आफ्रिकेतील भारतीय गुलाम: केप ऑफ गुड होप आणि डच ईस्ट इंडिया कंपनी
आफ्रिकेतील भारतीय गुलाम: केप ऑफ गुड होप आणि डच ईस्ट इंडिया कंपनी.
- - बॅटमॅन
पूर्वपीठिका
गुलामगिरी हे जगाच्या इतिहासातले एक जाचक आणि लज्जास्पद सत्य आहे. लिखित इतिहासाची उत्पत्ती साधारणत: इसपू ३०००च्या आसपासची मानली जाते. तेव्हापासून आजवर जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये कमीअधिक प्रमाणात ही लाजिरवाणी प्रथा चालत आलेली आहे. स्थलकालपरत्वे 'गुलाम' या शब्दाची व्याख्या, त्याला मिळणारी वागणूक, इत्यादी अनेक गोष्टींत अर्थातच फरक आहे. परंतु स्वत:च्या इच्छेविरुद्ध आणि बहुतांशी विनामूल्य इतरांचे काम, तेही वर्षानुवर्षे करावे लागणे, जनावरांसारखी खरेदीविक्री होणे किंवा थेट बळकावले जाणे, ही यांमधील मुख्य साम्यस्थळे होत. जागतिक पातळीवर गुलामगिरीबद्दल बोलायचे तर युरोपीय व अमेरिकन गौरवर्णीयांनी आफ्रिकेतील कृष्णवर्णीय स्त्रीपुरुषांना कसे गुलाम केले आणि पिढ्यानपिढ्या बंधनांत जखडून ठेवले, ही कहाणी काही प्रमाणात ज्ञात आहे. मात्र याच्या तुलनेत भारतीय स्त्रीपुरुषांनाही जगभर कसे नेले गेले, हा तितकाच महत्त्वाचा इतिहास अज्ञातच आहे. प्राचीन काळापासून ही गुलामांची निर्यात अखंड सुरू होती. याचे कैक पुरावे तत्कालीन ऐतिहासिक साधनांत विखुरलेल्या स्वरूपात सापडतात. मात्र वास्को दा गामा भारतात आल्यापासून युरोपीयांची जी अखंड वर्दळ भारतात सुरू झाली, तेव्हापासूनच्या गुलामव्यापाराचे पुरावे अधिक नियमितपणे सापडतात. कैक संशोधकांनी भारताच्या विविध भागांतील गुलाम जगभर कसे नि कुठे नेले गेले, याचा तपशीलवार अभ्यास केलेला आहे. मलबार, कोरोमंडल आणि बंगाल ही भारतातील गुलामांची प्रमुख उत्पत्तिस्थाने. तिथून त्यांना आफ्रिका, अरेबिया, मध्य आशिया, इंडोनेशिया, युरोप, अमेरिका, इ. अनेक ठिकाणी नेले जायचे. 'ऐसी अक्षरे'चा या वर्षीचा दिवाळी अंक आफ्रिकेला वाहिलेला असल्याने सदर लेखात आफ्रिकेतील भारतीय गुलामांचा आढावा घेतला आहे. अधिक नेमकेपणे बोलायचे, तर केप ऑफ गुड होप येथील भारतीय, त्यातही प्रामुख्याने बंगाली गुलामांचा विचार इथे केला आहे, कारण तेथील भारतीय गुलामांमध्ये प्रामुख्याने बंगाल्यांचा भरणा होता.
