बिल गेट्सची भीति
बिल गेट्सने एका लेखाद्वारे ए०आय० बद्दल व्यक्त केलेल्या भीतिबद्दल सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. एका वृत्तपत्राच्या संपादकांनी माझ्याकडे यावर संपर्क साधून माझे मत विचारले. त्यांना आज पाठवलेले उत्तर प्रसृत करत आहे.
नमस्कार,
तुम्हाला आठवेल की नाही माहित नाही. पण ए०आय० च्या आगमनाचे पडघम वाजायला सुरुवात झाली तेव्हा काही भविष्यवेधी लेखकांनी ५०% नोकर्या ए०आय० खाणार याचे भाकीत केव्हाच वर्तवायला सुरुवात केली होती. मी तेव्हा आपल्या पंतप्रधानाना एक उपहासात्मक पत्र लिहून भारताने ए०आय० वर बंदी घालावी असे सुचवले होते. आपले त्यावेळेला फोनवर बोलणे पण झाले होते.
पण आता जेव्हा घंटानाद बिल गेट सारख्या महात्म्याने सुरु केला तेव्हा या सर्व समस्येची सगळीच परिमाणे, आयाम बदलतात. कारण एकच त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतं...
"ए०आय० वापरा वर टॅक्स लावा" असा किती आक्रोश केला तरी यामुळे काही प्रश्न उभे राहतात - सर्वप्रथम, कर नेमका कशावर लावायचा हा प्रश्न उभा राहतो. ए०आय० वापरणाऱ्या व्यक्तीवर कर लावायचा, ए०आय० सेवा देणाऱ्या कंपनीवर, की ए०आय० मुळे वाढलेल्या उत्पन्नावर? उदाहरणार्थ, एखादा वकील ए०आय० च्या मदतीने करारपत्र तयार करतो, तर त्यात निर्माण झालेल्या मूल्याचा किती भाग ए०आय० चा आणि किती भाग वकिलाचा मानायचा?
ए०आय० मुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक उपकारक बदल घडून येत आहेत. अशा करांमुळे त्याचा वैद्यकीय सेवांवर भार पडून त्याचा परिणाम आधुनिक उपचारांपासून वंचित राहण्यात होणार हे निश्चित. भारतासारख्या देशात जिथे संशोधनक्षेत्र पिछाडीला आहे (पहा संशोधनावर होणारा खर्च) तिथे अशा करांच्या झळा जास्त पोचणार हे निश्चित आहे.
चीन सारखे यंत्रमानवांचे ऑलिम्पिक भरवणारा देश[१], सम्पूर्ण हॉस्पिटल ए०आय० कडून संचालित करणारा[२], थोडक्यात "आम्ही म्हणू ती पूर्व" म्हणणारा देश अशा टॅक्समुळे कितीसा प्रभावित होणार?
अशा अभूतपूर्व समस्यांना तोंड देण्यासाठी वेगळा विचार करणार्यांना, कल्पकतेला उत्तेजन देण्याची गरज असते. आपल्याकडे अशा लोकांना ठोकून काढले जाते, "चीनमध्ये जाऊन राहा", असे सांगितले जाते.
जोपर्यंत कल्पकतेचे मोजमाप राजकीय फूटपट्टीने होईल तो पर्यंत अशा प्रश्नांची प्रभावी उत्तरे सापडणे कठीण वाटते. कल्पक लोकांना नामोहरम करायची आता आपण जबरदस्त किंमत मोजणार आहोत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
बिल गेटस च्या प्रत्येक मुद्द्यावर अजुन बरेच लिहीण्यासारखे आहे पण सध्या इतकेच...
कळावे
राजीव उपाध्ये
१. https://www.youtube.com/watch?v=tLzGXy-6-Yo
२. https://www.youtube.com/watch?v=md8bxxOf9ps
जाताजाता: आपण जागतिक हवामान बदल रोखू शकलॊ नाही, प्लास्टिकचा विळखा रोखू शकलो नाही, फार काय डीजे मुळे होणारे ध्वनी प्रदूषण थांबवू शकत नाही. अन्नपदार्थातील भेसळ थांबवू शकत नाही, ए०आय०चे आक्रमण कसे रोखणार?
