कुर्प्यॉस्की नावाची पोलीश मीड (मधापासून बनविलेली वाईन) चाखण्याचा योग परवाच आला. अतिशय मधुर, सामान्यतः डेर्झट वाईन या सदरात मोडणारी आणि मधाचा सुंदर स्वाद असलेली ही वाईन मला खूपच आवडली म्हणून त्याबद्दल थोडेसे.
सामान्यतः वाईन बनविण्याची प्रक्रीया, द्र्वपदार्थांतील शर्करेचे विघटन यीस्टच्या सहाय्याने करणे व त्याद्वारे अल्कोहोल मिश्रित द्रव्य बनविणे अशी असते. अशा पद्धतीने फळांची वाईन बनविताना फळांतील शर्करा अल्कोहोलमध्ये परिवर्तित होते; यासाठी काहीवेळा फळांवर असलेले नैसर्गिक यीस्ट वापरले जाते तर कधी वातावरणातले नैसर्गिक यीस्ट वापरले जाते. अशाप्रकारच्या वाईन्स अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून जगभरात सगळीकडे बनविल्या जात आहेत. पण या नैसर्गिक यीस्टवर अवलंबून रहाण्याची प्रक्रिया जरा बिनभरवशाची असल्याने बहुतांशी आधुनिक वाईन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यीस्ट मुद्दामून वेगळे घातले जाते.
मधापासून बनविलेली वाईन देखिल पुरातन कालापासून प्रचलित आहे. भारतातही वैदिक काळापासून मधाचा उपयोग वाइन बनविण्यासाठी होत असे. मधापासून बनविलेले मद्य ते ‘माधवी’! मधावर नैसर्गिक यीस्ट आढळत असल्याने वेगळे यीस्ट न घालता देखिल वाईन सहज बनविता येते. पण यशस्वी होण्याच्या शक्यता वाढवायच्या असतील तर मात्र यीस्ट घातलेले चांगले. घरच्या घरी देखिल अतिशय सोप्या पद्धतीने मीड बनविता येते. माझ्याकडे असलेल्या वाईनच्या पुस्तकातील कृती खालीलप्रमाणे,
३ पाउंड मध
३ लिटर पाणी
३ टीस्पून अॅसिड ब्लेंड
१ पॅकेट मीड यीस्ट किंवा शॅंपेन यीस्ट
ऐच्छिक - कॅंम्पडन गोळी (निर्जंतुक करण्यासाठी)
पाण्यात मध मिसळून त्याला उकळी आणा. वर फेस येत राहिला तर तो चमच्याने बाजूला काढत रहा. गार झाल्यावर, त्यात अॅसिड ब्लेंड व वापरत असल्यास त्यात कॅंम्पडन गोळीची पूड घालावी. मिश्रण फर्मेंटर मध्ये भरून वर 'हवेचे बूच’ (एयर लॉक) बसवावे. चोवीस तासांनी झाकण उघडून त्यात यीस्ट मिसळावे व पुन्हा ‘हवेचे बूच’ बसवावे. विघटनाची क्रिया चालू असताना हवेच्या बुचातून नियमितपणे बुडबुडे येत रहातात. दोन आठवड्यांत ते थोडे मंदावले की वाईन रॅक करायची. रॅक करायची म्हणजे सायफन करून दुसऱ्या फर्मेंटरमध्ये भरायची, असे करताना खाली जो गाळ उरेल तो राहू द्यायचा. पुन्हा फर्मेंटरवर हवेचे बूच बसवून आता वाईन बुडबुडे पूर्ण थांबेपर्यंत (आणखी काही आठवडे) बनू द्यावी व नंतर पुन्हा त्यात कॅंम्पडन गोळी (वापरत असल्यास) घालून मग सायफन करून बाटल्यांमध्ये भरावी. मीड जितके जास्त दिवस ठेवाल तितकी अधिक चांगली बनते, त्यामुळे वर्षाभराने चाखल्यास अधिक रुचकर लागेल असे जाणकार सांगतात. मी स्वत: पुढच्या काही महिन्यांत हा प्रयोग करणार आहे त्यामुळे स्वानुभावाने त्याबद्दल अधिक माहिती देऊ शकेन.
काही नवीन फोटो,
कधी
>>मी स्वत: पुढच्या काही महिन्यांत हा प्रयोग करणार आहे
कधी ते कळवा. प्रकार बरा वाटतोय! :-)
लवकरच
:) सुरुवात आत्ता करते आहे पण बनायला किती वेळ लागेल माहीत नाही!
पाकृसाठी लागणारा वेळ वर्षाचा
पाकृसाठी लागणारा वेळ वर्षाचा असला तरी एकूण प्रकार रोचक दिसतो आहे. अॅसिड ब्लेंड आणि मीड/शँपेन यीस्ट (परदेशातील) वाण्याच्या सहज उपलब्ध असतं का? सामानाची जमवाजमव सुरू करतेच.
