कालातीत मूल्यांच्या शोधात अरुण खोपकर

 #अरुणखोपकर #निबंध #संकीर्ण #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

कालातीत मूल्यांच्या शोधात अरुण खोपकर

- - भूषण निगळे

अनुनाद काळकल्लोळ

मराठी भाषेचे निबंधांचे संचित समृद्ध आहे. लोकहितवादी आणि महात्मा फुलेंपासून सुरू झालेली मराठी गद्य निबंधलेखनाची परंपरा विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून आचार्य जावडेकर, नरहर कुरुंदकर, इरावती कर्वे, दुर्गा भागवत ते अरुण टिकेकर, मकरंद साठे यांच्यापर्यंत अनेक विचारवंतांनी विकसित केली आहे. एक मध्यवर्ती विषय बीजभूत ठेवून संलग्न विचारांना जोडत आणि मुद्द्यांचा अन्वय करून निबंधलेखक वाचकांना नवीन विचारसूत्रांची ओळख करून देतात. कधी मनोरंजन तर कधी नवीन ज्ञान – क्वचित दोन्ही – मिळत असल्यामुळे निबंध ही संज्ञा जरी मागे पडली असली तरी अजूनही निबंधांचा घाट वाचकप्रिय आहे.

मात्र या शतकात मराठीत निबंधशैलीच्या घाटात नवीन प्रयोग होण्याचे प्रमाण कमी झालेले दिसते. छापील माध्यमांतून आक्रसलेली जागा - रविवारच्या पुरवणीतील कमी पाने, 'अंतर्नाद'सारखी बंद पडत चाललेली मासिके - हे यामागचे एक कारण आहे, तर समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचकांचे रोडावलेले अवधान हे दुसरे. ('ऐसीअक्षरे'वरील काही लेख, उदाहरणार्थ,२०२२ दिवाळी अंकातील पंकज भोसलेंचा बहुमाध्यमी निबंध, आणि 'साधना साप्ताहिक'सारखे अपवाद या आखुडलेल्या प्रयोगशीलतेतून वगळावे लागतील. 'केशवरावांशी गप्पा' यासारख्या संवादानात्मक निबंधांपासून ते केवळ दोन-तीन वैचारिक लेखांनाच वाहिलेले विशेषांक असे 'साधना'चे उपक्रम स्तुत्य आहेत.) समाजमाध्यमांवर शब्दांचे पेव फुटले असले तरी अस्सल, पुरोगामी विचारांची वानवा असते हा विरोधाभास आहे. शिवाय वाढत्या एकाधिकारशाहीमुळे, विचारस्वातंत्र्यावर आलेल्या बंधनांमुळे आणि लोकांच्या भावना दुखावण्याचा भीतीमुळे निबंधलेखक 'स्वसेन्सॉरशिप'ला बळी पडून विवादास्पद विषयांपासून दूर राहतात. वैचारिक आणि गंभीर लेखांचे महत्त्व उतरणे हे मराठी समाजाच्या ढासळलेल्या बौद्धिक आरोग्याच्या कळीच्या मापकांपैकी एक आहे.

या निराशाजनक पार्श्वभूमीवर अरुण खोपकर यांच्या अनुनाद आणि कालकल्लोळ या दोन नवीन निबंधसंग्रहांचे प्रकाशन आणि या जोडपुस्तकांचे झालेले उत्स्फूर्त स्वागत ही दिलासादायक बाब आहे. थोड्याच कालावधीत एका विषयाला जोडून दोन पुस्तके निघावीत असे खोपकरांच्या बाबतीत नवीन नाही. २०१३ साली त्यांची चित्रव्यूह आणि चलत्चित्रव्यूह ('ऐसीअक्षरे'च्या २०१३च्या दिवाळी अंकात 'चिंतातुर जंतू' यांनी या पुस्तकांची उत्कृष्ट ओळख करून दिली आहे;) तर २०१४मध्ये त्यांनी संपादित केलेली चित्रभास्कर आणि रंगभास्कर ही जोडपुस्तके प्रकाशित झाली होती. विषयांच्या निवडीत दाखवलेली प्रयोगशीलता आणि अभिरुची, आशय वाचकांपर्यंत सुस्पष्टपणे पोहोचवण्यासाठी नेमकी शब्दयोजना, आणि निर्भीड, रोखठोक भाषाशैली या वैशिष्ट्यांमुळे खोपकरांची ही पुस्तके अल्पावधीतच चोखंदळ वाचकांच्या 'वाचलीच पाहिजे' यादीत पोहोचली.

