प्रश्न मनाचे

ग्रंथ परिचय- प्रश्न मनाचे

मन हा विषयच असा आहे कि त्याची व्याप्ती आपल्या कल्पनेपलिकडे जाते. मानवी मन हा कुतुहलाचा व गुढ विषय आहे. नुकतेच प्रश्न मनाचे हे डॉ हमीद दाभोलकर व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो होतो.त्या निमित्त या विषयावर चर्चा झाली. महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.पुस्तकाची पहिली आवृत्ती महिन्याभरातच संपल्याने खरतर हे दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन होते.
पुस्तक हे मनाचे आरोग्य आजार व त्यांची उकल या भोवती गुंफले आहे.या विषयावरील अवतीभवती असणारे व विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे म्हणजे एफ ए क्यू या स्वरुपात हे पुस्तक आहे. वाचक प्रथम त्याच्या मनात असलेले प्रश्न हे पुस्तकात मिळतेजुळते कुठे दिसताहेत का? हे प्रथम पाहतो व त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतो. २०२० साली जसे भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न आहे तसे त्या वेळी जगात औदासिन्य हा मानसिक आजार दुसर्‍या क्रमांकावर असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य या संकल्पने ' आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे ही स्थिती अपेक्षित नसून शारिरिक, मानसिक,सामाजिक व अध्यात्मिक अशा चारही अंगाने आरोग्यपुर्ण असणे होय' असे म्हटले आहे.
पुस्तकात औदासिन्य व मूडचे आजार, चिंतेचे आजार,व्यसन व व्यसनमुक्ति,स्किझोफ्रिनीया,मनोकायिक आजार,फिटेचे आजार, लहान मुलांचे मानसिक आजार, लैंगिक समस्या, वृद्धत्वातील मानसिक आजार, स्त्रिया व त्यांचे मानसिक आजार,मनाचे औषधोपचार, मनाचे आजार आणि अंधश्रद्धा,मन आणि स्वभाव अशा प्रकरणांमध्ये पुस्तक विभागले आहे.किचकट व तांत्रिक बाबी विशेषत्वाने टाळल्या आहेत.मानसोपचाराविषयी फारशी माहित नसलेला सर्वसामान्य माणुस हा खर्‍या अर्थाने पुस्तकाचा वाचक आहे.
मूड ठीक असणे वा नसणे याची अनुभूती आपल्याला येतच असते. ती मनाची अवस्था आहे. काही माणसे कधी कधी खूप उत्साही असतात तर कधी त्यांची बॅट्री एकदम डाउन असते. जेव्हा हे अधिक प्रमाणात होते तेव्हा ते बायपोलर मूड डिसऑर्डरचे बळी असतात.अशा ठिकाणी मूड स्टॅबिलायझर औषधे उपयोगी पडतात.
शरीराचा व मनाचा फारच जवळचा संबंध आहे. मनात चिंता निर्माण झाल्यामुळे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन शरीरात अनेक बदल घडून येतात. त्याचा परिणाम म्हणून परत मनात चिंता निर्माण होते असे हे दुष्टचक्र आहे.पॅनिक अटॅक, सोशल फोबिया, मंत्रचळ,पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, सर्वव्यापी चिंता अशा बाबी सोदाहरण सांगितल्या आहेत. औषधोपचाराबरोबरच समुपदेशन व वर्तणूक उपचार पद्धती या तितक्याच महत्वाच्या आहेत.
व्यसन हा एक मानसिक आजार आहे.कुटुंबात अथवा परिचितांमधे व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे आपण पहातो. पुर्णत: व्यसनमुक्त करता येईल असे औषध अजून वैद्यकशास्त्राला सापडले नाही. बिअर, वाईन ही दारु नाही असा खोडसाळ प्रचार जाणीवपुर्वक भारतात केला जातो असे दाभोलकर म्हणतात.
स्किझोफ्रिनिया हा तीव्र स्वरुपाचा मानसिक आजार आहे. पुस्तकात या विषयी अधिक पाने खर्च केली आहेत.या रुग्णाच्या उपचारात कुटुंबातील व्यक्तींचाही कस लागतो.
मनोकायिक आजारांमध्ये अनेक तपासण्या करुनही दुखण्याचे निदान होत नाही. डोके दुखणे, पित्त होणे, हातापायांना मुंग्या येणे ते अगदी शरीराची अर्धी बाजू लुळी पडणे इतकी लक्षणे दिसून येतात.क्रॉनिक फटिग सिंड्रोम सारख्या आजारात दीर्घ मुदतीचा थकवा जाणवतो.फिटेचे आजार हा मानसिक आजार व मेंदुचे आजार या सीमारेषेवरील आहे.कांदा किंवा चप्पल हुंगायला दिली की फिट थांबते असा समज असण्याचे कारण ती तेवढ्या वेळातच थांबलेली असते. लहान मुलात अतिचंचलता, मतिमंदत्व, स्वमग्नता आढळून येते.लैंगिक समस्या मधे हस्तमैथुन, लैंगिक समाधान,शीघ्रपतन, समलिंगी संबंध, लिंगबदल, लैंगिक विकृती या बाबतचे प्रश्न आहेत. इथे तज्ञांमधे कदाचित मतभिन्नता होउ शकते. कारण प्रकृती कुठली व विकृती कुठली याबाबत सर्वसहमती अवघडच असते.वृद्धांच्या मानसिक आजारात स्मृतीभ्रंशाचाच समावेश आहे.मनाचे आजार व अंधश्रद्धा मधे भूत, भानामती अंगात येणे,संमोहन या बाबींचा उहापोह आहे.मन व स्वभाव या प्रकरणात बहुतांशी मानसशास्त्राचा वर्गवारी चा भाग आहे.फ्रॉईडचे मॉडेल ते आधुनिक मानसशास्त्राचे प्रचलित संशोधन यात मांडले आहे.
एकंदरी पुस्तक विषयाच्या मानाने किचकट नाही.

