वॉकमन
वॉकमन
लेखक - सचिन कुंडलकर
यंत्राचं आणि तंत्राचं काय करायचं? याविषयी मोठ्या प्रमाणावर संभ्रम असलेल्या भारतीय समाजात मी राहतो. मी आणि आपण सगळेजण या यंत्रांचे आणि तंत्रज्ञानाचे जागतिक बाजारपेठेतील सगळ्यात मोठे ग्राहक आहोत. आपण प्रत्येकजण दिवसभरात कोणती न कोणतीतरी बटणं दाबूनच जगतो, पण आपलं मन मात्र या यंत्रांविषयी अतिशय गोंधळलेलं आणि भावूक आहे.
मी लहान मुलगा असताना म्हणजे ८०च्या दशकात जे मी सांगतोय ते सगळं घडायला पद्धतशीरपणे सुरुवात झाली. त्या काळात शेतकरी जसा आपल्या जनावरांची कृतज्ञतेने पूजा करतो तशी घरांमध्ये यंत्रांची पूजा होत असे. कारण घरामध्ये यंत्र आणणं ही एक सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब होती. शिवाय संपूर्ण भारत देश माझ्या लहानपणी कृतज्ञतेच्या व्यसनात बुडालेला होता. समाजाविषयी, यंत्रांविषयी, निसर्गाविषयी, आपल्या देशाविषयी एकदा का कृतज्ञता व्यक्त केली की मग सगळे सगळं करायला मोकळे होत असत. भारतीय संस्कृतीत कृतज्ञ होणे हे मष्ट आहे म्हणे, आणि आम्ही लहानपणी सगळेजण फारच म्हणजे फारच भारतीय होतो. पूजा केल्यामुळे यंत्राला बरे वाटेल आणि मग ते जास्त कृतज्ञतापूर्वक काम करेल असं त्या वेळच्या लोकांना वाटत असे.
लहानपणी आमच्या घरी काही म्हणजे काहीही नव्हतं. फक्त एक रेडिओ होता. मग एकेक गोष्टी येऊ लागल्या. त्या सर्व गोष्टी सामाईक असत. म्हणजे सर्व कुटुंबाला मिळून एकच गोष्ट घेतली जात असे. एकच फोन, एकच टीव्ही, आणि घरात फ्रीजसुद्धा एकच असे. फोन तर सगळ्या गल्लीत मिळून एखाद्याच्याच घरात असायचा. व्यक्तिगत यंत्रसामुग्री नसल्याने सर्व कुटुंबाचं मिळून त्या यंत्रावर पुष्कळच प्रेम असे. जणू मोती कुत्रा किंवा चेतक घोडाच असावा घरातला तेव्हढं प्रेम. काय विचारायची सोय नाही. सायकल विकायला लागली तर मुली ढसाढसा रडत आणि अश्या विषयांवर मराठी मासिकांमध्ये कथा वगैरे छापून येत असत. इराणी सिनेमांमध्ये सायकली, वह्या, पेनं, पेन्सिली आणि चपला हरवायच्या कितीतरी आधी आमच्या मराठी कथांमध्ये यंत्रं कर्ज काढून घेतली जात होती, ती विकली जात होती, सावकार त्यांच्यावर जप्ती आणत होते. मुली सासरी जाताना शिवणयंत्राला मिठी मारून रडत असत. सगळं अगदी किती किती गोड चालू होतं महाराष्ट्रात. मराठी साहित्यात आणि मराठी सिनेमात. मला तर लहानपणी भीती वाटायची की इतक्या गोड आणि सुसंस्कृत राज्यात राहतो आपण, इतकं गोड संगीत आणि इतका गोड सिनेमा आपला! चुकून एकदम सगळ्या महाराष्ट्राला मुंग्याच लागतील अचानक. त्याच्या गोडव्यामुळे. सगळ्या भारतालाच मुंग्या लागतील.