जोडीतील सुट्या पुस्तकांचे अस्तित्व स्वतंत्र जरी असले तरी त्यांची निर्मितीप्रक्रिया समान असल्यामुळे आधीच्या पुस्तकातील विषयसूत्रांना कधी छेद देत तर कधी विस्तार करीत लेखक त्याचे चिंतन विकसित करू शकतो. खोपकरांच्या या दोन्ही पुस्तकांतील काही विषय समउत्क्रांत झाले आहेत तर काहींचे वळणमार्ग वेगळे आहेत, आणि खोपकरांच्या विचारविश्वाची बहुमार्गी प्रगती या जोडपुस्तकांतून वाचकांना प्रतीत होते. मराठीतील वैचारिक निबंधांची तेजस्वी परंपरा ही जोडपुस्तके पुढे नेत असल्यामुळे त्यांच्या प्रभावक्षेत्राची आणि समकेंद्री अर्थवलयांची वाचकांना ओळख करून द्यावी हा या लेखाचा उद्देश आहे.

'अफलातून आणि अथांग'

अरुण खोपकर हे एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सिनेदिग्दर्शक, कलाआस्वादक, विचारवंत, आणि भाषांचे अभ्यासक ही त्यांच्या ओळखीची काही रूपे पाहता 'अफलातून आणि अथांग' असे त्यांचे वर्णन कुमार केतकर यांनी केले आहे. गेल्या दोन दशकांत मात्र त्यांच्या ओळखीचे लेखक हे आमुख प्रामुख्याने पुढे आले आहे. गुरुदत्तवरच्या त्यांच्या पुस्तकाचा 'गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसमीक्षेत एकच पुस्तक अढळपद मिळवून आहे आणि ते म्हणजे अरुण खोपकरांचं 'गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका' असा गौरव ख्यातनाम सिनेसमीक्षक गणेश मतकरी यांनी केला आहे. वाचनीय, रोचक शैलीत खोपकर बुद्धीवादी, तर्कसुसंगत विवेचन करत असल्यामुळे वाचकांच्या त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात.

प्रचंड व्यासंग, जागतिक सिनेमाचे अध्ययन, नऊ भाषांत प्रावीण्य असल्यामुळे त्या भाषांतील वाङ्‌मयाचा थेट आस्वाद घ्यायची शक्यता, आणि संगणक ॲनिमेशन ते पर्शियन हस्ताक्षरसौंदर्यकलेसारख्या अनेक विषयांत त्यांना रुची आहे. सखोल चिंतनातून खोपकर प्रकट होत असल्यामुळे त्यांच्या लेखनातून वाचकांना वैचारिक आनंद तर मिळतोच, पण नवीन विषयांची ओळख झाल्यामुळे त्यांचे निबंध वाचल्यावर एखादे क्षुधावर्धक घेतल्यावर भूक चाळवते तशी वाचकांची ज्ञानतृष्णा वाढते.

