परवलीचा शब्द: आज मी साबणाने आंघोळ केली
या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ. सकाळी उठून ब्रेकफास्टची तैयारी करते, मा की दाल, राजमा, छोले किंवा भाजी इत्यादिला फोडणी देते आणि कणीक मळून ठेवते. त्या नंतर सौ. चहा करते. सून ही सहाच्या आधी उठते. चहा पिऊन, पराठे, पोळ्या इत्यादि करते. नंतर आंघोळ करून, तैयार होऊन, नाश्ता करून, धावत-पळत आठच्या आधी घरातून निघते. संध्याकाळी सून साडे सात पर्यन्त घरी परतते. त्या आधी सौ. स्वैपाकाची कच्ची तैयारी करून ठेवते. सौ.च्या हातचा चहा पिऊन, सून स्वैपाकाचे काम बघते. त्यामुळे न मागता, मला ही संध्याकाळचा दुसरा चहा मिळतोच. ऑफिस मधून घरी यायला मुलाला ही रात्रीचे 9 वाजतात. रात्री साडे नऊ नंतर जेवण. मग सर्व आटोपता-आटोपता रात्रीचे साडे दहा-अकरा रोजच होतात. दुसर्या शब्दांत म्हणा, लेक आणि सून दोघांचे एका रीतीने यंत्रवत जगणे सुरू झाले आहे. महानगरात जगण्याचा संघर्ष हा यंत्रासारखाच असतो.
एक दिवस संध्याकाळी सात वाजता मित्रांसोबत पार्क पे चर्चा करून घरी परतलो. पाहतो काय सौ.ने भाजीला फोडणी टाकलेली होती आणि पोळ्या करत होती. मी आश्चर्याने तिच्या कडे पाहिले. सौ. म्हणाली सून थकून घरी येते, म्हंटले आज संध्याकाळचा स्वैपाक करून टाकते. मला आपल्या कानांवर विश्वास झाला नाही. मी म्हंटले, खरे सांग, तुला सुनेचा एवढा पुळका काहून आला. सौ. माझ्या कडे पाहत हसत म्हणाली, तुमचा लेकरू आज सकाळी ऑफिस जाताना सुनेला म्हणत होता, आज त्याने साबण लाऊन आंघोळ केली आहे. सौ.चे शब्द कानात पडले आणि मी भूतकाळात पोहचलो.
मुले शाळेत जाऊ लागली होती. मुलांची शाळा सकाळची होती. मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्शा सकाळी पाउणे सातला यायचा. मला ही सकाळी सातला घरातून निघावे लागायचे. त्याचे कारण बसस्टॉप घरापासून एक किमी दूर होता. या शिवाय त्यावेळी दिल्लीत मेट्रो सुरू झाली नव्हती. बस ने कमीत-कमी दीड तास कार्यालयात पोहचायला लागत असे. आम्ही दोघ सकाळी पाचला उठायचो. चहा पिऊन सौ. सर्वांसाठी सकाळचा नाश्ता आणि तिघांचे डब्बे तैयार करायची. मुलांसाठी सौ.ला दुपारी ही स्वैपाक करावेच लागायचा. या शिवाय घराची साफ-सफाई, कपडे धुणे, भांडे घासणे सर्वच सौ.ला करावे लागायचे. आता किमान झाडू-पोंछा आणि भांडे घासण्यासाठी बाई आहे. मला रोज संध्याकाळी घरी यायला रात्रीचे नऊ किंवा साडे नऊ होत असे. मुले ही रात्री दहा-साडेदहा पर्यन्त अभ्यास करायाची. रोजचे रुटीन आटोपता-आटोपता रात्रीचे 11 व्हायचेच. दिवसभराच्या कामाने सौ. थकून जायची. भारत सरकारात पीएसची नौकरी, त्यात मोठ्या कार्यालयात मोठ्या अधिकार्यांसोबत, असल्याने शनिवार आणि रविवारची सुट्टी क्वचित मिळायची. अश्या बिकट परिसस्थितीत रात्रीच्या नाटकाचा चौथा अंक सुरू करणे जमत नव्हते. शेवटी यावर उपाय काढला. ज्या दिवशी इच्छा अनावर होत असे, सकाळीच आंघोळ झाल्यावर सौ.ला म्हणायचो, आज साबणाने आंघोळ केली आहे. सौ. दिवसाचे काम त्या हिशोबने आटपायची. त्या दिवशी संध्याकाळी बहुधा वरण भात किंवा खिचडी इत्यादि करायची. त्यात वेळ आणि मेहनत कमी लागते. रात्री साडे नऊ होताच, सौ. मुलांवर तोफ डागायची, तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा नसतो. रात्री पुस्तके उघडून बसता आणि सकाळी उठताना नखरे करतात. मी दिवा बंद करते आहे, निमूट पणे जाऊन झोपा आणि सकाळी वेळेवर उठा. मुले वेळेवर झोपली तरच आमचा नाटकाचा चौथा अंक सुरू व्हायचा.
