लुगडं

लुगडं
====
-राजीव उपाध्ये
गावाच्या पूर्वेला नदी होती. गावाची वेस जिथे संपत होती, तिथून काही अंतरावर नदीकाठच्या काळपट मातीत एकमेकांच्या अंगावर कोसळल्यासारख्या काही झोपड्या उभ्या होत्या. उन्हाळ्यात त्यांच्या छपरांच्या फटींतून आकाश दिसे आणि पावसाळ्यात तेच आकाश पाण्याच्या रूपाने घरात उतरे. त्या वस्तीला गावातले लोक माळवाडा म्हणत. चांभार, मांग, महारांची ती वस्ती गावात असूनही गावाबाहेर होती. देवळापासून तिचं अंतर होतं, विहिरीपासून अंतर होतं, चावडीपासून अंतर होतं आणि माणसांच्या मनापासून तर त्याहून अधिक. गावच्या मुख्य रस्त्यावरून चालतानादेखील माळवाड्यातल्या माणसांनी कडेने चालावं, अशी कुठेही न लिहिलेली आज्ञा होती; पण लिहिलेल्या कायद्यापेक्षा तिचं पालन अधिक काटेकोरपणे होत असे. सावकाराच्या शेतात राबायचं, मोठ्या घरांची घाण काढायची, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावायची आणि काम नसेल त्या दिवशी उपाशी राहायचं—माळवाड्यात यालाच आयुष्य म्हणत.
गंगी याच माळवाड्यात राहत होती. पंचविशी नुकतीच ओलांडलेली, पण चेहऱ्यावर वयापेक्षा कितीतरी अधिक वर्षे साचलेली. तिचा नवरा सुरतसिंग एक दिवस सावकाराच्या शेतात राबता राबता अचानक खाली कोसळला. पडताना त्याच्या हातात खुरपं होतं. संध्याकाळी ते खुरपं घरी परत आलं; सुरतसिंग मात्र आला नाही. दुसऱ्या दिवशी गंगीचं डोकं मुंडण्यात आलं. तिच्या हातातल्या बांगड्या फोडल्या गेल्या, कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, गळ्यातलं मंगळसूत्र उतरवलं गेलं आणि अंगावरचं लाल लुगडं खेचून काढून त्याच्या जागी एक फटक पांढरं वस्त्र तिच्या अंगाभोवती गुंडाळण्यात आलं. हे सगळं इतक्या विधिपूर्वक झालं, की जणू त्या दिवशी फक्त सुरतसिंग मेला नव्हता; त्याच्यासोबत गंगीच्या आयुष्यातले सारे रंगही पुसले गेले होते. तिच्या दुःखाला गावाने एक पोशाख दिला होता आणि तो पोशाख घातल्यावर ती ‘शुद्ध’ झाली होती.
तिच्याबरोबर तिची सासू काशी राहत होती. नात्याने ती सासू असली तरी गंगीसाठी ती आईच होती. स्वतःच्या आईचा चेहरादेखील गंगीला नीट आठवत नव्हता. लहान वयातच तिला एका नातलगाच्या घरी कामासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथून काशीने तिला सून म्हणून आपल्या घरात आणलं आणि हळूहळू मुलगी म्हणून जवळ घेतलं. गंगीच्या आयुष्यात प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणारी माणसं फार थोडी होती; त्यात सुरतसिंग गेला होता आणि आता काशी उरली होती.
काशी ऐंशीच्या पुढे गेली होती. डोळ्यांवर पांढरं धुकं उतरलं होतं, गुडघे वाकत नव्हते आणि प्रत्येक श्वासाबरोबर तिची छाती अशा आवाजाने वरखाली होत असे, जणू एखाद्या मोडक्या घराचा जुना दरवाजा वाऱ्याने उघडझाप करत आहे. पंधरा दिवसांपासून ती अंथरुणाला खिळून होती. गावचा वैद्य येऊन गेला होता. त्याने नाडी पाहिली, दोन पुड्या दिल्या आणि पैसे घेऊन निघून गेला. पुड्या संपल्या, पैसे संपले; पण काशीची यातना संपली नाही. गरिबाचं मरणही विचित्र असतं. जगण्यासाठी पैसा लागतो, हे त्याला आयुष्यभर कळत राहतं; शेवटी मरतानाही पैसा लागतो, एवढंच नवं ज्ञान त्याच्या पदरात पडतं.
