भारतीय दृश्यकलेतलं 'उजवं' वळण... – अभिजीत ताम्हणे

'उजवी' किंवा 'डावी' विचारसरणी' आणि 'कला' (विशेषत: दृश्यकला) यांचा एकत्रित विचार करताना तीन-चार गोष्टी आधीपासूनच स्पष्ट असतात. पहिली म्हणजे, कोणत्याही विचारसरणीच्या – आयडिऑलॉजीच्या – अधीन झालेली कला ही 'मुक्त अभिव्यक्ती' असू शकत नाही. मराठीत 'उपयोजित कला' हा शब्द सहसा जाहिरातक्षेत्रासाठी वापरला जातो; पण 'ज्या कलाकृतीत कलावंताच्या हेतूऐवजी किंवा कलावंताच्या हेतूइतकाच अन्य कुठलातरी (विचारधारेचा) हेतू बलवत्तर ठरतो, अशी कोणतीही कलाकृती' अशा व्यापक अर्थानं तो पहिल्यास विचारसरणी 'मानणारी' कला ही कमीजास्त प्रमाणात उपयोजित असते. याला जोडून येणारी दुसरी गोष्ट अशी की, उजवी किंवा डावी कोणतीही विचारसरणी मानणारे चित्रकार वा दृश्यकलावंत हे प्रतीक-निर्माते म्हणून उत्तम कामगिरी करू शकतात. मात्र तिसरी गोष्ट अशीही की, बंडखोरीऐवजी अनुकरणशीलतेला वाव अधिक देत राहणं हा कोणतीही विचारसरणी टिकवण्याचा (आणि ती वाढतेही आहे असं समाधान करून घेण्याचा) सोपा मार्ग असतो. विचार पुरोगामी आहेत की प्रतिगामी आहेत, यावर 'निष्ठावंतां'ची वर्तणूक अवलंबून नसते आणि या निष्ठावंतांमध्ये जेव्हा कलावंतही असतात तेव्हा त्यांचा आविष्कार हा वरवर पाहाता जरी पुरोगामी वा प्रतिगामी वगैरे श्रेणींमध्ये मोडणारा भासला तरी कलावंतांसाठी तो निव्वळ निष्ठेचाच आविष्कार असतो, ही चौथी गोष्ट. दृश्यकलेचा जागतिक इतिहास हा बऱ्यापैकी नोंदवला गेलेला, ज्याचं दृश्य-प्रमाण आहे असाच असल्यामुळे या चारही गोष्टी अगदी कोणत्याही विचारसरणीत, कोणत्याही काळात स्पष्ट असतात. त्यातूनच तर मानवी चेहरे पूर्णत: टाळणारी 'इस्लामी कला' यासारख्या पूर्वग्रहमय 'शैली'सुद्धा तयार झाल्याचं हा दृश्यकलेतिहास सांगताे. त्यामुळे, या चारही गोष्टी हायपोथेटिकल किंवा गृहीतकल्पना ठरणाऱ्या नाहीत. त्यांच्या आधारे डाव्या – सोव्हिएत काळातल्या वगैरे – कलेची भरपूर चिकित्सा झालेली आहे आणि त्यातून याच गोष्टी जणू नियमांसारख्या सिद्ध होत राहिलेल्या आहेत.