अनुनाद आणि कालकल्लोळमधल्या विस्तीर्ण, समग्रलक्षी पटातून खोपकरांची ही सामर्थ्ये उठून दिसतात. मारिआ मोलिनेर या स्पॅनिश भाषाकोशकर्तीवर गाब्रिएल गार्सिआ मार्केसने लिहिलेल्या संवेदनशील श्रद्धांजलीचा स्वतः केलेला मराठी अनुवाद (जो इंग्रजीतही उपलब्ध नाही) खोपकरांनी अनुनादमध्ये समाविष्ट केला आहे, तो वाचून मार्केसबद्दल आत्मियता वाटणाऱ्या वाचकांना अतीव समाधान वाटेल. सिनेमा या कलाप्रकारावरचे खोपकरांचे सर्वांगीण आणि प्रत्यक्ष ज्ञान त्यांचा क्लविचार प्रगल्भ करते, आणि त्यामुळे संत तुकाराम या मानदंड ठरलेल्या मराठी चित्रपटाच्या त्यांच्या रसग्रहणाला खोली लाभते. खोपकरांच्या वैचारिक लोलकातून येणारा सप्तरंगी ज्ञानप्रकाश उपेक्षित विषयसूत्रांना उजळवून तर टाकतोच, पण अनेक परिचित व्यक्ती-संकल्पनांच्या नवीन बाजू सामोऱ्या आणतो.

विषयांचा एवढा विस्तृत परिप्रेक्ष्य पाहता वाचक तपशीलांत हरवून जायची शक्यता असते. '१९६०-७०च्या मुंबईचे सांस्कृतिक चित्र' हा विषय घेतला तर मुंबईची कलासंस्कृती, तिथल्या सांस्कृतिक संस्था, कवी-रंगकर्मी-चित्रकार यांची अंगुष्ठाचित्रे, मुंबईतील मनस्वी आणि ओजस्वी व्यक्तिमत्त्वे, सामाजिक-राजकीय चळवळी हे उपविषय येतात. या विस्तीर्ण कॅनव्हासवर रेखाटलेले चित्र अबोध आणि निर्जीव वाटू शकते. हा धोका टाळायला खोपकरांनी निवडलेले 'दीर्घघाटी निबंध' (इंग्रजीत लाँग फॉर्म एसे') हे संघटनतत्त्व मराठी निबंधांच्या उत्क्रांतीतील पुढचे पाऊल आहे. फारतर ३०-४० पानांत अडकलेल्या मराठी निबंधांना पुस्तकलांबीचा अवकाश खोपकरांनी दिला आहे. या अवाढव्य अवकाशातल्या घनदाट विचारवनात वाचकांना हरवून न देता त्यांना गंतव्य ठिकाणी सुरक्षितपणे आणण्याचे खोपकरांचे कसब त्यांच्या प्रयोगशीलतेला अधोरेखित करते.

साध्या निबंधात एखादा बीजभूत विषय – व्यक्ती, घटना, विचार — लेखक विस्तारित नेतो. कसबी निबंधलेखक एखाद्या अवघड विषयावर सर्वांगीण विचार करून त्या विषयाचे कंगोरे पाडत, विविध पैलूंवर प्रकाश टाकत वाचकांना तो विषय समजायला मदत करतो. ८०० ते १५०० शब्द ही साधारण निबंधांची शब्दमर्यादा वाचकांना विषयाचे प्राथमिक ज्ञान द्यायला पुरेशी पडते. पण विषय व्यामिश्र असला तर आशय वाचकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवायला ही मर्यादा तोकडी पडते.

उदाहरणासाठी 'ध्वनी' हा विषय घेतला तर ध्वनीचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित करण्यासाठी लेखक काय करू शकतो? ध्वनीच्या ताल-नाद-लय या रूपांची सुटी ओळख, गर्भात असल्यापासून या रूपांचे अस्तित्व जाणवणे, वय वाढते तशी ध्वनीअभिरुची विकसित करून घेणे, ध्वनीचा वापर कलाप्रकारांत कसा केला जातो, दिग्गज कलाकारांनी मूळ कलाप्रकाराला उठाव देण्यासाठी ध्वनीचे कसे उपयोजन केले आहे हे सारे पैलू महत्त्वाचे ठरतात. या आयामांचे रसग्रहण सोपे व्हावे यासाठी नेमक्या, वेचक उदाहरणांची जोड देणे आवश्यक ठरते – तसे न केल्यास असा निबंध म्हणजे ज्ञानकोशातील एखाद्या नोंदीसारखा होतो.