त्या दिवशी संध्याकाळी गंगी चुलीपाशी बसून भाकरी करत होती. घरात धूर भरला होता. तव्यावरची भाकरी फुगण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती आणि दारातून दिसणारा मावळता सूर्य नदीच्या पाण्यात लालसर होत विरघळत होता. तेवढ्यात अंथरुणावरून काशीचा क्षीण आवाज आला, “गंगू...”
गंगीने हाताला लागलेलं पीठ झटकत मागे पाहिलं. “काय आई?”
“जरा इकडे ये.”
ती अंथरुणाजवळ जाऊन बसली. काशी बराच वेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. त्या धूसर डोळ्यांत आता जग फारसं उरलं नव्हतं, पण गंगी मात्र अजून स्पष्ट दिसत असावी.
“एक काम करशील माझं?” तिने विचारलं.
“बोल ना. काय हवं?”
काशी काही क्षण गप्प राहिली आणि मग अतिशय हळू आवाजात म्हणाली, “तुझं ते लाल लुगडं... लग्नात नेसलं होतंस ते... एकदा नेसशील?”
गंगीच्या हातातला पिठाचा गोळा खाली पडला. घरात काही क्षण फक्त चुलीतल्या लाकडांच्या तडतडण्याचा आवाज राहिला. गंगीने मान खाली घातली. “आई, ते कुठे आहे आता? त्या दिवशी सकवाबाईंनी नेलं. जाळून टाकलं म्हणाल्या.”
काशीच्या कोरड्या ओठांवर किंचित हसू उमटलं. “मला माहीत आहे.”
गंगीने चमकून तिच्याकडे पाहिलं.
“तू ते नेसून पहिल्यांदा या दारातून आली होतीस, ते आठवतंय मला. घरात काय होतं तेव्हा? दोन मडकी, चूल आणि फाटकी गोधडी. पण तू दारात लाल लुगडं नेसून उभी राहिलीस, तेव्हा मला वाटलं होतं, माझ्या घरात लक्ष्मी नाही आली; माझी मुलगी आली.”
गंगीचे डोळे भरून आले. तिने हळूच म्हटलं, “पण आई, मी आता विधवा आहे. कुणी पाहिलं तर? रंगीत लुगडं नेसलेलं कळलं तर गाव काय म्हणेल?”
काशीने डोळे मिटले. “मी उद्या असेन असं तुला वाटतं?”
गंगीच्या तोंडून शब्द फुटला नाही.
“आयुष्यभर लोकांनी माझ्याकडून बरंच काही घेतलं, गंगू. जमीन गेली, मुलगा गेला, अंगातली ताकद गेली. आता डोळेसुद्धा जात आहेत. मरण्याआधी एकदा रंग तुझ्या अंगावर पाहू दे.”
त्या वाक्यानंतर घरातला धूरही जणू थबकला.
गंगी उठली. चुलीजवळ धान्याची एक जुनी पेटी होती. तिने बाजरी बाजूला सारली. तळाशी एक मळकट पोतं होतं आणि त्या पोत्याखाली गुंडाळून ठेवलेलं एक कापड. तिने ते बाहेर काढलं. किरमिजी रंगाचं जुनं लुगडं तिच्या हातात आलं. ते पूर्ण नव्हतं. थोडं फाटलेलं होतं; तरी त्याचा रंग अजून जिवंत होता. सकवाबाई ते जाळण्यासाठी घेऊन जाण्यापूर्वी गंगीने त्याचा एक भाग गुपचूप लपवून ठेवला होता. तो तिचा अपराध होता आणि तोच तिचा खजिनाही. ती कधीतरी नववधू होती, कुणाची तरी पत्नी होती, कुणीतरी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं होतं, याचा तो एकमेव उरलेला पुरावा होता.