आपण एक वाळूचा कण
तुम्ही कुणालाही पत्र लिहा. काहीही उपयोग नाही. आता जसं समजा मी तुम्हाला एआय वापरून सतत लिहू नका अशा अर्थाचं काही सांगते त्याला तरी काय किंमत आहे? मी कोण आहे? माझ्या म्हणण्याने काय होणार आहे? लोक एआय वापरून लिहायचे थोडीच सोडणार आहेत? तुमचे अगदी कट्टरातले कट्टर विरोधी घेतले तरी त्यांना काय पावर आहे? काही नाही.
शेवटी आपण काय करायचं तेवढंच आपल्या हातात आहे. आणि तेही कायम जमेलच असं नाही. मी तुम्हाला माझे उदाहरण देते. मी २०२१ पासून सोशल मिडिया सोडायचा प्रयत्न करत होते. कारण मी १६ वर्षांची असल्यापासून सतत कोणता ना कोणता सोशल मिडिया वापरला होता. आधी चॅट रूम (तिथेही आपण कोणत्याही नावाने जाऊ शकायचो), नंतर ऑर्कुट, नंतर फेसबुक, नंतर इंस्टाग्राम. ही सगळी तंत्रज्ञान प्रगती आणि तिची चांगली बाजू (सोशालिडियावर लिहून आपला एक वाचक वर्ग निमार्ण करणे, मैत्री करणे, विविध उपक्रमात सहभागी होणे) मी भरपूर उपभोगली. पण एक गोष्ट मात्र कायम खटकत राहिली. की सोशल मीडियावर आपण नेहमी एक stance घेत असतो. तसे आपण खऱ्या आयुष्यात नसतो. काही लोक लेखक होतात, काही समीक्षक होतात, काही आपले फोटो टाकून लोकांची वाहवा मिळवतात. यापैकी बऱ्याच गोष्टी मी केल्या आहेत. आणि त्याचं व्यसनही लावून घेतलं.
पण तो सोडायचं ठरवलं २०२१ मध्ये. आणि जमलं २०२५ मध्ये. ही चार वर्षं अतिशय क्लेशकारक होती. कारण आपण ठरवलेली एखादी गोष्ट आपल्यालाच सहज जमत नाही हा साक्षात्कार खूप निराशाजनक असतो. अनेकदा मी app काढून टाकायचे. वेळेची मर्यादा ठेवायचे. असे अनेक प्रयोग मी केले. आणि बहुतेकवेळा अपयशी ठरले. पण शेवटी मला एकदाचं जमलं. एक दिवस मी सगळी खाती कायमची डिलिट करून टाकली.
तर स्वतःमध्ये हा बदल घडवून आणायला मला ४ वर्षं आणि एवढी सारी चिकाटी लागली. तर मी सांगून इतर लोक बदलतील ही अपेक्षा मूर्खपणाचा आहे याची मला जाणीव आहे.
कोणत्याही समाजमाध्यमावर तग धरून राहायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे इतरांना शून्य किंमत द्यायला शिकणे. हे मला जमायचं नाही. म्हणून मी त्यातून कायमची बाहेर पडले.
बिल gates
बिल sir व्यापारी व्यक्ती आहेत त्यांना फक्त नफा आणि तोटा इतकेच कळते. Ai मुळे रोजगार विरहित अर्थ व्यवस्था निर्माण झाली तर पहिला ai च बळी जाईल.
रोजगार विरहित, उत्पादन ह्या मुळे काय घडेल हे त्यांना चांगले माहित आहे.
Ai मुळे आज च बेसिक स्किल मध्ये माणूस गाढवाच्या पण मागे गेला आहे.
सर्वच. Ai करणार असेक तर माणूस विचार करण्या ची कल्पना करण्या ची, aakdemod करण्याची, अगदी जुगाड करण्या ची पण क्षमता हरवून बसेल. नवीन टॅलेंट निर्माण होणार नाही हे सर्व gate ह्यांना माहित आहे.
.
