"काळी" कॉफी
"काळी" कॉफी
- - अवंती
पूर्वपीठिका
लहानपणी इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना घरात असलेल्या तर्खडकर पाठमालाचे तीनेक खंड अभ्यासणं ही घरची परंपरा होती. त्यात काॅफीकरता बुंद, कवा वगैरे शब्द वाचून हे काय कवा कवा लिहिलंय म्हणून तेव्हा हसूनही घेतलं होतं. पुढे गुगल हाताशी आल्यावर या शब्दाचा आणि काॅफीचा काय संबंध असेल हे शोधत गेले तर काॅफीला अरबी भाषेत “क़हवा” म्हणतात समजलं. याच्या जवळचा शब्द तुर्कीतला कावेह् आहे तर काॅफीच्या रोपाला तुर्कीत बुन् म्हणतात. मग लक्षात आलं की तर्खडकरांनी बहुतेक इथूनच बुंद, कवा वगैरे शब्द योजले असतील काॅफीकरता.
तसं पाहिलं तर काॅफी हे नावच जास्त योग्य, कारण काॅफीचं मूळ नाव हे काफ्फा (kaffa) या इथिओपियामधल्या गावावरून पडलं आहे. काॅफीचं मूळच इथिओपिया आहे. यामागची कथा फारच रोचक आहे. इथिओपियात एका रानात एक काल्दी नावाचा मेंढपाळ रोज आपल्या मेंढ्या चरायला सोडत असे. काही दिवसांनी त्याच्या लक्षात येऊ लागलं की त्याच्या मेंढ्या परत नेतेवेळी नाचत असतात. त्याने बारकाईने लक्ष ठेवलं आणि त्याला सुगावा लागला की त्याच्या मेंढ्या रोज परतताना एका झाडाची चेरीसदृश फळे खातात आणि त्यानंतर त्या खूप वेगळं वागतात. म्हणून काल्दीनेही एकदा ती फळं चाखून पहायचं ठरवलं. काल्दीला ती फळं फार काही चविष्ट वाटली नाहीत, कडू तुरट अशी ती फळं होती. तरीही त्याने ती खाल्ली अन् थोड्या वेळाने तोही एकाएकी खूष होऊन नाचू लागला. तिथून एक धर्मगुरू जात होता. त्याने काल्दीला त्याच्या नाचण्याचं कारण विचारलं असता धर्मगुरूलाही या फळांविषयी समजलं. अन् त्यानंही ही फळं चाखून पाहायचं ठरवलं. दिवसाअखेरची प्रार्थना करतेवेळी वयपरत्वे धर्मगुरूला थकून झोप येत असे. ही फळं खाल्ल्यापासून धर्मगुरूला प्रार्थनेवेळी थकणं, झोप येणं या गोष्टी बंद झाल्या अन् त्यानं या फळांविषयी इतरांना माहिती दिली. अशा पद्धतानं कर्णोपकर्णी काॅफीचा प्रसार झाला.
काॅफीच्या उगमाविषयी अनेक वाद प्रतिवाद आहेत. त्यात एक गट आफ्रिका हेच काॅफीचे मूळ म्हणतो तर दुसरा एक गट म्हणतो काॅफीचा उगम अरबस्तानातला आहे. याविषयीची कथाही रोचक आहे. अरबस्तानातील एका शहरात धर्मगुरू शेख ओमर राहात असे. त्याच्या काही चुकांमुळे त्याला तडीपार करण्यात आलं होतं. खाण्यापिण्याच्या शोधात फिरत असताना त्याला काही पक्षी एका झाडाची फळं खाताना दिसले. त्याने ती कडवट तुरट चवीची फळं खाल्ली, बिया खाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा पोत कठीण असल्याने त्याला त्या बिया चावून खाणं शक्य झालं नाही. म्हणून त्याने युक्ती केली व या बिया उकडल्या तरीही त्या खाण्याइतपत मऊ झाल्या नसल्यानं बिया फेकून ते उकळलेलं पाणी तो प्यायला. हे पाणी प्यायल्यानंतर काहीच वेळात त्याची मरगळ जाऊन त्याला तरतरी आली. या बिया त्याने शिक्षा संपल्यानंतर आपल्याबरोबर शहरात नेऊन त्याचा प्रसार केला. हे शहर होते मोखा/मोका. आज मोठ्यामोठ्या काॅफी हाऊस, काॅफी ब्रॅण्ड्समधे ह्याच नावानं मोका काॅफी मिळते.
काॅफीच्या उगमाविषयी कितीही वाद असले तरीही काॅफीचा पहिला लिखित उल्लेख अबू बकर राझीच्या अल् हाईवी या नवव्या शतकातल्या बग़दादमधील एका प्रसिद्ध हकिमाच्या अल् हाईवी या ग्रंथात सापडतो. त्याच्या ग्रंथात बुन्चुम् म्हणजे काॅफीपासून तयार केलेले एक पेय नमूद आहे. या पेयाचा उपाय पोटदुखीवर, पोट बिघडणे यावर उत्तम होतो असा त्याचा दावा होता. हे काही अंशी खरंही ठरतं. ज्याला आपण घरगुती उपाय, आजीबाईचा बटवा, Home remedies म्हणतो त्यात हा उपाय काही वेळा बरोबर बसतो.
