आफ्रिकेतील वसाहतकालीन चलन: दृश्यात्मकता आणि इतिहास
आफ्रिकेतील वसाहतकालीन चलन: दृश्यात्मकता आणि इतिहास
- - शैलेन
विषयप्रवेश
युरोपीय वसाहतवादाचा आफ्रिकेशी संबंध इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून यायला लागला. व्यापारी कंपन्या आणि त्यांचे सरकारी व्यवस्थेशी जवळून संबंधित असणारे भागधारक यांच्या पुढाकाराने आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील भूभागांशी जो व्यापार सुरू झाला त्याची परिणती हळूहळू गुलामांच्या व्यापारासारख्या वसाहतवादाशी कुख्यात प्रकारे जोडल्या गेलेल्या ऐतिहासिक घडामोडींमध्ये झाली. पण एकोणिसाव्या शतकात 'नव-वसाहतवाद' नावाने ओळखल्या जाणाऱ्या काळात या घडामोडींचा कळसाध्याय गाठला गेला. अठराव्या शतकापासूनच युरोपात राष्ट्रवादी जाणिवा प्रबळपणे व्यक्त होऊ लागल्या होत्या. या जाणिवांच्या प्राबल्यामुळे युरोपीय देश फक्त आपापल्या राष्ट्राला फायदेशीर होईल असेच व्यापारी धोरण आखू लागले होते. त्यामुळे या राष्ट्रांतल्या व्यापाराला काहीशी खीळ बसू लागली होती. अशा वेळी मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार करणाऱ्या देशांना आफ्रिकेतला भूभाग आणि संसाधने यांची भुरळ पडली. औद्योगिकीकरणामुळे उत्पादित झालेली उत्तम हत्यारे, राष्ट्रवादाची प्रखर जाणीव, ख्रिस्ती तत्त्वज्ञानाचा प्रभाव, गोऱ्या वंशवादाचा वरचष्मा अशा वेगवेगळ्या कारण-परंपरांमुळे युरोपीयांनी आफ्रिका खंड ओरबाडायला सुरुवात केली. या ओरबाडणुकीच्या शर्यतीमुळे या देशांमध्ये आपापसांत वैमनस्य उद्भवू लागण्याची दाट शक्यता निर्माण होऊ लागली. तेव्हा जर्मनीचा महत्त्वाकांक्षी आणि धोरणी चॅन्सलर बिस्मार्क याच्या पुढाकाराने १८८४मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली; आणि त्यात आफ्रिकेच्या 'वाटणी'चे धोरण सर्वानुमते ठरवण्यात आले. यातून आफ्रिका खंडातला 'नव-वासाहतिक' कालखंड सुरू झाला.
बर्लिन परिषद १८८४ (विकिमिडीया कॉमन्स)
या वसाहतवादी व्यवस्थेमुळे आफ्रिकेवर दूरगामी परिणाम झाले. आज आफ्रिकेत राष्ट्र-राज्ये आहेत ती याच वासाहतिक व्यवस्थेचा परिपाक होत. वसाहतवादामुळे 'महासत्ता' ('Metropole') असलेले देश आणि त्यांच्या वसाहती यांच्यात एक 'संस्थात्मक विलगीकरण' उभे राहिले. वसाहतींतल्या स्थानिक रहिवाश्यांना राज्यकर्त्या वर्गाकडून वेगळी वागणूक मिळायला लागली. राज्यकर्त्या वर्गाच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीच्या अंगाने कितीही प्रगती केली तरी वासाहतिक जनतेचे स्थान त्यांच्यापेक्षा निम्न प्रतीचेच राहिले. वासाहतिक संस्थांनी याला हातभार लावला आणि त्या दृढमूल केल्या. पण असे असले तरी वेगवेगळ्या युरोपीय सत्तांनी त्यांचे वासाहतिक धोरण वेगवेगळ्या प्रकारे राबविले हेही तितकेच खरे आहे. फ्रेंच वसाहतकारांवर राज्यक्रांतीतून आलेल्या समता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांचा प्रभाव असल्याने त्यांचा कल आफ्रिकेतल्या वासाहतिक जनतेलाही एका परीने 'फ्रेंच'च मानण्याकडे होता. पण या संदर्भात अर्थातच 'फ्रेंच' म्हणजे नक्की काय, याची गमके सोयीस्करपणे वेगळी होती. वसाहतीतल्या या तथाकथित 'फ्रेंच' जनतेला स्थानिक कारभारात काही स्थान असले तरी खुद्द फ्रान्समध्ये समान नागरिकत्वाचे हक्क नव्हते! ब्रिटिश वसाहतकारांनी तर इतकीही जवळीक बाळगली नाही. त्यांची पद्धत 'अप्रत्यक्ष कारभारा'ची होती. ब्रिटिशांनी आफ्रिकेतल्या जमातींचे पारंपरिक पुढारीच आपल्याकडे वळवून घेऊन त्यांच्या मदतीने स्थानिक कारभार चालवला पण त्यांच्यावर गव्हर्नरसारख्या वासाहतिक सत्ताकेंद्रांचे थेट नियंत्रण ठेवले. व्यापार-उदीम, चलनव्यवहार, परराष्ट्र-संबंध, सैन्य-नियंत्रण अशा महत्त्वाच्या बाबी अर्थातच या वासाहतिक सत्ताकेंद्रांच्या अखत्यारीत होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ही परिस्थिती झपाट्याने बदलली. आफ्रिकेतल्या वसाहतींमध्येही राष्ट्रीय चळवळी राहिल्या आणि अखेरीस वसाहतवादाचा अंत होऊन आफ्रिकेतले देश स्वतंत्र झाले – पण या प्रक्रियेलाही तीसेक वर्षे लागली!
युरोपीय दृश्यकला-संस्कृती आणि आफ्रिकेतला वसाहतवाद
आफ्रिकेतल्या वसाहतवादी घडामोडींचा प्रभाव युरोपातल्या कला-संस्कृतीवर पडला. नव-वसाहतवादाच्या काळात युरोपीय राष्ट्रांकरवी आफ्रिकेची ओरबाडणूक होण्याआधी युरोपीयांनी आफ्रिकेच्या अंतर्भागात केलेल्या सर्वेक्षण-सफरींमुळे या विशाल खंडाचे अंतरंग आहेत तरी कसे याचा थांग हळूहळू त्यांना लागू लागला. याच सफरींच्या माध्यमातून आफ्रिकेतल्या समाजांची त्यांना माहिती मिळू लागली. त्यांच्या जीवनपद्धती, राहणीमान, वगैरे विषय युरोपीय मानववंशशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचे विषय होऊ लागले. अर्थात या ज्ञान-संपादनाच्या तहानेमागे वसाहतवादाचा मोठा हात होता कारण याच ज्ञानातून मानव-संसाधनांचा वापर वासाहतिक फायद्यासाठी कसा करून घ्यावा याची धोरणे वसाहतकारांना आखता आली.
या काळातच आफ्रिकेतल्या लोकांच्या 'कले'चा परिचयही युरोपीयांना मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. या परिचयातून युरोपात आफ्रिकी कलेकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोण निर्माण झाला. या दृष्टिकोनामागेही वासाहतिक धारणांचा मोठा प्रभाव होता. 'महासत्ता' आपल्या वसाहतींकडे कशा पाहत यावर या धारणा उभारल्या होत्या. त्यांच्या दृष्टीने आफ्रिकी जनजीवन टोळीबद्ध, 'रानटी', निम्न-संस्कृत, 'काळे', अशा विशेषणांनी ग्रस्त होते. किंबहुना, वासाहतिक प्रभावातून या लोकांचा 'उद्धार'च होणार आहे या गृहीतकावर युरोपीयांची श्रद्धा होती. (आजही या श्रद्धेचा पुनरुच्चार करणारे महाभाग कुठे कुठे दिसत असतात!)
वसाहतकाळात नाना प्रकारचे युरोपीय व्यावसायिक आफ्रिकेत पोचले. आरोग्यसेवक, धर्म-प्रचारक, शिक्षक, शेतमालक, व्यापारी, प्रशासक अशा विविध प्रकारच्या कार्यात हे युरोपीय सामील होते. या लोकांनी आफ्रिकन 'कला'वस्तूंचे संग्रह करायला सुरुवात केली. या संग्रहांमागे या वस्तूंकडे 'कला' म्हणून बघण्यापेक्षाही 'वैचित्र्यपूर्ण' वस्तू बघण्याकडे या लोकांचा कल होता. याला युरोपीय कलाकारही अपवाद नव्हते. या वस्तू म्हणजे 'कला' नव्हेत, तर या वस्तूंचा आपल्या कलेत वापर करून आपण जी निर्माण करतो ती 'कला', असा त्यांचा गाढ समज होता. हर्बर्ट वॉर्डसारख्या ब्रिटिश कलाकाराच्या लेखनात तो प्रतिबिंबित झालेला दिसतोही. या कलावस्तूंचे आफ्रिकी समाज-जीवनात विवक्षित स्थान होते. पुतळे, हत्यारे, मुखवटे यांसारख्या वस्तू आफ्रिकी समाजांत शेकडो वर्षे ठरावीक प्रकारे वापरल्या जात होत्या. त्यांचा वापर जादूटोणा, राजनैतिक व्यवहार, मान्यतेची किंवा सामाजिक अस्मितेची चिन्हे, लग्नासारखे महत्त्वाचे समाज-व्यवहार अशा वेगवेगळ्या प्रकारे केला जात असे. या उपयोगांतून अशा वस्तूंविषयी आफ्रिकी समाजांत एक वेगळे 'सौंदर्यशास्त्र' निर्माण झाले होते. एका बाजूला 'आदिमते'चे आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला 'वैचित्र्या'चे नाविन्य अशा कचाट्यात सापडलेल्या युरोपीय लोकांना हे सौंदर्यशास्त्र उमगले नाही.
असे असले तरी वासाहतिक आफ्रिकी कलाकुसरीच्या वस्तू, तिथले लोक, त्यांचे वेष, चालीरीती वगैरे गोष्टींचा अंतर्भाव युरोपीय दृश्य-संस्कृतीत होऊ लागला. 'वैचित्र्या'च्या, आणि एकंदरीतच आपण या 'रानटी' लोकांचे कसे 'भले' करत आहोत हे दाखवण्याच्या ओढीतून महासत्ता आपापल्या वसाहतींना 'शो-केस'मध्ये ठेवू पाहणारी मोठमोठी प्रदर्शने भरवू लागल्या. याची सुरुवात ब्रिटनमध्ये १८५१मध्ये झालेल्या 'ग्रेट एक्झिबिशन'पासून झाली. बहुतेक प्रदर्शने महासत्तेचे केंद्र असलेल्या देशांतच होत, पण काही काही प्रदर्शने वसाहतींतही (उदा. १८७९ – सिडनी, १९०२ – हनोई) आयोजित केली गेली. १९३१ साली पॅरिसमध्ये भरलेले 'एक्सपोझेसियों कोलोनीयाल आंत्रनास्योनाल' हे बहुधा यांपैकी सगळ्यात मोठे प्रदर्शन होते. सहा महिने चाललेल्या या प्रदर्शनाची सुमारे ३.३ कोटी तिकिटे विकली गेली! या प्रदर्शनांची पोस्टर्स, हँडबिले, त्यात भाग घेणाऱ्या लोकांसाठी काढलेली पदके, स्मरणिका, खास काढलेले पोस्टेज स्टँप्स या सगळ्यांतून वसाहती, तिथली ठिकाणे आणि लोकजीवन यांचे एक रम्य-धूसर, कलात्मक असे चित्र महासत्तांतल्या आणि वसाहतींतल्या सामान्य जनांसाठी या महासत्तांनी तयार केले. अशा सार्वजनिक उपभोगार्थ निर्माण केलेल्या वस्तूंमुळे युरोपीय 'दृश्य-संस्कृती'मध्ये एक विवक्षित वासाहतिक 'शैली' तयार झाली.
पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय वसाहती प्रदर्शनाचे पोस्टर, १९३१ (विकिमिडीया कॉमन्स)
आफ्रिकेतल्या वासाहतिक चलनावर असणाऱ्या दृश्यांची संदर्भ-संगती आपल्याला या दृश्य-संस्कृती-शैलीच्या पार्श्वभूमीवर अभ्यासाची आहे. प्रख्यात इतिहासकार एरिक हॉब्सबॉम यांनी चलनांवरच्या दृश्यांना 'सार्वजनिक दर्शनोपभोगाचा सर्वांकष आविष्कार' असे म्हटले आहे. चलनी माध्यमे – म्हणजेच आपल्याला सुपरिचित अशा नोटा आणि नाणी – त्यांच्या अंगभूत गुणामुळे लोकांमध्ये 'चालतात', म्हणजेच 'संचरण' करतात. या संचरणामुळे त्यावर असलेल्या दृश्यांचेही आपसूकच संचरण होते. नाणकशास्त्रज्ञ व्हर्जिनिया ह्युईट म्हणतात, "चलनी नोटा या एखाद्या जाहिरात-फलकासारख्या काम करतात आणि म्हणूनच त्यांच्यावरची चित्रे ही सामाजिक किंवा राजकीय भावाशी निगडित असू शकतात." कागदी चलनाचा इतिहास जरी सातव्या-आठव्या शतकाइतका जुना असला तरी त्यावर चित्रात्मक अंकन हे सुमारे अठराव्या शतकापासून अधिक होऊ लागले असे दिसते. नोटा जिथे किंवा ज्यांनी जारी केल्या त्या ठिकाणचे किंवा त्या आर्थिक संस्थेशी निगडित असे काही चित्रण आपल्याला या नोटांवर दिसते.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर बँकिंग आणि तारण-व्यवहार कायद्यात पुष्कळच सुधारणा झाल्याने कागदी चलनावरचा लोकांचा विश्वास वाढीस लागला आणि पैशाच्या व्यवहारात नोटांचा अंतर्भाव अधिकाधिक होऊ लागला. कायदेशीर संरक्षणाबरोबरच छापण्याच्या तंत्रात झालेली प्रगती हीसुद्धा नोटांवरचा विश्वास वाढायला कारणीभूत ठरली; कारण बनावट नोटा तयार करणे हे या तंत्रज्ञानाने अधिकाधिक कठीण करून ठेवले. विसाव्या शतकात तर लोक नोटा सर्रास वापरू लागले आणि कागदी चलन हा धातुमय चलन किंवा नाण्यांइतकाच चलनी माध्यमांचा परिचित आविष्कार बनला.
आफ्रिकेतील वसाहत-पूर्व चलन
वासाहतिक चलनाचा, विशेषतः कागदी चलनाचा, आफ्रिकेतल्या समाजांवर काय परिणाम झाला ते पाहण्याआधी तिथे वसाहतपूर्व काळात काय चलन होते याची थोडी माहिती करून घेऊ. कार्ल पोलान्यी 'पैसा' किंवा 'वित्त' याची व्याख्या कार्यात्मक अंगाने करतात. त्यांच्या मते ज्या वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून, हिशेबी एकक म्हणून, किंमत चुकवण्यासाठी आणि मूल्य-साठा करण्यासाठी अशी चार कार्ये पार पाडण्याकरता वापरता येतात त्या सगळ्या 'पैसा' किंवा 'वित्त' या संज्ञेला पूरक असतात. आफ्रिकेतल्या चलन-पद्धतीचे एक ऐतिहासिक वैशिष्ट्य हे आहे की आफ्रिकेत चलन म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या जात असत. हे चलन-वस्तूंचे वैविध्य आफ्रिकेतले समाज 'पैसा' किंवा 'वित्ता'कडे कसे पाहत याचे द्योतक आहे. वरकरणी पाहता असे वेगवेगळ्या वस्तू चलन म्हणून वापरणे हे आदिमतेचे किंवा मागासलेपणाचे लक्षण वाटू शकते, पण आफ्रिकेतले लोक हे वैविध्य कुशलतेने आणि अनन्यसाधारण मार्गांनी हाताळत ही वस्तुस्थिती आहे. या वस्तूंद्वारे जे मूल्यविनिमय होते ते केवळ एकाच समाजापुरते मर्यादित नसते. अनेकदा या वस्तू-विनिमयामागे लोक-समाजांच्या साखळ्या आणि त्यातून निर्माण होणारे 'संपर्कजाल' (network) कार्यरत असे. आफ्रिकेतले भाषिक, सामाजिक आणि लोकतत्त्वीय (folk culture) फरक पाहता ते समाज हे वैविध्य कसे हाताळत असत याची कल्पना करणेही कठीण व्हावे इतकी ही वस्तूविनिमय पद्धती जटिल होती. या वस्तूंत कापड, मीठ, धातूंची हत्यारे किंवा बांगड्यांसारखी आभूषणे, 'कोला' बिया किंवा ताडाच्या सोपटासारख्या वनस्पतीजन्य वस्तू; कवड्या, शंखशिंपले किंवा पिसांसारख्या प्राणीजन्य वस्तू, गो-धन किंवा अज/मेष-धन म्हणजे खुद्द प्राणी, काचेचे किंवा दगडांचे मणी आणि त्यापासून बनवलेले दागिने, अशा अनेकानेक वस्तूंचा समावेश होत असे. या वस्तू अनेक कारणांमुळे 'मूल्य-गणती'साठी योग्य समजल्या जात. मागणी आणि पुरवठा या नेहमीच्या बाबी तर त्यामागे होत्याच पण त्याचबरोबर विवक्षित सामाजिक कार्ये किंवा परिस्थिती यांत या वस्तूंचे स्थान नक्की काय आहे यावरही या वस्तूंचे मूल्य ठरत असे. कित्येकदा ही कारणे समाजांच्या रचनेत, परंपरेत आणि चलणुकीत खोलवर रुजलेली असत. थोडक्यात हा वस्तू-विनिमय 'आदिम' किंवा 'मागास' अजिबातच नव्हता – पण युरोपीय वासाहतिक दृष्टिकोनाने त्याला तसे ठरवले. १९४९ साली मानववंशशास्त्रज्ञ पॉल एन्झिग यांनी या विनिमय वस्तूंवर लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाच्या नावातच 'Primitive Money' असा शब्दप्रयोग केलेला आहे!
वसाहतपूर्व काळात आफ्रिकेत ज्या वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून वापरल्या जात त्यापैकी विवक्षित म्हणून ब्राँझ वा पितळेच्या 'मनिला' नामक बांगड्या आणि सोन्याच्या धुळीचे वजन करायला वापरली जाणारी वजने या गोष्टींचा विचार करू. या दोन्ही वस्तू पश्चिम आफ्रिकेच्या 'साहिल' म्हणजे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेच्या भागात – म्हणजे आजच्या माली, बुर्किना फासो, नीजेर (पूर्वाश्रमीच्या फ्रेंच वसाहती) आणि नायजेरिया, घाना (ब्रिटिश वसाहती) या भागांत – या वस्तू चलन म्हणून वापरल्या जात.
पितळेची 'ओकपोको' मनिला, उत्तर नायजेरिया (ॲशमोलियन म्युझियम, ऑक्सफर्ड)
'मनिला' शब्द पोर्तुगीज भाषेतून आला असून त्याचा अर्थ बांगडी अथवा पोची असा होतो. पश्चिम आफ्रिकेतले लोक अशा बांगड्या चलन म्हणून वापरत असल्याचे उल्लेख अगदी सोळाव्या शतकातल्या युरोपीय लिखाणांतही सापडतात. वेगवेगळ्या आकाराच्या आणि किंमतीच्या बांगड्यांपैकी घोड्याच्या नालाच्या आकाराच्या आणि टोकांना चपटा आकार दिलेल्या 'म्क्पोरो' किंवा 'ओकपोको' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांगड्या अधिक लोकप्रिय होत्या. आजही कालाबार, एफिक किंवा इबिबियो यांसारख्या स्थानिक आफ्रिकी भाषांत पैशाला 'ओकपोको' हाच शब्द वापरला जातो. या बांगड्यांचा उपयोग सामान्य बाजारी विनिमयापासून ते दंडाची रक्कम भरणे, हुंडा देणे, जादूटोणे करणाऱ्यांचे मानधन म्हणून, किंवा प्रेताबरोबर पुरण्याच्या वस्तू म्हणून अशा अनेक प्रकारे केला जाई. पण याचबरोबर युरोपीय संपर्काबरोबर गुलामांचा व्यापार जसजसा वाढत गेला, तसतसा गुलामांची खरेदी-विक्री करायलाही या मनिला वापरल्या जाऊ लागल्या. सुरुवातीला १२ ते १५ मनिला देऊन एक गुलाम विकत घेता येई. पण लवकरच अटलांटिकपार होणारी शेतजमिनीची वाढ आणि तिथे लागणाऱ्या गुलामांची वाढलेली मागणी, यामुळे या चलनातही 'फुगवटा' निर्माण झाला आणि गुलामांची किंमत ५० मनिलांइतकी वधारली! अठराव्या शतकापासून बर्मिंगहॅम हे या मनिला-निर्मितीचे मोठे केंद्र बनले. इथे औद्योगिक पद्धतीने मनिलांचे उत्पादन सुरू होऊन त्या वासाहतिक पणन-पद्धतीद्वारे आफ्रिकेत पोचायला लागल्या आणि गुलामांच्या व्यापारात महत्त्वाची कामगिरी बजावू लागल्या. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये गुलामगिरी-प्रतिबंधक कायदा झाला आणि गुलामांच्या व्यापारातून ब्रिटनने अंग काढून घेतले. पण तोवर मनिलांचा चलन म्हणून प्रादुर्भाव आणि परिणाम इतका झाला होता की अन्य प्रकारच्या विनिमयांत त्यांचा वापर चालूच राहिला. ब्रिटनमध्ये गुलामी नष्ट झाली तरी पाम तेलाच्या व्यापारासारख्या वासाहतिक अर्थकारणात या चलनाचे स्थान कायम राहिले. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनने नायजेरियात 'आधुनिक' प्रकारचे चलन आणले आणि मनिला चलनातून कायद्याने बाद केल्या.
आजच्या घाना देशाच्या उत्तरेकडे असलेल्या भागात, कोमोए आणि व्होल्टा नद्यांच्या खोऱ्यांत, जी स्थानिक आफ्रिकन राज्ये होती त्यांना 'आकान' राज्ये म्हटले जाते. बोनो, डेन्क्येरा, अक्वामू, फांटे आणि अशान्ते ही ती राज्ये होत. यांपैकी सतराव्या-अठराव्या शतकात अशान्ते राज्याचा विस्तार होऊन ते एक शक्तिमान स्थानिक राज्य म्हणून पुढे आले. युरोपीय-पुरस्कृत गुलामांचा व्यापार हा या राज्याच्या भरभराटीचे एक कारण होतेच, पण उपरोल्लेखित नद्यांमध्ये वाहून येणारी सोन्याची रेव किंवा धूळ हाही या राज्याच्या उत्कर्षाचा एक महत्त्वाचा भाग होता. महत्वाची व्यापारी वस्तू असलेल्या या रेवेचा उपयोग अशान्ते आणि अन्य आकान राज्यांत चलन-विनिमयाची वस्तू म्हणून केला जाऊ लागला. पण अर्थातच, मूल्य-निश्चिती करायला त्या रेवेचे वजन करणे आवश्यक होते. ही रेव सोन्याची असल्याने तिला बरीच अंगभूत किंमत असणे साहजिक होते आणि म्हणूनच चलन म्हणून वापरताना या रेवेच्या अगदी लहान मात्रेचेही वजन करायची आवश्यकता भासे. त्यासाठी संवेदनाक्षम तराजू वापरले जात. रेव तराजूच्या पारड्यांत टाकण्यासाठी विशिष्ट चमचे असत. रेवेचे वजन करायला खास वजने वापरली जात. ही वजने पितळेची असून ओतकाम करून बनवली जात. ती सुरुवातीला साध्या, व्यावहारिक स्वरूपाची होती, पण जसजशी ही चलन-प्रणाली आकान संस्कृतीत रुजत गेली, तसतसे या वजनांचे दृश्यरूप बदलत गेले.