याचे कारण म्हणजे ज्ञान आणि आकलन यांतील फरक कुशल निबंधलेखकाने ओळखलेला असतो. विदेतून माहिती निर्माण होते आणि माहितीतून ज्ञान. पण कोरडी माहिती किंवा तपशील हवे तर वाचक विकिपीडियालाही भेट देऊन माहिती गोळा करू शकतात. आकलन करून घेण्यासाठी मात्र झटावे लागते : माहितीच्या सुट्या घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध शोधणे, त्यांच्यातील कार्यकारणभाव तपासणे, वरकरणी विरोधाभासी वाटणाऱ्या विदाबिंदूंतील एकोपा धुंडाळणे आणि या प्रयासातून तळपणाऱ्या विचारशलाकांना पारखणे, एवढे सारे परिश्रम घ्यावे लागतात – तज्जन्य ज्ञान मग श्रमपरिहार ठरते. उत्कृष्ट निबंध हा वाचकांना निव्वळ त्यांचे ज्ञान वाढवण्याचा करार नसतो; तर त्यांना विचारव्यूहात हरवून जायला दिलेले आमंत्रण असते. दोन तांबे अंगावर ओतून अंग भिजतेही. पण तो आंघोळीचा उपचार ठरतो. डोहात डुंबून, तासभर पोहून आल्यानंतर मिळणारे समाधान अवीट असते. उत्कृष्ट निबंध वाचकांना असे आत्मिक समाधान देतात.

एकूणचअसे वैचारिक परिश्रम करायला लावणारे दीर्घघाटाचे कलाप्रकार मानवी मनावर खोलवर परिणाम करतात. भारतीय महाकाव्ये किमान दोन सहस्त्रके भारतीय जनमानसावर अधिराज्य करत आहेत. एकेका पदाला नऊ वेळा 'वन्स मोर' घेत रात्रभर चालणारी संगीत नाटके मराठी शहरी संस्कृतीचा एकेकाळी मानदंड होती. फुटकळ आयपीएल सामन्यांचा फड दरवर्षी लागतो पण मौसम संपला की त्याचे महत्त्व शून्यवत असते; अटीतटीचे कसोटी सामने दशकांचा काळ उलटला तरी धावफलकांसकट क्रिकेटप्रेमींच्या लक्षात असतात.

मात्र दीर्घघाटी शैली म्हणजे फापटपसारा मांडण्याचा परवाना नव्हे. अनके दर्जाहीन चित्रपट तीन तासांहून अधिक लांबीचे असतात, अनिर्णित कसोटी सामने बहुतांशी निरस ठरतात. वैचारिक गोंधळ लपवायला, बचावात्मक आणि बोटचेप्या धोरणाच्या आड लपायला, आणि सैद्धांतिक गुर्मी दाखवायला पाल्हाळ मांडणे सोपे असते. शिवाय विचारांची शृंखला सतत लांबवत नेल्यास वाचकांचे अवधान हरवण्याची शक्यता असते : निबंध म्हणजे नुसतीच माहितीचे संलकन आणि विस्कळित घटनांची जंत्री नव्हे. एकीकडे विचारांची खोली आणि व्याप्ती आणि दुसरीकडे मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखावे लागते.

हे संतुलन, विषयात खोलवर जाऊन निमग्न होणे, आषयसूत्राला भरपूर अवकाश देत विकसित करणे, चढउतारांची नैसर्गिक लय शोधणे, उपविषयांना एका विशाल जाळ्यात संघटित करणे आणि या विचारजालाचे आकलन करून देण्यासाठी अनेक आवर्तने करत शंभरशेकडो शब्दांचा वापर करणे ही आयुधे कौशल्याने वापरली तर प्रज्ञावंत निबंधलेखक काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'ध्वनीमहात्म्य' हा 'अनुनाद'मधला दीर्घघाटी शैलीतील प्रबंध.

