Skip to main content

जेन झीनं आम्हांला आमची लायकी दाखवून दिली

(संजय सिन्हा या पत्रकाराचे खडे बोल. मराठीतून नोंदवण्याची गरज आहे, म्हणून मेघना भुस्कुटे यांनी केलेलं हे भाषांतर.)
--

जेन झीनं आम्हांला आमची लायकी दाखवून दिली

नमस्कार. मी संजय सिन्हा ssfbNews वरून आमच्याच व्यवसायबंधूंचा पंचनामा करायला उभा आहे.
मला माझ्या कामाबद्दल अभिमान वाटायचा एके काळी. पण या पिढीनं आज माझ्यासमोर आरसा धरला. हीच पिढी, जिला आम्ही अजाण, मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणारी, रिल्समध्ये रमलेली, अननुभवी म्हणून निकालात काढत आलो.
मी जेन झीबद्दल बोलतो आहे.
या पिढीनं कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं सोडून दिलंय. नि मला त्याचा आनंद आहे. स्वतःचे निर्णय ते स्वतः घेतात. त्यांचे निर्णय चुकीचे आहेत की बरोबर हे इतिहास ठरवेलच. पण त्यांनी त्यांची डोकी गहाण टाकलेली नाहीत, हे नक्की. हेच त्याचं सर्वांत मोठं बलस्थान आहे. जंतरमंतरवर जे घडताना मी पाहिलं, त्यानं मला मुळापासून हलवून टाकलं आहे.
आंदोलनामुळे नाही. लोकशाहीत अशी आंदोलनं होणारच. पण मी हादरलो आहे, कारण आम्हांला तुमची काहीएक गरज नाही असं या पिढीतल्या पोरांनी मुख्यधारेतल्या माध्यमांना चोख बजावलंय. “येऊच नका. आमच्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करू नका. आम्ही आमचं म्हणणं जगापुढे स्वतःच मांडू.” असं त्यांचं म्हणणं आहे.
तुम्ही लोकांनी पत्रकारांना नाही-नाही ती दूषणं दिलीत. कुणी गोदी मिडिया म्हटलं, कुणी प्रेस्टिट्यूट म्हटलं, कुणी पत्लकार म्हटलं. कुणी लिब्रांडू म्हणालं. कुणी वामपंथी म्हटलं. आम्ही ऐकून घेतलं. ऐकून घेणं भागही होतं. तथ्य होतंच त्यातही.
पण जेन झी तुमच्या-माझ्यापुढे दोन पावलं आहे.
ते म्हणले, “नाही ना विश्वास? बहिष्कार टाका.”
कुण्या चॅनलसमोर हात जोडले नाहीत, संपादकांना फोन लावले नाहीत, कुणा वार्ताहराला एक्स्क्लूजिव मुलाखत दिली नाही. त्यांनी आपला मोबाईल काढला नि स्वतःच पत्रकारिता करायला सुरुवात केली.
खरं सांगू? जे बघितलं गेल्या काही दिवसांत, त्यानं मी शरमून गेलो.
कोट्यवधी रुपयांचे कॅमेरे असतात आमच्याकडे, ओबी व्हॅन्स घेऊन फिरतो आम्ही. सॅटेलाइट अपलिंकसाठी कोट्यवधी रुपये खरचतो. आणि इथे – ही पोरंपोरी पाच इंचाच्या स्क्रीनचा मोबाईल घेऊन अशी पत्रकारिता करत होती, की भल्या भल्या न्यूजरूम्सनी त्यांच्या पायाशी बसून धडे घ्यावेत.
एका व्हिडिओत पळणाऱ्या तरुणाला एक जवान पायात पाय घालून पाडताना दिसतो. कॅमेऱ्यानं ते टिपलं आहे.
दुसऱ्या व्हिडिओत एक पोलीस एका तरुणीच्या पार्श्वभागात काठी घुसवताना दिसतो आहे. कॅमेरा तेही अचूक टिपतो. कुणी किंचाळून काहीही कॉमेंट्री करत नाही. नुसती दृश्यं दिसतात. पण त्यातून जे दिसतं, ते बघून कुठलाही संवेदनशील माणूस हादरून गेल्यावाचून राहणार नाही.
एका व्हिडिओत पोलीस स्वतःच गाडीच्या काचा फोडताना दिसतो. कॅमेऱ्यात हे टिपलं गेलं नसतं, तर उद्या ही तोडफोड आंदोलकांनी केली असंच पसरवलं गेलं असतं.
एक लहानसा मोबाईल कॅमेरा. सगळ्या खोट्यानाट्या नरेटिवला आव्हान देतो. यालाच पत्रकारिता म्हणतात.
स्टुडिओत बसून दहा लोकांवर आरडाओरडा करण्याला पत्रकारिता नाही म्हणत. सत्ताधाऱ्यांना जे लपवायचं असतं, ते सत्य – तो क्षण अचूक टिपणं म्हणजे पत्रकारिता. इतिहासाच्या पानांतून सत्तेला जे फाडून-खोडून, गायब करून टाकायचं असतं, ते नोंदून ठेवणं म्हणजे पत्रकारिता.