सोन्याच्या रेवेचे वजन करायची वेगवेगळ्या आकारांची वजने, आकान प्रांत, घाना (पिट-रिव्हर्स म्युझियम, ऑक्सफर्ड)
आकान संस्कृतीत बोलीला अनन्यसाधारण महत्त्व होते आणि या भाषांत म्हणी-वाक्प्रचार यांचे प्राचुर्य होते. जो माणूस यांचा यथायोग्य वापर करून उत्तम बोलू शके, त्याला आकान समाजांत मोठा मान असे. गावोगावच्या बाजारांत लोक एकत्र येत आणि तिथे देवघेव, घासाघीस करताना अशा 'हुशार' संभाषणांना वाव मिळे. अर्थात या बाजारांत विनिमयही घडे, किंबहुना बाजारांचे मुख्य उद्दिष्टच ते असते. तिथे घडणाऱ्या म्हणी-वाक्प्रचारप्रचुर संभाषणांचे प्रतिबिंब सोन्याची रेव तोलायच्या वजनांच्या रूपात पडायला लागले. त्या बोलीत येणाऱ्या प्रतिमा, उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी दृश्य स्वरूपात या वजनांच्या रूपात दिसायला लागल्या. ही वजने माणसे, प्राणी, शेतमाल, पिके, झाडेझुडपे अशा वेगवेगळ्या आकारांत आणि घाटांत बनवली जाऊ लागली. विशुद्ध व्यावहारिक उपयोगापलीकडे विशिष्ट सामाजिक स्थान, ओळख, स्तर इत्यादी सूचित करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ लागला. आफ्रिकेतल्या चलन-वैविध्य-परंपरेला अनुसरून ही वजने जन्म, मृत्यू, विवाह अशा विधींत विशिष्ट कारणांसाठी विनिमय-वस्तू म्हणूनही वापरली जाऊ लागली. कौटुंबिक वारसा सांगणाऱ्या वस्तू म्हणून त्यांचे संग्रह होऊ लागले आणि ते पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केले जाऊ लागले. 'ज्या समाजांत लेखी साहित्याची परंपरा नव्हती तिथे अशा वस्तूंमध्ये बद्ध केलेल्या चिन्हात्मक संकेतांतून विकार, विचार आणि आचार यांच्या प्रदर्शनाची आणि संक्रमणाची सोय केली जात असे', असे आफ्रिकन तत्त्ववेत्ते क्वामे अँटनी अप्पिया यांचे मत आहे. व्यवहार, विनिमय, वित्त, चलन, भाषा, सत्ता, मत्ता, संस्कृती इत्यादी बाबींचा संगम साधणाऱ्या या वस्तूंना 'प्रिमिटिव्ह' म्हणणे अगदीच अस्थायी आहे.
धातूच्या बांगड्या किंवा वजने यांबरोबरच कवड्यासुद्धा विनिमयाचे साधन म्हणून आफ्रिकेत सर्वत्र प्रचलित होत्या. 'मोनेटेरिया (सिप्रिया) मॉनेटा' या जातीच्या कवड्या या कामासाठी वापरल्या जात.
निकोलो ग्वालतीएरी याच्या शंख-शिंपल्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकात छापलेले आफ्रिकी चलनी कवड्यांचे चित्र, १७४२ (विकिमिडीया कॉमन्स)
कवड्यांचे उत्पादन आफ्रिकेपासून पुष्कळ दूर असलेल्या मालदीव बेटांत होई. तिथले रहिवासी ज्या प्रकारे कवड्यांचे 'पीक' घेत त्या पद्धतीचे वर्णन इब्न बतूता हा चौदाव्या शतकातला प्रख्यात मोरोक्कन प्रवासी करतो. तिथून या कवड्या सामुद्री व्यापाराच्या जालाद्वारे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच्या अनेक भागांत निर्यात होत. सहारा आणि साहिल प्रदेशांत त्या इजिप्तमार्गे, वाळवंटी कारवानांच्या आणि नीजेरसारख्या नद्यांच्या वाटेने पोचत.
वसाहतवादाचा आफ्रिकेतल्या चलनावर आणि समाजावर झालेला परिणाम
वसाहतपूर्व आफ्रिकेतले जनसमाज विनिमय-माध्यमांतले वैविध्य वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या सामाजिक आणि राजकीय प्रक्रियांद्वारे आणि मार्गांद्वारे हाताळत असत. ठरावीक वस्तूंच्या चलनातच कर आकारणी करणे हा एक मार्ग होता. वस्तूंच्या किमती इतर ठरावीक वस्तूंच्याच तुलनेत नियमित करणे, हा दुसरा मार्ग. चलनात किती पैसा असावा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या वस्तुरूप चलनात किती व्यापार व्हावा, यावर नियंत्रण ठेवले जात असे. वस्तुरूपी नसलेला आणि टांकसाळीत पाडलेला पैसा, म्हणजेच नाणी, आफ्रिका खंडासाठी नवा नव्हता – इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकातही इथिओपियातले आक्सुमाईट राज्य आणि रोमचे मांडलिक असलेल्या मॉरिटेनिया राज्यात स्वतःची नाणी होती. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या, पंधराव्या शतकातल्या किल्वा राज्याचा कारभार स्वतःच्या नाणेरूपी चलनात चालत असे. मात्र हे व्यवहार ठरावीक प्रांतातच मान्य होते; ठरावीक वस्तूंच्या व्यापारासाठी हा पैसा वापरता येत असे. हा पैसा कुणाला वापरता येईल, हे स्थानिक राज्यकर्ते ठरवत असत. चलनात फक्त नाणीच होती असं नाही तर मणी, कापड, धान्य अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तूही होत्या. युरोपीय लोकांनी व्यापार, विशेषतः गुलामगिरीत जुंपलेल्या लोकांचा व्यापार, सुरू केल्यानंतर आफ्रिकी अर्थकारण आणखी गुंतागुंतीचं झाले – युरोपीय माल आणि पैसा ही संकल्पना – अशी देवाणघेवाण सुरू झाली. जिथे युरोपीय लोकांचा थेट संपर्क येत असे, अशा किनारपट्टी आणि जवळच्या प्रांतात त्यांनी आणलेली नाणी चलनात वापरली जात, कारण त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्या आफ्रिकी लोकांना ती परिचित झालेली असत, आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसलेला असे. हे परदेशी पैसे हळूहळू अंतर्भागातही चालायला लागले. नायजेरियामध्ये 'मेक्सिको, पेरू, ब्राझील, चिले, आणि स्पेनची नाणी, ब्रिटिश सोनं-चांदी-तांब्याच्या पैशांच्या जोडीनं खुळखुळू लागली. अमेरिका, फ्रान्स, या देशांचे पैसेही तिथे मालदीव आणि मोझांबिकमधून आलेल्या कवड्यांच्या जोडीने चलनात दिसायला लागले' असे निरीक्षण तिथले अर्थशास्त्रज्ञ वॉल्टर ओफोनागोरो यांनी नोंदवले आहे.
एकोणिसाव्या शतकात वासाहतिक 'महासत्तां'नी त्यांच्या आफ्रिकेतल्या वसाहतींत नवीन चलने आणली आणि त्यासाठी औद्योगिक प्रकारे युरोपात बनवलेली चलनी माध्यमे – म्हणजे यंत्रांनी पाडलेली नाणी आणि आधुनिक प्रतिभूती मुद्रणतंत्राचा वापर करून छापलेल्या नोटा – चलनात आणायला सुरुवात केली. एरिक हेलेनर यांनी हा बदल म्हणजे वासाहतिक शासनांनी आफ्रिकेत घडवलेल्या कमालीच्या महत्त्वपूर्ण संस्थात्मक बदलांपैकी एक होता असे मत मांडले आहे. या निर्णयामागे अर्थशास्त्रीय, राजकीय आणि वैचारिकतेशी संबंधित अशी अनेक कारणे होती. महासत्ता आणि वसाहती यांच्यातल्या परस्पर-विनिमय-व्यवहारावर नियंत्रण ठेवणे सोपे जावे हे एक कारण होते. वसाहतींतून निर्यात घडवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून स्थानिक आर्थिक व्यवहारांची संरचना बदलणे आवश्यक होते. ते या चलन-बदलातून साध्य झाले. ही नवीन चलने बहुशः 'विश्वस्त' (fiduciary) प्रकारची होती म्हणजे त्यांचे दर्शनी मूल्य त्यांच्या अंगभूत मूल्यापेक्षा पुष्कळच जास्त होते. त्यामुळे हे चलन वटवण्यात फायदा होता, जो वसाहतींवर होणाऱ्या खर्चाकडे वळवता येत असे आणि वसाहतींतून होणाऱ्या वित्तशोषणाला साहाय्यभूत ठरत असे.
वासाहतिक चलनांना विनिमय-मूल्याबरोबरच सांकेतिक मूल्यही होते. वसाहतीत एकसमान असा शासकीय अवकाश निर्माण करणे आणि महासत्तेची हुकूमत दाखवणे हे संकेत या चलनांतून दिले गेले. या चलनांचा एक हेतू एकाच महासत्तेच्या वेगवेगळ्या वसाहतींतले वेगळेपण सुस्पष्टपणे दाखवणे हाही होता. त्याचबरोबर, 'रानटी' किंवा 'मागास' अशा आफ्रिकी लोकांना 'सुसंस्कृत' करण्याचे जे विविध उपक्रम वसाहतकाळात राबवले गेले, त्यांचा एक भाग म्हणूनही या चलनांच्या उपयोजनाकडे पाहता येते. वसाहतपूर्व काळातली वस्तूविनिमयाची आफ्रिकी परंपरा वसाहती सत्तांच्या दृष्टीने 'मागासलेली' होती. त्यापेक्षा वासाहतिक शासनांनी आणलेली, नाणी-नोटांच्या माध्यमातून विनिमय करण्याची प्रणाली शासन-पुरस्कर्त्यांना 'आधुनिक' वाटे. आफ्रिकी इतिहासाचे अभ्यासक स्टीव्हन बेयर यांनी नोंदवल्याप्रमाणे फ्रेंच शासनकर्त्यांच्या मते त्यांचे चलन हे पारंपरिक आफ्रिकी चलनापेक्षा 'श्रेष्ठ' होते आणि या चलनाचा संपूर्ण पुरस्कार न करणे म्हणजे एका प्रकारे वसाहती लोकांना सुसंस्कृत करण्याच्या वसाहतवादी हेतूपासून फारकत घेणे असा त्यांचा दृढ समज होता.
पाश्चात्य किंवा 'आधुनिक' प्रकारच्या चलनांच्या आस्थापनेमुळे वसाहतपूर्व आफ्रिकी चलन-परंपरा हळूहळू कोसळून पडली. वसाहतपूर्व आफ्रिकी चलने ही विनिमय-वस्तूंपेक्षा वेगळी आणि महत्त्वाची सामाजिक कार्ये पार पाडत. त्या वस्तूंचा वापर सामाजिक आणि राजकीय स्थान दर्शवण्यासाठी होई. त्यांच्या व्यापारातून आफ्रिकेचे वेगवेगळे भाग आणि तिथले जनसमूह एकमेकांच्या संपर्कात येत. त्यांचा वापर आणि पुनर्वापर सांस्कृतिक प्रकारे होत राहत असे – उदाहरणार्थ, वारसा म्हणून अशा वस्तूंचे हस्तांतरण लग्न किंवा जन्म-विधींमध्ये केले जात असे. जमात किंवा टोळीरूप समाजांत खाजगी मालमत्तेचे नियमन करण्याचे गुंतागुंतीचे नियम आणि चालीरीती या वस्तूंच्या सामाजिक वापरांतून बांधल्या जात. साहजिकच या सामाजिक बाजूंवरही या चलन-परंपरा कोसळण्याचे गंभीर परिणाम झाले. वस्तुमय चलनांच्या मूल्य-वैविध्यावर आधारित असलेल्या गाव-बाजार पातळीवरच्या कर्ज आणि तारण व्यवहारांच्या साखळ्या तुटून पडल्यामुळे हे व्यवहार मोठ्या पेचात आले.
