कादंबरी विरोध आणि द्वेषावर उभी राहते.

जी के ऐनापुरे कादंबरी विषयी नव्वदोत्तरी

कादंबरी विरोध आणि द्वेषावर उभी राहते.

लेखक - जी. के. ऐनापुरे

साधेपणा (simplicity) ते गुंतागुंत (complexity) हा मानवाच्या विकासाचा प्रवास आहे, जो मानवाच्या जन्मापासून सुरू होतो. त्याच्या निर्वाणानंतरसुद्धा तो संपत नाही. हा विकासाचा क्रम साहित्याच्या परिप्रेक्ष्यात आणल्यानंतर, त्याच्यातील गुंतागुंत पुढेमागे होऊन मानसिक पातळी प्राप्त करतो आणि सत्याचा शोध सुरू होतो. ह्या शोधाच्या पातळ्या कथा, कविता, कादंबरी, टीका अशा असू शकतात; ज्यांना पुढे आपण वाङ्‌मयप्रकार असे म्हणतो. पैकी कथा आणि कादंबरीला फिक्शन म्हणायची परंपरा जुनीच आहे. ती परकीय अधिक आहे. आपल्याकडे गद्याचं मूळ रूप गोष्टच आहे. ह्यालाच आपण कथा असे म्हणायला लागलो. गोष्ट आणि कथा ह्यामध्ये हमखास फरक करता येण्यासारखा आहे. हा फरक "आशययुक्त" (गोष्ट आहे) आणि "आशयमुक्त" (गोष्ट नाही) असा करता येईल. तो प्रयोग विरुद्ध आशय असासुद्धा करता येईल. कथेत साधेपणानं सांगितलेली गोष्ट कादंबरीत अधिक विस्तारमय, पाल्हाळिक, कंटाळवाणी आणि लिहिणाऱ्या-वाचणाऱ्यांना त्रासदायक होण्याची शक्यताच अधिक असते. ह्या त्रासापासून बचाव करण्याची जबाबदारी लिहिणाऱ्याच्या बाजूलाच अधिक असते. ह्याचे मूळ पुन्हा, आशय की प्रयोग, इथेच परत जातं. वाचकांचा अनुनय की साहित्यव्यवहारातली जागा ह्या नव्या झगड्यात लिहिणारा वयोपरत्वे अडकत जातो. त्याचं लिहिणं भरकटतं. एक लेखक, कादंबरीकार म्हणून त्याला मान्यता मिळालेली असली तरी आशयाला आपण कसे मुकत गेलो ह्याची रिळे त्याच्या डोक्यात फिरत राहतात, आणि अपूर्णतेची जाणीवसुद्धा. (ती तर कायमच असते)

