कला तुमच्या झिरपत असते....
पप्पांनी दोन दिवसात बनवलेला हा गणपती. निमित्त असं की आमच्या दोन लहान सवंगड्यांच्या शाळेत चिकनमातीचा गणपती बनवण्याचा उपक्रम झाला. तेव्हापासून त्यातल्या मोठ्या सवंगड्याने जणू त्याच्या घरी गणपतीचा कारखानाच उघडलेला. चिकनमातीचे गणपती बनवून हौस फिटल्यावर, मग खराखुरा म्हणजे शाडू मातीचा गणपती बनवायची त्याने टूम काढली. दादांनीही पोरांची हौस मनावर घेतली आणि माती हजर केली. पण वहिनांचा घसा मात्र गणपती आधी बसला... मग घरभर अख्खी माती-माती. त्यात गणपती येण्याआधी घरी माझं आगमन झालं. मग काय कारखान्याची रवानगी थेट आमच्या घरात....वेदूचा माझ्यावर आणि माझ्यातल्या कलेवर प्रचंड विश्वास(मला त्याची खूप कमाल वाटते. मग काय बॅगा टाकल्या आणि "आराम हराम है" म्हणत मी पीठाऐवजी माती मळायला बसले....आणि मातीचे गोळे रचायला सुरुवात केली...आपण काही पार्वती नाही ...पण मस्का लावायचं काम चांगलं करू शकतो हे वेळीच लक्षात आल्यामुळे मग अधूनमधून दुरून कटाक्ष टाकणार्या पप्पांना चांगला भरभरून मस्का लावला. मस्का फळला आणि पप्पांचा पवित्रा बदलला. माझ्यावर टीकाटिप्पणी करून मातीचा ताबा त्यांनी घेतला आणि गणपती आकार घ्यायला लागला. पप्पाही मग गणपती पुरा होईपर्यंत रमलेही. दोन दिवसात विना साच्याच एकहाती गणपती तयार....
दरम्यान मी मनानं गावच्या घरातल्या कारखान्यात आणि मागे सुटलेल्या आठवणीत जाऊन आले...आषाढ लागला की लगबग सुरू व्हायची. भाऊबाबा(मोठे काका) माती मळायचं कंत्राट बायकांकडे द्यायचे...कितीतरी पोती माती मळली जायची...मग आम्ही भावंडं, काक्या, वैन्या मातीला चेचायचो...या काळात वादावदी कमी व्हायची....माती मळून झाली की साचे लिपांयला घ्यायचे....आम्ही बारकी मंडळी ते भरून द्यायचो. मग मोठे भाऊ आणि बाकीचे काका फायनल टच....दोन दिवस साचे बांधून ठेवले जायचे, मग ते काढल्यावर त्याला, हात, सोंड, दागिने जोडण्याचा कार्यक्रम, ते रंगवण्याचा कार्यक्रम हे सगळंच अगदी तीन चार महिने साग्रसंगीत सुरू असायाचं. आमचं घरंच अगदी गणपतीमय रंगशाळा होऊन जायचं...रंगांचा, मातीचा गंध, त्यात श्रावणात घरी होणारं ग्रथांचं पारायण, आजूबाजूचा रानवट गंध, कोवळ ऊन, नाचणारा पाऊस, वार्यावर डोलणारी भातं, त्यात भांवडांची मजा मस्करी हे सगळ अगदी आल्हादानं सुरू असायचं. पप्पा सैन्यात म्हणून मग या सगळ्यात पप्पा क्वचित असयाचे. कधी जर सुट्टीवर आले तर पप्पा हातभार लावायचेच....मग आम्ही दोघी त्यांच्या मागे मागे. पण संपूर्ण गणपती लिंपताना मी त्यांना कधी याची देही याची डोळा बघितंलेलं नाही. ते सांगतात तसं सैन्यात भरती होण्याआधी केलेलं आहे हे सगळं पण त्याची मी साक्षी नाही. पण तीन-चार महिन्यांचा हा सोहळा मजेशीर असायचा....
माझ्या घरात सगळेच कलाकार...आमचं 40 माणसांचं कुटुंब. सगळ्यांच्या हाताला या ना त्या प्रकारची सुबकता. त्यामुळेच आज कधी जरासं चित्रबित्र काढलं की हा वारसा आणि कला कुठून कशी झिरपत माझ्यापर्यंत आली हे जाणवतं राहतं. असो. तर या सगळ्या नॉस्टेलजियातून बाहेर आले तोवर इकडे पप्पांनी गणपतीचा बेसिक आकार तयार केला आणि माती लिपायला सुरुवात केली.....आणि मग अगदी निगूतीने मनातला गणपती साकारला....मी, दिदी आई आणि ते स्वतः सुद्धा चकीत झाले..तेेवढ्यातच कारखान्याचा प्रस्ताव घरात घुं-घुं करत होता त्यात भर पडली शेजार्यांची..."आता रिटायर्ड झालात तर मग टाकाचं कारखाना" आता कलाकाराची एवढी किर्ती समोर दिसतेय तर आम्ही कच्चे लिंबू मातीच मळत बसलो.. आमची लूडबूडही एवढा चांगला गणपती बघून कमी झाली...पण मग आमच्या कलेचा मोर्चा आम्ही गणपती ठेवायचा कसा, मकर कसं बनवायचं याच्या नियोजनाकडे वळवला. तर कारखान्यातला एकलुता एक गणपती मकरात बसायला तयार आहे....
पप्पा आजवर तुमची नोकरीमुळे, आम्हाला आकार देता देता मागे पडत गेलो. पण अंगात असलेली ही कला आता विसाव्याच्या क्षणी बहरत राहूदे....असे रमत रहा...
तर डोळ्यांत साठलेली टीपं हलेकच पुसून पप्पा पुढच्या वर्षी कारखाना टाकायच्या आधी पोस्ट करून टाकली...तेवढाच त्यांच्या कलेला माझा हातभार....
ता.क. : पाटवरची नक्षी मी काढली आहे....मधेमधे लुडबूड करायच्या सवयीनुसार.
- श्रेya
ते तर झालेच; शिवाय…
…आगाऊ पात्रपरिचयाची नितांत गरज आहे.
म्हणजे, सामान्यतः तशी गरज लागली नसती, परंतु, इथे पप्पा, दादा, वहिनी, दोन सवंगडी (हे जे कोणी असतील ते), आणि इतरही अनेक आनुषंगिक नेहमीचेच यशस्वी (मी मोजदाद सोडली!)… इतके सगळे जण अक्षरशः रानोमाळ भटकताहेत. कोठला कोण कोणाचा कोण पत्ता लागत नाहीये.
परंतु, कथाबीज चांगले आहे.
(असो चालायचेच.)
ही टीका सौम्य आहे.
कधी कधी एखादी गोष्ट वाचून तुमचं "अक्षरश:" प्रोग्रामिंग बिघडतं. मग तुम्ही गळ्यात रुंड माळा घालून, केस सोडून, जीभ बाहेर काढून, डोळे वटारून त्या लेखावर तांडव नृत्य करू लागता. आणि तुम्हाला काहीतरी खटकलं आहे हे मान्यच असतं. पण त्यावरची तुमची प्रतिक्रिया कदाचित तुमच्याही हातात नाही असं वाटावं इतकी ती भयानक असते. जणू काही असं काही वाचलं की तुमच्या अंगात एखाद्या मेलेल्या (आणि जिवंत असताना मनासारखा मान न मिळालेल्या) साहित्यिकाचं भूत शिरतं.
अं.......
अं.......लेख आवडला पण छायाचित्रं कुठायत?