काही क्षणात मी भानावर आलो, च्यायला, आपला परवलीचा शब्द मुलांना माहीत आहे. आज तोच शब्द लेकराने वापरला. याचा अर्थ आपले गुपित सुनेला ही माहीत झाले असेल. मी हसत सौ.ला म्हणालो, अब पोल तो खुल चुकी है, आज अपुन भी सोने से पहले साबण लगाकर आंघोळ करेगा. तुमच्या जिभेला काही हाड...... काहीही म्हणा, सौ. लाजल्यावर या वयात ही सुंदरच दिसते.
प्राप्त परिस्थितीला भिडणे हे
प्राप्त परिस्थितीला भिडणे हे साहित्याचं ध्येय आहे...
असं साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून सांगितलं गेलं आहे. हे काम विनोदी पद्धतीने किंवा अग्रलेख छाप लेखनातून केलं जातं. वाचक आपापल्या पद्धतीने समस्येची उकलही सुचवतात. उकल कधी थेट मूलगामी असते तर कधी चाकोरीबाहेर जाणारी tangent? असते.
पुरुषी दृष्टिकोन
बरोबर!
मुलगाही ऑफिसमधून वेळेवर घरी आला आणि सगळ्यांनी एक छान वेळापत्रक करून स्वयंपाकाची जबाबदारी घेतली तर चौघांच्याही स्वयंपाकाची आणि सैपकाची व्यवस्थित सोय होईल.
पण पुरुष लोक ९ वाजता ऑफसमधून येणार आणि जे रिकामे आहेत ते पार्कमध्ये फिरायला जाणार.
हीच गोष्ट स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिली तर ते दोन पुरुष घरात राहत नसते तर त्या दोघींची आयुष्यं बरीच सुसह्य झाली असती. आणि सैपाक स्त्रियांना तसाही सहजसाध्य आहे. त्यासाठी सतत घरात पुरुष बाळगायची काहीच गरज नाही.
पुरुष खरंच फार कंटाळवाणे असतात.
?
बाकी सर्व ठीक आहे, परंतु…
ते दोन पुरुष घरात राहत नसते तर त्या दोघींची आयुष्यं बरीच सुसह्य झाली असती.
ते दोन पुरुष जर घरात राहात नसते, तर मुळात त्या दोन स्त्रियांना एकाच घरात राहण्याचे काही प्रयोजन नसते, ही बाब नजरेआड होते आहे काय?
(हं, आपापल्या घरांत त्यांची आयुष्ये सुसह्य झाली असती, किंवा कसे, हा निव्वळ स्पेक्युलेशनचा मामला आहे. दुनियेतल्या तमाम आत्याबाईंनी भरघोस मिश्या राखण्याची फॅशन जर प्रचलित असती, तर, कोणी सांगावे, त्या सर्वांना ‘काका’ म्हणून हाक मारण्याची प्रथा समाजात कदाचित अस्तित्वात असतीही. खात्री करून घेण्यास एकच मार्ग आहे — स्वतःच्या आत्याबाईंना भरघोस मिश्या राखण्यास भरीस पाडणे. (स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही!))
आणि सैपाक स्त्रियांना तसाही सहजसाध्य आहे. त्यासाठी सतत घरात पुरुष बाळगायची काहीच गरज नाही.
घरात पुरुष हे सैपाकासाठी(/स्वयंपाकासाठी) बाळगतात, म्हणून कोणी सांगितले? (कशासाठी बाळगतात, कोणास ठाऊक!)
——————————
(‘आणि सैपाक स्त्रियांना तसाही सहजसाध्य आहे’ या वाक्याच्या गर्भितार्थाकडे (असल्यास) तूर्तास दुर्लक्ष केले आहे.)
पुरुष खरंच फार कंटाळवाणे असतात.
असतात खरे.
या समस्येच्या समाधानार्थ, पुरुष न बाळगणे (किंबहुना, पुरुषांशी कोठल्याही प्रकारे संबंध न ठेवणे) हा एकमेव (संभाव्य) उपाय आहे.
जे रिकामे आहेत ते पार्कमध्ये फिरायला जाणार.
Think about it: That might be a blessing in disguise.
.
ते दोन पुरुष जर घरात राहात नसते, तर मुळात त्या दोन स्त्रियांना एकाच घरात राहण्याचे काही प्रयोजन नसते, ही बाब नजरेआड होते आहे काय?
