सर्वधर्म(निधर्म)समवाद

बहुतेकसे आस्तिक आणि नास्तिक आपापल्या धर्मात आणि अधर्मात आनंदात असतात असा माझा समज आहे. म्हणजे हिंदू असोत वा ख्रिश्चन, बहुसंख्य असोत वा अल्पसंख्य, बहुतेकसे लोक इतरांना आपल्या धर्मात ओढायला जात नाहीत. नास्तिकसुद्धा मोठे होऊन तसेच होतात, असा माझा समज आहे. (माझ्यासकट) बरेच नास्तिक मी बघितले आहेत. सुरुवातीला एकदम घोषणाबाज नास्तिक असतात. नास्तिकता म्हणजेच काय ती खरी वगैरे प्रवचनं देणं; इतरांना बदलण्याचा प्रयत्न करणं; हिंदू नास्तिक शाकाहारी घरांत जन्माला आले असतील तर मुद्दाम मांसमच्छी खाणं; वगैरे. हिंदू आणि भारतीय लोक आपली भारतीय आणि हिंदू संस्कृतीच काय ती थोर, हे अभारतीय आणि/किंवा अहिंदूंना सांगायचा प्रयत्न करतात. बहुतेकदा असे लोक त्यांना भेटतच नाहीत, मग आपसांतच सांगत राहतात.

सगळेच हळूहळू मोठे होतात; आणि ही घोषणाबाजी वगैरे बंद होते. किंवा आटे-दाल-का-भाव काय हे समजायला लागतं, आणि व्यक्ती व्यवहारी बनतात. असे विषय निघतात ते आपापल्या टोळक्यातच. म्हणजे 'गर्व से कहो हम हिंदू है' हे कुणी एडगर ॲलन पो किंवा स्टीव्हन हॉकिंग अशा कुणाला सांगायला गेलं असेल असं मला वाटत नाही. आणि मी चर्चमध्ये कधी भाषण ऐकायला गेलेच तर तथ्यं म्हणून ते ज्या गोष्टी सांगत आहेत, त्या चूक आहेत हेही मी त्यांना सांगत नाही. अर्थातच, याला अपवाद असतात. कधीमधी असे अपवाद टाळता येत नाहीत. 'हे सगळं आपल्या करमणुकीसाठीच सुरू आहे', असं मला वेळ असेल तर मी स्वतःला सांगते.

---

आम्ही ऑस्टिनात घर घेतलं तेव्हा जवळच दोन चर्चं आहेत, याचा फार विचार केला नव्हता. त्या लोकांचा उपद्रव म्हणजे शनिवार, रविवार, आणि सणासुदीला घराजवळ ट्रॅफिक करतात एवढाच असतो. पण घरी येणाऱ्या जेहोवाहच्या साक्षीदारांना तोड नाही.

घर घेऊन काही महिने जेमतेम झाले असतील. बेल वाजली. मी एकटीच घरी होते. दारावर एक काळा पुरुष होता, त्याच्या दोन पावलं मागे एक काळी स्त्री होती. त्यानं नेहमीचं हाय-हॅलो केल्यावर विषयाला हात घातला.

मला तेव्हा नोकरी करता येत नव्हती. त्यामुळे माझ्याकडे वेळच वेळ असायचा. ते लोक मला ख्रिश्चॅनिटी विकायला आले आहेत हे समजल्यावर मी त्यांना धाडकन घरातच बोलावलं. "या, या, या; बसा, बसा, बसा. पाणी आणू का?" त्यांनी नम्रपणे नकार दिला.

"तुम्ही सुवार्ता ऐकली आहेत का?" अशा अर्थाचं काही तो बुवा म्हणाला. सगळा वेळ जो काही संवाद झाला, त्यात तो बुवाच बोलत होता, आणि बाई फक्त साक्षीदार होती. (जर बुवा आणि मी बोलत होतो; ती फक्त साक्षीदार होती. तर मग जेहोवाह कोण?)

बुवानं मला बराच वेळ बोलून जेहोवाह का कोण देव कसा थोर वगैरे काही सांगितलं. माझा प्रतिसाद कसा होता, हे सांगायची फार गरज नसावी. "तुम्ही लोक उत्क्रांती आणि महास्फोटाचा सिद्धांत वगैरे मानत नाही ना?", हे मात्र मी जरूर विचारलं. आता बुवानं गाडीच बदलली.

माझा अंदाज असा की मी त्याच्या लेक्चरबाजीला बधत नाही, याचा अर्थ त्यानं काढला की तो काय म्हणतोय हे मला समजत नाही. आणि मला समजत नाही कारण ही भाषेची अडचण आहे.

