स्क्रीन
रात्रभर पाऊस पडत होता. पहाटे चारच्या सुमारास शहराचा रंगच बदलून गेला होता. काळे डांबरी रस्ते पाण्याच्या चकाकत्या थराखाली विरघळून गेले होते, रस्त्याच्या कडेचे पिवळे दिवे साचलेल्या पाण्यात लांब लांब पसरले होते आणि बंद दुकानांच्या पत्र्यांवर पावसाचे थेंब असा एकसुरी आवाज करत होते, जणू हजारो बोटे आत झोपलेल्या शहराला उठवण्यासाठी दारे वाजवत होती. पण सत्ताविसाव्या मजल्यावरच्या आपल्या बेडरूम मध्ये आपल्या गर्लफ्रेण्डच्या मिठीत झोपलेल्या अनिरुद्धला त्या पावसाने नव्हे, तर फोनच्या एका नाजूक टिणटिणीने जाग आली. स्क्रीनवर हिरव्या अक्षरांत संदेश चमकत होता—CITY FLOOD CONTROL: ALL PARAMETERS NORMAL.
अनिरुद्धने समाधानाने फोन बाजूला ठेवला आणि खिडकीचा पडदा सरकवला. एवढ्या उंचीवरून पाऊसही वेगळा दिसत होता. खाली शहर धुक्यात बुडाले होते. दूरवरच्या काचेच्या इमारतींची शिखरे ढगांत हरवली होती आणि एक्स्प्रेसवेवर लाल दिव्यांची अखंड रांग एखाद्या संथ वाहणाऱ्या रक्तवाहिनीसारखी सरकत होती. कालच महापौरांनी पत्रकार परिषदेत त्याच्या प्रणालीचे कौतुक केले होते. त्यांच्या मागच्या प्रचंड पडद्यावर अनिरुद्धने तयार केलेला डिजिटल नकाशा चमकत होता—लाखो रंगीबेरंगी ठिपके, रेषा, आणि चौकोन. कुठे पाणी वाहते, कुठे कचरा साचतो, कोणत्या रस्त्यावर किती वाहने आहेत, कोणत्या वस्तीत किती माणसे राहतात, कुठे पूर येऊ शकतो इत्यादि सगळं त्या नकाशाला माहीत होतं.
"आता शहर आपल्याशी बोलतं," महापौर म्हणाले होते. टाळ्या वाजल्या होत्या. त्या क्षणी अनिरुद्धला खरोखर वाटलं होतं की हे अफाट, विस्कळीत, सतत वाढणारं शहर अखेर त्याने एका काचेच्या पेटीत पकडलं आहे आणि त्या पेटीची किल्ली त्याच्या हातात आहे.
सकाळी साडेसात वाजता त्या नकाशावर पहिला लाल ठिपका चमकला. मग दुसरा. मग तिसरा. वॉर्ड ४३ : आकस्मिक जलसंचय. अनिरुद्धने स्क्रीन मोठा केला आणि त्याच्या कपाळावर आठी पडली. हे शक्यच नव्हतं. तिथे सहा महिन्यांपूर्वी नवी पावसाळी जलवाहिनी बसवली होती. मॉडेलने त्या परिसराला Low Risk ठरवलं होतं. पण दहा मिनिटांत नियंत्रण कक्षात फोनची घंटी थांबेनाशी झाली आणि तासाभराने अनिरुद्ध स्वतः वॉर्ड ४३ च्या बाहेर उभा होता.
त्याची गाडी मुख्य रस्त्यापर्यंतच जाऊ शकली. पुढे रस्ता नव्हताच; गढूळ तपकिरी पाण्याची एक अरुंद पट्टी घरांच्या मधून वाहत होती. अनिरुद्धने पँट गुडघ्यापर्यंत दुमडली आणि पाण्यात पाय टाकला. पहिल्याच पावलाला काहीतरी मऊ वस्तू त्याच्या बुटाला चिकटली. प्लास्टिकची पिशवी होती. थोडं पुढे एक तुटलेली चप्पल तरंगत होती, तिच्यामागे बिस्किटाचं रिकामं पाकीट, वाळलेली दोन लिंबं, झाडाची फांदी आणि एक लाल रंगाचा प्लास्टिकचा घोडा. दोन्ही बाजूंच्या घरांची दारे उघडी होती. कुणी बादलीने घरातलं पाणी बाहेर फेकत होतं, कुणी भिजलेल्या गाद्या खिडकीत अडकवत होतं, कुणी स्टीलची भांडी उंच फळीवर चढवत होतं. एका घरातून देवघरातील गणपतीची छोटी मूर्ती बाहेर आली; एका बाईने ती छातीशी धरली आणि पाण्यातून वाट काढत जिन्याकडे गेली.
"साहेब!"
