Skip to main content

समकालीन दिवाणखाना (नाटक) – मकरंद साठे

ललित

(स्थळ: पुण्यातील उच्च-मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय डाव्या विचारसरणीच्या intellectual/artist यांचा दिवाणखाना. अगदी तद्दन धंदेवाईक नाटकांप्रमाणे बॉक्स-सेटही असू शकतो. मागे लेव्हल आणि आत येण्याचे दार, railing इत्यादी, वा काहीसा सूचक. किमान सहा लोक बसावेत अशी व्यवस्था. अत्यंत उत्तम चवीने सजवलेल्या भिंती. भिंतीवर किमान दोन मोठी पेंटिंग्ज, ज्यांत भारतातील शहरी कष्टकऱ्यांचे वास्तव दाखवलेले आहे {सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांसारखी}. एखादे डाव्या विचारसरणीचे दर्शन घडवणारे पोस्टर.

खरे तर असा बॉक्स सेट नसावा. तशा बॉक्स सेटच्या फोटोचे, किंवा तशा बॉक्स सेटच्या रंगवलेल्या बॅकड्रॉपच्या (पूर्वीच्या संगीत नाटकांतील रंगवलेल्या पडद्यांप्रमाणे असलेल्या बॅकड्रॉपच्या) फोटोचे प्रोजेक्शन असावे. काही वेळा ते पुढे होणाऱ्या घटनांना किंवा बसण्याच्या व्यवस्थेला superimpose करून त्याचा अर्थवाही वापर करण्यासाठी चित्र बदलताही यावे.

एका कोपऱ्यात बार. तो उघडा आहे आणि त्यामुळे त्यातील बाटल्या, पेले इत्यादी दिसू शकतात. बारच्या वर मार्क्स, बुद्ध, तुकाराम यांचे छोटे पण नीट ओळखू येतील असे bust स्वरूपातले पुतळे. दिवाणखान्याची एकंदर अवस्था अस्ताव्यस्त, आदल्या रात्री पार्टी झाली असावी तशी. दारूचे पेले, अ‍ॅश ट्रे, बशा. काही पेल्यांत दारूही उरलेली. आजूबाजूला बरीच पुस्तके, मासिके पडलेली.

एका सोफ्यावर वय वर्षे ६२ची एक स्त्री वर्तमानपत्र वाचत बसली आहे. पायात leggings किंवा स्कर्ट आणि वर चुरगाळलेला short T-shirt, काहीसा bold. कानात किंवा गळ्यात ethnic पण खरोखर सुंदर, चांगल्या tasteचा दागिना, किंवा नाकात stud. तिच्या समोरच्या कपातील चहा संपत आलेला असावा. हातात पेटलेली सिगरेट.

एक ६४ वर्षांचा पुरुष येतो. एका कानात stud सदृश काही, केस अस्ताव्यस्त, दाढी. खाली short आणि वर चुरगाळलेला अर्धा कुडता किंवा T-shirt. डोळ्यांत झोप. हातात चहाचा कप. दुसऱ्या सोफ्यावर काहीसा धाडकन बसतो, तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी. तिच्याकडे बघतो. ती लक्ष देत नाही. शांतता.

दोघेही दिसायलाच हुशार, त्या पिढीचे typical intellectuals/creative लोक. डावे, काहीसे anarchist, irreverent, high-handed, हे हालचालींतूनही दिसावे.

काळ : वर्तमान. परंपरागत दृष्टिकोनातून पाहिल्यास इसवी सन २०२६; समकालीन, म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास शके १९४८. एका नामवंत खाजगी विद्यापीठातून राजकीय कारणांनी दोन वर्षांपूर्वी राजीनामा द्यावा लागलेला, अनिकेत नामक राज्यशास्त्राचा प्राध्यापक आणि कथाकार, आणि त्याची पत्नी, रोहिणी, प्रसिद्ध चित्रकार, यांचे घर. वेळ सकाळी उशीराची. नाही, नोकर येणार नाही... याच दोघांच्या एंट्रीपासून सुरुवात आहे. ही शेवटची तीन वाक्ये कदाचित निवेदनातून पण येऊ शकतील.)

अनिकेत : थकायला झालं... (रोहिणी पेपरातून डोकं वर काढत नाही.)

अनिकेत : (थोडं जास्त जोरात) थकायला झालं. (रोहिणीचं डोकं अजून वर्तमानपत्रात. लक्ष देत नाही.)

अनिकेत : (पसरलेल्या गोष्टींकडे निर्देश करत) मत्प्रिये... हे आवरायला हवं सगळं... (विराम.)

अनिकेत : (अचानक थोड्या भावनावेगाने) हे बघ, हे. हा गजा साला नेहमीप्रमाणे शेवटचं ड्रिंक अर्धं सोडून गेला आहे... ड्रिंक जमीन को पिलाना बुरी बात है. National waste!

रोहिणी : (वर आणि मग एका ग्लासकडे बघत) Agreed. ड्रिंक जमीन को पिलाना बुरी बात है. (परत वर्तमानपत्रात डोकं खुपसते.)

अनिकेत : आणि गजानन ते नेहमीच करतो.

रोहिणी : (शेवटी वर्तमानपत्र खाली करत) हे मघापासून तू गजानन, गजानन काय लावलं आहेस?

अनिकेत : म्हणजे?

रोहिणी : कालची पार्टी आणि गजानन यांचा संबंध काय?

अनिकेत : झालेलं दिसतंय परत चालू... अगं, काल गजानन, गोवर्धने आणि डिसोझा पार्टीला आले नव्हते का? आणि आपली चर्चा झाली... सॅम्युअल हंटिंग्टनच्या ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’च्या मांडणीमध्ये किती गडबड आहे त्याच्यावर. (यापुढे नाटकभर दोघांच्याही बोलण्यात एकीकडे गंभीर अर्थवाही चर्चा, बांधिलकी; दुसरीकडे pomp, दिखाऊपणा; आणि तिसरीकडे काहीसा पश्चात्ताप यांचा सूर, यांचे गमतीदार/चमत्कारिक मिश्रण असेल.) एकतर अगदी बेसिक चूक म्हणजे तो westernization आणि modernizationला कप्पेबंदपणे वेगवेगळं करतो. असं कसं होऊ शकेल? Western समाज आज जो काही आहे तो आधुनिकतेचं, enlightenmentचं फळ आहे. कांटची मांडणी वगळून त्याबाबत आपल्याला बोलताच येणार नाही. त्यांना वेगवेगळं करणं चुकीचं आहे. आणि गजा सारखा चुकीचं बोलत तर होताच; पण हंटिंग्टनला सारखं सॅम्युअल, सॅम्युअल म्हणत होता... जणू तो त्याचा भाचाच आहे! पूर्वी 'कोणी'तरी कोणालातरी सारखं 'बराक, बराक' म्हणत जवळीक साधायचा प्रयत्न नाही का करायचं... तसंच गजा...

रोहिणी : थांब, थांब, थांब... काल गजा आणि उरलेले दोघं आलेलेच नव्हते.

अनिकेत : Oh, come on... not again!

रोहिणी : काल मधुमितादी आणि बॅनर्जी आले होते. आणि त्यांच्याबरोबर तिसरा बाँग नको, नाहीतर ते बंगालीतच बोलत बसतील - म्हणून आपण मेननला बोलावलं होतं. आणि भगत होता, तू नोकरीत असतानाचा तुझा तो Ph.D.चा आवडता विद्यार्थी. तोही होता काल. आणि आपण Clash of Civilizations वर चर्चा केली नाही; आपलं भांडण झालं ते Rawlsची justiceबाबतची मांडणी आणि आंबेडकरांचे विचार हे एकत्र आणता येतील का नाही, यावरून.

अनिकेत : अरे देवा... आधीच वय झालंय आपलं!

रोहिणी : ते तर झालंच आहे. म्हणजे वय आपलं...

अनिकेत : त्यातून आपली नेहमीची भांडणं...

रोहिणी : आणि त्यातून तू नोकरीचा राजीनामा दिल्यापासून चालू झालेला हा memory lossचा त्रास.

अनिकेत : तसं जुनं आठवतं आपल्याला. फक्त short-term memoryबाबत... अं...

रोहिणी : ते तर जास्तच वाईट.

अनिकेत : तेही बरोबरच आहे. Agreed. This is awful!

रोहिणी : Absolutely awful.

अनिकेत : More awful than you think.

रोहिणी : You mean I can't think? फक्त तूच विचार करू शकतोस काय? केला होतास का सगळा विचार राजीनामा देण्याआधी?

अनिकेत : दिला नाही... द्यावा लागला... आणि आता आपण त्यावरून भांडायचं नाही असं ठरलं आहे ना? मग... (विराम.)

अनिकेत : आणि आता आपल्याला थकायला होतं त्याच्याशी मी राजीनामा देण्याचा काहीही संबंध नाहीये.

रोहिणी : सगळ्याचा सगळ्याशी संबंध असतो.

अनिकेत : नसतो. अगदी सगळ्याचा सगळ्याशी संबंध असतो असं logically सिद्ध करता येणार नाही. हे अतार्किक आहे.

रोहिणी : या पातळीवर वाद अशक्य आहे. बास. (विराम.)

अनिकेत : आत्ता जे काय थकायला होतंय ते आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत म्हणून नव्हे, तर आता आपल्याला पूर्वीसारखं रात्री तीन-तीन वाजेपर्यंत काथ्याकूट करत बसवत नाही म्हणून. ताकद उरत नाही.

रोहिणी : तसंही असेल... थकायला होतं आहे हे तर आहेच ना. आणि त्यातून आजकाल पार्ट्या म्हणजे नुसती भांडणं... तीही दोन टोकांमधली... फार वाढलीयेत आजकाल. लोकं तुटायला लागलेत. बरं झालं. काही दिवसांत या पार्ट्या आणि चर्चा संपतीलच. कोणी कोणाला भेटायलाच नको. थकायला होतं.

अनिकेत : खरं तर एवढं काही आपलं वय झालेलं नाही. मी चौसष्ट आणि तू बासष्ट, म्हणजे...

रोहिणी : तरुणच आजच्या मानानं. (विराम.)

रोहिणी : मला वाटतं की लहान वयात मुलं होण्याचा हा परिणाम आहे.

अनिकेत : कुठला परिणाम?

रोहिणी : थकवा येणं हा. (विराम.)

अनिकेत : तो दोष तुझा आहे... लग्नाच्या आधी तुला दिवस गेले... म्हणजे दिवस जाणं ही तुझी चूक नव्हे, पण माझं तर शिक्षण जेमतेम संपत होतं आणि तुला मूल हवं होतं.

रोहिणी : आमच्या घरात तशी परंपराच आहे ना. तुला ठाऊक आहे की; का ते पण विसरलास? माझी मावशी, आत्या, काकू... सगळ्यांनाच म्हणजे... लग्नाआधीच...

अनिकेत : ते नाही विसरलो. तुझ्याशी लग्न करण्यामागचं तेच तर एक मोठं कारण होतं... तुझी मावशी तर पळूनच गेली होती घरातून. शिवाय तिची भानगड आंतरजातीय होती ना.

रोहिणी : What do you mean by भानगड? चांगलं लग्न करून, वयाची नव्वदी गाठून मेले दोघंही, घटस्फोट न घेता.

अनिकेत : लग्न तर आंतरजातीय होतं ना... आपल्याला सालं ते एक नाही जमलं. (हसत) म्हणजे केलं आपण तसं, कोकणस्थ-देशस्थ. त्यांच्यातली तेढ काही कमी नसते!

रोहिणी : Don't be irreverent about everything... नाही केलं आपण आंतरजातीय लग्न, आणि ती एक कायमची रुखरुख... त्याबाबत आपण कुटुंबाची नाही, तर आपल्या संस्कृतीची, आपल्या सभ्यतेची परंपरा पाळली. तेवढं तरी झालं.

अनिकेत : थोडक्यात तू सर्वार्थानं परंपराग्रस्त आहेस... तूपण दारू अर्धीच प्यालीस काल. तो बघ, तो ग्लास तुझा. गजाचा वाण नाही पण गुण लागला!

रोहिणी : ती पण परंपराच. माझी मामी...

अनिकेत : बास... तेवढे पेले तरी उचलायचे का? फुटतील नाहीतर.

रोहिणी : फुटू देत. माणसं कधी ना कधी मरतात, पेले कधी ना कधी फुटतात. दोन्ही गोष्टी लवकर झाल्या तर बरंच आहे.

अनिकेत : आपणही मेलो तर बरंच. आपल्या जीवनाचं कार्य झालं आहे. मी भरपूर राज्यशास्त्र शिकवलं, भरपूर कथा लिहिल्या; तू भरपूर चित्रं काढलीस, जगभरात प्रदर्शित केलीस. दोघंही जन्मलो, दारू प्यालो, आपल्या परीनं जग बदलायचा प्रयत्न केला... आता तो प्रयत्न फसून गेल्या काही वर्षांत जग उलट्या दिशेनंच वळलं आहे, त्याला आपण तरी काय करणार? प्रत्येकाला काही मर्यादा असतातच.

रोहिणी : अगदी असतात.

अनिकेत : पण तो गजा साला...

रोहिणी : तो काल आला नव्हता... (विराम. दूरवरून एक घंटा एकदाच वाजल्याचा आवाज येतो. दोघंही एकमेकांकडे पाहतात.)

अनिकेत : आणि मला कशाची तरी भीती वाटतीय सकाळपासून.

रोहिणी : मलापण.

अनिकेत : आपण काल रात्री काहीतरी विशिष्ट कृत्य केलं असावं आणि त्याचा परिणाम म्हणून आता काहीतरी भयंकर होणार असावं, अशी भीती.

रोहिणी : तू परत एखादी कथा तर नाही ना लिहिलीस?

अनिकेत : त्या घटनेनंतर मी काहीही लिहिलेलं नाही.

रोहिणी : मीपण चित्रं काढणं बंदच केलंय.

अनिकेत : आणि शिवाय ही भीती दोघांना एकाच वेळी, म्हणजे दोघांनी काहीतरी एकदम... (विराम.)

रोहिणी : दोघांनाही ही गोष्ट आठवत नाहीये... दोघांची एकाच गोष्टीबाबतची memory एकदम जाणं हे तसं बरंच म्हणायचं.

अनिकेत : तेही खरंच. (विराम.)

अनिकेत : एकदम पूर्वीचा काळ आठवतो... (गालातल्या गालात हसत गाणं म्हणायला लागतो) उधर तुम हसीन थी, इधर हम जवां थे, बीच में ये यादोंके problems नहीं थे...

रोहिणी : बास! नको असे विनोद. आधीच कशाची तरी भीती वाटतीये; भिकार विनोदानं भीती वाढते फार. (विराम.)

