नमस्कार,
मी अनेक वर्षांनी इथे पोस्ट टाकण्याचा प्रयत्न करते आहे. शब्दनिवडीच्या ज्या चुका होतील, त्या कृपया गोड मानून घ्याव्यात ही विनंती!
मला सध्या गोव्याची कोंकणी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची थोडी मदत हवी आहे. जर तुम्ही ह्या भाषेचे भाषिक असाल, तर कृपया माझ्याशी संपर्क साधा अथवा इथे प्रतिक्रिया द्या.
थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे:
काय मदत हवी आहे?
डेटा ॲनोटेशन करायचे आहे: म्हणजे ह्या भाषेत लिहिलेला मजकूर वाचून त्या मजकूराची शैक्षणिक गुणवत्ता काय ह्याचे रेटिंग द्यायचे आहे.
- ह्यासाठी विशेष पात्रतेची गरज नाही. ही भाषा समजणे आणि इंटरनेट वापरता येणे एवढे पुरेसे आहे.
- तुम्हाला काहीही लिखाण वगैरे करायचे नाहीये. फक्त प्रत्येक एंट्रीतला मजकूर वाचायचा आहे आणि दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून योग्य रेटिंगच्या बटणावर क्लिक करायचे आहे
हे सर्व कशासाठी?
सध्या जी एआय (AI) मॉडेल्स तयार आहेत ती मुख्यत्वे अशा भाषांवर ट्रेन केली आहेत, ज्या भाषांचा भरपूर डेटा इंटरनेटवर उपलब्ध आहे. परंतु आता ज्या भाषांचा तुलनेने कमी वापर होतो आणि त्यामुळे त्यांचा कमी डेटा उपलब्ध असतो अशा भाषांवरही काम सुरू झाले आहे. सध्या ते ओपनसोर्स प्रकारात मोडते. ह्याचा अर्थ असा की ह्या डेटाचा उपयोग कोणालाही करता येईल, त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. वर ज्या प्रकल्पाची माहिती दिलेली आहे, तो प्रकल्प हगिंग फेस नावाची एक नावाजलेली टेक कंपनी राबवते आहे. ह्या खेपेला बऱ्याच वेगवेगळ्या भाषांवर काम चालू आहे, त्यातली गोव्याची कोंकणी ही एक भाषा आहे. हा डेटा गोळा झाला की ही कंपनी ह्या डेटावर आधारित ओपनसोर्स मॉडेल ट्रेन करेल. त्यामुळे ह्या भाषांवरील एआय (AI) च्या कामाला चालना मिळेल.
अधिक माहिती
हे काम ओपनसोर्स डेटासेटसाठी असल्याने ते स्वयंसेवी तत्वावर करून घेतले जात आहे. त्यामुळे ह्यासाठी कोणताही आर्थिक व्यवहार होणार नाही.
परंतु,
- तुम्ही केवळ २ तास जरी हे काम केले, तरी त्याने बरीच मदत होईल.
- तुम्हाला तुमच्या भाषेवरील एआय (AI) च्या कामाला चालना देण्यास मदत करता येईल.
- एआय (AI) साठी डेटा ॲनोटेशन कसे करतात ह्याचा अनुभव घेता येईल.
हे सर्व वाचून तुम्हाला ह्या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटला असेल, अथवा ह्या प्रकल्पात भाग घ्यायला ज्यांना आवडेल अशा व्यक्ती तुम्हाला माहित असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधा, किंवा इथे प्रतिक्रिया द्या.
गोंयची कोंकणी
गोंयची कोंकणी
या भाषेत एक वर्तमानपत्र प्रकाशित होते. गोव्यात दोन रुपयांत मिळते. पण डिजिटल प्रकाशनही होते.
https://epaper.thegoan.net/
>>>> भांगरभूंय
( सुवर्ण भूमी)
त्यातून काही चांगला संपर्क मिळतो का पाहा.
संपर्क करायचे मार्ग?
तुमचा संदेश ऐसी बाहेरील गोवेकर मित्रांना पाठवायचा होता -- अशा लोकांनी संपर्क कसा साधावा?
वैयक्तिक माहिती फार पसरवू देऊ नये, हे ठीकच. तरी प्रकल्पापुरता संपर्क कसा साधावा?