वासाहतिक चलन हे त्याच्या पूर्वसूरींपेक्षा दिसायलाही अतिशय वेगळे होते. त्या चलनाचे रूपच असे होते की, त्यावर विविध प्रकारच्या चित्रणाला वाव होता. विनिमयाचे माध्यम म्हणून नाण्यांची देवघेव लोकांत होते, या गुणाचा आधार घेऊन नाण्यांवर 'प्रचारक' स्वरूपाचे चित्रण करण्याची प्रथा पुष्कळच, म्हणजे नाणेरूप चलनाच्या उगमाइतकी, प्राचीन आहे. या चित्रणातून जे लोकांना सांगिले जात असे ते बहुशः त्या नाण्यांच्या विनिमय-माध्यम म्हणून होणाऱ्या उपयोगाला सहाय्यकारक असे – म्हणजे त्यात हे नाणे कोणी, कुठे, कधी पाडले, ते 'खरे' आणि विश्वासार्ह आहे का, त्याचे मूल्य किती आहे इत्यादी संकेत या नाण्यांच्या चित्रणातून दिले जात. ही माहिती अधोरेखित करण्याचे आणखीही वेगवेगळे संकेत हळूहळू निर्माण होत गेले – उदाहरणार्थ, नाणे पाडणाऱ्या राजाने एखादा विजय प्राप्त केला असेल तर त्या चित्रणातून त्याची शक्ती अधोरेखित होऊन लोकांचा त्या नाण्यावर विश्वासही वाढे. या सगळ्या बाबतींमुळे चलनाला एक 'दृश्यात्मकता' प्राप्त होई, जी अनेक लोकांच्या अभ्यासाचा विषय राहिली आहे. अठराव्या शतकापासून पुढच्या काळात, युरोपीय देशांत राष्ट्रवादाचे आणि क्रांतीचे वारे वाहू लागल्यानंतर, या दृश्यात्मकतेची भिस्त बहुशः राष्ट्रवादी चित्रणांवर रहात गेली. या राष्ट्रवादी चित्रणांमध्ये विवक्षित देशाची राष्ट्र-राज्य म्हणून 'ओळख' कशी सांगता येईल त्यावर भर असे. ही ओळख दाखवण्यात प्रतीक-रूपे, भौगोलिक वैशिष्ट्ये, भूतकालीन 'गौरवशाली' घटना, व्यक्ती, अथवा परंपरा, औद्योगिकीकरणातून प्राप्त होणारी व्यापारी किंवा सैनिकी शक्ती, इत्यादींच्या चित्रणाचा मोठा सहभाग होता. नाण्यांपेक्षाही नोटांवर ही चित्रणे करायला अधिक वाव मिळे, त्यामुळे ही दृश्यात्मकता नोटांच्या बाबतीत अधिक प्रकर्षाने दिसते. या दृश्यात्मकतेचा ऐतिहासिक अभ्यास आणि विश्लेषण हे वसाहतवादासारख्या अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चांगला उजेड पाडू शकतात. असे असले तरी इतिहास-अभ्यासकांचे आणि दृश्यात्मक मानववंशशास्त्रवेत्त्यांचे लक्ष इथे विशेष गेलेले दिसत नाही. नाणकशास्त्रज्ञ व्हर्जिनिया ह्युईट यांनी या अंगाने थोडे लेखन केले आहे, आणि अमेरिकास्थित केनियन अकादमिक वाम्बुई म्वान्गी यांनी केनियातल्या 'माऊ माऊ' चळवळीचा तिथल्या चलनी नोटांच्या दृश्यात्मकतेवर कसा परिणाम झाला, यासंबंधी एक लेख लिहिला आहे.
वासाहतिक आफ्रिकेतील नोटांचे चलन-व्यवहार
वसाहतवादी महासत्तांनी जी नवीन चलने आफ्रिकेत सुरू केली, ती जारी करण्यासाठी आणि त्यांच्या नियमनासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्थाही स्थापन केल्या. यातल्या मुख्य म्हणजे नोटांच्या वटणुकीकरता आवश्यक असणाऱ्या बँका. यातली फ्रेंचांच्या अख्त्यारीतली 'बाँक द सेनेगाल' (Banque de Senegal) ही सगळ्यात जुनी बँक – या बँकेची स्थापना १८५५ साली झाली. १८४८मध्ये फ्रान्समध्ये गुलामगिरी बेकायदेशीर झाल्यानंतर पूर्वाश्रमीच्या गुलामांच्या मालकांना नुकसानभरपाई मिळावी या हेतूने तिची स्थापना करण्यात आली होती. १९०३ साली या बँकेतून 'बाँक द लाफ्रीक ओसिदोंताल' (Banque de l'Afrique Occidentale) उर्फ BAO या बँकेची निर्मिती करण्यात येऊन पश्चिम आफ्रिकेतल्या सर्व फ्रेंच वसाहतींसाठी फ्रँक्सचे चलन जारी करणारी मध्यवर्ती बँक म्हणून या बँकेकडे जबाबदारी देण्यात आली. १९४५ साली महायुद्ध संपले तेव्हा अवमूल्यन होऊन फ्रेंच फ्रॅंकची स्थिती दयनीय झाली होती. या अवमूल्यनाचा तोटा वसाहतींना होऊ नये असे कारण वरकरणी दाखवून BAOने 'कोलोनी फ्रॉन्सेज दाफ्रीक' (Colonies françaises d'Afrique) उर्फ CFA फ्रॅंक या नवीन चलनाची निर्मिती केली. वास्तविक पहाता यामुळे वसाहतींमध्ये फ्रेंच मालाची आयात सोपी होऊन वसाहतींना फ्रान्स सोडून अन्यत्र निर्यात करणे महाग पडणार होते.
१९५५मध्ये BAOचे रूपांतर दोन वेगवेगळ्या 'जारीकरण संस्था' किंवा अँन्स्तीत्यु देमीसियोंमध्ये (Institut d'Emission) झाले. फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो या देशांसाठी एक, आणि फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका आणि कॅमेरून या देशांसाठी एक, अशा या संस्था होत्या. दोन्ही CFA फ्रॅंक हेच चलन काढत. यापैकी पूर्वोक्त संस्था फ्रेंच वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'बाँक सॉन्त्राल देझेता देलाफ्रीक देल्वेस्त' (Banque Centrale des États de l'Afrique de l'Ouest) किंवा BCEAO या नावाने ओळखली जाऊ लागली. दुसऱ्या संस्थेचे अवतरण १९७२ मध्ये 'बाँक देझेता देलाफ्रीक सॉन्त्राल' (Banque des États de l'Afrique Centrale) उर्फ BEACमध्ये झाले. आजमितीला या दोन्ही बँका पूर्वाश्रमीच्या फ्रेंच वसाहती असलेल्या आफ्रिकी देशांत मध्यवर्ती बँका म्हणून कार्यरत आहेत आणि 'CFA फ्रॅंक' याच नावाचे चलन जारी करतात – फक्त त्या नावाचे पूर्णरूप आता 'कॉम्युनॉते फिनॉन्सिएर आफ्रिकेन' (Communauté Financière Africaine) फ्रँक असे धरले जाते. फ्रेंचांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही CFA फ्रँक हे चलन फ्रेंच फ्रॅंकबरोबर पूर्वनियोजित हुंडणावळीच्या दराने 'बांधलेले' होते आणि आजही हे चलन 'युरो' चलनाशी असेच बांधलेले आहे.
पूर्व आफ्रिकेत सोमाली किनाऱ्यावर असणाऱ्या फ्रेंच वसाहतींचे चलन व्यवस्थापन 'बाँक द लँदोशीन' (Banque de l'Indochine) या पूर्वेकडील फ्रेंच वसाहतींचा कारभार बघणाऱ्या बँकेकडे सोपवण्यात आले होते. जिबूती या वसाहतीत या बँकेची शाखा १९०८ साली उघडण्यात आली पण त्याआधीच एक वर्ष या बँकेने तिथे चालवायला नोटा जारी केल्या होत्या.
पोर्तुगीज महासत्तेने १८६४ साली 'बँको नासियोनाल उल्त्रामारिनो' (BNU) या बँकेची स्थापना वसाहतींतले चलन जारी करण्यासाठी केली. १८६५मध्ये लुआंडा (अंगोला), तर १८६८मध्ये साव तोमे ए प्रिन्सीप आणि लुरेन्सो मार्केश (मोझांबिक) इथे बँकेची ऑफिसे उघडण्यात आली. १९२६मध्ये 'बँको दे अंगोला' या नवीन बँकेची स्थापना होऊन अंगोलातले चलन-व्यवहार तिच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आज BNU ही बँक 'काईशा जेराल दे दिप्युतासिओ' या बँकेच्या अधीन असून माकाव या चीनच्या किनाऱ्यावरच्या पूर्वाश्रमीच्या पोर्तुगीज वसाहतीत चलन जारी करते. या बँकेच्या संस्थळावर तिच्या वासाहतिक व्यवहाराचा उल्लेख 'वसाहतींच्या चलनी आणि आर्थिक वातावरणाला यथावकाश 'शिस्त' लावणारा उद्योग' आणि 'बँकेच्या इतिहासातला मैलाचा दगड' अशा गौरवशाली शब्दांत केला आहे!
ब्रिटिश वसाहतींमध्ये जे नवीन चलन आणले गेले त्याच्या व्यवस्थापनाची पार्श्वभूमी आणि पद्धत फ्रेंच आणि वासाहतिक महासत्तांपासून पूर्णपणे वेगळी होती. वर सांगितल्याप्रमाणे ब्रिटिशांनी आफ्रिकेत 'अप्रत्यक्ष' प्रकारे सत्ता राबवली. याच धोरणाला अनुसरून चलनाचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी 'करन्सी बोर्ड' नामक संस्थांची निर्मिती केली. वासाहतिक प्रशासकीय संस्था म्हणून करन्सी बोर्ड्स एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश साम्राज्यात अनेक ठिकाणी कार्यरत झाले. सुरुवात १८४८मध्ये मॉरिशसमध्ये स्थापन झालेल्या बोर्डापासून झाली. मध्यवर्ती बँक आणि करन्सी बोर्ड, या संस्थांच्या प्रशासनांत दोन गुणात्मक फरक आहेत – एक म्हणजे करन्सी बोर्ड हे त्यांची चलने दुसऱ्या एखाद्या 'शक्तिमान' चलनाच्या बदल्यात जारी करत आणि यातल्या हुंडणावळीचा दरही तेच ठरवत. दुसरा फरक म्हणजे करन्सी बोर्ड जिथे कार्यरत असत तिथल्या स्थानिक सरकारी कर्ज किंवा दायित्वांमध्ये (liabilities) गुंतवणूक करत नसत, त्यामुळे त्यांना स्थानिक परतावा मिळत नसे.
ब्रिटिश अखत्यारीत जे करन्सी बोर्ड चालत ते अर्थातच ब्रिटिश पाउंड हे 'शक्तिमान' चलन म्हणून वापरत आणि त्याच्या बदल्यात, ठरावीक दराने वासाहतिक चलन जारी करत. यामुळे वासाहतिक चलनांना स्थिरतेचा फायदा मिळे आणि चलनफुगवट्यासारख्या बाबींपासून त्यांचे संरक्षण होई. पण त्याचबरोबर हेही खरे होते की हुंडणावळीचा दर आणि वसाहतींची स्थानिक वित्तीय धोरणे ही ब्रिटिश सत्ताधारीच ठरवत आणि त्यात स्थानिकांना काही अपवाद सोडल्यास काही स्थान नसे. त्यामुळे आपोआपच वसाहतींतून ब्रिटनशी आणि इतर देशांशी होणारा व्यापार, मालाची आयात-निर्यात, आय-व्ययाची गणिते या सगळ्यावर ब्रिटिशांची अधिसत्ता राही. बहुतेक करन्सी बोर्डांचे व्यवस्थापन लंडनहून केले जाई. तिथे या बोर्डांचे जे तारण आणि मत्ता-व्यवहार होत त्यांचा अभ्यास करून आर्थिक इतिहासकार वदन नरसी यांनी असे दाखवून दिले आहे की, हे व्यवहार वासाहतिक शोषणाचा वस्तुपाठ होते. वसाहतींत चलन जारी करण्यासाठी 'शक्तिमान' चलनाचे जे रोखे वापरले जात त्यांचा तारण-व्यवहार सातत्याने ब्रिटिश साम्राज्याच्या थकबाकी चुकवणे, ब्रिटिश गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, आणि एकंदरीतच ब्रिटिश वासाहतिक सत्तेचे भले करण्यासाठी केला जाई. या रोख्यांची गुंतवणूक मुख्यत्वे कमी परताव्याच्या आणि अल्पकालीन मुदतीच्या व्यवहारांत केली जाई.