गंगीने अंगावरचं पांढरं वस्त्र बाजूला केलं आणि लाल लुगडं नेसलं. कोपऱ्यातल्या तडकलेल्या आरशात तिने स्वतःकडे पाहिलं. क्षणभर तिला स्वतःचाच चेहरा ओळखू आला नाही. मुंडणानंतर पुन्हा उगवलेले विरळ केस, खोल गेलेले गाल, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं आणि त्या सगळ्याभोवती पसरलेला लाल रंग. तो रंग तिच्या अंगावर नुसता शोभत नव्हता; तो जळत होता. वर्षानुवर्षे राखेखाली दबलेला निखारा कुणीतरी अचानक उकरून बाहेर काढावा, तशी ती दिसत होती.
ती काशीच्या अंथरुणापाशी जाऊन उभी राहिली. “पाह आई.”
काशीने डोळे उघडले. काही क्षण तिचा श्वास थांबल्यासारखा झाला आणि मग तिच्या सुकलेल्या चेहऱ्यावर विलक्षण मृदू हसू पसरलं. “गंगू...” तिने थरथरता हात पुढे केला आणि लुगड्याच्या पदराला स्पर्श केला. “किती सुंदर दिसतेस गं... अगदी त्या दिवसासारखी.”
गंगी तिच्याजवळ खाली वाकली. काशीने थरथरता हात तिच्या डोक्यावर ठेवला. कदाचित तो तिच्या आयुष्यातला शेवटचा आशीर्वाद होता.
आणि नेमक्या त्याच वेळी दारावर थाप पडली अन धाडकन उघडलं. दारात सरपंच नारायणरावांची बायको सकवाबाई उभी होती. तिच्या मागे दोन बायका होत्या. सकवाबाईंची नजर प्रथम गंगीच्या चेहऱ्यावर गेली आणि मग तिच्या अंगावरच्या लाल रंगावर स्थिर झाली. त्यांच्या चेहऱ्यावरची चीड अशी होती, जणू त्यांनी एखादं पाप प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभं असलेलं पाहिलं होतं.
“हे काय आहे?”
गंगी जागच्या जागी गोठली. “आईची तब्येत फार—”
“मी विचारते, हे काय आहे?”
सकवाबाईंचा हात तिच्या पदरावर गेला. “विधवा असून लाल लुगडं? तुला लाज नाही वाटत?”
“आईची शेवटची इच्छा होती,” गंगी कसंबसं म्हणाली.
“इच्छा?” सकवाबाई उपहासाने हसल्या. “रांडेला कसली इच्छा?”
बाहेरून जाणारी दोन माणसं थांबली. मग आणखी काही. काही क्षणांत झोपडीभोवती गर्दी जमली. गावाला दुसऱ्याच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचा अपमान पाहण्याची उत्सुकता नेहमीच अधिक असते.
“आज लाल लुगडं, उद्या कुंकू, परवा बांगड्या! मग गावातल्या पोरी काय शिकणार?” सकवाबाई ओरडत होत्या.
अंथरुणावरची काशी उठण्याचा प्रयत्न करत होती. “तिने... माझ्यासाठी...” तिच्या तोंडातून क्षीण शब्द बाहेर पडले; पण त्या गर्दीत मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या म्हातारीचा आवाज ऐकण्याइतकी शांतता कुणाकडे नव्हती.
