लायबेरिया आणि तीन आंधळे

 #लायबेरिया #प्रवासवर्णन #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

लायबेरिया आणि तीन आंधळे

- - नंदन

हा लेख लिहितेवेळी, इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा प्रश्न, ठिणगी-ठिणगी वाहून पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्या निमित्तानं झालेली एकंदरीत चर्चा ही बऱ्याच अब्दुल्लांवर बेगान्या शादीतली ऐसी दीवानगी ओढवून देणारी असली तरी; काही चर्चांतून मात्र, इस्त्रायलच्या निर्मितीमागच्या अधिवासी वसाहतवादी ('सेटलर कोलोनियलिझम') प्रेरणा आणि पाश्चिमात्य राष्ट्रांची, आपल्या भूमीवर प्रश्न निर्माण करणारा एखादा विशिष्ट समूह, येनकेनप्रकारेण जगाच्या सुदूर कोपऱ्यात ढकलून आपण नामानिराळे होण्याचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती याही बाबी पुनश्च अधोरेखित झाल्या आहेत.

ज्यू धर्माच्या लोकांना युरोपाबाहेर त्यांचा स्वतःचा असा एक देश असावा – आणि त्यायोगे त्यांचे, आणि मुख्य म्हणजे आपलेही प्रश्न सुटावेत या विचारांना जसं पहिल्या महायुद्धाच्या सुमारास खतपाणी मिळालं; तसंच, 'बाल्फोर डिक्लरेशन'च्या सुमारे शंभर वर्षांपूर्वी, अमेरिकेचं यादवी युद्ध संपून काही प्रमाणात मुक्तता मिळालेल्या गुलामांसाठी (व 'स्वातंत्र्यात' जन्मलेल्या कृष्णवर्णीयांसाठी)ही एक स्वतंत्र देश असावा, या विचाराने 'अमेरिकन कोलोनायझेशन सोसायटी'च्या स्वरूपात मूळ धरलं. अर्थात ग्रेट ब्रिटननं १८०८ साली, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसवलेली सिएरा लिऑनची वसाहत ही अमेरिकन-प्रेरित लायबेरियाची पूर्वसूरी! या प्रयोगामागच्या बऱ्यावाईट प्रेरणांचा आणि फलनिष्पत्तीचा मागोवा अवधूत बापट यांच्या 'लायबेरियातल्या यादवीचा संक्षिप्त इतिहास' या लेखात अधिक विस्ताराने वाचता येईल. त्याच लेखात उल्लेखलेल्या, लायबेरियाच्या एकाच मार्गावरच्या तीन निरनिराळ्या प्रवासवर्णनांचा ह्या लेखात धावता आढावा घेतला आहे.

* * *

ग्रॅहम ग्रीन हे नाव इंग्रजी साहित्याच्या वाचकांना अपरिचित नसावं. १९०४ साली जन्मलेल्या आणि ८६ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या ग्रीननं विसाव्या शतकातले ब्रिटिश साम्राज्याचे काही चढ, पण बरेचसे उतार अगदी जवळून पाहिले. ग्रीनच्या एक पिढी आधी जन्मलेल्या सॉमरसेट मॉमची लेखनशैली आणि त्याचे वर्ण्यविषय यांचा थोडा प्रभाव ग्रीनच्या लेखनावर दिसतो - पण त्याहीपेक्षा अधिक ब्रिटिश साम्राज्याच्या बदलत्या स्वरूपाचा. दोघेही लोकप्रिय लेखक, पण मॉम स्वतःला विषादमिश्रित विनयानं 'the very top rank of the second rate' म्हणवून घेई - अशा 'लॅमेंटेबल' कंपनीतले! दोघांनीही स्वेच्छेने आणि ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिसला छुपी मदत व्हावी म्हणून अनेक प्रवास केले आणि त्यांदरम्यान भेटलेले लोक आणि आलेले विलक्षण अनुभव यांबद्दल 'मज अंगीच्या अनुभवे, मज वाईट बरवे ठावे' ह्या स्वच्छ भूमिकेने विपुल लेखन केलं. विशेषतः, मॉमपेक्षाही ग्रीनच्या १९५०च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या 'The Quiet American' आणि 'Our Man in Havana' सारख्या कादंबऱ्या त्याच्या, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि हेरगिरीच्या जाणकारीचा पडताळा देतात.