स्पॅनिश, इटालियन, जर्मन आणि बेल्जियन वासाहतिक सत्तांचा प्रभाव आफ्रिकेत ब्रिटिश आणि फ्रेंचांइतका मोठा आणि विस्तृत नव्हता, पण त्यांनीही नवीन वासाहतिक चलनाचे प्रयोग आफ्रिकेत केले. पूर्व आफ्रिकेतल्या जर्मन आणि इटालियन अधिपत्याखाली जो प्रदेश आला तिथे चलनात भारतीय रुपयाचे प्राबल्य होते. या परिस्थितीला शेकडो वर्षांची व्यापारी पार्श्वभूमी कारणीभूत होती. या भूभागाचे अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातल्या व्यापारी मार्गांमुळे भारताशी जवळचे संबंध होते, त्यामुळे इथे रुपये चालत. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी झंझिबारच्या सुलतानाकडून रुपयाला अधिकृत चलन म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यातून भारतातल्या ब्रिटिश व्यापाराचा फायदा कसा अधिक होईल त्याकडे लक्ष पुरवले. रुपयाच्या या प्राबल्यामुळे जर्मन पूर्व आफ्रिका आणि इटालियन सोमालिया या देशांत अनुक्रमे 'डॉय्श-ओस्टाफ्रीकानिशं रुपी' आणि 'रुपिया इटालियाना' या रुपयांचे चलन सुरु झाले. जर्मन पूर्व आफ्रिकेचा कारभार सुरुवातीला 'डॉय्श-ओस्टाफ्रीकानिशं गेसेलशाफ्ट' (Deutsch-Ostafrikanische Gesselschaft) उर्फ DOAG ही कंपनी करे. तिच्यातर्फे हे रुपया आणि 'बेसा' उर्फ पैसा असे चलन १८९० साली पहिल्यांदा जारी करण्यात आले. पुढच्याच वर्षी हा कारभार कंपनीच्या हातून जर्मन सरकारने स्वतःच्या हाती घेतला. १९०४ साली 'डॉय्श-ओस्टाफ्रीकानिशं बँक' स्थापन झाली आणि तिने या रुपयांचे कागदी चलनही काढले. इटालियन सोमालियात व्हिन्चेन्झो फिलोनार्दी या हिकमतखोर गृहस्थाने १८९३ साली रुपयाच्या चलनाच्या स्वतःच्या कंपनीच्या खाजगी नोटा काढल्या. १९०९-१०मध्ये ही जबाबदारी 'बांका दितालिया' (Banca d'Italia) या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली.
१८८५ सालच्या बर्लिन परिषदेत बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याला विषुववृत्तीय आफ्रिकेचा मोठा भाग 'मानवतावादी आणि परोपकारी कार्यासाठी' खाजगी मालमत्ता म्हणून बहाल करण्यात आला. इथे लिओपोल्डने 'काँगो फ्री स्टेट' नामक वसाहतीची स्थापना केली. पण प्रत्यक्षात त्याचे तिथले कार्य आणि मानवतावाद किंवा परोपकार यांचा काडीमात्र संबंध नव्हता! किंबहुना, वसाहतवादाचा सगळ्यात नृशंस असा नंगानाच लिओपोल्डने केवळ स्वतःची तुंबडी भरण्यासाठी या काँगोमध्ये घातला. तिथे चालणाऱ्या अत्याचारांची दखल सगळ्या जगाने घेतली. अखेरीस १९०८ साली बेल्जियन संसदेने कायदा पारित करून काँगोची मालकी लिओपोल्डकडून काढून घेतली आणि तिथे बेल्जियन सरकारची वासाहतिक सत्ता स्थापन केली. यानंतर झालेल्या प्रशासकीय घडामोडींचा भाग म्हणून काँगोमध्ये 'बाँक द काँगो बेल्ज' (Banque de Congo Belge) स्थापन करण्यात आली. या बँकेकडून बेल्जियन फ्रँकशी जोडलेले स्थानिक चलन जारी करण्यात आले, जे काँगोच्या स्वातंत्र्यापर्यंत चालू होते. पुढे बँकेचे नाव 'बाँक सॉंत्राल द काँगो बेल्ज ए दु रूआंडा-उरूंडी' असे होऊन काँगोबरोबरच शेजारच्या रूआंडा-उरूंडी वसाहतीचा चलन-व्यवहारही तिच्याकडे सोपवला गेला.
वासाहतिक काळातल्या आफ्रिकेतल्या नोटांची दृश्यात्मकता: फ्रेंच वासाहतिक नोटा
वासाहतिक बँकांनी काढलेल्या नोटांवरची चित्रे आणि आरेखने विविध आणि विवक्षित प्रकारची होती आणि त्यातून एका परीने त्या छापणाऱ्या कंपन्यांची आरेखन-परंपरा आपल्याला दिसते. आफ्रिकी वसाहतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोटांचे मुद्रण मुख्यत्वेकरून खाजगी प्रतिभूती मुद्रणालये करत – उदाहरणार्थ, ब्रॅडबरी विल्किन्सन अँड कंपनी, टॉमस द ला रू, वॉटरलो अँड सन्स, आणि अमेरिकन बँकनोट कंपनी. यांतली शेवटची सोडली तर इतर कंपन्या ब्रिटन-स्थित होत्या. या मुद्रणालयांनी आपली स्वतंत्र धाटणी या कामासाठी वापरली. गुंतागुंतीचे आकृतिबंध, मूल्यांक, चित्रण आणि मजकूर यांचे आरेखन-शैलीतले परस्पर-स्थान; मजकूर आणि आकड्यांची टंक-शैली इत्यादी बाबतींतून अशा धाटणीचे वैशिष्ट्य जाणवते. चित्रणाचे आरेखन करण्याआधी पारंपरिक पद्धतीची जलरंग किंवा तैलरंगातली चित्रे काढली जात आणि त्या चित्रांचे आरेखनात उपयोजन केले जाई. अशी धाटणी निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे या कंपन्यांकडे छपाईसाठी लागणाऱ्या तांत्रिक साधनांनी निर्माण केलेल्या आरेखनांचे वैयक्तिक अभिलेखागार तयार असे, आणि या कलात्मक अभिलेखागारातूनच नवनवीन आरेखनांची निर्मिती केली जाई. या कंपन्यांच्या आरेखनकारांनी कल्पनाशक्ती आणि तांत्रिक कसब यांचा वापर करून यात वेळोवेळी भर घातली; पण आरेखनांची मूळ कला-कल्पना (design brief) आणि अखेरीस अंतिम उत्पादन कसे दिसणार याबद्दलचा शेवटचा शब्द वासाहतिक सत्तांच्या प्रतिनिधींचा असे. या खाजगी कंपन्यांमध्ये कोण कोण आरेखनकार / चित्रकार कार्यरत होते, त्यांची नावे आणि त्यांचे कलात्मक कार्य हे बहुशः अज्ञातच राहिले आहे कारण हा विषयच नोटांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने (बनावटीकरणापासून संरक्षण या अर्थाने) हे कलात्मक अभिलेखागार बाहेरच्या अभ्यासकांना आजही सहज उपलब्ध होत नाही.
फ्रान्समधला नोट-छपाईचा इतिहास मात्र काहीसा वेगळा आहे. एक म्हणजे फ्रेंच नोटांच्या छपाईचे पूर्ण काम (आरेखन ते अंतिम उत्पादन) हे बाहेरच्या कंपन्या करत नसत. ते फ्रान्सच्या 'बाँक द फ्रांस' (Banque de France) या मध्यवर्ती बँकेच्या अखत्यारीतल्या प्रतिभूती मुद्रणालयात केले जाई. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा फ्रान्सवर नाझी जर्मनीची सत्ता होती, तो अल्प कालावधी हा अपवाद. फ्रेंच वसाहतींच्या नोटांचे आरेखन आणि मुद्रणही इथेच होई. किंबहुना, वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यावरही BCEAO, BEAC वगैरे बँकांकडून फ्रेंच-भाषिक आफ्रिकी देशांचे चलन छापायच्या ऑर्डरी याच संस्थेला मिळत राहिल्या.
फ्रेंच नोटांचे कलाकाम आणि आरेखन कोणी केले याची नोंद अनेकदा त्यांच्या कडेच्या भागात घेतलेली दिसते, हे फ्रेंच नोटांचे आणखी एक वैशिष्ट्य. वासाहतिक नोटाही अर्थातच याला अपवाद नाहीत. त्यांच्या कामगिरीची दखल लॅटिन लघुरूपांची विशेषणे लावून घेतलेली असते. उदाहरणार्थ, ज्याने मूळ संकल्पनात्मक आणि चित्रकलेचे काम केले त्यासाठी INV (लॅटिन : invenit), आरेखनाचा आराखडा तयार करणाऱ्यांसाठी DEL (लॅटिन : delineavit), छपाईसाठी साच्यावर किंवा प्लेटवर कोरीवकाम करणाऱ्यांसाठी FEC (लॅटिन : fecit), म्हणजे शब्दशः "त्याने हे तयार केले" इत्यादी. जेव्हा एकच व्यक्ती मूळ कलाकाम आणि आरेखनाचा आराखडा दोन्ही बनवत असे तेव्हाही हे वापरले जात असे. फ्रेंच वासाहतिक नोटा बरेचदा 'बहुदेशीय' प्रकारे छापल्या जात; म्हणजेच, एकच आरेखन एकाहून अधिक वसाहतींसाठी थोडाफार फरक करून वापरले जात असे. यामुळे एकाच व्यक्तीच्या आरेखन आणि कलाकृतींचा प्रसार फ्रेंच वासाहतिक साम्राज्यात त्यांच्या नोट-कलेद्वारे होई.
आफ्रिकेतल्या सुरुवातीच्या फ्रेंच वासाहतिक नोटा आरेखनाच्या दृष्टीने साधारण होत्या; त्यांची आरेखने नेत्राकर्षक नव्हती. मात्र अगदी सुरुवातीपासूनच साचेबंद अशा मानप्रतिमांचे (stereotypes) चित्रण इथेही आढळते. आफ्रिकेतले वन्य-वनस्पती जीवन युरोपीय लोकांना नावीन्यपूर्ण आणि अजब वाटे; त्यामुळे विशेषतः काही वनस्पती आणि पशूंना या डिझाईनांमध्ये विशेष स्थान मिळाले. 'बाँक दु सेनेगाल'ने १८७४मध्ये गियोम-अल्फाँस आरांग उर्फ 'काबासाँ' (Guillame-Alphonse Harang, a.k.a. Cabasson, १८१४-१८८४) याच्या आरेखनांचा वापर करून नोटा जारी केल्या. त्यात स्थानिक लोकांची मानचित्रे मुख्य स्थानी होती आणि त्यांच्या आजूबाजूला पोपट, काकाकुवे, ऊस वगैरे दाखवले होते.
पुष्कळशा आरेखनांमध्ये सिंह, हत्तीसारखे आफ्रिकी वन्य प्राणी घेतलेले दिसतात. अशा चित्रांची परिणती या आरेखनांत एक 'विलक्षण' किंवा 'अनोखे'पण जाणवण्यात झालेले दिसते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही आरेखनांमध्ये आफ्रिकी कापडांमधल्या विणीचे आकारबंध आणलेले दिसतात. कापड वसाहतपूर्व काळात चलन म्हणूनही वापरले जात असे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. काही आरेखनांत स्थानिक लिपी आणि भाषा वापरल्या गेलेल्या दिसतात. फ्रेंच वासाहतिक महासत्ता वसाहतींकडे 'समावेशक' मेहेरनजरेने बघत असे याचे हे आरेखन-घटक द्योतक आहेत. आपण आधीच बघितले की फ्रेंचांच्या वासाहतिक कारभारात वसाहती जनतेशी 'संलग्नता' महत्त्वाची मानली जाई; 'आपण सगळेच फ्रेंच आहोत' या भावनेचा जाणीवपूर्वक परिपोष या दृष्टिकोणात केला जाई. वासाहतिक सत्तेच्या चलनावर स्थानिक भाषांना मिळणारे स्थान हा याच संलग्नतेच्या भावाचा आविष्कार होता.