"तुझी मातृभाषा इंग्लिशच का?"
"नाही, पण आता मी द्विभाषिक म्हणून खपून जाईन."
"तुझी मातृभाषा कुठली, नाव सांग मला." आणि हातातलं टॅबलेट काढून सरसावला.
आता आली पंचाईत. तो कितीही ज्ञानी, तपस्वी, आणि देवाची कृपा असणारा मनुष्य असला तरी 'ठ' हा उच्चार कुठून त्याला समजणार होता. शेवटी त्यानं हार मानली. माझ्याच हातात टॅबलेट दिलं आणि म्हणाला, "दाखव यात कुठे तुझी भाषा आहे ते! आमच्याकडे जगातल्या सगळ्या भाषांमध्ये समजावून सांगणारे व्हिडिओ आहेत."

तेव्हा मी थोडी लहान होते आणि त्यामुळे मोठीही होते. त्यामुळे 'जगातल्या सगळ्या भाषा वगैरे गमजा मारू नकोस. विकिपिडियालासुद्धा हे मिरवता येणार नाही', वगैरे विचारच माझ्या मनात आला नाही. म्हणजे मी लहान होते. पण लहान लोकच असले डायलॉक मारतात, म्हणजे हा डायलॉक न मारल्यामुळे मी मोठीही होते. अज्ञानात मोठेपण वगैरे. असो.

तर मी मराठी दाखवली. मग त्यानं मला एक व्हिडिओ दाखवला. त्यात एक बाबाजी मराठीत, किंवा तत्सम भाषेत देवाच्या थोरवीबद्दल सांगत होता. "कां की त्यांना माहीत नाही ..." या पलीकडे ख्रिस्ती-मराठीशी माझा परिचय नाही.

मला भविष्यकाळ दिसत नाही, हे सिद्ध करण्याची ही संधीच आहे. "ही अशी भाषा चॅटजीपीटी वापरेल बहुतेक", असं मी तेव्हा म्हणाले नाही. "हे खूप काही गमतीशीर बोलत आहेत, यापेक्षा तर तुझी इंग्लिश मला जास्त समजत्ये", मी त्याला म्हणाले. मला इंग्लिश समजत्ये यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

तोवर मला कंटाळा यायला लागला. परदेशी आहेत म्हणजे इंग्लिश येत नाही, हा वंशवाद काळ्या माणसाकडून ऐकून घेतल्यानंतर माझं पोटही भरलं होतं. मी त्यांना वाटेला लावलं.

---

गेल्याच महिन्यातली गोष्ट असेल. शनिवारी सकाळी छान हवा होती. मी नुकतीच फार्मर्स मार्केटातून घरी आले होते. चिकार भाज्या आणि बेकरी-पदार्थ आणले होते. ते सगळे फ्रिजमध्ये, जागेवर ठेवले आणि लक्षात आलं की माझं वॉलेट दिसत नाहीये. हं, वॉलेटमध्ये मोजून एक डॉलर होता; बँकेच्या ॲपमधून क्रेडिट कार्ड रद्द करायचं; नवा लायसन्स काढायचा; त्यानंतर नवीन लायब्ररी कार्ड आणायचं. ह्या सगळ्यांत फार तर अर्धा दिवस आणि थोडे पैसे जातील. ठीक. जगबुडी आल्यासारखा कालवा करायची गरज नाही. बेल वाजली. दोन अनोळखी स्त्रिया. काळ्या-गोऱ्या मिश्रवंशाची बाई बोलायला लागली; आणि काळी बाई तिच्या दोन पावलं मागे उभी होती.

मी दरवाजा उघडला तर डाव्या बाजूनं उन्हाची तिरीप थेट डोळ्यांवर. मी डावा हात सॅल्यूट केल्यासारखा भुवईला भिडवला.