एवढंच कशाला, 'प्राचीन भारतीय कले'चा अभ्यास करणाऱ्यांकडे पाहा ना – त्यांनी हे गृहीतच धरलेलं असतं की, पुराणं किंवा जातककथा यांना अभिप्रेत असणाऱ्या विचारसरणीचं उपयोजन या कलेत आहे आणि त्या वेळच्या कलावंतांनी प्रतीकनिर्मिती केलेली तरी आहे किंवा आधीच्या प्रतीकांचा फेरआविष्कार तरी केलेला आहे. यातूनही नवं काय दिसतं आहे, याचा अचूक थांग लावण्याचं काम ते अभ्यासक करत असतात. हा या नियमांच्या आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न असतो. त्याउलट, आपापल्या कला-शाळेच्या अभ्यासक्रमांशी किंवा शिक्षकांशी कलावंतांनी निष्ठाच जपल्याची साक्ष (भारतासंदर्भात, विशेषत: १९२० ते १९८० या दशकांतल्या) कलाकृतींतून पटते – तशी निष्ठा जपण्याची पद्धतच होती, हे लक्षात घेऊन त्या कलाकृतीचं विवेचन त्या वेळच्या समीक्षकांनी केल्याचं दिसतं. विचारसरणी मानणारे कलावंत आणि कलाकृती यांकडे अभ्यासूपणे पाहण्याच्या टप्प्यावर आजची कलासमीक्षा निश्चितपणे पोहोचलेली आहे. अशा अनेक परींची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास, आजच्या 'उजव्या विचारसरणी'च्या कलेची चर्चा करताना प्रस्तुत लेखकानं स्वत:चे पूर्वग्रह किंवा स्वत:चा अभिनिवेश घट्ट करण्यासाठी हे लिहून ठेवलंय अशा आरोपाला थारा असू नये.
उजव्या विचारसरणीचा आविष्कार ठरणाऱ्या दृश्यकलेची चर्चा आताच का करायची, याची कारणं 'कलाबाह्य' जरूर ठरतील; पण ती विचारसरणीच्या – (१) वाटचालीशी आणि (२) 'विजया'शी निश्चितपणे निगडित आहेत. यांपैकी 'वाटचाली'चा संबंध 'रा. स्व. संघाचं शंभरीत पदार्पण' टप्प्याशी जसा लावता येतो, तसाच 'विजया'चा संबंध 'मोदी सरकारच्या दशकपूर्ती'शी उघडपणे लावता येईल. गेल्या सुमारे शे-दीडशे वर्षांत पाश्चात्त्यांनी त्यांच्या आधुनिकतेचं रोपण भारतात केलं, त्यातून भारतीय विचारविश्वात मोठी घुसळण झाली. याच काळात भारतीय उजव्या विचारसरणीचीही वाटचाल समांतरपणे होत असताना, दृश्यकलेचं अख्खं क्षेत्र हे विचारसरणी-निष्ठच असतं हा आपला आणि पाश्चात्त्यांचाही इतिहास मात्र कमीअधिक प्रमाणात सारखाच होता! पाश्चात्त्यांच्या यथातथ्यवादी चित्रणाचं शिक्षण निष्ठापूर्वक दिलं-घेतलं जाण्याचा तो काळ. तो भारतातल्या तत्कालीन 'भारतीयतावादी' विचारसरणींनाही सहज रुचला-पचला कारण याच यथातथ्यवादाचा आधार घेऊन पौराणिक विषयांची चित्रं लोकप्रिय करणारे राजा रविवर्मा आपल्याकडे १९०६पर्यंत जिवंत होते. त्यानंतरही रविवर्मांच्या वाटेनं जाणारे होतेच. ब्रिटिशांनी इथं टपाल, रेल्वे, शालेय इंग्रजी शिक्षण वगैरेंंचा विस्तार ज्या अंत:स्थ हेतूंनी केला त्याच प्रकाराच्या हेतूंनी त्यांनी कलाशिक्षणही फैलावू पाहिलं. पण त्यांच्या कलाशिक्षणातल्या यथातथ्य चित्रणवादाशी आपलं नातं अगदी सहजपणे जुळलं. शिवाय, जॉन ग्रिफिथ्स यांनी १८७२ ते १८८५ या काळामधल्या प्रत्येक हिवाळ्यात निवडक कलाविद्यार्थ्यांना अजिंठा लेण्यांमध्ये नेऊन तिथली चित्रं नकलून काढणं, त्यांचं संधारण हे प्रयोग सुरू केले; तेव्हा हेतूविषयी शंका घेतल्या गेल्या नाहीत. बंगाली, शांतिनिकेतनातले कलावंत पौर्वात्त्य, भारतीय (मुघलकालीन म्हणजेसुद्धा भारतीयच) कलाशैलींचा अभ्यास करू लागले, तशी चित्रं काढू लागले, 'बंगाल रिव्हायव्हलिझम' ही चळवळ म्हणून ओळखली जाऊ लागली. झालं असं की, १९०७मध्ये कोलकात्यात 'इंडियन सोसायटी फॉर ओरिएंटल आर्ट' ही भारतीय कलाशैलींना प्रोत्साहन देणारी संस्था अबनीन्द्रनाथ टागोर आणि ई. बी. हॅवेल यांनी स्थापन केली, पुढे याच हावेल यांनी मुंबईच्या 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'मध्ये भारतीय शैलीतल्या चित्रणाचा अभ्यासक्रम सुरू केला, १९३२पासून जगन्नाथ अहिवासींचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाल्यानं तो बहरला... या सर्व काळांतली चित्रं आजच्या पुरोगामी, प्रागतिक, 'कन्टेम्पररी' डोळ्यांना जरी उजवी भासली तरी त्या-त्या काळात त्या कलानिर्मितीचा हेतू उजव्या राजकीय विचारांना पाठबळ देण्याचा नव्हता. जे काही पाठबळ कळत-नकळत मिळालं असेल, ते 'भारतीयतावादी' म्हणून गोड मानलं गेलं. या गोड फळांचा एक नमुना म्हणून नंदलाल बोस यांनी 'हरिपुरा काँग्रेस'साठी केलेल्या चित्रांकडे किंवा पुढे भारतीय संविधानाच्या हस्तलिखित प्रतीवर बोस आणि त्यांच्या शिष्यांनी केलेल्या सजावटीकडे बोट दाखवता येईल.
मुद्दा असा की, 'दृश्यकलेतल्या भारतीयतेचा शोध' घेण्यामागचे हेतू आणि 'उजव्या' ठरू शकणाऱ्या कलाकृतींमागचे हेतू हे भिन्न असतात, असा आपला इतिहास आहे. त्यातला अनुभवनिष्ठ निचोड असा की, सहसा ज्या कलाकृतींत आकृती ओळखू येतात, त्या कलाकृतींचं आशयद्रव्य उमगू शकतं, अशा कोणत्याही कलाकृतींची शैलीवैशिष्ट्यं काही का असेनात, विचारसरणीचा संबंध अशा भारतीय कलाकृतींच्या शैलीशी नसून फक्त (उमगणाऱ्या) आशयाशीच असल्याचा आपला इतिहास आहे. कारण मुळात भारताचा इतिहास एकारलेल्या संस्कृतीचा नाही.
मग तो इतिहास गेल्या दहा वर्षांत बदललाय का? हो आणि नाही. यापैकी 'नाही'चं उत्तर तसं सरळ असणार, याची कल्पना वाचकांनाही आली असेल. पण मग 'हो' कसं काय? या इतिहासाच्या कहाणीत 'ट्विस्ट' कुठं आला? मराठी शब्द वापरायचा तर 'वळण' कुठे आलं?