आणि एक प्रश्न आहे. ही सर्व आरास घरातल्या थंड ठिकाणी ठेवावी का कसें?
दारूचं नाव काढलं तरी 'अब्रह्मण्यम्' असा चेहेरा बनवणार्या एका बहिणीचं नाव माधवीच आहे ... तिलाही नावाचा हा अर्थ माहित नसावा.
लागणारे सामान
अदिती, सर्व सामान 'होम ब्रू' ची वेगळी दुकाने असतात तिथे मिळेल किंवा जालावरून मागवता येईल. मी बरेचसे सामान जालावरूनच मागविले होते. आरास म्हणशील तर, घरातच एका कोपरयात मांडता येईल. मी मागे जी वाईन बनविली होती, त्याचा फरमेंटर दिवाणखान्याच्याच एका कोपरयात ठेवला होता, त्यातून दर मिनिटाला येणारा बुडबुड्याचा आवाज सुरवातीला चमत्कारीक वाटायचा पण नंतर सवय झाली.
दारूचं नाव काढलं तरी 'अब्रह्मण्यम्' असा चेहेरा बनवणार्या एका बहिणीचं नाव माधवीच आहे ... तिलाही नावाचा हा अर्थ माहित नसावा.>>
माधवीचा अर्थ माधवाची पत्नी असाही होतो म्हणे!
अगदी!
'शांभवी' हे 'शंभूची बायको' अर्थात 'पार्वती'चे नाव आहे म्हणे. आम्हाला माहीतच नव्हते. आम्हाला दुसराच अर्थ माहीत, त्यात पु.लं.च्या 'शांभवी: एक घेणे'मुळे खुंटा बळकट झालेला. त्यामुळे 'शांभवी' हे मुलीचे नाव ऐकून आमचे म्हणजे 'कुठला बाप आपल्या पोरीचे नाव असे ठेवेल' असे झालेले. चालायचेच.
नंतर मोल्सवर्थ चाळल्यावर, 'शांभवी'चा अर्थ 'भांग' असा जो आहे *, तो 'शंकराला आवडणारी ती' अशा अर्थाने श्लेषात्मक/वक्रार्थी असून, पार्वतीच्या या नावा(च्या फोडी)तच त्याचा उगम आहे, हे कळले. धन्य तो मोल्सवर्थ.
- (मोल्सवर्थाच्या आठवणीने सद्गदित) 'न'वी बाजू.
* 'दारू' नव्हे. पु.लं.चे चुक्याच.
ब्बाबौ!
ब्बाबौ! अशी गाळतात व्हय! असो. मजा करा लेको! :)
अशाच दिर्घकालीन पाकृदेखील येत राहोत!
फर्मेंटर...
...कुठे आणि साधारणतः कितीला मिळतो?
फर्मेंटर
फोटोतला फर्मेंटर मला सोळा युरोला इथल्या होम ब्रू सप्लाइज च्या दुकानात मिळाला होता, हा प्लॅस्टिकचा आहे पण काचेचा बराच महाग असतो. बाकी सामान, एयर लॉक, सायफन नळी वगैरे बरेच स्वस्त असते. मला जालावर इथे बरयाच गोष्टी मिळाल्या.
धन्यवाद
आभारी आहे. (तो दुवा कार्यस्थळी प्रतिरोधित आहे; घरून पहावा लागेल. पाहीन.)
आता एक अज्ञानमूलक, मूर्खासारखा प्रश्नः मीड यीस्ट अथवा शांपेन यीस्ट ऐवजी (कुठल्याही ग्रोसरी स्टोअरात सहजगत्या मिळणारे) बेकर्स यीस्ट / रॅपिड राइझिंग यीस्ट वगैरे चालू नये, नाही? (म्हणजे, बहुधा चालणार नाही, असा कयास आहे, पण वापरल्यास नेमके काय होईल, याची कल्पना नाही.)
बाकी, कॅम्पडेन गोळी, अॅसिड ब्लेंड वगैरे गोष्टी सहजगत्या कोठे (आणि केवढ्याला) मिळाव्यात?
म्हणजे, होम ब्रू सप्लाय स्टोअरकडे वाकडी वाट करण्यास दुसरा काही पर्याय आहे का, अशा अर्थाने विचारतोय.
मीड यीस्ट, शांपेन यीस्ट,
मीड यीस्ट, शांपेन यीस्ट, बेकर्स यीस्ट वगैरे सगळे प्रकार साधारण नातलग आहेत आणि बेकर्स यीस्ट वापरूनही वाईन बनविणारे लोकही माहीत आहेत पण चवीत फरक पडतो, तो कसा त्याचा अनुभव नाही त्यामुळे सांगू शकत नाही.