या पोरांना कॅमेरा नीट समजतो. फ्रेमिंग समजतं. अँगल समजतो, टायमिंग, एडिटिंग… सगळं नीट समजतं.
त्यांचं काम बघताना वाटत होतं, हे काम कुण्या जाणकार, अनुभवी पत्रकारांच्या चमूनं केलं आहे जणू. कुणी शिकवली या पोरांना पत्रकारिता? कुणीच नाही. ती पोरं स्वतःच आंदोलनस्थळी पत्रकारिता जगली.
देशात खरंच माध्यमं स्वायत्त, स्वतंत्र असती, तर या पोरांना दुसऱ्याच दिवशी बोलावून कामं करण्यासाठी आमंत्रणं आली असती. “अशा वार्ताहरांची आम्हांला गरज आहे…” असं म्हणत त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या गेल्या असत्या. पण तसं झालं नाही, याचं वाईट वाटतं. कारण वृत्तवाहिन्यांना आता वार्ताहर नकोच आहेत. दिलेला आयता मजकूर वाचून दाखवणारे, पोपटपंची करणारे लोक हवेत त्यांना. पाळीव, आज्ञाधारक अँकर्स हवेत. पत्रकारपरिषदांमधून हसतमुख चेहऱ्यानं चमकोगिरी करणारे चिकणे चेहरे हवेत. प्रश्न विचारण्याआधी मालकाच्या तोंडाकडे बघून परवानगी घेणारे लोक हवेत यांना.
म्हणूनच लोकांचा विश्वास उडाला आहे आमच्यावरचा.
बातमी मोबाईलवर आधी येते, चॅनलवर नंतर.
कुणी जागरूक नागरिक कॅमेरा वापरून सत्य टिपतो, मग टीव्हीवर त्यावर घमासान चर्चा चालतात.
हे कधी, कसं बदललं? पत्रकारांनी बदलू दिलं. स्वतः पत्रकारांनी बदललं.
प्रत्येक व्हायरल व्हिडिओ खरा असतो, अंतिम सत्य सांगतो असं नाही. मलाही हे कळतं. सगळे व्हिडिओ नीट तपासून घ्यायला हवेत. संदर्भ बघून मग त्यांचं मूल्य ठरवायला हवं. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवलीच पाहिजे - नागरिक कॅमेरा उचलतात त्याच क्षणी पत्रकारितेची एकाधिकारशाही संपुष्टात येते. चॅनेलवर बातम्या दिसणं संपतं, तेव्हाच जनता जे टिपेल त्याची बातमी होते.
जेन झीनं आम्हांला आमची लायकी दाखवून दिली.
आम्हांला वाटायचं, आमच्याकडे पत्रकार असण्याचं ओळखपत्र आहे, म्हणजे आम्हीच पत्रकार आहोत. पण या पोरांनी सिद्ध केलं, पत्रकारिता ओळखपत्रात वसत नाही, ती पत्रकाराच्या कामावरच्या निष्ठेत, नैतिकतेत वसते.
आम्हांला वाटायचं, आमच्याकडे सुसज्ज स्टुडिओ आहे, म्हणजे आम्ही पत्रकारिता करायला लायक आहोत. पण त्यांनी दाखवून दिलं, पत्रकारिता रस्त्यावर घडते.
वृत्तवाहिन्यांच्या पैशांच्या पाठबळावर पत्रकारिता करता येते, असं वाटायचं. पण या पोरांनी शिकवलं, की पत्रकारिता अशी कुणाच्या बळाबिळावर चालत नाही. एकदा सत्य प्रकाशू लागलं, की त्यासमोर इतर सगळी बळं फिकी पडतात.
हा लेख जेन झीच्या पिढीची स्तुती करायला लिहिलेला नाही. आमच्या पिढीच्या चुकांची कबुली देण्याकरता लिहिला आहे.
१) आम्ही हळूहळू पत्रकारितेला धंदा होऊ दिलं.
२) आमच्या मालकांचे हितसंबंध जपले. जनतेशी बेइमानी होताना पाहिली, आणि तरी गप्प बसलो.
३) प्रश्न विचारण्याऐवजी आमचा फायदा बघितला. जोखीम न पत्करता स्वस्थ बसून राहणं निवडलं.
आता लोकांचा विश्वास गमावलाय आम्ही. पण आता वाईट वाटून काय उपयोग?
वाईट नका वाटून घेऊ. आरशात बघणं सोपं नसतंच.
जेन झी, आमचा सलाम स्वीकारा.
पत्रकारिता कॅमेऱ्यानं नाही, पाठीचा ताठ कणा वापरून करतात, याची आठवण तुम्ही आम्हांला करून दिलीत. ज्या दिवशी कणा गहाण पडतो, त्या दिवशी कॅमेरा म्हणजे निव्वळ एक यंत्र म्हणून उरतं. पत्रकार पत्रकार उरत नाही, सत्ताधाऱ्यांचा भाट होतो.
टीप : फोटो २६ जानेवारी २००१ रोजी घेतलेला आहे. त्या रात्री गुजराथेतल्या भयंकर भूकंपानंतर झालेल्या पडझडीत मी जगणं हुडकत होतो.
 