नाही. हे असं अघोरी रूटीन जगून जगून त्या दोन्ही बायका आपापल्या नवऱ्यांना सोडून द्यायचा निर्णय घेतील. सून सकाळी ६ माणसांचा स्वयंपाक करून निघण्यापेक्षा २ फुल आणि २ हाफ म्हणजे ३ माणसांचा स्वयंपाक करून निघेल. संध्याकाळी सासू सगळ्यांचं बघेल. दुपारी कुणी घरी नसताना सासूला तिच्या सैपाकाची सोय करता येईल आणि जेव्हा कधी वाटेल तेव्हा घरी आल्यानंतर सुनेला तिच्या. आणि आता त्या शहाण्या झाल्या असल्यामुळे अशाच पुरुषांबरोबर सैपाक करतील जे नंतर आपापल्या राहत्या घरी जाऊन स्वयंपाक करून स्वबळावर जेवू शकतील.
.
नाही. हे असं अघोरी रूटीन जगून जगून
सांप्रतकालीन रूटीन हे अघोरी असण्याबद्दल सहमत होऊ शकतो. (जरी तो माझा वैयक्तिक प्रश्न नसला, तरीही.) परंतु, माझा मुद्दा तो नाही.
त्या दोन्ही बायका आपापल्या नवऱ्यांना सोडून द्यायचा निर्णय घेतील.
तुमचे मूळ विधान ‘ते दोन पुरुष घरात राहत नसते तर त्या दोघींची आयुष्यं बरीच सुसह्य झाली असती.’ असे होते. त्यावर माझे म्हणणे असे होते, की ते दोन पुरुष जर (त्या) घरात राहात नसतील, तर (१) त्यांच्या (रिस्पेक्टिव) बायका तरी त्या घरात मुळात कशासाठी राहतील, आणि (२) आपापले नवरे ज्या घरा/रांत राहतात, त्या घरा/रांत जरी राहायचे नाही म्हटले (ठीक आहे, फेअर इनफ!), तरी, त्या परिस्थितीतसुद्धा, (या दोन बायकांचे एकमेकींशी नाते हे बव्हंशी आपापल्या रिस्पेक्टिव नवऱ्यांमधील नात्यांच्या बाय व्हर्च्यू ऑफ असल्याकारणाने) या दोन बायकांचा अन्यथा एकमेकींशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही (येथे ‘संबंधा’चा अर्थ ‘सैपाका’तल्याप्रमाणे कृपया घेऊ नये, अशी नम्र विनंती! किंवा, घ्या! मला काय त्याचे!), ही बाब लक्षात घेता, या दोन स्वतंत्र स्त्रियांना (ज्या घरात त्यांचे नवरे राहात नाहीत, अशा) एका(च) घराच्या छपराखाली राहणे चालू ठेवण्याचे काहीच कारण उरत नाही. त्यापुढे मग थोरल्या बाईही वाटेल त्या घरात राहायला मोकळ्या, नि धाकट्या बाईही वाटेल त्या घरात राहायला मोकळ्या! त्या दोघी एकाच घरात नक्की काय म्हणून राहातील?
आणि आता, तुमच्या (बदललेल्या) नव्या सिनारिओप्रमाणे, प्रस्तुत दोन बायका नि त्यांचे प्रस्तुत दोन (रिस्पेक्टिव) नवरे, सांप्रतकाळी एकाच घरात राहात आहेत. परंतु, काही कारणास्तव वा कारणाविना, त्या दोघीही आपापल्या (रिस्पेक्टिव) नवऱ्यांना (१) घरातून हाकलून देतात, किंवा, (२) त्यांना सोडून देऊन दुसऱ्या घरात राहू लागतात. ठीक आहे. तरीदेखील, यातील कोठल्याही सिनारिओमध्ये, या दोन मोहतरमा त्यानंतर एकाच घरात नक्की काय म्हणून राहतील, हे कळत नाही. (एनसीआर परिसरात घरांची इतकी टंचाई असावी काय?)
(अर्थात, हे सगळे मुद्दे निव्वळ एक ॲकॅडेमिक चर्चा म्हणून मांडलेले आहेत. अन्यथा, या दोन स्त्रिया आणि त्यांचे दोन (रिस्पेक्टिव) नवरे, या चार इंडिव्हिज्युअल व्यक्तींनी, नक्की कोठल्या (आणि किती) घरांत नक्की कोणा(कोणा)च्या बायकांबरोबर (वा विना) अथवा नवऱ्यांबरोबर (वा विना) राहावे (वा राहू नये), हा या चार व्यक्तींचा (इंडिव्हिज्युअल्सचा) वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याशी (किंवा त्या व्यक्तींशीही) मला काहीही देणेघेणे नाही. किंवा, या विषयासंबंधी माझ्या कोठल्याही वैयक्तिक फँटश्या, फेटिशे वगैरेही काहीही नसल्याकारणाने, त्याही (फँटश्या) वा तीही (फेटिशे) या मंडळींवर प्रोजेक्ट करण्याचे काहीच प्रयोजन मला दिसत नाही वा उद्भवतही नाही. असो चालायचेच.)
