उर-फॅसिझम - उम्बेर्तो एको

मूळ लेखक - उम्बेर्तो एको
मूळ इंग्रजी लेख
१९४२ साली मी दहा वर्षांचा होतो. तेव्हा मला 'लुदी युव्हेनिलेस' या स्पर्धेत पहिलं प्रांतीय पारितोषिक मिळालं. ही स्पर्धा इटलीतील तरुण फॅसिस्टांसाठी होती (म्हणजेच प्रत्येक इटालियन युवकासाठी). स्पर्धा नावाला ऐच्छिक होती, पण होती सक्तीची. विषय होता, "मुसोलिनीच्या गौरवासाठी आणि इटलीच्या अमर नियतीसाठी आपण प्राण द्यावे का?" मी मोठ्या कौशल्यानं त्यावर भाष्य केलं होतं. माझं उत्तर होकारार्थी होतं. मी हुशार मुलगा होतो.
लहानपणीची दोन वर्षं मी एसएस, फॅसिस्ट, रिपब्लिकन आणि पार्टिझन यांच्या सान्निध्यात घालवली. हे सगळे एकमेकांवर गोळीबार करत असत. त्यांच्यामध्ये राहून मी गोळ्या चुकवायला शिकलो. ती चांगली कसरत होती.
१९४५च्या एप्रिल महिन्यात पार्टिझनांनी मिलानचा ताबा घेतला. दोन दिवसांनी त्यांची फौज मी राहत असलेल्या छोट्या गावात पोहोचली. तो मोठा आनंदाचा क्षण होता. गावातला मुख्य चौक लोकांनी गजबजला होता. सगळे लोक गाणी गात होते, झेंडे फडकवत होते. मिमोच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. मिमो हा त्या भागातला पार्टिझन नेता होता. पूर्वी तो काराबिनिएरीचा (इटालियन पोलीस) Maresciallo या हुद्यावर होता. मुसोलिनीनंतर पंतप्रधान झालेल्या जनरल बादोल्योच्या समर्थकांमध्ये तो सामील झाला होता. मुसोलिनीच्या उर्वरित सैन्याशी झालेल्या पहिल्या चकमकींमध्येच त्याने आपला एक पाय गमावला होता.
कुबडीचा आधार घेत मिमो सिटी हॉलच्या बाल्कनीत आला. त्याचा चेहरा फिकटला होता. त्याने एका हाताने गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्या भाषणाची वाट पाहत होतो. माझं सगळं बालपण मुसोलिनीच्या ऐतिहासिक भाषणांनी भारलेलं होतं. त्या भाषणांतले महत्त्वाचे भाग आम्ही शाळेत पाठ करत असू. सगळीकडे शांतता पसरली.
मिमो घोगऱ्या आवाजात बोलू लागला. त्याचा आवाज जेमतेम ऐकू येत होता. तो म्हणाला, "नागरिकहो, मित्रांनो. किती तरी वेदनादायी त्यागांनंतर… आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठी धारातीर्थी पडलेल्यांचा विजय असो."
आणि बस्स, इतकंच!
तो पुन्हा आत निघून गेला. लोकांनी जोरदार जल्लोष केला. पार्टिझनांनी आपल्या बंदुका वर करून आनंदाच्या फैरी झाडल्या. आम्ही पोरंसोरं रिकामी काडतुसं गोळा करायला धावलो. आमच्यासाठी ती मौल्यवान होती. पण त्या दिवशी मी हेही शिकलो की 'भाषणस्वातंत्र्य' म्हणजे 'भपकेबाज भाषणांपासूनचं स्वातंत्र्य'.
काही दिवसांनी मी पहिल्यांदाच अमेरिकन सैनिक पाहिले. ते आफ्रिकन-अमेरिकन होते. मला भेटलेला पहिला यांकी जोसेफ नावाचा कृष्णवर्णीय इसम होता. त्याने मला 'डिक ट्रेसी' आणि 'लिल ॲब्नर' यांच्या अद्भुत जगाची ओळख करून दिली. त्याच्याकडे चकचकीत रंगांची कॉमिक्स होती आणि त्यांना छान वास यायचा.
त्या सैनिकांपैकी मडी नावाचा एक अधिकारी (मेजर किंवा कॅप्टन) एका कुटुंबाच्या बंगल्यात पाहुणा म्हणून राहिला होता. त्या कुटुंबातल्या दोन मुली माझ्या शाळेतल्या वर्गमैत्रिणी होत्या. त्यांच्याच बागेत मी त्या अधिकाऱ्याला भेटलो. काही बायका कॅप्टन मडीला घेरून जुजबी फ्रेंचमध्ये अडखळत त्याच्याशी बोलत होत्या. कॅप्टन मडीलाही थोडं फ्रेंच येत होतं.
काळे शर्ट घातलेले अनेक फिकट गोरे चेहरे मी पाहिले होते. पण तरीही 'अमेरिकन मुक्तिदाता' म्हणल्यावर माझ्या मनात पिवळसर-हिरव्या गणवेशातल्या त्या सुसंस्कृत कृष्णवर्णीय माणसाचीच प्रतिमा उभी राहायची. तो फ्रेंचमध्ये म्हणत होता, "होय, खूप खूप धन्यवाद, मॅडम, मलाही शॅम्पेन आवडते…" दुर्दैवानं तिथे शॅम्पेन नव्हती. पण कॅप्टन मडीनं मला 'रिग्लीज स्पिअरमिंट'चा पहिला तुकडा दिला आणि मी दिवसभर च्युइंगम चघळू लागलो. रात्री मी माझा च्युइंगमचा गोळा पाण्याच्या पेल्यात ठेवायचो, म्हणजे दुसऱ्या दिवशी चघळायला तो पुन्हा ताजा तयार असेल.
मे महिन्यात आम्हाला कळलं की युद्ध संपलं आहे. शांततेमुळे माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. मला सांगण्यात आलं होतं की एका इटालियन तरुणासाठी 'कायमचं युद्ध' हीच सामान्य अवस्था असते. पुढच्या काही महिन्यांत मला समजलं की प्रतिकार चळवळ फक्त आमच्या भागापुरती नव्हती. ती सगळ्या युरोपभर पसरली होती. या काळात मी नवे, रोमांचक शब्द शिकलो: réseau (गुप्त जाळे), maquis (भूमिगत प्रतिकारगट), armée secrète (गुप्त सैन्य), Rote Kapelle (नाझीविरोधी गुप्त जाळे), Warsaw ghetto (वॉर्सा घेट्टो). मी होलोकॉस्टची पहिली छायाचित्रं पाहिली. तो शब्द माहीत होण्याआधीच मला त्याचा अर्थ समजला होता. आपली नेमकी कशापासून मुक्तता झाली आहे, हे मला उमगलं.
आज माझ्या देशात काही लोक विचारतात, "या सगळ्या प्रतिकाराचा युद्धाच्या वाटचालीवर काही थेट लष्करी परिणाम झाला का?" पण माझ्या पिढीसाठी हा प्रश्न निरर्थक आहे. आम्हांला प्रतिकार चळवळीचा नैतिक आणि मानसिक अर्थ ताबडतोब समजला होता. युरोपीय म्हणून आम्ही मुक्तीची वाट निष्क्रियपणे पाहत बसलो नव्हतो, याचा आम्हांला अभिमान होता. आमचं स्वातंत्र्य पुन्हा मिळवून देण्यासाठी अमेरिकन तरुण स्वतःचं रक्त सांडत होते. त्यांनाही हे कळणं महत्त्वाचं होतं की आघाडीवरच्या गोळीबारामागे युरोपीय लोकही त्यांचं ऋण फेडत होते.
माझ्या देशात आज अशीही माणसं आहेत जी म्हणतात की प्रतिकार चळवळ हे कम्युनिस्टांनी रचलेलं धडधडीत खोटं होतं. कम्युनिस्टांनी या चळवळीचा आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखा फायदा घेतला, हे खरं आहे. कारण या चळवळीत त्यांची भूमिका प्रमुख होती. पण मला मात्र वेगवेगळ्या रंगांचे रुमाल बांधलेले पार्टिझन आठवतात.