अनिकेत : पण हे आवरायला तर हवं ना. आज कामाची बाई येणार नाहीये.

रोहिणी : नको का येईना. ठेवूया असंच.

अनिकेत : नको. हा आपला इतिहास आवरायला हवा.

रोहिणी : का? तो बदलायचा असला कोणाला, तर त्यांनी घ्यावेत त्यासाठी कष्ट. तेपण आपणच कशाला करायचं?

अनिकेत : हं... तेही खरंच... पण त्यावरून माझ्या लक्षात आलं ते असं, की म्हातारपण म्हणजे जो आता बदलता येत नाही अशा इतिहासाबद्दल निष्फळ विचार करत बसणं.

रोहिणी : अरे वा! आज सकाळी सकाळीच कोणीतरी तत्त्वचिंतन करायला लागलेलं दिसतंय. तेही existential, व्यक्तिगत अंगाने! सामाजिक, राजकीय अंगांना बगल देऊन!

अनिकेत : राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मी इतकी वर्षं काय शिकवत आलो; तर existential, व्यक्तिगत, आणि सामाजिक, राजकीय यांत तसा काही फरक नसतो हे! आणि तू मला... पण आत्ता तातडीची आवश्यकता आहे ती हे सगळं घर आवरण्याची.

रोहिणी : परत तेच. राहू दे ना तसंच.

अनिकेत : नाही. तात्त्विक नाही, पण व्यावहारिक अंगांनी विचार केला तर आपला मुलगा आज परत येणार आहे मठातून... त्याला तिथं गेल्याने मनःस्वास्थ्य प्राप्त होवो न होवो, तो परत तर येणार आहे आणि त्याला असं आवडत नाही. (रोहिणी काहीशी हरवलेली. गप्प. विराम.)

अनिकेत : आपल्याला एक मुलगा आणि मुलगी आहे... का तेच विसरलीस आता? एक मुलगा... लग्नाआधीच पोटात निर्माण झालेला... तो आता अमेरिकेतून परत...

रोहिणी : ते कसं विसरेन? एक मुलगा आहे. त्याचं नाव कबीर आहे आणि तो तीन वर्षांनी अमेरिकेतून काही दिवसांसाठी परत आला आहे.

अनिकेत : आणि तो अमेरिकेत राहत असल्यानं त्याचं मनःस्वास्थ्य ढळलं आहे.

रोहिणी : हो. तिथं H1B व्हिसाचे त्रास तयार झाले आहेत; शिवाय तिथे शाळेतपण गोळीबार करतात लोक.

अनिकेत : शिवाय वस्तूंची खूप चंगळ असल्यानं अपरंपार गरिबी सतत सतावत असते.

रोहिणी : शिवाय त्याला आता मूल होणारे... आणि एकंदरीनेच कोणाशी संपर्कच नकोसा झालेला असण्याच्या युगात हे भयानकच.

अनिकेत : आणि शिवाय त्यामुळेच सततची घटस्फोटाची टांगती तलवार अधिकच धारदार... आपण सतत भांडतो, पण अजून घटस्फोट नाही घेतला.

रोहिणी : शिवाय त्यांनीच निवडून दिलेला प्रेसिडेंट ट्रंप त्यांनाच जड झाला आहे. H1B आणि Green card...

अनिकेत : (तिचं वाक्य अर्ध्यात तोडत) काय आहे की तो आजच्या पिढीतल्या बहुतेकांप्रमाणे परंपरावादी आहे; आणि मी एक सामाजिक विषयांचा अभ्यासक म्हणून आपल्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासाची अनेक पुस्तकं वाचली आहेत, आणि त्यांत H1B आणि Green card याविषयी समस्या तयार झाल्यास काय करावे त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

रोहिणी : त्याची त्यांना गरज नाही. ते अशी पुस्तकं वाचत नसतात. त्यांनी वेगळा इतिहास बनवला आहे. त्याच्यावर आता त्यांची सत्ता आहे आणि those who control the past control the future...

अनिकेत : And those who control the present control the past. (एकमेकांना high-five देतात.)

रोहिणी : थोडक्यात त्याची वर्तमान आणि भविष्य अशा दोन्हींवर सत्ता आहे, आणि त्याला मठात जाऊन मनःशांती प्राप्त होणार आहे! प्रश्न संपला.

अनिकेत : प्रश्न आपला आहे, कारण त्याला आता थोड्या दिवसांत मूल होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला अमेरिकेत जावं लागणार आहे.

रोहिणी : अमेरिकेत जाणारी सगळी विमानं आता अशाच भयानक आईबापांनी भरलेली असतात... तुपकट चेहऱ्यानं "नातवंडांचा आनंद घेण्यासाठी चाललो" असं म्हणत राबण्यासाठी.

अनिकेत : हे म्हणजे भयानक high-handed विधान आहे. सामान्य माणसाला असं हलकं लेखू नये, निदान आपण तरी.

रोहिणी : पण असं आहे हे तुला मान्य नाही का?

अनिकेत : आहे. आणि आपण high-handed असण्यातही तशी चूक नाहीच आहे.

रोहिणी : आपल्याला लग्नाआधीच दिवस गेले होते. आता हे चक्र उलटं फिरत असलं तर we deserve at least this much!

अनिकेत : आपण तिथं जाऊन त्याच्या मुलावर आपले 'संस्कार' करूया. मग येईल मजा!

रोहिणी : करू या.

अनिकेत : पण ते आजकाल effective होताना दिसत नाहीत. आपल्या स्वतःच्याच मुलांवर नाही झाले तर...

रोहिणी : मुलगी बरी आहे की आपली...

अनिकेत : काय बरी? इंजिनिअर नाही, अमेरिकेत नाही, पण MBA आहे, अगदी अहमदाबादच्या IIMमधून. आणि City Bankत गुलाम म्हणून प्रचंड पैसे कमवत रात्री तीन-तीन वाजेपर्यंत दिवसाला सोळा-सोळा तास काम करते!

रोहिणी : बिचारी! ते काही असो... पण तिशीची झाली तरीही लग्न तर नाही ना केलं! तेवढं तरी बरं झालं ना!

अनिकेत : हं... पण आपण त्याच्या मुलाकडे, नातवंडांना बघायला जाण्याचा प्रश्न उरतोच.

रोहिणी : आपण त्याला आधी ते संस्कारांचं सांगूया. ते पटलं नाही तर मग आपली short-term memory कशी गेली आहे ते सांगून घाबरवूया. आपण बाळाचं काही करायला विसरलो आणि काहीतरी भयानक झालं तर? (तेवढ्यात परत दुरून घंटेचा एक टोल. इथपासून वारंवार प्रत्येक विरामाला भीती निर्माण व्हावी असं गूढ संगीत वाजेल. विराम.)

अनिकेत : हं... परत परत कशाची तरी भीती वाटतीये... काय केलं असेल काल रात्री असं आपण? (क्षणिक विराम. डोकं हलवत) हे आवरायचं का? मुलगा येणार आहे हे विसरू नकोस.

रोहिणी : तो रात्री येणार आहे आणि आत्ता सकाळ आहे... नको आता कसली घाई; त्रास होतो त्यानं.

अनिकेत : तेही खरं आहे. नकोच कसली घाई... 'घाई नको' हे ब्रीदवाक्य आता जगण्यातलं.

रोहिणी : उरलेल्या जगण्यातलं. (विराम.)

अनिकेत : आणि तसे आपण उच्चभ्रू असलो तरी आपण फार guilt वाटून घेण्याचं कारण नाही.

रोहिणी : अगदीच नाही. तू तर राजकीय कारणांनी, तात्त्विक मुद्द्यांवर चांगली नोकरीसुद्धा सोडलीस... एवीतेवी दोन वर्षांत रिटायर होणारच होतास म्हणून काय झालं?

अनिकेत : आणि तिथं काम करणं दिवसेंदिवस खरंच अवघड होत चाललं होतं म्हणून तरी काय झालं?

रोहिणी : आणि आपल्या मुलांपैकी एक मूल तरी भारतातच आहे. तिलाही तिकडे जाण्याची ओढ कितीका असेना, आहे तर इथंच ना!

अनिकेत : आणि ती आपल्या अमेरिकेतल्या मुलाइतकी आक्रमक देशप्रेमीही झालेली नाही.

रोहिणी : That is one of our major achievements.

अनिकेत : आणि शेवटी असं आहे की सगळ्यांनाच लेनिन, नाहीतर गांधी, नाहीतर मेधा पाटकर होता येत नाही. त्यांनी होऊपण नये, कारण लाखो लेनिन किंवा गांधी होऊन उपयोग काय? बाकी जग चालायला नको? प्रत्येकाजवळचा set of skills वेगवेगळा असतो. बांधिलकी मानणं महत्त्वाचं. (विराम. परत घंटेचा एक टोला.)

रोहिणी : नाही. हे काही खरं नाही. सहन होत नाही हे... म्हणजे हे फार unpredictable आहे... निदान कशाची आणि का भीती वाटतीये ते तरी कळायला नको का?... नाही... छे... आपण सरळ आत्महत्या करायची का?

अनिकेत : नको. सकाळ आहे. छान हवा आहे.

रोहिणी : पण भीती वाटते आहे... काय केलं असेल आपण काल रात्री?

अनिकेत : मलापण वाटतीये भीती. (क्षणिक विराम. दोघं एकाच वेळी एकमेकांकडे बघतात आणि एकाच वेळी एकाआड एक शब्द बोलतात.)

अनिकेत आणि रोहिणी : आपण भांडलो का नेहमीसारखे आपापसांत?

रोहिणी : नाही. म्हणजे नक्की आठवत नाही, पण या भीतीचं texture वेगळं आहे.

अनिकेत : आणि शिवाय भांडण झालं तर आपल्यापैकी एकाला तरी ते आठवतं.

रोहिणी : आणि दुसऱ्याला ते आठवत नाही, त्यामुळे अजून एक भांडण होतं... तसंही आज होत नाहीये. आत्ता फक्त भीती वाटतीये.

अनिकेत : पण तीही दोघांना एकाच वेळी, म्हणजे दोघांनी मिळून काहीतरी एकत्र तर...

रोहिणी : सेक्स?

अनिकेत : त्यानं दुसऱ्या दिवशी भीती वाटत नाही... म्हणजे आता ते जमेल का नाही या कारणानं त्या वेळी वाटते, पण दुसऱ्या दिवशी...

रोहिणी : मग काय केलं आपण असं एकत्र? सालं हे short-term memory lossचं प्रकरण भयानक आहे.

अनिकेत : पण त्यातही एक आत्तापर्यंत बरं होतं... एकाला तरी आठवायचं. (विराम.)

रोहिणी : आपण एकमेकांना मिठी मारूया का? (दोघं एकमेकांकडे बघतात. आता उठून मिठी मारणार असं वाटतं, पण होत काहीच नाही.)

अनिकेत : आपणपण मुलासारखं मठात जायला हवं होतं का?

रोहिणी : एवीतेवी तुलाही आता नोकरी नाहीच आहे.

अनिकेत : नाही. नको... जग दिशा बदलायला लागलं असेल, पण आपण नाही बदलायची.

रोहिणी : खरंय. नकोच जायला.

अनिकेत : का जाऊन पाहायचं?

रोहिणी : Over my dead body!

अनिकेत : तसं तर तसं... पण जाऊन बघायचं का? काहीतरी वेगळं...

रोहिणी : कदाचित काहीतरी radical केल्याचं समाधान मिळेल.

अनिकेत : मी लिहिली ना एक कथा.

रोहिणी : तीही काही फारशी radically, त्रासदायकपणे वेगळी होती म्हणता येणार नाही.

अनिकेत : पण परिणाम तर झाले ना radical? गेली ना short-term memory तेव्हापासूनच! (विराम.)

अनिकेत : संडासला जाऊया का?

रोहिणी : का, पोट बिघडलंय?

अनिकेत : नाही. पण भावना होतीये... परत परत.

रोहिणी : मला पण होतीये. (विराम. दोघे तिथेच. फक्त उठतात आणि बसतात, परत परत.)

रोहिणी : ते काही असो, पण आता हे memory loss प्रकरण फार वाढतंय. (विराम.)

अनिकेत : काहीतरी खेळू या का? किंवा मिठी मारू या. (परत काहीच होत नाही. विराम.)

रोहिणी : छातीत palpitation होतंय. (विराम. उठून खोलीभर फिरतात. अस्वस्थता. अधूनमधून टोल वाजतात. दरवेळी ते दचकतात. दोन ग्लासांतली उरलेली दारू पिऊन टाकतात.)

अनिकेत : काय झालं ते आठवत नाही, पण काही तरी झालंय असं वाटून भीती वाटते, is absurd.

रोहिणी : Absolutely absurd. We must do something about it.

अनिकेत : आता absurdच्या विरोधात काय करायचं ते कोणाला आजतागायत कळलंय का?

रोहिणी : खात्री नाही, पण शक्य आहे. मगाशी तू नकळत तेच करत होतास. काय म्हणालास तू मगाशी? किती छान सकाळ उगवली आहे! तेच म्हणायचं. फक्त याबाबतच नव्हे, तर आजकाल सगळ्याबाबतच म्हणायचं : हे किती छान व्हायला लागलं आहे आजकाल सगळं!

अनिकेत : That's a good idea. वास्तवच बदलून टाकायचं. म्हणजे 'ते' असं करतच आहेत... आपण जास्तच जोरात करायचं. (विराम.)

रोहिणी : मी ते केलं.

अनिकेत : मी पण केलं.

रोहिणी : म्हणजे प्रयत्न केला, पण भीती जात नाही. (विराम.)

रोहिणी : परत विचारते, आपण सेक्स तर नाही ना केला काल रात्री?

अनिकेत : नाही.

रोहिणी : तसंही irrelevantच झालं होतं आधीही काही वर्षं. तू sexच्या बाबतीत तसा जरा coldच होतास नेहमीच.

अनिकेत : (चिडून) Oh, come on! आता या वयात हे नाही ऐकून घ्यायचं मला, च्यायला! आपल्याला होतंय काय? आपण बोलतोय काय? You are too much! (तेवढ्यात दाराची बेल वाजते. कोणी दार उघडायचं यावरून न बोलता काहीसा तणाव. शेवटी अनिकेत जास्त रागावला असल्यानं तोंड फिरवतो आणि रोहिणी दार उघडते. दारातून त्यांचा मुलगा कबीर धाडकन दार लोटत आत येतो. रोहिणी जराशी धडपडते. कबीर, वय वर्षे ३४. अंगावर अत्यंत formal कपडे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची असते तशी गुळगुळीत दाढी आणि त्वचा. कपाळावर ठसठशीत गंध. हातात काही गंडे. बोटांत दोन अंगठ्या. मनगटावर स्मार्ट डिजिटल वॉच, जे मोबाईलच्या जोडीनंच तो सतत बघतो. उघडपणे अत्यंत रागात आहे. थेट बूट न काढता आत येऊन, बरोबरची बॅग उघडतो आणि आतून त्याच्या गुरूंची तस्वीर आणि लॅपटॉप बाहेर काढतो. हातात मोबाईल आहेच. लॅपटॉपवर घाईघाईत काहीतरी छापतो. मग मोबाईलवर. अनिकेत आणि रोहिणी चकित होऊन त्याच्याकडे पाहात राहतात. मग पसरलेल्या खोलीकडे आणि शेवटी एकमेकांकडे पाहतात.)