प्रश्न मनाचे
लेखक -डॉ हमीद दाभोलकर, डॉ नरेंद्र दाभोलकर
प्रकाशक- राजहंस प्रकाशन
पृष्टे- १५०
किंमत - १४०/-

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पुस्तकाची ओळख खूप आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या अनुभवात भारतामध्ये मानसिक रोगांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळ्या प्रकारचा आहे.

एक म्हणजे बेपर्वाई - 'उगाच दुःखाचा काय बाऊ करायचा, जगात सगळ्यांनाच दुःखं असतात' - यात काही जणांना जशी वजन उचलण्याची शक्ती कमी असते तशी काहींना ताण सहन करण्याची शक्ती कमी असते हे मान्य केलेलं नसतं.

दुसरं म्हणजे हतबलता - 'अहो, सांगू का, स्वभावाला औषध नसतं. असे उपचार करून स्वभाव बदलत नाहीत. ज्यांची बदलण्याची प्रवृत्ती असते तेच बदलू शकतात बाकी नाही' म्हणजे पुन्हा रोग्याच्या माथी त्याच्या कमकुवतपणाचा दोष मारला जातो, आणि यावर उपाय नाही असं ठामपणे सांगितलं जातं.

तिसरं म्हणजे कुचेष्टा - 'बावळट, बुळ्या, रडूबाई' वगैरे शब्दांत आपल्यापासून वेगळं असणाऱ्यांची चेष्टा केली जाते. पायाने अधू असणाऱ्याचा कधीही अपमान न करणारे, त्यांना आवर्जून मदत करणारे लोक असे शब्द वापरताना दिसतात.

या तिन्ही दृष्टीकोनांतून मन व त्याच्या रोगांविषयीचं अज्ञान दिसून येतं. अशा पुस्तकांमुळे ते अज्ञान कमी व्हायला मदत होईल अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक परिचय आवडला. या विषयावरची काही पुस्तके वाचली आहेत. 'मनोविकारांचा मागोवा' आवडले होते. 'मन करा रे प्रसन्न तितकेसे आवडले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा