Skip to main content

विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा !!

सध्या जो बापट यांनी ऐरणीवर आणलेला ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा आहे त्यावरुन विचार करतांना एक मुख्य मुद्दा जाणवला आणि इतरही किरकोळ विचार मनात आले ते इथे मांडावेसे वाटतात. तर बघा गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांपासुन एक नविन विशेष वर्ग निर्माण झालेला आहे. हा म्हणजे पुर्वीच्या काळात जे व्यवसाय किंवा मुख्य उपजिवीका म्हणुन पारंपारीक ढोल ताशा वाजवणारे होते त्यांना मोठ्या प्रमाणात हळूहळु रीप्लेस करणारा ढोल ताशे वाजवणारा सर्वसाधारणपणे तुलनेने अधिक शिक्षीत, आर्थिक वरचढ, पांढरपेशा , लोकांचा सोयीसाठी आपण अभिजन ढोलताशा वादक म्हणुयात ( फक्त सोयीसाठी इथे टीपीकल अभिजन विरुद्ध बहुजन ही विभागणी अपेक्षित नाही हे कृपया लक्षात घ्यावे )असा निर्माण झालेला आहे आणि दरवषी वेगाने त्यात वाढ होताना दिसतेय.

तर असे अभिजन ढोल ताशा वादक वर्गातील जे लोक आहेत त्यांची वर म्हटल्याप्रमाणे काही वैशिट्ये आहेत.

सर्वात मोठं म्हणजे हा त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय नाही जसा तो पुर्वकालीन बहुजन ढोल ताशा वादकांचा होता / आहे.

दुसरं हे वादन करण्यामागची अभिजनांची मुख्य प्रेरणा ही पलायनवाद ही आहे म्हणजे रोजच्या कंटाळुन कुजवुन टाकणाऱ्या ऑफीस वर्क पासुन. त्याच त्या रुटीन ला हे ढोल ताशा वादन त्यांना हवा तसा मजबुत बदल बहाल करतं. म्हणजे उत्सवपुर्व सरावापासुन याची सुरुवात होते. एखाद्या ठिकाणी सर्व ग्रुप असणं, त्यात हास्य विनोद समुह संवाद होणं , शिवाय सर्व काम हे पुन्हा धार्मिक बाबीशी जोडलेलं असण्याने त्याच ही एक अधिकच समाधान मिळणं, तसेच चार दिवारी के घुटन से, रोजमर्रा कि जिंदगीसे वगैरे काही काळ आजादी मिळणं, यात प्रामुख्याने युवा वर्ग असल्याने धागे जुळण्यातील शक्यतेने निर्माण झालेली आनंदह्र्द्य्स्पंदने , किंवा निव्वळ सहवासानंद , हा सुद्धा प्रेरणा असते. शिवाय निखळ ताल नाद यांची , ठेक्याची आवड संगितावर प्रेम हे ही एक प्रेरणा असते. यातही एरवी चे रटाळ तणावाचे तेच ते तेच ते विंदा म्हणतात तसे जीवन ज्यात कुठलाही ताल उरलेला नाही त्यापासुन पलायन ही देखील प्रेरणा असते. यासाठी अभिजन वर्ग ढोल ताशे वादनाकडे कदाचित आकर्षित झाला असावा. शिवाय मोकळा अवकाश , खुली मैदाने आनंदी आनंद चोहिकडे. त्याशिवाय वाजवलेल्या ढोलाचे फोटो व्हिडीयो सेल्फ्या, स्टेटसे मिरवणे वगैरे ( थोडे एनारायांसम ) नंतर आम्ही संस्कृतीत सहभागी आम्ही कितीही आधुनिक झालो तरी मुळांशी कसे घट्ट जोडलेलो आहोत वगैरे हे ही असते.

तर अशा अनेक प्रेरणांनी अभिजन या ढोल ताशा वादनाकडे वळले.

त्यात आर्थिक प्रश्न मुळातच नसल्याने मग आपल्या संघाचा विशिष्ट गणवेश बनवणे. त्यात पुन्हा फेटे वगैरे पायजामे कुर्ते जे एरवी च्या रहाटगाडग्यात वापरायला कमी च संधी मिळते शिवाय सेल्फ्या वगैरेही छान येतात लाइक्स ही मिळतात. तर संघ गणवेश असणे. पुन्हा आपल्या संघाचे युनिक नाव ठेवणे तांडव, मल्हार, ओमकारा इत्यादी मग तो लोगो वगैरे वापरणे. हा सर्व खर्च अभिजन आनंदाने करतात. सरावासाठी जागा मैदाने ठरवतात व्हॉट्स अप फेसबुक ग्रुप बनतात एकंदरीत आनंदी आनंद असतो.