मात्र १९३६ साली प्रसिद्ध झालेलं 'Journey Without Maps' हे पुस्तक ग्रीनच्या लेखनाच्या ह्या टप्प्याच्या बरंच आधीचं - जेमतेम तिशीत, लायबेरियाच्या अंतर्गत भागांत केलेल्या प्रवासावर बेतलेलं. (योगायोग म्हणजे, जोसेफ कॉनरॅडने, त्याच्या वयाच्या तिशीत, तत्कालीन बेल्जियन काँगोत व्यतीत केलेला काळ हा त्याच्या 'हार्ट ऑफ डार्कनेस' ह्या कादंबरीचा प्रेरणास्रोत ठरला)

सर्वस्वी अपरिचित प्रदेशात जाऊन, तिथले नवीन अनुभव घेऊन पाहण्याची असोशी हा, मला वाटतं, मानवी कुतूहलाचाच भाग असावा. काहीएक प्रमाणात, वैयक्तिक पातळीवर आणि एक समाज म्हणून, आर्थिक आणि राजकीय स्थैर्य आल्यावर ह्या कुतूहलाला थोडीफार आत्मशोधाची जोड मिळणंही तसं स्वाभाविकच. 'पूर्वरंग'च्या प्रस्तावनेत पुलंनी आपण आत्मचरित्र आणि प्रवासवर्णन हे दोन्ही प्रकल्प एकाच पुस्तकात पूर्ण केलेत, याची दिलेली कबुली काय किंवा इटली, ऑस्ट्रेलिया वा मलेशियाला जाऊन तत्रस्थ डार्क आणि हँडसम हंकाच्या अवचितप्रेमात पडून आपल्या सुखवस्तू आयुष्यात आलेल्या चहाच्या पेल्यातील वादळांना शमविण्याचा प्रयास करणाऱ्या पाश्चात्त्य ललनांच्या अलीकडे बोकाळलेल्या 'इट, प्रे, लव्ह'च्या अनेक नेटफ्लिक्सावृत्त्या काय – मार्क ट्वेनच्या पुस्तकाचं शीर्षक उधार घेऊन सांगायचं तर या सिंड्रोमाला 'The Innocents Abroad' हे नाव शोभून दिसेल.

वरच्या परिच्छेदातला छद्मीपणा अंमळ बाजूला ठेवून केवळ तथ्यांचा मागोवा घेतला तर असं दिसतं की, लायबेरियाला जाण्यामागे ग्रॅहम ग्रीनचे हेतू बहुपेडी होते. त्याची लेखनकारकीर्द नुकतीच सुरू झाली होती आणि ह्या आगामी प्रवासवर्णनासाठी त्याला प्रकाशकाकडून घसघशीत आगाऊ रक्कम मिळाली होती. शिवाय वर म्हणल्याप्रमाणे जोसेफ कॉनरॅड आणि ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस हेही दोन उत्प्रेरक घटक यामागे कार्यरत होते. कारण काहीही असो, सुस्थितीत असलेल्या ग्रॅहम ग्रीननं आपल्या वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी ज्या देशाचे नकाशेही नीट उपलब्ध नाहीत – अशा ठिकाणी जायचा धाडसी निर्णय घेतला. एका घरगुती कार्यक्रमात त्याने आपल्या चुलतबहिणीलाही याबद्दल विचारलं आणि तिनेही त्याला होकार दिला.

'Journey Without Maps' वाचायला घेतलं की पहिल्या काही पानांतच ग्रीननं हे नेहमीच्या 'वाटेवरचं' प्रवासवर्णन होणार नाही, याची कसून दक्षता घेतली आहे, हे लक्षात येतं. अगदीच स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैली म्हणता येत नसली तरी प्रवासातल्या अनुभवांच्या वर्णनांसोबतच उलगडत जाणारा 'मनाचिये गुंती'चा प्रवासही आहे. भरपूर सामान (त्यात खाणंपिणं, तंबू यांसोबत हॅमक्स, व्हिस्की या गोष्टीही आल्या), ते वाहून न्यायला तीसहून अधिक हमालांचा लवाजमा आणि थेट नकाशे उपलब्ध नसले तरी स्थानिक टोळीप्रमुख, जाणती माणसं आणि गाईड्स ह्यांच्या साहाय्याने ग्रॅहम ग्रीन आणि त्याची चुलतबहीण बार्बरा ग्रीन यांनी १९३५ साली हा प्रवास पूर्ण केला.