केप ऑफ गुड होप हे तसे मोक्याचे ठिकाण. पोर्तुगीजांनी भूमध्य समुद्री इस्लामी सत्तांना डावलून भारतापर्यंतचा थेट जलमार्ग सुरू केला तेव्हापासून एक 'फिलिंग स्टेशन' म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची होती. युरोपहून पूर्वेकडे किंवा उलट दिशेने जाणारी सर्व युरोपीय जहाजे इथे थांबत, पिण्याचे पाणी व खाद्यसामान भरून घेत. इ.स. १६५२मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीने केप टाऊन येथे एक लाकडी किल्ला बांधला. हळूहळू काही वर्षांनी त्याचे बांधकाम पक्क्या दगडांनी केले गेले. सुरुवातीच्या वर्षांत या वसाहतीची वाढ म्हणावी तशी झाली नाही. पुढे ह्यूगनॉट पंथीय फ्रेंच लोकांचे आगमन मोठ्या संख्येने होऊ लागल्यावर मात्र लोकसंख्येत वाढ झाली. युरोपीय लोक तिथे शेती करून राहत असत. त्यामुळे स्थानिक खोइ व अन्य जमातीच्या लोकांच्या, तुलनेने भटक्या जीवनशैलीला आवश्यक भूभागांवर निर्बंध आल्याने, त्यांची संख्या किनारपट्टीलगत कमी झाली. या वसाहतीची अर्थव्यवस्था जहाजवाहतूक व शेतीवरच अवलंबून होती. शेतीवर व अन्य कामे करण्यासाठी कैक मजुरांची आवश्यकता होती. ही गरज गुलामांकरवी भागवली गेली. अशा प्रकारे केप ऑफ गुड होपमध्ये गुलामांचा शिरकाव झाला. इ.स. १८०६मध्ये डचांनी ही वसाहत ब्रिटिशांकडे सुपूर्द केली व इ.स. १८३४मध्ये ब्रिटिशांनी अधिकृतरीत्या गुलामगिरी रद्द केली. त्यामुळे सदर लेखात हा इ.स. १६५२ ते इ.स. १८३४पर्यंतचाच कालखंड विचारात घेतलेला आहे.
गुलामांचा व्यापार
सर्वप्रथम हा गुलामांचा व्यापार कसा चालायचा हे पाहू. यात अनेक ठिकाणच्या, अनेक धर्मांच्या व वंशांच्या लोकांचा सहभाग होता. मुघल अधिकाऱ्यांचा यात लक्षणीयरीत्या सहभाग असून यात गुजराती व्यापारीही समाविष्ट होते. मुघल अधिकारी प्रामुख्याने मुसलमान, तर गुजराती व्यापारी प्रामुख्याने हिंदू आणि युरोपीय हे ख्रिश्चन होते. याखेरीज युरोपीय कंपन्या आणि आफ्रिका व इंडोनेशिया येथील कैक सत्ताधीश व लुटारूही या धंद्यात होते. डच कंपनीच्या सदस्यांना यात खाजगीरीत्या सहभागाची परवानगी नव्हती. तशीही त्यांना कोणत्याही प्रकारच्या खाजगी व्यापाराची परवानगी नव्हती. यातून बऱ्याच प्रमाणात लाचलुचपतीचे व छुपेपणाने खाजगी व्यापाराचे प्रकार घडत. गुलामांचा व्यापारही त्याला अपवाद नव्हता. अखेरीस इ.स. १७९१मध्ये यात खाजगीरीत्या सहभागाची मुभा देण्यात आली. गुलाम मिळवण्याचे मार्गही अनेक होते. युद्धे, दुष्काळ, इत्यादींमुळे लोकांचे विस्थापन ही तेव्हा नित्याची बाब होती. हरितक्रांती, अन्नसुरक्षा वगैरे भानगडींचा तेव्हा मागमूसही नसल्यामुळे दोन घास अन्नासाठी स्वत:ला विकणे हे तत्कालीन गरीब जनतेसाठी फार अतर्क्य किंवा अकल्पनीय वगैरे अजिबात नव्हते. याशिवाय बंगालच्या किनारी प्रदेशात अनेकदा चाचे लोक यासाठी सरळसरळ धाडी टाकत. जे कोणी दुर्भागी लोक हाती सापडत, त्यांना कुत्र्यामांजरासारखे जहाजांवर टाकून काही काळाने त्यांची विक्री होत असे. शिवाय, मागणी तसा पुरवठा या न्यायाने विशिष्ट प्रदेशातील लोकांचा विशिष्ट कामासाठी गुलाम म्हणून वापर अधिक होत असे. उदा. मादागास्करमधील गुलाम शेतीकामासाठी, तर अंगोलातील गुलाम एकूणच हमाली कामासाठी पसंत केले जात. तुलनेने भारतीय व इंडोनेशियातील काही ठिकाणच्या गुलामांचा वापर कारागीर म्हणून अधिक केला जाई. कोणत्या कामासाठी वापरायचे हे ठरल्यावर त्यानुसार त्यांच्या किमतीतही फरक पडत असे. बंगाली महिला गुलामांचे विणकामातील कौशल्यही उल्लेखनीय होते. तसे कैक उल्लेख तत्कालीन साधनांत दिसून येतात. केपटाऊनमधील साउथ आफ्रिकन कल्चरल हिस्टरी म्युझियममध्ये मालती नामक बंगाली गुलाम महिलेने विणलेल्या कापडाचा एक तुकडाही ठेवण्यात आला आहे.
