आरोग्याची काळजी घेणाऱ्या साबणाचा इतिहास

#संकीर्ण #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

आरोग्याची काळजी घेणाऱ्या साबणाचा इतिहास
- प्रभाकर नानावटी

तीन-चार वर्षांपूर्वी, करोना काळात, हाताला साबण लावून कमीत कमी २० सेकंद तरी पाण्यानं हात धुवावेत हा जागतिक आरोग्य संघटनेचा ‘मंत्र’ नक्कीच आपल्याला आठवत असेल. शहरं आणि खेड्यांमधल्या प्रत्येक घरात, सोसायटीत, हॉटेलं, बँका, ऑफिसं, शाळा, कॉलेजं यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी हात स्वच्छ धुवूनच आत जाण्याची सक्ती होती. हा एक कॉमनसेन्सचा सल्ला असल्यामुळे सर्व जण त्याचं पालनही करत होते. साबण वा हँडवाशमधील सरफॅक्टंट्स (surfactants) त्वचेवरचे जीवजंतू बाहेर काढतात. नंतर पाण्यानं धुतल्यावर त्वचेवरचे जीवजंतू बाहेर फेकले जातात. साबण स्वस्त आणि बहुतेक सर्व ठिकाणी मिळणारी वस्तू असल्यामुळे प्रत्येक घराघरात ठेवलेली असतो. जगभरातल्या लोकांच्या आरोग्य-रक्षणासाठी वापरात असलेल्या या साबणाचा इतिहास मात्र अत्यंत मजेशीर आहे.

जगात पहिल्यांदा साबण कुणी वापरला याबद्दल नेमकी माहिती मिळत नसली तरी साबणाबद्दलची त्रोटक माहिती इ. स. पू. २८०० मधल्या बॅबिलोनियन शिलालेखात सापडते. इ. स. पू. २५०० सालच्या एका सुमेरियन शिलालेखात साबण कसा तयार करावा याची माहिती आहे. हा साबण मुख्यत्वेकरून लोकरीचे तंतू धुण्यासाठी वापरला जात असावा.

इ.स.पू. १५५०मध्ये प्राण्यांची चरबी, कॉस्टिक सोडा आणि राख वापरून तयार केलेल्या, ट्रोना (trona) या नावाने ओळखल्या जाणारा साबण इजिप्शियन लोक औषधोपचारासाठी वापरत होते. त्याचा वापर लोकर स्वच्छ करण्यासाठीसुद्धा होत असावा.

पपायरसपासून साबण

प्राचीन मेसोपोटेमिया या देशात साबणासारख्या, स्वच्छ करणाऱ्या वस्तू सापडल्याचे पुरावे मिळाले आहेत. गाय, मेंढी, शेळी असे प्राणी मांसाहारासाठी मारल्यानंतर त्यांच्या पोटातील चरबी वेगळी केली जात असे. त्यात पाणी आणि क्षार असलेला कॉस्टिक सोडा, आणि लाकडाची राख यांसारख्या वस्तूंचे मिश्रण करून कढईत उकळत असत. ते उकळताना चुनखडी टाकायचे. नंतर ते मिश्रण दोन आठवडे थंड करण्यासाठी ठेवायचे. सुगंधी वास यावा म्हणून यारोच्या पानांनी झाकून लव्हेंडर, जरमँडर वगैरेंच्या तेलांचा शिडकावा केला जात असावा. कदाचित त्याच्या वड्या करून अंगावरचा आणि कपड्यांवरचा मळ काढण्यासाठी त्या वापरत असावेत. रोमन इतिहास संशोधकाच्या मते पहिल्या शतकाच्या काळात डोक्यावरील केस तांबूस करण्यासाठी गोमांसाची चरबी आणि राखेपासून बनवलेले घट्ट तेलासारखी दिसणारी साबणसदृश वस्तू रोमन वापरत होते.

प्राचीन काळात साबणसदृश वस्तूंचा वापर शरीर स्वच्छ करण्याऐवजी, कपड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडाच्या विणकामासाठी लागणाऱ्या लोकरीचे किंवा कापसाचे तंतू स्वच्छ करण्यासाठी होत असे. सार्वजनिक स्नानगृहासाठी प्रसिद्ध असलेले ग्रीक वा रोमनसुद्धा साबणांचा वापर करत नव्हते. केवळ बाथटबमध्ये अंग बुडवायचं; कधीकधी बांबू वा धातूपासून बनविलेलं, स्ट्रिगिल (strigil) नावाचं कोयत्यासारखं दिसणारं उपकरण अंगावर घासून जमा झालेली काजळी आणि तेलकटपणा घालवत होते.