नकाशा

वाटेत त्याला भेटलेले अंधश्रद्ध गावकरी, टोळ्यांचे प्रमुख, जादूटोणा करणारे 'डेव्हिल्स' यांसोबतच लायबेरियात स्थिरावलेल्या युरोपीयनांचंही चित्रण या पुस्तकात येतं. हिटलर आणि त्याचा वंशश्रेष्ठत्वाचा सिद्धांत उराशी बाळगणाऱ्या जर्मन मनुष्याशी जशी त्यांची गाठ पडते, तशीच 'इथल्या लोकांच्या पाठीवर हंटर हवा सदैव, नाहीतर ते तुला विकून खातील!' असा वंशद्वेषमिश्रित मित्रत्वाचा सल्ला देणाऱ्या स्थानिक अभिजनांशीही.

पुढचा प्रवास, त्यात बार्बरा आणि ग्रॅहम यांची झालेली चुकामूक, त्यांना प्रवासात आलेल्या अडचणी आणि राष्ट्राध्यक्षांशी घडलेली भेट, सततच्या सहवासाने एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वातल्या खुपू लागलेल्या लहानसहान गोष्टी आणि प्रयत्नपूर्वक टाळलेल्या चकमकी, निसर्गाची वेगवेगळी रुपं आणि त्याचवेळी अंगावर येणारा गर्द, दाट झाडीचा एकसुरीपणा ह्या साऱ्या बाबी मुळातूनच वाचण्याजोग्या आहेत - पण त्या बार्बरा ग्रीनच्या 'Too late to turn back' ह्या पुस्तकात!

बार्बराच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ

आपल्याहून श्रीमंत, सुशिक्षित आणि घराण्याच्या प्रसिद्ध शाखेतला, पण फारशी घसट नसलेला, चुलतभाऊ एका पार्टीत आपल्याला ह्या अतर्क्य प्रवासाबद्दल विचारतो काय आणि आपण शॅम्पेनच्या किंचित प्रभावाखाली असताना त्याला थेट होकार देतो काय – आणि एकदा परतीचे मार्ग खुंटल्यानंतर (Too Late to Turn Back!), निष्ठावंत सैनिकाप्रमाणे दररोजच्या नेमून दिलेल्या कामांना वाहून घेतो काय! हे सारं बार्बरा ग्रीननं फार अभिनिवेशरहित मोकळेपणानं लिहिलं आहे.

आपल्या प्रसिद्ध होऊ घातलेल्या लेखकबंधुबद्दल लिहिताना ती म्हणते :

His brain frightened me. It was sharp and clear and cruel. I admired him for being unsentimental, but 'always remember to rely on yourself,' I noted. 'If you are in a sticky place he will be so interested in noting your reactions that he will probably forget to rescue you.'

लेखनाच्या 'क्राफ्ट'ला वाहून घेतलेल्या आणि त्याबाबत सदैव दक्ष असलेल्या तरुण लेखकाचं हे चित्र अगदी बोलकं आहे. खुद्द ग्रॅहम ग्रीनचं पुस्तक वाचतानाही वाचकाला सूर सापडेपर्यंत थोडा वेळ का लागतो, याचंही उत्तर कदाचित ह्या विधानांत दडलेलं आहे.

ह्या ट्रेकच्या दरम्यान काही दिवसांनी, ग्रॅहम ग्रीनला एका गंभीर आजाराला तोंड द्यावं लागलं. मोहिमेची सूत्रं मग बार्बरानं हाती घेतली. रोज पुढचा मुक्काम कुठे होणार हे बऱ्याचदा नकाशे उपलब्ध नसताना ठरवणं, त्या दिवशी कापायचं अंतर फार असेल तर आढेवेढे घेणाऱ्या नोकरांना राजी करणं आणि मरणासन्न भावाची काळजी घेणं हे तिनं अपरिचित भाषा, लोक आणि प्रदेश या गोष्टींना न डगमगता निभावूनही नेलं. हा प्रसंग काय किंवा तत्पूर्वी एकदा ग्रॅहम आणि बार्बरा ग्रीनच्या तुकड्यांची झालेली चुकामूक काय – एकाच प्रसंगाचा अनुभव घेतलेल्या दोन व्यक्ती त्या गोष्टीकडे कसं वेगवेगळ्या प्रकारांनी पाहतात, याचा मासलेवाईक नमुना यांत आढळून येतो.