याखेरीज काॅफीविषयी इतिहासातील उल्लेख असा की धर्मगुरू शेख जमालउद्दीन अबू महम्मद काही कामानिमित्त इथिओपियात गेला होता. अनेक वर्षं तिथं राहून पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी एडन - येमेन इथं परतला. परंतु तिथे आल्यानंतर तो उदास राहू लागला होता. त्याच्या मनावर मरगळ आल्यासारखं, निरुत्साही असं वाटत होतं त्याला. अनेक उपाय उपचार करूनही त्याला उतार पडत नव्हता. मग त्यालाच एक युक्ती सुचली अन् त्याने आपल्या काही माणसांना इथिओपियाला पाठवून काॅफी मागवली. काॅफीचे सेवन केल्यानंतर मात्र जमालउद्दीनला एकदम तरतरी येऊन उत्साह आला. येमेनमध्ये धर्मगुरूनेच काॅफी आणल्यामुळे तिचा प्रसार वेगाने होत गेला. काॅफीमुळे रात्री जागरणास, झोप टाळण्यास मदत होते हे लक्षात आल्यामुळं गावोगावी दौरे करत फिरणाऱ्या कलाकारांना - त्या काळी करमणुकीचे खेळ करणारे, जलसे करणारे, रात्रीही प्रवास सहज करता यावा म्हणून अनेक प्रवासी, धर्मोपासक वगैरे काॅफीचं सेवन करू लागले. हळूहळू काॅफीचा महिमा येमेनहून मक्कामदिनेपर्यंत पोहोचला. अरब काॅफीच्या आकंठ प्रेमात बुडाले होते, इतके की त्यांनी काॅफीच्या बिया अरब देशाबाहेर नेऊच दिल्या नाहीत अनेक वर्षं. प्रवाशांची झडती घेणे, काॅफीबिया असतीलच कुणाकडे तर त्या उकळून अथवा भाजून देणे जेणेकरून त्या निकामी होऊन रुजणार नाहीत, वगैरे प्रकार करून काॅफीबिया अन् पर्यायाने काॅफी बाहेर देशात पोहोचूच दिली नाही. मात्र सोळाव्या शतकात एका भारतीय सूफी प्रवाशाने, बाबा बुदन याने हज यात्रेहून येताना आपल्या सामानात सात काॅफीबिया लपवून त्या चिकमंगळूर इथे रुजवल्या आणि भारतात अराबिका काॅफी लागवड अन् उत्पादनाला सुरुवात झाली. पुढे भारतात काॅफीचा प्रसार वेगाने झाला. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी यान फान नायेंडाल व त्याच्या सहकारी डच प्रतिनिधींना गोवळकोंड्याजवळ मौल्यवान चीजवस्तू म्हणून काॅफीची भेट दिल्याचे उल्लेखही समकालीन पत्रांत आहेत.
ज्याप्रमाणे आफ्रिकेतून काॅफी आशिया खंडात पसरली तशीच ती जगभरात पसरली. दक्षिण अमेरिकेत काॅफीची मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली. अर्थात दक्षिण अमेरिकेत, कॅरेबियन द्वीप समूहात ही लागवड युरोपियन सत्तांनी केली. सतराव्या शतकात युरोपियन वसाहतवादी सत्तांना काॅफीची महती पटली होती. काॅफीतून बराचसा नफा मिळवता येऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आलं होतं. बहुतेक जगभर पसरलेल्या युरोपियन वसाहतींनाही काॅफीची चटक लागली होती. आणि म्हणून काॅफी उत्पादन नफेशीर ठरावं याकरता या सत्तांनी काॅफी लागवडीकरता आफ्रिकेतून गुलाम निर्यात करायला सुरुवात केली. हे गुलाम दक्षिण अमेरिका, कॅरेबियन, आशिया खंड येथील युरोपियन वसाहतीत आणले जात. हे triangular trade - तीन टप्प्यातील आर्थिक प्रारूप हा वस्तू व गुलामांचा व्यापार करण्याचा एक मार्ग होता.