नवीन यंत्रं मुहूर्त पाहून आणली जात. दसरा, दिवाळी, पाडवा असल्या दिवशी घरात वॉशिंग मशीन किंवा मिक्सर आल्याने काय फरक पडतो हे आता मला कळत नाही पण आपण सदोदित घाबरलेली माणसं असल्याने समाज नावाच्या विनोदी समूहाला काही बोलण्याची सोय भारतात नसते. भारतीय समाज ज्याला त्याला घाबरून असतो आणि त्यामुळे त्याला सतत शुभ नावाचे मुहूर्त लागतात. चटण्या वाटायचे मिक्सर आणि कपडे धुवायची यंत्रं ह्यांना कशाला बोडक्याचे मुहूर्त लागत असत हे मला कधीही कळलेले नाही. नवीन यंत्र आणलं की ते कुणाच्या नजरेत येऊ नये, कुणाची त्याला द्रिष्ट लागू नये म्हणून काही दिवस ते कापडाखाली झाकून ठेवायचं. कारण लोकांना आपापली कामंधामं नसतात, ते आपल्या वाईटावर टपून बसलेले असतात असा सगळ्या आयाआज्यांचा विश्वास असायचा. आणि शिवाय वयाने मोठ्या माणसांना सगळं काही कळतं असं आम्हाला त्या वेळी नक्की वाटायचं. सुंदर सुंदर क्रोशाची कव्हरं शिवत असत तेव्हा बायका टीव्हीला आणि मिक्सरला! तेव्हा वेळ आणि प्रेम असे दोन्ही खूप असे त्यांच्याकडे. असा काळ होता तो.
घरामध्ये कुणीतरी एकालाच एखादी विशिष्ट वस्तू वापरता येत असे. म्हणजे बाबांना मिक्सर वापरता येत नसे आणि आईला व्हिडिओ लावता येत नसे. लहान मुलांना तर त्यावेळी फोनही करता येत नसे. मग यंत्र वापरण्यासाठी विशिष्ट व्यक्तीची किंवा त्या व्यक्तीच्या मर्जीची वाट पाहावी लागत असे. त्यामुळे आमच्यात कौटुंबिक जिव्हाळा आणि एकमेकांबद्दलची ओढ फार होती. घटस्फोटांचं प्रमाणही आम्ही मुलं लहान असताना कमी होतं असं म्हणतात ते काही उगाच नव्हे. खरंच होतं ते!
आपल्याला एखादी टेप ऐकायची असेल तर बाबांची रफी-मुकेश-तलतची गाणी आणि त्यांच्या हातातला ग्लास संपायची आम्ही वाट पाहत बसायचो किती तरी वेळ. हातातल्या कॅसेटमध्ये बोट घालून ती फिरवत बसावं लागे. ह्यामुळे आमची पिढी संयम शिकली. दसरा, गुढीपाडवा ह्या सणांना काय सापडेल ती गोष्ट हातात घेऊन त्याची पूजा केली जात असे. टीव्हीची पूजा, बाईकची पूजा, टेपरेकॉर्डरची पूजा, फ्रीजची पूजा. आमच्या घरी तर गोदरेजच्या कपाटाचीही पूजा होत असे. माझ्या सायकलला किंवा बाईकला हार घातलेला मला अजिबात आवडायचा नाही. घरापासून लांब गेलो की मी तो हार काढून फेकून द्यायचो.
पूर्वी सगळ्या वस्तू विकणारी जशी दुकानं होती, तशीच सगळ्या वस्तू दुरुस्त करून देणारी दुकानंसुद्धा मजबूत पसरलेली होती. त्यामुळे एकदा वस्तू घेतली की ती किती वर्षे घरात ठाण मांडून बसेल हे सांगता येत नसे. त्यामुळे वस्तू वारंवार रिपेयर करून घेतल्या जात. त्या वस्तूंविषयीच्या आठवणी मनामध्ये साचत जात आणि त्या वस्तू काम करेनाश्या झाल्या तरी टाकून देववत नसत. त्या माळ्यावर ठेवून दिल्या जात.
शिवाय आमच्या पुण्यात कुणीही कधीही घर-शहर सोडून जात नसे. घरातली निम्मी माणसं अमेरिकेला किंवा लंडनला गेली तरी निम्मे लोक पुण्यातच राहात. मुलींची लग्नं शक्यतो पुण्यात नाहीतर थेट बे एरियातच करायची पद्धत होती. तिथे जातानासुद्धा महाराष्ट्र मंडळ सोडून उगाच इतर अमेरिकन माणसांशी आपला संपर्क येऊ देवू नको असं मुलींना बजावून पोळपाट-लाटणं-कुकर-चकलीचा सोऱ्या वगैरे देऊनच पाठवलं जायचं. फाळणी वगैरे आमच्या भागात झाली नव्हती त्यामुळे एका रात्रीत नेसत्या वस्त्रानिशी घर सोडून पळणं वगैरे कुणालाही करायला लागलं नव्हतं. आणि सदाशिव पेठ, नारायण पेठ सोडल्यास पानशेतच्या पुराच्या पाण्याने कुणाचंही वाकडं केलं नव्ह्तं. त्यामुळे सगळी माणसं, सगळ्या जुन्या वस्तू आणि यंत्रं संपूर्ण टुणटुणीत. केव्हाही या आणि पाहा. हात लावल्यास खबरदार.