रोहिणी : (मागेच उभं राहत त्याच्याकडे पाहत राहते. मग आश्चर्यानं) कबीर... अरे... पण... तू रात्री येणार होतास ना? आणि आल्या-आल्या आमच्याशी एक शब्द न बोलता लॅपटॉपवर... काही प्रॉब्लेम नाही ना कामाच्या जागी?

समकालीन दिवाणखाना

कबीर : नाही. Problem नाही. पण चोवीस तास alert राहावं लागतं आजकाल, नाहीतर... गेल्याच आठवड्यात ५४३२ लोकांना काढलं गूगलनं!

अनिकेत : (काहीसं सैलावत आणि जरा चेष्टेच्या सुरात) मग ठीक आहे. तुमच्या पिढीला सवय आहे त्याची आता... पण मनःशांती मिळाली का, एक दिवस आधीच?

रोहिणी : तसं वाटत नाहीये. किंवा मिळालीपण असेल, कारण लॅपटॉप बघणं हे काही मनःशांती जाण्याचं लक्षण नव्हे. तशी परंपरा नाहीये. आणि रागावलेलं दिसतंय कुणीतरी... बायको बरी आहे ना?

अनिकेत : आणि परंपरेबद्दलच बोलायचं झालं, तर आत येताना बूट काढावेत. ती परंपरा आहे आपली. 

(कबीर लॅपटॉप थाडकन बंद करतो आणि काही क्षण त्यांच्याकडे रोखून पाहत, रागानं पण कष्टानं control केलेल्या आवाजात):
कबीर : का केलंत काल रात्री असं? (अनिकेत आणि रोहिणी एकमेकांकडे, म्हणजे काल रात्री काहीतरी झालेलं दिसतंय अशा भावनेनं बघतात.)

रोहिणी : काय केलं?

अनिकेत : कोणी काय केलं?

कबीर : तुम्ही... तुम्ही नाही तर कोणी? (आजूबाजूच्या पसरलेल्या खोलीकडे त्याचं लक्ष जात) तरीच... काल तुमच्या परंपरेप्रमाणे नेहमीचं दारूकाम झालेलं दिसतंय. त्याच्याच नशेत...

अनिकेत : ही आमची परंपरा नाही. आपली परंपरा आहे पुरातन काळापासूनची. सुरा ही देवी आपली... अगदी वेदकाळापासून, आणि इंद्रापासून कृष्णापर्यंत सगळे... (कबीर काही उत्तर देणार तेवढ्यात परत बेल वाजते. यावेळी अनिकेत उठून दार उघडतो. बाहेरून त्यांची मुलगी अश्विनी आत येते. वय वर्षे ३१. काहीशी जाड. अंगात क्रॉप टॉप आणि shorts. पाठीवर महागडी sack. हातात एक गंडा. तीही कबीरप्रमाणेच रागावलेली, पण रागावण्यापेक्षाही चिंता थोडी जास्त. तीही आल्या-आल्या मधल्या उरलेल्या एका टीपॉयवर दोन लॅपटॉप काढून उघडून ठेवते. त्यावर काहीतरी छापते. मोबाईल एका प्लगला चार्जिंगला लावते. तिच्याही हातात तसंच घड्याळ. त्यात चिंतातुर नजरेनं बघते. रोहिणी आणि अनिकेत दोघेही बघत राहतात. स्तब्ध आणि आश्चर्यचकित. हे होईस्तोवर एक तणावपूर्ण विराम.)

अनिकेत : अश्विनी... तूपण!

रोहिणी : सकाळी सकाळी दहा वाजता! अगं, पहाटे चार वाजता आली असशील कामावरून... थोडी झोप घ्यावी गं... आणि अशी... म्हणजे... काय झालंय का काही कामाच्या जागी?

अश्विनी : कामाच्या जागी काहीही झालेलं नाहीये... आणि बास झाली ही चेष्टा! कामाच्या जागी सत्तर तास हे कुठल्या पिढीनं केलं चालू? आं? हे थांबवायलाच हवंय, पण...

अनिकेत : (तिला अर्ध्यात थांबवत) अगं, एके दिवशी, एका वेळी, अपेक्षित नसताना आपली दोन्ही मुलं आलीयेत. दिवाळी आहे आज. कुठे फुलबाज्या वगैरे आहेत का बघ, काही उडवायला.

अश्विनी : आता फुलबाज्या नाही, तर फटाके उडणारेत; बॉम्बच उडणार आहेत मोठे!

कबीर : तेच सांगत होतो मी त्यांना मघाशी.

अश्विनी : तुलापण कळलं वाटतं, अगदी मठातसुद्धा! का मिळाली मनःशांती already?

कबीर : मिळता मिळता गेली; हातातून सटकली. यांच्यामुळे. (जरा रागात) तुला काय कळतंय? काय tensions असतात अमेरिकेत!

अश्विनी : अमेरिकेचं सोड. आपला देश काही मागं नाही आता. केवढी प्रगती झालीये गेल्या दहा वर्षांत, त्याची कल्पनाच नाहीये तुला... You are so cut off... इथं आता 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' अशी परिस्थिती आहे.

रोहिणी : अरे वा! हे वाक्य तुझ्या तोंडून! ते कोणाचं आहे ते माहीत आहे का?

अश्विनी : खरं तर आमच्याच तोंडचं वाक्य आहे हे... आमच्यासमोर priorityने प्रश्न हा आहे, की पहिल्यांदा कोणाशी लढायचं? तुमच्याशी, का आता ज्यांनी गोष्टी पुढं नेत जगणंच कठीण केलंय त्यांच्याशी? आणि तुम्हाला वाटतं हा तुमचा प्रश्न आहे. पण त्यानं काय फरक पडतो? आहे ना तसा प्रसंग? मग झालं तर!

कबीर : तूपण यांच्यासारखीच... उरलेल्यांच्या quotes वापरत बसा आयुष्यभर. आणि कितीही फरक पडला तरी फार मागं आहात अजून अमेरिकेच्या.

अश्विनी : आता आपल्याला भांडायचं आहे का लहानपणीसारखं? तुला फक्त माझ्याशीच भांडायचं आहे... मोठं काही दिसतं का तुला? अमेरिकेत राहिलं ना, की तसं दिसणं बंदच होतं वाटतंय... इथंपण नाही आता मनःशांती. सगळं सतत पेटल्यासारखं असतं. Boiling hot! आणि आपल्याला कशातून जावं लागतंय ते यांना आणि यांच्या पिढीला कळतच नाहीये. ही अशी परिस्थिती असताना नाही नाही त्या भानगडी करत बसतात. आता पूर्वीसारखे मनमानी करायचे आपले दिवस संपले, हेपण यांच्या लक्षात येत नाहीये. आता त्यांना वाचवत बसायची additional कटकट!

कबीर : लहानपणी तरी काय वेगळं होतं? तेव्हापासून जगाच्या उलटंच शिकवत आले हे.

अश्विनी : खरं आहे... जरा खरवडलं ना, तर यांच्या पिढीतले इतर बहुतेक लोकही तेव्हापासून असंच होते आणि आता जे होतंय त्याला सपोर्टच करतात, हे लक्षात येतं आता. यांच्या intellectual दहशतीनं बोलायचे नाहीत तेव्हा. पण आता ते दिवस गेले.

कबीर : अजिबात नाही उरले. यांचे दिवस गेले आता.

अश्विनी : अगदी पार गेले. पण यांचं काही थांबत नाही!

कबीर : They are exasperating!

अश्विनी : Absolutely exasperating!... एवढ्या एका बाबतीत तुझं आणि माझं जुळतंय असं दिसतं. नाही तर तू म्हणजे...

कबीर : मीच भांडतोय? आं? लहानपणापासून तूच...

अनिकेत : अरे, नका रे भांडू आता. इथे कसे, ते सांगा. सोडा ती कालची पार्टी आमची... अगदी महाभारतातही उल्लेख आहेत अशा पार्ट्यांचे; तेव्हा ती परंपरा आहे आपली.

कबीर : पण ते दारू पिऊन असल्या पोस्ट टाकत नसत सोशल मीडियावर! (दुरून परत घंटेचा एक टोल. क्षणिक विराम. गूढ भयकारक संगीत.)

रोहिणी : पोस्ट? काय बोलतोयस काय तू?

कबीर : तुम्ही दोघांनीही आपापल्या मोबाईलवरून एकाच वेळी काल रात्री उशीरानं टाकलेल्या पोस्टविषयी बोलतोय मी. (अनिकेत आणि रोहिणी परत एकमेकांकडे बघतात.)

रोहिणी : आम्ही काही पोस्ट-बिस्ट टाकली नाही बाबा. काय बोलतोयस तू?

कबीर : (वैतागून त्यांच्यापैकी एकाचा फोन उचलतो आणि त्यात बघतो) पोस्ट केलीत आणि नंतर deleteही केलीत! कमाल आहे. म्हणजे तुम्ही जे केलंत ते बरोबर नव्हतं, कोणाला तरी दुखावणारं होतं, हेही तुम्हाला माहीत होतं आणि तरी केलीत!

अनिकेत : तू काय बोलतोयस काहीही समजत नाहीये... मठातल्या बाबांनी काही...

कबीर : त्यांचा काही संबंध नाहीये... हे असं काहीतरी दुखावणारं...

रोहिणी : म्हणजे खरं!

अनिकेत : (हसत) Yes... yes... म्हणजे खरं!

कबीर : खरं, खोटं गेलं... कोण खरं का खोटं, त्याबद्दल काही बोलतच नाही आजकाल. त्याला काही अर्थच उरलेला नाहीये.

अनिकेत : च्यायला, म्हणजे खरं-खोट्यातला भेद मिटला आजकाल, याची चक्क जाण आहे तुम्हांला!

कबीर : एका प्रश्नाचं उत्तर द्या, बास. ती पोस्ट का केलीत? आणि तीही दोघांनी! आणि तीही नंतर लगेच delete केलीत! तुम्हाला काय वाटलं? केली मजा, घेतली मागं, संपलं सगळं? तुम्ही delete करायच्या आधीच्या क्षणात viral झालीये ती, देशभर... च्यायला, मनःशांती मिळवायला आलो इथं... मिळता मिळता हातातून गेली अगदी, काल रात्री!

अश्विनी : दमले आहे मी. सहन होत नाही... हे वय नाही आमचं असं काही सहन करायचं... कशाला केलीत ती पोस्ट?

रोहिणी : अगं, कसली पोस्ट? आम्हाला तर काहीही आठवत नाहीये. कसली पोस्ट? (रोहिणी आणि अनिकेत दोघेही परत एकमेकांकडे बघतात. क्षणिक विराम.)

अनिकेत : एक मिनिट... एक मिनिट... तुम्ही ही काय पोस्ट म्हणताय, तेच आम्हाला कळत नाहीये... आम्हाला काहीही आठवत नाहीये.

कबीर : आठवत नाहीये... का दारू...

रोहिणी : अरे नाही... काय आहे की short-term memory असते ना... आमची ती गेली आहे... म्हणजे आपण तुमच्या लहानपणी एक मांजर पाळलं होतं, आठवतंय? ते कसं एके दिवशी घरातून निघून गेलं; तशी आमची short-term memory गेली आहे.

अनिकेत : Yes. म्हणजे आमच्या दोघांचीही. (आता एकमेकांकडे बघायची वेळ कबीर आणि अश्विनीची.)

कबीर : हे सोयीचं झालंय आजकाल तुम्हाला, असं दिसतंय. गेली दोन वर्षं ऐकतोय!

रोहिणी : साधारणपणे एका वेळी एकाचीच जाते ना short-term memory. यावेळी पहिल्यांदाच दोघांची एकाच वेळी गेलेली दिसतीये!

अश्विनी : दोघांची असो नाहीतर एकाची, विषय बदलू नका. प्रश्न आहे तो तुम्ही केलेल्या पोस्टचा.

कबीर : (रागाने) थांब... हे memory lossचं प्रकरण संपवूया आधी, कारण त्याचा काही तरी संबंध असेल याच्याशी. कधीपासून जायला लागली memory? आणि अगदी एका वेळी, ठरवून! कमाल आहे! सोयीस्कर अगदी!

अनिकेत : सोयीस्करला एक दुसरा चांगला शब्द आहे... psychologist त्याला defense mechanism म्हणतात.

रोहिणी : Yes... ती आमची defense mechanism आहे.

कबीर : पण कशाविरुद्ध?

अनिकेत : अरे, आत्ताच्या परिस्थितीविरुद्ध!

अश्विनी : आणि परिस्थिती म्हणजे जागतिक वगैरे असणार! काय समजता काय तुम्ही स्वतःला? रामदासस्वामी? सतत चिंता करितो विश्वाची! विश्वाचं आम्हाला बघू द्या आता... स्वतःचं बघा... ती पोस्ट का केलीत?

रोहिणी : जगाच्या परिस्थितीबद्दल जाऊ दे गं... भीती वाटते आणि त्यामुळे होतं हो असं... आपोआप.

अनिकेत : म्हणजे त्या वेळी एकदा जी भीती वाटली होती ना, त्यामुळे रे. आमचा नाइलाज आहे अगदी.

कबीर : तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का? कशाची भीती वाटली इतकी? कधी?

अश्विनी : अरे, त्याला राजीनामा नव्हता का द्यावा लागला दोन वर्षांपूर्वी... बरंच काही काही झालं तेव्हा.

कबीर : Oh, I see! This is interesting. मी नव्हतो तेव्हा इथं, आणि तेव्हापण तिथंही फार tensions होती... आणि तुम्हीही कधीच कळवलं नाहीत नीट. मला वाटलं, घेतली असेल premature retirement.

रोहिणी : तो आलाच होता रे; कंटाळा म्हणजे...

अनिकेत : कंटाळा नव्हता आला; शिकवणं अशक्य झालं होतं. कसा शिकवायचा राज्यशास्त्र हा विषय आजच्या काळात, स्मृतिभ्रंश झाल्याशिवाय?

रोहिणी : मग आता येईल तुला शिकवता, निदान अर्धा तरी. तेवढी तरी गेली ना memory! द्यायला लाग guest lectures. तेवढा वेळ तरी घरातून बाहेर जाशील आणि मला जरा शांतता मिळेल.