"तुला आनंदाची बातमी ऐकायला आवडेल का?" यापेक्षा आणखी जास्त हिंटची मला गरज नव्हती.
"फुकट देणार असाल तर!" माझं वॉलेट गायब झाल्याप्रीत्यर्थ हा जोक होता हे यांना देव सांगेल का?नसेल सांगणार तर उपयोग काय त्याचा?
बोलणारी स्त्री थोडी हसली.
"जगात आनंद मानण्यासारखं, दिलासा वाटण्यासारखं बरंच काही आहे!"
"तुम्हाला बहुतेक कुणी इस्रायल-हमास यांच्या युद्धात निष्पाप लोक मरत आहेत; तिथे फक्त ड्रेनेजची व्यवस्था उध्वस्त झाल्यामुळे साध्याशा पावसाचं पाणी साठून रोगराई येण्याची भीती आहे, वगैरे सांगितलं नाही का?" आणि खरं तर दिलासा कसला, नवं, फक्त कार्ड बाळगण्याचं वॉलेट असल्यामुळे रोकड फार नव्हती; शिवाय फार्मर्स मार्केटातले लोक बऱ्यापैकी प्रामाणिक वाटतात त्यामुळे किमान तिथे पडलं असेल तर लायसन तरी परत मिळेल, कागदी घोडे नाचवावे लागणार नाहीत हा? मुळात वॉलेट हरवलंच कशाला, नंतरचा दिलासा देण्यासाठी? म्हणजे 'गब्बर से तुम्हे एक ही आदमी बचा सकता है' म्हणणार हे लोक वर?

"ते तर सगळं वाईटच आहे. पण देव ..."
"हां, आता कसं आपण मुद्द्यावर आलो. तुम्ही ते ख्रिश्चन लोक असणार." ख्रिसमसही जवळ आलाय, शेवटचं वाक्य मी बहुतेक मनातच ठेवलं होतं.
"नाही, आम्ही 'ते' लोक नाही. देवाचं..." मला अनोळखी बाईच्या बोलण्यात अवतरण जाणवतंय. म्हणजे मी अतिहुशार आहे का पॅरॅनॉईड?तोवर तिनं तिच्या झोळीतून कसलं तरी पँफ्लेट काढायला सुरुवात केली होती.
"बरोबर आहे तुमचं सगळं. पण मी देव मानत नाही. मला गरज नाही. तुम्हाला गरज असेल देवाची, पण मला नाही." आता ती बोलणारी, हुशार, मिश्रवंशीय बाई गोंधळली होती.
"तू हे पुस्तक वाचलं आहेस का?"
"काय फरक पडतो? तुम्हाला उत्क्रांतीबद्दल कितपत माहिती आहे? तरीही तुमचं बरं चाललंय ना? का उत्क्रांतीची माहिती असल्याशिवाय बिनसतंय तुमचं काही?"
"देव महत्त्वाचा असतो..."
"असं पाहा, मी उन्हात गेले तर माझ्या कातडीत मेलॅनिन तयार होतं; मेलॅनिनमुळे त्वचेचं रक्षण होतं. आणि मी फार उन्हात बाहेरच जात नाही. त्यामुळे मी सनस्क्रीन विकत घेत नाही. ज्या गोष्टीची गरज नाही, ती गोष्ट घ्यायचीच कशाला? तसंच माझ्यासाठी देवाचं. मला गरज नाही देवाची. तुम्हांला गरज असेल तर जरूर देवावर विश्वास ठेवा. समजा, मला देवाची गरज पडलीच तर नर-देवावर मी नाही विश्वास ठेवणार. देव असायचीच तर किमान माझ्यासारखी असू देत, परकी कशाला हवी? तुम्हीही स्त्रियाच आहात; तुम्ही किमान तेवढी मागणी करून पाहा. त्यातून मला देव हवाच असेल तर मी तुमचा 'इंपोर्टेड' देव का मानू? माझ्या मूळ धर्मातही चिकार देव आहेत. मी त्यांतला कुणी निवडेन."
मिश्रवंशीय बाईला हार मानायची होती, पण कशी हार मानायची ते समजेना.।
"असं पाहा, तुम्हाला तुमचा वेळ फुकट घालवायचा असेल तर जरूर मला उपदेश करा. पण मी काही तुमची गिऱ्हाईक नाही आणि बनण्याची शक्यताही नाही. त्यापेक्षा तुम्ही इतर कुणी भाबड्या लोकांना पकडून गिऱ्हाईक बनवा. तुमच्या वेळेचा तो थोडा तरी सदुपयोग होईल."

त्या हसून निघाल्या. काही झालं तरी मी पडले उदारमतवादी, त्यांची थोडी तरी सोय बघायला नको का!

त्या गेल्यावर मी थोडा विचार केला, आणि बाहेर जाऊन गाडीचा दरवाजा उघडला. ड्रायव्हर-सीटच्या खालीच पाकीट दिसलं. जगात देव आहे, आणि तिची माझ्यावर कृपा आहे. सकाळी तिनं माझ्या डोक्याला डोकं घासलं तेव्हा मी चालढकल न करता तिला दरवाजा उघडून दिला. तिला म्यांवही करावं लागलं नाही.