इस्लामच्या सुवर्णयुगात साबण उत्पादनाला औद्योगिक स्वरूप प्राप्त झालं. महंमद इब्न झकारिया अल राझी (इ.स. ८६५ - ९२५) याला ऑलिव्ह तेलापासून ग्लिसरिन तयार करता येत असे. त्यानं साबण कसे तयार करावेत, याची नोंद ठेवली. चरबीयुक्त तेलं आणि अल्कली यांच्या संयुगांतून साबण तयार करता येतो, हे लक्षात आलं. मध्ययुगीन कालखंडात प्राणीजन्य चरबीऐवजी वनस्पतीजन्य तेलांचा वापर करून तयार केलेल्या साबणांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्याची शुद्धता आणि वास यांमुळे युरोपमध्ये साबण ही फक्त श्रीमंतानाच परवडणारी चैनीची वस्तू झाली. यात प्रथम क्रमांकावर आणि जास्त मागणी असलेली ऑलिव्ह तेलं आणि सुगंधी लॉरेल तेलापासून सिरियामध्ये बनविलेली अलेप्पो साबणाची लांबडी वडी युरोपमधील देशांत ख्रिश्चन व्यापारी विकत होते.

नंतरच्या काळात याच वड्यांच्या फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश आणि ब्रिटिश आवृत्त्यांचं स्थानिक उत्पादन होऊ लागलं. त्यातही हाबोन दि कास्तिया (कास्टिय गावाचा साबण) नावाच्या साबणाच्या वड्या मध्य स्पेनमध्ये तयार होत असत; त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या होत्या. या ऑलिव्ह तेलापासून बनविलेल्या वड्या युरोपमधील राजघराण्यात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या. आताच्या काळात छायाप्रतींना झेरॉक्स या नावानं ओळखलं जातं; किंवा वनस्पती तूप म्हणजे डालडा! तसंच त्या काळी मिळणाऱ्या बहुतेक कडक साबणवड्यांना लोक साबण न म्हणता कास्तेया म्हणत असत.

ब्रिटिश साबण

इ. स. १५०० ते १७०० या काळादरम्यान युरोपमधून मोठ्या प्रमाणात युरोपीय लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले. गरीब, श्रीमंत, सरदार-दरकदार, बेरोजगार, निवृत्त सैनिक इत्यादींचा लोंढा अमेरिकाभर पसरायला लागला. या बाहेरून आलेल्या स्थलांतरितांनी बंदुकीच्या बळावर मूळच्या अमेरिकी रहिवाश्यांची कत्तल केली. त्यांच्या सगळ्या जमिनी बळकावल्या. युरोपमधून आलेल्या या स्थलांतरितांना तिथल्या पाण्याची भीती वाटत होती. पाण्यात पाय ठेवला तर आजार पसरेल या भीतीने ते नियमितपणे आंघोळ करत नव्हते. बहुतेक वसाहतवादी प्रामुख्यानं साबणाचा वापर इतर घरगुती कामांसाठी करत होते. साबण तयार करण्याचं आणि वापरण्याचं काम घरातल्या स्त्रियांच्या देखरेखीखाली होत असे.

त्या काळच्या एका नोंदीनुसार मांसाहारासाठी पाळीव प्राण्यांची कत्तल केल्यानंतर बायका उरलेली चरबी, स्वयंपाकांच्या भांड्यांना चिकटलेले वंगणसदृश पदार्थ आणि चुलीत साठलेली राख थंडीच्या काळात साठवून ठेवत असत. चरबी, वंगणात आम्लं असतात आणि राखेतून उकळून अल्कली काढता येते. हे वापरून उन्हाळ्यात एका मोठ्या किटलीत साबण तयार केलं जात असे. यांतून तयार केलेला मऊ साबण बहुतांशी वापर बायकांची अंतर्वस्त्रं स्वच्छ करण्यासाठी होत असे.