मी रात्री रेडिओला चिकटून बसायचो. खिडक्या बंद असायच्या आणि शहरभर वीज नसल्यामुळे बाहेर अंधार असायचा. रेडिओभोवतीची जागा एका लहानशा प्रकाशाने उजळलेली असे. त्यात बसून मी लंडनहून पार्टिझनांना पाठवले जाणारे संदेश ऐकायचो. हे संदेश गूढ आणि तरीही काव्यमय होते (The sun also rises, The roses will bloom). त्यांपैकी बहुतेक संदेश "messaggi per la Franchi", म्हणजे 'फ्रांकीसाठी' असायचे. कोणीतरी माझ्या कानात कुजबुजलं की फ्रांकी हा वायव्य इटलीतील सर्वांत शक्तिशाली भूमिगत जाळ्याचा नेता आहे. अफाट धैर्याचा माणूस अशी त्याची ख्याती होती. मग फ्रांकी माझा नायक झाला.
फ्रांकीचं खरं नाव एदोआर्दो सोन्यो होतं. तो राजेशाहीचा समर्थक होता. तो इतका प्रखर कम्युनिस्टविरोधी होता की युद्धानंतर तो अतिउजव्या गटांमध्ये सामील झाला. प्रतिगामी सत्तापालटाच्या एका कटात सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर झाला. पण काय फरक पडतो? सोन्यो आजही माझ्या लहानपणीचा स्वप्नवत नायक आहे. मुक्ती ही वेगवेगळ्या रंगांच्या लोकांनी एकत्र येऊन केलेली कृती होती.
आज माझ्या देशात काही लोक म्हणतात की मुक्तिसंग्रामाचा काळ हा दुःखद, फूट पाडणारा काळ होता आणि आता आपल्याला फक्त राष्ट्रीय सलोखा हवा आहे. त्या भयंकर वर्षांच्या स्मृती दडपून टाकाव्यात, असं ते म्हणतात: reprimée, refoulée, verdrängt. पण दडपून टाकल्यामुळेच न्यूरोसिस निर्माण होतो. सलोख्याचा अर्थ सद्भावनेने आपापलं युद्ध लढलेल्या सर्वांबद्दल करुणा आणि आदर बाळगणं असा असेल, तर ठीक आहे. पण क्षमा करणं म्हणजे भूतकाळ विसरणं नव्हे. ॲडॉल्फ आइकमनचा त्याच्या कार्यावर मनापासून विश्वास होता, हेसुद्धा मी मान्य करायला तयार आहे. पण म्हणून मी असं म्हणू शकत नाही, "ठीक आहे, परत या आणि पुन्हा ती कृत्यं करा." जे घडलं ते आठवायला, आणि "त्यांनी" पुन्हा तसं करू नये असं ठणकावून सांगायला आपण इथे आहोत.
पण "ते" म्हणजे कोण?
दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोपवर राज्य करणाऱ्या एकाधिकारशाही सत्तांचा आज विचार केला, तर सहज म्हणता येईल की त्या सत्ता वेगळ्या ऐतिहासिक परिस्थितीत त्याच स्वरूपात पुन्हा उभ्या राहणं कठीण आहे. मुसोलिनीच्या फॅसिझमचा पाया काय होता? सामर्थ्यशाली नेता. कॉर्पोरेटिझम. रोमची साम्राज्यवादी नियती. नवे प्रदेश जिंकण्याची साम्राज्यवादी इच्छा. अतिरेकी राष्ट्रवाद. संपूर्ण राष्ट्राला काळ्या कपड्यांच्या लष्करी शिस्तीत बांधण्याचा आदर्श. संसदीय लोकशाहीला नकार आणि ज्यूविरोध. हा पाया पाहता, इटलीतल्या Alleanza Nazionale (नॅशनल अलायन्स) या पक्षाचं मुसोलिनीच्या जुन्या फॅसिझमशी फार कमी नातं आहे, हे मान्य करायला मला काहीच अडचण नाही की. हा पक्ष युद्धोत्तर फॅसिस्ट पक्ष MSIमधून तयार झाला होता. तो निःसंशयपणे उजव्या विचारांचा पक्ष असला, तरी जुन्या फॅसिझमपासून बराच दूर गेला आहे. त्याचप्रमाणे युरोपात, अगदी रशियातही, जिकडे-तिकडे नाझीसदृश चळवळी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्याबद्दल मला काळजी वाटते. तरीही नाझीवाद पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपात, एखादी देशव्यापी चळवळ म्हणून उदयाला येईल असं मला वाटत नाही.
राजवटी उलथून टाकता येतात. विचारसरणींवर टीका होऊ शकते, त्या नाकारल्याही जाऊ शकतात. तरीही, प्रत्येक राजवटीच्या आणि तिच्या विचारसरणीच्या मागे विचार करण्याची आणि अनुभवण्याची एक पद्धत असते. सांस्कृतिक सवयींचा एक संच असतो. गूढ प्रवृत्ती आणि अथांग ऊर्मी असतात. मग प्रश्न पडतो की युरोपवर (आणि कदाचित बाकी जगावरही) अजून एखादं भूत घोंघावतंय का?
आयनेस्को एकदा म्हणाला होता, "केवळ शब्दांनाच महत्त्व असतं; बाकी सगळी निव्वळ वटवट." भाषिक सवयी अनेकदा आत दडलेल्या भावनांची महत्त्वाची लक्षणं असतात. म्हणूनच हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. केवळ प्रतिकाराची चळवळच नव्हे, तर संपूर्ण दुसऱ्या महायुद्धालाच जगभर फॅसिझमविरुद्धचा लढा का म्हणलं गेलं? हेमिंग्वेचं 'फॉर हूम द बेल टोल्स' पुन्हा वाचा. त्यातला रॉबर्ट जॉर्डन आपल्या शत्रूंना फॅसिस्ट म्हणतो. अगदी स्पॅनिश फालांजिस्टांबद्दल बोलतानाही तो 'फॅसिस्ट' हाच शब्द वापरतो. फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्या दृष्टीनेही "अमेरिकन जनतेचा आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांचा विजय म्हणजे फॅसिझमवर आणि त्याने दर्शवलेल्या जुलूमशाहीवर मिळवलेला विजय असेल."
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पॅनिश युद्धात उतरलेल्या अमेरिकनांना "उतावळे फॅसिस्टविरोधी" म्हणलं जायचं. म्हणजे चाळीसच्या दशकात हिटलरशी लढणं हे प्रत्येक चांगल्या अमेरिकनाचं नैतिक कर्तव्य होतं. पण तीसच्या दशकात फ्रँकोशी लढणं म्हणजे खूपच उतावळेपणा! कारण स्पॅनिश लढा मुख्यतः कम्युनिस्ट आणि इतर डाव्यांनी उभा केला होता, म्हणून तो नकोसा वाटायचा. आणखी एक गोष्ट. तीस वर्षांनंतर अमेरिकन कट्टरपंथी, आपल्या धूम्रपानाच्या सवयीला मान्यता न देणाऱ्या पोलिसाला "फॅसिस्ट डुक्कर" का म्हणत होते? कागुलार्ड डुक्कर, फालांजिस्ट डुक्कर, उस्ताशे डुक्कर, क्विस्लिंग डुक्कर किंवा नाझी डुक्कर असं ते का म्हणाले नाहीत?
"माईन काम्फ" हा एका संपूर्ण राजकीय कार्यक्रमाचा जाहीरनामा आहे. नाझीवादाकडे वंशवादाचा आणि देवानं खास निवडलेल्या आर्यांचा सिद्धांत होता. Entartete Kunst म्हणजे "विकृत कला" ओळखायला स्पष्ट परिभाषा होती. सत्तेसाठीची आंतरिक प्रेरणा आणि 'उबरमेन्श'चं तत्त्वज्ञान होतं. नाझीवाद ठामपणे ख्रिश्चनविरोधी आणि नव-मूर्तिपूजक होता. तर स्टॅलिनचं डायमॅट (सोव्हिएत मार्क्सवादाचं अधिकृत रूप) उघडपणे भौतिकवादी आणि नास्तिक होतं. व्यक्तीची प्रत्येक कृती शासन आणि शासकीय विचारसरणीच्या अधीन ठेवणारी राजवट म्हणजे एकाधिकारशाही, असा अर्थ घेतला तर नाझीवाद आणि स्टॅलिनवाद या दोन्ही खऱ्या अर्थाने एकाधिकारशाही राजवटी होत्या.

इटालियन फॅसिझम निश्चितच हुकूमशाही होती, पण ती पूर्णतः एकाधिकारशाही नव्हती. ती सौम्य होती म्हणून नव्हे, तर तिची विचारसरणी तात्त्विकदृष्ट्या कमकुवत होती म्हणून. प्रचलित समज वेगळा असला तरी इटलीतल्या फॅसिझमला कोणतंही खास तत्त्वज्ञान नव्हतं. मुसोलिनीच्या सहीनिशी ट्रेक्कानी विश्वकोशात फॅसिझमवरचा लेख छापला गेला. हा लेख मुळात जोवान्नी जेन्तिले यानं लिहिला होता, किंवा निदान त्याच्या प्रेरणेनं लिहिला गेला होता. त्या लेखात हेगेलोत्तर, निरपेक्ष नैतिक राज्याची संकल्पना मांडली होती. मात्र मुसोलिनीने ती कधीच पूर्णपणे अमलात आणली नाही. मुसोलिनीकडे कोणतंही तत्त्वज्ञान नव्हतं. त्याच्याकडे फक्त आणि फक्त भाषणबाजी होती. सुरुवातीला तो कडवा नास्तिक होता. नंतर त्यानं चर्चशी करार केला. बिशपांचं स्वागत केलं, आणि हे बिशप त्याच्या फॅसिस्ट निशाणांना आशीर्वाद देऊ लागले. त्याच्या सुरुवातीच्या चर्चविरोधी काळाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. तिच्यानुसार मुसोलिनीने देवाचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष देवालाच आव्हान दिलं. तो म्हणाला, "मला इथल्या इथे ठार करून दाखव." पुढे मुसोलिनी आपल्या भाषणांमध्ये नेहमी देवाचं नाव घेऊ लागला. त्याला "दैवी आशीर्वाद लाभलेला माणूस" म्हणलेलं त्याला चालायचं.
इटालियन फॅसिझम ही एखाद्या युरोपीय देशावर ताबा मिळवणारी पहिली उजव्या विचारसरणीची हुकूमशाही होती. पुढच्या सगळ्या चळवळींना मुसोलिनीच्या राजवटीत एक आद्य रूप सापडलं. इटालियन फॅसिझमने पहिल्यांदा लष्करी विधिप्रथा तयार केल्या, लोकसंस्कृती घडवली, अगदी वेशभूषाही रूढ केली. त्यांचे काळे शर्ट अरमानी, बेनेटॉन किंवा व्हर्साचे यांच्या कपड्यांपेक्षा कितीतरी अधिक प्रभावशाली ठरले. तीसच्या दशकातच फॅसिस्ट चळवळी उभ्या राहिल्या. इंग्लंडमध्ये मॉस्ली आला. लाटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया, पोलंड, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, ग्रीस, युगोस्लाव्हिया, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, आणि अगदी दक्षिण अमेरिकेतही अशा चळवळी तयार झाल्या. इटालियन फॅसिझमनंच अनेक युरोपीय उदारमतवादी नेत्यांना पटवून दिलं होतं की या नव्या राजवटीने लक्षणीय सामाजिक सुधारणा केल्या आहेत आणि ती कम्युनिस्ट धोक्याला एक सौम्य क्रांतिकारी पर्याय आहे.
तरीसुद्धा 'फॅसिझम' हा शब्द या वेगवेगळ्या एकाधिकारशाही चळवळींचा प्रतिनिधी कसा झाला? केवळ ऐतिहासिक प्राधान्यामुळे याचं स्पष्टीकरण मिळत नाही. नंतरच्या एकाधिकारशाही राजवटींचे सगळे मूलभूत घटक इटालियन फॅसिझममध्ये होते, हे याचं कारण मुळीच नाही. उलट फॅसिझमला कोणताही गाभा नव्हता. फॅसिझम ही धूसर स्वरूपाची एकाधिकारशाही होती. ती वेगवेगळ्या तात्त्विक आणि राजकीय कल्पनांचा कोलाज होती. विरोधाभासांचं पोळं होती. राजेशाही आणि क्रांती एकत्र आणू शकणारी एखादी एकाधिकारशाही चळवळ उभी करता येईल का? शाही सैन्य आणि मुसोलिनीची खाजगी मिलिशिया एकत्र नांदू शकतात का? चर्चला विशेषाधिकार देऊन दुसरीकडे हिंसेचं गौरवीकरण करणारं सरकारी शिक्षण लादता येतं का? आणि संपूर्ण राज्यावर नियंत्रण असताना मुक्त बाजारपेठ चालवता येते का? फॅसिस्ट पक्ष जन्माला आला तोच नव्या क्रांतिकारी व्यवस्थेचा अभिमान मिरवत. पण त्याला पैसा पुरवला होता सर्वांत परंपरावादी जमीनदारांनी. या जमीनदारांना पक्षाकडून प्रतिक्रांतीची अपेक्षा होती. सुरुवातीला फॅसिझम प्रजासत्ताकवादी होता. तरीही वीस वर्षं तो राजघराण्याशी निष्ठेची घोषणा करत राहिला. पक्षाचा ड्यूचे (Duce, सर्वोच्च नेता) तर राजाच्या हातात हात घालून चालत होता. त्यानं राजाला सम्राटाची पदवीही देऊ केली होती. पण १९४३मध्ये राजानं मुसोलिनीला बडतर्फ केलं. आणि दोन महिन्यांतच जर्मनीच्या पाठिंब्याने फॅसिस्ट पक्ष "सामाजिक" प्रजासत्ताकाच्या झेंड्याखाली पुन्हा परत आला. त्याने आपली जुनी क्रांतिकारी संहिता पुन्हा वापरायला काढली. फक्त आता या संहितेला जवळजवळ जॅकोबिन विचारांच्या छटा होत्या.
नाझी वास्तुकलेची आणि नाझी कलेची एकच शैली होती. नाझींचा वास्तुविशारद अल्बर्ट श्पीअर असेल, तर मीस फान डेर रोहेसाठी जागाच नव्हती. तसंच स्टॅलिनच्या राजवटीत लामार्क योग्य ठरला, तर डार्विनसाठी जागा उरत नसे. इटलीत फॅसिस्ट वास्तुविशारद नक्कीच होते. पण त्यांच्या खोट्या कोलोसियमांच्या शेजारी ग्रोपियसच्या आधुनिक बुद्धिनिष्ठतेवर आधारलेल्या अनेक नव्या इमारती उभ्या होत्या.
काटेकोर सांस्कृतिक धोरण ठरवायला इटलीत कोणताही फॅसिस्ट झ्दानोव्ह नव्हता. इटलीच्या कलाक्षेत्रात दोन महत्त्वाचे पुरस्कार होते. 'प्रेमियो क्रेमोना' या पुरस्कारावर रोबेर्तो फारिनाची या कट्टर आणि अशिक्षित फॅसिस्टाचं नियंत्रण होतं. तो प्रचारतंत्र म्हणून कलेला प्रोत्साहन देत असे. ("रेडिओवर ड्यूचेचं भाषण ऐकताना" किंवा "फॅसिझमने निर्माण केलेली मनःस्थिती" अशी शीर्षकं असलेली चित्रं मला आठवतात.) दुसरा पुरस्कार होता 'प्रेमियो बेर्गामो'. त्याचा प्रायोजक होता जुझेप्पे बोत्ताई. हा सुसंस्कृत आणि बऱ्यापैकी सहिष्णू फॅसिस्ट होता. त्याने "कलेसाठी कला" या कल्पनेला आश्रय दिला. जर्मनीत अनेक अवांतगार्द कलाप्रकारांवर भ्रष्ट आणि छुपे कम्युनिस्ट म्हणून बंदी घातली गेली होती. बोत्ताईने त्या कलांनाही संरक्षण दिलं.
दान्नुन्सिओ हा इटलीचा राष्ट्रकवी होता. तो मोठा फॅशनेबल, रंगेल माणूस होता. जर्मनी किंवा रशियात असता तर त्याला गोळ्या घातल्या गेल्या असत्या. इटलीत मात्र त्याचा राष्ट्रवाद आणि त्याचं शौर्यपूजन पाहून त्याची राजवटीचा भाट म्हणून नेमणूक झाली होती. प्रत्यक्षात त्याच्या या दोन्ही प्रवृत्तींवर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या अधःपतनवादी फ्रेंच सांस्कृतिक प्रवाहांचा बराच प्रभाव होता.