आणि ह्या सगळ्यात, कधीही काही जुनं न विसरणाऱ्या, आमच्या भावगीतं, नाट्यगीतं, वपु-पुल कथाकथनं, लताबाई-आशाबाई, अमुक मामा तमुक तात्या यांची भजनं यांनी माखलेल्या मराठी घरात, एके दिवशी माझा नाशिकचा आत्येभाऊ त्याचा लाल रंगाचा सोनीचा वॉकमन विसरून गेला. त्यात एक इंग्लिश गाण्याची कॅसेट होती, कुणाची ते मला आठवत नाही. तुझं काहीतरी इथे विसरला आहेस असं त्याला कळवलं असता, त्याने ते जे काही विसरलं होतं ते थोडे दिवस मला वापरायला द्यायला सांगितलं. त्या वॉकमनने मला बदलून टाकलं. माझ्या आजूबाजूचं कंटाळवाणं घाऊक जग बदललं.
माझा पहिला वॉकमन. तो लाल रंगाचा होता. त्याला मऊ काळे स्पंज असलेले दोन हेडफोन होते. त्यातल्या पेन्सिल सेल सतत विकत आणाव्या लागत जो एक फार मोठा टीनएज खर्च होऊन बसला. पण तो वॉकमन फक्त माझा होता आणि मला हवी असलेली गाणी तो गुपचूप मलाच ऐकवायचा, अगदी माझ्या पलंगात सुद्धा गुपचूप येऊन. एखादं यंत्र तुमच्या आयुष्यात योग्य वेळी येतं आणि ते तुम्हाला एकदम दुरुस्त करून सोडतं. काही जणांसाठी तो कॅमेरा असतो, काही जणांसाठी तो टेलिस्कोप असतो किंवा गिटार असते. माझ्यासाठी तो माझा पहिला सोनीचा वॉकमन होता. त्याच्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या गर्दीच्या आणि सामूहिक भावनांच्या धबडग्यातून वेगळा झालो आणि मला माझं एकट्याचं विश्व मोकळेपणाने उभं करता आलं. मला लिहिता यायला लागलं ते माझ्या वॉकमनमुळेच कारण त्याने माझा अहंभाव फार चांगल्या प्रकारे जोपासला. मला कृतज्ञ आणि नम्र बालक होण्यापासून त्याने वाचवलं आणि चालतं फिरतं केलं. बदलाची सवय लावली. एका जागी लोळत संगीत ऐकणं आयुष्यात बंद झालं. उपदेश करणाऱ्या दिग्गज माणसांकडे संपूर्ण दुर्लक्ष करायची महत्त्वाची अमराठी सवय मला लागली. माझ्याभोवतीच्या इतर जगाला बंद करून टाकून त्यानं मला एका गुहेत पाठवलं. सतत “आम्ही”, “आम्हाला” असा सामूहिक विचार करण्यापेक्षा "मी”, "मला”, असा नेमका विचार मी त्या वयात करू लागलो.
गाण्याचा अर्थ, शब्दांचे अर्थ कळण्याची सक्ती त्या वॉकमनने माझ्यावरून काढून टाकली. मला माझा खाजगीपणा मिळाला. मी काय ऐकतो आहे आणि त्यातून काय मिळवतो आहे यावर इतरांचं लक्ष असण्याची शक्यता संपली आणि माझ्या मनावर उशिराने का होईना पण माझा संपूर्ण हक्क तयार झाला. सगळ्या गोष्टीना अर्थ असला पाहिजे, सगळ्या गोष्टी समाजोपयोगी पाहिजेत, कानावर नेहमी चांगले असे काही पडले पाहिजे अश्या सगळ्या विचारांपासून मला त्याने मुक्ती दिली. आदर्शवादाच्या शापापासून वाचवलं आणि खाजगीत जाऊन वेडंवाकडं पाहायची, ऐकायची चटक योग्य त्या वेळी लागली आणि पहिल्यांदा मी ज्या जगात जगत आलो होतो त्या आयुष्याविषयी मला कंटाळा उत्पन्न झाला. पुढे माझ्या आयुष्यात कॉम्प्युटर येईपर्यंत मला खाजगी वाटेल अशी जागा त्याने तयार केली. आणि मला पुष्कळ ऐकवलं, फिरवून आणलं.