मुळातच ग्रॅहम ग्रीनच्या पुस्तकात बार्बराचा उल्लेख नावानिशी फक्त एकदा येतो (आणि पुढल्या तीनेकशे पानांत 'माय कझिन' म्हणून हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच). त्यांची घनदाट जंगलात झालेली चुकामूक गंभीर स्वरूपाची असली, तरी तिचा उल्लेखही अगदी ओझरता येतो. आपल्या आजारात चुलतबहिणीने केलेली शुश्रूषा व दाखवलेली हिंमत या बाबी जवळपास अनुल्लेखितच आहेत - पण साधारण ह्या स्वरूपाचं मुक्त चिंतन पुस्तकात ठिकठिकाणी आढळून येतं :

“The fever would not let me sleep at all, but by the early morning it was sweated out of me. My temperature was a long way below normal, but the worst boredom of the trek for the time being was over. I had made a discovery during the night which interested me. I had discovered in myself a passionate interest in living. I had always assumed before, as a matter of course, that death was desirable.

It seemed that night an important discovery. It was like a conversion, and I had never experienced a conversion before. (I had not been converted to a religious faith. I had been convinced by specific arguments in the probability of its creed.) If the experience had not been so new to me, it would have seemed less important. I should have known that conversions don't last, or if they last at all it is only as a little sediment at the bottom of the brain. Perhaps the sediment has value, memory of the conversion may have some force in an emergency; I may be able to strengthen myself with the intellectual idea that once in Zigi's Town I had been completely convinced of the beauty and desirability of the mere act of living.”

'द थर्ड मॅन'सारख्या शीतयुद्धाच्या आरंभाची नस पकडणाऱ्या चित्रपटाचं व तदनंतर अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांचं लेखन करणाऱ्या ग्रॅहम ग्रीनपेक्षा हा अवतार बराच निराळा आहे.

याउलट बार्बराचा पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश अगदी स्वच्छ आहे. आपण केवळ महिनाभर एका परक्या देशात वावरलो, म्हणजे त्याबद्दल अधिकारवाणीने भाष्य करण्याइतपत माहिती आपल्याला नाही याची विनयपूर्वक जाणीवही तिला आहे (आणि पुस्तकाच्या प्रस्तावनेत तिने स्थानिक लायबेरियनांना संभाव्य त्रुटींकडे सहानुभूतीपूर्वक पाहा, असं साकडंही घातलं आहे) -

Or should the reader have a keen, searching mind and hope to gain great knowledge from this book, let him, too, cast it from him. He will learn nothing new. I confess now that I who undertook this trip so impulsively, returned to England with a deep love in my heart for the beauty of the primitive villages, but remained appallingly ignorant to the end of the wild, untouched nature around me. I was also more interested always in the natives than in the politics of an adolescent government. It was the little everyday things that pleased me most.

एकंदरीतच व्हिक्टोरियन काळातून बाहेर पडू पाहणाऱ्या आणि दुसऱ्या महायुद्धातल्या ब्रिटिश साम्राज्याच्या पडझडीची चाहूल लागण्यापूर्वीच्या काळात तत्कालीन इंग्रजी अभिजनवर्गातील भावी लेखकाचा आपल्या कुटुंबातील स्त्रीसदस्याकडे आणि स्थानिक आफ्रिकी जनतेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कशा कनवाळूपणाच्या, कुतूहलाच्या, शिष्ट अहंमन्यतेच्या आणि बऱ्याचशा romanticized infantilizationच्या (मराठी प्रतिशब्द ब्रिगेड, क्षमस्व!) छटा सामावलेल्या आहेत - याची प्रचीती येण्यासाठी ही दोन्ही पुस्तकं उपयुक्त आहेत!

* * *

याच परिक्रमा-पराक्रमावरचं तिसरं पुस्तक म्हणजे शोधपत्रकार टिम बुचरचं 'Chasing the Devil'. टिम बुचर 'द डेली टेलिग्राफ'चा अनेक वर्षं आफ्रिका विभागप्रमुख (ब्युरो चीफ) होता आणि काँगोतल्या प्रथमदर्शी अनुभवांवर आधारित 'Blood River: A Journey to Africa's Broken Heart' हे त्याचं पुस्तकही प्रसिद्ध आहे.