युरोपियांच्या नजरेत या सर्व गुलामांचीही एक उतरंड अस्तित्वात होती, त्यानुसार भारतीय गुलाम साधारणपणे मध्यभागी असत. मिश्रवंशीय गुलाम सर्वोच्च तर मादागास्करमधील गुलाम सर्वांत खालचे मानले जात. धाडी टाकणारे फक्त चाचे लोक नसून युरोपीय कंपनीवाले व इतरही असत.
गुलामांचे जीवन
बळजबरीने गुलामांना केप ऑफ गुड होपमध्ये आणल्यावर त्यांची रवानगी 'स्लेव्ह लॉज' अर्थात खास गुलामांसाठी तयार केलेल्या घरांत होई. यात बरीच गर्दी असे. त्यातल्या त्यात डच कुटुंबांकडे काम करणारे गुलाम त्यांच्या घराजवळ तुलनेने बऱ्या स्थितीत राहत. बाकीच्यांना मात्र दाटीवाटीतच राहावे लागे. त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते. विशेषत: इ.स. १७५३मध्ये केप ऑफ गुड होपमधील डच वसाहतीचा गव्हर्नर राईक टुलबाख याने लागू केलेला 'टुलबाख कोड' पाहताना याचे प्रत्यंतर येते. यानुसार कोणत्याही गुलामाला -
रात्री १०नंतर बाहेर पडण्याची मुभा नव्हती.
रात्री त्यांनी गाणेबजावणेच काय, शिट्ट्या वाजवणेही निषिद्ध होते.
सुट्टीच्या दिवशी व रविवारच्या ख्रिस्ती प्रार्थनेवेळी त्यांनी रस्त्यात किंवा चर्चबाहेर एकत्र जमणे निषिद्ध होते.
गुलामांना इतर गुलामांसोबत रस्त्यावर भेट झाली असता बोलण्याची मनाई होती.
गुलामांना कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगणे निषिद्ध होते.
गुलामाने कोणत्याही मुक्त व्यक्तीविरुद्ध वर्तन केल्यास जाहीररीत्या त्याला/तिला बेड्या घालून चाबकाचे फटकारे दिले जात.
मालकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची हिंसा करणाऱ्या गुलामाला थेट मृत्युदंड दिला जाई.
हे नियम सर्वच गुलामांना लागू होते व त्याची झळ त्यांना बसत असे. परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मादागास्कर व अन्य ठिकाणच्या गुलामांना बहुतांश सहकुटुंबच पकडून आणले जात असे. पण तसे बंगाली गुलामांबाबतीत घडत नसे. त्यांना बहुतांश सुटेच आणले जाई. आणि यातही स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असे. कुटुंबापासून तुटलेल्या या पुरुषांना त्यामुळे त्यांच्या लैंगिक व कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी इतर गुलामांशी बराच संघर्ष करावा लागे. त्यातच त्यांच्या हातून बलात्कार, खून, इत्यादींसारखे गुन्हेही घडत. याला अर्थात क्वचित अपवाद असले तरी साधारणपणे असे दिसत नाही. इ.स. १७८२मध्ये आई व मुलांची ताटातूट करू नये असा हुकूम डचांनी काढला तरी त्याची अंमलबजावणी कितपत झाली, हे शंकास्पदच आहे.
अशाही परिस्थितीत बंगाली गुलामांनी कोरोमंडल (आजचे तमिळनाडू व आंध्र प्रदेश येथील किनारपट्टी), मलबार (केरळ), श्रीलंका, इंडोनेशिया, मादागास्कर, इ. ठिकाणच्या गुलामांसोबत संबंध ठेवले. त्यांच्या नोंदी अधूनमधून सापडतात. त्यांना मालकांकडून अनेकदा त्रास होत असे. याचे एक उदाहरण तत्कालीन व्यवस्थेवर चांगलाच प्रकाश टाकते. माणिका नामक बंगाली गुलाम स्त्रीने रेनियर नामक मादागास्करच्या गुलाम पुरुषाशी लग्न केले व त्यांना त्यातून एक मुलगी झाली. वयात आल्यावर ती सुंदर दिसू लागली. तिच्या सौंदर्याच्या असूयेपोटी या दोघांच्या मालकाची बायको त्या मुलीला खूप त्रास देत असे. एके दिवशी छळाचा अतिरेक झाल्यावर रेनियरने त्याच्या मालकावर हल्ला करून त्याला ठार मारले आणि स्वत: पळून गेला. तब्बल आठ वर्षांनी त्याला पकडण्यात यश आले.