अनिकेत : That's not a bad idea. कंटाळाच येतो नाहीतरी आजकाल घरी बसून. (कबीर आणि अश्विनी आईवडिलांच्या थंडपणामुळे आल्यापासूनच अत्यंत अस्वस्थ आहेत. आता ती अस्वस्थता वाढते आहे.)

कबीर : नका करू आता नाही ते. आणि मुख्य म्हणजे परत विषय नका बदलू. मला का नव्हतं सांगितलं तेव्हा?

रोहिणी : अरे, तू तुझ्या tensionमध्ये... त्या वेळी तर मनःस्वास्थ्यासाठी मठातपण गेलेला नव्हतास.

कबीर : बास! सगळ्याचीच गंमत वाटते तुम्हाला... किती शिवीगाळ होतीये तुमच्या पोस्टवर, धमक्यांचा पाऊस पडतोय, ते पाहिलंत ना, तर वाचा बसेल!

अनिकेत : पण आमच्या accountवर काहीच कसं येत नाहीये?

कबीर : ते मलापण कळत नाहीये. पण त्यासाठी वेळ नाही आत्ता. कुठल्याही क्षणी ते येतील.

रोहिणी : ते? म्हणजे कोण?

कबीर : ते कळेलच थोड्याच वेळात. आता कृपा करा आणि सांगा जरा नीट, काय झालं तेव्हा ते...

अनिकेत : ते मरू दे आता. आम्ही accept केलंय आता जे झालं ते, आणि त्यामुळे झालेला memory loss, दोन्ही... OK?

कबीर : नाही ना... OK कसं असेल... कालची पोस्ट परत तशीच reaction घडवून आणू शकते; खरं तर त्याहीपेक्षा जास्त वाईट काहीतरी घडवून आणू शकते. आता त्या गोष्टीला दोन वर्षं होऊन गेली आहेत... फार फरक पडलाय जगात...

अनिकेत : खरंय... आजकाल दोन वर्षं म्हणजे केवढा मोठा काळ!

रोहिणी : होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हावं इतका मोठा!

अनिकेत : युगांतर व्हावं इतका!

कबीर : चेष्टा करू नका... घरात बसून असता, पुस्तकं वाचत बसता. जगात काय होतंय त्याचं भान नाही तुम्हाला... तंत्रज्ञान कुठल्याकुठं जाऊन पोचलंय!

अश्विनी : भावना किती जास्त तरल झाल्यात, आणि माणसं संवेदनशील!

कबीर : आणि कायदा त्यांना साथ देत किती जास्त सक्षम झालाय... काही कल्पना आहे?

रोहिणी : नाही.

अनिकेत : नाही... आमची short-term memory गेली आहे... आणि सध्या विचारशील तर मला संडासला लागल्याची भावना होतीये परत.

अश्विनी : मलापण आत्ताच व्हायला लागलीये.

कबीर : ते काही नाही. या पोस्टवर काहीतरी इलाज केलाच पाहिजे.

रोहिणी : अरे, पण काय होती तरी काय ती पोस्ट?

कबीर : मोठ्यानं बोलून सांगण्यासारखी नाही ती; आणि एवीतेवी त्याच्यावर जो काय उपाय असेल तो तुम्हाला एकतर कळणार नाही, आणि कळला तरी तुम्ही इतके impractical आणि हट्टी आहात की तो तुम्ही करणार नाही.

अश्विनी : त्यामुळे जे काय करायचं ते आम्हालाच करावं लागणार आहे आणि तुम्हाला वाचवावं लागणार आहे... किती काळजी लावता आता माझ्या या वयात!

कबीर : त्यांची काळजी मरू दे. माझ्या H1Bचा प्रश्न आहे... नीट ऐका. पोस्टबाबत जे करायचं ते करण्यासाठी मुळात आधी, राजीनामा दिलात त्या वेळी काय झालं होतं, ते मला सांगा.

रोहिणी : काही नाही रे... हा राज्यशास्त्राचा प्राध्यापक असला तरी कथा... म्हणजे creative कथालेखनपण करतो ना.

कबीर : ते कशाकरता? अं? कशाकरता? काय साध्य होतं त्यातून? अं? पण ते मरू दे. त्याचा काय संबंध इथे? बाबा राज्यशास्त्र शिकवायचा दिल्लीतल्या एका अत्यंत नामांकित प्रायव्हेट युनिव्हर्सिटीत, आणि तिथं काहीतरी झाल्यामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला, हे मला ठाऊक आहे. त्याचा कथांशी काय संबंध? ते आधी सांगा. (असं म्हणून तो मनगटावरच्या घड्याळात बघतो आणि दचकून उठत जोरजोरात फेऱ्या मारायला लागतो. त्याला असं करताना पाहून अश्विनीलाही काहीतरी आठवल्यासारखं होतं. तीही स्वतःच्या घड्याळात बघते आणि उठून जोरजोरात फेऱ्या मारायला लागते. अनिकेत आणि रोहिणी चकित होतात.)

अनिकेत : अरे, हे काय... अरे, जे काही झालं ते समजायला फार अवघड नाही... इथं ते पूर्वीच्या सिनेमांतले किंवा कादंबऱ्यांमधले नायक क्षुब्ध झाले की फेऱ्या मारायचे, तसे तुम्ही करण्याइतकं तर नाहीच नाही!

अश्विनी : क्षुब्ध आहोतच, पण काळ बदलला आहे. आम्ही त्यामुळे फेऱ्या मारत नाही आहोत. या तुमच्या भानगडीत आमची दिवसाची दहा हजार पावलं चालण्याचं राहून गेलं तर...

अनिकेत : म्हणजे?

रोहिणी : (त्याला हळू आवाजात समजावत) अरे, आजकाल सगळ्यांना दहा हजार पावलं चालावं लागतं दररोज.

अनिकेत : च्यायला, तसा कायदा झालाय? But this is against personal rights, fundamental rights, against constitution! म्हणजे एखाद्याला चालायचं नसलं तर त्याला तो अधिकार असला पाहिजे... No, no... I must tell Prashant Bhushan. तो जाईल कोर्टात.

रोहिणी : ते जाऊ दे आत्ता! कधीतरी तरी priority कशाला द्यायची ते लक्षात घे. सतत असं तात्त्विक काहीतरी, च्यायला... ते मरू दे रे. भीती वाटतीय ना आत्ता? आणि आपल्याला काही आठवतपण नाही, आणि आपल्याजवळचे एकंदरीतच सगळ्यावरचे उपाय संपले आहेत.

अनिकेत : अगदी सगळ्यावरचे उपाय संपले आहेत. पण मग काय करायचं? आत्महत्या करायची का?

रोहिणी : नाही. तीपण वेळ गेली आता... त्याला थोडक्यात काय झालं ते सांग... कदाचित तेच काही मदत करतील. शेवटी मुलं आहेत आपली. (क्षणिक विराम.)

अनिकेत : (दीर्घ श्वास घेत) सांगतो... पण बसलात एका जागी तर बरं होईल... मला जरा सोपं जाईल. (दोघंही मुलं अस्वस्थपणे, पण चालणं थांबवत एका जागी बसतात.)

अनिकेत : झालं काय, की मी एक कथा लिहिली, गंमत म्हणून. ती नाही आवडली काहींना. नेमके 'ते काही' म्हणजे powers that be होते. त्यांनी समिती नेमली युनिव्हर्सिटीत. खरं तर स्टुडंट युनियनपण माझ्या बाजूला होती सुरुवातीला. पण का कोण जाणे, सगळे काही वेळानं गप्प बसले. आणि मग मला आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटचा फोन आला.

अश्विनी : त्या? त्या तर तुमच्याच गटातल्या ना? मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या डाव्या विचारवंत आहेत ना? त्यांनी तर मदतच केली असेल.

रोहिणी : नाही ना. तिथंच तर गोची झाली.

अनिकेत : त्या म्हणाल्या, माफी मागून टाका. लेखी द्या. समितीतले लोक काही बरं बोलत नाहीयेत. शिवाय काही फोन येताहेत; UAPA खाली कारवाई करू म्हणताहेत. लेखी देऊन टाका, मिटवून टाका.

रोहिणी : तरी मी त्याला म्हटलं होतं, काय व्हायचं ते होऊ दे.

अनिकेत : आणि तू होतीस कुठे? तर न्यू यॉर्कमध्ये, एका जंगी पार्टीत! त्याच दिवशी तुझी दोन पेंटिंग्ज मोठ्या किमतीला विकली गेली होती ना तिथं! तुला फोन लावला विचारविनिमय करायला, तर मागे इतका जल्लोष चालला होता की धड ऐकूसुद्धा येत नव्हतं फोनवर.

रोहिणी : त्याच दिवशी झालं सगळं, हा माझाच दोष असल्यासारखा वागतोस तेव्हापासून तू. त्या पैशावर चाललीये मौज retirementनंतर!

अनिकेत : वा! मला pension नाहीये का? आं?

अश्विनी : तुम्हाला केवळ भांडतानाच पाहत आलोय आम्ही लहानपणापासून... आता जरा नीट सांगा लवकर.

अनिकेत : सांगण्यासारखं काही नाही... मी राजीनामा दिला... काय म्हणायचं ते म्हणा. मी एकटा होतो... UAPA वगैरे म्हणजे कित्येक वर्षं... म्हणजे भीती वाटली मला. (विराम. परत घंटेचा टोल आणि गूढ संगीत.)

रोहिणी : There I agree. मी परत आल्यावर पटलं मला. That was the only choice.

कबीर : म्हणजे कोणीच उभं राहिलं नाही तुमच्या पाठी?

अनिकेत : तसं नाही ते... तू नव्हतास इथं. द वायर आणि द इंडियन केबल, कॅराव्हान, अनेक नियतकालिकांनी कव्हर केली स्टोरी. अगदी इंडियन एक्स्प्रेसमध्येसुद्धा आली होती बातमी. माझ्या दोन कलीग्जनी राजीनामे दिले.

कबीर : आणि पुढे?

अनिकेत : ते गेले परदेशी विद्यापीठांत.

कबीर : या सगळ्याला विचारतो कोण आज, हेसुद्धा तुम्हांला जाणवेनासं झालं आहे... सामान्य माणसाला तर काहीच पडलेली नाहीये, आणि इतरही कोणीही ठाम पाठीशी उभं राहिलं म्हणावं, तर तसं पण झालं नाही... म्हणून तर घाबरलात. ते खरं कारण... कोणी आलं होतं का घरी दहशत दाखवत?

अनिकेत : नव्हतं असं. पण हा जो trollingचा शोध लावला आहे ना तुम्ही, तो दहशत निर्माण करण्यासाठी पुरेसा आहे.

कबीर : तेव्हापासून गेली short-term memory?

रोहिणी : हो. भीती वाटते. स्मृती जाते. सोपी गोष्ट. (कबीर आणि अश्विनी परत घड्याळात बघतात आणि चालायला लागतात. त्यामुळे अनिकेत हसायला लागतो.)

कबीर : (चिडून) एवढ्याशानं घाबरायला होतं, तर लिहायची कशाला कथा? आणि आधीपण सामाजिक-राजकीय काही-ना-काही चालायचंच तुमचं. लहानपणापासून पाहतोय मी.

अनिकेत : माझं चूक का बरोबर ते विसर. हे जे काही सामाजिक-राजकीय म्हणतोस ना, त्यात नेहमी फक्त कामगार, दलित वगैरे तर जाऊ दे, अगदी आपल्यापैकी घ्यायचे झाले तर intellectuals, लेखक, कलाकार, असेच लोक कसे असतात रे आजकाल? समाजात असलेल्या इंजिनियरांच्या संख्येच्या प्रमाणात ते नगण्य का असतात रे, तुझ्यासारखे?

कबीर : इंजिनिअर होण्यातच चूक आहे, असं तुमचं वेडगळ म्हणणं दिसतंय मला. असं का होतंय त्यामागचं कारण तुम्हाला कळणार नाही, कारण तुमची short-term memory गेली आहे.

अनिकेत : गुरुजी, आमची short-term गेली हे तर खरंच. ते वाईटच... पण तुमची तर long-term गेली आहे. आमची भीतीनं गेली आहे. भीती गेली तर परत तरी येईल कदाचित. तुमची गेली आहे, कारण तुम्ही इतिहासच बदलता आहात.

अश्विनी : त्यानं काय फरक पडतो?

अनिकेत : फरक पडतो ना... खरं काय, तेच बदलतं. सत्य काय, याच्यावरच एकमत नसलं ना, तर संवाद संपतो... (जरा भावुक होत) आणि बाकी सगळं मरू दे; किती वेगळे होतात तुम्ही लहानपणी! तुमची आधीची शाळा तरी आठवतीये का? पुण्यातली?

अश्विनी : उगाच त्यानं भावुक होऊ नका... आठवते अगदी थोडीथोडी. काय फरक पडतो त्यानं? One must look ahead.

रोहिणी : हेच आपण विसरायला लागलोय अनिकेत... nostalgia वाईट असं घोकत असतानाच we too are stuck in the past असं झालंय का काय, च्यायला?

अनिकेत : थांब गं. सारखा self-criticism नको... दुसऱ्यावर पण चढावं कधीकधी... तर, तुला आठवते का शाळा आधीची?

कबीर : अजिबात नाही. फक्त तुम्ही भांडला होतात कुठल्या शाळेत घालायचं त्यावरून, ते आठवतंय.

रोहिणी : शेवटी घातलं होतं ना एका चांगल्या शाळेत... पण शेवटी हा नोकरी बदलून दिल्लीला आल्यावर तर सगळंच सोडून typical English private शाळेत घालायला लागलं.

अश्विनी : माझी स्मृती पूर्ण गेलेली नाही. तिथंपण परत एकदा शाळा बदललीत. ती का?

अनिकेत : ते पण सांगतो. तू एक कविता लिहिली होतीस तेव्हा. तू लिहिलं होतंस : काल माझ्या गच्चीवर पावसाचं झाड तयार झालं संध्याकाळी ढग आल्यावर; त्यावर एक किरमिजी रंगाचा पक्षी येऊन बसला आणि नाचायला लागला; त्याला बघून मीपण नाचायला लागले.

अश्विनी : My god, what a poem!

रोहिणी : त्या शाळेतले शिक्षक म्हणाले होते, ही काय कविता आहे? ते म्हणाले, पावसाचं झाड नसतं, पक्षी नाचत नाहीत... म्हणून बदलली होती ती शाळापण.

अनिकेत : आणि याला शाळेत विचारलं की तुला मोठं झाल्यावर कोण व्हायचं आहे, तर त्यानं उत्तर दिलं; आनंदी, समाधानी व्हायचं आहे.

