Skip to main content

जैविक लिंगाचा वर्णपट : निसर्गाची गुंतागुंत आणि समाजाची बौद्धिक दिवाळखोरी[१]

जैविक लिंगाचा वर्णपट : निसर्गाची गुंतागुंत आणि समाजाची बौद्धिक दिवाळखोरी [१]

राजीव उपाध्ये


भाग १

मानवी ओळख हा कायम वादाचा, तणावाचा आणि संघर्षाचा  विषय ठरलेला आहे, कारण व्यक्तीची ओळख प्रामुख्याने ३ घटक निश्चित करतात. ती व्यक्ती आपल्या वर्तनातून, कर्तृत्वातून आपली ओळख निर्माण करते. त्या व्यक्तीचे कुटुंब त्या व्यक्तीला काही ओळख बहाल करते. एखाद्या व्यक्तीचे तिच्या कुटुंबातले स्थान सहसा त्या व्यक्तीकडून होणार्‍या अपेक्षांच्या पूर्तीवर ठरते. त्याने/तिने  आई-वडीलांसाठी, भावंडासाठी काय केले? मी जेव्हा नवीन गाडी घेतली तेव्हा शक्य तेव्हढ्या संपर्कातील नातेवाईकांना माझ्या गाडीतून हिंडवून आणले. मी तेव्हा खुपच दिलदार म्हणून ओळखला गेलो होतो. पण मग माझ्याकडून अपेक्षा वाढल्या. माझ्याकडुन काही गोष्टी जेव्हा ’मिळेनात’ (लुबाडता येईनात) तेव्हा मी बदनाम झालो.

यापलिकडे ज्या ओळखी असतात त्या समाजाने निर्माण केलेल्या असतात. या ओळखी  आर्थिक हितसंबंध, सत्ता इ० मधून निर्माण होतात. तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक जेव्हा समाजाने निर्माण केलेल्या ओळखीबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा समाज खवळतो आणि ढवळून निघतो.

अशीच एक सामजिक ओळख म्हणजे जैविक लिंग - स्त्री आणि पुरुष. पण आज विज्ञान या निकषाला छेद देते. जैविक लिंगाबद्दलची चर्चा आजकाल इतकी राजकीय झाली आहे की विज्ञानाची अवस्था गावातल्या भांडणात अडकलेल्या पंचासारखी झाली आहे. दोन्ही बाजूंना पंचाने आपल्याच बाजूने निकाल द्यावा असे वाटते. पण पंचाची अडचण ही असते की त्याने प्रत्यक्षात जे पाहिले आहे तेच सांगावे लागते. विज्ञानाची अवस्था तशीच आहे. निसर्गाने जे निर्माण केले आहे ते अनेकांना मान्य नाही आणि जे अनेकांना मान्य आहे ते निसर्गाने निर्माण केलेले नाही.

"शाळेत शिकवले" हे दोन शब्द आपल्या बौद्धिक आयुष्याचे सर्वात मोठे थडगे आहेत. जैविक लिंग फक्त दोनच असतात असे शाळेत शिकवले जाते. हे पूर्ण खोटे नाही. पण ते पूर्ण सत्यही नाही. या दोन वाक्यांमधील फरक समजावून सांगणे हे उत्क्रांतीशास्त्र शिकवण्यापेक्षा कठीण काम आहे. कारण माणूस तर्कशुद्ध प्राणी नाही. तो वर्गीकरण करणारा प्राणी आहे. त्याला जग समजून घ्यायचे नसते. त्याला फक्त त्याच्या आकलनानुसार जगाचे कप्पे करायचे असतात. एकदा कप्पे तयार झाले की विचार करण्याची सोय संपते. धर्म, जात, वंश, राष्ट्र, विचारसरणी आणि आता लिंग: प्रत्येक ठिकाणी हीच पद्धत. वर्गीकरण ही ज्ञानाची सुरुवात असते. बहुतेक लोक मात्र त्यालाच ज्ञानाचा शेवट समजतात. यात बुद्धीची कमतरता नसते; आळशीपणाचा उत्सव असतो.

उत्क्रांतीच्या दृष्टीने मानवी प्रजातीमध्ये दोन प्रमुख प्रजनन भूमिका आहेत: अंडाणू निर्माण करणारे शरीर आणि शुक्राणू निर्माण करणारे शरीर. याबद्दल कोणताही गंभीर शास्त्रीय वाद नाही. पण समस्या इथे सुरू होत नाही. समस्या "बहुसंख्य" आणि "सर्व" या दोन शब्दांमधील अंतरात सुरू होते. हे अंतर समजत नाही म्हणजे भाषेचा प्रश्न नाही; बुद्धीचा प्रश्न आहे. बहुसंख्य म्हणजे सर्व नव्हे. अपवाद म्हणजे नियम नव्हे. पण सार्वजनिक चर्चेत हे दोन भेद टिकत नाहीत. एक गट अपवादांचे अस्तित्वच नाकारतो. दुसरा गट अपवादांनाच वास्तवाचे केंद्रस्थान बनवतो. दोघेही एकसारखेच बेजबाबदार आहेत.

गेल्या काही दशकांत जनुकशास्त्र, विकास-जीवशास्त्र आणि अंतःस्राव-शास्त्राने लिंगनिर्मितीची प्रक्रिया इतक्या तपशीलाने उलगडली आहे की जुने पाठ्यपुस्तकी सूत्र आता कालबाह्य ठरले आहे. XX म्हणजे स्त्री आणि XY म्हणजे पुरुष ही सुरुवात आहे; पण कथा तिथे संपत नाही. Klinefelter syndrome मधील XXY व्यक्ती, Turner syndrome मधील 45,X व्यक्ती, XYY आणि XXX अशा गुणसूत्रीय स्थिती, Androgen Insensitivity Syndrome आणि 5-alpha reductase कमतरता अशा अनेक जैविक वास्तवांनी आपल्याला एक साधा धडा दिला आहे: निसर्गाला मनुष्यनिर्मित फॉर्मवरील चौकोनांची माहिती नसते.

इंटरसेक्स हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात लगेच राजकारण सुरू होते. काही जणांना वाटते हा विषय मांडणे म्हणजे स्त्री-पुरुष या संकल्पनांवर हल्ला आहे. काहींना वाटते इंटरसेक्स व्यक्तींचे अस्तित्व म्हणजे स्त्री-पुरुष या श्रेण्या निरर्थक ठरल्या. प्रत्यक्षात दोन्ही निष्कर्ष घाईघाईने काढलेले आहेत. निसर्ग  फक्त  मधल्या जागा भरायचे काम करतो. Anne Fausto-Sterling यांनी दशकांपूर्वी हा प्रश्न पुढे आणला तेव्हा त्यांचा उद्देश नवीन धर्म निर्माण करणे नव्हता. त्यांचा मुद्दा इतकाच होता की निसर्गातील विविधता आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक आहे. पण सार्वजनिक चर्चेत सूक्ष्मता टिकत नाही. सूक्ष्म वास्तव मरते आणि झुंडीने केलेली घोषणाबाजी जगते. 

continued...