गुलामांचे संबंध त्यांच्या मालकांशीही येत. यात बहुतांश गोरे मालक आणि गुलाम स्त्रिया यांचे प्रमाण जास्त असे. पण उलट बाजूच्या घटनांच्याही काही नोंदी आहेत. टायटस नामक बंगाली गुलामाचे त्याच्या गोऱ्या मालकिणीशी प्रेमप्रकरण होते. १७१४ साली या प्रेमी युगुलाने टायटसच्या मालकाला ठार मारले. कोर्टाने टायटसला मृत्युदंडाची शिक्षा दिली. मात्र मालकिणीला विशेष काही शिक्षा दिल्याचे उल्लेख नाहीत.
साधारणपणे बंगाली गुलाम घरकाम, शिवणकाम इत्यादी कामांसाठी वापरले जात. क्वचित कधी इतर कामेही ते करत असल्याच्या नोंदी सापडतात - उदा. सुतारकाम आणि ट्रंपेट वाजवण्याचे काम या गुलामांनी केल्याचे नमूद आहे.
केप ऑफ गुड होपमध्ये आणलेले गुलाम इतक्या वेगवेगळ्या ठिकाणचे होते की त्यांच्यात समान धागे शोधणेच अवघड होते. साधारणत: गुलामांना बाटवून ख्रिश्चन करण्याचे धोरण असले तरी अनेकदा त्याची अंमलबजावणी नीट होत नसे. डच आणि पोर्तुगीज या भाषा मुख्यत: वापरल्या जात असल्या तरी अनेक गुलामांना त्या येत नसल्याचे नमूद आहे. विशेषत: कैक बंगाली गुलामांना बंगाली भाषा सोडून अन्य कोणतीच भाषा येत नसल्याच्या नोंदी सापडतात. भाषिक, वांशिक आणि धार्मिक प्रतलांवर पाहता केप ऑफ गुड होपमधील गुलाम समाजात मुळातच खूप वैविध्य होते आणि ते मिटवून समान सांस्कृतिक संस्कार करण्याचे धोरणही विशेष जोराने राबवले गेले नाही. त्यामुळे अमेरिकेतील आफ्रिकन वंशीय गुलामांमध्ये पुढे जशी एक विशिष्ट संस्कृती निर्माण झाली तशी इथे होऊ शकली नाही.
गुलामांचे उठाव इ.
या गुलामांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीला ते साहजिकच कंटाळत. मालकांचा जाच असह्य झाला की त्याचा प्रतिकारही करत. अर्थात डच अंमल असेतोवर सशस्त्र उठावात मात्र याचे रूपांतर झाले नाही. तोवर त्यांच्या प्रतिकाराची विविध रूपे असत. सामान्यत: ते नेमून दिलेल्या कामांत टाळाटाळ करत किंवा अधिक त्रास झाल्यास मालकापासून दूर पळून जात. केपच्या वसाहतीजवळच्या डोंगराळ प्रदेशात आश्रय घेत. आधीच वसाहतीची लोकसंख्या कमी, त्यात आसपासचा प्रदेश डोंगराळ. त्यामुळे अशा पळून गेलेल्या गुलामांना पकडणेही कठीण असे. हे मोठ्या प्रमाणावर झाल्यास मात्र डच मालक त्याचा इलाज करत. उदा. इ.स. १७२६च्या आसपास आरॉन नामक बंगाली गुलामाने इतर अनेक गुलामांशी संधान बांधले व ते सर्वजण पळून गेले. इतकेच नव्हे तर त्यांनी कैक महिने केपच्या वसाहतीनजीकच्या शेतजमिनींवर हल्ले केले आणि गुरेढोरेही चोरून नेली. त्यांचा बंदोबस्त करायला तब्बल नव्वद शिपायांची तुकडी पाठवली गेली, आणि एकोणीस गुलामांची धरपकडही झाली. याचा म्होरक्या आरॉन मात्र शेवटपर्यंत हाती लागला नाही. काही जणांनी केपटाऊनजवळच्या टेबल बे येथून बोटींनी युरोपला पळून जाण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला.