अमेरिकेत वसाहतवादी साबण बनवताना

अमेरिकेच्या या नव्या जगात उद्योगाचे वारे वाहू लागले. १८०७ साली न्यूयॉर्कमध्ये कोलगेट कंपनीची स्थापना झाली; ओहायो राज्यात सिनसिनाटीमध्ये १८३७ साली प्रॉक्टर अँड गँबल कंपनीची स्थापना झाली. या दोन्ही कंपन्या मोठ्या प्रमाणात साबणाचे उत्पादन करायला लागल्या. पण त्यांनी साबणातल्या घटक पदार्थांत कुठलेही बदल केले नाहीत आणि लोकांनी प्रत्यक्ष वापर करण्यातसुद्धा! कपड्यांसाठी वाळू किंवा दगडाजागी साबणाचा वापर सुरू झाला परंतु आंघोळीच्या साबणापासून अमेरिकी मध्यमवर्ग फार दूर होता.

मुळात साबण हे एक मेणबत्ती उद्योगासाठी लागणाऱ्या घट्ट चरबीचे उपउत्पादन होतं. साबणाचा वापर फक्त कपडे धुण्यासाठी होत होता. प्रॉक्टर अँड गँबल कंपनीतले कामगार मोठमोठ्या कढयांमध्ये कत्तलखान्यातून येणारी चरबी आणि इतर घटक उकळून मेणबत्ती आणि साबण उत्पादनाला हातभार लावत होते.

अमेरिकेच्या उत्तरेच्या आणि दक्षिणेकडच्या राज्यामधल्या यादवी युद्धानं सर्व काही बदलून टाकलं. सार्वजनिक आणि वैयक्तिक आरोग्याचे निकष बदलले. सुधारणेचे वारे वाहू लागले. उत्तरेच्या युनियनतर्फे लढणाऱ्या सैनिकांवर, नियमितपणे साबणांचा वापर करून आंघोळ करण्याची सक्ती करण्यात आली. वैयक्तिक आरोग्य रक्षणाकडे जास्त लक्ष पुरवण्यात यायला लागलं. त्यामुळे स्वस्तात मिळणाऱ्या साबणांचा पुरवठा करण्याची मागणी वाढली. मूठभर श्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या साबणाला सर्वसामान्य जनतेलाही आरोग्यरक्षणाच्या या स्वस्त उपायाची सवय लागली. अमेरिकेतला मध्यमवर्ग एकदाचा नियमितपणे आंघोळ करायला लागला!

ग्राहकांच्या गरजांची दखल घेत साबण उत्पादक कंपन्यानी विविध प्रकारचे साबण बाजारामध्ये आणले. १८७९मध्ये प्रॉक्टर अँड गँबल (P&G) या कंपनीने आयव्हरी सोप (हस्तीदंती साबण) बाजारात विक्रीसाठी आणला. हा सुगंधी वासाचा आंघोळीचा साबण होता. १८९८ साली मिलवॉकी येथील बी. जी. जॉन्सन सोप कंपनीनं पाम आणि ऑलिव्ह तेलांचे घटक असलेले पामोलिव्ह साबण बाजारात आणले. या साबणानं विसाव्या शतकाच्या पहिल्या एक-दोन दशकांत विक्रीचे सर्व विक्रम मोडले.

साबणाच्या रासायनिक घटकांवर आणि प्रक्रियांवर संशोधन होऊ लागलं. ही एक नव्या युगाची नांदी ठरली. मुळात साबण हा आता प्रसिद्ध पावलेल्या डिटर्जंटचा एक प्रकार आहे. पाण्यात तेल विरघळत नाही, त्यामुळे कपड्यांतला आणि अंगावरचा तेलकटपणा घालवण्यासाठी पाण्याचाच वापर करून काही रासायनिक संयुगं शोधत असताना डिटर्जंटच्या रेणूचं एक टोक हायड्रोफोबिक (पाण्याला दूर सारणारं) आणि दुसरं टोक हायड्रोफिलिक (पाण्याला आकर्षित करणारं) आहे हे लक्षात आलं. हायड्रोफोबिक भाग तेलकट रेणूंना चिकटतो आणि हायड्रोफिलिक भाग पाण्याच्या रेणूंना आकर्षित करतो. सरफेस टेन्शनच्या गुणधर्मामुळे हायड्रोफोबिक भागावरचे तेलाचे रेणू हायड्रोफिलिक भागावरच्या पाण्याच्या रेणूंकडे जातात. अशा प्रकारे डिटर्जंट पावडर किंवा साबण, कपडे किंवा अंगावरच्या इतर अस्वच्छ करणाऱ्या कणांबरोबरच तेलकट कणही पाण्याबरोबर वाहून बाहेर टाकले जातात. साबणांसाठी खोबरेल तेल, पाम तेल आणि स्थानिकरीत्या उपलब्ध असलेलं सरकीचं तेल यांचं कमी-जास्त प्रमाण करून अनेक प्रयोग करण्यात आले. त्यातून प्राणिजन्य चरबीला पर्याय सापडला – हायड्रोजनेटेड चरबी. उत्पादकांच्या मते हा तर क्रांतिकारक शोध होता. यानंतर या साबणाच्या उत्पादनासाठी प्राण्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नव्हती.