कबीर : What humbug! मला मी दिलेलं उत्तर नाही आठवत, पण आईच मला सांगायची की मोठा झालास आणि कोणीही झालास तरी समाधानी राहा. तेच मी सांगितलं असणार... What a stupid answer!

रोहिणी : मग आता कशाला आला आहेस मनःस्वास्थ्य मिळवायला? आं?

कबीर : तिथंच गोंधळ घातलात ना तुम्ही आयुष्यभर... मनःस्वास्थ्य तांत्रिक गोष्टी करून मिळवता येतं. कविता तर आता AIच करणारे याच्यापुढे... त्यानं मिळत नाहीत ते पैसे आणि सुख! मी IIT आणि अमेरिकेत आयव्ही लीग युनिव्हर्सिटीतून मेरिटमध्ये पास झालो, लगोलग गूगलमध्ये नोकरीला लागलो, त्याचं कौतुक नाही तुम्हांला! हिनं अहमदाबादहून IIM केलं, त्याचं कौतुक नाही! आणि एवढंच होतं आधीच्या शाळेचं, तर कशाला बदललीत शाळा? कारण तुम्हाला चांगली नोकरी हवी होती म्हणून!

अश्विनी : ते सुद्धा मी मान्य करीन, पण आमच्यावर का ढकलता सगळं? तुम्हांला आवडते तशी एकमेव शाळा उरली भारतात, उरलेल्या साध्या शाळा वाईट झाल्या; हे कोणी केलं? तुमच्याच पिढीनं ना?

कबीर : आणि तुम्ही आधी घातलं होतंत त्या शाळेतली मुलं भेटतात ना अधूनमधून आता... मी ओळखत नाही त्यांना, पण ते ओळखतात. साल्यांची long-term memory चांगली असते, एवढं मान्य केलं पाहिजे. पण तेवढंच ते. काय करत असतात सगळे? कोणी पुण्यातच राहून फिल्म बनवण्याच्या प्रयत्नात असतं, कोणी documentary, कोणी न विकली जाणारी चित्रं काढत असतात, कोणी NGOमध्ये एकाच जागी सडत असतात, नाही तर कंटाळून NGO बदलत असतात, त्याही परदेशी पैशांवर चालणाऱ्या; काही जण आईवडिलांच्या नावावर कुठल्यातरी think tank नामक भ्रामक वास्तवात नांदत असतात, नाहीतर मराठी नियतकालिकांचे स्थानिक पत्रकार म्हणून आईवडिलांच्या पैशांवरच जगत असतात... कोणी इंजिनिअर होत नाही, डॉक्टर नाही, UPSC देऊन सेक्रेटरी नाही... जमिनीवर काम करणारा कोणी नाही... आणि तुम्ही तरी काय करता? वाचत बसता आणि मग कुठल्या तरी चळवळीला पाठिंबा देता.

अश्विनी : That is right. तू एवढ्या चळवळींना पाठिंबा देतेस, पण ते काय ते, तुमच्या पार्टीत मेंबर होण्याला कार्ड होल्डर असं काहीतरी म्हणतात; ते झाली नाहीस कधीच.

रोहिणी : त्याचं कारण सोपं आहे... अनेक आहेत असे आमच्यासारखे. आम्हांला आमचं स्वातंत्र्य जपायचं होतं आणि असतं.

अनिकेत : Yes... स्वातंत्र्य जपायचं, शिस्तीत अडकायचं नाही... त्यातूनच काही...

कबीर : नाही... स्वातंत्र्यातून तडजोड करण्याची प्रवृत्ती वाढते.

अनिकेत : (खरोखरच आश्चर्यचकित) च्यायला... He is talking sense! म्हणजे इतकी वर्षं राज्यशास्त्राचा अभ्यास करून हे नव्हतं लक्षात आलं! खरंच... आपण compromises केले ते याच स्वातंत्र्याच्या नावाखाली!

कबीर : What humbug! शिस्तीलाच महत्त्व असतं... शिस्त पाळत सीमेवर सैनिक मरताहेत आपले, आणि तुम्ही काय करता, तर वाचत बसता. बघू बरं, काय वाचताय सध्या... (बाजूला पसरलेल्या पुस्तकांपैकी काही गोळा करत) अं... भिखू पारेखच्या, जहानबेगलूनं घेतलेल्या दीर्घ इंटरव्ह्यूचं पुस्तक, आणि राजीव भार्गवचं Reimagining Indian Secularism; शिवाय रिचर्ड पोझनरचं A Failure of Capitalism... आणि Houellebecq, हे फ्रेंच वाटतायत नावावरून, शाळेत होती मला फ्रेंच; तर त्यांची Annihilation नावाची कादंबरी... यानंच बदललं जग आणि झालं असं. Congrats!

अनिकेत : (हसत) जग नाही बदललं... हं... पण हे कोणीच तुम्हांला माहिती नसले तरी मेघनाद देसाई, तो पांढरे केसवाला प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि ब्रिटिश लॉर्ड, बऱ्याचदा TVवर असायचा तो, तो तुम्हांला नक्की माहीत असेल. त्यानं लिहिलेलं दिलीपकुमारवरचं पुस्तकपण आहे बघ तिथे, आणि ते पण आम्ही वाचलं!

अश्विनी : Oh, my! दिलीपकुमार... सहा महिन्यांपूर्वी एकदा पहाटे मला झोप येत नव्हती, तर असंच यूट्यूबवर गेलेली असताना त्याचं गाणं ऐकलं मी... What a great song! (गायला लागते.)

[मूळ मजकुरातल्या हिंदी गाण्याच्या चार ओळी इथे तशाच ठेवाव्यात.]

होऽऽ उडे जब जब जुल्फे तेरी

होऽऽ उडे जब जब जुल्फे तेरी

कुंवारियोंका दिल मचले

कुंवारियोंका दिल मचले जिंद मेरिये

मी सांगते, हिरोच्या शरीरावर भाळून हिरॉईननं म्हटलेलं एकमेव गाणं असेल हे. नाहीतर सगळ्या हिरॉईन्स हसीन आणि हिरो जवाँ, साले! त्याचे सगळे सिनेमे पाहिले असतील मी गेल्या सहा महिन्यांत: नया दौर, अंदाज, आरजू, देवदास, मधुमती... काय दिसायचा साला दिलीपकुमार! मला भयंकर आवडायला लागलाय तो! What looks and what expressions! खरा tragedy king!

रोहिणी : तुला दिलीपकुमार आवडतो!? This is unbelievable.

अनिकेत : Absolutely unbelievable.

कबीर : बोंब दिसणं आणि expressions, च्यायला! सगळे बोदले साले हिरो आणि हिरॉईनी तेव्हाच्या... ही एवढी पोटं आणि कुल्ले. माणूस उभा आहे का तंबोरा, तेच कळायचं नाही. आता बघा, शाहरुख, सलमान, अक्षयकुमार... साठीला आले तरी सिक्स पॅक्स जात नाहीत; आणि बघा दीपिका आणि आलिया, पोरं झाली तरी काय टुकटुकीत! आणि शिवाय जिंकतात ते शेवटी; ट्रॅजिडी किंग वगैरे भंकस नाहीये आता, जिंकण्याचा जमाना आहे आता या देशात!

अश्विनी : नाही... दिलीप was an exception. मी काहीही ऐकूनच घेणार नाही त्याच्याविरुद्ध.

कबीर : There is no comparison with Shahrukh and Dipika... No म्हणजे no.

रोहिणी : अरेरे, किती रे obsolete तुम्ही! दिलीप तर जाऊच द्या, शाहरुख आणि दीपिका...

अनिकेत : अरेरे, खरंच किती जुनाट इतिहासात अडकलेले आहात रे तुम्ही! You are ancient! आताचा जमाना आहे शायना कपूर, आहान पांडे... नावं तरी ऐकलीयेत का? सैयारा पाहिलात का त्याचा?

अश्विनी : च्यायला, तुम्ही पाहिलात सैयारा?

रोहिणी : तर! असे सगळे सिनेमे बघतो आम्ही... They are good as socio-political indicators. We are in tune with the times, dear ones! अगदी पुस्तकं वाचतो ना, तेवढेच महत्त्वाचे असतात ते.

कबीर : मुळात पुस्तकांनाच काही अर्थ नसतो. बाद केली पाहिजेत साली पुस्तकं कॉलेज संपल्यावर!

अश्विनी : ए, असं नाही हं अगदीच. पुस्तकानं जग बदलतं. मी दर महिन्याला चार कपडे आणि एक पुस्तक घेतेच विकत. मार्क्सचं The Capital नावाचं पुस्तक...

अनिकेत : च्यायला! तू वाचलं आहेस मार्क्सचं तीन खंडांचं दास कॅपिटल! This is म्हणजे thrilling!

अश्विनी : नाही, ते नाही. त्याबद्दलचं छोटं पुस्तक विकत घेतलंय पण मी. वाचलं नाहीये अजून. वेळ होत नाही ना. सगळीच पुस्तकं वाचणार आहे मी एकदा.

कबीर : ते मरू दे. निरुपयोगी आहेत ही असली पुस्तकं.

रोहिणी : आणि आम्ही निरुपयोगी वाचतो, तसंच चित्रंही काढतो रे तशीच; बाहेरच्या जगात भारतातली गरिबी विकणारी... सगळं चुकलंच आमचं. आमची दिशाच चुकली. म्हणून तर तुम्ही पूर्ण बदलताय ना ती... एका दिशेला चाललं होतं गेली कित्येक शतकं... चुकतमाकत, रडतरखडत, कधीकधी तर खोटारडेपणा करत, लढाया करत का असेना; पण नव्या विचारांसाठी दारं खुली ठेवत; स्वातंत्र्य, समानता आणणारी आणि भविष्यात बघणारी दिशा होती ती. ती दिशाच बदलून 'योग्य' मार्गावर आणताय. मागे बघणारी, इतिहासात जाऊ पाहणारी करताय, आणि तेही इतिहास बदलून... म्हणून तरी तुमची स्मृती जातीये ना... चांगलं आहे.

अश्विनी : त्यात काही नाही; बदल झाला. नऊवारी साडी नेसणाऱ्या आयांच्या मुली पाचवारीत आल्या, पाचवारीवाल्यांच्या मुली सलवार-कमीज घालायला लागल्या, सलवार-कमीजवाल्यांच्या जीन्समध्ये गेल्या, आणि आता जीन्सवाल्यांच्या, माझ्यासारख्या आणि याच्या बायकोसारख्यांच्या मुली shorts आणि क्रॉप टॉपमध्ये आल्यात. चालूचे की ते.

कबीर : माझी बायको पण नेहमीच shorts आणि क्रॉप टॉप घालते... आणि... आणि एवढंच नाही, तर ते घालून अमेरिकेत वडाची झाडं नाहीत म्हणून लॅपटॉपवर वडाची इमेज डाऊनलोड करून त्याला वटपौर्णिमेच्या दिवशी फेऱ्या घालते! आणि त्याचा व्हिडिओ अपलोड करते; त्याला लाखो लाईक्स आले तिला! बघा जरा, कुठं चाललंय जग, आणि तुम्ही...

अनिकेत : And the biggest irony is, shorts घालून हे करणं आणि बुरखा घालणं यात फरकच नाहीये, हेच तुमच्या लक्षात येत नाही! कपड्यांतले फरक ही वरवरची गोष्ट... ती करता, पण खोलवर उलटं करता ना सगळं!

कबीर : (रागावून) बुरखा! What do you mean? आं? आणि तसं असलं तरी problem काय आहे? तुम्हीच म्हणता ना, ज्यांना बुरखा घालायचा असेल त्यांना तो अधिकार आहे. बुर्किनी घालून पोहा... म्हणजे अधिकार परत फक्त 'त्यांना'च?

अनिकेत : तो फार complex विषय आहे.

कबीर : काही complex-bimplex नसतं काही. तुम्ही केलंय ते सगळं तसं. उत्तरं नसलेले प्रश्न विचारून... आमच्याकडे आहेत सगळ्याला उत्तरं, आणि ज्यांना उत्तरं असतील असेच प्रश्न विचारतो आम्ही... सोपं असतं सगळं... आमच्याकडे बघा, तसे व्हा. Simple!

अश्विनी : ए... तसं नाहीये ते... म्हणजे complex झाल्यात काही गोष्टी खरंच. मी कधीच करणार नाही तुझ्या बायकोसारखं. मी फक्त shorts घालणार आणि मी लग्नच करणार नाहीये... फार तर मी live-in...

कबीर : (चिडला आहे) तुझ्याशी करेल कोण लग्न? ही एवढी जाड झाली आहेस... पहाटे तीन-तीन वाजता घरी येतेस...

अश्विनी : You bastard, misogynist pig! Don't body-shame me... तुझी बायको बघ एकदा... तू नसताना काय दिवे लावत असेल shorts घालून अमेरिकेत, माहितीये का?

कबीर : खोटारडी साली! यांच्यासारखीच!

रोहिणी : (त्यांचं भांडण थांबवत) एक मिनिट, एक मिनिट... भांडू नका परत आपापसांत. आत्ता प्रश्न काय आहे? तुम्ही प्रयत्न काय करताहात? तर आम्हाला वाचवण्याचा!

अनिकेत : Correct. Priority आहे आम्हाला वाचवायचं आणि स्वतःही वाचायचं. (परत घंटेचा टोल. संगीत. वातावरणात गूढ भीती.)

रोहिणी : तेव्हा वाचवा बरं आम्हाला! चला... ते करूनच दाखवा... आत्ताच्या परिस्थितीत आम्ही जे काही केलं, त्यानंतर आम्हाला वाचवूनच दाखवा!

अश्विनी : माझ्या पोटात दुखतंय. संडासाला लागल्यासारखं होतंय, पण...

कबीर : मला पण... पण जाववत नाहीये... त्राण गेल्यासारखं होतंय. का करता तुम्ही असं? का त्रास देता इतका अजून? केलीत ना मजा गेली इतकी वर्षं. बास की आता. आता का त्रास देता? आं?

अनिकेत : यांना फार त्रास देतोय आपण... आत्महत्या करायची का?

रोहिणी : नको. आत्महत्या करण्याचाही एक योग्य क्षण असतो. त्या वेळी ती केली तरच उपयोग होतो.

अनिकेत : मूळ प्रश्न सतावतो सारखा: एकदम सालं सगळं कसं बदललं एका दशकभरात... उलटंच!

अश्विनी : तेच तर म्हणाले मी मगाशी... तुमच्यामुळेच बदललं आणि आता आम्हांला...