पकडलेल्या गुलामांना कडक शिक्षा दिली जाई. सामान्यत: शांबोक नामक एका जाड चामड्याच्या चाबकाने फटकारे मारले जात. याद्वारे पळून जाण्याचे परिणाम किती वाईट आहेत, हे अन्य गुलामांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न असे. केपच्या वसाहतीतील गुलामांविरुद्धच्या बहुतांश फौजदारी केसेसमध्ये पळून गेलेला गुलाम पुन्हा पकडल्यावरच्या शिक्षेचीच उदाहरणे बहुतांशी दिसून येतात.
गुलाम ही मालकाची मालमत्ता मानली जाई. त्यामुळे गुलामांनी आत्महत्या केली तर मालमत्तेचे नुकसान या सदराखाली त्याची नोंद होत असे. आता मेलेल्या गुलामाला काहीही करता येणे शक्य नसले तरी त्याच्या प्रेताची शक्य तितकी विटंबना केली जाई. केपच्या वसाहतीमधील सर्व मुख्य रस्त्यांमधून ते प्रेत फरपटवत नेऊन शेवटी एका कोपऱ्यात टांगले जात असे. मेल्यावरही गुलामांवर अशा प्रकारे अधिकार दर्शवण्याची ही पद्धत होती. कैकदा गुलाम मालकाच्या घरांना आगी लावत. यात बंगाली गुलामांनी अन्य बंगाली गुलामांसोबत एकत्र मिळून कट आखल्याचे दिसत नाही, कारण ते अनेक ठिकाणी विखुरलेले होते. त्यामुळे जिथे शक्य तिथे ते अन्य वंशीय गुलामांसोबत मालकांविरुद्ध बंड करत.
डच अंमल संपून ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर मात्र संघटित उठावांचे प्रमाण वाढले. यात इ.स. १८०८चा कूबर्ग उठाव प्रसिद्ध आहे. हा क्रूरपणे चिरडण्यात आला. यानंतरही दोन उठाव झाले ते चिरडण्यात आले. साधारणपणे ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर अशा उठावांचे प्रमाण वाढलेले दिसते. याचे कारण म्हणजे डचांपेक्षा ब्रिटिशांनी गुलामांवर अधिक अत्याचार केले असे नसून, ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, हैतीमधील उठाव, इ. अनेक उठावांची माहिती तोवर केप वसाहतीत पोचल्यामुळे तसे झाले असावे, असा संशोधकांचा तर्क आहे.
पण अमेरिकेसारखे उठाव केपमध्ये झाले नाहीत त्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील गुलामांमध्ये वंश, धर्म, भाषा, इ. कोणत्याच पातळीवर पुरेसे साधर्म्य नव्हते आणि केपमध्ये जन्मलेल्या गुलामांपेक्षा बाहेरून आणलेल्या गुलामांची संख्या कायमच अधिक होती. शिवाय कठोर शिक्षांखेरीज गुलामांना नशापाणी करण्यास प्रोत्साहनही दिले जाई, जेणेकरून अंमली पदार्थांवर अवलंबित्व वाढल्यामुळे त्यांना विरोध करणे अधिक जड जावे.
काही अपवादात्मक गुलाम व स्वतंत्र लोक
वरील सर्व माहिती वाचल्यावर वाटेल की केपच्या वसाहतीत बंगाली गुलामांना काहीही अधिकार नव्हतेच की काय? याचे उत्तर थोडेसे गुंतागुंतीचे आहे. 'गुलाम' म्हणून जगताना त्यांना विशेष हक्क नव्हते हे खरेच. पण कैकजणांची गुलामगिरीतून अधिकृतरीत्या मुक्तताही केली गेली व त्यांनी पुढचे जीवन हे स्वतंत्रपणेच कंठले - तशी उदाहरणे ज्ञात आहेत. इतकेच नव्हे तर काही बंगाली लोक स्वत: गुलामांच्या खरेदी-विक्रीचे कामही करत. इ.स. १८१६-३४मध्ये गुलाम बाळगून असणाऱ्या १३१ जणांपैकी १५ बंगाली असल्याची नोंद आहे.