प्रथम अॅन्थ्रॉपिकच्या सीओने यावर लिहिले. नंतर झकरबर्गने माझ्यामते व्हाईट पेपर पब्लिश केला. मग बिल गेट्स आणि इतर तरी पाठी का राहतील, पीअर प्रेशर?
जेन एआयचा वापर रटाळ एकसूरी टेक्स्ट जनरेशनसाठी करणे मला तितकसं आवडत नाही, कारण सगळ्यांकडे जवळजवळ तीच मॉडेल्स आहेत. एआयचा वापर नेहमीची काही कामं ऑटोमेट किंवा सेमीऑटोमेट करता आली तर मला फार आवडेल.
पास्कल बोर्नेट आणि इतर ऑथर्सने लिहिलेलं एक पुस्तक खूप इंटरेस्टींग वाटलं. अजून पूर्ण नाही केलं आहे. त्यात सध्याच्या एआयच्या मुख्य त्रुटी आणि त्यावरचे उपाय यांचा उहापोह आहे. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत असल्यामुळे लेटेस्ट मॉडेल्समध्ये या त्रुटींवर कितपत काम झाले आहे याची कल्पना नाही.
यातल्या काही त्रुटी बर्याच जणांनी अनुभवल्या असतील.
१. एक्झिक्यूशन गॅप – उदा. तो ट्रॅव्हल प्लान करतो, टिकीट आणि हॉटेल बुकींग करतो, पण त्या दिवशी त्या ठिकाणी चक्रीवादळ येणार असेल तर तिथे जाणे टाळायला पाहिजे हे त्याला समजत नाही.
२. लर्निंग गॅप – काही इंस्ट्रक्शन तर त्याला एकाच सेशनमध्ये बर्याच वेळा पुन्हा द्याव्या लागतात. हे मला नेहमीच दिसते, अगदी क्लॉदमध्येही.
३. कोऑर्डीनेशन गॅप – वेगवेगळ्या सिस्टीममध्ये त्याला नीट कोऑर्डीनेट करता येत नाही.
४. परसिस्टंट मेमरीचा अभाव – अक्रॉस सेशन्स तो शिकत नाही आणि इंप्रुव्ह करत नाही. काही बेसिक गोष्टी कळतात, पण एकाच प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या सेशन्समधून शिकून इंस्ट्रक्शन इंप्रुव्ह करतो असं दिसत नाही.
५. फार क्वचित तो जेन्युईन क्रिएटीव्हीटी किंवा इनोव्हेशन दाखवतो.
६. हॅलुसिनेशन्सचा प्रॉब्लेम – आत्मविश्वासाने चुकीची किंवा बनावट माहिती देणे. एआय जनरेटेड रिसर्चमध्ये बर्याच वेळा संदर्भ चुकीचे असतात, किंवा बरोबर असले तरी संदर्भातील डेटा किंवा फॅक्ट चुकीचा असतो.
७. नैतिकता आणि निर्णयक्षमतेतील तफावत – नैतिक परिणामांची समज नसणे, ज्यामुळे आरोग्यसेवा आणि फौजदारी न्याय व्यवस्थेत समस्या निर्माण होतात.
पुस्तकात काही उपाय सुचवले आहेत, उदा. शॉर्ट टर्म मेमरी मॅनेजमेंट, स्टोकॅस्टीसीटी म्हणजे दरवेळी क्रिएटीव्हीटी वापरून वेगवेगळी उत्तर देणे आणि कन्सिस्टन्सी म्हणजे दरवेळी सेम उत्तर देणे. यातला तोल सांभाळण्यासाठी टेंपरेचर सेटिंग्ज इ. बघू काही फायदा झाला तर.
फार क्वचित तो जेन्युईन…
फार क्वचित तो जेन्युईन क्रिएटीव्हीटी किंवा इनोव्हेशन दाखवतो.
जेन्युईन क्रिएटीव्हीटी कशाला म्हणणार? माझ्या मते अस्सल सर्जनशीलतेचा निकष एकच आहे - "आहा!" अनुभव आणि हा पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष आहे. ए०आय०च्या निर्मितीमध्ये, तो मजकूर असो की चित्र, एकसुरीपणा टाळता येणे हे उपयोगकर्त्याच्या आकलन क्षमतेवर अवलंबून आहे.