---

ऑस्टिनमध्ये आम्ही तसे नवे होते. बऱ्या अर्ध्यानं पाश्चात्त्य पद्धतीनुसार इंटरनेटवरून कुठूनतरी ह्यूमनिस्ट ग्रूपचा पत्ता काढला. मला नोकरी करता येत नव्हती; त्यामुळे नवीन ओळखी वगैरे होण्यासाठी म्हणून मी तिथे काही वेळा गेले होते.

हे लोक बरेचदा कुठल्याशा रेस्टॉरंटच्या पॅटिओवर वगैरे भेटायचे. एक मोठंसं टेबल असायचं. तिथेच पेयपान, चरणं वगैरे व्हायचं. काही लोक तिथेच जेवायचे. गप्पा मारायच्या आणि मग आपापल्या घरी.

मी नयी होते, तेव्हा मी विचारलं. "तुम्ही सगळेच नास्तिक लोक का?". तर एका उतार-मध्यमवयीन स्त्रीनं उत्तर दिलं, "हा नास्तिकांचा गट नाही. आम्ही ह्यूमनिस्ट आहोत." म्हणजे काय, वगैरे प्रश्न मी विचारले नाहीत. कारण नंतर लगेच तिच्यापेक्षा आणखी थोड्या वयस्कर पुरुषानं त्याच्या पेल्यावर काटा मारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि बोलायला सुरुवात केली. तो त्या मीटप गटाचा प्रमुख होता. त्यानं नव्या लोकांचं स्वागत वगैरे केलं. 'आपण ह्यूमनिस्ट आहोत, आणि धार्मिक लोकांच्या वाढत्या प्रभावाचं काही करायला पाहिजे' अशा छापाचं काही तो बोलला. शिवाय, थोड्या वेळानं सगळ्यांनी जागा बदलायच्या आणि नव्या शेजाऱ्यांजवळ बसून त्यांच्याशी गप्पा मारायच्या असं जाहीर केलं.

त्या गटात बरेच वयस्कर लोक होते. एक विद्यार्थीही होता. पण या गटप्रमुखानं, स्टीव्हनं, Austin Judgemental Map दाखवल्यावर त्याच्या भावना दुखावल्या. तो कधीही परत न येण्यासाठी निघून गेला.

ऑस्टिन नकाशा

या लोकांच्या अनेक चर्चा धर्म कसा वाईट आहे, याबद्दल असायच्या. म्हणजे आता इतक्या वर्षांनंतर मला आठवतात त्या चर्चांपैकी. बाकी आठवण्यासारखं काहीच नसायचं. दोनेकदा तिकडे गेल्यावर मी बऱ्या अर्ध्याला म्हणाले, "हे लोक फार बोअर काही गप्पा मारतात. मला त्यात काही रस नसतो. आपल्या वयाचे कुणीच लोक तिथे नसतात. असतात ते बरेचसे म्हातारे लोक. आणि त्यांच्याकडे बोलण्यासाठी फार काही नसतं."

हे त्यानं तिकडे सांगितलं का कसं माहीत नाही. त्याच सुमारास 'ले मिझराब्ल' नावाचा संगीतचित्रपट प्रदर्शित झाला होता. या गटातल्या स्त्रियांनी तिथे एकत्र जायचं आणि 'ह्यू जॅकमनला बघून उसासे टाकायचे' असं ठरवलं. जरा काही बदल म्हणून मीही गेले. सॉरी, नो सॉरी, ह्यू जॅकमनकडे बघून उसासे ... ओक्के!

एकदा तिथे सत्र होतं, आपण निधर्मी का बनलो हे सांगायचं. बऱ्याच लोकांनी पुरुषांनी ख्रिश्चन धर्माची नालस्ती केली. मग मी हात वर केला.

"माझा धर्मावर आणि धार्मिक लोकांवर तसा फारसा आक्षेप नाही. म्हणजे ख्रिश्चन धर्मावर. तुम्ही जी काही वर्णनं सांगत आहात, त्याचा मला काहीच त्रास झालेला नाही. मला माझ्या हिंदू धर्माचाही फार त्रास झालेला नाही. पण मला हिंदू पुरुषांचा काही अंशी उपद्रव झाला आहे. हे लोक जरा उदारमतवादी असते तर मी नास्तिक झाले नसतेही!"