१७९१मध्ये निकोलस लब्लाँक या फ्रेंच शास्त्रज्ञानं मीठ किंवा सोडियम क्लोराइडपासून अल्कली सोडा तयार करण्याचा शोध लावला. हा शोध साबण उद्योगाच्या व्यापारीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. लुई पाश्चरच्या वैयक्तिक आरोग्याविषयीच्या अभूतपूर्व संशोधनामुळे विषाणूंच्या प्रसार कसा होतो आणि त्यापासून काळजी कशी घ्यावी हे समजलं; त्यातून साबणाच्या वापराला महत्त्व आलं. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात साबणासाठी लागणाऱ्या चरबी आणि तेल या कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे आणि वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी चरबी वापरून तयार केलेल्या धुण्याच्या साबणाला अत्युत्तम पर्याय म्हणून या कंपन्या कृत्रिम डिटर्जंटचे उत्पादन करू लागल्या. त्या काळात जर्मन वैज्ञानिकांनीही सिंथेटिक डिटर्जंटचा शोध लावला. याच शोधातून आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या साबणांच्या उत्पादनांना चालना मिळाली. रिफाइण्ड तेल तयार करताना निरुपयोगी तेल वापरून डिटर्जंटचं पावडर स्वरूपात उत्पादन आणि विक्री शक्य झालं. नंतरच्या काळात या कंपन्या घरगुती क्लीनर्स, शांपू, सुवासिक तेल इत्यादी उत्पादनांची विक्री करू लागल्या.

द्रव साबणाचा (लिक्विड सोप) शोध एकोणिसाव्या शतकात लागला. १८६५मध्ये विल्यम शेपर्ड यानं त्याचं पेटंट घेतलं. बी. जे. जॉन्सन सोप कंपनी (नंतर ही कंपनी आपलं नाव बदलून पामोलिव्ह कंपनी झाली) १८९८ साली द्रव साबणाचं उत्पादन करायला लागली. १९००च्या सुमारास इतर काही कंपन्या द्रव साबण तयार करायला लागल्या. पाइन-सॉल आणि टाइड लिक्विड सोप बाजारात आले. अजूनही वॉशिंग मशीन बाजारात आलं नव्हतं. त्या काळी या लिक्विड सोपचा वापर कपडे, जमीन धुण्यासाठी, न्हाणीघर स्वच्छ ठेवण्यासाठी केला जात होता. परंतु आंघोळीसाठी तो वापरला जात नव्हता.

आता साबण उद्योग हा कमी भांडवलाचा हँडमेड, लघुउद्योग वा छंद म्हणून करण्याचा उद्योग राहिलेला नाही. गृहोद्योग म्हणूनही तो राहिला नाही. भारतासारख्या देशात मात्र काही ठिकाणी खादी केंद्रांत साबणाचं उत्पादन करून विक्री केली जात होती. साबणाच्या सुमार दिसण्यामुळे ग्राहकांची संख्या रोडावत गेली. साबणाचा रंग, खरबरीत आकार यांच्या जोडीला उत्पादनात काही एकसमानता नव्हती. त्याचं मार्केटिंगही म्हणावं तसं झालं नाही.