आता फ्युचरिझमचं उदाहरण घ्या. कोणाला वाटेल की एक्स्प्रेशनिझम, क्युबिझम आणि सरिअलिझम यांच्यासारखंच फ्युचरिझमही Entartete Kunst, म्हणजे विकृत कलेचं उदाहरण ठरलं असणार. पण सुरुवातीचे इटालियन फ्युचरिस्ट राष्ट्रवादी होते. त्यांच्या सौंदर्यदृष्टीवर वेग, जोखीम आणि हिंसेचा प्रभाव होता, म्हणून इटलीने पहिल्या महायुद्धात भाग घ्यावा, या मताशी ही मंडळी सहमत होती. त्यांनी आपल्या कलेतून वेग, जोखीम आणि हिंसेचा गौरवच केला, आणि त्यांच्या या गौरवगानाचा फॅसिस्टांच्या तारुण्यपूजेशी काही अंशी मेळ बसत होता. फॅसिझमने स्वतःला रोमन साम्राज्याशी जोडलं होतं आणि ग्रामीण परंपरांचं पुनरुज्जीवन केलं होतं. आणि तरीही 'सामोथ्रेसच्या विजयदेवतेच्या शिल्पापेक्षा मोटारकार सुंदर आहे' असं म्हणणाऱ्या मारिनेत्तीला इटालियन अकादमीचा सदस्य म्हणून नेमलं गेलं. मारिनेत्तीला तर चंद्रप्रकाशाचाही खात्मा करायचा होता. पण तो ज्या अकादमीचा सदस्य झाला, तिच्यासाठी चंद्रप्रकाश अतिशय आदरणीय होता.
भविष्यातले कितीतरी पार्टिझन आणि कम्युनिस्ट पक्षाचे बुद्धिजीवी GUFच्या मदतीनं शिकले होते. Gruppi Universitari Fascisti ही फॅसिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना होती. 'नव्या फॅसिस्ट संस्कृतीचा उगम' ठरावी, अशी तिच्याकडून अपेक्षा होती. या संघटनांमध्ये विविध विचारांची सरमिसळ झाली. तिथे फिरणाऱ्या नव्या कल्पनांवर कोणत्याही विचारसरणीचं नियंत्रण नव्हतं. जहाल विचारांप्रती पक्षाची माणसं सहिष्णू होती असं नव्हे. पण त्यांच्यापैकी फार थोड्यांकडे त्या विचारांना आळा घालण्याइतकी बौद्धिक कुवत होती.
त्या वीस वर्षांत मोंताले आणि इतर काही लेखक "एर्मेतिची" नावाच्या गटात होते. त्यांच्या कविता म्हणजे राजवटीच्या सुजट शैलीला दिलेली प्रतिक्रिया होती. या कवींकडे हस्तिदंती मनोऱ्यातले कवी म्हणूनच पाहिलं जात होतं. त्यामुळे त्यांना आपला साहित्यिक निषेध नोंदवण्याची मुभा मिळाली होती. या कवींचा बाज फॅसिस्ट आशावादाच्या आणि वीरपूजेच्या अगदी उलट होता. राजवटीनं त्यांचा हा विरोध सहन केला, कारण तो उघड असला तरी सामाजिकदृष्ट्या नगण्य होता. त्यांच्या गूढ काव्याकडे फॅसिस्टांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
या सगळ्याचा अर्थ असा मुळीच नाही की इटालियन फॅसिझम सहिष्णू होता. ग्राम्शी मृत्यूपर्यंत तुरुंगात कैद होता. फॅसिझमला विरोध करणारे नेते जाकोमो मातेओत्ती आणि रोसेल्ली बंधू यांचे खून झाले. स्वतंत्र वृत्तपत्रांवर बंदी घातली गेली. कामगार संघटना मोडून काढण्यात आल्या. राजकीय असहमती दर्शवणाऱ्यांना दूरच्या बेटांवर डांबण्यात आलं. कायदेमंडळ केवळ नावापुरतं उरलं होतं. कार्यकारी सत्तेचा न्यायव्यवस्थेवर आणि प्रसारमाध्यमांवरही ताबा होता. तिनं स्वतःच नवे कायदे लागू केले. त्यांपैकी एक कायदा 'वंशसंरक्षणा'बद्दल होता. हा कायदा म्हणजे पुढे घडलेल्या होलोकॉस्टला इटलीनं दिलेला औपचारिक पाठिंबाच होता.
मी वर वर्णन केलेलं हे विरोधाभासी चित्र सहिष्णुतेमुळे तयार झालं नव्हतं. राजकीय आणि वैचारिक गोंधळ हे त्याचं खरं कारण होतं. पण तो रचलेला गोंधळ होता. त्या गोंधळालाही कडक शिस्त होती. फॅसिझम तात्त्विकदृष्ट्या विस्कळीत होता. भावनिकदृष्ट्या मात्र त्याचा पाया पक्का होता.
म्हणून आता माझा दुसरा मुद्दा. नाझीवाद एकच होता. फ्रँकोच्या अतिकॅथलिक फालांजिझमला आपण नाझीवाद म्हणू शकत नाही. कारण नाझीवाद हा मुळात मूर्तिपूजक, बहुदेववादी आणि ख्रिश्चनविरोधी आहे. पण फॅसिझमचा हा खेळ अनेक प्रकारे खेळता येतो, आणि तरीही त्याचं नाव बदलत नाही. फॅसिझमची कल्पना विटगेनश्टाइनच्या 'खेळ' या कल्पनेसारखीच आहे. खेळ स्पर्धात्मक असू शकतो किंवा नसू शकतो. त्यासाठी विशेष कौशल्य लागतं किंवा लागत नाही. त्यात पैसा गुंतलेला असतो किंवा नसतो. विटगेनश्टाइनच्या शब्दांत सांगायचं तर, ज्यांच्यात थोडंफार 'साम्यवैशिष्ट्य' असतं अशा वेगवेगळ्या क्रियांना आपण खेळ म्हणतो. आता पुढे दिलेला क्रम पाहा.
समजा, काही राजकीय गट आहेत. पहिल्या गटाची वैशिष्ट्यं ABC आहेत, दुसऱ्याची BCD, आणि असंच पुढे. पहिल्या आणि दुसऱ्या गटात दोन वैशिष्ट्यं समान आहेत, म्हणजे ते सारखे आहेत. याच न्यायाने दुसरा व तिसरा सारखे, आणि तिसरा व चौथाही सारखे. आता पाहा, पहिल्या आणि तिसऱ्या गटात C हे वैशिष्ट्य समान आहे, म्हणजे ते दोन्हीही सारखेच. चौथ्या गटाचं उदाहरण सगळ्यात गमतीदार आहे. चौथा गट साहजिकच दुसऱ्या आणि तिसऱ्यासारखा आहे. पण पहिल्या गटाशी मात्र त्याचं एकही वैशिष्ट्य समान नाही. तरीही पहिल्या गटापासून चौथ्या गटापर्यंत साधर्म्याचा एक अखंड क्रम दिसतो, ज्यात साम्य हळूहळू कमी होत जातं. या क्रमातील मधल्या गटांमुळे परस्परांतील साम्याची साखळी टिकून राहते. म्हणजे या भासमान संक्रमणामुळे चौथ्या आणि पहिल्या गटामध्ये साम्य उरतंच.
फॅसिझम हा सर्वसमावेशक शब्द झाला, कारण फॅसिस्ट राजवटीतून एक किंवा अनेक वैशिष्ट्यं काढून टाकली तरी तिची ओळख फॅसिस्टच उरते. फॅसिझममधून साम्राज्यवाद गाळला, तरी फ्रँको आणि सालाझार उरतात. वसाहतवाद गाळला, तरी बाल्कनमधला उस्ताशेंचा फॅसिझम उरतो. इटालियन फॅसिझममध्ये भांडवलशाहीच्या कट्टर विरोधाचं लक्षण जोडलं (मुसोलिनीला त्यात फारसा रस नव्हता), की कवी एझरा पाउंड मिळतो. त्यात केल्टिक पुराणकथांची उपासना आणि होली ग्रेलचं गूढ मिसळलं (अधिकृत फॅसिझमसाठी हे सारं अपरिचित होतं), की मिळतो सर्वांत आदरणीय फॅसिस्ट गुरूंपैकी एक, ज्युलियस एव्होला.
पण ही सगळी अस्पष्टता असूनही मला वाटतं की मी ज्याला उर-फॅसिझम किंवा शाश्वत फॅसिझम म्हणतो आहे, त्याची वैशिष्ट्यं एका यादीत मांडता येतात. ही वैशिष्ट्यं एका रचनेत बसवता येत नाहीत. त्यांतली अनेक एकमेकांशी विसंगत आहेत. शिवाय ती इतर प्रकारच्या जुलूमशाहीत आणि धर्मवेडातही दिसून येतात. पण त्यांपैकी एखादं जरी वैशिष्ट्य असलं, तरी त्याभोवती फॅसिझम बस्तान मांडू शकतो.