मी खाजगीपणे ऐकायला लागलेल्या नव्या संगीताने मला तोंडावर पाणी मारून जागं केलं. मायकल जॅक्सन आणि मडोना ह्या अतिशय दोन महत्त्वाच्या व्यक्ती माझ्यासोबत पुण्यात सगळीकडे चालू लागल्या. त्यांनतर अनेक वर्षांनी आता मला त्या दोघांनी त्या काळात किती मदत केली हे लक्षात येतं. कारण ते दोघंही सतत खाजगीत मला खूप आवश्यक गोष्टी सांगू लागले आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची गरज नव्हती. ते बोलतात ती भाषा मला सुरुवातीला काही वर्षं काडीमात्र कळत नव्हती तरीही त्या दोघांचं संगीत मला आवश्यक ती उर्जा देत गेलं. घरातल्या सामूहिक टेपरेकॉर्डरवर मी घरच्यांच्या आवडीचं सगळं ऐकणं बंद केलं आणि मी घरापासून वेगळा असा मुलगा तयार व्हायला लागलो.
मी माझ्या वॉकमनला मित्रासारखं वागवलं. मी त्याला धुतला पुसला नाही, त्याची पूजा केली नाही आणि तो सोडून जाताना मला त्रास झाला नाही. तो बंद पडल्यावर मी टाकून दिला. माझ्यासाठी मी ऐकत असलेलं संगीत त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाचं होतं आणि राहिलं. त्या लाल वॉकमनने मला माझं आजचं आयुष्य मजेत पार पडायला शिकवलं. कुणालाही बाहेरून पाहताना उदास आणि विचित्र वाटेल असं माझं महानगरामधील एकलकोंडं आयुष्य.
कुठेतरी जाण्यासाठी काहीतरी सोडून जावंच लागतं. आज मला हे लक्षात येतं की माझा राग माझ्या भाषेतल्या संगीतावर, लेखकांवर आणि गायकांवर मुळीच नव्हता. मला कंटाळा तयार झाला होता ते तेच तेच वाचणाऱ्या आणि तेच तेच ऐकणाऱ्या आणि कोणत्याही बदलाबद्दल असुरक्षित होणाऱ्या माझ्या आजूबाजूच्या मराठी समाजाबद्दल. माझा वॉकमन आणि त्यानंतर माझी सर्व खाजगी गॅजेट्स, यांनी मला तो राग व्यक्त करायला मदत केली.
आज मला त्यामुळे माझी पर्सनल गॅजेट्स फार महत्त्वाची वाटतात. वस्तू आपल्या स्वतःच्या असण्यावर आणि त्यावरच्या गोष्टींचा खाजगीपणा जपला जाण्यावर माझा विश्वास आहे. समाजमान्यता नसलेलं, सवयीचं नसलेलं सगळं काही अश्या गॅजेट्सवर बघता ऐकता येतं आणि त्यातून आपापली एक नैतिकता योग्य त्या तरुण वयात मुलं निर्माण करू शकतात. आपली कुटुंबं, जातीपाती, सामाजिक आणि धार्मिक महापुरुष ह्यांनी सांगितलेल्या नैतिक उपदेशांना आपण योग्य त्या वयात फाट्यावर मारू शकतो. त्यामुळे मला नवनव्या गॅजेट्सवर पैसे खर्च करायला फार म्हणजे फार आवडतं.