बाजारीकरणामुळे साबणांच्या उत्पादनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. त्याबद्दल होत असलेलं संशोधन, ग्राहकांच्या आवडी-निवडीकडे जास्त लक्ष, इत्यादींमुळे साबणाच्या रचनेत, आकारमानात आणि वापरात येणाऱ्या घटकांमध्ये भरपूर सुधारणा होत आहेत. कृत्रिम आणि प्राणिजन्य चरबीचा वापर आणि मॉइश्चरायझर, कंडिशनर आणि साबणाचा फेस येण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ यांचाही समावेश होत आहे. सुगंधी वासामुळे साबण जास्त आकर्षक होत आहेत. तरीसुद्धा साबणातील मूळ घटकांची – विशेष करून जेलमधल्या पेट्रोलियम घटकांची – दुर्गंधी ते पूर्णपणे घालवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे साबणाचा घट्टपणा आणि पाण्यात ठेवल्यावर विरघळण्याची प्रक्रिया, विरघळण्याचा वेग याबद्दल अजूनही जास्त माहिती नाही.

लाईफबॉयची जुनी जाहिरात

लिव्हर ब्रदर्स इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या लाइफबॉय या साबणाची विक्री भारतात करायला लागले. जमशेटजी टाटा यांनी केरळमधील खोबरेल तेलांचा कारखाना विकत घेतल्यानंतर १८९७मध्ये उत्तर प्रदेशातल्या मीरत या शहरात नॉर्थ वेस्ट नावाच्या कारखान्यातून साबणाच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवली. धुण्याच्या आणि अंगाच्या साबणांचे उत्पादन ही कंपनी करायला लागली. नंतरच्या काळात अनेक उत्पादक वेगवेगळ्या नावांनी साबणांचे उत्पादन करायला लागले.

धुण्याचे साबण येण्याआधी, भारतात जुन्या काळी कपडे धुण्यासाठी वाळू वापरत होते. वाळूत सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेटचे घटक असतात. ही वाळू पाण्यात मिसळून त्यात कपडे भिजवून नंतर काही वेळानं कपडे घासून साफ केले जायचे. मात्र श्रीमंतांचे कपडे स्वच्छ करण्यासाठी रिठ्याचा वापर करत होते. श्रीमंतांच्या बागांमध्ये रिठ्याची झाडं लावण्यात येत होती. त्याच्या सालींमधून निघणारा फेस कपड्यांमधली घाण साफ करून कपडे चमकदार बनवत असे. आजही महागडे आणि रेशमी कपडे स्वच्छ करण्यासाठी रिठ्याचा वापर केला जातो. जेथे रिठे मिळत नव्हते तिथे कपडे धुण्यापूर्वी गरम पाण्यात टाकून ओले करत असत. यानंतर कपडे दगडावर आपटून साफ केले जायचे. धोबीघाटात आजही जुन्या पद्धतीने साबण आणि सर्फ न वापरता असेच कपडे धुतले जातात.

रिठे
रिठे

आपल्या इथली गावं आणि शहरं नदीकाठी वसलेली होती. किंवा गावात एखादा मोठा तलाव, आंघोळीसाठी विहीर असायची. बहुतेक पुरुष मंडळी यांचा वापर करायचे. स्त्रिया, वृद्ध आणि रुग्ण घरातच कुठे तरी आडोशाला बसून आंघोळ करत असावेत. तिथे अंग धुण्यासाठी दगडांचा वापर करत होते. साबण हा प्रकार त्या काळी माहीत नव्हता. उच्चभ्रू घरातील स्त्रिया शिकेकाईची पूड, हळदीची पूड, आवळा वा बेसनसारख्या गोष्टी वापरून आपल्या केसांची आणि त्वचेची निगा राखत असत. परंतु विसाव्या शतकात उत्तरार्धात अंगाच्या साबणांच्या आगमनानंतर या गोष्टी काळाआड झाल्या. साबण उत्पादकामधील स्पर्धेमुळे हमाम, (सिनेतारकांचा) लक्स, लाइफबॉय, (आयुर्वेदिक) मेडीकेअर, (पारदर्शक) पियर्स इत्यादी नावांच्या साबणांनी बाजारपेठ काबीज केली.

पामोलिव्हची जुनी जाहिरात
पामोलिव्ह कंपनीच्या साबणाची जाहिरात (इ. स. १९००)

मध्ययुगात दुर्गंधीयुक्त असणारं आणि ओबडधोबड वाटणारं हे घरगुती उत्पादन आजच्या स्पर्धात्मक जगातल्या विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन म्हणून मिरवत आहे. त्यातली विविधता थक्क करणारी आहे. ही उत्पादनं जरी साबण या सदराखाली येत असली तरी त्यांत मोठ्या प्रमाणात विविधता आहे. ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार आणि त्वचेच्या गुणधर्मानुसार त्यांची निवड केली जात आहे. आपण साबण ही घरगुती वापरातील एक सामान्य वस्तू म्हणून पाहात असलो तरी करोना काळात काही दिवस तरी त्याला विशेषत्व प्राप्त झालं होतं.