साधारणपणे १६व्या शतकाला ही कल्पना उदयाला आली अन् ती १९व्या शतकापर्यंत पाश्चिमात्त्य वसाहतवादाच्या काळापर्यंत सुरू राहिली. यात व्यापार युरोप, आफ्रिका (त्यातही पश्चिम आफ्रिका) आणि अमेरिका खंडात होत असे. या तीन टप्प्यातील व्यापारात पहिला टप्पा युरोपात सुरू होत असे. यात कापड, दागिने, धातूची भांडी, दारू व इतर पेये, सुरे, चाकू व इतर काही हत्यारे, अशा नानाविध तयार वस्तू जहाजातून पश्चिम आफ्रिकेत नेल्या जात. या वस्तूंच्या बदल्यात तिथून गुलाम विकत घेतले जात. याचा पुढचा टप्पा म्हणजे हे गुलाम जहाजातून दक्षिण अमेरिकेत पाठवले जात. या प्रवासाला सुमारे ९० दिवस लागत. जहाजात प्रमाणापेक्षा अधिक गुलाम दाटीवाटीने साखळदंडाने बांधून ठेवलेले असत. यामुळे जहाजावरच सुमारे २०% आफ्रिकन गुलाम मृत्यू पावत. दक्षिण अमेरिकेत बरेचदा ब्राझीलमधेच जहाज येत असे, तिथे आल्यानंतर या गुलामांचा लिलाव करून विक्री केली जाई. आणि तिथून ते संपूर्ण अमेरिका खंडात वेगवेगळ्या वसाहती अन् त्यांच्या मालकीच्या मळ्यांवर कामाकरता विकले जात. यात प्रामुख्याने ऊस अन् काॅफीचे मळे होत. तिसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या, मौल्यवान वस्तूंची आयात केली जात असे. अशाच गुलामांच्या आयात निर्यातीतून दक्षिण अमेरिका त्यातही ब्राझिल, कोलंबिया, जमाइका वगैरे ठिकाणी काॅफीची लागवड प्रचंड प्रमाणात झाली अन् आज जगभरात सर्वाधिक काॅफी उत्पादन इथं होतं.
असं असलं तरी आफ्रिकेतही काॅफीचं उत्पादन होतंच! दक्षिण अमेरिका वगैरे ठिकाणी कॉफी पिकवणारे कष्टकरी हात हे बहुतांशी आफ्रिकन वंशीय आहेत, हे खरंच आहे. परंतु जसं अमेरिकेतील गौरवर्णीयांनी युरोप सोडल्यावरही युरोपशी त्यांचे सर्व प्रकारचे लागेबांधे, दळणवळण, इ. टिकून राहिले तसे या कृष्णवर्णीयांचे आफ्रिकेशी लागेबांधे तितक्या प्रमाणात टिकले नाहीत. त्यामुळे मी ठरवलं की लेखात आफ्रिकन वंशीयांचा अमेरिका खंडातील इतिहास व वर्तमान अभ्यासण्यापेक्षा प्रत्यक्ष आफ्रिकेतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणं अधिक योग्य. त्यामुळे इथून पुढच्या लेखात आफ्रिका खंडातील कॉफी उत्पादनाचाच विचार केला आहे.
आफ्रिकेतील कॉफी उत्पादन - एक ढोबळ आढावा
वर लिहिलं त्याप्रमाणे काॅफीचा उगम आफ्रिका आहे. पण आज जगभरातल्या काॅफी उत्पादनापैकी आफ्रिका खंडात फक्त १२% काॅफीचे उत्पादन होते. यातही इथिओपिया जगातील सर्वात जास्त आफ्रिकन काॅफी बनवणारा देश आहे. जगातील काॅफी उत्पादनाच्या ३% काॅफी इथिओपियात एका वर्षात होते. त्याखालोखाल युगांडामध्ये काॅफीचं उत्पादन होतं. आफ्रिकेत काॅफी बिया आजही पारंपरिकरीत्या वाळवल्या जातात. यामध्ये हातानेच काॅफीबिया साफ केल्या जातात आणि सूर्यप्रकाशातच त्या वाळवल्या जातात. काही वेळा काॅफीबिया पूर्ण खडखडीत वाळायला एक महिनाही लागू शकतो. पण काॅफीबिया सूर्यप्रकाशातच पूर्ण वाळल्याशिवाय त्यांचे पॅकेजिंग करून त्या बाहेर पाठवत नाहीत. आफ्रिका खंडात सर्वाधिक म्हणजे ३९% काॅफी उत्पादन इथिओपियात होतं. त्याखालोखाल २३% युगांडात, तर तिसऱ्या क्रमांकावर आयवरी कोस्ट आहे, जिथे १३% काॅफी उत्पादन होतं. यानंतर मग टांझानिया, केनिया या देशांतही काॅफीची लागवड होते. आफ्रिकेच्या याच भागात एक गंमतीशीर अन् अतिशय दुर्मिळ अशी पी-बेरी काॅफीदेखील उगवते. सहसा काॅफीत दोन बिया असतात. पण पी-बेरीमध्ये एकच बी असते. या प्रकारची काॅफी दुर्मिळ आहे, जगभरातल्या केवळ १०% काॅफीबियांमधे पी बेरी काॅफीचे फळ उगवून येते. उर्वरित पूर्व आफ्रिकेत फारशी काॅफी लागवड होत नाही.