बंगाली गुलामांपैकी बऱ्याच तपशीलवार नोंदी सापडतात त्या अँजेला नामक स्त्रीच्या. 'अँजेला फान बंगाल' अशी तिची नोंद डच साधनांत आढळते. इ.स. १६५०च्या दशकाच्या उत्तरार्धात, म्हणजेच केप वसाहतीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तिला तिचा नवरा व तीन मुलांसह पीटर केंप नामक डच माणसाने बटाव्हिया अर्थात इंडोनेशियात एका पोर्तुगीज चाच्याकडून खरेदी केले व केप वसाहतीचा तत्कालीन गव्हर्नर यान फान रिब्बेक याला विकले. फान रिब्बेकने पुढे इ.स. १६६२मध्ये या पूर्ण कुटुंबाला तेथीलच अब्राहम खाब्बेमा याला विकले. खाब्बेमा याने इ.स. १६६६मध्ये, त्याची बटाव्हियाला बदली झाल्यावर या कुटुंबाची दास्यत्वातून मुक्तता केली. अँजेलाच्या नवऱ्याबद्दल पुढे माहिती मिळत नाही - कदाचित तो मेलाही असावा. पण इ.स. १६६९मध्ये अँजेलाचा आर्नोल्डस विलेम्स बासोन या डच माणसाशी विवाह झाला. बासोन इ.स. १६९८मध्ये मरण पावला, परंतु अँजेला त्यानंतर २२ वर्षे जगली. तत्कालीन समाजव्यवस्था पाहता तिचे जीवन अतिशय अपवादात्मक व उल्लेखनीय म्हटले पाहिजे. ती शेवटपर्यंत टेबल व्हॅली येथे राहिली. वाईन बनवणे आणि माळीकाम असा तिचा व्यवसाय असल्याची नोंद सापडते. तिच्या पदरी तीन पुरुष व दोन स्त्री गुलामही होते. यांपैकी स्त्रियांचे उगमस्थान ज्ञात नसले तरी पुरुष भारतातील असल्याचे ज्ञात आहे. 'Tough businesswoman' असे तिचे वर्णन तत्कालीन साधनांत येते. ही तिला अभावितपणे दिलेली मोठी सलामीच म्हटली पाहिजे.
अँजेलाची मुलगी ॲना हिने तर या बाबतीत आईवरही कडी केलेली आढळते. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या पदरी असलेल्या ओलाफ बर्ग नामक एका स्वीडिश अधिकाऱ्याशी तिने इ.स. १६७८मध्ये लग्न केले व इ.स. १७३४मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत केपटाऊनजवळ Groot Constantia नामक तिच्या इस्टेटची तिने देखभाल केली. नवरा मेल्यावर वारसाहक्काने ही इस्टेट तिच्याकडे आली. Groot Constantia खेरीजही केपटाऊनमधील अनेक घरे तिच्या मालकीची होती. तिच्याकडे सर्व ठिकाणी मिळून तब्बल ६२ गुलाम होते.
याखेरीज लुईस फान बंगाल याचेही अँजेलाच्या आसपासच '"n kleurryke figuur'" अर्थात '"रंगीबेरंगी व्यक्तिमत्त्व'" अशा विशेषणाने युक्त बरेच उल्लेख सापडतात. इ.स. १६७३मध्ये याची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात आली, व इ.स. १६७५मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला. यानंतर तो स्वत:ही गुलामांची खरेदीविक्री करू लागला. इतकेच नव्हे, तर विलियम टीरलिंग नामक एका गोऱ्या माणसाला त्याने चक्क नोकरीवरही ठेवले, आणि इतकेच नव्हे तर काही काळाने त्याला कामावरून काढूनही टाकले! पूर्वाश्रमीच्या गुलामासाठी एका गौरवर्णीय व्यक्तीला कामावर ठेवणे आणि काढणे हे तत्कालीन परिस्थिती पाहता अतिशय धाडसाचे काम होते. त्याने पुढे अनेक लग्ने केली, त्यातून त्याला कैक मुले झाली. त्याने अनेक शेतजमिनी, हॉटेल्स इत्यादी विकत घेतल्याच्या नोंदीही आहेत.