अतिपरिचयामुळे एखाद्या व्यक्तीची अवज्ञा व्हावी तसेच ध्वनीचे आणि आपले झाले आहे. सर्वांगाला व्यापणाऱ्या ध्वनीची संवेदना गर्भाशयातल्या पिंडावस्थेपासून ते अखेरच्या पिंडदानाच्या आधीपर्यंत सतत आपल्या सोबत असल्यामुळे ध्वनीविचाराचा वेगळा विकास करण्याची गरज भासत नाही. ध्वनीला मिळणारी ही सावत्र वागणूक खोपकरांच्या सुरेल शब्दसिम्फनीने कमी होईल. खोपकरांनी 'ध्वनीमहात्म्य'मध्ये सिनेमातंत्रातल्या ध्वनीशी निगडित महत्त्वाच्या पायऱ्यांचा आढावा जरी घेतला असला तरी सिनेध्वनी हे त्यांनी ध्वनीसंवेदनेचे आयाम उलगडून दाखवायला घेतलेले माध्मय आहे. दृश्यबाधित आणि दृश्यमुक्त ध्वनी, सिंक्रोसिस-फ्लॅशबॅक-डबिंग यांसारखी तंत्रे, या तंत्रांची दिग्दर्शकाला-कलाकारांना-पटकथालेखकाला अभिव्यक्तीत होणारी मदत, ध्वनिश्रवणशास्त्राची संगणकामुळे झालेली प्रगती असे अनेक उपविषय वापरत खोपकर ध्वनीचे अलौकिक महत्त्व उलगडून दाखवतात. हे विषय आणि संज्ञा समजावून द्यायला एकाहून एक वरचढ उदाहरणे खोपकरांनी वापरलेली आहेत.

उदाहरणार्थ, ऋत्विक घटक यांच्या अजांत्रिक या चित्रपटात ध्वनीची मोलाची भूमिका कशी मोलाची ठरते हे खोपकरांनी दाखवले आहे. चित्रपटातील बिमल या टॅक्सीचालकाचे त्याच्या जुन्यापुराण्या टॅक्सीशी – बिमलने तिला 'जगद्दाल' असे नाव दिले आहे – असलेले प्रेमाचे नाते ध्वनीतून कसे उलगडत जाते याचे वर्णन त्यांनी ज्या उत्कटतेने केले आहे त्यावरून त्या दोन्ही व्यक्तिरेखांशी वाचक तादात्म्य पावून जातो. चित्रपटाच्या शेवटी भंगारात गेलेल्या जगद्दालचा भोंगा दुःखी बिमलला ऐकू येतो. भोंगा एक लहान मूल वाजवत असते. 'पदार्थ म्हणून झालेल्या मृत्यूनंतर ऊर्जा म्हणून बालकाबरोबर तिचे नवजीवन सुरू होते' असे खोपकर जेव्हा लिहितात, तेव्हा चित्रपटाचा कथात्मक आर्क दिसतोच, आणि पुस्तकाच्या पानांतून तो भोंगा संवेदनशील वाचकाला ऐकू येतो. अशीच द्योतक उदाहरणे निबंधभर येतात : आल्फ्रेड हिचकॉक, सत्यजित रे, वॉल्ट डिस्ने यांचा सिनेमा, 'घाशीराम कोतवाल' नाटकाचे भास्कर चंदावरकर यांनी दिलेले संगीत, व्हॅन गॉफ, ॲनीमे, आणि मांगा शैलींतील चित्रे, बालकवींची कविता, गोवळकोंडाचे ध्वनीस्थापत्य : यांतील प्रत्येक फाटा हा स्वतंत्र निबंध होऊ शकतो.