या प्रश्नाचं हमखास चुकीचं ठरणारं उत्तर म्हणजे 'भारतीय अमूर्तवादी' कलावंत भारतीय अध्यात्माकडे झुकले असल्यामुळे भारतीय अमूर्तकला उजव्यांनाच सामील झाल्याचं दिसलं! हा आरोपच ठरेल आणि तो खोडून काढला जाईल हे चांगलंच आहे. कारण शंकर पळशीकरांचे 'ऱ्हीं', 'क्लीं' हे आजही ध्वनीच्या अनुभवाचं अमूर्तचित्र म्हणूनच पाहिले जातात (त्याचा संबंध विशिष्ट धर्मातल्या विशिष्ट वर्णीयांची मक्तेदारी मानले गेलेल्या ध्वनींशी लावला जात नाही), असा त्याचा अर्थ होईल आणि हाच अर्थ त्या चित्रांना सर्वाधिक न्याय देणारा ठरेल. किंवा रामकुमार यांची 'बनारस' चित्रं संख्येनं इतकी भरपूर आहेत तरीसुद्धा 'गंगा आरती'चे कार्यक्रम वारंवार व्हीआयपी उपस्थितीत घडवले जाण्यामागचे हेतू आणि दिवंगत रामकुमारांच्या प्रदीर्घ 'बनारस' चित्रमालिकेमागचे हेतू यांची गल्लत कोणीही करत नाही. पण मग, आजच्या काळातले नोएडावासी अमूर्तकार अविजित पाठक यांच्या कलाकृतींकडे निव्वळ अमूर्तकला म्हणून पाहू जावं तर पाठकजीच सांगू लागतात, 'आपली जमिनीखाली गाडली गेलेली पुरातन मंदिरं, आर्किऑलॉजी, असे बरेच संदर्भ इथं अमूर्तरूपानं आलेले आहेत'; पाहावं तर, या कलाकृती म्हणजे कापडाचे तुकडे वापरून केलेलं 'कोलाज' आहेत. त्यातून कोणताही विशिष्ट आकार दिसत नाही. पण एक तरुण आणि धर्म-जातीच्या खुणा कपाळ-डोईवर वागवणारा दृश्यकलावंत स्वत:च्या या कामाचा संबंध जमिनीखालच्या मंदिरांशी जोडतो आहे... आणि राजकारणाचा विषय निघाल्यावर, न संकोचता आणि आक्रस्ताळेपणाही न करता, सभ्यपणानंच स्वत: उजव्या विचारसरणीला मान्यता देत असल्याचं सांगतो आहे! हे आहे वळण... इथं या वळणावर, उजवेपणाचे सारे संकेत देत, कलावंतपणाच्या आणि सभ्यपणाच्या साऱ्या मर्यादा पाळत एक कलावंत यशस्वी होतो आहे. त्याच्या यापूर्वीच्या प्रवासात तो असे कोणतेही संकेत देत नव्हता, तेव्हाच्या त्याच्या इष्टमित्रांचं स्वागत तो करतो आहे, पण आता मी तुमचा नाही आणि तुमच्यापेक्षा अधिक यशस्वी आहे, याची जाणीवही देतो आहे.
लक्षात घ्या, ज्या अमूर्तचित्रांकडे साधारण अर्धशतकापूर्वीच्या काळापर्यंत, त्यातल्यात्यात विचारसरणीनं उजवे मानले जाणारे एस. एम. पंडित, माधवराव सातवळेकर अशा त्या काळच्या नामवंत चित्रकारांनी ढुंकूनही पाहिलं नसेल (सातवळेकरांनी १९६६ च्या ललित दिवाळी अंकात पिकासोवर केलेली आगपाखड स्मरणीय आहे); ती अमूर्तचित्रं- त्यातही कोलाज पद्धतीनं केलेली- आता 'उजव्या कले'चा नमुना ठरवली जाऊ शकतात! हा इतिहासातला बदलच म्हणायला हवा की नाही? भारतामधल्या विचारसरणींपैकी 'आजच्या' राजकीय संदर्भात 'उजवी विचारसरणी' असं ज्या भाजपला, संघ परिवाराला म्हटलं जातं, त्यांच्या 'मंदिर वहीं बनाएंगे' किंवा 'चलो अयोध्या' या पोस्टरांवरलं थेट प्रचारचित्र म्हणून एस. एम. पंडितांनी कधीकाळी केलेल्या एका चित्राचा वापर करण्यात आला होता, ते आपल्या कलेतिहासातलं एक निराळं वळण होतं. याच पंडित यांच्या विवेकानंद-चित्राचा आधार पुढे नारायण