गुलाम लोकसमूह व केपटाऊनमधील समाज
कालौघात बंगाली गुलाम केपटाऊन व आसपासच्या समाजात पूर्णत: सामावून गेले. आजमितीस तेथील समाजात खालील प्रमुख समूह आहेत:
१. गौरवर्णीय - इंग्लिश आणि आफ्रिकान्स भाषक
२. आफ्रिकन - युरोपियन मिश्रवंशीय - आफ्रिकान्स भाषक
३. आफ्रिकन वंशीय खोइसान - आफ्रिकान्स भाषक
४. मलय - आफ्रिकान्स भाषक
५. आफ्रिकन वंशीय - खोसा भाषक
यांपैकी क्रमांक ३ ते ५ यांचा गौरेतरांमध्ये समावेश होतो. मलय लोक साधारणपणे सारखीच भाषा, एकच धर्म (इस्लाम), आदींमुळे आपली ओळख आहे तशी टिकवू शकले. मात्र बंगाली गुलाम गौरवर्णीय व गौरेतर या दोन्ही समूहांत मिसळून गेले. स्वतंत्र बंगाली, उदाहरणार्थ वर सांगितलेल्या लुईस व अँजेलासारखे मुक्त लोक, बहुतांशी गौरवर्णीय समूहात सामावून गेले. गौरवर्णीय पुरुषांशी लग्न झालेल्या बंगाली स्त्रियांचे प्रमाण यात अधिक होते. अशा संबंधांतून निर्माण झालेली संतती युरोपीय समाजात सामावून घेण्यास अडचण नसे, कारण मुळात डच किंवा युरोपियन वंशीय स्त्रियाच तिथे अल्प प्रमाणात असल्यामुळे अन्य वंशीय स्त्रियांशी युरोपियन वंशीय पुरुषांनी लग्न करण्याला तितकेसे कमी लेखले जात नसे. पण हेच युरोपियन वंशीय स्त्रियांशी अन्य वंशीय पुरुषांनी संबंध ठेवल्यास त्या पुरुषाला शिक्षा होत असे. याखेरीज काही बंगाली लोक हे मलय व आफ्रिकन वंशीय समूहांतही मिसळल्याच्या नोंदी सापडतात.
गुलामांची मुक्तता व त्यांना केपटाऊन व आसपासच्या समाजात सामावून घेण्यातील एक महत्त्वाची पायरी म्हणजे इ.स. १६८५मध्ये हेंड्रिक एड्रियन फान ऱ्हीड या अधिकाऱ्याने त्यासंबंधीचा काढलेला आदेश होय. यानुसार, कोणत्याही गुलामाने
१. मालकाची सेवा एकनिष्ठपणे व मनोभावे केल्यास
१. त्याच्या सुटकेसाठी १०० फ्लोरिन इतके पैसे भरल्यास
२. त्याला ठीकठाक डच भाषा बोलता येत असल्यास
३. डच चर्चमध्ये ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यास
४. पैसे कमावण्याची क्षमता असल्याबाबत वरिष्ठांची खात्री पटवल्यास
त्याच्या/तिच्या मुक्ततेविषयीचा सरकारी आदेश निघत असे. इ.स. १७९५पर्यंत याचा अंमल होत होता. या अटी तशा कडक असल्यामुळे यानुसार मुक्तता झालेले गुलाम कमीच होते. तरीही इ.स. १७००-१७२० या काळात १४३ गुलामांची मुक्तता केल्याची नोंद आहे व यासाठीची कारणेही तब्बल २३८ आहेत! ११ जणांच्या बाबतीत डच भाषेचे ज्ञान, तर २८ जणांच्या बाबतीत ख्रिस्ती धर्म स्वीकारणे ही कारणे आहेत. परंतु मालकाची सेवा मनोभावे व एकनिष्ठपणे करणे हेच मुख्य कारण ५७ जणांच्या बाबतीत नोंदवल्याचे दिसते.
संख्या, व्याप्ती, इ.
सरतेशेवटी केप ऑफ गुड होपच्या वसाहतीतील बंगाली गुलामांच्या एकूण संख्येबाबत उपलब्ध असलेली माहिती पाहू. इ.स. १६५२ ते १८३४ या काळात केपच्या वसाहतीत एकूण सातेकशे बंगाली गुलामांची नोंद आहे. आता १८२ वर्षांत ७०० म्हणजे वर्षाकाठी जवळपास चार असे सरासरी प्रमाण येईल. हे प्रमाण अतिशय नगण्य आहे किंवा एकही गुलाम असणे हे घृणास्पद आहे, या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी याबद्दलचे सत्य आहे. ७०० हा आकडा मुळात अशा गुलामांचा आहे ज्यांचे -
१. उगमस्थान बंगाल असे स्पष्टपणे नोंदवले आहे.
