाही. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छोटंसं रेकॉर्डिंगतरी कोणाकडे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तर लपून संभोग करताना पाळायचे नियम सर्वाधिक वाहवा!) मला हा भाग या कार्यक्रमातील सर्वात अधिक आवडला (स्माईल) .

ब्वॉरं! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ह्यात उल्लेखित पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत का? आणि असलीच तर त्यातल्या चावट वर्णनांसकट आहेत का?
(नाय म्हणजे आम्ही अपेक्षा ठेवायची बाँडपटाची आणि निघायचा संस्कारी बाँड!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आनंदध्वजाच्या कथा , हाल सातवाहनाची गाथासप्तशती , शुक बहात्तरी

पैकी 'आनंदध्वजाच्या कथां'त अपेक्षित चावटिका आहेत. उरलेली वाचलेली नसल्याने सांगू शकत नाही.

मोकाशीँच्या 'वात्स्यायना'वर गेल्याच महिन्यात 'लोकसत्ता'मध्ये आलेला लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> आनंदध्वजाच्या कथा , हाल सातवाहनाची गाथासप्तशती , शुक बहात्तरी
पैकी 'आनंदध्वजाच्या कथां'त अपेक्षित चावटिका आहेत. उरलेली वाचलेली नसल्याने सांगू शकत नाही.

'गाथा सप्तशती' आणि 'शुकबहात्तरी' त्यातल्या चावटपणासाठी प्रसिद्ध आहेत. व्यभिचारी स्त्रीपुरुषांची इतकी चविष्ट वर्णनं त्यात आहेत, की आजच्या स्वयंघोषित संस्कृतिरक्षकांसाठी ती पाठ्यपुस्तकं म्हणून नेमावीत अशी माझी कळकळीची इच्छा आहे. आनंदध्वजासाठी प्रेरणारूप म्हणून आनंद साधल्यांसमोर 'डेकॅमेरन' किंवा 'अरेबियन नाइट्स'प्रमाणेच हे भारतीय अक्षरवा़ङ्मयही असावं असा अंदाज आहे. बुकगंगावर 'कोकिला पस्तिशी' म्हणूनही एक पुस्तक दिसतंय. तेसुद्धा शुकबहात्तरीचंच भावंड दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'नागमल्ल वात्स्यायन' असे नाव नसून 'मल्लनाग वात्स्यायन' असे ग्रन्थाधारित नाव आहे. तसेच श़ंकर-पार्वती संवाद, वात्स्यायन कामसूत्र लिहिण्यास का प्रवृत्त झाला हा मजकूर संपूर्ण कपोलकल्पित आहे. मूळ 'कामसूत्रा'मध्ये ह्यातील काही नाही, तसेच दंतकथा स्वरूपातहि हे कधी वाचनात आलेले नाही. ही दि.बा मोकाशींची स्वनिर्मित रंजक कथा दिसते.

'ऋषिकेश, हृषीकेश, हृषिकेश' ह्यांपैकी 'हृषीकेश' (हृषीक + ईश, हृषीक = ज्ञानेन्द्रिय) हा प्रयोगच शुद्ध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही त्या गृहस्थांना ओळखता! तसे असल्यास ओळखीमुळे सुयोग्य नाव तुम्हाला ठाऊक असणार. नाव ठाऊक असल्यानंतर त्याची व्युत्पत्ती देणे ठीकच.

पण प्रत्यक्ष किंवा ख्यातीने त्या गृहस्थाचे नाव ठाऊक नसले, तर भलत्या कुठल्या नावाची व्युत्पत्ती देणे अप्रस्तुतच. नाहीतर कुठलेसे भलतेच "मृत्यु + जय = मृत्युंजय, मृत्यु = मरण" हेच शुद्ध, आणि माझे "धनंजय" हे नाव अशुद्ध असे नका बरे म्हणू. माझे नाव लिहिण्याची वेळ आल्यास मृत्युंजय धनंजय असेच लिहावे, ही विनंती.