"तुम्ही लोक ज्या काही गोष्टी तक्रारी म्हणून सांगत आहात, घरून धर्माची सक्ती झाली; धर्म स्वीकारला नाही तर नरकात जाल, छापाच्या धमक्या वगैरे, यात काय अडचण आहे. बोलणाऱ्यांना बोलू देत की! कुणीही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात घुसल्याचं तुम्ही सांगत नाही. तुमच्या ओळखीच्या, प्रेमाच्या लोकांच्या खाजगीपणावर धर्म हल्ला करत आहे, असं तुम्ही म्हणत नाही. मग असू देत की धर्म! काय बिघडवलं आहे तुमचं त्यानं?"

"तुम्ही एकजात सगळ्या पुरुषी आणि सुखवस्तू तक्रारी करत आहात. तुमच्या शरीरांवर कुणी हक्क गाजवत नाहीये. ते लोक कुणी उत्क्रांती मानत नाहीत तर काय फरक पडतो, याबद्दल कुणी काही म्हणत नाही आहात...." मी पाच-सात मिनिटं काय ते बोलले असेन. त्यानंतर मी त्या गटात कधीच गेले नाही.

बरा अर्धा त्या गटात कधीमधी जातो. आमच्याकडे एक या नास्तिक लोकांच्या गटाचा कपही आहे. मेटलिक ब्लू रंगाचा, दंडगोल आकाराचा, किमान २०० मिली पेय मावेल इतका मोठा. मला तो कप कुरूप वाटतो. बरा अर्ध्याला आवडतो तो कप. तो वापरतो तो कप नियमितपणे.

या नास्तिक लोकांचा मेळावा साधारण दिवाळीच्या आसपास लास व्हेगासमध्ये भरतो, तिथे तो गेली काही ‌वर्षं जात आहे. 'American Atheist' नावाचं नियतकालिक त्याच्या नावानं घरी येतं. तो ते कधी वाचतानाही दिसत नाही.

२०२२च्या जूनमध्ये अमेरिकी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की गर्भपात हा अमेरिकी स्त्रियांचा घटनादत्त अधिकार नाही. त्यानंतरच्या अंकाच्या मुखपृष्ठावर मोठी बातमी होती. मिसिसिपी राज्यात गाड्यांच्या नंबरप्लेटवर काय तरी देवाचं वाक्य लिहिण्याची सक्ती होती, ती आता असणार नाही!

माझी एक मैत्रीण म्हणते, "स्त्रीद्वेषाच्या बाबतीत सर्वधर्मसमानता आहे." नास्तिक काही निराळे असतील असं का मानायचं?

---

'धर्मामुळे कशी जगात युद्धं होत आहेत; तरीही लोक धर्माचरण सोडत नाहीत' अशा अर्थाचं आवाहन घेऊन 'लेख लिहा' असा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला. तेव्हापासूनच हा विषय डोक्यात होता.

आणखी एका संवादात मला अमेरिकेतले पारंपरिक - गोरे, वंश‌वादी, गरीब, वगैरे - लोक भेटतात का, अशी विचारणा झाली. या दोन्हींमुळे 'ते सगळे सारखेच' हे आठवलं.

field_vote: 
0
No votes yet

त्या गेल्यावर मी थोडा विचार केला, आणि बाहेर जाऊन गाडीचा दरवाजा उघडला. ड्रायव्हर-सीटच्या खालीच पाकीट दिसलं. जगात देव आहे, आणि तिची माझ्यावर कृपा आहे. सकाळी तिनं माझ्या डोक्याला डोकं घासलं तेव्हा मी चालढकल न करता तिला दरवाजा उघडून दिला. तिला म्यांवही करावं लागलं नाही.

सकाळीसकाळी पिसाळलेला जॉर्ज मिकॅश चावला काय? (नास्तिक, स्त्रीलिंगी देवसंकल्पना, मांजरवर्शिप – चेक!)

(नाही, जॉर्ज मिकॅश हा चेक नव्हता; हंगेरियन होता. परंतु ते एक असो.)

बाकी, त्या असल्या कसल्या ग्रूप्समध्ये जाऊन बसायचे म्हणजे, निरुद्योगीपणाचा कळस आहे. नाही, तुमचे एक वेळ ठीक आहे, एच४वर असताना बोले तो सक्तीचा निरुद्योगीपणाचाच काळ, त्यामुळे, तुमची मी एक वेळ त्यावरून मापे काढणार नाही, परंतु... जाऊ द्यात, मला काय त्याचे, म्हणा! नि त्यात ती तसल्या गटांची मेंबरशिप, त्याकरिता लास व्हेगासला जाणे, घरात येणारी मासिके... असो; व्यक्ती तितक्या प्रकृती, आणखी काय?