आफ्रिकेतील कॉफीची पुरवठा साखळी पाहिली तर तिच्यातील अंगभूत आणि व्यवस्थात्मक दोष लगेच लक्षात येतात. बहुतांश कॉफी तिथे अल्पभूधारक मळेवाल्यांकडूनच पिकवली जाते. युगांडात यांचे प्रमाण ९८% आहे तर इथिओपियात हेच प्रमाण ९५% व टांझानियात ९०% आहे. यातील श्रमशक्तीचे वितरण पाहिले तर अल्पभूधारक मळेवाले स्वत: व कुटुंबासकट राबण्याचं प्रमाण मोठं आहे. आफ्रिकन कॉफी खरेदी करणारे प्रमुख देश म्हणजे जर्मनी, अमेरिका, सौदी अरेबिया आणि बेल्जियम. प्रक्रिया न केलेल्या कॉफीवर कोणतेही आयात शुल्क युरोपियन युनियन आणि अमेरिकेत लागू केले जात नाही, तसेच प्रक्रिया केलेल्या कॉफीवरचं आयात शुल्क १०% आहे. अरेबिका व रोबस्टा या दोन्ही वाणांची लागवड आफ्रिकेत होते. पैकी अरेबिका हा वाण अधिक किमती असून, त्याच्या उत्पादनात वाढ झाल्यास कॉफीच्या निर्यातीत थेट वाढ दिसून येते. अरेबिका वाणाची लागवड ही प्रामुख्याने इथिओपिया, टांझानिया व केनिया या देशांत होते. कॉफीची रोपं लावल्यानंतर तीनचार वर्षांनी फळं येतात, व ती पक्व झाल्यावर लगेच खुडावी लागतात. यादरम्यान कमी कालावधीसाठी बऱ्याच मजुरांची आवश्यकता भासते. या टप्प्यावर रोजगाराच्या तात्पुरत्या संधी बऱ्याच तयार होतात. त्यांचा लाभ घेणारेही बहुतांशी अस्थायी मजूरच असतात. फळे खुडून, त्यांवर प्रक्रिया करून मग अनेक दलालांकरवी ही कॉफी अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जाते.
अनेक कॉफी उत्पादक देशांत बालकामगारांचा वापर केला जातो. युगांडा, टांझानिया, केनिया या प्रमुख कॉफी उत्पादक देशांचाही यात समावेश आहे. अल्पभूधारक मळेवाल्यांना अनेकदा यांचाच आधार असतो. उत्पादनाचं लक्ष्य गाठण्याकरिता जितके अधिक मजूर मिळतील तितके हवेच असल्याने बालकामगारांची भरती आश्चर्यकारक नक्कीच नाही - योग्य नसलं तरी. केनियातील एकतृतीयांश कॉफी मजूर १५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून युगांडात कॉफी मळ्यावर काम सुरू करणाऱ्यांचे सरासरी वय फक्त ११ वर्षं आहे. तेथील किमान ४८% बालकामगारांनी अनेक अपघात व दुखापती झाल्याची कबुली दिली आहे. इथिओपिया, टांझानिया व युगांडातील एकूण मुलांपैकी बालकामगारांचे प्रमाण हे अनुक्रमे ४०%, २५% व २०% पेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी या संदर्भात बोलकी ठरावी.
इथिओपिया, युगांडा, इ. देशांमधील गरीब प्रांतांमधील भूमीहीन मजूरही यात सहभाग घेतात, तसेच कॉफी उद्योगातील एकूण मनुष्यबळापैकी २०% तरी 'पार्ट-टाईम' कामगार असल्याचे आढळले आहे. पूर्णवेळ कामगारांना द्यावे लागणारे फायदे इ. कामगार कायद्यांशी निगडित जो खर्च होतो, तो टाळण्यासाठी व कायद्यांमधून पळवाट काढण्यासाठी यांची भरती केली जाते. हा प्रकार जगात अनेक ठिकाणी आढळतो तसा इथेही दिसून येतो. याखेरीज कॉफी मळ्यांवरील स्त्री कामगारांचं होणारं शोषणही चिंताजनक आहे. अजून एक गर्हणीय प्रकार म्हणजे मनुष्यबळ पुरवणारे कंत्राटदार मजुरांचे विविध मार्गे शोषण करतात. दूरवर कॉफी मळ्यांपर्यंत जाण्याचा प्रवासखर्च भरून देण्याच्या भानगडीतच मजूर कर्जबाजारी होतात. बाकीचे तर राहूच दे.
हा झाला आफ्रिकेतील कॉफी क्षेत्राचा एक धावता आढावा. आता थोड्या अधिक बारकाईने यांपैकी दोन पैलू पाहू.
१. कॉफी क्षेत्राचे विश्लेषण - इथिओपिया.
२. कॉफी क्षेत्रात स्त्रियांवर होणारे अत्याचार - केनिया.