सोनावडेकरांनी कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारक-शिलेसाठी केलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला होता, याची आठवण कुणी पंडित हे एकनाथजी रानडे, पर्यायानं रा. स्व. संघ यांच्या कसे जवळचे होते असं ठसवण्यासाठी काढू शकेल. पण याच पंडितांनी इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर यांची व्यक्तिचित्रं केली आहेत, 'फिल्मिंडिया' या मासिकाच्या मुखपृष्ठासाठी तर कित्येक अभिनेत्रींची चित्रं केली आहेत. त्या काळात एस. एम. पंडित यांना कुणीही 'तुम्ही राजकीय हिंदुत्ववादाचा पुरस्कार करता का हो?' असं विचारलेलं नाही, याचा एक अर्थ असा की तशी शंकाही कुणाला आली नसावी. पुढल्या काळात एस. एम. पंडित यांनी महाभारत-युद्धाच्या प्रसंगांवर जी चित्रं केली, ती या महाकाव्यातल्या कृष्णाच्या लढाऊपणाचं प्रतीक ठरणारी आहेत. या चित्रांपैकी, हात उगारून मोठ्ठं सुदर्शनचक्र सोडू पाहणाऱ्या कृष्णाचं चित्र (मागे त्याला थांब म्हणणाऱ्या, हतबल दिसणाऱ्या भीष्माचार्यांची प्रतिमाही आहे ती वगळून) कदाचित पुढल्या काळात कृष्ण-जन्मभूमी आंदोलनासाठीही वापरलं जाईल. पण पंडित यांचे राम-कृष्ण संघीय प्रचारचित्रांमध्ये वापरणं हे अखेर ॲप्रोप्रिएशन किंवा अंकितीकरण आहे. पंडित यांनी साकारलेलं प्रतीकरूप मान्य करून, ते अंगीकारण्याचा हा प्रकार ठरतो.
हे अंकितीकरण किंवा अंगीकार करण्याचं वळण पुढेही येत राहिलं. त्यातला आणखी गुणात्मक फरक ठरणारा प्रकारही वर्षभरापूर्वी घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'चे १०० एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) एक प्रदर्शन भरवण्याचा घाट घालून तो यशस्वीही केला गेला. त्यासाठी निवड झालेले चित्रकार अजिबातच 'मोदीसमर्थक' वगैरे नव्हते. 'ठुकराल ॲण्ड टागरा' किंवा रियाझ कोमू हे तर प्रयत्न केला तरीही मोदीसमर्थक होऊ शकणार नाहीत, अशीच खात्री अनेकांना आजही (त्यांचा समावेश 'त्या' प्रदर्शनात झाला, पंतप्रधानांशी आपापल्या कलाकृतींबद्दल ते बोलत असल्याची छायाचित्रं प्रसारित करण्यात आली, तरीसुद्धा) असेल. पण सरकारी कलादालनाच्या निमंत्रणावरून हे प्रदर्शनात आले आणि पंतप्रधानपदाचा मान ठेवूनच त्या पदावरल्या व्यक्तीशी बोलले. असंच त्या प्रदर्शनातल्या अन्य आठेक चित्रकारांनीही केलं असेल. त्यांपैकी एखाददुसऱ्यानंच पुढल्या वर्षभरात केंद्र सरकारचं या-ना-त्या प्रकारे साह्य मिळवलं म्हणतात, पण बाकीच्यांनी नाही. पण तरीही त्या प्रदर्शनातल्या कलाकृतींवर विनाकारण 'मोदीपसंत' कलाकृती असा शिक्का बसला. हे वाचणाऱ्यांपैकी काही क्रिकेटप्रेमींना, आयसीसी वर्ल्ड कप २०२३चा अंतिम सामना हरल्यावर ड्रेसिंगरूममध्ये जाऊन, भारतीय संघातल्या मोहम्मद शमी याला जवळ ओढून केलं गेलेलं सांत्वन आठवेल. दृश्यकलेच्या त्या किंवा अलीकडेही तशाच निमित्तानं (मोदी सरकारची दहा वर्षे) 'एनजीएमए'नंच भरवलेल्या प्रदर्शनापुरता विचार केल्यास, हे 'मानीव अंकितीकरण' ठरतं.