म्हणूनच अमुक अमुक साबण ज्याच्या घरी, आरोग्य तेथे वास करी या जाहिरातीतल्या ओळींना मनापासून दाद द्यावीशी वाटते.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

साबणाचा इतिहास सांगणारा लेख आवडला. मात्र, साबण आणि डिटर्जंट यांत साम्य आहे, हे पटलं नाही. बहुतेक साबण हे फॅटी ॲसिडसची सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्टस असतात. मॉडर्न डिटर्जंट हे LABS (Linear alkylbenazene Sulfonate) + सोडियम कार्बोनेट व इतर फीलर्स घालुन बनवलेले असतात. डिटर्जंटसमुळे, एकदा कपड्यापासून विलग झालेले धुळीचे कण, पुन्हा त्या कपड्याला चिकटु शकत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साबण हा प्रकार त्या काळी माहीत नव्हता.

"नाही निर्मळ जीवन काय करील साबण", यात साबण या शब्दातून तत्कालिन नेमके काय अभिप्रेत आहे? (जर हे साबण हा शब्द नंतरच्या काळात घुसडविलेला नसल्यास). ४-५ वर्षांपूर्वी गोदरेजच्या वार्षिक अहवालात, स्वातंत्र्यापूर्वीच्या त्यांच्या जाहिरातींची नोंद घेतली होती. चरबी ऐवजी वनस्पतीतेल वापरणारा पहिला भारतीय साबण असा त्यांचा दावा होता त्या काळात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याविषयी गूगल् अंकलला शरण गेल्यावर मिळालेली माहिती खाली देत आहे.

साबण हा शब्द मराठी शब्द नाही. जुन्या लॅटिन भाषेतील ‘सॅपॉ’चं ते मराठी रुप आहे. लॅटिन भाषेतला ‘सॅपोनेम’ पोर्तुगीज भाषेत ‘सॉबओ’ झाला तर ग्रीक भाषेत त्याचा उच्चार झाला ‘सॅपौनी’. फ्रेंच लोक त्याला सॅव्हॉन म्हणू लागले. इंग्रजीत त्याला ‘सोप’ म्हणतात. बंगालीत ‘साबन’ म्हणू लागले. त्यानंतर हिंदीत त्याला ‘साबुन’ असं म्हटलं जातं. हा शब्द मराठीत आला तेव्हा त्याचा शब्द झाला ‘साबण’. लॅटिन भाषेतला ‘सॅपॉ’ असा प्रवास करत मराठीत आला तेव्हा त्याचा ‘साबण’ झाला. सतराव्या शतकात इंग्लंडने साबणावर करही लावला होता. साबण हा श्रीमंताच्या चैनीची गोष्ट आहे असं त्यांनी म्हटलं होतं. नंतर हा कर हटवला गेला. त्यानंतर साबण हा सामान्यांच्या हाती आला.

"नाही निर्मळ जीवन, काय करील साबण"!
संतशिरोमणी तुकारामांच्या गाथेमधल्या ७५९ व्या अभंगाची सुरुवात वरील वाक्याने होते. तुकोबारायांच्या काळात, म्हणजे सतराव्या शतकात, साबणाला नक्की साबणच म्हणत असतील का? कसा असेल तो दिसायला? कसा बनवत असतील हा साबण; म्हणजे, त्या काळी काय काय पदार्थ वापरुन त्याची निर्मिती होत असेल? तो आजच्यासारखाच छान गुळगुळीत, क्वचित पारदर्शी आणि आल्हाददायक वासाचा असेल का? कारण तेराव्या शतकातल्या ज्ञानेश्वरीच्या ४६५ व्या ओवीत सामान्य जन अंग धुण्यासाठी माती आणि पाण्याचा उपयोग करीत असत अशी नोंद आहे.

मृत्तिका आणि जळें। बाह्य येणें मेळें।
निर्मळु होय बोलें। वेदाचेनी॥
(वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी यांच्या योगाने बाह्य शरीर निर्मळ होते).