रोहिणी : नाही... मूर्खासारखं बोलू नकोस. अवघड होत्या गोष्टी या देशात. जे केलं गेलं, देशात जे स्वातंत्र्य, विविधता काय ठेवली, ते महत्त्वाचं होतं... आज जे काही तुमचं चांगलं झालंय ना, ते आमच्यामुळे. Colonial powers त्याच सुमारास राज्य सोडून गेल्या जगभर. डझनावारी काय, शेकडो देशांतून. त्यांतले फक्त सात देश लोकशाही आहेत आजही; आणि आपण सोडता त्यांतले उरलेले सहा अगदी नखाएवढे आहेत. आणि त्यांनी फक्त लोकशाही नाही गमावलीये, ते अत्यंत वाईट अवस्थेत आहेत सर्वार्थानं. आणि irony म्हणजे हे टिकवणं सर्वात अवघड होतं ते आपल्यासाठी: डझनावारी भाषा, जाती आणि धर्म... काहीही असलं तरी त्या दिशेनं नव्हतो जात आम्ही... आणि आता तर आपल्याकडेही... म्हणजे लोकशाही जी काही आहे ती हुकूमशाहीपेक्षाही जास्तच... (तेवढ्यात परत घंटेचा टोल वाजतो.) आता भीती वाटतीये.

अनिकेत : मग आता? भीती तर वाटतीये... काय करू या? थोडं ड्रिंक घेऊया?

अश्विनी : चालेल.

कबीर : अश्विनी, तूपण! अगं, तुझ्यापण लक्षात येत नाही का... भीती वाटतीये मला आता फारच... मलापण संडासला लागल्याची भावना व्हायला लागलीये आणि मला सवय नाहीये त्याची. मला सतत खरं तर constipation असतं. I can't take this anymore! (तेवढ्यात बेल वाजते. अश्विनी दार उघडते. एक अत्यंत उत्साही आणि आक्रमक तरुण पुरुष, अंगात काळे कपडे, अंगावर बाकी कुठल्याही अस्मितेचं प्रतीक नसावं; पण हातात काठी/दंड, दोर, बेड्या इत्यादी घेऊन आत येतो. त्याच्याबरोबर तितकीच उत्साही आणि तोंडभर स्मित करत असलेली एक स्त्री-पोलीस. ते येऊन खोलीतल्या सर्वात चांगल्या जागी सहज अधिकारवृत्तीने बसतात. उरलेले उभे. हे दोघे काहीही न बोलता चौघांकडे हसत बघतात. तणाव.)

कबीर : (भेदरलेल्या आवाजात) तुम्ही... म्हणजे तुम्हीच ते संस्कृतिरक्षक...

पुरुष: असं आम्हांला पूर्वी म्हणावं लागायचं.

कबीर : पण मग कुठल्या बाजूचे? म्हणजे तुमच्या अंगावर कुठलीच तशी खूण नाहीये... ना टिळा, ना टोपी, ना गंध, ना दाढी, ना कुठल्या रंगाचे कपडे!

पुरुष: अरे अरे... किती कालबाह्य आहेस रे तू! तुझी long-term memory पुरेशी गेलेली नाही अजून. अजून तुझ्या डोक्यातला तो इतिहास पुसला गेलेला नाही. मुला, ते संपलं आता. आता जगातल्या प्रत्येक प्रदेशात एकच संस्कृती मानली जात असल्यानं अशा चिन्हांची, प्रतीकांची आवश्यकताच नाही. आता त्या सगळ्यांतून मुक्तता! आता खरा सेक्युलॅरिझम अवतरला आहे जगात!

अश्विनी : आणि तुम्ही पोलीस... यांच्याबरोबर...

स्त्री: आम्हांला गणवेश आवश्यक आहे, कारण नाही तर यांच्यातला आणि आमच्यामधला फरक कळणार कसा? मी पोलीस हवालदार, बिल्ला क्रमांक २०१४. (नाटकाच्या संहितेत यापुढे पुरुषाला 'रक्षक' आणि स्त्रीला 'पोलीस' असे संबोधण्यात येईल. यापुढच्या भागात मध्येमध्ये या दोघांना फोन येतात. ते घेतात. ऐकतात. काहीही न बोलता मान डोलावतात. त्या वेळी जे काही चालू असते ते अचानक थांबते आणि जणू काहीच झाले नाही अशा प्रकारे पुढे चालू होते.)

रक्षक : आता आम्ही भावनारक्षक म्हणून जगभरात ओळखले जातो, आणि आमचं काम आहे कायद्याचं रक्षण करणं.

पोलिस : आणि आमचं काम आहे भावनांचं रक्षण करणं.

रोहिणी : This is great! कायदा आणि भावना या एकाच नाण्याच्या दोन बाजू!

अनिकेत : अरेरे! हे नवं राज्यशास्त्र शिकवायला मिळणार नाही मला कधीच. पोटात कळमळतंय.

रक्षक : आम्हांला तर भूक लागलीये.

पोलिस : खूप भूक... कशी आणि कशानं भागणार कळत नाही.

कबीर : पिझ्झा मागवू?

रक्षक : चालेल. चीज बर्स्ट मागवा.

पोलिस : आणि पिझ्झा व्हेजिटेरियन हवा.

रक्षक : त्यात crisp capsicum, jalapeno, pickled onions, paneer, spicy red paprika, green olives असतील असा बघा.

पोलिस : थांबा, ते spicy red paprika नको. त्यानं ॲसिडिटी होते आजकाल. अजून काय choices आहेत, बघा जरा.

अश्विनी : (काळजी भरल्या आवाजात) अरेरे, पण ताई, jalapeno पण तिखट असतं... दुसरं काही?

रक्षक : असेल, पण ते आता भारतात बनतं. तेव्हा ते पाहिजे. देशासाठी तेवढं केलं पाहिजे.

पोलिस : Let us celebrate today.

रोहिणी : काय करायचं celebrate? काहीच तर झालेलं नाही तसं.

रक्षक : होणार आहे... लोकशाहीच्या कृतीचा आविष्कार!

रोहिणी : म्हणजे?

पोलिस : कळेलच थोड्या वेळात. अधीर होऊ नका. सगळं वेळच्या वेळी करायचा आमचा प्रघात आहे. आमची वेळ येईपर्यंत आम्ही शांतपणे दबा धरून वाट पाहतो, हा इतिहास आहे.

रक्षक : आणि आता ती वेळ जवळ आलेली आहे... पण आधी पिझ्झा order करा. आता भूक सहन होत नाही. (कबीर आणि अश्विनी दोघे घाबरलेल्या अवस्थेत एकत्रितपणे मोबाईलवरून पिझ्झा order करतात.)

कबीर : Your order is being prepared. चौतीस मिनिटांत येईल. (तणावपूर्ण दीर्घ विराम. चौघे भेदरलेले. पोलीस आणि रक्षक मंद स्मित करत इकडेतिकडे बघतात. आरामात. वेळ घेत.)

रक्षक : Good... हं... बसा... बसा... आता कामाला लागू. (उरलेले चौघे अवघडलेपणानं बसतात.)

पोलिस : काल रात्री तुम्ही एक पोस्ट केली होतीत?

अनिकेत : असं आमची मुलंही म्हणत होती. पण आम्हांला आठवत नाही. आमची short-term memory गेलेली आहे.

रक्षक : ते आम्हांला ठाऊक आहे. तुमची फाइल आधीच बरीच जाड होती... तुमच्या राजीनाम्याआधीही अनेक आंदोलनांना तुम्ही पाठिंबा दिला होतात, तेव्हापासूनच जाड होत चालली होती; पण या पोस्टमुळे ती अगदी फाटेपर्यंत जाड झाली आहे.

पोलिस : (कळकळीनं) एवढं ताणू नये हो.

रक्षक : तर थोडक्यात सांगतो. वेळ दवडायला नको. तुम्ही एक पोस्ट केली होतीत. ती मान्य होण्यासारखी नाही. त्याबाबत माफी मागा आणि त्यातली विधानं नाकारा. प्रश्न सुटेल.

रोहिणी : अहो, पण ती होती तरी काय? मघापासून आमच्या मुलांना विचारतो आहोत; तेही सांगत नाहीत.

पोलिस : त्यावर बंदी घातली असल्यामुळे ती काय होती हे उघडपणे सांगता येणार नाही.

अनिकेत : पण ती viral झाली आहे ना? उघडपणे सगळीकडे फिरते आहे ना?

रक्षक : ते आमच्या हातात नाही. आणि असलं तरी ते आम्ही थांबवणारही नाही. ती viral होणं आणि त्यावर क्रुद्ध होत react होण्याचं स्वातंत्र्य लोकांना असणं, हे लोकशाहीसाठी पोषक आहे.

रोहिणी : ते पोषक आहे हे चांगलं आहे, पण आम्हांला ती दिसत नाही. आमचीच पोस्टही दिसत नाही. कालच तर केली म्हणता ना, तीही उशीरानं.

पोलिस : ती उडवली सरकारी यंत्रणेनं काही क्षणांत. लोकशाही आहे आजची... efficient आहे प्रचंड... काम करते!

अनिकेत : अहो, पण मी पन्नासवेळा विचारलं की ती पोस्ट काय होती ते तरी सांगा. सरकारनं आमच्या पोस्ट तर उडवल्या आहेतच, पण आमची अकाऊंटंही बंद केल्यानं इतर कुठूनही ती पोस्ट काय होती ते कळण्याची शक्यता नाही.

रक्षक : मीपण कितव्यांदा सांगू? त्यावर कायद्यानं बंदी आणली गेली असल्यानं त्या काय होत्या हे सांगता येणार नाही.

रोहिणी : आम्हीच केली होती ती असं म्हणता ना? आम्हीच काय केलं ते आम्हांलाच सांगता येणार नाही?

रक्षक : तो आमचा दोष नाही... कायदा म्हणजे कायदा. तो आजही आंधळाच असतो. तेव्हा उपाय एकच आहे: बिनशर्त माफी मागा, त्यात जे लिहिलं होतंत ते नाकारा; मग ते काय होतं ते सांगता येईल कदाचित.

रोहिणी : ही चर्चा मुलांबरोबर एकदा झाली आहे... परत सांगते: जे माहीतच नाही ते कसं नाकारायचं?

पोलिस : त्यात काय आहे? "मला ते माहीत नाही, त्यामुळे मी ते नाकारते" असं म्हणायचं. बास.

अनिकेत : अहो, असं करता येईल?

रक्षक : त्यात काय मोठंय? तुमचा विश्वास नाही अशा कितीतरी गोष्टी नाकारता की तुम्ही... आता त्या कुठल्या याची उगाच नावं घेत नाही, पण आपला विश्वास नसला की नकार द्यायचा, हे करतच आला आहात तुम्ही.

रोहिणी : आहे, पण ते पटलं पाहिजे ना आत्ताच्या लोकांना! त्यांना आमचं बहुतेक सारं पटत नाही आजकाल.

पोलिस : पटेल. त्यांनाही माहीतच नसलेला इतिहास बदलला, तरी त्यांना पटतंच की नाही? मग?... चला, करून टाका.

अनिकेत : नाही, नाही. अगदी illogical आहे ते.

रक्षक : तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुमचा! तुम्ही विचारांच्या अंगानं हे करता येणार नाही म्हणताय.

रोहिणी : म्हणजे?

रक्षक : म्हणजे असं, की कायद्याच्या अंगानं पाहिलं तर काही नव्या कायद्यांमध्ये असं करणं अगदी चपखल बसतं, आणि उलट तसं केलं नाही तर मोठी शिक्षा होऊ शकते. त्याचंच तर रक्षण करतो ना आम्ही.

पोलिस : आणि भावनांना तर ते अगदीच मान्य आहे. (क्षणिक विराम.)

अश्विनी : (मध्ये येते; कबीर तिला अडवायचा प्रयत्न करतो, त्याचा हात झटकत) अहो, पण त्या पोस्टमध्ये काय होतं ते सगळं नाही, तरी निदान काही clueतर द्याल की नाही त्यांना? का मी सांगू? थोडा clueतर द्या... त्यामुळे पोस्टमध्ये problem काय आहे त्याचा काही थोडा अंदाज तर येईल ना. ऐकतील ते.

रक्षक : असं म्हणताय? ते करता येईल... अगदी कायद्यांतही ती पळवाट आहे... त्या पोस्टमध्ये फार, म्हणजे फार विचार आहेत. इतक्या छोट्या जागेत इतके विचार कोंबून भरले आहेत की विचारता सोय नाही!

अनिकेत : पण त्यानं problem काय झाला?

रक्षक : अहो, एवढ्या मोठ्या प्रमाणात विचार आले की गोंधळ उडतो. झोप उडते माणसांची. तुम्ही स्वतः झोपत नाही आणि रात्री उशीराने अशा पोस्ट करत बसता, आणि उरलेल्यांना झोपू देत नाही.

पोलिस : लोकशाही ही गोष्ट लोकं कोणावर विश्वास ठेवतात त्याच्यावर अवलंबून आहे, आणि हा विश्वास भावनांना आवाहन करून सहजपणे निर्माण करता येतो. पण जास्त विचार वगैरे केला ना, तर त्याला तडा जातो. तुम्ही फक्त स्वतः विचार करून थांबत नाही, तर इतरांना विचार करायला उद्युक्त करता. नाही नाही ती ध्येयं त्यांच्यासमोर ठेवता. त्यांना त्यांच्या स्थितीचं भान आणवून देता. त्यानं ते अस्वस्थ होतात. त्यांना असा त्रास देणं योग्य नव्हे. तुम्ही लोकशाहीसाठी धोकादायक आहात आणि आम्हांला लोकशाहीचं रक्षण करायचं आहे.

अनिकेत : अहो... म्हणजे तुम्ही स्वतःच किती विचार करता!

रोहिणी : I admire you.

रक्षक : हे तुम्हांला आता कळतंय. अजून बऱ्याच गोष्टी कळलेल्या नाहीयेत तुम्हांला, आणि म्हणून तुम्ही चाट होता. अहो, प्रश्न कोणी विचार करायचा आणि कोणी नाही करायचा हा आहे. सगळ्यांवर हा भार असू नये.

पोलिस : पण तोही problem उरलेला नाही आता. कालक्रमात त्यावर इलाज आपोआपच तयार होतो. त्यासाठी वाट बघावी लागते. आणि आमच्याकडे फार patience आहे, हे तर तुम्ही जाणताच. थांबलो आम्ही विंगेत इतकी वर्षं... बऱ्याच गोष्टी होण्याची वाट पाहत.

रक्षक : त्यांतली एक गोष्ट अशी, की हळूहळू विचार जास्त भयंकर होत जातात; मग सत्य काय त्याबाबत उगाचच चर्चा उद्भवते. आपसांतच छान भांडणं व्हायला लागतात.

अनिकेत : आपण आता भांडायचं नाही... ठरवलंय आपण.

रोहिणी : अगदी नाही भांडायचं.