मी इथे काही प्रकाशित केलेल्या (आणी मग चालकांनी नजरे आड केलेल्या) कथा याचा पुरावा म्हणून पुरेशा आहेत. सध्या मला निअर-नॅचरल नॅरेशन ए०आय० कडून मिळवण्यात बर्यापैकी यश मिळत आहे. फक्त सध्या दुग्धेन दग्धजिव्ह: अशी अवस्था असल्याने इथे माझ्या प्रयोगाबद्द्ल किती लिहायचे याबद्दल संभ्रम आहे.
नबा आणि सई केसकर
मला वाटणारी मोठ्ठी भीति अशी की ए०आय०चा तिरस्कार करणारे लोक उद्या ए०आय० ने अमरत्व देणारे रसायन जरी शोधून काढले तरी त्याकडे नाके मुरडतील.
?
ए०आय०चा तिरस्कार करणारे लोक उद्या ए०आय० ने अमरत्व देणारे रसायन जरी शोधून काढले तरी त्याकडे नाके मुरडतील.
समजा, उद्या एआयने अमरत्व देणारे रसायन जर शोधून काढलेच — ते शक्य आहे, किंवा नाही, याचा विचार तूर्तास बाजूस ठेवू. (तसेही, एआय hallucinate तर करू शकतेच.) — तरीसुद्धा, is it necessarily such a desirable thing?
(Perpetual थेरडेशाही (हिंदू, or otherwise) झेलायला इथे कोण तयार आहे? त्यात पुन्हा, सगळेच कधी ना कधी थेरडे होणार, नि एकसमयावच्छेदेकरून अस्तित्वात राहणार, नि proliferate होत राहणार, म्हटल्यावर…)
फार कशाला, उद्या एआयने (किंवा फॉर्दॅट्मॅटर कोणीही) अमरत्व देणारे रसायन जर शोधून काढलेच, तर त्याला सर्वप्रथम शिव्या घालणारा कदाचित मीच असेन. (माझा विरोध एआयला नाही, अमरत्व देणारे रसायन शोधून काढण्याला आहे.)
सुभाषित पेश-ए-खिदमत आहे (निश्चित स्रोत ठाऊक नाही. हितोपदेश असे जालशोधावरून समजते, परंतु आगापिछा ठाऊक नाही. (चूभूद्याघ्या, नि क्षमस्व.)):
यद्ददासि विशिष्टेभ्यो यच्चाश्नासि दिने दिने।
तत्ते वित्तमहं मन्ये शेषं कस्याऽपि रक्षसि॥
अर्थात, जे तू कोणाला तरी (दान म्हणून) देऊन टाकतोस, किंवा जे तू रोज खातोस (म्हणजे, उपभोगतोस अशा अर्थी. पैसे खाणे अशा अर्थाने नव्हे.), ते धन मी तुझे मानतो; बाकीचे तू केवळ दुसऱ्या कोणाचे तरी (ठेव म्हणून) सांभाळतोस.
किंवा, आमचे दिवंगत तीर्थरूप म्हणायचे, त्याप्रमाणे: माणसाला आयुष्यात पैसा लागतो खरा, परंतु, किती लागतो? समजा माणसाला भरपूर पैसा मिळाला. माणूस त्याचे काय करेल? ठीक आहे, रोज श्रीखंडपुरी जेवेल. चिकन खाईल. मटण खाईल. रोज उंची विलायती दारू ढोसेल. दहा गाड्या ठेवेल. फार कशाला, तितकाच षोकीन असेल, तर दहा बाया ठेवेल, रंडीबाजी करेल. थोडक्यात काय, चैन करेल. मनसोक्त उपभोग घेईल.
परंतु, माणूस किती उपभोग घेऊ शकतो, याला, माणसाच्या उपभोगक्षमतेला, भौतिक मर्यादा आहे. (मर्यादा प्रत्येकाची वेगळी असेल, कदाचित, परंतु, मर्यादा आहे.) समजा, माणसाला गरजा पुरविण्याइतका पैसा मिळाला. इतकेच नव्हे, तर सगळ्या (कल्पना करता येतील, इतक्या) चैनी पुरविण्याइतका पैसा मिळाला. तर मग माणसाला त्याहूनही अधिक पैसा मिळावा, ही हाव का असते? त्याहूनही अधिक पैशाची गरज काय असते, नि उपयोग काय असतो?