वर्तमानयुगात (आय.टी., जागतिकीकरण) हा विकासक्रम उलटा बनत चालला आहे. गुंतागुंतीच्या झमेल्यात अडकून पडल्यामुळे माणूस आणि त्याच्या निर्मितीच्या शक्यता मानसिक पातळीवर असुरक्षित, थांबून राहण्याच्या प्रक्रियेजवळ पोचलेल्या आहेत. ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू 'बहुआयामी विचलन' हा आहे. हे विचलन दिसायला आर्थिक असले तरी त्याचा मुख्य स्रोत सांस्कृतिक अधिक धार्मिक असाच आहे. ह्या विचलनाला भिडण्याची क्षमता लिहिणाऱ्याच्यात अधिक सक्षमपणे निर्माण व्हायला हवी. गुंतागुंत ते साधेपणा हा जो उलटा बनत चाललेला विकासक्रम हा, ह्या विचलनातून सुटका करून घेण्याचा सोपा मार्ग दिसत असला तरी तो तितका सोपा नाही. म्हणून तर माणूस ह्या विचलनावर प्रतिक्रियात्मक न होता त्याला अध्यात्माच्या आणि धर्माच्या नावाने शरण गेलेला आहे. ह्या शरण जाण्यातून त्याला मनःशांती मिळवून देणारा साधेपणा प्राप्त करायचा आहे, अवगत करायचा आहे. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जगण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. माणूस ज्या साधेपणाच्या प्राप्तीसाठी धडपडतो आहे तो साधेपणा पहिल्या साधेपणापेक्षा वेगळा आहे. पहिला साधेपणा आरंभबिंदू या अर्थाने आहे; तर दुसरा साधेपणा अधिक ज्ञानाच्या अवलोकनातून येणारा, नेमका, समृद्धी देणारा, सत्याच्या जवळ जाणारा, कोणत्याही प्रकारच्या विचलनाला उडवून लावणारा आहे. हा साधेपणा थेट तत्त्वज्ञान आणि सहजतेकडे जातो. हा साधेपणा प्राप्त करणं माणसासाठी जितकं अवघड, त्याच्यापेक्षा अवघड लिहिणाऱ्यासाठी; त्यातल्या त्यात कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्यांसाठी अवघड आहे. अशा अर्थाने लिहिण्याकडे बघितल्यास ते आपोआपच एक अवघड कर्म बनतं. हा दुसऱ्या प्रकारचा साधेपणा उर्दू आणि कन्नड साहित्यात अधिक प्रमाणात आहे, आणि मराठी साहित्यात तो अपवादानेच दिसतो. 'मराठीचा अभिमान' अशा अर्थाने त्याचा शोध घ्यावा लागतो. बहिणाबाई, नामदेव ढसाळ यांच्या कविता, माडगूळकर, सखा कलाल यांच्या कथा ह्याच्यापुढे हा शोध, इच्छा असतानासुद्धा सरकत नाही.

साधेपणाच्या (दुसऱ्या प्रकारच्या) पार्श्वभूमीवर नव्या पिढीच्या लेखनात, वर्तुळात डोकावल्यावर पूर्वसुरी, भूमिका, गटातटाचे राजकारण, प्रकाशकीय चौकटीत स्वतःला व लेखनाला कोंबून घेण्याचा प्रकार, स्वस्त प्राध्यापकी, फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवरील फालतू चमकोगिरी अशा अनेक गोष्टींचा संदिग्ध गोंधळ त्यांच्या लेखनापर्यंत पोचलेला दिसतो. ह्यातून थेट सुटका करून घेऊन, ह्या सगळ्याचा वापर आपल्या लेखनात करण्याची अपरिहार्यता अपवादात्मक आणि तऱ्हेवाईक बनलेली आहे. कवितेत हा प्रकार फार पूर्वीपासूनच सुरू झालेला आहे. पण तो अर्थहीन, कंटाळवाणा आणि टाकाऊ बनलेला आहे.