आफ्रिकेतील कॉफी उत्पादक देशांत कमीअधिक फरकाने सारखीच परिस्थिती आहे. ब्राझील आणि व्हिएतनाम या देशांमध्ये अक्षरश: राक्षसी प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे कॉफीची किंमत अनेकदा पडते, आणि गेली कैक दशके ती अधिकाधिक कमी होत आहे. जागतिक उत्पादनातील टक्केवारी कमी असल्याने किमतीवरही आफ्रिकन देशांचे नियंत्रण नसतं. आणि कॉफीच्या किमती कमीकमी होत गेल्याने कॉफी उत्पादकांची अवस्था अधिक बिकट आहे. त्यात भरीस भर म्हणून कॉफी क्षेत्रातील मजुरांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो - त्यातही महिला मजुरांना पुरुष मजुरांपेक्षा अधिकच. दोन वेगवेगळ्या देशांतील स्थिती नीट पाहिल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
कॉफी क्षेत्राचे विश्लेषण - इथिओपिया
अगोदरच सांगितल्यानुसार, इथिओपिया हे कॉफीचे उगमस्थान आहे. तब्बल दोनेक हजाराच्या आसपास कॉफीचे प्रकार इथे आढळतात. अन्य कोणत्याही देशात कॉफीच्या झाडांमध्ये इतकं जनुकीय वैविध्य आढळत नाही. २००६मध्येच तेथील दीडेक कोटी लोकसंख्या कॉफीवर अवलंबून होती तेव्हा अख्ख्या देशाची लोकसंख्या आठ कोटी होती. म्हणजे जवळपास १९% लोकसंख्या कॉफीवर थेट अवलंबून होती. आज हे प्रमाण थोडं कमी झालं असलं तरी कॉफी उत्पादकांची संख्या आजही अतिशय जास्त आहे. याहीपेक्षा धक्कादायक आकडा म्हणजे, २००६मध्ये इथिओपियाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ७०% रक्कम कॉफीतून येत असे. २०२१मध्ये हाच आकडा ३६% इतका होता. ही घट लक्षणीय असली तरी हा आकडा अजिबात दुर्लक्षणीय नाही.
इथिओपियातील प्रत्येक प्रांताचं कॉफी उत्पादनाच्या दृष्टीतून Major, Medium, Minor असं वर्गीकरण केलेलं आहे. पैकी Major व Medium प्रकारात मोडणाऱ्या प्रांतांत ओरोमिया आणि सदर्न नेशन्स, नॅशनॅलिटीज अँड पीपल्स रीजन (SNNP) या दोघांचा दबदबा आहे. या दोन्ही प्रांतांत मिळून जवळपास सव्वापाच लाख हेक्टर जमीन कॉफी लागवडीखाली असून Major व Medium प्रकारात मोडणाऱ्या प्रांतांतील एकूण कॉफीखालील जमिनीपैकी ओरोमियामध्ये ६३% व SNNP मध्ये ३५% जमीन आहे. बहुतांश कॉफी उत्पादक रासायनिक खतं, कीटकनाशके, इ. सारखे आधुनिक उपाय वापरत नाहीत. शुद्ध "ऑरगॅनिक" प्रकारे शेती करतात. त्यामुळे अन्य देशांच्या मानाने उत्पादन खूप कमी आहे. आणि एकूण उत्पादनाच्या निम्म्याच्या आसपास उत्पादन हे देशांतर्गतच खपतं.
कॉफी उत्पादनाला इतरही कैक मर्यादा असून वाढती जंगलतोड, तीही विशेषत: कॉफी उत्पादक क्षेत्रांमधील, हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कॉफी बेरी डिसीज नामक कॉफीच्या रोपांचा एक घातक रोग असून एकूण उत्पादनाच्या जवळपास निम्म्या उत्पादनाला यापासून धोका आहे. आधुनिक उपायांचं प्रमाण कमी असल्यानं हा धोका अधिकच मोठा आहे. त्याशिवाय साठवण, वाहतूक, इत्यादींमध्ये होणारं नुकसान वेगळंच. शेतकऱ्यांपासून कॉफी खरेदी करणारे अनेक लहानमोठे व्यापारीही असून काहीजण वैयक्तिक स्तरावर तर काहीजण संस्थात्मक स्तरावर हे काम करतात. दूध संघासारखे कैक मोठे कॉफी संघ आहेत. मोठ्या प्रमाणावर कॉफी खरेदी, त्यावर प्रक्रिया, साठवण अशी अनेक कामं हे संघ करतात.
कॉफीची फळं पिकल्यावर फळांपासून कॉफीच्या बियांपर्यंत अनेक पायऱ्या आहेत.
फळं साठवल्यावर लगेच त्यांचा लगदा केला जातो व मोठ्या टाक्यांमधून त्यांचं फरमेंटेशन अर्थात किण्वन केलं जातं. त्यानंतर तयार झालेला चिकट भाग काढून ती फळं स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली जातात. यानंतर पारंपरिकरीत्या सूर्यप्रकाशात वाळवली जातात. त्यांमधील आर्द्रता ११.५% इतकी राखली जाते. अलीकडच्या काळात सूर्यप्रकाशाऐवजी निव्वळ धुतलेल्या कॉफीला अधिक भाव येऊ लागल्यानं एकूण कॉफी उत्पादनात धुतलेल्या कॉफीचं प्रमाणही वाढू लागलं आहे. कॉफी निव्वळ धुवायची की न धुताच सूर्यप्रकाशात वाळवायची, हे वाणावरही अवलंबून असतं. उदा. अरेबिका वाणाची कॉफी न धुताच सूर्यप्रकाशात वाळवली जाते. त्यानंतर साल काढून मग कॉफीच्या बिया मिळतात.