१. उर-फॅसिझमचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे परंपरेची उपासना. परंपरावाद अर्थातच फॅसिझमपेक्षा खूप जुना आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या प्रतिक्रांतिकारी कॅथलिक विचारातही परंपरावाद होताच. पण त्याहून खूप पूर्वी, उत्तर हेलेनिस्टिक काळात त्याचा उगम झाला. ग्रीक बुद्धिवादाला दिलेली प्रतिक्रिया म्हणून तो जन्माला आला. भूमध्य सागराच्या परिसरात वेगवेगळ्या धर्मांचे लोक राहत होते (रोमन पँथियन त्यांच्यापैकी बहुतेकांना उदारपणे स्वीकारत असे). हे लोक मानवी इतिहासाच्या प्रारंभी मिळालेल्या एका साक्षात्काराची स्वप्नं पाहू लागले. परंपरावादी गूढवादानुसार तो साक्षात्कार विस्मृतीत गेलेल्या भाषांच्या पडद्याआड लपला होता. तो इजिप्शियन चित्रलिपींमध्ये होता. केल्टिक चिन्हांमध्ये होता. आशियातल्या अल्पपरिचित धर्मग्रंथांतही होता.
ही नवी संस्कृती समन्वयवादी असणं भाग होतं. शब्दकोशानुसार "समन्वयवाद म्हणजे वेगवेगळ्या श्रद्धा किंवा आचारांचं एकत्र येणं." पण असं एकत्र येताना आपापसांतले विरोधाभास सहन करावे लागतात. प्रत्येक मूळ संदेशात ज्ञानाचा एक कण असतो. आणि जेव्हा कधी हे संदेश वेगळे किंवा परस्परविरोधी वाटतात, तेव्हा त्याचं कारण एकच असतं. हे सगळे संदेश रूपकांच्या मदतीने एकाच आदिम सत्याकडे बोट दाखवत असतात.
परिणामी, ज्ञानात प्रगती होऊ शकत नाही. सत्य एकदाच आणि कायमचं सांगून झालेलं आहे. आपल्या हातात फक्त त्या गूढ संदेशाचा अर्थ लावत राहणं उरतं.
कोणत्याही फॅसिस्ट चळवळीचा अभ्यासक्रम पाहिला की त्यात प्रामुख्याने परंपरावादी विचारवंत सापडतात. नाझी ग्नॉसिस, म्हणजे नाझी गूढवाद, हा परंपरावादी, समन्वयवादी आणि अलौकिक गूढ घटकांवर पोसलेला होता. इटलीतल्या नव्या उजव्यांसाठी ज्युलियस एव्होला हा सर्वांत प्रभावी सैद्धांतिक स्रोत होता. त्याने होली ग्रेल आणि "प्रोटोकॉल्स ऑफ द एल्डर्स ऑफ झायन" एकत्र केले. किमया (अल्केमी) आणि पवित्र रोमन-जर्मन साम्राज्यही एकत्र केलं. आपली खुली विचारसरणी दाखवण्यासाठी इटलीतील उजव्यांनी अलीकडेच आपल्या अभ्यासक्रमात दे मेस्त्र, गेनों आणि ग्राम्शी यांच्या लेखनाचाही समावेश केला आहे. हा समावेश म्हणजेच समन्वयवादाची उघड साक्ष आहे.
अमेरिकन पुस्तकांच्या दुकानांत "न्यू एज" म्हणून लावलेली कपाटं चाळली, तर तिथे संत ऑगस्टिनही सापडतो. माझ्या माहितीप्रमाणे तरी तो फॅसिस्ट नव्हता. पण संत ऑगस्टिन आणि स्टोनहेंज यांची सरमिसळ करणं हे उर-फॅसिझमचं लक्षण आहे.
२. परंपरावादात आधुनिकतेला नकार अंतर्भूत असतो. फॅसिस्ट आणि नाझी दोघंही तंत्रज्ञानाची पूजा करत. याउलट परंपरावादी विचारवंत सहसा तंत्रज्ञान नाकारतात, कारण ते पारंपरिक आध्यात्मिक मूल्यांच्या विरुद्ध आहे असं त्यांना वाटतं. नाझीवादाला आपल्या औद्योगिक कामगिरीचा अभिमान होता. पण आधुनिकतेची ही स्तुती वरवरची होती. त्या स्तुतीखालची विचारसरणी मात्र 'Blut und Boden' या संकल्पनेवर आधारलेली होती. ज्यांचं रक्त, त्यांची जमीन, असा वंश आणि जमीन यांचा सहसंबंध जोडणारी ही संकल्पना होती. नाझींनी आधुनिक जगाला दिलेला नकार हा भांडवली जीवनपद्धतीच्या विरोधाच्या आवरणाखाली लपला होता. पण त्यांचा मुख्य रोख १७८९च्या (आणि अर्थातच १७७६च्याही) विचारांना नाकारण्याकडे होता. प्रबोधनयुग, म्हणजे बुद्धिप्रामाण्याचा काळ, ही आधुनिक अधःपतनाची सुरुवात मानली जाते. त्या अर्थाने उर-फॅसिझमची व्याख्या irrationalism, म्हणजेच 'अविवेकवाद' अशी करता येईल.
३. अविवेकवाद हा केवळ 'कृतीसाठी कृती' करण्याच्या अट्टाहासावर अवलंबून असतो. कृती स्वतःच सुंदर आणि श्रेष्ठ असल्यामुळे ती विचार न करता, किंवा विचार करण्याआधीच, केली पाहिजे. विचार करणं म्हणजे निर्बलता, पुरुषत्व गमावण्याचाच एक प्रकार. संस्कृती टीकात्मक वृत्तींशी जोडलेली असते, त्यामुळे तिच्याकडे नेहमीच संशयाने पाहिलं जातं. बौद्धिक जगावरचा अविश्वास हे नेहमीच उर-फॅसिझमचं लक्षण राहिलं आहे. "जेव्हा मी संस्कृतीच्या गप्पा ऐकतो, तेव्हा मी बंदुकीला हात घालतो", या गोरिंगच्या कथित वाक्यापासून ते "विकृत बुद्धिजीवी", "अक्कलपंडित", "उंटावरून शेळ्या हाकणारे", "विद्यापीठं म्हणजे डाव्यांचा अड्डा" अशा वाक्प्रचारांच्या वारंवार वापरापर्यंत हेच दिसून येतं. फॅसिस्ट विचारवंत मुख्यतः आधुनिक संस्कृतीवर हल्ला करण्यात गुंतले होते. उदारमतवादी बुद्धिजीवी वर्गाने पारंपरिक मूल्यांशी दगाफटका केला, असं म्हणून ते त्यांच्यावरही तुटून पडत.
४. कोणतीही समन्वयवादी श्रद्धाव्यवस्था विश्लेषणात्मक टीका सहन करू शकत नाही. टीकात्मक वृत्ती भेद करते आणि असा भेद करणं हे आधुनिकतेचं लक्षण आहे. आधुनिक संस्कृतीत वैज्ञानिक समुदाय मतभेदाचा गौरव करतो, कारण तो ज्ञान सुधारण्याचा मार्ग आहे. पण उर-फॅसिझमसाठी मतभेद म्हणजे देशद्रोह.
५. शिवाय, मतभेद हे विविधतेचं लक्षण आहे. उर-फॅसिझम वाढताना जनमत मिळवू पाहतो. भिन्नतेची नैसर्गिक भीती माणसांमध्ये असते. जनतेचं एकमत मिळवण्यासाठी उर-फॅसिझम याच भीतीचा गैरफायदा घेतो. तो जनमानसात ती भीती रुजवतो आणि वाढवतो. त्यामुळे फॅसिस्ट किंवा फॅसिस्टसदृश चळवळींचं पहिलं आवाहन बाहेरच्या घुसखोरांविरुद्ध असतं. म्हणून उर-फॅसिझम व्याख्येनेच वर्णद्वेषी असतो.
६. उर-फॅसिझम वैयक्तिक किंवा सामाजिक निराशेतून निर्माण होतो. म्हणूनच ऐतिहासिक फॅसिझमचं एक सर्वांत ठळक वैशिष्ट्य होतं की तो निराश मध्यमवर्गाला आवाहन करायचा. हा मध्यमवर्ग आर्थिक संकटाने किंवा राजकीय अपमानाच्या भावनेने त्रस्त असायचा. समाजातल्या कनिष्ठ वर्गाच्या रेट्याची त्याला भीती वाटायची. आपल्या काळात जुने 'कामगार' लहान-सहान भांडवलदार होऊन मध्यमवर्गात येत आहेत. समाजाच्या तळाशी असलेला असंघटित आणि उपेक्षित वर्ग मात्र बहुतांशी राजकीय पटलावरून बाहेर फेकला गेला आहे. म्हणून उद्याचा फॅसिझम या नव्या बहुसंख्य मध्यमवर्गीय लोकांमध्ये आपला श्रोतावर्ग शोधेल.