तर याचे उत्तर: माणसे विकत घेण्यासाठी. त्याला मर्यादा नसते. (राजकारणी लोक हेच करतात. म्हणून त्यांना अमर्याद पैशाची, नि त्याकरिता प्रसंगी पैसे खाण्याची, गरज असते. तुम्हालाआम्हाला (पक्षी: सामान्य माणसाला) नव्हे.)
त्याच धर्तीवर आम्हीदेखील म्हणतो: माणसाला आयुष्य हवे, हे खरे. नि दीर्घायुष्याची आस असते, हेदेखील समजण्यासारखे आहे. दीर्घायुष्याचा मनुष्य (एका मर्यादेपर्यंत) उपभोग घेऊ शकतो. परंतु, माणसाला अमरत्व कशासाठी लागते?
तर याचे उत्तर: लोकांचे डोके खाण्यासाठी. लोकांवर perpetually सत्ता गाजविण्यासाठी. (थेरडेशाही हेच करते.)
(अवांतर: वृद्धांना (केवळ ते वृद्ध आहेत, म्हणून) मान देण्याची पद्धत बंद करा. (मूलभूत मानवी आदर म्हणत नाहीये मी. मान म्हणतोय.) माणसाची अमरत्वाची आस झटक्यात नाहीशी होते की नाही, ते पाहा.)
पण लक्षात कोण घेतो? चालायचेच.
+१
सत्ता गाजवणं एवढंच काय ते खरं!
आहे ते ७०-८० वर्षांचं आयुष्य चांगलं जगा आणि नंतर आवरा. हे ७०-८० वर्षांचं आयुष्य फक्त सुस्थित लोकांसाठीच असेल तर सगळेच सुस्थित असतील, याचा विचार करा. झालंच तर मेनोपॉजचा त्रास बायकांना कमी कसा होईल याचा विचार करा. पण त्यात अमरपट्ट्याचं ग्लॅमर नाही!
त्या सृष्टी निर्मत्या ला तरी. माहित आहे का?
त्या सृष्टी निर्मत्या ला पण माहित नसावे किती मोठी चूक त्याने केली आहे. त्याला असा समज होता की सर्व मानव जाती च मेंदू समान आकलन क्षमते च त्याने बनवला आहे पण सत्य आता माहित पडत आहे सर्व आकलन क्षमता, सर्व बुद्धी मत्ता. पृथ्वी वर फक्त एकाच माणसा कडे गेली आहे बाकी 7 अब्ज बिनडोक च राहिले ( नीट जगाची लोकसंख्या पण माहित नाही म्हणजे एक व्यक्ती सोडून बाकी सर्व बिनडोक च )
सर्वच murkh
इथे ai चा वापर नोकरीं व्यसयात करणारे खूप आहेत त्यांना ai चांगले माहित आहे, रोज वापरतात. माझा ai शी काही संबंध नही पण ai म्हणजे काय हे चांगले माहित आहे.
हे महोदय जें रोज ai नोकरीं व्यवसाय मध्ये वापरता त ज्यांना ai ची मर्यादा माहित आहेत त्यांना पण मूर्ख समजतो आणि हा एकटाच शहाणा.
अदिती, सई,, न. बा , किती तरी लोक आहेत
सध्याचा एआयशी झगडा
गेली जवळजवळ चारेक वर्षं, आठवड्यातून (सरासरी) फार तर दोन तास मी एका प्रकल्पाचं काम करत आहे. रेकमेंडेशन अल्गोरिदम. उदाहणार्थ, नेटफ्लिक्सवर बघितलेला 'ब्लेड रनर' आवडला का, मग तुम्हाला 'एलियन'सुद्धा आवडेल, अशा छापाच्या शिफारशी करणारं अल्गोरिदम. हे अल्गोरिदम नेटफ्लिक्सनं २००७-२००९ अशा काळात जी स्पर्धा भरवली होती (इतिहास इथे वाचता येईल) त्यासाठी तयार केलं होतं.
