Skip to main content

फाउंटन

1 minute

"फाउंटनला कोणती बस जाते?"

"बावीस नंबर. म्हणजे बसवर बावीस ही संख्या लिहिली असेल ती. आतापासून येणारी बावीसावी बस नव्हे. हु हु हु"

"हा हा हा. उत्तम विनोद होता."

"धन्यवाद. पण बसवर हुतात्मा चौक लिहिलं असेल - आता फ्लोरा फाउंटन म्हणत नाहीत त्या जागेला."

"अहो पण मी तिथे जातच नाहीये."

"तुम्हीच विचारलंत ना - फाउंटनला कोणती बस जाते?"

"हो, पण फ्लोरा फाउंटन नाही."

"मग?"

"फाॅना फाउंटन!"

"म्हणजे?"

"फ्लोरा म्हणजे वनस्पतीजगत. फाॅना म्हणजे प्राणीजगत. फाॅना फाउंटनजवळ विविध प्रजातींचे प्राणी आढळतात, म्हणून फाॅना फाउंटन."

"खरंच?"

"हो तर. मुंगीपासून निळ्या देवमाशापर्यंत जवळपास स-ग-ळे. हायड्रा, सालामांडर, कोमोडो ड्रॅगन, शहामृग, बिबळ्या. पुण्यवान लोकांना एडियाकारन बायोटासुद्धा दिसतात म्हणे."

"अरे वा. मजाच आहे सगळी."

"हो तर. फारच रोचक जागा आहे. फक्त एकच भीती आहे हो."

"कसली? बिबळ्या हल्ला करेल अशी?"

"नाही. अख्खं फाॅना फाउंटन वनताराला घेऊन जातील याची."

Node read time
1 minute

'न'वी बाजू Fri, 29/05/2026 - 23:33

"नाही. अख्खं फाॅना फाउंटन वनताराला घेऊन जातील याची."

त्याऐवजी, वनतारा फॉना फाउंटनभोवती बांधणे स्वस्तात पडणार नाही काय?

देवदत्त Sat, 30/05/2026 - 01:12

In reply to by 'न'वी बाजू

हौसेला मोल नसतं.

एस्कोबारचे पाणघोडे वनताराला नेण्याबद्दलची बातमी वाचली. पाणचेतक, पाणएलएमएलव्हेस्पाअल्फा, पाणलॅम्ब्रेटा वगैरेंच्या गोष्टी नीटच्या पेपरसारख्या लीक झालेल्या दिसतात.

'न'वी बाजू Sat, 30/05/2026 - 18:49

In reply to by देवदत्त

फॉना फाउंटनचे प्राणी (जबरदस्तीने) ‘वनतारा’ला उचलून नेण्याच्या निषेधार्थ जी हाणामारी होईल, तीत बळी पडणाऱ्यांच्या नावाने फॉना फाउंटनचे पुनर्नामकरण ‘हुतात्मा चौक’ असे होईल काय?

(च्या**, महाराष्ट्राचे — खरे तर मुंबईकरांचे — नि गुजरात्यांचे पंगे सनातन म्हणायचे, हं?)


मुंबई म्हणजे तमाम महाराष्ट्र नव्हे. असो.

'न'वी बाजू Fri, 29/05/2026 - 23:51

फाॅना फाउंटनजवळ विविध प्रजातींचे प्राणी आढळतात

जेथे विविध प्रजातींचे प्राणी आढळतात, अशा प्रकारचे एकच ठिकाण दक्षिण मुंबईत आहे — राणीचा बाग (उर्फ व्हिक्टोरिया गार्डन्स, उर्फ जिजामाता उद्यान). आणि, तेथे फाउंटनबिउंटन (निदान माझ्या माहितीत तरी) नसावा.

Deepu Sat, 30/05/2026 - 10:05

एडियाकारन बायोटा दिसणारे हे फाॅना फाउंटन नक्की आहे कुठे? म्हणजे time travel करून एकदा जावून यावे म्हणते.

'न'वी बाजू Sat, 30/05/2026 - 16:28

In reply to by Deepu

छोटा येशू जर डायनोसॉरच्या पाठीवर बसून शाळेत जाऊ शकत असे, तर तुम्ही आणि एडियाकारन बायोटा एकसमयावच्छेदेकरून नांदू का शकत नाही?

देवदत्तियन जगतात हे नक्की (आणि सहज) होऊ शकते. (‘धशफठ’ आठवतोय?) फक्त, पुरेसे पुण्य गाठीशी असले, म्हणजे झाले!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 30/05/2026 - 21:19

वनतारा काय असतं? 

या देवदत्तच्या डोक्यातून काय निपजेल याचा नेम नाही. कधी निपजेल या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे - नेहमी!