या पूर्ण प्रक्रियेत अनेक अडचणी येतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे कॉफी उत्पादक शेतकऱ्यांची गरिबी. बहुतांश शेतकऱ्यांकडे कॉफी वाळवण्यासाठी उंच कट्टे बांधायलाही पैसे नसल्यामुळे जमिनीवरच कॉफीची फळं वाळवावी लागतात. शिवाय कॉफी संघ वगैरेंतर्फे काही ठिकाणी कॉफी धुलाई केंद्रे चालवली जात असली तरी ते पुरेसं नसतं. कारण "तत्काळ" कॉफी धुतल्याशिवाय अपेक्षित दर्जा व उत्पादन मिळत नाही. आणि शेतापासून कॉफी धुलाई केंद्रं साधारणपणे दोनेक किमी तरी दूर असतात. तिथवर नेईतोवर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळेही ते अनेकदा जमत नाही. हे वाचताना तर मला क्षणभर भरूनच आलं. फक्त दोन किलोमीटर अंतरासाठी शेतकऱ्यांकडे गाड्या नसतील का? एवढा काय फरक पडतो नक्की? पण ज्या अर्थी शोधनिबंधात हे आवर्जून नमूद केलंय त्या अर्थी यात काहीएक तथ्य तर असलंच पाहिजे. त्याखेरीज मग धुलाई केंद्रांनजीकच्या जलस्रोतांमधील प्रदूषण हाही एक कळीचा मुद्दा आहेच.
इथिओपिया सरकारने अलीकडेच स्थापन केलेल्या इथिओपियन कमाॅडिटी एक्स्चेंजद्वारे तयार झालेल्या कॉफीचं लिलाव, विक्री, इत्यादींचं नियमन केलं जातं. लहान शेतकरी मोठ्या शेतकऱ्यांना किंवा कॉफी संघांना कॉफी विकतात, तिथून ती देशात आणि देशाबाहेर जाते. कमाॅडिटी एक्स्चेंजद्वारे प्रदेश, प्रक्रिया, वाण, इत्यादी निकषांवर ग्रेडिंग होऊनही उत्तम वाणाच्या देशांतर्गतच मोठ्या मागणीमुळे या अधिकृत व्यवस्थेबाहेरही कॉफीचा बराच मोठा काळाबाजार चालतो. भले स्थानिक चलनातच का असेना, यातून निर्यातीपेक्षा अधिक फायदा मिळत असल्यामुळे हा बाजार तेजीत आहे. पण अर्थातच त्यालाही बऱ्याच मर्यादा आहेत.
कॉफीच्या निर्यातीतही इथिओपियन उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मध्यंतरी, कॉफीच्या बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचे अवशेष सापडल्यामुळे जपानने त्यावर बंदी घातली होती. अन्यथा इथिओपियन कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन एकट्या जपानमध्ये खपतं. अगोदर लिहिल्यानुसार, कैक इथिओपियन शेतकरी रासायनिक खतं, कीटकनाशकं, इ. वापरत नसताना मग हे कसं झालं? अधिक तपासाअंती बांगलादेशहून आयात केलेल्या पोत्यांमुळे ते झाल्याचं दिसून आलं. तसेही जपानी नियम अमेरिकन नियमांपेक्षा अनेकपटीने कडक आहेतच. त्याशिवाय साठवणीचं तंत्र निर्दोष नसणं, भेसळ, इ. कारणांमुळेही न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय कॉफी बाजारात इथिओपियन कॉफीला म्हणावे तसे "रेटिंग" नाही.
अशा अनेक अडचणी असूनही इथिओपियाला कॉफीद्वारे अधिक परकीय चलन मिळवण्याची, व्यापार वाढवण्याची बरीच संधी आहे. खरं तर कोणत्याही एका वस्तूवर कोणत्याही देशाचा व्यापार बहुतांश केंद्रित असूच नये. हळूहळू इथिओपियाच्या निर्यातीतील कॉफीचा टक्का कमी कमी होत आहे हे त्या दृष्टीने आशादायक चित्र आहे. मात्र याची दुसरी बाजू म्हणजे ब्राझील आणि व्हिएतनाम येथील कॉफीच्या भरमसाट उत्पादनामुळे अनेकदा जगभरच कॉफीचे दर पडतात आणि त्यामुळेही आफ्रिकन, पर्यायाने इथिओपियन कॉफीलाही त्याचा फटका बसतो. शिवाय गेली कैक दशकं कॉफीची किंमतही कमीकमीच होत आहे. त्यामुळे आता इथिओपियन शेतकऱ्यांनी कॉफीकडून "खात" नामक पिकाकडे मोर्चा वळवला आहे. हा एक अंमली पदार्थ असून आता कॉफीखालोखाल याची लागवड सर्वाधिक होते. खात पिकाचा जगातीलच सर्वात मोठा उत्पादक इथिओपिया हा आहे. त्याच्या निर्यातीतूनही कैक कोटी अमेरिकन डॉलर्स इथिओपियन अर्थव्यवस्थेला मिळतात.