आपल्या देशात अजूनही तंत्रज्ञानबहाद्दर माणसे वेबसाईटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम करतात. अॅम्ब्युलन्स आणि वेबसाईट यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाइतकं विनोदी असं जगात दुसरं काही नसेल. पण भारतातला सामूहिक आणि सामाजिक भाबडेपणा संपता संपत नाही हेच खरं. आपलं यंत्राशी आणि तंत्रज्ञानाशी असलेलं नातं असं गुंतागुंतीचं आणि संकोचाचं आहे कारण आपण दशकानुदशकं फक्त ग्राहक देश आहोत आणि आज आपण सेवा आणि तंत्रज्ञानक्षेत्रात एक मोठी अर्थव्यवस्था उभी करत असलो तरी आपली मूळ मानसिकता उत्पादक देशाची नाही, तर ग्राहक देशाची आहे. शिवाय आपल्या भारतीय मनाला वर्तमानापेक्षा भूतकाळ नेहमीच अधिक आकर्षक वाटत आला आहे कारण आपण विज्ञानापेक्षा धर्माच्या आधाराने जगणारा समूह आहोत. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबत आपल्या पारंपरिक समाजजीवनात होणाऱ्या बदलांबाबत आपण सतत असुरक्षित आणि भांबावलेले राहाणार आणि आजचं आपण जगत असलेलं आयुष्य आपल्याला नेहमी कमअस्सल, यांत्रिक आणि तुटक वाटत राहाणार. शिवाय आपल्या आजूबाजूला कोणतेही बदल घडायला लागले की तो कोणत्यातरी देशाच्या किंवा बहुराष्ट्रीय कंपनीच्या कारस्थानाचा भाग आहे हे नरडी फोडून सांगणाऱ्या लोकांची कमी नाही. आपल्याला सगळं काही हवं आहे पण त्या सुबत्तेमुळे येणाऱ्या सुखाकडे, सोयींकडे आपण सतत एका संशयाने पाहत राहणार. आपला अख्खा देश सतत या अश्या द्वैतामध्ये जगत असतो.
यंत्रं मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक, स्वस्त आणि बहुआयामी झाली तेव्हापासून माणसाचं यंत्राशी असलेलं नातं एका अंतरावर येऊन स्थिरावलं आहे. त्यामुळे काही नवे सामाजिक प्रश्न तयार झाले आहेत पण तसे प्रश्न तयार होणं चांगलंही आहे आणि समाजाच्या हिताचंही आहे. कारण सतत नवेनवे प्रश्न तयार व्हायलाच हवेत. माहितीसाठी आता कोणीही कुणावर अवलंबून राहात नाही, यामुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेत आणि नात्यात किती मोठे बदल होत आहेत याची आपण कल्पनाही करून शकत नाही. कुणापासूनही माहिती लपवून ठेवून किंवा ती उशीरा देऊन आपण त्या माणसावर सत्ता गाजवू शकण्याची शक्यता आता संपली आहे.
तुमच्या पुढच्या पिढीला तुमच्याकडून कोणतीही माहिती नको आहे. त्यांना तुमचे सल्लेही नको आहेत. तुम्हाला कुणीही काहीही विचारत बसणार नाहीये. सर्व प्रकारची माहिती सर्व वर्गाच्या, सर्व जातीच्या, सर्व वयाच्या, सर्व माणसांना आता इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. शिवाय अनुकूल माणसं यंत्रांमुळे एकमेकांशी जोडली गेली आहेत. आपलं कुटुंब आपल्याला यापुढे जगण्यासाठी एक विशिष्ट मर्यादेपर्यंतच पुरं पडणार आहे. त्यामुळे पारंपरिक नातेव्यवस्था आणि तिचा जयघोष करणाऱ्या माणसांची या पुढच्या काळात फार मोठी गोची होणार आहे. ज्यांना आपल्याला फार काही कळतं आणि तरुण पिढीला आपल्या मार्गदर्शनाची फार गरज आहे असं वाटेल, त्या माणसांना ह्यापुढे एका मोठ्या औदासीन्याला सामोरं जावं लागणार आहे कारण तुम्हाला जे काही कळतं त्यापेक्षा पुढचं काही येऊन पोचलेलं असणार. संपत्ती, माहिती आणि सुरक्षितता ह्या गोष्टी पारंपरिक कुटुंबाबाहेरच्या माध्यमांमधून सहजपणे उपलब्ध होणार आहेत, होतही आहेत. आणि भारत देशात ज्या गोष्टीवर आपला गरजेपेक्षा जास्त विश्वास आहे, ती म्हणजे वय आणि ज्ञान ह्यांचा संबंध. वय जास्त म्हणजे ज्ञान जास्त हे गणित आता ताबडतोब मोडून पडणार आहे आणि सहजपणे यापुढील जग हे तरुण माणसांचं असणार आहे. असं सगळं होण्यात तंत्रज्ञानाचा फार मोठा हात आहे.