आणि श्री अवधुत गुप्ते यांनी जे अप्रतिम असे गाणे विद्यांनंद बापट यांच्यावर बनवलेले आहे. ( जे मला बेहद्द आवडले संगीत चाल सुमधुर तर आहेच पण ज्या ओळी आहेत त्याही कसल्या काटेरी आहेत ) त्यात ते म्हणतात तसे बापटांना ते सल्ला देतात " विद्यानंदा ! ओळख इथल्या आनंदी आनंदा " हा अभिजनांचा आनंद काही विद्यानंदाच्या लक्षात येतच नाही .

जसे विद्यानंदा च्या लक्षात येत नाही तसेच आनंदमग्न अभिजनांच्या सुद्धा आपण डीजे सारखेच लोकांचे कान आपल्या ढोल ताशाने फोडतो हे लक्षातच येत नाही. एका मुलाखतीत डॉ कविता मांडके यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ढोल आपण पोटावर बांधतो आणि बदडतो तेव्हा जी कंपने सर्व शरीरभर पसरतात त्याचे ही मोठे दुष्परीणाम आहेत हे तर आनंदमग्न अभिजनांच्या गावीही नसते.

हे ढोल ज्यांना परवडत नाहीत असा एक तुलनेने एक निन्म आर्थिक स्तरातील वर्ग आहे जो डीजे चा वापर करतो असे दाखवणारा एक व्हिडीयो बघितला. मला त्यामागील अर्थशास्त्र माहीत नाही अनुभव नाही पण मुद्दा कन्विनसींग होता.

तर बापटांनी अनेंकांवर हल्ला चढवलेला आहे ज्यात प्रामुख्याने डीजे वर तर आहेच आहे असे म्हणुया बहुजनांवर त्याच बरोबर त्यांनी अत्यंत योग्य रीतीने ढोल ताशांवर सुद्धा तार्किक आक्षेप घेत हल्ला चढवलेला आहे. सर्वात मोठी गंमत म्हणजे अभिजनांकडुन याच्यावर अळिमिळी गुपचिळी दिसतेय. यातील तथाकथित सुशिक्षीतांना यापैकी कुणालाही कधीही स्वप्नातही आपण इतर नागरीकांना आपल्या ढोल ताशाने उपद्रव निर्माण करतोय ते तर सोडा स्वत:च्या शरीरावर ही अन्न्याय करतोय हे माहीत नव्हते वा डोळेझाक केली असावी असे वाटण्यास वाव आहे.

बापटांच्या विरोधात जे बोलत आहेत त्यात अभिजनांचे मौन मला मोठे गंमतीदार वाटतेय. की आपण अरेच्च्या आपणही उपद्रवी आहोत या भावनेने लज्जा तर निर्माण झाली नसेल आणि त्याने गप्प बसले असतील का ? यात पुन्हा एक आहे जे जे पारंपारीक ते ते उत्तमच योग्यच असते हा एक मोठा गैरसमज वा पुर्वग्रह आहे . ढोल ताशे पारंपारीक म्हणुन अर्थातच ते बडवणे ते ही देवाचे काम म्हटल्यावर तो फिर क्या कहने ! बापट अगदी योग्य म्हणतात तसे इतरांना सक्तीचे श्रोते बनवण्यात मग अडचण ती काय ?

अभिजन ढोल ताशा पथकाच्या बाबतीत अजुन एक निरिक्षण आहे . यातील महीलांचा सहभाग. एक मुंबईत गुढीपाडव्या ला साडी वगैरे नेसुन ते बुलेट वरुन फिरणे आणि दुसरे ढोल बडविणे. हे एक रोचक आहे. म्हणजे यातील महीलांकडे एक " बघा आधुनिक आहेत मात्र आपल्या संस्कृतीशी नाळ जोडुन आहेत धर्माशी नाळ जोडुन आहेत " असा एक पवित्रा असतो. यात तुम्ही परंपरेचं जोखड अजुन भिरकावुन देऊ शकत नाही उलट या सर्वात तुम्हाला जोडुन परंपराच दृढ केली जात असते याची त्यांना क्वचितच जाणीव होत असावी. बरे परंपरा मुलत: चांगली असेल तर ते एक पण जेव्हा ती ढोल ताशे बडवण्यासारखी उपद्रवी विघातक स्वरुपाची असते तेव्हा त्यात आपण हातभार लावतोय त्याला प्रोत्साहन देतोय. हे ढोल ताशे बडवणाऱ्या अभिजन पथकातील महिलांना कधीच लक्षात आले नसावे का ? आले नाही किंवा बोलले नाही याचे आश्चर्य वाटते. कारण मी आजपर्यंत कुठल्याही अभिजन ढोल ताशे पथकातील कोणाही स्त्री पुरुषांना आपण हे काहीतरी चुकीचं करतोय असे वाटलेले दिसत नाही. अभिजनांकडुन अपेक्षा साहजिकच जास्त होती असते आहे. कारण त्यांचे शिक्षण वगैरे त्यांना ही माहीती असण्याची हे भान असण्याची शक्यता देते.