'बाँक द फ्राँस'ने १९३०च्या दशकात फ्रेंच रंगचित्रकार आणि मूर्तीकार मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ (Maurice-Sébastien Laurent, १८८७ – १९७३) याला आरेखनकार म्हणून नियुक्त केले. त्याची कारकीर्द ही नोटांचे कलाचित्रण या विषयाचा पूर्णपणे कायापालट घडवणारी ठरली. लॉराँचा जन्म नाँसी शहरात झाला आणि तिथेच त्याने कलाशिक्षण घेतले. १९१२च्या 'सालों'मध्ये (वार्षिक कलाप्रदर्शन) त्याला मानपदक मिळाले होते. त्याने बाँक द फ्राँसबरोबर नोट-आरेखक म्हणून १९३०च्या दशकात काम सुरू केले.
लॉराँने १९३४ साली BAOसाठी केलेली चित्रणे आणि आरेखने ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. चित्रणांमध्ये साचेबंद चित्रांपेक्षा व्यक्तिचित्रणांवर त्याने भर दिला. आफ्रिकेतल्या स्थानिक जनतेतली उदाहरणे घेऊन त्याने त्यांना नोटांवर स्थान दिले. उच्च मूल्यांकाच्या दोन नोटा सोडल्या तर चित्रांमध्ये महासत्तेचा दृश्य-संबंध कुठे विशेषतः दिसत नाही. लॉराँची रंग-निवडही लक्षणीय आहे. गुलाबी, पिवळा, लाल, आणि हिरव्या रंगाच्या सौम्य छटा (pastel shades) त्याच्या चित्रणांत प्रामुख्याने दिसतात. या रंगांच्या पार्श्वभूमीवर आफ्रिकी लोकांचा जन्मजात तकतकीत काळा-ब्राँझ रंग एका वेगळ्या प्रकारे उठून दिसतो. पण याच पार्श्वभूमीमुळे उच्च मूल्यांकाच्या नोटांवर आफ्रिकी बायकांबरोबर दाखवलेल्या फ्रेंच महासत्तेचे व्यक्तिरूप असलेल्या 'मारियान' या स्त्रीचे गोरेपणही तितकेच उठून दिसते.
BAO - ५ फ्रँक, १९३४. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
BAO - १०० फ्रँक, १९३६. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
लॉराँने हे लोक सर्वसाधारण आफ्रिकी ग्रामीण सृष्टीचे अंग म्हणून दाखवले आहेत. ते आपल्याला बाजाराला जाताना, कापड विणताना, शिकार करताना, शेतात काम करताना, किंवा बाजारात वस्तूंची विक्री करताना दिसतात. या व्यक्तिचित्रणांचे वैशिष्ट्य म्हणजे यापैकी पुष्कळ जण लॉराँने सन्मुख प्रेक्ष्यात दाखवले आहेत. या विशिष्ट दृश्य-यथार्थतेमुळे हे चित्रण अक्षरशः आपल्या नजरेला भिडते, आणि त्यातून त्या व्यक्तींची जीवनेच्छा जरी व्यक्त होत असली, तरी त्यांचे एक प्रकारे वस्तुकरणही होते. हे लोक आफ्रिकेबद्दलच्या 'आदिम', 'उदात्त वन्यते'च्या (noble savage) साच्यात बद्ध होतात. स्त्रियांचे चित्रण करताना लॉराँ त्यांचा स्तनभार विमुक्तपणे दाखवतो. त्याचबरोबर त्यांचे चित्रविचित्र केशसंभार, दागिने, कपड्यांचे अपुरेपण इत्यादी गोष्टींच्या चित्रणावर लॉराँचा भर दिसतो. अशा चित्रणातून एक विवक्षित 'वासाहतिक एकाग्र-दृष्टी' किंवा 'टक' जाणवते.
BAO - १०० फ्रँक, १९३४. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
BAO - ५ फ्रँक, १९३६. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
लॉराँने त्याच्या चित्रणांत महासत्ता आणि वासाहतिक जन यांच्यातले अनुबंध काहीशा हळुवारपणे दाखवले आहेत. 'मारियान' हे फ्रेंच राष्ट्राचे कल्पित स्त्री-रूप आणि आफ्रिकी लोक यांच्या चित्रणात हे अनुबंध विशेष जाणवतात. १००० फ्रँकच्या नोटेच्या आरेखनात लॉराँने मारियान एका आफ्रिकी आई आणि बाळाला अलगद आलिंगन देताना दाखवली आहे, आणि त्या बाळाने तिचे एक बोट नाजूकपणे त्याच्या लहानशा बोटांत पकडले आहे. ५००० फ्रँकच्या नोटांवर मारियान दोन आफ्रिकी बायकांच्या मधोमध, त्यांच्या खांद्यांवर हात ठेवून उभी आहे. या बायका स्तन उघडे ठेवलेल्या आणि आफ्रिकी दागिन्यांनी मढलेल्या आहेत. याउलट मारियान श्वेतवस्त्रा आणि ग्रीक देवतेच्या परंपरेतली दाखवली आहे. याच नोटेच्या मागच्या बाजूला तंतुवाद्य वाजवणारा आफ्रिकी पुरुष आणि ताडाची झावळी हातात घेतलेली आफ्रिकी स्त्री आहे, ज्यांच्या चित्रणातही ग्रीक देवताचित्रणाचे आफ्रिकी प्रतिबिंब दिसते.
BAO - १००० फ्रँक, १९३७. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
BAO - ५००० फ्रँक, १९४७. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
आफ्रिकी वसाहती लोकांनी दुसऱ्या महायुद्धात दिलेल्या योगदानाची लॉराँ आवर्जून नोंद घेतो. १९४६ साली जारी केलेल्या ५०० फ्रँकच्या नोटेवर त्याने फ्रान्सचा राष्ट्रध्वज हेलावणारी आफ्रिकी स्त्री आणि एका फ्रेंच सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून लढणारे दोन आफ्रिकी सैनिक यांची चित्रणे दाखवली आहेत.
BAO - ५०० फ्रँक, १९४७. आरेखन-सूत्रधार / कलाकार - मॉरिस-सेबास्तिएं लॉराँ
लॉराँच्या चित्रणशैलीचा मोठा प्रभाव फ्रेंच राष्ट्रीय आणि वासाहतिक नोटांवर पडला. त्याची आरेखनशैली – खास करून व्यक्तींवर भर आणि सौम्य रंगच्छटांची पार्श्वभूमी या बाबी – पुढची अनेक दशके फ्रेंच नोटांचा भाग बनली. आफ्रिकेतल्या चलनांत त्याने आणलेल्या वासाहतिक दृश्यमयतेची झलक आपल्याला त्याच्यानंतर नोटांसाठी चित्रणे-आरेखने करणाऱ्या काही कलाकारांच्या कामात दिसते. ऑंरी क्लेमाँ-सेरव्हो (Henri Clément-Serveau १८८६-१९७२) आणि रेमाँ व्होद्यो (Raymond Vaudiau १९१०-१९९५) यांच्या चित्रण आणि आरेखन कामांत ती विशेषेकरून ओळखता येते. व्होद्यो हा केवळ रंगकर्मी कलाकारच नव्हता तर चित्रफितींचा निर्माता आणि मध्य / विषुववृत्तीय आफ्रिकेत मानववंशशास्त्रीय काम करणारा एक शोधक-प्रवासीही होता. क्लेमाँ-सेरव्हो आणि व्होद्यो या दोघांच्याही कामात आपल्याला व्यक्तिचित्रणाबरोबरच आफ्रिकी कलाकुसरीच्या वस्तूंचीही उपयोजना दिसते. या वस्तू आणि आफ्रिकी व्यक्ती यांची चित्रणे यातून सूचित होणाऱ्या 'आदिमते'ला विरोधाभास म्हणून नोटांच्या दुसऱ्या बाजूला अनेकदा औद्योगिक अवजारे, विमानतळ, मालवाहतूक, यांत्रिक शेती इत्यादींची चित्रणे या दोघांनी वापरली. त्यातून वासाहतिक सत्तेने या भागांत 'आधुनिकता' आणली या प्रमेयावर त्यांची श्रद्धा असल्याचे आपल्याला दिसते. विशेष रंजक गोष्ट म्हणजे ज्या कलाकुसरीच्या वस्तूंचे उपयोजन यांनी केले, त्यांपैकी अनेक युरोपातल्या मानवशास्त्रीय संग्रहालयात होत्या; ज्या देशांच्या नोटांवर त्या पाहायला मिळतात, त्या देशांत नव्हत्या. काही वस्तू तर अशा आहेत की, त्यांचा या फ्रेंच वसाहती देशांशी काही संबंधही नव्हता. व्होद्योने तयार केलेल्या एका आरेखनात वापरलेल्या एका 'बेनिन ब्राँझ'चे उदाहरण इथे घेता येईल.
अँन्स्तीत्यु देमीसियों, फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो - १०० फ्रँक, १९५६. आरेखन-कलाकार - ऑंरी क्लेमाँ-सेरव्हो
अँन्स्तीत्यु देमीसियों, फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो - ५०० फ्रँक, १९५६. आरेखन-कलाकार - रेमाँ व्होद्यो
हे सोळाव्या शतकातले शीर्ष-शिल्प इडिया नावाच्या 'ईयोबा' अथवा राजमातेचे आहे. बेनिन हे उत्तर नायजेरियातले आफ्रिकी साम्राज्य – त्याचा साम्राज्यवादी उच्छेद केला तो ब्रिटिशांनी, फ्रेंचांनी नव्हे. त्यावेळी लुटून नेलेली ही ब्राँझची शिल्पे आता जगभरातल्या अनेक संग्रहांत विखुरलेली आहेत. व्होद्योने त्याच्या आरेखनात वापरलेले शीर्ष-शिल्पही ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. वसाहतवादी कारवायांतून झालेल्या लुटीच्या वस्तू त्या त्या देशांना पुन्हा परत द्यायची जी चळवळ गेली काही वर्षे जोमाने चालू आहे, त्या चळवळीत या ब्राँझ शिल्पांना महत्त्वाचे स्थान आहे. ही शिल्पे वसाहतवादी हिंसेचे प्रतीक बनली आहेत. व्होद्योने या शिल्पाच्या बाजूला अर्धनग्न आफ्रिकी शेतमजूर शेतात हाताने काम करताना दाखवले आहेत, आणि नोटेच्या दुसऱ्या बाजूवर व्यवस्थित कपडे आणि दागिने घातलेली एक आफ्रिकी युवती असून तिच्या पार्श्वभूमीला औद्योगिक नांगराचे चित्र आहे. या दोन चित्रणांतून वासाहतिक अनुषंगाने आधुनिकता आणि सुसंस्कृतता आली, हा संकेत इथे स्पष्टपणे दिलेला जाणवतो. व्होद्योने आरेखित केलेल्या या नोटा १९५६ साली फ्रेंच पश्चिम आफ्रिका आणि टोगो या देशांमध्ये कार्यरत असलेल्या 'अँन्स्तीत्यु देमीसियों'ने जारी केल्या, पण १९६० नंतर BCEAO बँकेने काढलेल्या स्वातंत्र्य-पश्चात नोटांवरही हे आरेखन सुरु राहिले.