(मला जरी भरपूर वेळ असता, तरीसुद्धा मी असल्या – किंवा फॉर्दॅट्मॅटर कसल्याच – गटांचा/कल्टांचा सदस्य झालो नसतो. कदाचित I have too much self-respect for that. परंतु, असो. काही लोक अमेरिकेस आल्याआल्या ॲम्वेचे सदस्य बनतात (तरी आजकाल ॲम्वेचे प्रस्थ नगण्य झालेले दिसते.), तर काही जण असल्या कल्टांचे. नाही म्हणजे, असाल तुम्ही नास्तिक. माझे काहीही म्हणणे नाही. (मी स्वत: माझ्या स्वत:च्या तात्कालिक सोयीस अनुसरून स्वत:स ठार नास्तिक, अज्ञेयवादी, किंवा तद्दन आस्तिक यांपैकी काहीही म्हणवू शकतो, परंतु ते एक असो.) परंतु म्हणून लगेच अमेरिकेस आल्याआल्या त्या कोठल्याश्या स्वत:स नास्तिक म्हणवणाऱ्या कल्टाच्या नादी काय म्हणून लागायचे? (त्या कोठल्याश्या अमेरिकन मिशनरी संस्थेच्या नादी लागून रेव्हरंड झालेल्या ना. वा. टिळकांत नि तुमच्यात मग फरक तो काय राहिला?) तुम्ही स्वान्तसुखाय नास्तिक असू शकत नाही? त्याकरिता गटबाजी कशासाठी?)

माझी एक मैत्रीण म्हणते, "स्त्रीद्वेषाच्या बाबतीत सर्वधर्मसमानता आहे." नास्तिक काही निराळे असतील असं का मानायचं?

या दोन्हींमुळे 'ते सगळे सारखेच' हे आठवलं.

नास्तिकता हादेखील शेवटी एक धर्म आहे, हे लक्षात घेतले, की असले प्रश्न पडत नाहीत, की ('ते सगळे सारखेच' यात) काही साक्षात्कार असल्याचे वाटत नाही.

बाकी,

हिंदू नास्तिक शाकाहारी घरांत जन्माला आले असतील तर मुद्दाम मांसमच्छी खाणं; वगैरे.

याचा नास्तिकतेशी खरे तर काहीही संबंध नाही. बोले तो, एखाद्या समाजात पूर्वापार सवयींमुळे सगळेच जर शाकाहारी असले, तर त्यात खरे तर काही गैर नाही. आणि, अशा समाजातल्या एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने शाकाहारी असणे, हेदेखील समजण्यासारखे आहे. (मांसाहार करणेही तितकेच समजण्यासारखे आहे, परंतु येथे तो मुद्दा नाही.) परंतु, अनेकदा, 'ते तसले' खायचे नसते, ते 'घाण' असते, 'आपल्यात' 'तसले' खाण्याची पद्धत नाही, 'तसली' 'आपली' 'परंपरा' / 'तसले' 'आपले' 'संस्कार' नाहीत, ते 'तसले' खाऊ नये असे 'शास्त्र' आहे, असे बिंबविण्याची मायक्रोॲग्रेशने जेव्हा (सकारण किंवा विनाकारण) आप्तस्वकीयांकडून किंवा निकटवर्तीयांकडून होऊ लागतात, तेव्हा बहुतकरून ते त्याविरुद्ध मायक्रोरेबेलियन असते. (म्हणून पारंपरिक हिंदू थेरडेशाहीचा नि:पात होणे महत्त्वाचे आहे.) अन्यथा, कोणी काय खावे नि कोणी काय खाऊ नये, हा ज्याचातिचा वैयक्तिक प्रश्न आहे.

मात्र, या मायक्रोरेबेलियनचा देवाच्या असण्यानसण्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. (कदाचित नास्तिकता हेदेखील एक (असंबद्ध) मायक्रोरेबेलियन असू शकते, याव्यतिरिक्त.)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पुण्यात पोस्टडाॅक असताना तिथेच पचडी करणारा एक मित्र होता. तिसऱ्या वर्षात असेल. तो म्हणे आला तेव्हा भगवा टिळा लावायचा, पूजा करायचा रोज. तिथे पचडी करणाऱ्या, लग्न न केलेल्या लोकांसाठी ज्या खोल्या होत्या त्यांत कसलं पावित्र्य असणार होतं! केरसुणी ठेवायला तिथे पुरेशी जागा नव्हती.