२. केप ऑफ गुड होपमध्ये त्यांचा प्रवेश तसेच त्यानंतर काही अन्य घटनांची नेमकी नोंद आहे.
डच ईस्ट इंडिया कंपनीची कागदपत्रे आजच्या निकषांनी पाहिली तरी बऱ्यापैकी तपशीलवार आहेत आणि शिस्तबद्धरीत्या केलेल्या नोंदीही त्यात सापडतात. परंतु असे असले तरी काही महत्त्वाच्या गुंतागुंतींची दखल घेणे अवश्य आहे. केप ऑफ गुड होपला थेट बंगालहून गुलाम आणत नसत. अनेकदा बंगाल ते बटाव्हिया हा प्रवास प्रथम व्हायचा व तिथून केप येथे गुलाम आणले जात. यात अनेकदा गुलामांचे उगमस्थान कोणते, याची नोंद नसे. कैक गुलामांची तर नोंदणीही केली जात नसे. शिवाय अजून एका गोष्टीमुळे नेमक्या गुलामांची संख्या किती, हे नीट ठरवता येत नाही. ती म्हणजे, समजा, लुईस नामक गुलाम मरण पावला व त्यानंतर लगेचच एक नवीन पुरुष गुलाम आणला गेला. तर या नवीन गुलामाचे नाव कैकदा मरण पावलेल्या गुलामाचेच ठेवले जात असे. त्यामुळे नेमका कोणता लुईस, हे कळणे दुरापास्त! मानवी आयुर्मर्यादेचा निकष लावला तरी मधली अनेक वर्षे नेमकी ओळख कळणे केवळ अशक्यच. आणि समजा निव्वळ नावांवरून अंदाज लावायचा तर कैक गुलामांच्या धर्मांतरानंतर ते सर्व ख्रिश्चन/युरोपियन नावे स्वीकारत. त्यामुळे त्याचीही काही मदत याकामी होत नाही. ख्रिश्चन नावांखेरीज काही हिंदू व मुसलमान नावे सापडतात. आता मुसलमान नाव म्हटले तर निव्वळ तेवढ्यावरून प्रदेश समजत नाही. त्यामुळे हिंदू नावांकडेच लक्ष दिले तरी त्यातही बंगाल की मलबार की कोरोमंडल, हा प्रश्न उरतोच. त्यामुळे उगमस्थानाची थेट नोंद असल्याशिवाय हे सगळंच प्रकरण अंदाजपंचे आहे. यावरून लक्षात येईल की एकूण गुलामांची वास्तविक संख्या ही नोंदणीकृत संख्येपेक्षा अनेकपटींनी असली पाहिजे. कैक हजारांत ही संख्या असेल, हे उघडच आहे.
अशी ही केप ऑफ गुड होपमधील बंगाली गुलामांची कहाणी. गुलामगिरी म्हटले की नशिबी येणारे सर्व भोग या लोकांनी भोगले, आणि गुलामगिरीचे अधिकृतरीत्या उच्चाटन झाल्यावर केपटाऊन व आसपासच्या समाजात ते मिसळूनही गेले. भारताच्या इतिहासात, मुळात या ना त्या कारणाने ब्रिटिशपूर्व काळात भारताबाहेर जाणाऱ्या/नेल्या गेलेल्या भारतीयांना अजूनही म्हणावे तितके महत्त्वाचे स्थान नाही. त्यात गुलामांना तर नाहीच नाही. ऐसी अक्षरेच्या आफ्रिका विशेषांकाच्या निमित्ताने आफ्रिकेत नेल्या गेलेल्या भारतीय गुलामांची कहाणी सांगता आली, याचा आनंद मात्र मला नक्कीच आहे. गुलामगिरी म्हटले की कृष्णवर्णीय, आफ्रिकन वंशीय गुलामच डोळ्यांसमोर येतात. परंतु भारतीय गुलामही मोठ्या संख्येने अनेक देशांत नेले गेले, हा एक दुर्दैवी इतिहास आहे. त्याच्याकडे झालेल्या दुर्लक्षाची या लेखाच्या निमित्ताने थोडी तरी भरपाई होईल, असा मला विश्वास वाटतो.
संदर्भ :
Ansu Datta. FROM BENGAL TO THE CAPE: Bengali Slaves in South Africa from 17th to 19th Century. Published by Xlibris in 2013.
प्रतिक्रिया
लेख आवडला.
लेख आवडला.