ग्रॅहम आणि बार्बरा ग्रीनचा लायबेरियाप्रवास १९३५ साली घडला आणि सुमारे सत्तरएक वर्षांनी त्याच मार्गानं, पण बऱ्याच कमी लवाजम्यासह प्रवास करताना आलेले अनुभव बुचरनं ह्या पुस्तकात मांडले आहेत. ह्या कालावधीत अर्थातच बरेच बदल घडले आहेत - आधुनिक सुधारणा, यादवी युद्धं, राजकीय उलथापालथी हे नेहमीचेच यशस्वी कलाकार; पण त्यांव्यतिरिक्त ग्रामीण भागातल्या घरांची बांधणी, त्यांच्यातलं सामानसुमान हेही बदललं आहे. बदलाचा वेग मात्र अनियमित आहे. शहरांचं स्वरूप पूर्णतः बदललं असलं तरी जसजसं लेखक अंतर्भागात जाऊ लागतो – तसतशा त्याला ग्रीनद्वयीच्या पुस्तकातल्या ओळखीच्या खुणा सापडू लागतात.

थोडाफार आफ्रिका खंडावर बेतलेल्या नॉनफिक्शन पुस्तकांचा साचेबद्धपणा आणि काहीकिंचित आत्मस्तुती हे दोन बारके दोष वगळले, तर पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आहे. सॉमरसेट मॉमच्या शब्दांत 'Some people read for instruction, which is praiseworthy...' गटाला नक्कीच आवडेल असं - पण त्याला साहित्यिक मूल्य फारसं नाही. ग्रॅहम आणि बार्बरा ग्रीनच्या आपापल्या पुस्तकांतून त्यांची व्यक्तिमत्त्वं गुणदोषांसहित प्रमाणात उघड होतात; त्या तुलनेनं या पुस्तकाला एक प्रकारचा आधुनिक, चकचकीत बेतशुद्धपणा आहे. (not that there's anything wrong with that!)

* * *

ह्या तीन पुस्तकांतून लायबेरिया किंवा सिएरा लिओनविषयी किती माहिती मिळते, हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवू. पण ह्या पुस्तकांकडे एकत्रितपणे पाहताना त्यातून दोन मुख्य प्रेरणा जाणवतात - त्या वरपांगी विरोधाभासी वाटल्या तरी एका पातळीवर त्या परस्परांशी जुळलेल्या, पूरक आहेत.

पहिली म्हणजे, निग्रहानं न रुळलेली वाट निवडण्याची. 'कोलंबसाचे गर्वगीत' कवितेतली ऐतिहासिक तथ्यं जरी आता #notagedwell क्यॅटॅगरीत मोडत असली तरी, 'नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती' ही आदिम प्रेरणा सनातन आहे. आपापल्या वैयक्तिक मगदुरात मग भले तिला कधी न खाऊन पाहिलेला पदार्थ चाखण्याची मर्यादित परिमिती का न प्राप्त होवो! जाणूनबुजून काहीएक धोका पत्करावा, नवे अनुभव अंगी यावेत, नव्या जागा आणि माणसं पहायला मिळावीत - आणि (कितीही क्लिशे वाटलं तरी), त्यातून स्वतःची नवी ओळख आपल्यालाच पटावी हा तो ध्यास. ग्रीन बंधुभगिनींचे अनुभव याच धर्तीवरचे!१

दुसऱ्या बाजूला, 'महाजनो येन गतः स पन्थाः'च्या धर्तीवरच - पण निराळ्या पाऊलवाटेवर उमटलेल्या पावलांवर स्वतः पावलं टाकून, त्या परप्रकाशी अनुभवांशी आपलीही नाळ प्रत्यक्षात जुळते का, हा पडताळा घेण्याचा खटाटोप. नर्मदापरिक्रमा किंवा 'Camino de Santiago'सारखे धार्मिक अधिष्ठान आणि चिकित्सेचं वावडं असणारे प्रवास निराळे, पण साहित्याच्या क्षेत्रातही अशी उदाहरणं विरळ२ नाहीत. अगदी होमरच्या ओडिसीयसचा डार्डनेल्स ते माल्टा व्हाया सिसिली असा धांडोळा घेणारे वा लायबेरियाची जंगलं तुडवणारे तयारीचे वीर असोत वा दस्तायेव्हस्कीच्या रास्कोलनिकोव्हचा सेंट पीटर्सबर्गमधल्या गल्लीबोळांतला जेमतेम साताठशे पावलांचा, त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रवास गिरवणारे किंवा जेम्स जॉईसच्या लिओपोल्ड ब्लूमच्या डब्लिनमधल्या भटकंतीची पुनरावृत्ती करणारे हौशी पर्यटक असोत - अंततोगत्वा प्रेरणा तीच.