मी तिथे गेले तेव्हा तो नास्तिक बनण्याच्या मार्गावर होता. मग काही काळ रोज मांसाहाराची फेज झाली. आणखी एक बंगाली, मासेखाऊ, आणि ओवाळून टाकलेला पचडी करणारा मित्र या 'बाटग्या'ची चिकार टिंगल करायचा. आणि 'बाटगा'ही आनंदानं स्वतःवर अनेक विनोद ओढवून घ्यायचा. तिथले बहुतेकसे लोक ओवाळून टाकलेले. आस्तिक लोक असले तरीही त्यांना माज करता येण्यासारखी परिस्थितीच नव्हती.

आता हा मित्र सेटी - search for extraterrestrial intelligence - या विषयात बऱ्यापैकी नावाजलेला शास्त्रज्ञ आहे.

या तुलनेत माझा मांसाहार अगदीच रटाळ होता. काही काळ मी चायनीज खाल्लं तर फक्त चिकनवालंच खायचे. मग कावीळ झाली, चायनीजचा नाॅशिया आला आणि माझा मांसाहार बंदच झाला. त्याच पुण्याच्या संस्थेत कँटीनमध्ये मांसाहार देण्यावरून काहीसा बवाल झाला तेव्हा मी मांसाहारी लोकांना जाहीर आणि मराठीतून पाठिंबा व्यक्त केला होता - ॲडमिन आणि कँटिनवाले बहुतेक लोक मराठीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

> आता हा मित्र सेटी - search for extraterrestrial intelligence - या विषयात बऱ्यापैकी नावाजलेला शास्त्रज्ञ आहे.

हे कसं घडतं याबद्दल फारच उत्सुकता आहे. माझ्या समजुतीप्रमाणे extraterrestrial intelligence चा एकही नमुना आत्तापर्यंत सापडलेला नाही. मग ह्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ नाव मिळवण्यासाठी काय करतात? म्हणजे उदाहरणार्थ, अॅन्ड्रोमिडा गॅलॅक्सीत extraterrestrial intelligence कुठेही अस्तित्वात नाही असं संशोधन करून नाव कमावता येतं का? (हा प्रश्न प्रांजळपणेच विचारतो आहे, खवचटपणे नाही.)

‘परिपूर्ण संख्या (perfect numbers)’ नावाच्या एका गणिती क्षेत्राची यामुळे आठवण झाली. उदाहरणार्थ, २८ ह्या संख्येला १,२,४,७ आणि १४ ने भाग जातो. आता १+२+४+७+१४ = २८, म्हणून तिला परिपूर्ण संख्या म्हणतात. तशीच ६ ही देखील परिपूर्ण आहे (कारण १+२+३ = ६). उल्लेखनीय बाब अशी की माणसाला ठाऊक असलेल्या सगळ्या परिपूर्ण संख्या सम आहेत. एकही विषम परिपूर्ण संख्या आत्तापर्यंत सापडलेली नाही. पण ‘odd perfect numbers’ ह्या विषयावर लोकांनी पेपर लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ, एक अब्जापर्यंत (किंवा एक शंकूपर्यँत वगैरे) एकही विषम परिपूर्ण संख्या अस्तित्वात नाही असं सिद्ध केलं तर त्यावर पेपर लिहिता येतो. सेटीचं असंच काही आहे की काय? हे म्हणजे अरब-इस्राएल समस्या सोडवणं शक्य नाही असं सिद्ध करणाऱ्या माणसाला नोबेल पीस प्राईज देण्यासारखं आहे.
----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

माझ्या समजुतीप्रमाणे extraterrestrial intelligence चा एकही नमुना आत्तापर्यंत सापडलेला नाही.

ह्यावरून आठवलं. माझ्या एका (खगोलशास्त्रज्ञ) मित्राला extraterrestrial intelligence ऐवजी extraterrestrial life वर सेटल (SETL) होण्याची इच्छा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादी संख्या परिपूर्ण असण्याच्या निकषांत तिला किमान दोन घटक असणे अपेक्षित आहे काय?

विचारण्याचा मतलब, १ या संख्येला १ हा एकच घटक आहे, आणि त्या घटकांची बेरीज (जर तिला 'बेरीज' म्हणता येत असेल तर) १ आहे. १ या संख्येला परिपूर्ण म्हणता येईल काय?

असल्यास, तुमच्या विषम परिपूर्ण संख्येचे (ट्रिव्हियल) उदाहरण येथेच मिळाले! (चूभूद्याघ्या.)