दोन बायकांनी गंगीचे हात पकडले. सकवाबाईंनी तिच्या लुगड्याचा पदर ओढला. गंगीने तो दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवला. काही क्षण त्या एका लाल कापडाच्या दोन टोकांवर दोन जगं उभी राहिली—एका बाजूला संपूर्ण गावाचा धर्म, प्रतिष्ठा, परंपरा आणि पुरुषांनी आखून दिलेल्या मर्यादांचं ओझं; दुसऱ्या बाजूला एका मरणाऱ्या म्हातारीची शेवटची इच्छा आणि एका तरुण विधवेच्या आयुष्यात उरलेली एकमेव रंगीत आठवण.
अचानक कापड फाटलं. तो आवाज फार मोठा नव्हता, पण गंगीला क्षणभर वाटलं, तिच्या छातीच्या आत काहीतरी चर्रकन फाटलं.
लुगडं तिच्या अंगावरून खेचून काढण्यात आलं. गर्दीतल्या एका पुरुषाने नजर वळवली; दुसऱ्याने वळवली नाही. एका बाईने पदराआड हसू दाबलं. कुणीतरी पुन्हा तिचं मुंडण करण्याची सूचना केली आणि लगेच न्हाव्याला बोलावण्यात आलं.
गंगीला झोपडीबाहेर मातीत बसवलं गेलं. एका बाईने तिची हनुवटी घट्ट धरली. वस्तरा डोक्यावरून फिरू लागला. खरखरणाऱ्या त्या आवाजाबरोबर विरळ केसांच्या पुंजक्या मातीत पडत राहिल्या. गंगीचे डोळे मात्र घराच्या आत काशीच्या अंथरुणावर खिळले होते. एका ठिकाणी वस्तरा त्वचेला लागला आणि रक्ताचा बारीक थेंब कपाळावरून खाली सरकला. सकवाबाईंनी बोटाने राख उचलली आणि त्या जखमेवर चोळली.
“आता झाली शुद्ध,” त्या समाधानाने म्हणाल्या.
गर्दीत कुणीतरी हसलं. गंगीच्या तोंडून मात्र एकही शब्द बाहेर पडला नाही.
काशीने हे सगळं पाहिलं. ज्या मुलीला तिने कधीकाळी लाल लुगडं नेसून आपल्या घरात येताना पाहिलं होतं, त्याच मुलीच्या अंगावरून आज तिच्या डोळ्यांसमोर रंग ओरबाडून काढला जात होता. तिचं डोकं खरवडलं जात होतं, तिच्या अपमानाभोवती गाव तमाशा पाहत उभं होतं. काशीने हात वर करण्याचा प्रयत्न केला, पण तो अर्ध्यावरच थरथरला. तिचे ओठ हलले.
“गंगू...”
गंगीने तिच्याकडे पाहिलं.
काशीचा हात खाली पडला. छाती एकदा वर आली, खाली गेली आणि पुन्हा वर आली नाही.
बाहेरची गर्दी अजून गंगीच्या शुद्धीकरणात गुंतली होती. घराच्या आत एक माणूस मेला आहे, हे काही क्षण कुणाच्या लक्षातही आलं नाही.
गंगी उठली. ती घरात गेली. काशीचे डोळे अजून उघडे होते. तिने हाताने ते मिटले आणि तिच्या अंगावर पांढरं धोतर पसरलं. ज्या गावाने जिवंत काशीला आयुष्यभर फारसं काही दिलं नव्हतं, त्या गावाने शेवटी तिला पांढरं कापड दिलं होतं.
गंगी रडली नाही. कदाचित दुःख एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच अश्रू निर्माण करतं; त्यापलीकडे गेलं, की डोळ्यांतही एक प्रकारचा दुष्काळ पडत असावा.
ती घराबाहेर पडली. लोकांनी तिला वाट करून दिली—जशी मेलेल्या जनावराला नेताना देतात. कुणीतरी विचारलं, “कुठं चाललीस?” तिने उत्तर दिलं नाही. एका म्हातारीने तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हटलं, “आई मेली तरी हिला रडूसुद्धा येत नाही. जातच तशी.”