'ईयोबा' (राजमाता)चे शीर्ष-शिल्प, बेनिन, उत्तर नायजेरिया (ब्रिटिश म्युझियम)
ब्रिटिश आफ्रिकी वसाहतींतल्या नोटा
फ्रेंच नोटा आणि ब्रिटिश नोटा यांच्यातला अगदी ठळकपणे जाणवणारा दृश्यात्मक फरक म्हणजे ब्रिटिश नोटांवर आफ्रिकी व्यक्तींचे चित्रण अभावानेच आढळते. ब्रिटिश पूर्व आफ्रिकेच्या पूर्ण नोट-इतिहासात म्हणजे १९२० ते १९६५ या वर्षांत काढलेल्या एकाही नोटेवर व्यक्तिचित्रण नाही – अपवाद फक्त ब्रिटिश राजा/राणीचा! ब्रिटिश वासाहतिक नोटा बहुशः ब्रिटनस्थित खाजगी कंपन्या छापत असल्याने आणि त्यांच्यावर फ्रेंच नोटांप्रमाणे आरेखनकारांची किंवा चित्रणकारांची नावे आढळत नसल्याने, त्यांचे चित्रण-आरेखन कोणी केले हे केवळ नोटांवरून समजत नाही. ब्रिटिश नोटा जारी करण्याच्या कामात वासाहतिक प्रशासने आणि या कंपन्या यांच्यात मध्यस्थ म्हणून ब्रिटिश सरकारचे 'क्राऊन एजंट्स' हे खाते काम करी. नोटांची आरेखने ठरवण्याचे काम वासाहतिक प्रशासने, नोटा छापणाऱ्या कंपन्या आणि क्राऊन एजंट्स या संस्था डॉ. ए. जे. बुल या सल्लागाराच्या मदतीने करे. हे डॉ. बुलसाहेब 'लंडन काऊंटी कौन्सिल स्कूल ऑफ फोटो एंग्रेव्हिंग अँड लिथोग्राफी' या संस्थेत काम करत आणि नोटांच्या आरेखनांच्या निवडीवर तसेच त्यांच्या विषय-निश्चित्तीवर त्यांचा मोठा प्रभाव होता.
ब्रिटिश वासाहतिक नोटांच्या दृश्यात्मकतेची चिकित्सा आपल्याला या बाबी ध्यानात ठेवून लागते. वेगवेगळ्या प्रतिभूती मुद्रणालयांनी छापल्या असल्या, तरी या समान पार्श्वभूमीमुळे ब्रिटिश नोटांचीही एक बनलेली दिसते. या नोटा वासाहतिक प्रशासने त्यांच्या स्थानिक सार्वजनिक प्रशासनाचा भाग म्हणून जारी करत आणि त्यामुळे त्यांच्यावर काही नैसर्गिक भूदृश्यांचा समावेश केला जात असे. पण असे असले तरीही या नोटांच्या आरेखनांत कुठेतरी ब्रिटनचा संदर्भ येणे आवश्यक होते, कारण अर्थातच या नोटा अद्याप स्वतंत्र राष्ट्र-राज्याकडून जारी केलेल्या नसत. हा संदर्भ दृष्टीबद्ध करण्याच्या काही योजना होत्या. एकोणिसाव्या शतकांतल्या कागदी चलनावर 'ब्रिटानिया'सारखी रूपकात्मक चित्रे दाखवली जात आणि अनेकदा तिच्या आगेमागे विवक्षित वसाहतींतले प्राणी, पक्षी, झाडे इत्यादी दाखवून तिचा या भूभागाशी असलेला संबंध दृष्टिबद्ध केला जाई. विसाव्या शतकात केवळ ब्रिटिश राजाचे चित्र हा संदर्भ जोडायला पुरेसे ठरू लागले. किंबहुना, राजा/राणीचा मुखवटा हा कित्येक वासाहतिक नोटांवरचा ब्रिटिश प्रभुत्व दाखवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे दिसते. वासाहतिक प्रशासनाची मुद्रा किंवा राजचिन्ह हा ब्रिटिश प्रभुत्व दृष्टीबद्ध करण्याचा आणखी एक मार्ग होता. अशी चिन्हे दाखवण्याची ब्रिटिश कागदी चलनाची परंपरा होती. अगदी १८व्या शतकात खाजगी बँकांकडून जारी केलेल्या ब्रिटिश नोटांवरही अशी चित्रणे आपल्याला दिसतात. पण एकोणीस-विसाव्या शतकात आफ्रिकी वसाहतींसाठी पूर्णपणे युरोपियन परंपरेत बसणारी अशी चिन्हे निर्माण केली गेली. ढाल, दोन्ही बाजूंनी ती उचलून धरणारे प्राणी, रिबिनी, झेंडे, लॅटिन भाषेतली बोधवाक्ये वगैरे मिथकीय बाजातून ब्रिटिश अधिसत्ता दृष्टीबद्ध करण्याचे काम ही चिन्हे करत. त्या चिन्हांचे उपयोजन अनेकदा ब्रिटिश वासाहतिक नोटांवर केलेले दिसते.
एवंच, राजा/राणी किंवा राजचिन्हे यांच्याशिवाय ब्रिटिश वासाहतिक नोटांवर जर काही प्रामुख्याने दिसत असेल, तर ते म्हणजे निसर्ग किंवा भूदृश्ये. या भूदृश्यांमुळे (आणि काही वेळा स्थानिक भाषा आणि लिपीच्या उपयोगामुळे) या आरेखनांचा त्या त्या वसाहतींशी यथायोग्य दृक-संदर्भ जोडला जाई. ही दृश्ये बहुशः 'लाँग शॉट' प्रकारची, दुरून तो भूभाग पाहिल्यासारखी आहेत. मोठमोठ्या जलाशयांवर विहार करणाऱ्या लहानशा शीडबोटी, नद्यांची पात्रे, सव्हाना किंवा उष्ण-कटिबंधीय जंगले, धबधबे, अशा चित्रांतून आफ्रिकी भूदृश्यांचे विस्तीर्णत्व आणि त्याचबरोबर महासत्तेपासून त्यांचे अतिशय दूरवर असलेले स्थान या दोन्ही बाबींवर एक प्रकारचे दृग्भाष्य ही चित्रणे करतात. वन्यजीवन हा आफ्रिकेच्या बाबतीत लोकप्रिय असणारा विषय इथेही मोठ्या प्रमाणावर वापरलेला दिसतो.
ऱ्होडेशिया आणि न्यासालँड - १० शिलिंग, १९५७ (लेक न्यासाचे चित्र)
दक्षिण ऱ्होडेशिया - १० शिलिंग, १९५१ (व्हिक्टोरिया फॉल्स)
या सर्व आरेखनांमध्ये आफ्रिकी जनता कुठेच दिसत नाही ही बाब अगदी स्पष्टपणे जाणवते. ब्रिटिशांच्या दक्षिणेकडच्या वसाहतीत, जिथे 'अधिवासी वसाहतवाद' जोरात होता, तिथे तर हे अधिकच स्पष्ट होते. काही अपवादात्मक उदाहरणांत आफ्रिकी लोक दाखवलेले दिसतात; उदाहरणार्थ १९५३ साली ब्रिटिश वेस्ट आफ्रिकन करन्सी बोर्डाने जारी केलेल्या नोटा. पण इथे ते लोक भुईमूग, कोको आणि पाम तेल या नगदी पिकांची शेती करण्याच्या संदर्भात, म्हणजेच वासाहतिक प्रशासनाच्या, आणि पर्यायाने महासत्तेच्या फायद्याची कामे करताना दाखवले आहेत. याहूनही दुर्मीळ म्हणजे वसाहती भूभागाच्या वसाहतपूर्व इतिहासाची दखल घेणारी चित्रणे. याचे एकच उदाहरण आपल्याला दिसते, ते म्हणजे 'ग्रेट झिम्बाब्वे' या साम्राज्याच्या राजधानीचे अवशेष आणि तिथला मनोरा. या अवशेषांचे चित्रण सर्वप्रथम १९३९ सालच्या दक्षिण ऱ्होडेशियाच्या नोटांवर दाखवले गेले. पुढे हेच चित्र ऱ्होडेशिया आणि न्यासालँड या वसाहतींचे संयुक्त चलन असलेल्या १९५६ सालच्या एक पौंडाच्या नोटेवर तसेच साठीच्या दशकात ऱ्होडेशियाने काढलेल्या पाच पौंडाच्या नोटेवरही वापरले गेले. .
ऱ्होडेशिया - ५ पाउंड, १९६४ (ग्रेट झिम्बाब्वेचे अवशेष)
ब्रिटिश वेस्ट आफ्रिका करन्सी बोर्ड - १०० शिलिंग / ५ पाउंड, १९५३. (पाम तेलबियांची शेती)
पोर्तुगीज आणि इतर वासाहतिक चलनांची दृश्यात्मकता
वासाहतिक चलनांवर अनेकदा प्रतीकरूपांचे चित्रण दिसते हे वर सांगितलेच. या प्रतीकरूपांत 'मारियान' किंवा 'ब्रिटानिया' यांच्यासारखी महासत्तांची मानवी आणि 'राष्ट्रवादी' प्रतीकरूपे अधिक प्रमाणावर दिसतात हेही आपण पाहिले. पण अशा प्रतीकरूपांचा विलक्षण आढळ दिसतो तो पोर्तुगीज वासाहतिक चलनावर. पोर्तुगीज महासत्ता आपल्या वसाहतींकडे आणि साम्राज्याकडे एक राष्ट्रीय गौरवाची बाब म्हणून कशी बघे याचे पडसाद आपल्याला या चित्रणात उमटलेले दिसतात. याचे एक कारण म्हणजे पोर्तुगिजांचे आफ्रिकेत जे साम्राज्य होते, ते इतर युरोपीय महासत्तांच्या साम्राज्यांपेक्षा पुष्कळच जुने होते. त्याची पाळेमुळे बर्लिनोत्तर 'ओरबाडणुकी'त नव्हती, तर सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी केलेल्या नाविक दिग्विजयात होती. पोर्तुगीज आफ्रिकेच्या पुष्कळशा नोटा ब्रिटनस्थित ब्रॅडबरी विल्किन्सन या कंपनीद्वारे छापल्या गेल्या आहेत. टॉमस द ला रू या कंपनीकडेही पोर्तुगीज साम्राज्याच्या काही नोटा छापायची कंत्राटे देण्यात आली होती. यामुळे त्यांची आरेखन आणि चित्रण शैली ही पुष्कळशी ब्रिटिश वासाहतिक नोटांशी साधर्म्य दाखवणारी आहे.
या नोटांवर विशेष उठून दिसते ती एका युरोपीय युवतीची प्रतिमा, जी अर्थातच पोर्तुगीज महासत्तेचे प्रतीक आहे. ब्रॅडबरी विल्किन्सनच्या अनामिक आरेखनकारांनी हिचे जे चित्र निर्माण केले आहे त्यात ती जहाजाच्या अग्रभागावर, नांगराच्या दांडीवर बसलेली दाखवली आहे आणि तिच्या पार्श्वभूमीवर एका 'पॅकेट' जहाजाचे चित्रण आहे. त्या जहाजाच्या पलीकडे, क्षितिजाकडे टक लावून ती विचारमग्न स्थितीत बसली आहे. १९५० नंतर द ला रू कंपनीने केलेल्या आरेखनांत अशीच पाठमोरी स्त्री जहाजांच्या एका समूहाकडे पहाते आहे, असे चित्रण आहे. या समूहांत नॉर्स लाँगशिप, कॅरावेल, गॅल्यन, पॅकेट आणि आधुनिक प्रवासी जहाज अशा वेगवेगळ्या काळातल्या नौकांचा समावेश आहे. या चित्रणांचा संदर्भ निश्चितपणे पोर्तुगीजांच्या दर्यावर्दी भूतकाळाशी लावता येतो आणि पोर्तुगीज महासत्ता तिच्या आफ्रिकी साम्राज्याकडे या गौरवशाली भूतकाळाचेच सातत्य म्हणून पाहात असे, ही भूमिका स्पष्ट होते. हे स्त्रीचे प्रतीकरूप आपल्याला अन्य काही नोटांवर आफ्रिकी जनतेकडे 'मातृभावा'ने पाहताना आणि त्यांच्याकडून वसाहतींचे फायदे (वस्तू, पिके, फळे, प्राणी) इत्यादी शालीनपणे स्वीकारताना दिसते.