एका व्यक्तीने असे निरिक्षण नोंदवले की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले पुण्यातील मिरवुणीकत बहुसंख्येने असतात. ही सुद्धा एक वेगळी पलायनवादी संख्या आहे. यातील अनेकांना भविष्याची शाश्वती नाही, पास होण्याचे प्रमाण अत्यल्प , अनेक वर्षे वाया जात असलेली, महानगरात दबुन जाऊन वावरणारी व त्याच वेळी सभोवतालच्या भौतिक जीवनाच्या लालसेने विचलीत असलेली, सततच्या "चैन एक पल नही और कोइ हल नही " या अवस्थेत वावरणारी. कदाचित जेव्हा समोर एखाद दुसरीच नाचण्याची झोकुन देण्याची संधी मिळत असेल तेव्हा बेभान होत आपले काटेरी वास्तव विसरवत असेल , तेव्हा त्या प्रेरणेने ही मुले नाचत असावीत.

मुलत: एकंदरीत समाजच कठिण होत चाललाय. संधी संपत चालल्यात, अस्थिरताच कमालीची स्थिर झालेली तेव्हा या व्यतिरीक्त काय अपेक्षा करणार. तसे पाहीले तर एकीकडे बेभान ढोल ताशे डीजे वाजवणारे दुसरीकडे तितकेच बेभान नाचणारे हे सर्व च मुळ कठोर काटेरी झालेल्या वास्तवापासुन पळत आहेत. तर अशा बेभानांकडुन आपल्यामुळे दुसऱ्या कोणा नागरीकांना त्रास होतोय याचे भान त्यांना असण्याची अपेक्षा म्हणजे अवघडच आहे.

हा तसा सर्व समाजच एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. इथे जरी अभिजन ढोल ताशे पथक यांच्यावर भर दिलेला असला तरी तो एक वर्ग मला डोळ्यात आला म्हणुन पण एकुण सर्वच आपण एका गर्तेत सापडलेले आहोत. त्याची कारणे खुप खोलवर आहेत. बाहेर येऊन नाचणे आणि बेभान होणे हे केवळ त्याचे बाह्य लक्षण आहे. आपण आतुन अस्थिर अशांत अस्वस्थ अपयशी असा झालेलो समाज आहे.

सध्या तरी असे जाणवतेय

मला असे प्रामाणीकपणे वाटते की आपण रस्त्यावर येउन जे काही करतोय आपण सर्वच तो एक परीणाम आहे एक सिम्प्टम आहे. आपल्या आत काहीतरी बिघडलय ते यानिमित्ताने आपण शोधायला हव असे मला वाटते. आपण मुळ कारणे मूळ प्रेरणा या मागच्या शोधल्या पाहीजेत की आपण रस्त्यावर येऊन असे कुठल्या प्रेरणेने करतोय ? याचा शोध घेणे अगत्याचे वाटते या मंथनातुन काय बाहेर येइल माहीत नाही पण आपण आपल्या स्वत:ला पुर्वीपेक्षा अधिक चांगले जाणुन घेऊ शकु असे मला वाटते.

श्री अवधुन गुप्ते जे म्हणताय ते फार खोलवर आहे त्यांचे आव्हान खुप खुप खोलवर जाण्यास सांगत आहेत ते अगदी बरोबरच म्हणताहेत

विद्यानंदा !

ओळख इथल्या आनंदी आनंदा !!!

तुम्हाला काय वाटते जाणुन घ्यायला आवडेल.

तर्कतीर्थ Thu, 10/09/2026 - 11:10

बापट असोत किंवा दाभोळकर, सावरकर असोत, तीक्ष्ण भूमिकेने गर्दीला डिवचले जाते. त्यांनी संस्कृती या विषयाचा मानववंशशास्त्रीय अंगाने परिचय करून घेतला असता तर ते इतके ’जहाल’ बनले नसते. तसेच प्रकरणाने पुरेसे पेट घेतल्यावर त्यावर काबू ठेवण्याची कला, गरज पडल्यास सन्माननीय पद्धतीने माघार घेणं पण त्यांना लहान वयामुळे माहित नसावे.

माध्यमांनी त्यांचा कुंभमेळ्यातला आय०आय०टी० बाबा बनवला आहे.