रघुनाथ कडाकणे (मिथ्याचे प्रयोग), शंकर सखाराम (एस. ई. झेड.), सीताराम सावंत (देशोधडी), महेंद्र कदम (आगळ), कचरू भालेराव (सूर्या) , नामदेव माळी (खरडछाटणी, छावणी), सुभाष किन्होळकर (शिक्षणसेवक : कृष्णा डोळसे), सरदार जाधव (दात, कोयता), कुमार अनिल (भडास), रफीक सूरज (रहबर), अशोक कोळी, आनंद विंगकर, किरण गुरव, श्याम पेठकर (भावलीचं लगीन) असे अनेकजण कादंबरी लिहिताना दिसत आहेत. ही कादंबरी या वाङ्‌मयप्रकाराची जमेची बाजू म्हणायला हवी. 'ह्या सगळ्यांच्या कादंबऱ्या चांगल्या की वाईट?' हा प्रश्न येथे दुय्यम आहे. त्यांनी कादंबऱ्याच का लिहिल्या? कथा का नाही? ह्या संदर्भात अधिक चर्चा साहित्यव्यवहार, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा अंगाने व्हायला हवी. पण अशा चर्चेला समीक्षाव्यवहारात स्थान नाहीच. हे आपल्या साहित्यसंस्कृतीच्या दृष्टीने वाईटच म्हणायला हवं. ह्या सगळ्यांनी भूप्रदेश, भाषा, आशय, संवाद, विस्तार, जगण्यातला सभोवताल (भूतकाळ अधिक), ह्या सगळ्याला 'वास्तव' म्हणून समोर आणलेलं असलं तरी हे वास्तव सांगण्याचं प्रयोजन लेखनाच्या केंद्रस्थानी टोकदारपणे नीट न आणल्यानं ह्या कादंबऱ्या, वाङ्‌मयप्रकार अशा अर्थानं विस्तारमयच अधिक आहेत. हा विस्तार काहीवेळा भयावह आणि टाकाऊ बनतो. विस्तार आणि प्रयोगशीलता या गोष्टी एकत्र आल्यावर कादंबरी अडगळीतल्या अंधाऱ्या खोलीसारखी कशी बनते, ह्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून ‘अ डाॅ हाॅ का बा ना सु ना’ (२००८) ह्या श्रीधर तिळवे ह्यांच्या कादंबरीचं नाव सांगता येईल. ह्या कादंबरीची एकूण पृष्ठे १०२४ इतकी आहेत. ह्या कादंबरीचा विस्तार उत्तरआधुनिक जादूचे प्रयोग अशा अर्थानेसुद्धा ओळखला जाईल (फक्त कवितेसाठी मासिक काढणाऱ्या लोकांमध्ये). वर सांगितलेल्या सर्व लिहिणाऱ्यांमध्ये 'संरक्षणयंत्रणा' अशा अर्थाने कादंबरी लिहिण्याची मानसिक गरज आहे का? असा एक गंभीर प्रश्न समोर येतो.