पहिलं पारितोषिक आणि १० लक्ष डॉलर ज्यांना मिळाले, त्यांच्या RMSE होती १०.१. दुसऱ्या नंबरवर जी टीम होती, त्यांची RMSE या विजेत्यांपेक्षा ०.०००४% कमी. नगण्य फरक, पण नियमांनुसार या दुसऱ्या टीमला काही मिळालं नाही. (आठवा, लूल इज लूल.) पहिल्या नंबरच्या लोकांनी जो कोड लिहिला होता, तो नेटफ्लिक्सनं वापरला नाही, कारण तो खूपच जास्त किचकट होता.
दुसऱ्या टीमचा कोड नेटफ्लिक्सनं वापरला नाही, कारण ते जिंकले नाहीत. त्या अल्गोरिदमवर मी काम करत आहे. ते अल्गोरिदम लिहिणारा इसम माझा एक बॉस आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या इतर रेकमेंडर अल्गोरिदमच्या तुलनेत हे अल्गोरिदम कसं काम करतं, हे आम्ही तपासलं; आता त्याचा पायथन कोड लिहून, तो कुणालाही वापरता येण्याइतपत सुलभ करण्यासाठी काम करत आहोत.
माझा एक तरुण सहकारी क्लोदून कोड लिहितो. मी तो वाचते. त्याला क्लोदायला २० मिनिटं लागत असतील फार तर. मला दोन-तीन तास लागतात त्या कोडमध्ये काय त्रुटी आहेत, कुठे क्लोदनं पो टाकला आहे, हे सगळं शोधून तसा फीडबॅक (अचानक मराठी शब्द आठवेना!) देण्यासाठी. (यातली जेंडर रोलची गंमत कुणाला बघायची असेल तर जरूर बघा!)
एका ठिकाणी फक्त क्लोदचं म्हणणं मला पटलं. बाकी आत्तापावेतो किमान ६-८ ठिकाणी बदल करायला लागले.
तोचतोचपणा असणारी कामं करायला क्लोद किंवा कुठलंही LLM बरं असतं. उदाहरणार्थ, दिवसातून चारदा इमेलांमध्ये लक्ष देण्यासारखं काही आहे का, हे शोधून देणं, वगैरे.
या सगळ्या प्रकारांत डेटा सेंटरं चालवण्यासाठी जी पर्यावरणाची काशी घातली जाते; डेटा सेंटरांच्या आजूबाजूच्या लोकांना जे उपद्रव सहन करावे लागतात; आधीच जागतिक पर्यावरणहानी होत आहे त्यात भर पडत आहे; गरीब आणखी गरीब होणार आणि श्रीमंत आणखी मालामाल होऊन विषमता वाढत जाणार; याच्याबद्दल तंत्रज्ञानात काम करणाऱ्या लोकांना काहीही म्हणायचं नसतं.
दुसऱ्या बाजूला, अनुभवी पांढरपेशा लोकांच्या नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर गदा येईलसं वाटत नाही. पण अननुभवी लोकांची गरज कमी झाली आहे. या लोकांना शिकवलं नाही, तर पुढे अनुभव कसा मिळणार वगैरे प्रश्न मला सध्या पडतात. त्यांचं काम एआय करेल असं म्हणावं, तर पर्यावरणाची आत्ताच होणारी हानी दिसते. एआय या लोकांचं काम करणार नाही असं म्हणावं तर अनेक तरुण लोक एआयखेरीज आता काम करताना चाचपडताना दिसतात.
नोकरीतले अन्नसाखळीतले माझ्या डोक्यावरचे लोक एआयमुळे नोकऱ्या कमी करायच्या मागे आहेत; पण त्यांना स्वतःला एआयचे तपशील फार माहीत नसतात. कोड लिहिला की काम झालं असं करता येत नाही; तो पक्का करण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात, याचं आकलन मुळातच या कारकुनाचे व्हीपी वगैरे झालेल्यांना नसतं.