आपापल्या फायद्यांसाठी यंत्र योग्य पद्धतीने भरपूर वापरणं आणि नवं तंत्रज्ञान येताच जुनी यंत्रं टाकून देणं यात मला काहीही वावगं वाटत नाही. शिवाय मी आता ज्या समाजरचनेत राहातो, त्यात मला चुकीच्या माणसांवर किंवा ती मिळत नाहीत म्हणून झाडांवर किंवा हिंस्र कुत्र्यांवर जीव लावण्यापेक्षा, माझा कॉम्प्युटर आणि माझा आयपॉड जास्त शांतता आणि समाधान देतात. असं सगळं असण्याने मी अजिबात दु:खी किंवा बिचारा वगैरे झालेलो नाही. मला माझ्या कारशिवाय आणि इंटरनेटच्या अमर्याद पुरवठ्याशिवाय आनंदात जगता येत नाही. हा माझ्यात झालेला बदल आहे. मला मी जगतो आहे त्याबद्दल कोणतीही अपराधी भावना नाही. उद्या कदाचित असं सगळं नसेल तेव्हा जसं असेल त्या परिस्थितीनुसार बदलून वागता येईल.
प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीची किंमत मोजत असतो. मी फेसबुकवर चकाट्या पिटत असताना मार्क झुकरबर्ग माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो विकून श्रीमंत होतो आहे हे मला माहिती आहे. मी प्रत्येक वेळी क्रेडिट कार्ड स्वाईप करताना माझ्या खाण्यापिण्याच्या-कपडेलत्त्याच्या आवडीनिवडी कुणी साठवून ठेवत आहे याची मला कल्पना आहे. कोणत्याही जागी कोणत्यातरी कॅमेऱ्याचा डोळा माझ्यावर रोखला गेलेला आहे. शहरात एका इमारतीपासून दुसऱ्या इमारतीपर्यंत लोंबकळणाऱ्या वायरीमधून बरीच आवश्यक अनावश्यक आणि आपल्या सर्वांची खाजगी माहिती पुरासारखी लोंढ्याने बेफाम वाहात आहे.
मी या यंत्रांच्या, त्यातून निघणाऱ्या अदृश्य लहरींच्या, वायरींच्या, धुराच्या, वेगवेगळ्या व्हायरसेसच्या, विजेच्या तारांच्या जंजाळात जगणारा आनंदी प्राणी आहे. मी आणि माझ्यासोबत तुम्ही सर्वजण.
अनेक वर्षं झाली तरी मध्येच मला माझ्या लाल वॉकमनची खूप आठवण येते. तेव्हा मी त्याच्यावर ऐकायचो ती गाणी आज माझ्यासोबत आहेत पण तो नाही. चुरडून पुन्हा रिसायकल होवून वेगळेच काही तयार झाले असेल त्याचे. तो असताना मला बरं वाटत होतं आणि त्याच्यापासून लांबवर येऊन पोचल्यावरही मला आज बरंच वाटतं आहे.
---
https://kundalkar.wordpress.com/
संक्षिप्त लेखाच्या स्वरूपात पूर्वप्रसिद्धी – लोकसत्ता (श्री. कुमार केतकर व श्री श्रीकांत बोजेवार) २००९.
सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. लेखाचा मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.
प्रतिक्रिया
लोकसत्तेतला लेख वाचतोय असं
लोकसत्तेतला लेख वाचतोय असं क्षणभर वाटलं आणि शेवटी प्थम प्रकाशन -लोकसत्ता.कित्ती सवय झाली आहे.
वॅाकमनशी जडलेलं नातं छान मांडलंय.
ठीक! एकुणच लेखकाचा भवताल
ठीक!
एकुणच लेखकाचा भवताल भितीदायक होता हे खरं पण प्रातिनिधिक नव्हता असे वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आवडला रे लेख. ऑलमोस्ट
आवडला रे लेख.
ऑलमोस्ट प्रत्येक वाक्याला यातलं बरचसं अनुभवलंय असं वाटत राह्यलं.