कादंबरी लिहिण्याची मानसिक गरज लेखकामध्ये किती प्रबळ असते, ह्याच्यावर त्या कादंबरीतील आशयाचं संघटन (composition) आणि परिणाम (impact) अवलंबून असतो. आजच्या काळात कादंबरी लिहिण्याची मानसिक गरज टिकवून ठेवणं हा नपुंसकत्वाला आव्हान दिल्यासारखाच प्रकार आहे. अस्वस्थ होऊन लिहिण्याच्या प्रक्रियेकडे जाणं आणि 'दिसामाजी काहीतरी लिहावे' ह्यातील दरी वाढत जाऊन त्यातला दुसरा प्रकारच अधिक शिल्लक राहिल्यासारखा दिसतो आहे. हे आपल्या मराठी साहित्यसंस्कृतीचं अभद्र लक्षण आहे. ह्यातूनच कादंबरी लिहिण्याची मानसिक गरज अधिक निर्माण झाल्याचं दिसतं. ही गरज लेखकाचा लेखकराव होण्याइतपतच मर्यादित राहू इच्छिते. अशा लेखकाचं सामाजिक स्थान काय? ह्याचं उत्तर 'मध्यमवर्गीयच' असं आहे. मंटो, भाऊ पाध्ये ह्यांची मानसिक गरज त्यांच्या विचारांप्रमाणे शेवटपर्यंत टिकून राहिली. मंटोच्या समोरतर फाळणीचा विध्वंस होता. करंटा, राडा, डोंबाऱ्याचा खेळ सारख्या कादंबऱ्या लिहिणाऱ्या भाऊ पाध्येंच्या समोर सामाजिक चळवळीतून निर्माण झालेलं नवं वातावरण, माणसाचा दांभिकपणा आणि त्याचं महानगरातलं अस्तित्व असा अनोखा पेच होता. ह्याच्यापेक्षा गंभीर आणि अराजकसदृश्य वातावरण असताना मराठी कादंबरी मात्र त्याच त्या (परदेशी फॅशन) आणि आशयाच्या ग्रामीण परिप्रेक्ष्यात 'त्याच' पद्धतीने फिरताना दिसत आहे. ज्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, असे लोक प्रकाशकांना (संस्कृती (हिंदू) चालविणाऱ्या) हाताशी धरून, विद्यापीठातल्या प्रशिक्षित समीक्षकांना खूश करून, प्रयोग - जादूचे प्रयोग - करून 'आयडियल कादंबरीकार' म्हणून ठळक होताना दिसताहेत. आणि ज्यांच्याकडं सांगण्यासारखं भरपूर आहे; त्यांना ते नीटपणे आणि धाडसाने सांगायचे स्वातंत्र्यच नाही. मराठीतल्या गद्यात्म लेखनाचा हा पेच फार पूर्वीपासूनच अस्तित्वात ठेवला गेला आहे. सनातनी आणि सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या लोकांनी त्याला संस्कृतीचा महामार्गच बनवून टाकला आहे. हा महामार्ग आधुनिक आहे हा देखावा निर्माण करताना त्यांना जर्मनी ते अमेरिका अशी धाव घ्यायला लागली आहे. ह्याचं सांस्कृतिक आकर्षण निर्माण करताना प्रयोग, प्रयोगशीलता, अस्तित्ववाद, देशप्रेम अशा अवडंबरांचा आधार घ्यावा लागला आहे. त्यात धर्माचं आणि जातिव्यवस्थेचं स्थान अव्वल आहे. हा सांस्कृतिक पेच सोडवण्यासाठी विरोध, द्वेष, श्रद्धा ह्या मार्गांचा अवलंब धाडसाने करायला हवा. कारण ह्या सगळ्याचं मूळ अदृश्य पातळीवरचा जातव्यवहार, सनातनी वर्चस्वाचा अट्टहास, अध्यात्माच्या मार्गाने सरकणारा आधुनिक स्वातंत्र्याला होणारा विरोध, मुद्दाम अस्तित्वात आणले जाणारे शैक्षणिक भटकलेपण, समूहातनं अवतरणाऱ्या संस्कृतीचा ऱ्हास, सुधारणापर्वाकडे जाणारा श्रद्धेचा मार्ग विकृत करण्याची वैदिक चाल, धार्मिक साठमारी आणि अट्टहासातनं निर्माण होणारे अराजक, लाॅ अॅण्ड ऑर्डरवर असणारे भांडवली आणि धार्मिक वर्चस्व, लोकशाहीचा भ्रम, पिढ्यानपिढ्या चालणारी राजकीय दुकानं आणि ते चालवणारे चालबाज पुढारी; ह्यातून निर्माण होणारे भूभागाचे केंद्रीकरण, शेती, शेतकरी, ग्रामजीवन ह्या संदर्भातली तरुण पिढीतनं नष्ट होत चाललेली आस्था, पांढरी नोकरशाही आणि राजकारण ह्यांच्यातील दिवसेंदिवस घट्ट होत जाणारी युती, मध्यमवर्गीय किंवा त्याच्यापेक्षा वरचढ होण्याचा लागलेला असाध्य रोग अशा अनेक बाबीत आहे. कादंबरी लिहिणाऱ्याला (कथा/कवितासुद्धा) ह्या सगळ्या विचित्र बाबींमुळे तयार होणाऱ्या अदृश्य भिंतीवर पुन्हा-पुन्हा प्रहार करायचाय. आजच्या युगात मनोरंजनापेक्षा साहित्याचे कार्य हे आणि असेच असायला हवे - याला पुरोगामी, प्रागतिक, विद्रोही असे म्हणायची गरज नाही - इतके ते मध्यवर्ती आणि सतर्क असायला हवे.