७. ठोस सामाजिक ओळख नसलेल्या लोकांना उर-फॅसिझम सांगतो की तुमचं एकमेव अहोभाग्य इतकंच की तुम्ही या देशात जन्माला आला आहात. राष्ट्रवादाचं मूळ इथे आहे. शिवाय राष्ट्राला ओळख मिळते ती त्याच्या शत्रूंमुळेच. म्हणून उर-फॅसिस्ट मानसिकतेच्या मुळाशी एका कटाचं, शक्यतो आंतरराष्ट्रीय कटाचं वेड असतं. अनुयायांना सतत वेढल्यासारखं, धोक्यात असल्यासारखं वाटलं पाहिजे. कट उघड करण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे परकीयांचा द्वेष. पण कट फक्त परकीय नव्हे, तर देशांतर्गतही शिजत असल्याचं दाखवावं लागतं. ज्यू हे सहसा सर्वांत चांगलं लक्ष्य असतात, कारण ते एकाच वेळी देशात आणि देशाबाहेरही असतात. अमेरिकेत कटाच्या या वेडाचं एक ठळक उदाहरण म्हणजे पॅट रॉबर्टसनचं "द न्यू वर्ल्ड ऑर्डर." अलीकडच्या काळातही अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत.
८. शत्रूंच्या संपत्तीचा भपका आणि त्यांचं शक्तिप्रदर्शन पाहून फॅसिझमच्या अनुयायांना सतत अपमानित वाटलं पाहिजे. मी लहान असताना मला शिकवलं गेलं होतं की इंग्रज हे "पाच वेळा जेवणारे लोक" असतात. गरीब पण काटकसरी इटालियनांपेक्षा इंग्रज जास्त वेळा खातात. ज्यू लोक श्रीमंत असतात. त्यांचं एक गुप्त जाळं असतं आणि त्याद्वारे ते एकमेकांना मदत करत असतात. पण अनुयायांना हेही पटलं पाहिजे की ते या शत्रूंना चिरडू शकतात. म्हणून वक्तृत्वाचा रोख सतत बदलत राहतो. शत्रू एकाच वेळी खूप सामर्थ्यवान आणि खूप दुबळे दाखवले जातात. फॅसिस्ट सरकारं युद्धं हरायला नशिबानेच बांधलेली असतात. कारण शत्रूच्या बळाचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायला ती मुळातच असमर्थ असतात.
९. उर-फॅसिझममध्ये जगण्यासाठी संघर्ष नसतो, उलट संघर्षासाठीच जगणं असतं. म्हणून शांततावाद म्हणजे शत्रूशीच हातमिळवणी. शांततावाद वाईट आहे, कारण जीवन म्हणजे सततचं युद्ध. यातून "आर्मागेडोन कॉम्प्लेक्स" निर्माण होतो. शत्रूंचा पराभव करायचा असेल, तर एक अखेरची लढाई असायलाच हवी. त्यानंतर चळवळ साऱ्या जगावर सत्ता प्रस्थापित करेल. पण असा "अंतिम तोडगा" त्यानंतर येणाऱ्या शांततेच्या सुवर्णयुगाच्या आगमनाचं आश्वासन देतो, आणि ते सततच्या युद्धाच्या तत्त्वाशी विसंगत आहे. कोणत्याही फॅसिस्ट नेत्याला ही कोंडी सोडवण्यात यश आलेलं नाही.
१०. अभिजनवाद हा कोणत्याही प्रतिगामी विचारसरणीचा एक ठरावीक पैलू असतो, कारण त्याच्या मुळाशी उमरावशाहीची वृत्ती असते. या उमरावशाही आणि लष्करी अभिजनवादात दुर्बलांविषयी क्रूर तुच्छता अंतर्भूत असते. उर-फॅसिझम मात्र केवळ लोकाभिमुख उच्चभ्रूवादाचं समर्थन करू शकतो. जगातील सर्वोत्तम लोकांमध्ये प्रत्येक नागरिकाचा समावेश होतो. त्या नागरिकांमध्ये पक्षाचे सदस्य सर्वश्रेष्ठ असतात. आणि प्रत्येक नागरिक पक्षाचा सदस्य होऊ शकतो (किंवा त्याने व्हायलाच हवं). पण सामान्य जनांशिवाय श्रेष्ठकुळातील अभिजन असू शकत नाहीत. आपल्याला सत्ता लोकशाही मार्गाने मिळालेली नसून बळाच्या जोरावर मिळवलेली आहे, याची फॅसिस्ट नेत्याला जाणीव असते. आपलं बळ जनसमुदायाच्या दुर्बलतेवर आधारलेलं आहे, हेही त्याला माहीत असतं. जनसमुदाय इतका दुर्बल आहे की त्याला शासकाची गरज आहे, आणि तो शासकाच्या अधीन राहण्यास पात्रही आहे. गट लष्करी पद्धतीनं उतरंडीत रचलेला असल्यामुळे प्रत्येक कनिष्ठ नेता आपल्या हाताखालच्या लोकांना तुच्छ लेखतो, आणि त्यांच्यातला प्रत्येकजण आपल्या खालच्यांना. यामुळे संपूर्ण जनसमुदायात सामूहिक अभिजनत्वाची, अर्थात आपण श्रेष्ठ असल्याची भावना अधिकच बळकट होते.
११. या दृष्टिकोणातून प्रत्येकाला 'नायक' होण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक पुराणकथेत नायक हा एक असाधारण माणूस असतो. पण उर-फॅसिस्ट विचारसरणीत नायकत्व, वीरश्री ही सर्वसामान्य रीत आहे. या नायकपूजेचा मृत्युपूजेशी जवळचा संबंध आहे. फालांजिस्टांची एक घोषणा "Viva la Muerte" होती, हा काही योगायोग नाही. या स्पॅनिश घोषणेचा अनुवाद "मृत्यू चिरायू होवो!" असा करावा लागेल. बिगर-फॅसिस्ट समाजांमध्ये सामान्य जनतेला सांगितलं जातं की मृत्यू कटू असतो, पण त्याला सन्मानाने सामोरं गेलं पाहिजे. श्रद्धाळूंना सांगितलं जातं की तो अलौकिक आनंदाकडे नेणारा वेदनादायी मार्ग आहे. याच्या उलट, उर-फॅसिस्ट नायक वीरश्रीयुक्त मृत्यूसाठी आसुसलेला असतो. वीराच्या आयुष्याचं सर्वोत्तम बक्षीस म्हणून मृत्यूची भलावण केली जाते. उर-फॅसिस्ट नायक मरायला अधीर असतो, आणि त्या अधीरतेमुळे बहुतेक वेळा तो दुसऱ्यांनाच मृत्यूच्या दारी पाठवतो.
१२. कायमचं युद्ध आणि वीरश्री या दोन्ही गोष्टी निभावणं कठीण असतं. म्हणून उर-फॅसिस्ट आपली सत्तेची इच्छा लैंगिक बाबींकडे वळवतो. हेच पुरुषी वर्चस्वाच्या उन्मादाचं (machismo) मूळ आहे. या उन्मादात स्त्रियांबद्दल तुच्छता असते. तसंच ब्रह्मचर्यापासून समलैंगिकतेपर्यंत प्रत्येक "नेहमीपेक्षा वेगळ्या" लैंगिक सवयीबद्दल असहिष्णुता आणि निंदा असते. लैंगिक संबंध हाही जरा अवघडच प्रकार असल्यामुळे उर-फॅसिस्ट नायक शस्त्रांशी खेळायला लागतो. शस्त्रांशी खेळणं हा लैंगिक वर्चस्वाच्या पोकळ प्रदर्शनाचा एक पर्यायी खेळ ठरतो.