आपल्याला अनोळखी विशेषनामाविषयी अनेक पर्याय असू शकतात :

१. "ऌफिड्ड" असा महाभाष्य-रचनेपूर्वी कोणीही न ऐकलेला शब्द कोणाचे नाव असू शकते, हे उदाहरण पतंजलीने दिलेले आहे. त्या शब्दाची ओढूनताणून व्युत्पत्ती करायला गेली तर त्याचे हसेच केले आहे. त्याच प्रमाणे "Queequeg", "पिंट्या", "मम्मट", "ऋषिकेश", वगैरे त्या व्यक्तीचा निर्देश करणारे मूळ अव्युत्पन्न शब्द मानावेत.
२. केवळ मनोरंजन म्हणून : ते विशेषनाम व्युत्पत्तीपुरते शुद्ध मानून, ते आपल्या-बोलीपेक्षा-वेगळ्या-बोलीत अपभ्रष्ट उच्चारतात असे मानावे. मग आपण त्या वेगळ्या बोलीचे अनुकरण करत आहोत असे मानावे. आणि ते अनुकरण आहे म्हणून ध्वनिशब्द (onomatopoeia) म्हणून उच्चारण्याकरिता शुद्ध मानावे. महाभाष्यात एका पात्राने "ऌफिड्ड" शब्द "ऋ" धातूला "फिड्ड" हा उणादि प्रत्यय लावून "ऋफिड्ड" शब्द शुद्ध साधलेला आहे, अशुद्ध बोलणारा कोणी "ऌफिड्ड" म्हणेल असे मानले आहे, आणि त्या अशुद्ध बोलणार्‍याचे अनुकरण करत संस्कृतभाषकही "ऌफिड्ड" असा शुद्ध अनुकरण-उच्चार करू शकतो, अशी आडवळणी वाट सुचवलेली आहे. त्याचप्रमाणे पतंजलीने "देवदत्त->देवदिण्ण" असे उदाहरण पुढे दिले आहे. म्हणजे संस्कृतभाषकाला "देवदिण्ण" या प्राकृत शब्दाचा (तुच्छतेने का होईना) अनुकरण-उच्चार करण्याकरिता पळवाट पतंजलीने करून दिलेली आहे. इतकेच काय - अपभ्रष्ट नावाचा उच्चार करताना "देवदिण्ण" अशी नक्कल करतानाची तुच्छता वाटलीच पाहिजे, या सक्तीतूनही पतंजलीने पळवाट दिलेली आहे. "यद्वान-तद्वान" म्हणून कोणी ऋषी होते, त्यांचा "यर्वाणस्तर्वाण" असा अपभ्रंश झालेला उच्चार सम्मानाने करता येतो, असे उदाहरण पतंजलीने दिलेले आहे.
त्याचप्रमाणे अरविन्दराव जी बोली बोलतात, तीत "हृषीकेश" शुद्ध आहे, असे त्यांनी म्हणावे, मग प्रमाणमराठी/प्रमाणहिंदी या वेगळ्या प्राकृतोद्भव बोलींमध्ये त्याचा "ऋषिकेश" असा अपभ्रंश झाला आहे असे मानावे. मग प्रमाणमराठी भाषकाची नक्कल करत अरविन्दरावांनी "(लेखी) ऋषिकेश (उच्चारी रुशिकेश)" असे लेखन/उच्चारण करावे. आणि अपभ्रष्ट उच्चार तुच्छ आहे असे मनात आले पाहिजे अशी सक्ती नाही : "त्यांची बोली वेगळी आणि सन्माननीय, माझीही सन्माननीय, पण या शब्दापुरते मी प्रमाणमराठीची निव्वळ नक्कल करतो आहे", असे म्हणावे.