कॅम्पडेन गोळी म्हणजे 'सोडियम मेटाबायसल्फेट' , अॅसिड ब्लेंड म्हणजे सायट्रिक, टार्टारीक, मॅलिक अॅसिड वगैरेंचे मिष्रण. या गोष्टी इतरत्रही मिळू शकतात पण होम ब्रूविंगच्या दुकानातून घेतले तर प्रमाणात घालता येईल, किंमत अगदी वाजवी असते.
अवांतर: मी अजिबात यीस्ट न घालता वाइन (रासबेरी) बनविली आहे आणि ती उत्तम झाली पण आता मीड बनविताना मात्र पुस्तकातली कृती जशीच्या तशी वापरणार आहे. हा घरी वाइन बनवायचा उद्योग (खास करून यीस्ट न वापरता) जरा 'हिट अॅंड मिस' प्रकारात मोडतो. एका मित्राने व मी सारखीच कॄती वापरून बनविलेली वाइन बरीच वेगवेगळी झाली आणि एकाच वेळी सुरुवात करूनही वेगवेगळ्या वेळेस तयार झाली.
अजिबात यीस्ट न घालता वाइन
मग त्याची पाकृ आणि शक्य असल्यास फोटो इ. कधी येणार? इतर कोणकोणत्या फळांची वारूणी बनवता येते?
(वारूणीप्रेमी) अदिती
कोणताही शर्करायुक्त पदार्थ
माझ्या स्वल्प वाचनानुसार, तत्त्वतः, कोणत्याही शर्करायुक्त पदार्थापासून वारुणी बनवता यावी. (फक्त, प्रयोगशीलता पाहिजे. दर्जा कमीजास्त होईल फारतर, किंवा चव कदाचित तितकीशी आवडणार नाही; हाय काय नि नाय काय. एका ग्यालनहून मोठी ब्याच बनवायची नाही, म्हणजे वाया गेली नि फेकून द्यावी लागली, तरी फारसे नुकसान होत नाही.१)
रेशिपीबुकांतून तर्हेतर्हेची द्राक्षे, सर्व प्रकारच्या बेर्या (ष्ट्राबेरी, रासबेरी, ब्ल्याकबेरी, ब्लूबेरी, क्र्यानबेरी, एल्डरबेरी - हा काय प्रकार असतो, कोण जाणे!), चेरी, झालेच तर बीट, टॉमेटो, फार कशाला, कांद्याच्या वारुणीचीसुद्धा२ रेशिपी पाहण्यात आलेली आहे.
====================================================================================================================================
१ उत्पादनात खर्ची पडलेल्या कच्च्या मालाची किंमत एका ग्यालनच्या ब्याचमागे सरासरी साधारणतः वीस डॉलरच्या आसपास (गिव ऑर टेक अ फ्यू). (यात उपकरणांची, बाटल्यांची, बुचांची, झालेच तर उपकरणांच्या सफाईसाठी लागणार्या द्रव्यांची वगैरे किंमत धरलेली नाही.)
(आधी इतरत्र म्हटल्याप्रमाणे, एका यू.एस.ग्यालनच्या ब्याचमधून ७५० मिलीच्या ५ बाटल्या भरण्याइतका ऐवज निघावा.)
२ कांद्याची वारुणी बनवताना अर्थात कच्च्या मालात द्राक्षे मिसळून.
वाईनची बाटली उघडल्यानंतर लगेच
वाईनची बाटली उघडल्यानंतर लगेच संपवावी लागते, नाहीतर तिची चव जाते. त्यासंदर्भात वाईन बनवताना काही काळजी घ्यावी लागते का?
?
आपली नेमकी अडचण समजली नाही.
नीट सांगता येत नाहीये, पण
नीट सांगता येत नाहीये, पण वाईनची बाटली झाकणबंद असता बराच काळ टिकते. एकदा झाकण उघडल्यानंतर एक-दोन दिवसांत वाईन संपवली नाही तर वाईनची चव पार जाते, चवीला वाईन व्हिनेगार बनतं आणि अल्कोहोलही उडून जातो असा अनुभव+अडचण आहे.
निष्प्राण वाईन
तुम्ही उत्तर अमेरिकेत असाल तर यावर एक उपाय म्हणजे Private Preserve या Napa Valley तल्या कंपनीने तयार केलेला एक कॅन मिळतो. त्यात अरगॉन, नत्रवायू अाणि कर्बद्विप्राणवायू यांचं मिश्रण असतं. वाईनच्या बाटलीचं बूच उघडून हवी तेवढी वाईन काढून घ्यायची अाणि या मिश्रणाचा अर्धा सेकंद फवारा मारून पुन्हा बंद करायची. त्यामुळे वाईनशी प्राणवायूचा संपर्क न येऊन तिच्यातला प्राण कायम राहतो. मी हा प्रकार वापरून पाहिलेला अाहे, अाणि वाईन तशीच्या तशी राहते असा माझा अनुभव अाहे. (अर्थात वाईन मुळात भिकार असेल तर या उपायाने सुधारत नाही.)