१३. उर-फॅसिझम एका निवडक लोकानुनयावर उभा असतो. त्याला "गुणात्मक" लोकानुनय म्हणता येईल. लोकशाहीत नागरिकांना वैयक्तिक हक्क असतात. पण सर्व नागरिकांचा मिळून पडणारा राजकीय प्रभाव हा केवळ संख्यात्मक असतो. म्हणूनच आपण बहुमताचा नियम पाळतो. पण उर-फॅसिझममध्ये नागरिकांना 'व्यक्ती' म्हणून कोणतेही हक्क नसतात. जनता हा गुणात्मक घटक मानला जातो. ती सामायिक इच्छेची अभिव्यक्ती करणारी एकसंध संस्था मानली जाते. अर्थातच इतक्या मोठ्या संख्येच्या माणसांची एकच सामायिक इच्छा असू शकत नाही. म्हणून नेता स्वतःला त्यांचा दुभाषी म्हणून मिरवतो. नागरिकांनी प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार गमावलेला असतो, म्हणून ते कोणतीही कृती करत नाहीत. त्यांना फक्त "जनतेची" भूमिका वठवायला बोलावलं जातं. जनता ही एकसंध संकल्पना निव्वळ एक नाटकी ढोंग ठरते. गुणात्मक लोकानुनयाचं चांगलं उदाहरण पाहायला आपल्याला आता रोममधल्या पियाझा व्हेनेत्सियाकडे किंवा नुरेंबर्गच्या स्टेडियमकडे पाहण्याची गरज नाही. आपल्या भविष्यात टीव्हीवरचा किंवा इंटरनेटवरचा लोकानुनय आहे. तिथे निवडक नागरिकांच्या भावनिक प्रतिसादालाच "जनतेचा आवाज" म्हणून सादर केलं आणि मान्य केलं जाऊ शकतं.
गुणात्मक लोकानुनयामुळे उर-फॅसिझमला "कुजलेल्या" संसदीय सरकारांच्या विरोधात असावंच लागतं. मुसोलिनीने इटालियन संसदेत उच्चारलेल्या पहिल्या वाक्यांपैकी एक होतं, "मी या बधिर आणि उदासवाण्या जागेचं माझ्या मॅनिपलसाठी छावणीत रूपांतर केलं असतं." (मॅनिपल म्हणजे पारंपरिक रोमन सैन्याची उपशाखा.) खरं तर त्याला लगेचच आपल्या मॅनिपलसाठी चांगली जागा सापडली. पण थोड्याच काळानं त्यानं संसद बरखास्त केली. जिथे कुठे एखादा राजकारणी संसदेच्या वैधतेवर शंका घेतो आणि म्हणतो की आताशा संसद "जनतेचा आवाज" मांडत नाही, तिथे उर-फॅसिझमचा वास येऊ लागतो.
१४. उर-फॅसिझम न्यू-स्पीक भाषेत बोलतो. जॉर्ज ऑर्वेलने "१९८४" या कादंबरीसाठी न्यू-स्पीक ही भाषा तयार केली. कादंबरीतल्या इंगसोक या समाजवादी इंग्लिश राज्याची ती अधिकृत भाषा होती. पण उर-फॅसिझमचे घटक वेगवेगळ्या हुकूमशाहींमध्ये समान असतात. सगळ्या नाझी आणि फॅसिस्ट पाठ्यपुस्तकांमध्ये मोजका शब्दसंग्रह आणि प्राथमिक वाक्यरचना वापरली जायची. त्यामागे जटिल आणि टीकात्मक विचारांची साधनंच मर्यादित करणं हा हेतू होता. पण आपण न्यू-स्पीकचे इतर प्रकारही ओळखायला तयार असलं पाहिजे, ते अगदी एखाद्या निरुपद्रवी वाटणाऱ्या लोकप्रिय टॉक-शोच्या रूपात आपल्यासमोर आले तरीही.
२७ जुलै १९४३च्या सकाळी सांगण्यात आलं की रेडिओवरच्या बातमीनुसार फॅसिस्ट राजवट कोसळली आहे आणि मुसोलिनीला अटक झाली आहे. आईनं मला पेपर आणायला पाठवलं. जवळच्या स्टॉलवर गेल्यावर मला तिथल्या पेपरांची शीर्षकं वेगवेगळी दिसली. शिवाय मथळे पाहिल्यावर मला जाणवलं की प्रत्येक पेपर वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय. मी डोळे मिटून एक पेपर उचलला. त्याच्या पहिल्या पानावर पाच-सहा राजकीय पक्षांची सही असलेला संदेश होता. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, पार्तितो द'अत्सिओने आणि उदारमतवादी पक्ष यांचा त्यात समावेश होता.
तोवर माझा असा समज होता की प्रत्येक देशात एकच पक्ष असतो, आणि इटलीमध्ये पार्तितो नात्सिओनाले फासिस्ता (नॅशनल फॅसिस्ट पार्टी) हाच तो एक पक्ष आहे. आता मला कळत होतं की माझ्या देशात एकाच वेळी अनेक पक्ष असू शकतात. मी हुशार मुलगा असल्यामुळे माझ्या लगेच लक्षात आलं की इतके पक्ष एका रात्रीत जन्माला येऊ शकत नाहीत. ते सगळे काही काळ भूमिगत संघटना म्हणून अस्तित्वात असले पाहिजेत. पहिल्या पानावरचा संदेश हुकूमशाहीच्या अंताचा आणि स्वातंत्र्य परत मिळाल्याचा उत्सव साजरा करत होता. भाषणाचं स्वातंत्र्य, वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य आणि राजकीय संघटनांचं स्वातंत्र्य. "स्वातंत्र्य", "हुकूमशाही", "मुक्ती" हे शब्द मी आयुष्यात पहिल्यांदाच वाचत होतो. या नव्या शब्दांमुळे मी पुन्हा एकदा 'स्वतंत्र पाश्चात्त्य माणूस' म्हणून जन्माला आलो होतो.
आपण या शब्दांचा अर्थ पुन्हा विसरणार नाही, यासाठी सावध राहायला हवं. उर-फॅसिझम आजही आपल्या आजूबाजूला आहे, कधीकधी साध्या वेशात. आपल्यासाठी ते किती सोपं झालं असतं, जर कोणी जागतिक रंगमंचावर येऊन म्हणालं असतं, "मला ऑशविट्झ पुन्हा उघडायचंय. मला इटलीच्या चौकाचौकांत पुन्हा काळ्या शर्टांची कवायत हवी आहे." पण आयुष्य इतकं सोपं नसतं. उर-फॅसिझम अगदी निरुपद्रवी भासणाऱ्या रूपातही परत येऊ शकतो. हा फॅसिझम ओळखणं, त्याचा बुरखा फाडणं आणि त्याच्या प्रत्येक नव्या रूपाकडे बोट दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे. रोज, जगाच्या प्रत्येक भागात. ४ नोव्हेंबर १९३८ रोजी फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी उच्चारलेले शब्द आठवण्यासारखे आहेत:
"मी हे धाडसी विधान करण्याचं धाडस करतो की जर अमेरिकन लोकशाहीने एखाद्या जिवंत शक्तीसारखी पुढे जाणं थांबवलं, आणि रात्रंदिवस शांततामय मार्गांनी आपल्या नागरिकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न तिने सोडला, तर आपल्या भूमीत फॅसिझम बळकट होत जाईल."
स्वातंत्र्य आणि मुक्ती हे कधीही न संपणारं, अखंड कार्य आहे. या लेखाचा शेवट मी फ्रांको फोर्तिनी यांच्या एका कवितेने करतो. (स्टीफन सार्तारेल्ली यांच्या इंग्रजी अनुवादावरून अनुवादित)
पुलाच्या कठड्यावर
फाशी दिलेल्यांची डोकी
ओढ्याच्या वाहत्या पाण्यात
फाशी दिलेल्यांची थुंकी.
बाजारातल्या फरसबंदीवर
गोळ्या घातलेल्यांची नखं
मैदानातल्या वाळक्या गवतावर
गोळ्या घातलेल्यांचे तुटके दात.
हवेला चावत, दगडांना चावत
आमचा देह मानवी उरला नाही
हवेला चावत, दगडांना चावत
आमची हृदयं मानवी उरली नाहीत.
पण मृतांच्या डोळ्यांत आम्ही वाचलंय
त्यातून रुजवू पृथ्वीवर स्वातंत्र्य
पण मृतांच्या घट्ट आवळलेल्या मुठीत
आहे न्याय अजून व्हायचा.
तळटीपा :
१. SS (Schutzstaffel) – नाझी जर्मनीतील निमलष्करी संघटना, जी हिटलरच्या राजवटीत दडपशाही, छळछावण्या आणि ज्यूंच्या सामूहिक हत्याकांडात महत्त्वाची भूमिका बजावत होती.
२. पार्टिझन (Partigiani) – इटलीतील दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट राजवटीविरुद्ध लढणारे प्रतिकारयोद्धे.