मुळात कादंबरी विरोध आणि द्वेषावरच उभी राहते. तिच्या विस्ताराच्या आणि भिडण्याच्या, माणसाला जागृत करण्याच्या शक्यता ह्या दोन गोष्टींतच अधिक असतात. कादंबरीचे भाषिक कृती म्हणून शिल्लक राहणारे अस्तित्व विरोध आणि द्वेषावरच अधिक असते. येथे विरोध आणि द्वेष ह्या शब्दांची उपयुक्तता कादंबरीच्या पानापानांत आपल्याला सहजगत्या दिसली पाहिजे. माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे हे दोन मार्गच मानायला हवेत. ह्या मार्गावरून चालत असताना त्यातला चांगुलपणा पदोपदी जाणवायलाच हवा. ह्या शब्दांचा असा विचार केल्यानंतर वर्चस्वावरची ठाम प्रतिक्रिया म्हणजे विरोध; विद्वेषाचा प्रतिकार म्हणजे द्वेष, असा एक सहिष्णू समंजसपणा लेखनाच्या केंद्रस्थानी ठेवता येतो. अशा पार्श्वभूमीवर यु. आर. अनंतमूर्ती ह्यांची संस्कार (१९६६) आणि देवनुरू महादेव ह्यांची कुसुमबाला (१९८८) ह्या दोन कादंबऱ्या समोरासमोर ठेवून पाहता येतील. ह्या दोन्ही कन्नड कादंबऱ्यांच्या आशयाचे अवलोकन केल्यास, कादंबरी विरोध आणि द्वेषावर कशी उभी राहते ह्याचा अर्थ लागेल. येथे अनंतमूर्तीना जे म्हणायचं आहे ते खरंतर देवनुरू महादेव ह्यांनी म्हणायला पाहिजे होतं, तर देवनुरू महादेव ह्यांनी कादंबरीचं जे रूप स्वीकारलं आहे ते अनंतमूर्तीनी स्वीकारायला पाहिजे होतं; असा समूहनिष्ठ कप्पाबंद विचार कुणाच्याही डोक्यात सहजच येईल. पण कुसुमबाला कादंबरीचं रूप द्वेष पचविण्याच्या अवस्थेतून आलं असावं. कदाचित मानवी पातळीवर द्वेषाला आपलं करण्याचा तो नवा प्रकारच मानायला हवा. भालचंद्र नेमाडे ह्यांच्या 'झूल' (१९७९) आणि विलास सारंग ह्यांच्या 'रुद्र' (२००९) ह्या दोन्ही कादंबऱ्यांचा विचार अशाच पद्धतीने करता येईल. विरोध आणि द्वेषाचं अजब, आश्चर्यचकित करणारं सामर्थ्य ह्या कादंबऱ्यांमध्ये आहे. जगभरातल्या संस्कृतीशी सहज मिसळून (match) जाणारा कादंबरीकार म्हणजे फ्योदोर दोस्तोव्हस्की. त्याचं हे असामान्य वैशिष्ट्य विरोध आणि द्वेष यांतील संयोगामुळेच शक्य झालं आहे.

आजच्या स्थितीत कादंबरीचा विचार करत असताना, त्यातील नायकाच्या अस्तित्वाचा विचार ही अत्यंत फसवी, मानसशास्त्रालासुद्धा चकवा देणारी गोष्ट बनली आहे. नायकापासून समाजाकडे की समाजाकडून नायकाकडे की फक्त समाज?, ह्या दुहेरी-तिहेरी पेचाला कादंबरीच्या पसाऱ्यात कोणतेच स्थान राहिलेले नाही. कादंबरीवर आणि कादंबरीत प्रयोग ही गोष्ट प्रकाशकांना आणि संस्कृतीरक्षकांना फसविण्यासाठी (दोन्ही बाजूंनी) योग्य वाटत असली तरी, ग्लोबल पातळीवर तो अडाणीपणाच ठरू लागला आहे. मराठी साहित्यसंस्कृतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी हे ठीक वाटत असलं तरी भांडवलदारी अर्थव्यवस्थेचे महानायक, अध्यात्माला राजकारणाची बाजू देऊन बौद्धिक असण्याला शून्य करणारे धर्मसत्ताक दलाल ह्यांच्यातील अभद्र युतीला तोडण्यासाठी, नष्ट करण्यासाठी तिचा काडीचाही उपयोग नाही हेसुद्धा तितकंच खरं. मग कादंबरीचा उपयोग काय राहिला आहे?