एखाद्या वस्तूने, एखाद्या गॅजेटने, एखाद्या कशानेतरी स्वतंत्र माणूस असण्याची जाणीव करून देणे हा अनुभवही अगदी जवळचा.
८०च्या दशकातच मोठी झाल्याने वॉकमन आणि त्याचा वापर, बॅटर्यांचा खर्च व तत्सम सगळ्या गोष्टींचा फार जास्त परिचय आहे.
- नी
आवडला. सर्वच पटले असे
आवडला. सर्वच पटले असे नाही.
.
विशेषतः समाजाच्या भाबड्या कृतज्ञतेविषयीचा तिरकस सूर. भलेही समाज भाबडा असेल, लोकांना गोळा करुन प्रत्येक गोष्ट साजरा करणारा असेल, पण निदान उत्सवप्रिय तर आहे. अन्य काही समाज (होय पाश्चात्यच) पाहीले आहेत जिथे या लॅक ऑफ उत्सवप्रियतेमुळे, लोक बसस्टॉपवरती ५ मिनीटात लोकांशी एकदम खाजगी बोलतात का तर एकाकीपणामुळे कोंडमारा झालेला असतो ज्याचा निचरा होणे आवश्यक असते.
जिथे एखाद्या समाजात (पाश्चात्य) अति एकलकोंडेपणाचा कोंडमारा आहे तिथे भारतिय समाजात अति गचपण आहे हे मान्य आहे.
एकांगी
लेख थोडा एकांगी पण मनोरंजक वाटला. तरुण पिढीला, जी पाहिजे ती माहिती जालावरुन क्षणार्धात मिळते हे मान्य, पण ती फक्त माहितीच असते, शहाणपणा नव्हे. आता एखाद्याला जुन्या लोकांच्या अनुभवाचा फायदा करुन घ्यायचा नसेल आणि सर्व गोष्टी स्वतःच्या चुकांमधूनच शिकायच्या असतील तर त्यांची मर्जी.
दुसरं म्हणजे ज्या भावंडांबरोबर आम्ही वाढलो वा सुट्टीत एकत्र खेळलो, त्या सर्वांना आज वयाची साठी उलटल्यावरही, एकमेकांबद्दल जी आपुलकी वाटते, त्याच इंटेन्सिटीची आपुलकी या पुढच्या भावंडांना एकमेकांबद्दल वाटेल का ? स्वमग्न व्यक्तिंना दुसर्याचा सहवासही नकोसा वाटतो कारण ते आपल्याच विश्वांत डुंबत असतात. हा एकटेपणा किती वर्षे तुम्हाला हवाहवासा वाटेल ?
ओव्हरऑल कुटुंबांविषयी फार
ओव्हरऑल कुटुंबांविषयी फार काही हळवेपणा बाळगत नसलो तरी या प्रतिसादाशी बराच सहमत आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
गोतावळ्यातून बाहेर
मला वाटतं की लेखात एकटेपणापेक्षाही कौटुंबिक सामूहिकतेतून बाहेर पडण्याची गरज उलगडून सांगितली आहे. एकदा 'स्व'ला ह्या सामूहिकतेतून बाहेर काढता आलं की तुम्ही त्या 'स्व'ला घडवू शकता. नंतर तुमचे इतर लोकांशी स्नेहबंध जुळूच शकतात, पण ते 'केवळ एकत्र राहतो म्हणून' किंवा 'केवळ एका गोतावळ्यातले आहोत म्हणून' लादलेले नसतात, तर तुम्हाला एकमेकांसोबत मजा येते म्हणून जुळलेले असतात. आणि समजा ती मजा येणं बंद झालं तर ते तुटतात किंवा तोडलेही जाऊ शकतात. कुणाला पसंत असो किंवा नसो, पण माझ्या आसपासच्या तरुणाईचं जगणं हे असंच आहे. आणि त्यातून ते मजेत जगत असतील, तर त्याला नाक मुरडण्याची गरज मला भासत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
निर्जीव यंत्राबद्दल कृतज्ञता
निर्जीव यंत्राबद्दल कृतज्ञता बाळगणे म्हणजे भाबडेपणा असला तरी मूर्खपणा नक्कीच म्हणता येणार नाही. मुळात ती कृतज्ञता फक्त यंत्राबद्दल नसून आणखी खोलवरही असू शकते. अर्थात सतत कशाबद्दलतरी कृतज्ञता बाळगत राहणे त्रासदायक वाटतेच म्हणा. पण त्यापेक्षाही मी, माझे, मला इत्यादी प्रथमपुरुषी (वि)भक्तीत बोलणारे लोक जास्त डोक्यात जातात.