* * *

या दोन निरनिराळ्या, पण परस्परसंबंधित प्रेरणांवर आधारलेली ही तीन पुस्तकं विशाल आफ्रिका खंडाच्या एका लहानशा कोपऱ्याचं आणि त्याहूनही त्यांच्या लेखकांच्या व्यक्तिमत्त्वांचं आणि धारणांचं गुंतागुंतीचं दर्शन वाचकांना घडवतात, हे नक्की!

* * *

१. अर्थात यालाही वसाहतवादी दृष्टिकोनाचा स्पर्श आहेच. 'Half of a Yellow Sun' कादंबरीतला प्राध्यापक ओडेनिग्बो जसा आफ्रिकेतल्या 'शोधांच्या' सनावळीबद्दल उखडतो (व्हिक्टोरिया फॉल्स अमुक साली शोधला गेला) – तसा हा निरीक्षकाच्या स्थानातून उद्भवणाऱ्या दृष्टिकोनाचा आणि तेच स्थान साऱ्यांना लागू पडतं ह्या धारणेचा मामला आहे.

२. इथे 'मराठी साहित्यातील तत्सम उदाहरणांची वानवा' ह्या विषयावर परिसंवादात्मक लिहिण्याचा मोह कटाक्षाने टाळण्यात आलेला आहे – नाही म्हणायला, 'मेघदूता'तील स्थळांचा हवाई मागोवा घेणारा एक 'पायलट स्टडी' काही वर्षांपूर्वी झाला होता.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगला आढावा घेतलात नन्दनराव.
टीम बुचरच्या लिखाणाविषयक आपली मते जुळत नाहीत..पण हरकत नाही, हे असे चालायचेच.

मराठीत यातील पुस्तकांचा परिचय करून दिल्याबद्दल आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टीम बुचरच्या लिखाणाविषयक आपली मते जुळत नाहीत..

तुमचे मत मांडल्यास ते वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ग्रॅहम ग्रीनची सेमी फिक्शन वाटावी अशी वर्णने आहेत. उत्तम भाषेत लिहिलेली अतिशय ग्राफिक वर्णने करणारी.
परंतु त्यात लायबेरिया किंवा सीएरा लिओन ऐवजी गबोन किंवा कॅमेरून अशी देशांची नावे लिहिली असती तरी पुस्तकाच्या वाचनीयतेत फरक पडला नसता. कुठलातरी आफ्रिकेतील मागासलेला देश याव्यतिरिक्त त्यात त्या स्पेसिफिक देशाबद्दल काही आहे असे जाणवत नाही (पुस्तक उत्तम वाचनीय आहेच , तरीही,)
बार्बरा ग्रीनचे पुस्तक हे त्या मानाने तत्कालीन लायबेरियाचे किमान एक युरोपीय दृष्टीने रोखठोक वर्णन तरी करते.
टीम बुचर च्या पुस्तकात ऐतिहासिक (म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून) संक्षिप्त पण परिपूर्ण असा आढावा तर आहेच , शिवाय त्या मार्गावरून गेल्यावरही विद्यमान परिस्थिती अडचणी आणि गेल्या तीसचाळीस वर्षात झपाट्याने बदललेल्या परीस्थितीचा आढावा ही आहे. विश्लेषण ही आहे.
टीम बुचर च्या पुस्तकात लायबेरिया आणि सीएरा लिओन देश थोडेफार समजतात.
हे ग्रीनच्या पुस्तकात अजिबात होत नाही.(हा दोष म्हणून लिहीत नाहीये, तिसरे पुस्तक का उजवे वाटते त्याचे एक कारण म्हणून हे लिहीत आहे)
मी हे दोनचार दिवसात अपडेट ही करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यू धर्माच्या लोकांना युरोपाबाहेर त्यांचा स्वतःचा असा एक देश असावा – आणि त्यायोगे त्यांचे, आणि मुख्य म्हणजे आपलेही प्रश्न सुटावेत या विचारांना जसं पहिल्या महायुद्धाच्या सुमारास खतपाणी मिळालं; तसंच, 'बाल्फोर डिक्लरेशन'च्या सुमारे शंभर वर्षांपूर्वी, अमेरिकेचं यादवी युद्ध संपून काही प्रमाणात मुक्तता मिळालेल्या गुलामांसाठी (व 'स्वातंत्र्यात' जन्मलेल्या कृष्णवर्णीयांसाठी)ही एक स्वतंत्र देश असावा, या विचाराने 'अमेरिकन कोलोनायझेशन सोसायटी'च्या स्वरूपात मूळ धरलं.