BNU, अंगोला - १०० एस्क्युडो, १९२१ (जहाजाच्या नांगरावर बसलेली स्त्री)
BNU, पोर्तुगीज गिने - ५० एस्क्युडो, १९७१ (नुनो त्रिस्ताव आणि जहाजांच्या ताफ्याकडे पाहणारी स्त्री)
वासाहतिक इतिहासातले 'हिरो' हे पोर्तुगीज चलनावर अधिक प्रमाणात दिसतात हेही त्यांच्या दृश्यात्मकतेचे एक वैशिष्ट्य आहे. फ्रेंच नोटांवर व्यक्तिचित्रणाचे प्राबल्य असले तरी वासाहतिक प्रशासक किंवा आफ्रिकेतले 'जेते' त्यांच्यावर दिसत नाहीत. नाही म्हणायला एमिल जोंतील या फ्रेंच सेनाधिकाऱ्याचे चित्र आरेखक-कलाकार पॉल म्युनिए याने तयार केलेल्या 'बहुदेशीय' नोटांवर दिसते. जोंतीलने मध्य आणि विषुववृत्तीय आफ्रिकेत फ्रेंच लष्कराच्या मदतीने 'स्वाऱ्या' करून तिथल्या नाठाळ (!) 'रानटी' लोकांना वठणीवर आणले आणि फ्रेंच साम्राज्याची वृद्धी केली.
कॅस सॉंत्राल द ला फ्रांस दुत्रमेर, फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका - २०-फ्रँक, १९४७ (एमिल जोंतील)
पण पोर्तुगीज नोटांवर अगदी पंधराव्या शतकातल्या नुनो त्रिस्ताव, वास्को द गामा अशा दर्यावर्दींपासून एकोणिसाव्या-विसाव्या शतकातले फ्रान्सिस्को द ओलिव्हेईरा कामिसोसारखे धंदेवाईक आणि जोआव अझेवेदो कुटिन्हो किंवा मार्शल आंतोनिओ ऑस्कर कार्मोना यांच्यासारखे वसाहतवादी प्रशासक अशा अनेकांची वर्णी लागलेली दिसते. मोझांबिकमधल्या 'गाझा' राज्याचा राजा न्गुनगुन्हाने याने १८९५मध्ये केलेले बंड चिरडून त्याला हद्दपार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा जनरल मुझीन्यो द अल्बुकर्क हे आणखी एक उदाहरण. BNUच्या नोटांवर आफ्रिकी लोकांचे चित्रण दिसत नाही, पण बँको दे अंगोलाच्या नोटांवर ते दिसते. अर्थात इथेही पोर्तुगिजांचा वरचष्मा आहेच, कारण बहुतेकदा आफ्रिकी लोक हे पोर्तुगीजांनी आणलेल्या धर्मप्रसार, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी 'सुसंस्कृतपणा'च्या आविष्कारांच्या प्रभावाखाली असल्याचे दाखवले आहे. किपलिंगच्या 'white man's burden' या वसाहतवादी वाक्प्रचाराची थेट आठवण करून देणारी ही दृश्ये आहेत. वासाहतिक इतिहासातले काही ठळक टप्पेही या नोटांवर आपल्याला दृश्यरूपात दिसतात. उदाहरणार्थ, डच आणि पोर्तुगीज यांच्यामधल्या युद्धात १६४८ साली लुआंडाचा किल्ला पोर्तुगीजांनी पुन्हा हस्तगत केला, किंवा १८८५ मध्ये 'कबिंडा' या लहानशा वसाहतीचा ताबा घेताना तिथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांशी पोर्तुगीजांनी केलेला 'सिम्युलाम्बुकोचा तह', अशा घटनांची चित्रणे.
बँको दे अंगोला - ५० एस्क्युडो, १९७२ (मार्शल कार्मोना)
BNU, मोझाम्बिक - १००० एस्क्युडो, १९५३ (जनरल मुझीन्यो द अल्बुकर्क)
बँको दे अंगोला - १० अंगोलार, १९४६ (सिम्यूलांबुकोचा तह)
प्रतीकरूपे आणि आफ्रिकी जनजीवन यांची रंजक सांगड आपल्याला बेल्जियन काँगोच्या चलनावर दिसते. इथे आफ्रिकी लोकांबरोबरच वन्यजीवनाचेही फार सुंदर चित्रण केलेले आहे. वासाहतिक काळाच्या अगदी शेवटी, काँगोला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षेच आधी, काढलेल्या काही नोटा सोडल्यास काँगोच्या नोटांवर बेल्जियन राजघराण्याचे कुठतेही चित्रण दिसत नाही. पण या अखेरच्या नोटांवर का होईना, नराधम राजा दुसरा लिओपोल्ड याचे चित्र एकदा तरी आपल्याला दिसतेच! काँगोला स्वातंत्र्य देताना बेल्जियन राजा बोद्वां याने जे भाषण केले त्यात त्याने लिओपोल्डचे गोडवे गायले होते आणि काँगोचे नवनिर्वाचित अध्यक्ष पॅट्रिस लुमुम्बा यांनी त्याचा जागच्या जागी स्पष्ट धिक्कार केला होता ही गोष्ट ध्यानात ठेवता नोटांवरच्या या चित्रणाची तात्कालिकता आपल्या लक्षात येते.
बाँक सॉंत्राल द काँगो बेल्जीक ए दु रूआंडा-उरूंडी - १०० फ्रँक, १९५६ (दुसरा लिओपोल्ड)
पोर्तुगीज आणि ब्रिटिश नोटांप्रमाणेच बेल्जियन काँगो आणि रूआंडा-उरूंडी या त्याला लागून असलेल्या आणखी दोन वसाहतींमध्ये चालणाऱ्या नोटा प्रामुख्याने खाजगी कंपन्या छापत. पण १९३६-३७मध्ये काढलेल्या नोटा याला अपवाद आहेत. त्यांची निर्मिती बेल्जियमच्या राष्ट्रीय बँकेच्या मुद्रणालयात केली गेली होती. या नोटांचे आरेखन बेल्जियन रंगकर्मी आंद्रे आले (André Hallet) याने केले होते तर कोरीवकाम करणारा एन्द्रे होरवाथ हा हंगेरियन / स्लोव्हाकियन शिल्पी होता. १० फ्रँकच्या नोटेवरच्या चित्रणासाठी आलेने त्याच्या 'ला मार्शे आ बुजुम्बुरा' या रंगचित्राचा आधार घेतला होता. त्यात त्याने उरूंडीमधल्या बुजुम्बुरा शहरात भरणाऱ्या आफ्रिकी बाजाराचे मनोज्ञ चित्रण केले आहे. या नोटेच्या मागच्या बाजूवर आफ्रिकी सव्हानाचा गवताळ भूभाग आणि त्यात चरणाऱ्या हरणांचे सुंदर चित्रण केलेले आहे. अशा प्रकारचे वन्यजीवन आणि लोकजीवन यांची विरोधाभासी सांगड घालणारे चित्रण पुष्कळशा आफ्रिकी नोटांवर दिसते, पण इथे एका चित्रकाराची प्रत्यक्ष कृती आणि नोटेच्या आरेखनात तिचे त्याने केलेले उपयोजन जसे दिसते तसे अन्यत्र कुठेच दिसत नाही.
बाँक द काँगो बेल्ज - १० फ्रँक, १९३७. ‘ला मार्शे आ बुजुम्बुरा’ या रंगचित्रावर आधारित आरेखन.कलाकार - आंद्रे आले
उपसंहार
वसाहतवादी युरोपियांनी आफ्रिकेत 'आधुनिक' प्रकारची, म्हणजे यंत्रांनी उत्पादित केलेली, नाणी आणि नोटांसारखी चलन-माध्यमे तसेच नवीन वासाहतिक चलने आणून आफ्रिकेतल्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण चलन-परंपरेचे सपाटीकरण केले. या बदलाचे अत्यंत गंभीर असे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिणाम झाले. वसाहतवादी कार्य-व्यवहारांतून आणि प्रशासन किंवा कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी विषयांच्या अंमलबजावणीतून युरोपीय लोकांची आफ्रिकेबद्दलची जाण आणि जाणीव, दोन्ही घडत गेल्या. या जडणघडणीचे प्रतिबिंब युरोपीय कला-चळवळींत पडले. पण त्यामागे वासाहतिक असमानता आणि शोषण यांची काळी पार्श्वभूमी होती.
वासाहतिक चलनांच्या दृश्यात्मकतेचा अभ्यास हा आपल्याला या बदलामागच्या ऐतिहासिक भूमिकांचे परिशीलन करण्यास उद्युक्त करतो आणि त्याचबरोबर, पुराव्याचे साधन म्हणून सहाय्यभूतही ठरतो. या अभ्यासातून वासाहतिक 'दृश्य-संस्कृती' आणि 'एकाग्रता' किंवा 'टक' (gaze) यांच्याबद्दलचे महत्त्वाचे पुरावे मिळतात. या दृश्यात्मकतेच्या घडणीत वेगवेगळ्या वासाहतिक महासत्तांनी बजावलेल्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. त्यांतून निर्माण झालेल्या चित्रणांतून आपल्याला हे दिसते की, या 'एकाग्रते'चे आयामही वेगवेगळे होते. वाम्बुई म्वांगी यांनी म्हटल्याप्रमाणे चलनाची आरेखने आणि चित्रणे ही त्या-त्या वासाहतिक सरकारच्या 'स्व-प्रतिनिधित्वा'चे तसेच त्या त्या वसाहतींच्या प्रतिनिधित्वाचेही द्योतक ठरतात. फ्रेंच महासत्तेने केलेली वसाहती व्यक्तींची वैचित्र्यपूर्ण चित्रणे, ब्रिटिशांनी आफ्रिकी समाजांबाबत पाळलेली 'अदृश्यता', पोर्तुगीजांनी त्यांच्या चलनाच्या दृश्यात्मकतेत भूतकाळाच्या सातत्यावर आणि साम्राज्य-महासत्ता यांच्यातल्या ऐतिहासिक अनुबंधांवर दिलेला भर या विवक्षित बाबी म्वांगींच्या मताला पोषक आहेत. या दृश्यात्मकतेतून वसाहतवादी युरोपीयांना आफ्रिका खंड म्हणजे 'आदिम', 'विचित्र', 'नैसर्गिक', 'वन्य' आणि 'सुदूर' कसा वाटे असे याचे भान आपल्याला प्राप्त होते. युरोपीय लोक वासाहतिक आफ्रिकेकडे 'सुधारणा'वादी दृष्टिकोनातून कसे बघत याचेही मनोज्ञ दर्शन ही चलनी माध्यमे घडवतात. या 'सुधारणे'चे आणि 'आधुनिकते'चे श्रेय घेण्यासाठी आफ्रिकी समाजांचे मागासपण आणि तथाकथित 'असंस्कृत'पण प्रकर्षाने दाखवायला युरोपीय महासत्ता आफ्रिकी कलावस्तूंचाच वापर करतात. आफ्रिकी वसाहती आणि महासत्ता यांच्यातले विविध प्रकारचे 'अंतर' – सांस्कृतिक, वांशिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि भौगोलिक – संकेतबद्ध करणे हे या दृश्यात्मकतेचे उद्दिष्ट आहे. या दृश्यमयतेच्या मागे कार्यरत असलेली वासाहतिक वैचारिकता आपल्याला त्यांच्या विश्लेषणातून समजता येते, पण अद्याप ही दृश्यात्मकता साध्य करणाऱ्या कलाकारांच्या योगदानाचा अभ्यास म्हणावा तितका झालेला नाही. त्या दृष्टीने भविष्यात अजून प्रयत्न झाले तर या अभ्यासाचे आणखी रंजक कंगोरे प्रकाशात येतील.
(नोटांची चित्रे www.banknoteindex.com आणि www.numizon.com या संकेतस्थळांवरून साभार)
प्रतिक्रिया
लेख आवडला
मांडणी सोपी, ओघवती तरीही सखोल माहिती देणारा लेख आहे.
माझ्या लेखात आफ्रिकेतून पहिल्यांदा शे दोनशे लोकांना पकडून आणणाऱ्या नुनो त्रिस्तावचा उल्लेख आहे. त्याच्या नावाने पोर्तुगीजांनी नोट काढली हे वाचून मौज वाटली.