तसे नव्हे!
माझे म्हणणे, झाकण उघडल्यावर एक-दोन दिवसांचे वर वाईन शिल्लक ठेवायचीच कशाला? (मुळात राहतेच कशी?)
Method behind the madness
याचं कारण असं की काही लोकांना वेगवेगळ्या मूडनुसार वेगवेगळी वाईन लागते (उदाहरणार्थ, नेमाडे वाचताना एक, गौरी देशपांडे वाचताना दुसरी, शुभंकरोति म्हणताना तिसरी इत्यादि). भलत्या वेळी भलती वाईन पिऊन ते जीवनाचा रसभंग करू इच्छित नाहीत, अाणि परिणामी त्यांच्या फडताळात अनेक बाटल्या एकाच वेळेला उघडलेल्या असतात. या जीवनपद्धतीबद्दल अापल्याला काहीच सहानुभूती वाटत नाही काय?
जीवनपद्धतीविषयी सहानुभूती
शुभंकरोतिविषयी अनुभव नाही, पण या जीवनपद्धतीविषयी सहानुभूती वाटण्याविषयीच्या सैद्धांतिक मुद्द्याशी सहमत. हां, मराठी संवादस्थळांवर वावरताना मात्र अनेकांना वाईनपेक्षा कडक दारूच लागत असावी असं अनेक प्रतिसाद वाचून वाटतं.
वाईनपेक्षा कडक दारूच "दारूऽऽऽ
"दारूऽऽऽ इट्स नॉट दारू.. इट्स वाईन यु नो ;)" असा हल्ला कसा झाला नाही याचा विचार करत होतो :P
तुमचं दोघांचंही म्हणणं मान्य
तुमचं दोघांचंही म्हणणं मान्य आहे पण हे तय्यार वाईनसाठी ठीक आहे. पण वाईन बनवताना अशी अडचण येत नाही का असा मूळ प्रश्न आहे.
वाइन तयार करताना
वर दिलेल्या कृतीत आणि माहितीत एयर लॉक वापरणे, निर्जंतुक करणे वगैरे सांगितले आहे ते वाईनचा हवेशी संपर्क आणि यीस्ट खेरीज इतर फंगस, बॅक्टेरियाचा संपर्क टाळण्यासाठीच आहे. वाइन बनल्यावर निर्जंतुक बाटल्यांतून भरल्यावर आणि त्यावर बूच बसविल्यावर त्याचा पुन्हा हवेशी संपर्क येतो ते ती बाटली उघडल्यावरच! त्यामुळे वाईन बनविताना, ती उघ्डल्यावर खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची असे तुम्ही जे विचारता ते म्हणजे नेमके काय हे कळले नाही.
मस्त
होम ब्रू या प्रकाराविषयी ऐकलेलं आहे. एकांच्या घरी बनवलेली प्यायलेलीही आहे. ती ठीक होती. तुमची वाईन कशी झाली हे जरूर कळवा.
वाईनबाबत साधारणपणे चांगली की वाईट इतकंच मला थोडंफार समजतं. पण खास वाईन पिवय्ये असतात त्यांच्या तोंडून वाइनचा बुके, ऍसिडिटी, स्पाइस, फ्लॉवरीपणा वगैरे तांत्रिक शब्द ऐकलेले आहेत. त्याविषयी थोडी माहिती देता येईल का? तसंच द्राक्षांची जातकुळी, त्या वर्षीचं हवामान या सर्व बारीकसारीक गोष्टींनीही वाईनची चव बदलते. याचीही थोडी माहिती द्यावी.
वाइनची चव
मी वाइनची फार जाणकार आहे असा माझ मुळीच दावा नाहीय पण एका प्रात्यक्षिकात दाखविलेले होते की आंबटपणा, गोडी आणि कडवटपणा ह्या तीन चवींचे वाइनमध्ये प्राबल्य असते आणि या तिन्ही जीभेच्या आणि तोंडाच्या वेगवेगळ्या भागांना जाणवतात, उदाहरणार्थ आंबटपणा जिभेच्या कडांना, गोडी जिभेच्या मधे आणि कडवटपणा जिभेच्या मागील भागात जाणवतो. त्यामुळे वाइनची चव घेताना ती जिभेच्या आणि तोंडाच्या कोणत्या भागाला जास्त जाणवते त्यावरून तिची परीक्षा करता येते. वेगवेगळ्या जातीच्या द्राक्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वाइन्स बनविल्या जातात त्यामुळे या प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या चवींचे प्राबल्य असते. वाइनची परीक्षा करताना तिचा सुगंध, तिचा रंग, त्यातील अल्कोहोलचे प्रमाण, तिची चव (अर्थातच), त्यातील वेगवेगळ्या चवींचे संतुलन, प्यायलानंतर जिभेवर रेंगाळणारी चव अशी अनेक परीमाणे वापरली जातात आणि त्यावरून वेगवेगळी अनुमाने काढली जातात.