अनिरुद्धने वळून पाहिलं. पांढरे केस डोक्याला चिकटलेली एक म्हातारी कमरेपर्यंत पाण्यात उभी होती. तिच्या हातात स्टीलचं पातेलं होतं.
"तुम्हीच ना ते नकाशावाले?"
"कुठला नकाशा?" अनिरुद्धने विचारलं.
"टीव्हीवर दाखवला होता ना परवा. सगळं शहर दिसतं म्हणे त्यात."
अनिरुद्ध नकळत हसला. "हो. तो आमचाच."
"मग यात हे दिसतं का?"
तिने पातेलं पाण्यात बुडवलं, भरलं आणि घराबाहेर फेकलं. बाहेरचं पाणी क्षणभर हेलकावलं आणि पुन्हा तिच्या घरात शिरलं. म्हातारीने पुन्हा पातेलं भरलं. मग समोर बोट दाखवलं.
दोन जुन्या इमारतींच्या मध्ये एक प्रचंड काँक्रीटची भिंत उभी होती. पावसाने धुतलेली, नवीकोरी. तिच्या पलीकडे बांधकाम सुरू असलेल्या उंच इमारतींचे सांगाडे धुक्यात उभे होते आणि त्यांच्यावर एक मोठा निळा फलक चमकत होता—RIVER VIEW RESIDENCES — LIVE ABOVE THE CITY.
अनिरुद्धने टॅबलेट उघडला. त्याच्या नकाशात तिथे भिंत नव्हती. तिथून एक निळी रेषा अगदी सहजपणे पुढे गेली होती—Natural Drainage Channel. कधीकाळी या सगळ्या वस्तीचं पावसाचं पाणी त्या वाटेने नदीत जात असावं. आता त्या निळ्या रेषेवर चाळीस फूट उंच काँक्रीट उभं होतं.
"ही भिंत कधी बांधली?"
"उन्हाळ्यात."
"तक्रार केली नाही?"
म्हातारी हसली. तिच्या हसण्यात दातांपेक्षा सुरकुत्याच जास्त दिसत होत्या.
"केली की."
"मग?"
तिने पातेलं पुन्हा पाण्यात बुडवलं.
"तुमच्या नकाशात तक्रारी दिसत नसतील बहुतेक."
अनिरुद्ध काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग पुढे निघाला.
थोड्या अंतरावर एक सात-आठ वर्षांचा मुलगा पाण्यात वाकून काहीतरी शोधत होता. त्याचा अर्धा गणवेश अंगावर होता. पांढरा शर्ट चिखलाने तपकिरी झाला होता आणि एका पायात चप्पल होती, दुसरा पाय उघडा. अनिरुद्ध त्याच्याजवळ थांबला.
"काय हरवलं?"
मुलगा पाण्यातच पाहत म्हणाला, "घर."
अनिरुद्धला वाटलं त्याने नीट ऐकलं नाही.
"काय?"
"घर."
मुलाने पाण्यात हात घातला आणि तोच लाल प्लास्टिकचा घोडा बाहेर काढला. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर आनंद चमकला.
"हा मिळाला. घर नाही मिळालं."
त्याने मागे बोट दाखवलं. दोन पत्रे एकमेकांवर पडले होती. त्यांच्या खाली भिजलेली गादी, निळी बादली आणि शाळेच्या दप्तराचा एक कोपरा दिसत होता. रात्री पाण्याच्या जोराने झोपडी कोसळली होती.
अनिरुद्धने नकळत टॅबलेट उघडला. त्या जागेवर एक छोटासा राखाडी चौकोन होता—मिळकत क्र० ४३/७७१. रहिवासी ३.
त्याने स्क्रीनवरच्या त्या चौकोनाकडे पाहिलं आणि मग समोरच्या पत्र्यांच्या ढिगाकडे. एका बोटाच्या टोकाएवढ्या त्या चौकोनात तीन माणसं राहत होती. दोन गाद्या, एक गॅसची शेगडी, काही स्टीलची भांडी, मुलाची पुस्तकं, आईची साडी, भिंतीवर देवाचा फोटो, उन्हाळ्याच्या रात्री बाहेर टाकायची खाट आणि हा लाल घोडा—सगळं त्या एका राखाडी चौकोनात मावत होतं.
संध्याकाळी अस्वस्थपणे अनिरुद्ध नियंत्रण कक्षात परतला तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. पाऊस जवळजवळ थांबला होता. समोरच्या प्रचंड स्क्रीनवर शहर पुन्हा उजळून निघालं होतं. सर्व्हरने ताजा डेटा घेतला आणि सकाळपासून लाल असलेले ठिपके एकामागून एक हिरवे होऊ लागले. Water Level Normal. Traffic Normal. Drainage Normal. शहर पुन्हा व्यवस्थित झालं होतं.
निदान स्क्रीनवर तरी...