एक महत्त्वाचा फरक.

यहुद्यांचा आपला असा देश असावा (नव्हे, आहे!), ही कल्पना काय, किंवा पॅलेस्टाइनचे वसाहतीकरण करून पुढेमागे कदाचित ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याची कल्पना काय, या मुळात खुद्द युरोपीय (अश्कनाझी) यहुदी अभिजनांच्या (पक्षी: त्यांच्यातील ‘विचारवंत’/‘बुद्धिवादी’ मंडळींच्या) कल्पना होत्या, तथा त्यांना आर्थिक पाठबळ देणारी मंडळीसुद्धा त्यांच्यातलीच श्रीमंत मंडळी होती. या कल्पना त्यांच्या मनात तत्कालीन प्रचलित युरोपीय सत्तांनी घुसविलेल्या नव्हत्या; लादलेल्या तर नव्हत्याच नव्हत्या. (किंबहुना, या कल्पना पहिल्या महायुद्धाच्याही पुष्कळ अगोदर, एकोणिसाव्या शतकातच रुजू लागल्या होत्या, नि त्याकरिता सक्रिय प्रयत्नसुद्धा तेव्हापासून सुरू झालेले होते.) नि त्याकरिता, जेथून कोठल्याही प्रकारे मदत मिळू शकेल असे वाटेल, अशा कोणत्याही सूत्राशी वाटाघाटी वा हातमिळवणी करण्याबद्दल कसलाही विधिनिषेध यहुदी गटांतसुद्धा नव्हता. परंतु, महत्त्वाची बाब म्हणजे, या सर्वामागे मुख्यत्वेकरून युरोपीय अश्कनाझी यहुदी समाजामधील अंतःप्रेरणेचा भाग होता; युरोपीय सत्तांनी त्यांना लावलेली फूस वा केलेली सक्ती वा युरोपीय सत्तांचे वसाहतवादी विचार वगैरे घटक हे (निदान द्वितीय महायुद्धोत्तर काळापर्यंत तरी) यात फारसे नसावेत.

याउलट, लायबेरियाच्या वसाहतीकरणाच्या बाबतीत, कृष्णवर्णीयांच्या अंतःप्रेरणेचा वा स्वेच्छेचा भाग या प्रयत्नांमागे कितपत असावा, हे शंकास्पद आहे.

बाकी, ग्रॅहम तथा बार्बरा ग्रीन यांच्या पुस्तकांबाबत: बापटांच्या लायबेरियाविषयीच्या लेखात यांबद्दल वाचल्याने प्रचंड कुतूहल जागृत होऊन ही दोन्ही पुस्तके ॲमेझॉनवरून मागविली आहेत. (दोन्ही पुस्तकांच्या सेकंडहँड प्रती उपलब्ध झाल्याकारणाने, कधीपर्यंत हाती येतात, ते पाहायचे.) अर्थात, या कुतूहलजागृतीकरणामागे, ग्रॅहम ग्रीनच्या लेखनासंबंधीच्या (अत्यल्प का होईना, परंतु) पूर्वानुभवाचाही हात आहेच!

(मात्र, ग्रॅहम ग्रीनच्या एकंदर लेखनाबाबतची माझी धारणा ही काहीशी संमिश्र आहे, हे या ठिकाणी नमूद करणे इष्ट वाटते. उदाहरणार्थ, Our Man in Havana तथा Monsignor Quixote यांच्या मी प्रथमवाचनी प्रेमात पडलो होतो. The Tenth Manनेसुद्धा मनावर पकड घेऊन प्रभाव पाडला होता. मात्र, त्याचे इतर काही लेखन (उदा., The Quiet American. किंवा, The Power and the Glory. किंवा, आता नक्की आठवत नाही, परंतु, May We Borrow Your Husband? हेदेखील पूर्वी कधी हातात पडले होते काय?) हे, का, कोण जाणे, परंतु, इतके रटाळ वाटले, की पहिल्या काही पानांतच कंटाळा येऊन पुढे वाचण्याचा नाद सोडून दिला. (अर्थात, यात माझ्या पिंडाचा भाग बव्हंशी असू शकेल.) आजकाल ग्रॅहम ग्रीनच्या पुस्तकांच्या बाबतीत मी वाचायला/विकत घ्यावीत की घेऊ नयेत, आपल्याला झेपतील की कंटाळवाणी होतील, याबद्दल नेहमीच संभ्रमात/दुग्ध्यात/किंकर्तव्यमूढ असतो. उपरोल्लेखित पुस्तके मागविली आहेत खरी, परंतु ती रंजक ठरतील, या केवळ आशेवर तूर्तास तग धरून आहे. पाहू या काय होते ते. असो चालायचेच.)