पण मला वाटते की फार कमी जणांच्या जिव्हा इतक्या प्रगल्भ असतात की ज्यांना चवीतले बारीक-सारीक फरक जाणवत असाव्यात. अनेकदा बरेच जण आपले त्यातले ज्ञान पाजळण्यासाठी मोठे मोठे शब्द वापरून इतरांना लपेटत असतात असा मला अनुभव आला आहे. :p शिवाय नावाजलेल्या प्रदेशांतून आलेल्या वाइन्सबद्द्ल चांगले बोलण्याचा प्रघात आहे आणि नवीन प्रदेशांतल्या चांगल्या वाइन्सकडे पाहून नाकं मुरडली जातात. या विषयावरचा (नापा व्हॅलीच्या वाइन्स) बॉटल शॉक हा चित्रपट माझे स्वतःचे डोळे उघडायला कारणीभूत होता.
असो. मी बनविलेली रासबेरी वाइन डिसर्ट वाइन प्रकारात मोडत असल्याने बरीच गोड होती पण तरीही त्यातून रासबेरीजची किंचितशी आंबट चव जाणवत होती.
blind taste
अनेकदा बरेच जण आपले त्यातले ज्ञान पाजळण्यासाठी मोठे मोठे शब्द वापरून इतरांना लपेटत असतात असा मला अनुभव आला आहे
blind taste मध्ये नक्की किती जण पास होउ शकतात ही एक शंकाच आहे.
क्या बात है..,
जबरदस्त रेसिपी, कधी करायचा योग येइल माहिती नाही कारण हे सगळे साहित्य भारतात गोळा करणे अवघडच आहे.
घासकडवींचा प्रतिसाद वाचून गाथा वाइनची (इतरत्र प्रकाशित असलेली) इथे पुनःप्रकाशित करतो आहे.
- (वाइनप्रेमी) सोकाजी
भारतात ब्रूविंग
सोकाजी, भारतात साहित्य नाही मिळाले तरी जालावरून मागविता येईल शिवाय फर्मेंटर वगैरे नाही मिळाला तरी प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीला एयर लॉक लावून जुगाड करता येईल.
लीग्यालिटीचा विचार करावा लागेल
मद्यार्कयुक्त पेयांच्या घरगुती उत्पादनाबद्दल भारतातील कायदे काय आहेत, हेही पाहावे लागेल. (शिवाय, साहित्य जालावरून जरी मागवायचे झाले, तरी (१) साहित्याच्या अशा प्रकारे आयातीसंबंधी भारतात असू शकणारे निर्बंध, आणि (२) जालावरून भारताबाहेरून मागविलेल्या वस्तूंची किंमत चुकती करताना येऊ शकणारे भारतातील परकीय चलनविषयक संभाव्य निर्बंध, हेही बहुधा विचारात घ्यावे लागतील, असे वाटते. चूभूद्याघ्या.)
ऐकीव/वाचीव माहितीनुसार, अमेरिकेतसुद्धा (पक्षी: यू.एस.ए.मध्ये) मद्यार्कयुक्त पेयांचे घरगुती (विनापरवाना) उत्पादन १९७०च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत अवैध होते. श्री. जिमी कार्टर अध्यक्ष असताना, १९७८ साली, ही बंदी संघराज्यीय (फेडरल) पातळीवर अंशतः१ उठवण्यात आली. मात्र, अमेरिकेतील प्रत्येक राज्याचे/प्रदेशाचे राज्यपातळीवरचे/स्थानिक कायदे याहून वेगळे (आणि अधिक निर्बंधकारक२) असू शकतात.
सांगण्याचा मुद्दा, ज्याला/जिला हा छंद जोपासणे आहे, त्याने/तिने प्रथम आपले स्थानिक कायदे तपासून त्यांच्या मर्यादा जाणून घेतलेल्या बर्या.