रक्षक : ते झालं व्यक्तिगत, आणि तेसुद्धा तुम्हांला जमणार नाही. Believe me. कारण इतक्या विचारांतून मग ‘सत्यं अनेक असतात’ असे भयानक निष्कर्ष उद्भवतात. त्यांतून वाट काढायची म्हणजे गोंधळ उडतो ना सामान्य माणसांचा.

पोलिस : मग भावना भडकणार नाहीत तर काय होणार? समाजातली एकसंधता जाते, समरसता जाते.

रक्षक : लोकशाही धोक्यात येते.

पोलिस : आणि अगदी विचारांच्या अंगानं पाहिलं तरी असं करणं अतार्किकच आहे. मुळात तुम्हीच ‘विचारस्वातंत्र्य हवं’ असं कंठशोष करून लोकांना पटवता. आणि त्यांनी हे स्वातंत्र्य वापरूनच गुंगीत जायचं ठरवलं, कोणी त्यांना हाताला धरून नेऊ लागलं तर डोळे मिटून त्याच्या मागे जायचं असं स्वातंत्र्य त्यांनी घेतलं, तर त्यावर प्रश्न विचारायचा तुम्हाला काय अधिकार?

पोलिस : (त्याचं वाक्य अर्ध्यात तोडत) दुसरी गोष्ट अशी, की तुमचे हे विचार व्यवहारात आणायचे झाले की compromises करावेच लागतात. Ground level politics is all about compromises.

रक्षक : काय आहे, की तुम्ही corrupt होत जाता.

पोलिस : आणि त्याचं कारण असं आहे, की तुम्हीच corrupt होऊ शकता. एवढे विचार जे करतात ना, तेच corrupt होऊ शकतात. कारण मग उक्ती आणि कृती यांत फरक पडतो. आम्ही मुळात कोणी विचारच करू नये हेच सांगतो. त्यानं सगळं corruption बादच होतं!

अनिकेत : I agree. च्यायला, तात्त्विकदृष्ट्या हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. यांनीच शिकवायला पाहिजे राज्यशास्त्र विद्यापीठात. Theory पक्की आहे यांची!

रक्षक : ते करतोच आहोत की आता आम्ही... सगळं येतच आहे ताब्यात आता.

पोलिस : ते कळत नाहीये तुम्हांला... पण तो मुद्दा वेगळा. आम्ही फोकस सुटू देणार नाही... आधी काही प्रश्नांची उत्तरं द्या. (ते पटापट त्या दोघांचे हात मागे बांधतात. परत दीर्घ विराम. रक्षक आणि पोलीस फोनवर बोलतात. फाइली उघडतात. इतर चौघे एकमेकांकडे बघत तणावात.)

कबीर : जरा म्हणजे... काहीतरी जुळवता आलं तर बघा.

पोलिस : म्हणजे?

कबीर : म्हणजे तसे म्हातारे आहेत हो ते... काळ बदललाय हे उमगत नाही त्यांना... काही मिटवता आलं तर...

रक्षक : नाही. याबाबतीत तडजोड, भ्रष्टाचार अजिबात नाही. ही फार खोलातली बाब आहे. इथे थेट सत्तेलाच आव्हान आहे आणि त्याबाबत फार दक्ष असावं लागतं, हे तुम्हीही मान्य कराल. बाकी काही असतं तर गोष्ट वेगळी होती. आम्हीच सुचवलं असतं मग तुम्हाला...

पोलिस : हां... तर आधी काही साधे प्रश्न विचारते... तुम्हाला veg आवडतं का non-veg आवडतं?

अनिकेत : हा काय प्रश्न आहे? हात बांधता मागे आणि हे असे प्रश्न विचारता? तुम्हाला आमच्यावर urban naxal म्हणून कारवाई करायची आहे, का आमच्याशी लग्न करायचं आहे? हे काय प्रश्न?

अश्विनी : बाबा... उत्तर द्या! म्हणा, veg. थोडा वेळ घ्या जरा सबुरीनं.

रक्षक : Good. असं आहे, की भावना आणि कायदा एकत्र आले की आवडीनिवडी महत्त्वाच्या होतात ना. कोण काय खातं, काय वाचतं, काय बघतं ते महत्त्वाचं होतं... तर दुसरा प्रश्न, सिनेमे कुठले बघता? फक्त ते फेस्टिवलवाले बघता का इतरपण बघता?

कबीर : अहो, सगळे बघतात ते! अगदी सैयारासुद्धा...

रक्षक : (त्याला मध्ये अडवत आणि जोरात) त्यांना बोलू देणार, का तुम्हाला report करू? मग ते व्हिसा वगैरे बघा काय ते! (कबीर अंग चोरून बसतो. परत दीर्घ विराम. परत फोन येतात. रक्षक आणि पोलीस मान डोलावतात. चौघे अजून तणावात.)

पोलिस : हं, तर बोला. सिनेमे कुठले? मराठी आणि हिंदीपण बघता का फक्त इंग्रजी?

रोहिणी : सगळे बघतो. मराठीत म्हणाल तर 'दशावतार' पाहिला. झालंच तर 'असंभव', 'सावरबोंड' आणि अगदी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'सुद्धा पाहिला.

अनिकेत : आणि हिंदीत 'सैयारा' आणि 'जवान'.

रक्षक : विश्वास बसत नाही. काय खरं ते सांगा.

अश्विनी : अहो, ते खरंच बघतात. त्यांना त्यांतून socio-political analysis...

पोलिस : तरीच!

रक्षक : कठीण आहे तुमचं! (हसतो.) पिझ्झा तरी निखळ आनंदासाठी खाता का socio-political कारणांसाठी? आं? अहो, असावं जरा मनोरंजन वगैरे आयुष्यात; गुंगी फक्त विचारांची नसावी! Relax! (तेवढ्यात अश्विनीला फोन येतो. तो पिझ्झाच्या हॉटेलमधून आहे. त्यावर ती काही बोलणार, तेवढ्यात रक्षक म्हणतो…)

रक्षक : कोणाचा?

अश्विनी : पिझ्झाच्या...

पोलिस : Speaker mode लावा.

फोनवरचा आवाज: Hello. We are so sorry. तुम्ही जी toppings मागितली ना, त्यांच्यापैकी pickled onions आज उपलब्ध नाहीत. Please choose something else.

रक्षक : मी कोण बोलतोय लक्षात आलं का? आजकाल असतो आम्ही सगळीकडे. लक्षात यायला हरकत नाही. Pickled onions नाहीयेत, का कांदे महाग झालेत नेहमीप्रमाणे म्हणून टाळताय? आं? पाठवू का कोणाला?

अश्विनी : कुठे? कांद्याचे भाव स्वस्त करायला?

रक्षक : Shut up! पाठवू का?

फोनवरचा आवाज: Oh no, Sir! तुम्ही आहात तिथं हे माहीत नव्हतं ना आम्हांला. Sorry. Pickled onions it will be!

अश्विनी : हां... ही खरी आजची efficiency! कमाल आहे... हां, झालं मनासारखं? आता करा खेळ चालू. तुम्ही आहात म्हटल्यावर पिझ्झा येईलही लवकर!

पोलिस : (तिच्याकडे दुर्लक्ष करत) खेळूच या खेळ... हां... काय... जरा हिच्यासारख्या तरुण मुलीला कळू द्या काय चाललंय, आणि त्यात कसं आईवडिलांसारखं नाही तर या मुलासारखं नीट वागायचं ते. गंमत वाटतीये तिला. काय? आता जरा पुढच्या टप्प्यावर जाऊ या.

रक्षक : कायदा काय म्हणतो माहीत आहे का? कायदा म्हणतो, की गुन्हेगाराला सगळं नीट कळलं पाहिजे. तेव्हा ते कळण्यासाठी आपण एक छोटा खेळ खेळू या. (परत दीर्घ विराम. त्यांचे बांधलेले हात नीट बांधले गेले आहेत ना, ते तपासतात.)

पोलिस : हं... आता जरा पुढे जाऊ या. आता आम्ही एखादा शब्द किंवा वाक्य उच्चारू, आणि ते उच्चारलं की लगोलग तुमच्या मनात आलेला शब्द सांगायचा. अगदी सायकॉलॉजी नावाच्या सायन्सनं मान्य केलेला खेळ आहे हा. यातून खेळणाऱ्याला आणि ते बघणाऱ्याला, दोघांनाही लपलेल्या अनेक गोष्टी उघड होतात. आपले गुन्हे आपल्यालाच कळतात. चला, चालू करू.

रक्षक : लोकशाहीला सार्वत्रिक मान्यता. (विराम. या प्रश्नांना ते स्वतः उत्तरे देतील, किंवा वेगळ्याच आवाजात voice over असेल आणि यांच्यावर फक्त उजेड, तेही आश्चर्यचकित; तर काही वेळा react करत बोलतातही.)

पोलिस : अहो, यावर तत्क्षणी उत्तर अभिप्रेत आहे...

रक्षक : परत चालू करू. लोकशाहीला सार्वत्रिक मान्यता.

अनिकेत : जोपर्यंत ती इस्लामिक किंवा हिंदू मूलतत्त्ववाद्यांना त्या मार्गानं सत्तेवर आणत नाही तोपर्यंत.

पोलिस : Good. भारत आणि इराणला, आणि तशाच इतर देशांना, अणुबॉम्ब बनवण्याला मनाई.

रोहिणी : इस्राएल सोडता.

रक्षक : चीनमधल्या आणि काही प्रमाणात भारतातल्याही मानवी अधिकारांच्या उल्लंघनाला विरोध.

रोहिणी : सौदी अरेबियाबाबत मौन.

पोलिस : सर्वधर्मसमभाव आणि उच्चारस्वातंत्र्य.

अनिकेत : सलमान रश्दी आणि पेरुमल मुरुगन. (तेवढ्यात अश्विनीला फोन येतो. आता तो पिझ्झा पोचवणाऱ्या मुलाचा आहे. ती स्वतःच फोन speaker modeवर लावते.)

फोनवरचा आवाज : (उत्तम convent accentमध्ये) Hello? May I know where you stay? I am not able to find it!

रक्षक : च्यायला, accent बघा!

अश्विनी : झालीये प्रगती आपल्याकडे गेल्या काही वर्षांत हो! I agree. बरोबर आहे तुमचं.

पोलिस : काय म्हणणं आहे तुमचं? आं? जास्तच बोलायला लागली ही तर!

अश्विनी : अहो नाही हो... मी फक्त विनोद म्हणजे...

रक्षक : विनोद नाही पाहिजे. Serious व्हायला शिका. देशाचा प्रश्न आहे.

फोनवरचा आवाज : Hello. I am so sorry. I am only asking for address, location. I know it's in India, but...

रक्षक : ए भाड्या, मराठीत बोल. मी कोण बोलतोय लक्षात आलं का?

अश्विनी : हां... आता कसं! Seriousness आला आता. भाषाच...

रक्षक : Shut up!

फोनवरचा आवाज : Oh... कळलं... कळलं. पण location, sir... (अश्विनी location पाठवू पाहते, तिला थांबवत पोलीस कबीरकडे पाहतो. कबीर घाईघाईने फोन घेत location पाठवतो.)

अश्विनी : हां... झालं समाधान? अहो, मी चुकीचं location पाठवणार नव्हते. आपल्याला सगळ्यांनाच खायचाय ना pizza. समरसता आहे आपल्यांत! त्यांचे हात तेवढे...

रक्षक : (तिच्याकडे लक्ष न देत) हात बांधलेले राहणं हा खेळाचा भाग आहे. त्यानं पेशंटला concentrate करायला मदत होते. जुनं शास्त्र आहे हे आपल्याकडचं... हां, तर पुढचा प्रश्न, धर्म आणि स्त्रीस्वातंत्र्य.

रोहिणी : शहाबानो.

पोलिस : समता.

अनिकेत : समरसता, आणि एकंदरीनेच ‘reservation दिलं की बास!’ अशा क्लृप्त्यांनी जिला हायजॅक केलं आहे अशी गोष्ट.

रक्षक : एकंदरीतच आजकाल अस्वस्थ झालेली पिढी आहे तुमची... आता तर तुमची अस्वस्थता जास्त वाढलेली दिसते... good... पण आम्ही किती सहिष्णू आहोत ते आता तुम्हाला कळेल. आता खेळाला जरा वेगळं वळण देऊ. तुम्ही त्यात शिरू पाहातच आहात, तर आता थोडं जास्त theoretical होऊया. कदाचित लोकांना सगळं कळणार नाही. पण त्यानंच त्यांना भारी वाटेल, आणि तुम्हांआम्हांला तर कळेलच, पण शिवाय तुमची अस्वस्थताही जरा आटोक्यात राहील. तुमचा प्रांत हा, theory म्हणजे, तुमच्या आवडीचा. चला.

पोलिस : परत एकदा विचारते: समता.

रक्षक : (तिला हाताच्या इशाऱ्यानं थांबवत) नाही, ते झालं... नको त्या गोष्टी नकोत परत. पुढचं विचारा.

रक्षक : स्वातंत्र्य.

अनिकेत : भांडवलशाही आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यांनी जिला हायजॅक केलं आहे अशी गोष्ट.

पोलिस : आधुनिकता.

रोहिणी : जिचा प्रवास अर्ध्यात असताना तिला भांडवलशाहीनं स्वतःच्या चौकटीत बंदिस्त केलं अशी गोष्ट. (तेवढ्यात अश्विनीला परत फोन येतो. ती काही बोलणार तेवढ्यात…)

रक्षक : (अश्विनीकडे बघत, पण त्याच सुरात) त्याला म्हणावं, परत जा आणि कोकपण घेऊन ये. इथं अजून थोडा वेळ लागणार असं दिसतं. आणि डाएट कोक नको.

अनिकेत : (गोंधळून जात) कोक... म्हणजे... नाही, काही डोक्यात येत नाही. याचा काय संबंध आधुनिकतेशी? म्हणजे कोक आहे आधुनिक काळातला, पण...

रक्षक : अहो, तो शेवटचा भाग वेगळा होता. आम्हांला ना, कोक झिरोची चव जास्त आवडते. तो order करायला सांगत होत्या त्या पिझ्झाबरोबर... तुम्हाला काय वाटलं?

कबीर : सांगतो, सांगतो. (रक्षक आणि पोलीस एकमेकांकडे पाहत मंद स्मित करतात. दीर्घ विराम. अनिकेत आणि रोहिणी आता जास्तच अस्वस्थ झाले आहेत; मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टींनी. अनिकेत काही बोलू पाहतो; रक्षक त्याला हाताच्या इशाऱ्यानी थांबवत..)

रक्षक : पुढचा प्रश्न, क्रांती.