'संस्कार भारती' ही रा. स्व. संघाच्या परिवारातली कलाप्रसार संस्था. तिचे अध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव (त्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर) आहे, ते वासुदेव कामत हे यथातथ्यवादी चित्रणात उच्चदर्जाची उत्कृष्टता मिळवलेले आणि कलेसाठीच्या अनेक पुरस्कारांखेरीज २०१५मध्ये 'पद्मश्री'ने सन्मानित झालेले चित्रकार. त्यांची अनेक रचनाचित्रं एस. एम. पंडित यांच्यासारखीच प्रतीकरूप ठरणारी आहेत. पण पंडितांनी उपलब्ध पात्रांचीच प्रतीकं चितारली, तर कामत हे सूचकतेची त्यापुढली पातळी गाठणारे आहेत. याच संस्कार भारतीचा चित्रकला विभाग सांभाळणारे सुनीलकुमार विश्वकर्मा हे काशी विश्वविद्यालयाच्या दृश्यकला विभागाचे प्रमुख आणि दिल्लीतल्या 'भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे'चे प्रोग्राम ऑफिसर आहेत. कामत पूर्वी कला-प्राध्यापक होते, पण पुढे कोणतंही सरकारी पद त्यांनी स्वीकारलेलं नाही. रवी परांजपे यांनी उत्तरायुष्यात लिहिलेलं एक पुस्तक त्यांच्या तद्दन उजव्या भूमिकांचा पुरस्कार करणारं हाेतं, पण त्यांच्या एकंदर कलाजीवनाचं सार काय, तर आर्किटेक्चरल डिझाइनमधली तंत्रं त्यांनी रचनाचित्रांत (तैलरंग, पेस्टल, पेन्सिल अशा विविध साधनांवरची हुकुमत दाखवून) वापरली.
अनेक चित्रकार खासगीत 'उजव्या विचारांचे' म्हणून ओळखले जातातच. पण त्यांची चित्रं काही अशा प्रकारे अंगीकृत झालेली नाहीत. ही चित्रं मुद्दामहून विचारसरणीचाच प्रसारप्रचार करणारी आहेत, असं नाही पण ('एनजीएमए'मध्ये मोदींच्या काही ना काही निमित्तानं भरणाऱ्या प्रदर्शनांसाठी ज्यांना निवडलं जातं त्यांच्यासारखी) युरो-अमेरिकी कलेतिहासाच्या सध्याच्या व्यवस्थेपर्यंत या अन-अंगीकृत उजव्यांची चित्रं पोहोचलेली नाही. चित्रकाराकडे जी-जी कौशल्यं असायला हवी, ती यांपैकी अनेकांकडे अगदी चोखपणे आहेत, त्यांच्यामुळे अनेक शिष्यांनाही मार्गदर्शन मिळालेलं आहे... पण म्हणून त्यांच्या कलाकृती विचारसरणीच्या आहारी गेलेल्या नाहीत. 'बंडखोरीऐवजी अनुकरणशीलतेला वाव अधिक देत राहाणं' एवढंच कलावंत म्हणून त्यांच्या उजवेपणाचं लक्षण सांगता येईल. २०१९च्या निवडणुकीआधी 'मोदींनाच पुन्हा निवडून द्या' असं आवाहन करणारं एक पत्रक कुणा 'नेशन फर्स्ट कलेक्टिव्ह' नामक गटानं वा संघटनेनं काढलं होतं आणि विविध कलाप्रकारांतल्या ९०० कलावंतांचा पाठिंबा मोदींनाच असल्याचा दावा त्यात होता. त्यात उपयोजित कलेत उत्तम कारकिर्द केलेले गोपी कुकडे यांचा उल्लेख 'फाइन आर्ट्स' या कलाप्रकारातले कलावंत असा केलेला होता आणि दुसऱ्या दृश्यकलावंताचं नाव होतं ते, त्या वेळी ललित कला अकादमीच्या 'गढी स्टुडिओज'चे प्रमुख असलेल्या राजन फुलारी यांचं. पण या दोघांखेरीज, ज्यांना दृश्यकलेच्या प्रांतात काहीएक ओळख आहे असं एकही नाव या ९००मध्ये नव्हतं.