भाबडेपणावरची तिरकस टीका आवडली आणि पुढे आणखी काहीतरी विचार असेल म्हणून वाचत गेलो पण निराशा झाली. माझी माहिती कोणीतरी गोळा करतोय आणि बाजारात ती वापरली जाते हे माहित असूनही मी आनंदी आहे वगैरे म्हणणे म्हणजे जाणूनबुजून केलेला दुर्बळ माणसाचा, बाजारव्यवस्थेला मिळेल तिथे लुचणारा लुच्चा भाबडेपणा आहे आणि या भाबडेपणाची आधीच्या भाबडेपणापेक्षा जास्त सालं काढली पाहिजेत.
निगुतीने वापरणे, जपणे, दुरुस्त करणे याची टर उडवून "यूज ॲन्ड थ्रो"ची भलामण करण्याचे दिवस सरत आले आहेत. त्यामानाने हा लेख फारच शिळा वाटला.
लेख आवडला. टीन-एज वयात
लेख आवडला. टीन-एज वयात बोनी-एम, आबा, ब्रायन अॅडम्स वगैरेंशी झालेली ओळख आणि त्याचा प्रभाव यातून गेलेलो असल्याने लेख विशेष भावला.
मस्तच.
या वॉकमनने माझाही आयुष्य अमुलाग्र बदलुन टाकलं. लेखातल्या बहुतांश वाक्यावाक्याशी तिव्र सहमत.
actions not reactions..!...!
बदल
या वाक्याभोवतीच सगळा लेख उभा आहे असं वाटलं. व्यक्तिगत अनुभवाच्या पातळीवर लेख राहिला असता, तर समजून घेता आलं असतं, पण त्या अनुुभवातून सरसकट देश, समाज वगैरे गोष्टींबद्दल काही सोपी आकलनं मांडल्येत असं वाटलं.
या दोन्ही टोकांवरच फक्त विचार वावरतात का? पहिलं टोक चुकीचं आहे तर त्यावर उतारा म्हणून दुसरं टोक, ही तात्कालिक प्रतिक्रिया असेल लेखकाची त्या परिस्थितीतली हेही समजून घेता येईल एक वेळ. पण या सगळ्या घडामोडींकडं काही काळ गेल्यानंतर पाहात असताना तरी जरा अधिक खोलात जायला काय हरकत होती. त्यामुळंच "मी"ची परिस्थिती "आपण"वर लादायचा विचित्र प्रयत्न दिसतोय. म्हणून मग अनेक विधानं सहज येऊन जातात, उदाहरणार्थ:
एका सोप्या विचारावर उतारा म्हणून दुसरा सोपा विचार. काही गोष्टी बदलल्या, हे तर खरंच. पण बदललेल्या परिस्थितीचं शक्य तेवढं खोलातलं आकलन करून घेण्यापेक्षा बदललेल्या परिस्थितीत "जसं असेल तसं बदलून वागता येईल" एवढाच दृष्टीकोन ठेवला तर मग भूतकाळातल्या ज्या मंडळींना नावं ठेवल्येत त्यांच्यात नि आपल्यात काय फरक?
(कुंडलकर यांच्या 'कोबाल्ट ब्लूू' कादंबरीत, मराठीत अन्यथा सहज न आलेला विषय सहज आला होता, त्याबद्दल मोकळेपणा होता. ती गोष्ट होती, काही व्यक्तींमधलं नातं उलगडायचा प्रयत्न होता. मग त्यात पुणेरी ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबाची पार्श्वभूमी, त्यात वेगवेगळे लैंगिकतेचे कल, नातेसंबंध यांच्याबद्दल काही बदल टिपले गेले. तिथं पार्श्वभूमीची मर्यादा सगळ्या समाजावर-देशावर लादली जात नाही. कादंबरी वाचून काही वर्षं लोटल्येत, त्यामुळं बाकी काही मत वगैरे नाही इथं देत. पण कादंबरीत गोष्ट होती एक, त्यामुळं कदाचित निष्कर्षांची घाई नव्हती.)