सून सकाळी ६ माणसांचा स्वयंपाक करून निघण्यापेक्षा
सहा माणसांचा हिशेब कळला नाही. (मी तरी चारच मोजली.)
२ फुल आणि २ हाफ म्हणजे ३ माणसांचा स्वयंपाक करून निघेल.
दोन हाफ माणसे अद्याप आलेली नसावीत, असा अंदाज. (मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाला चार किंवा पाचच महिने झाले आहेत, असा उल्लेख आहे. अर्थात, Not that that proves anything.)
संध्याकाळी सासू सगळ्यांचं बघेल.
काय म्हणून?
दुपारी कुणी घरी नसताना सासूला तिच्या सैपाकाची सोय करता येईल आणि जेव्हा कधी वाटेल तेव्हा घरी आल्यानंतर सुनेला तिच्या.
त्या दोघींनी (स्वतःकरिता) काय करावे (किंवा करू नये), हे ठरविणारे (किंवा त्याची चर्चासुद्धा करणारे) तुम्ही किंवा मी नक्की कोण? (मानले, की You are an Indian, and I, too, used to be an Indian once, परंतु तरीही, Shouldn’t we be minding our own businesses?)
आणि आता त्या शहाण्या झाल्या असल्यामुळे
हे तुम्ही (किंवा मी) नक्की काय म्हणून ठरवायचे?
अशाच पुरुषांबरोबर सैपाक करतील जे नंतर आपापल्या राहत्या घरी जाऊन स्वयंपाक करून स्वबळावर जेवू शकतील.
त्या कोठल्या पुरुषांबरोबर (एक किंवा अनेक) अथवा स्त्रियांबरोबर (एक किंवा अनेक) अथवा आपल्याआपल्या ‘सैपाक’ करतील (वा करणार नाहीत), ही त्यांची खाजगी बाब झाली, नव्हे काय? याबद्दल कोणतीही स्पेक्युलेशने तुम्ही किंवा मी (किंवा फॉर्दॅट्मॅटर अन्य कोणीही) नक्की काय म्हणून करावीत?
तर सांगण्याचा मतलब, Let us keep our fantasies (if any) to ourselves. Or, if we can’t, let us keep them wherever we may please, but let us at least not project them unto (or inflict them upon) others.
दुसरा असाही विचार करून पाहा ना. प्रस्तुत लेखक, त्याच्या आयुष्यातील काही अतिखाजगी बाबींची खुलेआम, सार्वजनिक चर्चा करतो आहे. तुमचे ठाऊक नाही, परंतु निदान मला तरी मुळात या गोष्टीबद्दल आक्षेप असायला पाहिजे. (असे मला वाटते. नव्हे, मुळात मला या गोष्टीबद्दल आक्षेप आहे.) अशा परिस्थितीत, त्यात आणखीन मी माझ्या फँटश्या या मनुष्याच्या खाजगी आयुष्यावर लादून आधीच खराब असलेली परिस्थिती आणखी का घाणेरडी करू?
बाकी, तुमचे (आणि लेखकाचे, आणि इतरांचेही) चालू द्या.
काळ काम वेगाचे चक्र
काळ काम वेगाचे चक्र फिरवण्याची गरज आहे.
विविध नोकरी व्यवसायांच्या कामाच्या वेळा विविध असतात. >>>
पण पुरुष लोक ९ वाजता ऑफसमधून येणार आणि जे रिकामे आहेत ते पार्कमध्ये फिरायला जाणार.>>> तर हा विचार सोडला पाहिजे. सैन्यदलात अकाऊंटिंग, शिंपीकाम वगैरे प्रत्यक्ष युद्ध लढाई संबंधी नसलेली खाती आणि त्यात काम करणारे कर्मचारी असतात त्यांना जुजबी इतर कामे शिकावी लागतात. स्वयंपाक ही शिकावा लागतो.
अऱ्याऱ्याऱ्याऱ्याऱ्या!
म्हणजे, एरवी नेहमी बिनसाबणाचाच करतो की काय हा मनुष्य आंघोळ?
डर्टी फेलो! (सर्वार्थाने.)
(आणि, या खाजगी गोष्टीचा सार्वजनिक ज़िक्र नक्की कशाबद्दल?)
काहीही म्हणा, सौ. लाजल्यावर या वयात ही सुंदरच दिसते.
हे ज्ञान मला कशासाठी? या माहितीचा मी नक्की काय उपयोग करून घेणे अपेक्षित आहे?
.
एवढे सगळे परवलीचे शब्द शोधून काढण्यापेक्षा पुरुष स्वयंपाक का करत नाहीत?