तुकोबांच्या काळी साबण हा आजच्या स्वरुपात नक्कीच नव्हता. राख, वनस्पतीजन्य तेल, चुना, खारी माती, इत्यादी मिश्रणातून साबण-जल तयार होत असाव व ते मुख्यत्वे कपडे धुण्यासाठीच वापरलं जात असाव.. भारतातल्या धर्माचरणांमुळे साबणात प्राणीजन्य सामुग्री वापरले जात नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स. उटणे आजकाल बाजारात मिळते तेही फक्त दिवाळीच्या दिवसात. भारतीय बाजारात साबण येण्यापूर्वी उटणे बाजारात मिळायचे का ते घरच्या घरी बनविले जात होते? उटण्या मध्ये मुख्यत्वे मसूर डाळ पीठ वापरले जाते आणि बाकीचे घटक सहज उपलब्ध होत असतील असे वाटत नाही. काहीवेळेला (लहान मुलांसाठी) बेसनपीठ साबण म्हणून वापरले जात होते. तरीही काही संदर्भ मिळालेच तर जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते मराठी रुप आहे. लॅटिन भाषेतला ‘सॅपोनेम’ पोर्तुगीज भाषेत ‘सॉबओ’ झाला तर ग्रीक भाषेत त्याचा उच्चार झाला ‘सॅपौनी’. फ्रेंच लोक त्याला सॅव्हॉन म्हणू लागले. इंग्रजीत त्याला ‘सोप’ म्हणतात. बंगालीत ‘साबन’ म्हणू लागले. त्यानंतर हिंदीत त्याला ‘साबुन’ असं म्हटलं जातं. हा शब्द मराठीत आला तेव्हा त्याचा शब्द झाला ‘साबण’. लॅटिन भाषेतला ‘सॅपॉ’ असा प्रवास करत मराठीत आला तेव्हा त्याचा ‘साबण’ झाला.

लॅटिन भाषेतील ‘sapo’ हा शब्द जरी (मराठी) ‘साबणा’चा (मूळ) उद्गम असला, तरीही, त्याचा लॅटिनपासून मराठीपर्यंतचा प्रवास हा अरबांमार्फत/अरबी भाषेतून झालेला आहे, असे मोल्सवर्थ सांगतो.

"नाही निर्मळ जीवन, काय करील साबण"!
संतशिरोमणी तुकारामांच्या गाथेमधल्या ७५९ व्या अभंगाची सुरुवात वरील वाक्याने होते. तुकोबारायांच्या काळात, म्हणजे सतराव्या शतकात, साबणाला नक्की साबणच म्हणत असतील का? कसा असेल तो दिसायला? कसा बनवत असतील हा साबण; म्हणजे, त्या काळी काय काय पदार्थ वापरुन त्याची निर्मिती होत असेल? तो आजच्यासारखाच छान गुळगुळीत, क्वचित पारदर्शी आणि आल्हाददायक वासाचा असेल का? कारण तेराव्या शतकातल्या ज्ञानेश्वरीच्या ४६५ व्या ओवीत सामान्य जन अंग धुण्यासाठी माती आणि पाण्याचा उपयोग करीत असत अशी नोंद आहे.

काय संबंध? तुकोबारायांचा काळ सतराव्या शतकातला. ज्ञानेश्वरांचा तेराव्या शतकातला. मधल्या काळात वाटेल तेवढी स्थित्यंतरे झालेली असू शकतात.

(ज्ञानेश्वर एकादशीला साबूदाण्याची खिचडी खात असणे शक्य नाही. उलट, तुकाराम ती खात असणे अगदीच अशक्य नाही. तद्वत्, ज्ञानेश्वरांच्या काळात साबण नव्हता, म्हणून तुकारामांच्याही काळात तो नसण्याचे काहीच कारण दिसत नाही. साबूदाणा, शेंगदाणे, रताळी, मिरच्या, तंबाखू, वगैरे ज्ञानेश्वरांच्या काळात अज्ञात असलेल्या चीजवस्तू माझ्या कल्पनेप्रमाणे तुकारामांच्या काळापर्यंत उपलब्ध झालेल्या होत्या.)