'ध्वनीमहात्म्य' हा १०४ पानांचा प्रबंध आहे तर 'दूरचे प्रतिध्वनी' हा जोडनिबंध वीस पानांचा. एवढे वैचारिक श्रम घेऊनही वाचकांची वैचारिक दमछाक होत नाही. खोपकरांनी निर्मिलेल्या ध्वनीशिल्पाचे परिशीलन हे त्यांच्या प्रभावी शैलीमुळे आणि विषयावरच्या स्वानुभवाने घटवलेल्या पकडीमुळे आनंददायक ठरते. एखाद्या अवघड चालीवरचे गाणे 'कानकीडा' होऊन दोन-तीन दिवस कानात रुंजी घालते आणि मग आपण ते विसरून जातो. पण 'ध्वनीमहात्म्यातील' सिम्फनी सखोल चिंतनातून उद्भवली आहे. ती ऐकून, मनात घोळवून आणि तिच्यातल्या जागा शोधत सम्यक आकलनानंतर वाचकांची ध्वनीदृष्टी कायमची बदलून जाते. सिनेमा-मालिकाच नव्हे तर दैनंदिन जीवनातील आवाज-कल्लोळ-आक्रोश-टाहो ऐकायला नवीन कान वाचकांना मिळतात. या कर्णविस्तारामुळे 'ध्वनीमहात्म्य' हा मराठीतील सर्वश्रेष्ठ निबंधांपैकी एक होऊन जातो. वाचक ध्वनीचे सौंदर्य ओळखायला शिकतो तसेच ध्वनीची झालेली ओळख वाढवायला संलग्न विषयांचा वेध घ्यायला उत्सुक होतो.

संस्था आणि कलासंस्कृती

अनुनादमध्ये विकसित झालेली दीर्घघाटी निबंधशैली खोपकरांनी 'कालकल्लोळ'मध्ये पूर्णत्वाला नेली आहे. कालकल्लोळ मधील सहापैकी दोन निबंध शंभराहून जास्त पानांचे आहेत तर इतर सरासरी ४० पानांचे. 'विस्तारणारी वर्तुळे' आणि 'तीन किरणकेंद्रे' या दोन भागांत संग्रहाचे आयोजन केले आहे. पहिल्या भागात खोपकरांच्या विस्तारणाऱ्या संवेदनांची जाणीव वाचकांना होते आणि ते खोपकरांचे सहप्रवासी होतात, तर दुसऱ्या भागात या परिपक्व झालेल्या ज्ञानचक्षुंतून सतीश आळेकरांची नाटके, संत तुकाराम हा चित्रपट आणि अरुण कोलटकर यांच्या कवितांतील दृश्य प्रतिमा या तीन विषयांचे सकल दर्शन होते.

विषयांचे सखोल चिंतन करून विचारांच्या प्रदीर्घ भूभागात वावरत असल्यामुळे निवडलेल्या मध्यवर्ती कल्पनेचा विस्तार करणे खोपकरांना शक्य होते. या शक्यता अरुण कोलटकर यांच्या कवितेवरच्या निबंधात खोपकरांनी आजमावलेल्या आहेत. कोलटकर यांच्या कवितांचा महिमा सतत वाढत आहे आणि त्यांच्या कवितांचे विश्लेषण करणे हे समीक्षकांना नेहमीच आव्हानात्मक वाटले आहे. भालचंद्र नेमाडेंनी 'इराणी' या कोलटकरांच्या कवितेचे दोन वेगवेगळ्या प्रबंधांतून पृथक्करण केले आहे: साहित्याची भाषा (१९९०) आणि टीकास्वयंवर (१९९४). नेमाडेंचे विश्लेषण वस्तुनिष्ठ पद्धतीचे असल्यामुळे कवितेची बाह्यरचना, शब्द-प्रतिमांची निवड, कवितेचे अंतस्तरातून होणारे साद-नाद या भाषाशास्त्रीय तंत्रांची निवड त्यांनी केली आहे.

खोपकरांनी मात्र 'दृश्यकलांचा वापर' हा दृष्टिकोन निवडून कोलटकर यांच्या कवितेचे आगळेवेगळे रूप समोर आणले आहे. चलत–स्थिर प्रतिमा, रंग–रेषा–परिप्रेक्ष्य ही अवजारे, आणि चौकट(फ्रेम)–प्रतिमा–आकार आणि दृष्टीक्षेत्राची खोली यासारख्या सिनेमॅटिक तंत्रांचा कोलटकरांनी वापर करून कविता कशा निर्मिल्या याचे विवेचन खोपकरांनी केले आहे. उदाहरणार्थ,

सिगारेट पेटवून बेकार ठेवतो जळणारी काडी
चहाच्या वर्तुळात जी उठून बसते विझताना जरा.
अगत्यशील जशी लाश बर्फाच्या लादीवर उघडी
समशीतोष्ण कोणी आलासे वाटताच सगा सोयरा.