——————————

किंबहुना, युरोपीय सत्तांनी, विशेषेकरून इंग्रजांनी, त्यांना कधी जर अनुकूलता दर्शविली असलीच, तर ती फार फार तर केवळ औष्ठ्यसेवा (lip service) होती; ब्रिटनमधील यहुदी समाजास तेव्हा चालू असलेल्या युद्धाकरिता पाठिंबा देण्यासाठी तथा युद्धप्रयत्नांत सहभागी होण्यासाठी उत्तेजन देण्यावर डोळे ठेवून दिलेले ते फार फार तर एक तोंडदेखले आश्वासन होते.१अ (All politics being, of course, local.)

१अ त्याच वेळेस, उस्मानी Ottoman) आधिपत्याखाली असलेल्या अरबांना, त्यांनी उस्मानी अधिसत्तेविरूद्ध उठाव करण्याकरिता उत्तेजन देण्याच्या हेतूने, ‘ते राहात असलेल्या सर्व प्रदेशांत’ त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे आश्वासनही ब्रिटिशांनी दिले होते. हे एकसमयावच्छेदेकरून (१) ब्रिटिशांच्या दुटप्पीपणाचे तथा (२) ब्रिटिश साम्राज्यात कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नसण्याचे सुमधुर तथा मनोहर उदाहरण आहे. तर ते एक असो.

इस्राएलच्या मागणीचा हिटलरी छळाशी नि वंशसंहाराशी अर्थाअर्थी थेट संबंध नाही. फार फार तर ते एक तात्कालिक निमित्त ठरले, इतकेच. (हे कोठल्याही प्रकारे हिटलरी कृत्यांचे वा नाझीवादाचे समर्थन नव्हे.२अ)

२अ हल्ली हे असे डिस्क्लेमर स्पष्टपणे लिहावे लागते. अन्यथा भलभलते आरोप होतात. कालाय तस्मै नमः।

किंबहुना, पुढे उस्मानी साम्राज्याचे विघटन होऊन राष्ट्रसंघाच्या वतीने पॅलेस्टाइनच्या प्रदेशाच्या प्रशासनाची जबाबदारी ब्रिटनच्या शिरावर येऊन पडल्यावर, त्या प्रदेशात यहुदी राज्याचे स्थापन करण्याच्या उद्योगांत कार्यरत असलेल्या एका ‘विचारी’ यहुदी ‘क्रांतिकारी’ (घातपाती) गटाने, कदाचित पॅलेस्टाइनच्या पवित्र भूमीतून ब्रिटिशांना हुसकावून लावून तेथे यहुदी राष्ट्रस्थापनेकरिता मदत मिळू शकेल, अशा ‘विचारा’ने खुद्द हिटलरलासुद्धा मदतीचे आवाहन करणारे पत्र धाडले होते! (हिटलरने अर्थात त्या पत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केले, ही बाब वेगळी.) परंतु, अर्थात, हे येथे फारच अवांतर झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत सहमत न बा.
लायबेरिया आणि ज्यू लोकांचा देश प्रेरणा यात अजिबात साधर्म्य नाही.
कुठल्याही प्रकारचे.
अजून एक. ग्रीन मंडळींची पुस्तके मागवली आहात तसे टीम बुचर चेही जरूर मागवा, असे रेकमेनडेशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षांपूर्वी एका इंग्रज लेखकाने रडियार्ड किप्लिंगच्या पुस्तकांमध्ये उल्लेखलेल्या स्थळांना भेट देऊन एक प्रवासवर्णन लिहिलं होतं. त्याहून हे तिसरं पुस्तक नक्कीच उजवं वाटतंय!

मेरी लुईस प्रॅटच्या "imperial eyes" पुस्तकात युरोपीय प्रवासवर्णनांना एका विशिष्ट प्रकारच्या "third world blues"ने ग्रासलेले आढळते असं एक वाक्य आठवतं. आता थेट संदर्भ हाताशी नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0