(परंतु, 'एकही विषम परिपूर्ण संख्या आत्तापर्यंत सापडलेली नाही' या विधानावरून, १ ही संख्या 'परिपूर्ण'च्या निकषांत बहुधा बसत नसावी. (चूभूद्याघ्या.))

--------------------

(अवांतर: त्याचप्रमाणे, १ ही संख्या (माझ्या कल्पनेप्रमाणे) मूळ संख्यांमध्येसुद्धा गणली जात नसावी. १ आणि ती संख्या यांव्यतिरिक्त इतर कोणतेही घटक नसूनसुद्धा! बहुत नाइन्साफ़ी है ये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक वाचनीय लेख.
या महिन्यात भारतात आलात तर बरीच निरीक्षणे करण्याची संधी मिळून अजून विस्तृत लेख लिहिण्याची संधी मिळेल.
या मातृभूमीत परत
यासाठी तरी.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. .
बाकी नास्तिक म्हणजे देव आहे मानणाऱ्या आस्तिक गटाला विरोध करणारा गट असं काही समजतात. पण त्याहीपेक्षा एक मोठा गट आहे तो.
काही बिंबवण्यापेक्षा आहे ते घडले ते सांगणारा लेख आवडतो.
----------------------
हे एक पुस्तक - https://www.goodreads.com/book/show/6943146-nine-lives . वाचलं आहे. संग्रही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकावरच्या रँडम विद्वानांच्या रँडम पोष्टींना उत्तर देण्याची आवश्यकता नसते. (डिफेन्सिव होऊन तर नसतेच नसते.)

----------------------------------------

बाकी, इंग्रजीत better half असे बायकोस म्हणण्याचा प्रघात आहे, नवऱ्यास नव्हे, हे प्रतिपादन चोक्कस आहे. त्याच न्यायाच्या व्याप्तीने, नवरा हा worse half अर्थात वाईट अर्धा ठरावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र अशा उत्तरांमुळे ऐसीची जाहिरात होते! Wink

माझ्या लॅपटॉपवरून ऐसी उघडल्यावर तिथे फेसबुकवरच्या प्रतिक्रिया दिसत नाहीत. मला वेळ असतो तेव्हा मी लॅपटॉपच उघडते. फोनवरून क्वचितच ऐसी उघडते; आणि त्यात हा मोती सापडला! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नवरा हा घराबाहेर worse नसतो.

बसरा मोती असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आस्तिक,नास्तिक , सोज्वळ धार्मिक,कट्टर धार्मिक, एक भाषिक,एक जातीय ,एक धर्मीय, एक प्रांतीय सर्व समूह आहेत.

तत्व ज्ञान ,शुद्ध हेतू,निष्ठा, ह्याचा आणि ह्या सर्व समूहाचा
काडीचा संबंध नाही.
स्व अस्तित्व टिकवण्ासाठी समविचारी समूह असावा लागतो.
सत्ता गाजविण्याची इच्छा माणसाची पुरातन सवय आहे त्या साठी पण समूह च लागतो.
इत्यादी.

फक्त ह्याच असल्या हेतू साठी समूह बनले आहेत.
सर्व प्रकारचे .
ह्या पेक्षा त्याला जास्त किंमत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही भारतात, पक्षी, पुण्यात आलात तर एकदा या विषयावर विक्षिप्त चर्चा करायची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अशा अनेक भित्या अनेक लोकांनी दाखवल्या आहेत; म्हणूनच मी भारतात येणं टाळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(ती कमेंट वाचून स्व. निळू फुलेंची आठवण झाली ("बाई, वाड्यावर या!"), असे लिहिण्याचे मनात आले होते, परंतु (स्वत:च्या) सभ्यतासंकोचास्तव टाळले.)

(बाकी, भारतात येणे टाळण्याची इतर अनेक कारणे विश्वात असू शकतात; मात्र, हे कारण पटले नाही. इतकाही भाव कोणाला देणे उचित वाटत नाही. (अर्थात, मला काय त्याचे, म्हणा!))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा सभ्यपणा फारच रंजक आहे. ही जी तुलना आहे तिचं वर्णन माझ्या एका मित्रानं अफजल खान आणि सध्या राजकारणात कार्यरत असणारी प्रसिद्ध स्त्री असं केलं असतं. या स्त्रीचं नाव तो सहज वापरत असे, पण आता राजकीय धुरळा उडवण्याची इच्छा असल्यामुळे कुठल्याही पक्षातली प्रसिद्ध राजकारणी स्त्री गृहीत धरायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.