"ऋषिकेश" नावाचे एक तीर्थस्थळ गंगेवर आहे. वाटल्यास "हृषीकेश"चा अपभ्रंश केल्याचे खापर तेथील गावंढळ ग्रामस्थांवर फोडावे. आणि आपल्या ओळखीतील "ऋषिकेश"सुद्धा त्या तीर्थस्थळाच्या नावाचे अनुकरण म्हणून शुद्धच नक्कल-शब्दाचा वापर करत आहे, असे मानावे. म्हणजे तेथील अनोळखी ग्रामस्थांबाबत मस्तपैकी तुच्छता, आणि परिचिताबाबत अनुकरणशब्द शुद्ध बोलण्याचा गौरव, दोन्ही साधतात. हा सुवर्णसौरभयोग!
३. केवळ मनोरंजन म्हणून : "Queequeg", किंवा "ऋषिकेश" हे तत्सम संस्कृत घटकांपासून बनलेले आपणास नवीन नाव आहे, असे समजून वेगवेगळी व्युत्पत्ती लावून बघावी. "(ऋषि+क)+ईश", "(ऋषि+क्+आ)+ईश", "ऋषि+केश" हे तीन तरी पर्याय मला फार विचार न करिता सुचतात. त्यांचा वाटेल तसा अर्थ लावावा. सहृदय असल्यास शक्यतोवर शुभ अर्थ लावावा. "ऋषिकेश" असे विशेषनाम लावणारी कोणी व्यक्ती मित्रपरिवारात असल्यास त्या व्युत्पत्तींपैकी निवड करण्यास द्यावी. त्या व्यक्तीपुरती तरी निवडलेली व्युत्पत्ती लक्षात ठेवावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप रे! हे काय आहे? बुक्का, थप्पड तर नक्कीच नव्हे. चिमटा, चापटी, गालगुच्चा, लोकरीचा हातमोजा घालून गालावर फिरवलेला हात? की जी पीस नामक वस्तू शायीत* बुडवून पूर्वी लेखन व्हायचे, ते किंञ्चित खरखरीतपणे गालावर फिरवलेले पीस?
* यावरही असाच सुंदर प्रतिसाद येईल का? (हे प्रवोकेशन नाही. तेव्हढी माझी हिम्मत/धाव/कुवत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'हृषीकेश'हा उच्चार केवळ माझ्याच बोलीचा नाही तर गीतेतहि तीच बोली दिसते. तेथे सर्वत्र हृषीकेश असा प्रयोग आहे अणि तो मी दिलेल्या व्युत्पत्तीच्या अर्थानेच केवळ समजू शकतो. तेथून तो उचलून वापरणार्‍या सर्वांवर हे बंधन येते की त्यांनी तो तसाच वापरावा. मी तो 'ऋषि + केश' अशा स्वनिर्मित अर्थाने वापरत आहे असा बचाव करणे मला योग्य वाटत नाही. ह्या बाबतीत मी unashamedly purist आहे हे मी नि:संकोचपणे मान्य करायला तयार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा मुद्दा चुकतो आहे.