अनिकेत : दूरवर घडलेलं spectacle. आणि त्यातून उगवलेली आशावादी आत्मसंतुष्टता. (त्यांची अस्वस्थता वाढत जाते. रक्षक हातात काठी घेऊन, हसत, अगदी निरुपद्रवीपणे काठीशी खेळत त्यांच्या बाजूने फेऱ्या घालतो.)

रक्षक : स्मृती.

अनिकेत : सत्य.

पोलिस : असत्य.

रोहिणी : संवादाचा अभाव.

रक्षक : तंत्रज्ञान, इतिहासानं कधीही न पाहिलेला बदलाचा प्रचंड वेग, आणि जग flat होऊन एकत्र येणं.

अनिकेत : भीती.

रक्षक : भीती.

रोहिणी : जी अनाठायी तयार करून विद्वेष आणि हिंसेचं दुष्टचक्र चालू करायला वापरली जाणारी गोष्ट.

पोलिस : Media.

अनिकेत : Manufacturing consent.

रक्षक : Social media.

रोहिणी : Manufacturing untruth and hate. (दीर्घ विराम. दोघेही पराकोटीचे अस्वस्थ.)

पोलिस : हे चालूच ठेवता येईल, काय? पण त्याची जरूर नाही; एवढं पुरेसं आहे... किती आम्हांला अनुकूल झालेलं आहे की नाही सगळं? आता या पार्श्वभूमीवर आम्ही काय म्हणतो ते किती effective आहे बघा. (मार्चिंगसाठीच्या संगीताच्या चालीवर म्हणतात:)

रक्षक : चिकरक चकरिक चीचाय चोचक लोलम्

पोलिस : गुंडो लोलम् मनपकवम्

रक्षक : एक्को टोक्को एटिकेटी एटीको

पोलिस : एटीफाय एटीफाय ची चाय चो

रक्षक : रिकटिक रिकटिक रिकरिकी टिकीटिक

पोलिस : उपसा उपसा ऑ (क्षणिक विराम.)

रक्षक : कसं सगळ्यांनी एका तालात मार्चिंग करावंसं वाटतं की नाही... तुम्हाला नाही वाटत असं मार्चिंग करावं?

अनिकेत : नाही.

रोहिणी : अजिबात नाही.

रक्षक : अरेरे... आता तर थियरीनंही तुम्हाला शांती मिळत नाही आणि तुम्ही मार्चिंगही करायला तयार नाही... आम्ही आमच्या परीनं प्रयत्न केला तुम्हाला मदत करण्याचा. अगदी मनापासून.

पोलिस : अहो, करावं मार्चिंग... व्हावं सामील मासेसमध्ये. सगळा गोंधळ दूर होतो मग... तुमच्या मार्गांनी काय होतं; की सामान्य माणसाचा, म्हणजे तुम्ही ज्याला उगाचच कष्टकरी, शोषित म्हणत समाजात फूट पाडत असता ना त्याचा, गोंधळ उडतो ना.

रक्षक : पण तुमच्या लक्षात हे येत नाही, की गोंधळ उडाल्यामुळे त्याला समजावायला सोपं जातं.

अश्विनी : आणि सगळ्यांना पटकन पटतं ते सांगतात ते. मग ते त्याला सांगू शकतात, की युद्ध हीच शांतता, गुलामगिरी म्हणजे स्वातंत्र्य आणि ज्ञानाचा अभाव म्हणजे सत्ता. आणि तेपण कसं, तर तुमच्यांतल्याच अनेक लोकांना, अगदी आंबेडकरांपासून विवेकानंदांपर्यंत लोकांना, आपलंसं करून.

रक्षक : (जोरात हसायला लागतो.) हुशार आहे हां मुलगी तुमची... पण तिला कळत नाहीये की सामान्य माणसं आमच्या बाजूला आलीयेत आता; अगदी तिच्या भावासहित. तरी तुम्हांला जाग येत नाही. रोगिष्ट!

अनिकेत : अहो, थोडा विकार झाला असला तरी रोगी जिवंत होता, सुधारू शकत होता. आता तुम्ही जे औषध देताय ते औषध नाहीये; ते विष आहे, विष.

रक्षक : विष आणि औषध हे अनेकदा एकच असतात. आणि सगळ्यांना ते पटलंय ना. लोकशाहीनं मान्य केलंय ना! (विराम)

रोहिणी : थकायला झालं फार.

अनिकेत : मलापण.

रोहिणी : (रक्षकाकडे आणि पोलिसाकडे बघत) तुम्हाला नाही झालेलं थकायला. तुम्ही तर अगदी फ्रेश दिसताय!

रक्षक : नाही. आम्हाला थकायला होत नाही. विचारांनी थकायला होतं, हे तुम्हांला विचार करूनही कळलेलं नाही. भावना आणि कायदा एकत्र आले की एनर्जीच एनर्जी. दिवसातले वीस तास काम करतात मग काही लोक.

रोहिणी : हे जे काही बोलताहेत ते कमाल आहे... नाही, हे वास्तव असू शकत नाही.

अनिकेत : The trouble with reality today is that it isn't realistic anymore. आता वास्तव वास्तववादी उरलेलं नाही, मत्प्रिये. (क्षणिक विराम)

रोहिणी : लोकशाही कधीच फार काळ टिकत नाही. ती काही काळानंतर कामातून जाते, दमते... तिच्या स्वभावातच अधिकाराबद्दल अतिरेकी शंका घेण्याचा गुण असतो. मग होतं असं, की स्वतःच स्वतःबद्दल निर्माण केलेल्या अतिरेकी अपेक्षांच्या ओझ्याखाली ती कोसळते आणि स्वतःचाच खून करते.

रक्षक : अजून चर्चेची हौस फिटली नसली तर तीही फिटवू या. तुम्ही बोलताय ना, ते आधी समृद्ध होऊन मग लोकशाही आलेल्या देशांबद्दल. आपल्या इतक्या गरीब देशात असं होत नाही. इथे लोकशाही टिकते. तुम्हांला इथल्या वास्तवाशी काही देणंघेणं...

अनिकेत : (त्याचे वाक्य तोडत) तुमच्याशी गंभीरपणेच बोललं पाहिजे. I have to accept. पण आम्हांलाही इथल्याशी काही देणंघेणं आहे. इथं काय होतं ते आम्हांला कळत नाही असं नाही. आम्ही आधी जे म्हटलं ते तर होतंच, पण शिवाय आपल्याइतक्या गरीब देशात असं होतं, की लोकं फार काळ चांगल्या भविष्याच्या आशेवर जगू शकत नाहीत. त्यांना घाईनं परिस्थिती सुधारायला हवी असते. मग काही काळानंतर लोकानुनय, चांगल्या भविष्याऐवजी तातडीच्या फायद्याची लाच, constitutional bodiesचा गैरवापर, आणि खोट्या भीतीवर उभा केलेला द्वेष, यांच्या पायावर भावना चेतवून कोणीतरी स्वतःला strong नेता म्हणून खपवायला लागतो, आणि मागल्या दारानं...

रक्षक : (जोरात हसायला लागतो.) असं काहीही होत नाहीये. होतंय ते असं, की लोकशाही फक्त स्वरूप बदलते आहे. तुम्ही विचारांतपण कमी पडताना दिसता की हो! परत मी सांगतो आता. नीट ऐका, युद्ध हीच शांतता, गुलामगिरी म्हणजे स्वातंत्र्य आणि ज्ञानाचा अभाव म्हणजे सत्ता.

पोलिस : आता खरी लोकशाही अवतरली आहे. सगळ्या शाळा, सगळी विद्यापीठं... सगळीकडूनच सगळी गुंतागुंतीची वैचारिक अडगळ दूर केलीये आम्ही, आणि त्यामुळे ती सोपी झालीये. लोकांना सहज कळेल अशी... थोड्या वेळात बघालच, की सगळं कसं लोक ठरवतात ते. अगदी बहुमतानं!

अनिकेत : ही फसवेगिरी आहे. ही तर हुकूमशाहीपेक्षाही वाईट...

रक्षक : (हात वर करून त्याचं वाक्य तोडत) बास. खूप बोलू दिलं. खूप विचार करू दिला. आता निर्णय होईल तो बहुमतानं, लोकशाहीनं... चर्चा संपली. बास.

पोलिस : वास्तव काय झालंय ते समजून घ्या. चुकलं म्हणून टाका, नाकारून टाका... संपलं. (अश्विनी अस्वस्थ आहे. काही बोलू पाहते. रक्षक तिला हाताच्या इशाऱ्याने आणि नजरेच्या जरबेने थांबवतो.)

अनिकेत : परत तेच! काय चुकलं म्हणू?

रक्षक : अहो, कालची पोस्ट चुकली म्हणा.

पोलिस : दहा वर्षांपूर्वीचं चुकलं म्हणा.

रक्षक : चाळीस वर्षांपूर्वीचं चुकलं म्हणा.

पोलिस : ऐंशी वर्षांपूर्वीचं, म्हणजे अगदी नेहरूंच्या काळापासून चुकलं म्हणा.

रक्षक : हवं तर अगदी पाचसहाशे वर्षांपूर्वी, हे जे सगळं आधुनिकता आणि ‘प्रत्येकानं स्वतंत्र विचार करा’ वगैरे प्रकरण चालू झालं ना, तेव्हापासूनच चुकलं म्हणा.

अश्विनी : (रागात पुढे येत) नाही. काहीही म्हणू नका. तुम्ही करताय ते बरोबर आहे. काय व्हायचं असेल ते होऊ दे.

कबीर : अश्विनी! अगं, हे काय बोलतेयस तू? त्यांना...

अश्विनी : (त्याला थांबवत) नाही. मी पण already अस्वस्थ होते अनेकदा, आत्ता जे काही चाललंय त्यानं. पण मला नक्की कळत नव्हतं, आणि आधीच्या गोंधळानं आणि corruptionमुळे मी वैतागून गेले होते... मला बदल हवा होता. पण हे जे काही झालं ना गेल्या काही मिनिटांत, त्यामुळे माझ्या डोक्यात नीट उजेड पडला आहे.

कबीर : अगं, पण ते काहीही करू शकतात. यांना, आपल्याला...

अनिकेत : आता घाबरून चालायचं नाही कबीर. कारण नाहीतर सगळंच संपेल. ही म्हणतीये ते ऐक.

कबीर : पण तितकं सोपं नाही ते. आधी तरी काय सगळं चांगलं होतं का?

अश्विनी : प्रश्न आत्ताचा आहे, आणि आत्ता जे होतंय ते सगळ्यात भयानक आहे... आपण त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. नाही तर जे होईल ते भयानक होणार आहे. आणि यांच्या पिढीची इनिंग खरं तर संपली आहे आता. त्यांना उगाच इतिहासाबद्दल नाही ती उत्तरं आणि excuses देण्यात वेळ घालवावा लागतो... आता इनिंग आपली आहे. खरं तर ती नेहमीच नव्या पिढीची असते. नाही... we must resist; मग जे काय व्हायचं असेल ते होऊ दे! (रोहिणी आणि अनिकेत तिच्याकडे कौतुकानं पाहत आहेत. कबीर काही बोलू पाहतो, त्याला ते हाताच्या इशाऱ्यानं थांबवतात. रोहिणी, अनिकेत आणि अश्विनी तिघेही आक्रमकपणे रक्षक आणि पोलिसाकडे बघत राहतात. एक तणावपूर्ण विराम. दीर्घ विराम. घंटेचा टोल वाजतो. पोलीस आणि रक्षक दोघांचे हात सोडवतात.)

रक्षक : ठीक. नका माघार घेऊ. आम्ही आता निघतो. लोकच काय तो निर्णय घेतील.

पोलिस : (मुलांना उद्देशून) लोक निर्णय घेण्याच्या आधी आईबापांना समजावा... नाही तर मग तुमचाही निर्णय घ्यावा लागेल.

कबीर : अहो, पिझ्झा येईलच एवढ्यात...

रक्षक : नाही, वेळ नाही. भावना कर्तव्यात कसूर करू देत नाहीत.

पोलिस : (प्रेक्षकांकडे बघत) निर्णय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही लोकशाहीतले नागरिक आहात. निर्णय करताना तुम्ही आम्हांला निवडून दिलं आहे आणि आम्ही राज्यावर आहोत, हे विसरू नका.

रक्षक : आणि तुमचं कर्तव्य करायला चुकू नका. निर्णय देण्याची सक्ती नाही. पण जो काही कराल किंवा करणार नाही, त्याचा स्क्रीनशॉट काढून नावासहित आम्हाला पाठवा. आपापले फोन चालू करून त्यावर मी आधीच ज्याची लिंक पाठवलेली आहे ते ॲप डाऊनलोड करा. त्यावर तुमच्या मदतीला AIसुद्धा असेल.

पोलिस : AIचे अनेक ऑप्शन येतील: ChatGPT, Deepseek, GLM-4 Plus, Google Gemini, Pangu LLM, Hunyuan, Meta AI. त्यानं घाबरून जाऊ नका. ते वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि देशांचे असल्यामुळे त्यांची उत्तरं अनेकदा वेगवेगळी असू शकतात. पण या बाबतीत सगळ्यांचं उत्तर एकच असेल, याची खात्री बाळगा.

अश्विनी : हे तर आपल्या pizzaच्या toppingsसारखे choices झाले की...

रक्षक : (तिच्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकत, पण तिचे वाक्य अर्ध्यात तोडत प्रेक्षकांना उद्देशून) भावनापूर्वक आणि कायदेशीर निर्णय घ्या. (खोलीकडे नजर टाकत आणि अनिकेतला निर्देश करत) आणि तोपर्यंत हा इतिहास नीट आवरून बांधेसूद, सोयीचा करा जरा; आम्ही करतो तसा. कदाचित short-term memory परत येईल, आपण काय पोस्ट केली होती ते आठवेल.

पोलिस : उद्याला येऊ परत, जो निर्णय येईल त्याची अंमलबजावणी करायला. इथून हलू नका. बाहेर पहारा आहे.

रक्षक : नमस्कार आणि जय भारत! (दोघेही निघून जातात. उरलेले चौघे काहीशा भेदरलेल्या, काहीशा रागावलेल्या, तर काहीशा resigned अवस्थेत खाली बसतात. परत बेल वाजते. पिझ्झा येतो. अश्विनी तो आणून मधल्या टेबलावर ठेवते. हळूहळू रंगमंचावर अंधार होत जातो आणि प्रेक्षकांवर प्रखर उजेड पसरतो.)

—

आभार : जॉर्ज ऑर्वेल, नॉर्मन मेलर, जॉन लेनन, जॉन अ‍ॅडम्स (युनायटेड स्टेट्सचा दुसरा अध्यक्ष).

नाटकाच्या नावासाठी आभार : अर्थातच 'दिवाणखाना' या स्थळी रचली गेलेली असंख्य मराठी नाटके.