माझ्या आजूबाजूला क्लॉड कोडचं चिकार कौतुक चालतं. किमान डेटा सायन्ससाठी तरी क्लोड खूप जास्त bloat - गरज नसलेला कोड - लिहून ठेवतो. 'घर आहे म्हणून अर्धी वाटी जास्त भात टाकला', असं मला नेहमी असा कोड बघून वाटतं. आपल्या घरी आधी ठरवल्याशिवाय कुणीही पाहुणे आले नाहीत तर जास्त भात कशाला टाकायचा, पण क्लोड टाकतो!
…
ते तुमच्या परीने ठीकच आहे, हो! परंतु, पंतप्रधानांना उपहास वगैरे समजतो, या तुमच्या गृहीतकाला आधार काय?
चीन इज़ द न्यू पाकिस्तान. चालायचेच.
“थांबवू शकत नाही”??? थांबवण्याची (एक लोकसमुच्चय म्हणून) “आपल्याला” मुळात इच्छा तरी आहे काय? कधी होती काय?
नाही म्हणजे, (पूर्वीच्या तुमच्या एआयजनित लेखांच्या रतिबाला मीदेखील जरी कंटाळलो होतो, तरीसुद्धा) तुमची angst मला समजते. (आणि, एआयकडे केवळ ‘एक नवे साधन’ (a new tool) एवढ्या(च) दृष्टिकोनातून पाहिल्यास, एक उत्तम साधन होण्याची त्यात क्षमता आहे, हेदेखील मी मान्य करू शकतो.)
परंतु, उपयोग काय? (As a whole) भारत हा मूलतः न-कर्त्यांचा देश आहे. (एक समाज म्हणून अमेरिकेचीही वाटचाल आजकाल याहून फार वेगळ्या दिशेने चाललेली नाहीच, म्हणा — एके काळी can do attitude असलेल्या go-getter लोकांचा म्हणून नावाजलेला देश कोठे हरवला, कोणास ठाऊक? — परंतु, तो वेगळा विषय झाला. तूर्तास विषय भारताचा चालू आहे.) आणि, न-कर्त्यांचा देश आहे तर आहेच, परंतु, दुधावरची साय म्हणजे, (by and large) जेथेतेथे आपली अक्कल पाजळू पाहणाऱ्या दीडशहाण्या लोकांचा देश आहे. त्यामुळे, हे असेच चालत राहायचे. त्याला नाइलाज आहे.
(नाही म्हणजे, सगळेच भारतीय असे आहेत, असे माझे म्हणणे नाही. परंतु, by and large, राष्ट्रीय मनोवृत्ती ही पूर्वापार अशीच आहे. (दुर्दैवाने, यात काही चुकीचे आहे वा चुकते आहे, हेदेखील अनेकदा बाहेर पडल्याशिवाय लक्षात येत नाही.) आणि, जे असे नाहीत, ते त्या माहौलात राहून दुर्दैवाने (एका मर्यादेपलिकडे) फारसे काही कधीही करू शकणार नाहीत. राष्ट्रालाच (as a whole) मुळात मनापासून जे नको आहे, ते राष्ट्रावर कोण काय लादणार कपाळ!)
त्यामुळे, हे पूर्वापार असेच चालत आलेले आहे, नि जगाच्या अंतापर्यंत हे असेच चालत राहायचे. नाइलाज आहे, हिंदुस्तान है।
अहो, पूर्वापार मोजत आलेलो आहोत — यात नवीन काय सांगितलेत? परंतु, कोणाला पडलेली आहे काय? नि, कधी पडली होती, की आजच पडावी?
(नाही, याचा इतकाच त्रास जर होत असेल (नि शक्य असेल), तर खरोखरच कोठेतरी निघून जा. चीनला जाऊन राहू नका, वाटले तर, परंतु, कोठेतरी चालते व्हा. तुमच्याच भल्यासाठी. देशाला जर आपल्या भल्याची पडलेली नाही, तर तुम्ही आपल्या स्वतःच्या भल्याचे पाहा. गांधीजींचा मार्मिक संदेश लक्षात ठेवा: Quit India!)
असो चालायचेच.