याचा अर्थ असाही काढता येतो की, भारताची संस्कृती एकारलेली नसल्याचा इतिहास एरवी राजकीयदृष्ट्या 'उजवा' कल असलेल्यांनाही नाकारता येत नाही. या संमिश्र संस्कृतीच्या खुणा दृश्यकलेतही अनेकदा दिसल्या आहेत. गुलाम रसूल संतोष यांनी तांत्रिक कलेचा आधार घेतला. 'प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप'चे सदस्य अशी ओळख आजही असलेले दिवंगत चित्रकार सय्यद हैदर रझा यांनी तंत्र-कलेची प्रतीकं आणि भौमितिक रचनाचित्रं, प्राचीन चित्रांच्या जीर्ण कडा यांचा चातुर्यानं संगम केला आणि 'रझा शैली'च तयार झाली. या 'रझा शैली'ची विविध रूपं भोपाळच्या अमूर्त-चित्रकारांच्या कलाकृतींतून दिसत राहिलेली आहेत. अपवाद म्हणून एखादाच उदयराज गडणीस (आता यांनी 'स्वामी अमुकतमुक' किंवा तत्सम नाव धारण केलेलं आहे) स्वत:च्या आध्यात्मिक वलयाचा बडिवार चित्रविक्रीसाठी माजवताना दिसला असेल, पण या असल्या प्रवृत्तींना भारतीय दृश्यकलाक्षेत्रानं थारा दिलेला नाही.
कलाबाह्य 'उजवेपणा'चा दृश्यकलेच्या क्षेत्रावर होणारा परिणाम हा निराळा विषय आहे. हुसेन यांच्या 'सरस्वती' या चित्रावरून त्यांना भंडावून सोडणं असो की एका गुजराती महिलेनं मुंबईत चालवलेल्या कलादालनातून राजेंद्र कापसे या चित्रकाराचं प्रदर्शन बंद करायला लावण्याचा प्रकार असो की कुठल्याशा एका तारांकित हॉटेलाच्या मोकळ्या जागेत सठीसहामाशी जी विक्रीपर प्रदर्शनं भरतात त्यांत फक्त गणपतीची विविध चित्रं मांडणारे प्रदीप म्हापसेकर यांना 'गणपतीचा आकार असा नसतो; ही चित्रं काढून टाका' असं धमकावण्याचा प्रकार असो... हे सारं १९९५ ते २०१० या काळात घडलेलं आहे आणि असल्या प्रकारांची दहशत आजही आहे.
दुसरीकडे, उजव्या दृश्यकलेचे सरकार-पुरस्कृत किंवा पक्ष-पुरस्कृत आविष्कार दिसणं वाढलं आहे. हे आविष्कार कलेतिहासाच्या परिघाबाहेरचे आहेत. गुजरातमधून सर्वदूर पसरलेल्या 'स्वामिनारायण पंथा'ची मंदिरं ज्या रंगाची असतात, तो आता अगदी डोंबिवली रेल्वेस्थानकाच्या पश्चिम बाजूला रस्त्याकडेच्या सुशोभित भिंतीपासून ते काशी विश्वनाथ मंदिराच्या रुंद कॉरिडॉरपर्यंत अनेक ठिकाणी दिसतो आहे. झटपट उभे राहणारे पुतळे सर्वांच्या परिचयाचे झाले आहेत. स्मारकं उभारून किंवा कायमस्वरूपी प्रदर्शनं स्थापून 'नॅरेटिव्ह' तयार करता येतं, हेही सर्वांना माहीत आहे. या कशाचाही संबंध आजच्या कलाबाजाराशी जसा नाही, तसा उद्याच्या कला-इतिहासाशीही नाही.
दृश्यकलेला उजवं वळण देण्याचे प्रयत्न अनेक झाले. राजकीय यश ज्या वेगानं मिळालं, त्या प्रमाणात हे प्रयत्न पुढे गेलेले नाहीत. भारतातली आजची दृश्यकला अद्यापही उजव्या 'वळणावर'च आहे, तिथून पुढला उजवा रस्ता तिनं धरलेला नाही.
(लोकसत्ता दिवाळी अंक २०२४ येथून पुनर्प्रकाशित)