गीतेत "हृषीकेश" असे आहे, आणि त्याची तुम्ही दिलेली व्युत्पत्ती योग्यच आहे. परंतु मराठीत आणि हिंदीत एक नाव आहे, त्याची गोष्ट होत आहे.

तुम्ही तुमच्या लेखनात "केवळ" हा शब्द वापरला आहे, तो बहुधा तुमच्या बोलीतला असावा. गीतेत शब्द "केवल" असा दिसतो.

तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः ।
पश्यति अकृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः ॥ १८-१६ ॥

> 'हृषीकेश'हा उच्चार केवळ माझ्याच बोलीचा नाही तर गीतेतहि तीच बोली दिसते.
तर गीतेतल्या बोलीत आणि तुमच्या वापरातल्या बोलीत अनेक ठळक फरक दिसतात. इतकेच काय, ज्या-ज्या व्यक्तीला गीता सहज आणि शब्दन् शब्द वाचता येत असेल, त्या-त्या व्यक्तीला तुमचा वरील प्रतिसाद वाचता येईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गीतेत ज्यांचा व्युत्पत्तिजन्य संबंध आहे, अशा शब्दांचे गीतेपेक्षा वेगळे लेखन केल्याची उदाहरणेच उपप्रतिसादात अधिक आहेत. (येथे "अधिक संख्या" ठरवण्याकरिता नामे-विशेषणे, क्रियापदे, सर्वनामे, सर्वच मोजली आहेत. नामे-विशेषणेच बघितली, तरी अनेक रूपे गीतेतल्या पेक्षा दिसतात : केवळ, बोली, वापरणारा, बचाव, बाबत.) त्यामुळे नको त्या भलत्या शब्दांच्या बाबतीतही purist असल्याची (unashamedly) अपराधत्यागाची भावना नजरचुकीनेच झाली असणार.

> तेथून तो उचलून वापरणार्‍या सर्वांवर हे बंधन येते की त्यांनी तो तसाच वापरावा.
हा कळीचा मुद्दा तुम्हाला ठाऊक आहे. तो मुद्दा सर्वमान्यही आहे. (For an exact quote, everyone is automatically a purist; there is no need to qualify some as being unashamed.)
पण "तेथून तो उचलून वापरला" हे कोण्या अनोळखी व्यक्तीच्या नावाबाबत तुम्ही कसे ठरवू शकता? भारतीय लोक बहुभाषिक आहेत, भारतातील प्रचलित भाषांत तद्भव शब्दभांडार भरपूर आहे. तेव्हा "तो संस्कृत ग्रंथापेक्षा वेगळ्या ठिकाणून उचलून वापरला आहे" हा विचार खूपच संभवनीय वाटतो. आता तुम्ही "केवळ" शब्द वापरताना तो "गीतेतून उचलून वापरला, तसाच वापरायचे बंधन आहे" असे म्हणणे अपरिपूर्ण विचाराचे लक्षण नाही का ठरावे? असा विचार कोणी तुमच्यावर लादून स्वतःला "शुद्धकेवक" म्हणेल; तर त्यास "केवळ-निर्लज्ज-शुद्धकेवलक" म्हणणे भाग पडेल! तद्भव-दु:स्वास तुमच्या शब्दसंपदेत इतका विरळा दिसतो, की "निर्लज्जपणे तत्सम शब्दच वापरण्याचे बंधन पाळतो" अशी आत्मनिंदा अन्याय्य आहे.

"केवळ-शब्द गीतेपेक्षा वेगळ्या स्रोताकडून उचलून तुम्ही वापरत आहात" असा निर्णय करणे अगदीच सोपे आहे. मराठीभाषकांत तत्सम-नसलेले शब्द व्यक्तिनावे म्हणून वापरण्याची परंपरा जुनी आहे, तो काही नव्या पिढीचा विक्षिप्तपणा नव्हे : बळवन्त, बाळ, चिमाजि, बाजी, संभा, कमळा, बायजा, सई अशा प्रकारची व्यक्तिनावे शेकडो वर्षांपासून वापरलेली दिसतात. ही सर्व नावे कुठल्याशा संस्कृत ग्रंथातून जशीच्या तशी उचलून वापरली असे म्हणणे ठीक नाही. त्यांसारखे कुठलेसे शब्द कुठल्या संस्कृत ग्रंथांत सापडतीलच, पण ही नावे तेथून उचलेली नाहीत. मराठीततील तद्भव शब्द ऐकून आपल्या आजूबाजूच्या वापरातून उचललेली ती नावे आहेत.