==================================================================================================================================================================================
१ अंशतः अशासाठी, की (१) केवळ बियर, वाईन, मीड अशा प्रकारच्या मद्यार्कयुक्त पेयांचे (पक्षी: ज्यांच्या उत्पादनात केवळ brewing आणि/किंवा fermentation घडते, परंतु distillation घडत नाही, केवळ अशाच मद्यार्कयुक्त पेयांचे) घरगुती विनापरवाना उत्पादन आता वैध आहे, (२) घरगुती/विनापरवाना distillation हे अजूनही अवैध आहे, इतकेच नव्हे, तर तो दंडनीय गुन्हा आहे; सबब, घरी (उदा.) व्हिस्की बनवणे हे अजूनही अवैध आहे१अ, (३) असे (बियर, वाईन, मीड वगैरेंचे, घरगुती) विनापरवाना उत्पादन हे केवळ उत्पादकाच्या घरगुती, विनाव्यापारी वापरासाठी वैध आहे; विशेष करून, अशा उत्पादनाची विक्री अवैध आहे, आणि (४) असे (वैध) विनापरवाना उत्पादन हे काही ठराविक वार्षिक मर्यादेपर्यंतच१ब वैध आहे.
१अ घरगुती distillation हे धोकादायकही असू शकते. धोका दोन पातळींवर उद्भवतो. (१) उपकरणाचा स्फोट झाल्याने किंवा निष्काळजीपणामुळे आग लागल्याने, आणि (२) विषबाधेचा धोका.१क
१ब अमेरिकन संघराज्यीय कायद्यानुसार घरगुती उत्पादनाची मर्यादा ही प्रतिवर्षी प्रति-प्रौढ-माणशी १०० यू.एस.ग्यालन (१ यू.एस.ग्यलन = ३.७८५४१ लिटर) आणि प्रतिवर्षी प्रतिबिर्हाडी २०० यू.एस.ग्यालन यांपैकी न्यूनतम इतकी आहे. (बोले तो, बिर्हाडात एकच प्रौढ व्यक्ती असल्यास मर्यादा प्रतिवर्षी १०० यू.एस.ग्यालन इतकी आहे. बिर्हाडात दोन प्रौढ व्यक्ती असल्यास ही मर्यादा २०० यू.एस. ग्यालन इतकी होते. मात्र, बिर्हाडात दोनाहून अधिक प्रौढ व्यक्ती असल्यास ही मर्यादा दरडोई हिशेबाने त्याहून अधिक वाढत नाही; प्रतिवर्षी २०० ग्यालन इतकीच राहते.)
(येथे 'बिर्हाड' हा शब्द 'हौसहोल्ड' अशा अर्थाने योजिला आहे.)
१क या विषबाधेबद्दलच्या मुद्द्याबद्दल मी वाचलेली (आणि त्यातून मला जितपत समजली तितपत)
माहितीथियरी येणेप्रमाणे (चूभूद्याघ्या; स्वतःच्या जबाबदारीवर विश्वास ठेवावा.): कोणत्याही fermentation प्रक्रियेत (आणि विशेषकरून द्राक्षांसारख्या पेक्टिनयुक्त फळांच्या fermentationमध्ये) ethanolबरोबरच सूक्ष्म प्रमाणात methanolसुद्धा बनतच असतो. (सबब, उदाहरणादाखल, आपल्या नेहमीच्या बाजारू वाइनमध्येदेखील सूक्ष्म प्रमाणात methanolचे अस्तित्व नैसर्गिकरीत्या असतेच.) मात्र, एक म्हणजे, वाइनमध्ये या methanolचे concentration अतिशय कमी असते, आणि दुसरे म्हणजे, methanolचे जे दुष्परिणाम शरीरावर होतात (अंधत्व, मृत्यू वगैरे), ते शरीरात त्या methanolच्या होणार्या अपचयात घडणार्या विघटनातून उत्पन्न होणार्या द्रव्यांमुळे होतात. आता, (१) हा methanolचा अपचय घडवून आणणारे जे enzyme असते, तेच enzyme हे ethanolचाही अपचय घडवून आणण्यास कारणीभूत असते, आणि (२) परिणामी, ethanolचे भरपूर concentration आणि methanolचे तुलनेने नगण्य concentration अशा परिस्थितीत, त्या enzymeला अपचय घडवून आणण्याकरिता बळकावण्याच्या स्पर्धेत ethanol सरस ठरतो, आणि methanol बहुतांशी अपचय न होताच शरीराबाहेर उत्सर्जित होतो. परिणामी वाईन प्यायल्याने आपण आंधळे बनत नाही किंवा मरत नाही. (उलटपक्षी, शुद्ध methanol प्यायल्यास किंवा मिश्रणात methanolचे concentration तुलनेने अधिक निघाल्यास असे दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते.)आता, distillation प्रक्रियेत दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे, दोन्ही alcoholsचे concentration वाढते. दुसरे म्हणजे, methanolचा उत्कलनबिंदू हा ethanolच्या उत्कलनबिंदूपेक्षा तुलनेने कमी असल्याने, distillationमधून सुरुवातीस जे काही बाहेर येते, ते जवळपास शुद्ध (किंवा concentrated) methanol असते, आणि ते फेकून द्यावे लागते. सुरुवातीस सर्व methanol बाहेर निघून गेल्यानंतर मग कोठे ethanol येऊ लागतो. (शिवाय, ethanolसुद्धा बाहेर येऊन गेल्यावर सरतेशेवटी जी fusel alcohols किंवा fusel oils बाहेर येऊ लागतात, ती घातक जरी नसली, तरी त्यातून वाईट चव येऊ शकते, म्हणून तीही फेकून द्यावी लागतात.)