आणि, आजचा काळ बोले तो त्याहीपुढचा, म्हणजे एकविसाव्या शतकाचा. तुकारामांच्या काळापासून ते आजपर्यंत मधल्या काळात काहीच स्थित्यंतरे झाली नाहीत काय? तुकारामांच्या काळात आंतरजाल नव्हते, म्हणून आजही ते नाही, असे आपण म्हणणार नाही. मग तोच न्याय (साबणाच्या बाबतीत) ज्ञानेश्वरांच्या आणि तुकारामांच्या काळांना लावता येणार नाही काय? ज्ञानेश्वरांच्या काळात साबण नव्हता, म्हणजे तुकारामांच्याही काळात तो असणे शंकास्पद आहे, असे कसे बरे म्हणता येईल?

हं, आता, तुकारामांच्या काळातल्या साबणाचे स्वरूप आणि आजच्या साबणाचे स्वरूप यांत कालपरत्वे जमीनअस्मानाचे अंतर असणे हे साहजिक आहे. फार कशाला, तुकोबारायांना न्यायला जे विमान आले होते, त्या विमानाच्या तंत्रज्ञानात नि आजच्या जेटोत्तरयुगीन विमानांच्या तंत्रज्ञानात, इतक्या शतकांच्या अवधीनंतर, काहीच फरक नसेल, हे शक्य तरी आहे काय?

——————————

आम्ही शाळेत असताना, इयत्ता दहावीच्या मराठीच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला शिवाजीमहाराजांचा धडा होता. नक्की तपशील आता आठवत नाहीत, परंतु बहुधा महाराजांनी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना लिहिलेले सूचनावजा पत्र होते. त्यात कोठेतरी, ‘तुमचे शिपाई/सैनिक रात्री झोपण्याअगोदर तंबाखू पेटवतील, नि मग निष्काळजीपणे झोपेत तो गवताच्या गंजीवर नाहीतर दारूगोळ्यावर पडून आग लागून नुकसान होईल, तरी त्याकरिता योग्य तो बंदोबस्त करणे’ अशाही आशयाचा काही मजकूर वाचल्याचे अंधुकसे स्मरते. शिवाजीमहाराज हे तुकोबारायांचे समकालीन. सांगण्याचा मतलब, तुकोबारायांच्या काळात बाजारात तंबाखू उपलब्ध असणे हे अगदीच अशक्य नाही. ज्ञानेश्वरांच्या काळात मात्र तो नव्हता, हे निश्चित.

खरे तर, हे अगदीच अशक्य नसावे. बोले तो, १९५०च्या दशकात नाही का, कोठल्यातरी ब्रिटिश मॉडेलची कॉपी मारून ‘अँबॅसिडर’ जी बाजारात आणली, तिच्यातच पुढे कधी कोठे ग्रिलचाच आकार बदल, कोठे दिव्यांचीच ठेवण बदल, असले मामूली बदल करतकरत पार ‘मार्क ४’पर्यंत रेटली होती? किंवा, ‘फियाट’च्या कोठल्यातरी जुन्यापुराण्या मॉडेलची कॉपी मारून तीच ती ‘पद्मिनी’ युगानुयुगे खपत होती? तुकारामांच्या काळात नक्की काय परिस्थिती होती, याबद्दल कल्पना नाही, परंतु, समाजवादी अर्थव्यवस्था, लायसन्स राज, प्रोटेक्शनिझम वगैरे भानगडी जर तेव्हापासून असल्या, तर पार रामायणाच्या काळातले विमानाचे तंत्रज्ञान तुकोबारायांच्या काळातच नव्हे, तर आजपर्यंतसुद्धा (किंवा, गेला बाजार, अर्थव्यवस्था खुली होण्याअगोदरपर्यंत) रेटत आलेले पाहावयास मिळणे हे अगदीच अशक्य नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साबण आल्यावर रिठे,शिकेकाई, मागे पडली .

कारण साबणाचे मार्केटिंग झाले , जाहिराती मधून, खोट्या दावे करून रिठे,शिकेकाई च मार्केटिंग झाले नाही नाही..
पण शेवटी सत्य ते सत्य च असते .
आज साबण कंपन्यांना ठासून सांगावे लागते .
आमच्या साबण मध्ये शिकेकाई आहे,चंदन आहे ,हळद आहे .

(रिठे हे कपडे धुण्यासाठी वापरले जात होते ,पूर्वी )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0