कॉफी क्षेत्रात स्त्रियांवर होणारे अत्याचार - केनिया
जगभरातील स्त्रियांवरील अत्याचार हा फार चिंतेचा विषय आहे. त्यातही कष्टकरी, तळागाळातील महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचं लैंगिक शोषण ही विशेष चिंतेची बाब आहे. कमी वेतन, दुय्यम वागणूक, लैंगिक शोषण, प्रसंगी बलात्कार आणि त्यानंतरची मुस्कटदाबी या साऱ्या गोष्टी अनेक वर्षं कष्टकरी स्त्रिया सोसत आल्या आहेत. परंतु कुटुंबाचा आणि स्वतःचा खर्च भागवणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची व कुटुंबाच्या पोटाची खळगी भरणं आणि मदतीचा हात नसणं यापुढे शोषण सहन करण्याखेरीज अनेक महिलांपुढे पर्याय नव्हता - आजही नाही. आफ्रिकेतील काॅफीमळ्यातील कामगार महिलाही याला अपवाद नाहीत. गुलाम म्हणून त्यांची नेमणूक झाली तेव्हाही ही परिस्थिती अशीच होती अन् आजही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आता केवळ गुलाम हे नाव जाऊन मजूर/कामगार अशी गोंडस, समाजमान्य नावे तिथे आली आहेत.
तर, आता कॉफी उद्योगात स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार पाहू. कोणत्याही एका देशातील परिस्थितीचा आढावा घेतला तरी आफ्रिकेतील एकूण परिस्थितीची कल्पना येण्यासाठी ते पुरेसं आहे. आफ्रिकेत इथिओपियाखालोखाल केनिया व टांझानिया येथे कॉफीचे उत्पादन सर्वाधिक होते. पैकी केनियातील अनेक स्त्री कामगारांशी प्रत्यक्ष बोलून केलेल्या एका अभ्यासात अनेक धक्कादायक आणि अप्रिय सत्यं उजेडात आली. धक्कादायक म्हणजे आश्चर्यकारक अशा अर्थी नव्हे, पण सुन्न करणारं या अर्थी. जवळपास ९०% स्त्रियांना या ना त्या प्रकारे लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागला आहे, आणि त्यांपैकी ९५% तरी स्त्रियांना नोकरी जाण्याच्या भीतीने त्याविरुद्ध आवाज उठवायची भीती वाटते. कॉफी मळ्यांवरील मुकादम अनेकदा फक्त महिला कामगारांचंच नव्हे, तर त्यांसोबत मळ्यावरच राहणाऱ्या त्यांच्या मुलींचंही शोषण करतात. आणि सर्वात धक्कादायक बाब ही, की प्रत्यक्ष संभाषण केलेल्या पुरुषांपैकी तब्बल ७०% पुरुषांनी "हे असंच असतं" छाप प्रतिक्रिया नोंदवली! अत्याचारांचा सामना कराव्या लागलेल्या महिलांमध्ये हतबलता, डिप्रेशन, इत्यादी अनेक मानसिक विकारांचा प्रादुर्भाव आढळतो. शिवाय दुर्दैव म्हणजे केनियन कायद्यातही याविरुद्ध खास तरतुदी नाहीत. याची अजून एक बाजू म्हणजे किमान दोन तृतीयांश महिलांच्या मते एड्ससारख्या रोगाच्या प्रादुर्भावामागे स्त्रियांचं या मार्गे होणारं शोषणही कारणीभूत आहे. केनियाच्या लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिकांना रोजगार शेतीतून मिळतो, हे लक्षात घेतल्यास याची व्यापकता लक्षात येईल. कॉफी व तत्सम उद्योगांत बहुतांश स्त्री कामगारांचा भरणा असल्यामुळेही याला एक खास महत्त्व आहे.
या अभ्यासात एकूण ४०० स्त्रियांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पैकी १५० स्त्रिया रुइरू आणि थिका या प्रांतांमधील कॉफी मळ्यांवर काम करतात. वय वर्षे २० ते ४० या मर्यादेत बहुतांश स्त्रियांची वयं आहेत, म्हणजेच तरुण स्त्रियांचा यात भरणा असल्याचं दिसून येतं. अल्प प्रमाणात १४ ते १९ वर्षीय मुलीही इथं आढळतात. लग्न झालेल्या स्त्रियांचं प्रमाण ४०% असून अविवाहित ३८%, घटस्फोटित १२% तर विधवा १०% इतक्या आहेत. केनियातील पारंपरिक संस्कृतीनुसार, अविवाहित, अर्थात 'पुरुषाचं संरक्षण नसलेल्या' स्त्रियांचं समाजातील स्थान तसं डळमळीतच असतं. त्यामुळे यातील निम्म्याहून अधिक स्त्रियांना लैंगिक अत्याचारांचा धोका तुलनेने अधिक आहे. आणि ज्या स्त्रिया विवाहित आहेत, त्यांचे नवरे आर्थिकदृष्ट्या फार काही कमवताना दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांना कुटुंब चालवण्यासाठी असे काबाडकष्ट करावे लागतात.
लैंगिक अत्याचारांचे वर्गीकरण सदर अभ्यासात तीन प्रकारे केले आहे.
१. वरिष्ठांसोबत संबंध ठेवून बढती किंवा अधिक पैसा मिळवणं.
२. नोकरी कायम ठेवण्याच्या बदल्यात वरिष्ठांनी लैंगिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करणं.
३. कोणताही खास हेतू न ठेवता वरिष्ठांनी लैंगिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करणं.