या ओळींत असलेल्या धारदार दृक्‌प्रतिमा (विझताना वाकडी होणारी काडी, तिची लाश होणे) क्लोजअप्स कशा आहेत आणि या प्रतिमा 'विशिष्ट चौकटीत, विशिष्ट लेन्समधून आणि विशिष्ट दृष्टिकोनातून दिसतात' याचे दिग्दर्शन खोपकर सफाईने करतात. 'इराणी' कवितेचे हे 'सीन बाय सीन' विश्लेषण वाचकांना मुंबईतल्या नामशेष झालेल्या 'इराणी हॉटेल' या संस्थेत नेते आणि अनोखा दृष्टिकोन देते.

खोपकर आणि कोलटकर यांची अनेक दशकांची दाट मैत्री होती. त्यामुळे कोलटकर त्यांच्या प्रत्येक कवितेमागे किती श्रम घेत असत, कवितांसाठी वर्षानुवर्षे कसे संदर्भ गोळा करत, जाहिरातक्षेत्रातले शिखरस्थान सोडून त्यांनी कवितेसाठी आयुष्य कसे समर्पित केले होते याचे लेखाच्या शेवटी येणारे वर्णन वास्तवदर्शी आणि सचोटीचे झाले आहे. कोलटकरांच्या प्रभादेवीतल्या घराचे वर्णन भावपूर्ण आहे: तुकारामापासून ते बॉब डिलनसारखे कवीमित्र कोलटकरांच्या घरी त्यांची (अर्थातच आभासी, पण प्रत्यक्षाहून खरी वाटणारी) भेट कशी घेत असत हे वाचून वाचकाला आधी हसू फुटेल - आणि मग पापण्यांच्या कडा ओलावतील. चारोळीला महाकाव्य समजण्याचा समाजमाध्यमांचा सध्याचा ट्रेंड पाहता आणि कोलटकरांचे आयुष्य पाहता एक युग संपल्याची चुटपुट वाचकाला वाटेल.

नेमकी अशीच सल 'ये बॉम्बे है मेरी जान' हा साठोत्तरी मुंबईवरील दीर्घलेख वाचून वाटू शकते. १९६०-७०च्या काळातील मुंबईचे विलक्षण गतिमान आणि थरारक चित्र खोपकरांनी चितारले आहे. एखादा कुशल सिनेसंकलक तुकड्यातुकड्यातून संलग्न चित्रपट जसा निर्माण करतो तसे हृद्य घटना आणि व्यक्तिचित्रांतून खोपकरांनी मुंबईचे सिनेमॅटिक दर्शन वाचकांना दिले आहे : मनोहर सप्रे, भाऊ पाध्ये, विलास सारंगांसारख्या ज्ञात, आणि आनंद, बॉबी यांसारख्या अज्ञात व्यक्ती, जहांगीर आर्ट गॅलरी, सामोवार कॅफे, रिदम हाऊस सारख्या संस्था, जॅझ म्युझिक, दलित साहित्य आणि रात्रभर चालणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलींसारखे कलाप्रकार. 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'पासून माटुंगा लेबर कॅम्प ते नशाचरांच्या अड्ड्यांपर्यंत खोपकरांचा सहजसुंदर वावर असल्यामुळे मुंबईचे भौगोलिक-आर्थिक-सांस्कृतिक असे विविधांगी दर्शन वाचकांना होते. (मुंबईची आताची सर्वांगीण बकाली पाहता तिच्या गतकालीन सांस्कृतिक समृद्धीचे हे वर्णन तरुण वाचक ललित समजून वाचू शकतील हा धोका आहे.)