थोडक्यात, distillation प्रक्रियेतून बाहेर येणार्यापैकी काय ठेवायचे आणि काय (आणि किती) फेकून द्यायचे, याचा अंदाज (किंवा विधीनिषेध) distillerला नसल्यास विषबाधेचा धोका उद्भवू शकतो.
२ आधी म्हटल्याप्रमाणे, अमेरिकन संघराज्यीय कायद्याप्रमाणे उत्पादनाची सर्वाधिक मर्यादा प्रतिवर्षी प्रतिबिर्हाडी २०० यू.एस.ग्यालन इतकी असली, तरी अलाबामा राज्यात त्या राज्याच्या कायद्यानुसार ही मर्यादा प्रति-तिमाही प्रतिबिर्हाडी १५ ग्यालन (परिणामी, प्रतिवर्षी प्रतिबिर्हाडी ६० यू.एस.ग्यालन, परंतु कोणत्याही एका तिमाहीत १५ यू.एस.ग्यालनची मर्यादा न ओलांडता) इतकीच आहे. शिवाय, कोणत्याही एका क्षणी अशा प्रकारे बनवलेल्या उत्पादनाचा १५ यू.एस.ग्यालनहून अधिक साठा न करण्याचे बंधन आहे, आणि अलाबामातील "ड्राय" कौंट्यांमध्ये आणि "ड्राय" मुन्शिपाल्ट्यांच्या हद्दींत ही मुभा उपलब्ध नाही. किंबहुना, मुळात घरगुती उत्पादनाची ही मुभा गेल्याच वर्षी (२०१३मध्ये) पास झालेल्या एका राज्य-कायद्यामुळे मिळाली, असे कळते.२अ
२अ अर्थात, १ यू.एस. ग्यालन म्हणजे अंदाजे ७५० मिलीच्या ५ बाटल्यांहून किंचित अधिक, हे लक्षात घेता, ही कमी केलेली मर्यादाही काही कमी नाही. १५ यू.एस. ग्यालन म्हणजे ७५ बाटल्या इतका ष्टॉक एका वेळी बाळगणे, आणि ३०० बाटल्या वर्षभरात बनवणे म्हणजे खाऊ नव्हे. इतक्या बनवणे ही एक गोष्ट; समजा बनवल्या, तरी इतक्या पिणार कोण आहे? आणि फेडरल मर्यादा / आमच्या जॉर्जियाची मर्यादा (तूर्तास फेडरलइतकीच आहे!) बोले तो, वर्षाला बिर्हाडामागे १००० बाटल्या? अबब!
घर की मूर्गी
माहितीपूर्ण!!
अर्थात मीडवगैरे अनवट वारुणीप्रकार बनवायचे असल्यास गोष्ट निराळी. पण नेहेमीच्याच बियर आणि वायनी बनवायला घरी इतका खटाटोप करावा काय?
घर का पाया १, पेज २ बराबर.
१ पाया सूप
२ भाताच्या पेजेला हिंदीत कय म्हणतात?
अलिकडचे यशस्वी प्रयोग.
दोनेक महिन्यांपूर्वी, प्राचीन पद्धतीने बनवलेल्या संत्र्याच्या स्वादाच्या मीडची भट्टी सुरु केली होती. या मीडमध्ये मधाबरोबरच स्वादाकरता संत्रे, दालचिनी, लवंग, बेदाणे वगैरे जिन्नसही वापरतात; शिवाय यात वाईन यीस्टऐवजी चक्क बेकर्स यीस्ट वापरायचे असते. वेगळा आणि रोचक(!) प्रकार वाटला म्हणून फार आशा न ठेवता प्रयोग सुरु केला होता. बरोबर सव्वा-दोन महिन्यात मीड पूर्णतः पारदर्शी झाली आणि विघटनाची प्रक्रिया जवळजवळ थांबली म्हणून ती बाटल्यांत भरली आणि भरताना तिचा स्वादही घेतला. अतिशय उत्तम स्वाद आला आहे पण ही मीड बरीच गोड आहे (डिसर्ट वाईन सदरात मोडणारी). बाटल्यांत भरल्यानंतरही अनेक महिने तिचा स्वाद सुधारत राहील अशी अपेक्षा आहे. पुढल्या खेपेस थोड्या जास्त प्रमाणात हीच मीड बनवायचा विचार आहे. या मीडबरोबरच साधारण तीच कृती वापरून पण बेकर्स यीस्ट ऐवजी वाईन-यीस्ट वापरून अजून एक घाणा लावला होता पण ती मीड त्यामानाने फारच मंद गतीने चालली आहे. या वर्षी सुरु केलेल्या रासबेरी वाईन आणि अॅपल सायडरलाही चांगले यश आले आहे.