यांपैकी १ व २ चं प्रमाण अनुक्रमे १७% व १९% असून, सर्वांत धक्कादायक म्हणजे ३चं प्रमाण जवळपास ६०% इतकं आहे. म्हणजे कोणत्याही विशेष हेतूशिवाय, फक्त आणि फक्त सत्तेच्या आधारे स्त्रियांचा भोग घेणं सर्वात जास्त आढळतं. अर्थात जिथे वरील सर्वच प्रकार वाईट आहेत त्यात प्रतवारी तरी कशी करणार? यावर अधिक काहीही भाष्य करायची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि एवढे अत्याचार सोसून, स्त्रियांना पुरुषांइतके पैसे तरी मिळतात का? तर तेही नाही. कॉफी मळ्यांमध्ये तर ८०% वेळेस प्रमोशन्स वगैरेही वरिष्ठांसोबत संबंध ठेवल्यामुळेच मिळतात. आणि स्त्री व पुरुषांना प्रमोशन्स मिळण्याच्या कारणातील तफावत पाहिली तर त्यातही हेच कारण प्रामुख्याने दिलं जातं.
कॉफी उद्योगात, निव्वळ लैंगिक अत्याचाराखेरीज इतरही अनेक प्रकारे स्त्रियांना त्रास दिला जातो. यात, समजा एखाद्या स्त्री कामगाराने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर तिच्या कामाबद्दल मुद्दाम वाईट रिपोर्ट्स द्यायचे, जेणेकरून तिला नोकरी गमवावी लागेल. किंवा अविवाहित स्त्रियांना उद्देशून मुद्दाम खालील वाक्य वापरायचं, उदा.
"नानी आताकुवेका वेवे?" (तुला तर नवरा नाही, मग आमच्याशिवाय तुझ्या 'गरजा' कशा भागणार?)
कॉफी मळ्याच्या मुकादमांमध्ये तर "मामा वा कांबी नि वा किला म्तु" (कॉफी मळ्यांमधील कोणत्याही स्त्रीचं लैंगिक जीवन कोणत्याही पुरुषाच्या आधीन असतं.) ही म्हणच प्रसिद्ध असल्याचंही इथे आवर्जून नोंदवण्यात आलं आहे. यांसारख्या उदाहरणावरून हा रोग किती खोलवर गेलाय, हे लक्षात येईल.
एखाद्या स्त्रीने नकार दिला तर विनाकारण तिच्यावर ओरडायचं, तेही तिच्या कुटुंबासमोर, मुलांसमोर, समजा तिने संबंध ठेवण्यास नकार दिला तर कॉफी मळ्यावर राहण्यास जागा द्यायची नाही, इत्यादी अनेक प्रकार तिथे चालतात. कैकदा काम सुरू असतानाच संबंध ठेवले जातात, जेणेकरून मुकादम इत्यादी मंडळी लगेच 'मोकळी' होतील.
अशी ही कॉफीची काळी गाथा आहे. तिचं सेवन करणाऱ्याला तजेला मिळतो हे खरं, पण मळ्यात कष्ट करणाऱ्या मजुरांना व अल्पभूधारक उत्पादकांना विशेष काही हाताला लागत नाही. ही रड शेतीक्षेत्रातच तशी सार्वत्रिक आहे. जागतिक कॉफी उद्योगात ब्राझील व व्हिएतनामच्या तुफान उत्पादनापुढे आफ्रिकेचा पाड लागणं तसंही अवघडच. कॉफीचं उगमस्थान असूनही आज जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनाच्या फारतर दहाबारा टक्क्यांइतकंच उत्पादन तिथे होतं. त्यामुळे उत्पादन काय न त्याचं नियमन काय, सर्वच पातळ्यांवर आनंदी आनंद आहे. भरीस भर म्हणून कामगारांचं सर्वच पातळ्यांवर होणारं शोषणही आहेच.
आता हे सर्व वाचून तोंडातील कॉफी कडू होईल का?
म्हणजे तशी ती व्हावी का?
नाही झाली तर तुम्ही दगड किंवा अपार स्वार्थी ठराल का?
मला यांपैकी कोणत्याही प्रश्नाचं नेमकं उत्तर माहीत नाही. कॉफी माझा जीव की प्राण आहे हे खरंच, आणि लेखाच्या निमित्ताने हे सर्व वाचून सुन्न व्हायला झालं हेही खरंच. पण त्यापलीकडे मी काय सांगू? या लेखाच्या निमित्ताने आफ्रिकेतील कॉफीचं एक अज्ञात, दुर्लक्षित विश्व मी वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तो जमलाय की नाही हे शेवटी वाचकच ठरवतील, इतकंच मी सांगू शकते.
संदर्भ :
• https://verite.org/africa/explore-by-commodity/coffee/
• https://www.afdb.org/fileadmin/uploads/afdb/Documents/Publications/4-Cof...
• https://agoa.info/images/documents/5157/Ethiopian_Coffee_Industry_Value_...
• https://laborrights.org/sites/default/files/publications-and-resources/K...
• https://www.heifer.org/blog/newsworthy/rooted-in-racism-coffees-bitter-o...
• Coffee - a Dark History. Antony Wild.
• The Devil's cup - Coffee, the driving force in History. Stewart Lee Allen.