गंगी क्षणभर थांबली. तिने वळून त्या म्हातारीकडे पाहिलं. तिच्या नजरेत राग नव्हता, शाप नव्हता, तक्रारही नव्हती. पण त्या निर्विकार नजरेत असं काही होतं, की म्हातारीने आपोआप डोळे खाली केले.
गंगी नदीकाठी आली. संध्याकाळ आता अंधारात विरघळत होती. नदीकाठची वाळू थंड झाली होती. ती खाली बसली. वारा मुंडलेल्या डोक्यावरून गेला, तेव्हा वस्तऱ्याने कापलेल्या जागा झोंबल्या. तिने हळूहळू आपली बंद मूठ उघडली.
तिच्या तळहातावर एक छोटी किरमिजी चिंधी होती.
लुगडं खेचताना फाटलेला तो कोपरा गोंधळात जमिनीवर पडला होता. गंगीने खाली कोसळताना नकळत तो उचलून मुठीत लपवला होता. एवढ्याशा कापडासाठी आता कुणी तिची झडती घेणार नव्हतं. गावाला वाटलं होतं की त्यांनी तिच्याकडून लाल रंग पूर्णपणे काढून घेतला आहे.
गंगीने ती चिंधी ओठांना लावली. त्या कापडाला अजूनही धुराचा, घामाचा आणि काशीच्या बोटांचा वास येत होता की तो केवळ तिच्या मनाचा भास होता, हे तिला समजलं नाही.
काही वेळाने गावाकडून माणसांचे आवाज आले. काशीचं प्रेत स्मशानाकडे नेत होते. गंगी दूरून उभी राहून पाहत राहिली. तिला जवळ जाण्याची परवानगी नव्हती. ज्या हातांनी पंधरा दिवस काशीला पाणी पाजलं होतं, तिचं मलमूत्र साफ केलं होतं, तापलेल्या अंगावर ओल्या चिंध्या ठेवल्या होत्या, रात्री तिची छाती चोळली होती, तेच हात आता मृत काशीला स्पर्श करण्याइतके शुद्ध नव्हते.
गंगी वाळूत गुडघे टेकून बसली. तिने हात जोडले नाहीत. देवाचं नाव घेतलं नाही. फक्त लाल चिंधी छातीशी धरली आणि डोळे मिटले. देवळात प्रवेश नसलेल्या स्त्रीची ती प्रार्थना होती; म्हणून कदाचित तिला देवाची गरजही उरली नव्हती.
रात्र गडद होत गेली. काही वेळाने गंगी उठली. तिच्यासमोर नदी होती, नदीच्या पलीकडे अंधार होता आणि मागे ते गाव होतं. तिने पाण्यात पाय टाकला. थंड पाणी प्रथम घोट्यांपर्यंत, मग गुडघ्यांपर्यंत आणि पुढे कंबरेपर्यंत आलं. प्रवाह फार मोठा नव्हता, पण प्रत्येक पाऊल जड होतं. मध्यावर पोहोचल्यावर ती क्षणभर थांबली. मागे गाव होतं, पण तिने वळून पाहिलं नाही. तिने पुढचं पाऊल टाकलं आणि हळूहळू नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचली.
त्या रात्री सरपंच नारायणरावांच्या घरात गरम भाकऱ्या झाल्या होत्या. सकवाबाई जेवत बसल्या होत्या. नारायणरावांनी हुक्क्याचा झुरका घेत सहज विचारलं, “ती चांभारिण कुठं गेली?”
“कोण जाणे. नदीकडे गेली म्हणे.”
“बुडाली तर?”
सकवाबाईंनी भाजीचा घास घेतला. “बुडू दे.”
नारायणरावांनी पुन्हा हुक्का ओढला आणि म्हणाले - “बरंच झालं. गाव शुद्ध राहील.”