Sanjay Sinha 2001

भाषांतर : मेघना भुस्कुटे

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 00:16

(*'जन झी'चे अनेकवचन, अशा अर्थाने.)

अशा कित्येक जन झिया आल्या, नि गेल्या. (बोले तो, सध्याची जन झी आहे. पूर्वीच्या जन आणखी काहीतरी असतील.) त्या सगळ्याच तुम्हाला (पक्षी: आपापल्या पूर्वसूरींना. (आम्हालादेखील.)) काही ना काही शिकवीत गेल्या, नि (तुम्हाला तुमची, पक्षी, आपापल्या पूर्वसूरींना आपापल्या पूर्वसूरींची, पर्यायाने, आम्हाला आमचीसुद्धा) लायकी दाखवीत गेल्या.

उपयोग काय झाला?

तुम्ही (पक्षी, त्यांचे पूर्वसूरी. पर्यायाने, आम्हीसुद्धा.) त्यातून काही शिकलात का? शिकता काय कधी? बदलता काय?

मग असले वांझोटे लेख पाडण्यात नक्की काय हशील?

पूर्वीच्या काळी, महात्मा गांधींचा फोटो भिंतीवर लावायचा, वाटले तर २ ऑक्टोबरला त्या फोटोला हार चढवायचा, भाषणे ठोकायची, फार फार तर ३० जानेवारीला मिनिटभर शांत उभे राहायचे, नि एरवी महात्मा गांधींच्या शिकवणीला, त्यांच्या आदर्शांना, फार कशाला, खुद्द महात्मा गांधींनासुद्धा पार विसरून जायचे, हे आमच्या पिढीने पुष्कळ पाहिले. (त्यानंतरच्या पिढीने यावर फक्त एकच सुधारणा पाहिली: उच्च मूल्याच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचे फोटो पाहिले. बस्स, आणखी काही नाही.)

तेही ठीकच आहे, म्हणा. एखाद्या व्यक्तीला जर निष्प्रभ करून पार विसरून जायचे असेल, जाजमाखाली जर सारून द्यायचे असेल, तर त्याचे दैवतीकरण करावे, त्याला पूजनीय करावे, दिवसातून/वर्षातून दोनदा त्याची पूजा करून फोटोला हार चढवावा, हे भारतीय/हिंदू परंपरेस साजेसेच आहे. त्यामुळे, चलता है, हिन्दुस्तान है।

विचारण्याचा मुद्दा इतकाच, की या असल्या लेखांतून (सांप्रतच्या) जन झी-चा महात्मा गांधी तर होत नाहीये ना? (केला जात नाहीये ना?)

असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 00:48

In reply to by अस्वल

अभिप्रायाबद्दल काही वाटले नाही (तुम्हाला वाटेल तसा अभिप्राय प्रामाणिकपणे देण्याचे तुमचे स्वातंत्र्यच आहे, मला काय त्याचे, इ.इ.), परंतु, (प्रस्तुत लेखावरील माझ्या) ज्या प्रतिसादाबद्दल हा अभिप्राय आला, त्याबद्दल आश्चर्य वाटले खरे.

कदाचित, अभिप्रायाची जागा (नजरचुकीने) चुकली तर नाही?

असो चालायचेच.

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 00:21

मेघना भुस्कुटे यांनी केलेलं हे भाषांतर

अय्या! मेघना भुस्कुटे हयात आहेत अद्याप?

(अरे वा!)