३. PNF (Partito Nazionale Fascista) – बेनिटो मुसोलिनीने स्थापन केलेला इटलीचा राष्ट्रीय फॅसिस्ट पक्ष.
४. इटालियन सामाजिक प्रजासत्ताक (Italian Social Republic) – १९४३ ते १९४५ या काळात उत्तर इटलीत मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली, नाझी जर्मनीच्या पाठिंब्यावर अस्तित्वात असलेले फॅसिस्ट राज्य. याला सालो प्रजासत्ताक असेही म्हणतात.
५. For Whom the Bell Tolls – अर्नेस्ट हेमिंग्वे यांची १९४० मध्ये प्रकाशित झालेली कादंबरी. स्पॅनिश यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा एका अमेरिकन स्वयंसेवकाच्या अनुभवांवर केंद्रित आहे.
६. कागुलार्ड (Cagoulards), फालांजिस्ट (Falangists), उस्ताशे (Ustaše) आणि क्विस्लिंग (Quisling) – युरोपातील विविध फॅसिस्ट किंवा अतिउजव्या राजकीय चळवळी, संघटना आणि सहकार्यवादी नेत्यांशी संबंधित संज्ञा. कागुलार्ड ही फ्रान्समधील गुप्त अतिउजवी संघटना होती; फालांजिस्ट ही स्पेनमधील फॅसिस्ट चळवळ होती; उस्ताशे ही क्रोएशियातील फॅसिस्ट संघटना होती; तर क्विस्लिंग हे नॉर्वेतील नाझी सहकार्यवादी नेते विदकुन क्विस्लिंग यांचे आडनाव होते.
७. Entartete Kunst – नाझी जर्मनीने आधुनिकतावादी कलेला हिणवण्यासाठी वापरलेली संज्ञा; तिचा अर्थ साधारणतः 'विकृत कला' असा होतो. १९३७मध्ये म्युनिक येथे या कलेविरोधात विशेष प्रदर्शन भरवण्यात आले.
८. Übermensch – जर्मन तत्त्वज्ञ फ्रेडरिक नित्शे यांनी मांडलेली संकल्पना; तिचा अर्थ साधारणतः 'अतिमानव' असा होतो. नाझींनी या संकल्पनेचा आपल्या वंशश्रेष्ठत्वाच्या विचारसरणीशी संबंध जोडून तिचा विकृत वापर केला.
९. कॉर्पोरेटिझम (निगमवाद) – समाजातील विविध आर्थिक आणि व्यावसायिक गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांमार्फत अर्थव्यवस्था व कामगार-संबंधांचे नियमन करण्याची राजकीय-आर्थिक संकल्पना. इटालियन फॅसिझममध्ये स्वतंत्र कामगार संघटनांऐवजी राज्यनियंत्रित संस्थांना महत्त्व दिले गेले.
१०. गाब्रिएले दान्नुन्सिओ (Gabriele D'Annunzio) – इटालियन कवी, कादंबरीकार आणि राष्ट्रवादी राजकीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्या राजकीय नाट्यपूर्णतेचा, प्रतीकांचा आणि जनसमुदायाला उद्देशून केलेल्या भाषणांचा इटालियन फॅसिझमच्या शैलीवर प्रभाव पडला.
११. फिलिप्पो तोम्मासो मारिनेत्ती (Filippo Tommaso Marinetti) – इटालियन कवी आणि भविष्यवादी (Futurist) चळवळीचे संस्थापक. त्यांनी वेग, तंत्रज्ञान, हिंसक ऊर्जा आणि युद्ध यांचा गौरव केला; पुढे ते फॅसिझमचे समर्थक बनले.
१२. आंद्रेई झ्दानोव्ह (Andrei Zhdanov) – सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षातील वरिष्ठ नेता. स्टॅलिनच्या काळात कला आणि साहित्यावर पक्षाचे वैचारिक नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या मोहिमेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
१३. लामार्क आणि डार्विन (Lamarck and Darwin) – जाँ-बाप्तिस्त लामार्क आणि चार्ल्स डार्विन हे अनुक्रमे जीवांच्या उत्क्रांतीविषयीचे सिद्धांत मांडणारे फ्रेंच आणि ब्रिटिश निसर्गतज्ज्ञ. त्यांच्या सिद्धांतांमध्ये उत्क्रांती कशी घडते, याबाबत महत्त्वाचे फरक आहेत.
१४. GUF (Gruppi Universitari Fascisti) – मुसोलिनीच्या राजवटीतील फॅसिस्ट विद्यापीठीय विद्यार्थी संघटना. विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना फॅसिस्ट विचारसरणीशी जोडणे हा तिचा प्रमुख उद्देश होता.
१५. एर्मेतिची (Ermetici) – विसाव्या शतकातील इटालियन साहित्यविश्वातील Ermetismo या काव्यप्रवाहाशी संबंधित कवी. त्यांच्या कवितेत संक्षिप्तता, सूचकता आणि गुंतागुंतीच्या प्रतिमांना महत्त्व होते.
१६. युजेनियो मोंताले (Eugenio Montale) – इटालियन कवी, लेखक आणि साहित्याचे नोबेल पारितोषिक विजेते. विसाव्या शतकातील इटालियन आधुनिक कवितेतील ते एक महत्त्वाचे नाव आहेत.
१७. अंतोनियो ग्राम्शी (Antonio Gramsci) – इटालियन मार्क्सवादी विचारवंत आणि इटालियन कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकांपैकी एक. सांस्कृतिक वर्चस्व (hegemony) या संकल्पनेवरील त्यांच्या विचारांचा राजकीय सिद्धांतावर मोठा प्रभाव आहे.
१८. ऑस्वाल्ड मॉस्ली (Oswald Mosley) – ब्रिटिश राजकारणी आणि ब्रिटिश युनियन ऑफ फॅसिस्ट्सचा संस्थापक. त्यांनी ब्रिटनमध्ये फॅसिस्ट विचारसरणीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.
१९. फ्रान्सिस्को फ्रँको आणि अंतोनियो सालाझार (Franco and Salazar) – फ्रान्सिस्को फ्रँको हा स्पेनचा हुकूमशहा होता; तर अंतोनियो सालाझार हा पोर्तुगालचा दीर्घकाळ सत्तेवर राहिलेला हुकूमशहा होता.
२०. हेलेनिस्टिक कालखंड (Hellenistic period) – इ.स.पू. ३२३ मध्ये अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर सुरू झालेला आणि साधारणतः इ.स.पू. ३१ पर्यंत चाललेला कालखंड. या काळात ग्रीक संस्कृतीचा भूमध्यसागरीय प्रदेशात आणि पश्चिम आशियात प्रसार झाला.
२१. न्यू एज (New Age) – विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकप्रिय झालेली विविध आध्यात्मिक, गूढवादी आणि पर्यायी विचारप्रवाहांची व्यापक संज्ञा. यात वैयक्तिक आध्यात्मिक विकास, पर्यायी उपचारपद्धती आणि विविध धार्मिक-तत्त्वज्ञानपर कल्पनांचा समावेश होतो.
२२. उर-फॅसिझम (Ur-Fascism) – उम्बेर्तो एको यांनी फॅसिझमच्या विविध ऐतिहासिक रूपांमध्ये आढळणाऱ्या सामायिक वैशिष्ट्यांना उद्देशून वापरलेली संज्ञा. एखाद्या एकाच ऐतिहासिक फॅसिस्ट राजवटीची प्रतिकृती नसली, तरी काही विशिष्ट प्रवृत्तींच्या आधारे फॅसिस्ट राजकारण ओळखता येते, हा त्यांच्या विवेचनाचा मुख्य मुद्दा आहे.
२३. एकाधिकारशाही (Totalitarianism) – राज्य किंवा सत्ताधारी पक्षाने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या शक्य तितक्या सर्व क्षेत्रांवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारी शासनपद्धती.
२४. समन्वयवाद (Syncretism) – परस्परविरोधी किंवा भिन्न विचारसरणी, श्रद्धा आणि तत्त्वांचा चिकित्सक सुसंगतीचा आग्रह न धरता एकत्रित स्वीकार किंवा मिश्रण करण्याची प्रवृत्ती.
२५. The Protocols of the Elders of Zion – ज्यू लोक जगावर गुप्तपणे नियंत्रण मिळवण्याचा कट रचत आहेत, असा खोटा दावा करणारा बनावट दस्तऐवज. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रसारित झालेल्या या मजकुराचा ज्यूविरोधी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
२६. फ्रांको फोर्तिनी (Franco Fortini) – इटालियन कवी, निबंधकार, अनुवादक आणि मार्क्सवादी विचारवंत. साहित्य, राजकारण आणि विचारसरणी यांच्या परस्परसंबंधांवरील त्यांच्या लेखनासाठी ते ओळखले जातात.