> मी दिलेल्या व्युत्पत्तीच्या अर्थानेच केवळ समजू शकतो
गीतेतला "हृषीकेश" शब्दाचा वापर तुम्ही दिलेल्या व्युत्पत्तीने समजू शकतो, हे खरे. परंतु गंगेच्या काठावरील "ऋषिकेश" गावाच्या (हिंदी) नावाबाबत तो व्युत्पत्तिजन्य अर्थ सुसंगत नाही. काही ऐतिहासिक संदर्भ असला, पण तो कालौघाने विसरलेला असला, तर तो नि:संदर्भच होतो. "वेणुग्राम"चा काही अर्थ - "बांबूचे गाव" - लागतो, तसा "बेळगाव" या प्रचलित नावाचा तो सामासिक अर्थ लागत नाही. म्हणून काही सध्याचे लोक "बेळगाव" (का "बेळगावि") म्हणतात ते अशुद्ध होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मल्लनाग वात्स्यायन' असे ग्रन्थाधारित नाव ही चांगली माहिती आहे. अपेक्षेप्रमाणे साधार आणि खणखणीत.
(आदल्या उपप्रतिसादामुळे या प्रशंसेवर सावट नको.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके. मल्लनाग असेल.. बाकी छान गुंफलेल्या कथेच्या ओघात हे नाव नीटसे लक्षात न राहण्याची शक्यता आहेच. आभार! लेखनात बदल करतो आहे.

बाकी धनंजय यांचा उपप्रतिसाद वाचून काही वर्षांपूर्वी वाचलेल्या एका बालसाहित्याच्या कथेत त्या कथानायकाचे नाव "ल" असते याची आठवण झाली Smile

मागे धनंजय यांनीच ऋषिकेश या नावाच्या अनेक संभाव्य व्युत्पत्त्या दिल्या होत्या (त्या मी मानतो अथवा माझ्या नावाला लागू आहेत असा दावा नाही. माझ्या नावाला काहीही अर्थ नाही म्हणालात तरीही मला काहीही फरक पडणार नाही)

धनंजय उवाच. मुळ धागा उपक्रमावर होता. हा प्रतिसाद माझ्या आवडीचा म्हणून स्वतंत्र सेव्ह केलेला आहे.

गंगेच्या काठावरती एक मोठे गाव आहे, त्याचे नाव "ऋषिकेश" असे आहे - त्यांनी सांगितलेला हा तपशील योग्यच आहे. या गावातील कित्येक संस्कृत पंडितही त्याचे नाव "ऋषिकेश" असेच लिहितात. तसेच वाचक्नवी यांनी दिलेली ऋषीचा केश = ऋषिकेश ही व्युत्पत्ती सोपी आणि मनात प्रथम येणारी आहे.

ऋषिक शब्दाचा अर्थ "हीन" असा सृष्टिलावण्या यांनी दिलेला आहे. ऋषिक या शब्दाची ऋषि+ (निंदार्थक) क (अर्थ - हीन ऋषी) अशी फोड करता येते. (पण ऋषिक म्हणजे केवळ हीन - ऋषी नाही - अशी फोड मला माहीत नाही.) मोनिएर विल्यम्स यांच्या शब्दकोशातही हा "हीन ऋषी" अर्थ सापडतो. परंतु त्याच शब्दकोशात "ऋषिका" हे एका नदीचे नाव होते, असेही सापडते.
ऋषिका+ईश = ऋषिकेश -> ऋषिका नदीचा अधिपती असाही अर्थ निघतो.