तेवढ्यात शेजारच्या खोलीत काहीतरी जोराने आपटल्याचा आवाज झाला. त्यानंतर एका स्त्रीचा दबलेला हुंदका ऐकू आला. नारायणरावांचा मुलगा आपल्या बायकोला मारत होता. सकवाबाईंनी क्षणभर त्या दिशेने कान दिला आणि मग भाकरीचा तुकडा तोडत शांतपणे म्हटलं, “नवरा-बायकोचं आहे.” त्यानंतर घरातलं जेवण पुन्हा सुरू राहिलं.
पण त्या रात्री सकवाबाईंना झोप लागली नाही. मध्यरात्री त्यांची सून पाणी प्यायला अंगणात आली. तिच्या मनगटावर निळसर वळ उमट्ले होते. सकवाबाईंची नजर त्यावर पडताच सुनेने पटकन पदर ओढला आणि आत निघून गेली. त्या बराच वेळ अंधारात बसून राहिल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा गंगीचं मुंडलेलं डोकं, कपाळावर फासलेली राख आणि त्या राखेतून ओघळणारा रक्ताचा बारीक लाल थेंब येत राहिला.
पहाटे उठल्यावर त्यांनी हात धुतले. एकदा. मग पुन्हा. नंतर साबण लावून जोरजोराने घासले. तरीही त्यांना सारखं वाटत राहिलं की त्यांच्या बोटांना कुठेतरी लाल रंग लागून राहिला आहे.
दुसऱ्या दिवशी गावात थोडी विचारपूस झाली. गंगी कुठे गेली, याबद्दल प्रत्येकाकडे एक उत्तर होतं, पण कुणाकडे माहिती नव्हती. कुणी म्हणालं ती नदीत बुडाली असेल. कुणी म्हणालं शहरात पळाली. कुणीतरी तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल अश्लाघ्य अंदाज बांधला. दुपारपर्यंत मात्र गावाला बोलण्यासाठी दुसरा विषय मिळाला आणि गंगी विसरली गेली.
नदीच्या पलीकडे मात्र एक स्त्री चालत होती.
तिच्या पायांत चप्पल नव्हती. डोक्यावर केस नव्हते. पोटात अन्न नव्हतं. खिशात पैसा नव्हता. कुठे जायचं, कुणाकडे जायचं, रात्री कुठे झोपायचं—यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. तिच्याकडे फक्त बंद मुठीत धरलेली एक छोटी लाल चिंधी होती.
पूर्वेला हळूहळू सूर्य वर येत होता. त्याचा कोवळा प्रकाश तिच्या मुंडलेल्या डोक्यावर पडला. काल त्याच डोक्यावर राख फासली गेली होती; आज त्यावर ऊन पडलं होतं.
गंगी चालत राहिली.
तिला आपण जिंकलो आहोत असं वाटत नव्हतं. आपण हरलो आहोत असंही वाटत नव्हतं. विजय आणि पराभव हे शब्द कदाचित पोट भरलेल्या माणसांना परवडत असावेत. तिला भूक लागली होती, पाय दुखत होते, आई मेली होती, नवरा आधीच गेला होता, घर मागे राहिलं होतं आणि पुढची रात्र कुठे काढायची, याचीही कल्पना नव्हती. तरी तिचे पाय एकामागून एक पुढे पडत होते.
काही माणसांच्या वाट्याला जगणं म्हणजे सुख नसतं, आशा नसते, विजय तर मुळीच नसतो. ज्यांनी तुम्हाला मिटवून टाकायचं ठरवलं आहे, त्यांच्या इच्छेविरुद्ध घेतलेला पुढचा श्वास—कधी कधी तेवढंच जगणं असतं.
गंगीने चालता चालता मूठ उघडली. सकाळच्या उन्हात ते छोटंसं लाल फडकी क्षणभर उजळून निघालं. तिने ते पुन्हा छातीशी दाबून धरलं आणि पूर्वेकडे चालत राहिली.
गावात लोक म्हणाले, ती हरली. पण गाव चुकत होतं. गंगी जिंकलीही नव्हती.
ती फक्त संपली नव्हती. आणि कदाचित त्या गावासाठी तेच सर्वांत असह्य होतं.