सिद्धार्थ गौतम आपल्या तरुणपणीच दुःखाचं मूळ शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मला वाटतं, कादंबरीचा आरंभबिंदू हाच असावा, आणि ह्यातून निर्माण झालेले तत्त्वज्ञान म्हणजे कादंबरीचा महामार्ग. हा आरंभबिंदू आणि महामार्ग सगळ्यांनाच सापडेल ह्याची शक्यता कोणत्याही काळात अशक्यच. पण ह्या दरम्यान भटकण्याची शक्यता मात्र अधिक...

दिनांक १९/०७/२०१५ रोजी अक्षरमानव; पुणे मराठी विभाग; बळवंत काॅलेज, विटा; मुक्तांगण वाचनालय, विटा ह्यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या लेखनकार्यशाळेत केलेले भाषण.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मुळात कादंबरी विरोध आणि द्वेषावरच उभी राहते.

हे बहुसंख्य कादंबर्‍यांबद्दल म्हणता येईल पण अपवादही आहेत, विशेषतः आधुनिक साहित्य. अगदी बहुचर्चित उदाहरण घ्यायचं तर जेम्स जॉइस यांची 'फिनेगन्स वेक'. त्यामुळे लेखकाचे अशा कादंबर्‍यांबद्द्ल काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

अवांतर : मला 'लिटररी क्रिटीसिझ्म'वरचे लेख मराठीतून वाचायला जड जातात. 'बहुआयामी विचलन'सारखे शब्द आले की त्यांचा थेट अर्थ पोचत नाही, अंधुक अर्थ लागतो. अर्थात ही माझी मर्यादा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक ना एक दिवस मी
शासकीय मराठीतल्या सर्व आणि मराठी समीक्षेतील वापरात असलेल्या सर्व शब्दांचा एकुण एक शब्दाचा अर्थ माहीत करुन घेईल.
नंतर मी एकेक शब्द त्याचा अर्थ आणि सुलभ आकलनासाठी एकुण प्रतिशब्द किमान ७ उदाहरणे देईल अशी एक डिक्शनरी निर्माण करेल. वाक्यात उपयोग करुन दाखवीन शब्द चालवुन ही दाखवीन.
सध्या नुसत शब्द संग्रह करण सुरु आहे पण ही पहीली पायरीच अजुन संपत नाही.
बघाना संपली अस वाटेतोच तुम्ही एक नविन शब्दाची भर टाकलीत
बहुआयामी विचलन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विनोदी आहात. Wink
साधेपणा (simplicity) सारख्या साध्या शब्दाचा अर्थ इंग्रजीत दिला आहे तर 'बहुआयामी विचलन'चा द्यायलाही हरकत नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीच समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मलाहि. सगळ्या शब्दांचे अर्थ इंग्रजीत दिले तरी काही समजेल असे वाटत नाही.

ह्यावरून शाळेत शिकलेली ना.सी.फडके ह्यांची 'कथा/कादंबरी म्हणजे गुंतागुंत-निरगाठ-उकल' ही व्याख्या आठवली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कादंबरी लिहिण्याची मानसिक गरज लेखकामध्ये किती प्रबळ असते, ह्याच्यावर त्या कादंबरीतील आशयाचं संघटन (composition) आणि परिणाम (impact) अवलंबून असतो. आजच्या काळात कादंबरी लिहिण्याची मानसिक गरज टिकवून ठेवणं हा नपुंसकत्वाला आव्हान दिल्यासारखाच प्रकार आहे. अस्वस्थ होऊन लिहिण्याच्या प्रक्रियेकडे जाणं आणि 'दिसामाजी काहीतरी लिहावे' ह्यातील दरी वाढत जाऊन त्यातला दुसरा प्रकारच अधिक शिल्लक राहिल्यासारखा दिसतो आहे. हे आपल्या मराठी साहित्यसंस्कृतीचं अभद्र लक्षण आहे. ह्यातूनच कादंबरी लिहिण्याची मानसिक गरज अधिक निर्माण झाल्याचं दिसतं. ही गरज लेखकाचा लेखकराव होण्याइतपतच मर्यादित राहू इच्छिते.

हे समजले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0