ऋषिक नावाचे एक लोकविशेष होते, असे आपल्याला दिसते. दिग्विजय करताना अर्जुनाने या लोकांवर विजय मिळवला (तसा खूप-खूप देशांवर विजय मिळवला - ते सर्व वाईट लोक नव्हते). हे लोक शूर असावेत. बाकी राज्यांबद्दल सभापर्वातील २४व्या सर्गात फक्त नामोनिर्देश केला आहे. ऋषिक लोकांबाबत मात्र दोन श्लोक आहेत :
२.२४.२४ :
लोहान्परमकाम्बोजानृषिकानुत्तरानपि ।
सहितांस्तान्महाराज व्यजयत्पाकशासनिः ॥
२.२४.२५
ऋषिकेषु तु संग्रामो बभूवातिभयंकरः ।
तारकामयसंकाशः परमर्षिकपार्थयोः ॥
२.२४.२६
स विजित्य ततो राजन्नृषिकान्रणमूर्धनि ।
शुकोदरसमप्रख्यान्हयानष्टौ समानयत् ॥
अर्जुनाला युद्ध देण्याच्या लायकीचा ऋषिकांचा हा तेजस्वी राजा सुद्धा ऋषिकेशच म्हणावा.
हे युद्ध झाल्यानंतर ऋषिक लोक नाहिसे झाले नाहीत. व्याकरणमहाभाष्यात ऋषिक लोकांचे जनपद "आर्षिक" आहे, असे उदाहरण दिले आहे. (पा.सू ४.२.१०४वरील भाष्य) महाभारतानंतरही टिकलेल्या या ऋषिकांचे सर्व नेते "ऋषिकेश" म्हटले जाऊ शकतात.

- - -

सारांश : विशेषनामांसाठी मला वाटते त्या-त्या व्यक्तीलाच विचारून अर्थ, लेखनाची पद्धत आणि उच्चाराची पद्धत स्वीकारावी. कुठल्याशा एका व्युत्पत्तिजन्य अर्थाचा आरोप करून विशेषनाम चुकले आहे, असे म्हणणे कित्येकदा पटण्यासारखे नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'ऋषिकेश-हृषीकेश' ह्याविषयी मी जे वर लिहिले आहे त्याविषयी खुलासा.

आपले जुने-जाणते सदस्य ऋषिकेश ह्यांचे नाव त्यांनी योग्य प्रकारे कसे लिहावे हे सांगण्यासाठी मी ते अजिबात लिहिलेले नाही. त्यंनी आपले नाव कसेहि लिहावे, त्याला आक्षेप घेणारा मी कोण? मला तसे करायचे असते तर ते गेल्या चार वर्षांत - माझ्या सदस्यत्वाची लांबी - केव्हाहि केले असते पण मी तसे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपाने कधीहि केलेले नाही हा इतिहास आहे.

वर मूळ धाग्यात ऋषिकेश ह्यांनी लिहिले आहे 'हृषीकेश जोशींचे नाव आंतरजालावर ऋषीकेश, सुदर्शनला खाली बोर्डावर ऋषिकेश, तर मूळ प्रयोगात प्रोजेक्ट करतेवेळी हृषीकेश असे लिहिले होते. ते स्वतः बहुदा हृषीकेश असे लिहितात म्हणून लेखात तेच वापरले आहे.' ह्या वाक्याच्या संदर्भामध्ये मी आपले मतप्रदर्शन केले आणि 'हृषीकेश' हाच शब्द शब्द म्हणून सार्थ आणि म्हणूनच समर्पक आहे असे म्हटले. कोशकार वामन शिवराम आपटे आणि मोनिअर विल्यम्स तेच सांगतात.

माझ्यासमोर 'कृष्णाचे नाव ऋषिकेश आहे' असे कोणी लिहून आणून टाकले तर ते मला मान्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थातच! हे माझ्याबद्दल नाही माहित होते. मला केवळ त्यावरून झालेली जुनी चर्चा आठवली ती पुरवणी म्हणून दिली. त्याबद्दल गैरसमज अजिबात नाही.

मात्र हृषीकेश जोशींबद्दल लिहिताना ते स्वतःचे नाव कसे लिहितात तितकेच महत्त्वाचे आहे. कृष्णाचे नाव काहीही का असेना!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रिंगण आणि रिंगणाबाहेरची चर्चा आवडली.

मात्र हृषीकेश जोशींबद्दल लिहिताना ते स्वतःचे नाव कसे लिहितात तितकेच महत्त्वाचे आहे.

'एक ऋका हुआ फैसला!' ह्या फालतू कोटीचे ह्या ऋद्य चर्चेला ठिगळ लावल्याबद्दल दिलगीर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0