ग्यानी मीड
ही पाककृती इंट्रेस्टिंग वाटते आहे. मल्ड् वाईनसारखी चव येते का? शक्य असल्यास प्रमाण आणि कृती वाचायला आवडेल.
चव आणि प्रमाण
या मीडची चव किंचित मसालेदार असली तरी मल्ड वाईन इतकी तीव्र नाही. या मीडचा वास फारच मस्त आहे, त्यातून किंचित मसाले, मधाचा आणि संत्र्याचा गोड वास व्यवस्थित ओळखू येतो. मीड गोड असली तरी त्याची चव द्राक्षाच्या वाईनपेक्षा बरीच वेगळी असते.
साहित्य : १.५ किलो मध, १ चमचा बेकर्स यीस्ट , १ संत्रे, २ लवंगा, १ दालचिनीची काडी, २५ बेदाणे
कृती याप्रमाणे वापरली.
धागा वर आल्यावर पुन्हा वाचला.
धागा वर आल्यावर पुन्हा वाचला. अधिक मुरला आहे ;)
सायफन करून म्हणजे काय?
मला वाटते तळाचा गाळ ढवळला
मला वाटते तळाचा गाळ ढवळला जाऊन मिक्स होऊ नये म्हणून पात्र उचलून उपडे न करता फक्त वरवरचा द्रव ट्रान्सफर करण्यासाठी सायफन तत्वाने (आठवा: जुना रॉकेल पंप) ते ट्रान्सफर करावे असा अर्थ असावा. "एकसंध द्रवपदार्थ नेहमी समपातळीत राहतो" या तत्वावर उंच टाकीतून द्रव्य शोषून निम्नस्तराच्या टाकीत पाईप सोडला तर एकदा सुरु झालेला प्रवाह दोन्ही टाक्यांच्या पातळ्या एकसमान होईपर्यंत चालूच राहतो या तत्वावर. सुरुवातीला एकदा या पाईपमधली हवा काढून द्रवाचा एकसंध प्रवाह सुरु करावा लागतो. यात डेस्टिनेशन हे सोर्सच्या खालच्या पातळीवर असले म्हणजे झाले. मधे पाईप वरखाली कसाही फिरवल्यास फरक पडत नाही.
ओह ओके. एका बाईकमधून बाटलीत
ओह ओके.
एका बाईकमधून बाटलीत पेट्रोल ट्रान्फर करतो तसे ;)
बरोबर ओळखलेत.. हम्म. अॅबसेंट
बरोबर ओळखलेत.. हम्म. इंधनभरणाबाबतीत अॅबसेंट माईन्डेड दिसता. कितीवेळा येते अशी वेळ एका महिन्यात साधारणपणे?
गेले ते दिन गेले
गेले ते दिन गेले ;) :(
काल डॉक्टर अजय बंग यांचे
काल डॉक्टर अजय बंग यांचे प्रवचन दूर चित्रवाणी वर पहिले, महाराष्ट्राचे विभाजन खालील राज्यात करता येईल:
१. फेणी मद्यराज्य (कोकण)
२. वाईन मद्य राज्य (पुणे -नासिक)
३. ज्वारी मद्य राज्य (मराठीवाडा,प. विदर्भ)
४. मोहा मद्य राज्य (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर)
५. नाव विसरलो (उसाची दारूला काय म्हणतत (प. महाराष्ट्र)
एक कदम्ब वृक्षाच्या फुलांपासून जुन्या काळी दारू बनविल्या जात होती. ती पिल्यावर माणूस प्रेमात पडतो. असे म्हणतात, काय खंर ते माहित नाही. कृष्णाला कदम्ब वृक्ष अत्यंत प्रिय होता...
रम
उसापासून बनते ती 'रम'.
मादक वास.
शक्य आहे. कदंबाच्या फुलांचा वास अतिशय मोहात पाडणारा/मादक व मोगरा किंवा निशीगंधाच्या फुलांपेक्षा तीव्र असतो.
रुची, हा प्रयोग कधी?
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने…
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने लिहील्येय. -- 20250114___051733