मात्र खोपकर स्मरणरंजनात गुंग होत नाहीत. काळाच्या ओघात तंत्रज्ञानातील आणि अभिरुचीतील होणाऱ्या बदलामुळे शहरे-व्यक्ती-संस्था मागे पडणे अटळ असल्याची जाणीव त्यांना आहे आणि 'पूर्वी सारे छानछान होते' हा पवित्राही त्यांना घ्यायचा नाही. खोपकरांना शोध घ्यायचा आहे तो कालातीत मूल्यांचा. एखाद्या कृष्णविवराजवळ काळ मंदावतो आणि कमी गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात वेगाने जातो. जडबंबाळ आठवणींच्या कृष्णविवरात खोपकरांना सापडायचे नाही आणि हलकाफुलक्या गोष्टींच्या मोहात अतिवेगाने थिरकायचे नाही. काळाच्या कैदेत न सापडता खोपकरांच्या प्रतिभेचा विहार चालू असतो : कधी स्वतःभोवतीच वर्तुळाकर गिरक्या घेऊन परतपरत त्याच ठिकाणी येत तर कधी नागमोडी वळणे घेऊन फिरते. या मुक्त संचारामुळे शाश्वत मूल्यांचा शोध घेणे त्यांना शक्य होते.

सत्य, सौंदर्य, आणि सहिष्णुता

खोपकरांची सौंदर्यदृष्टी उच्चकोटीची आहे हे पानोपानी जाणवते. कवितांचा, नाटकांचा, आणि साहित्यकृतींचा रसास्वाद ज्या मोकळेपणाने ते घेतात त्यातून ती दिसतेच, पण त्यांच्या शब्दनिवडीतून आणि वाक्यरचनेतून, भाषाशैलीतूनही ती अभिप्रेत होते: वाक्यावाक्यावर त्यांनी घेतलेले परिश्रम जाणवतात. नुसत्या घाट आणि शैलीतच नव्हे तर शब्दांच्या वापराचे प्रयोगही खोपकरांनी समर्थपणे पेलले आहेत: मग ते 'आघाडीचे गार्दी' सारखे ('Avant Garde' साठी यॊजलेले) शब्दप्रयोग असोत, किंवा 'विश्वनाभी' असे कोलटकरांच्या घराचे केलेले वर्णन असो. शक्तिशाली क्रियापदे, वेचक नामे, आणि वेधक शब्दप्रयोग वापरल्यामुळे त्यांची वाक्य स्मरणात राहतात. मराठीला जो इंग्रजी-हिंदी शब्दांचा अतिवापर करण्याचा रोग जडला आहे त्याची लागण त्यांना झालेली नाही, तरीही इंग्रजी संज्ञांना त्यांनी वापरलेले प्रतिशब्द खटकत नाहीत. कथनाच्या गतीतही बदल केल्यामुळे वेळेच्या तन्यतेचे प्रयोग त्यांना करता येतात : साठोत्तरी मुंबईवरच्या निबंधात प्रसारित झालेला काळ कसौलीवरच्या पुढील निबंधात केवळ दोन दिवसांत आकुंचित होतो, पण त्या घटनांचे पडसाद अनेक दशके ऐकू येणारे असतात.

हीच सौंदर्यदृष्टी दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीत दिसते. पुस्तकांचे बाह्यरूप विलक्षण देखणे आहेच, शिवाय उच्च निर्मितीमूल्ये आणि पुस्तकनिर्मितीच्या प्रत्येक पायरीवर घेतलेली मेहनतही जाणवते. विकास गायतोंडे या जाहिरात क्षेत्रातल्या मातब्बर व्यावसायिकाचा वरदहस्त लाभल्यामुळे जोडपुस्तकांचे ग्रंथरूप मनात भरते आणि वाचक बराच वेळ ग्रंथ नुसता हातात धरून ठेवतात. ग्रंथातील रूपाभिमुखता मुख-मलपृष्ठापासूनच प्रतीत व्हायला सुरुवात होते. प्रकाशक श्री. कोठावळे यांनीही पुस्तकाच्या निर्मितीत कसूर न ठेवल्यामुळे खोपकरांच्या प्रतिभेला दोन्ही पुस्तकांची ग्रंथरूपे न्याय देतात. (दोन्ही पुस्तकांना सूची नसल्याचे मात्र खटकते. ही उणीव पुढील आवृत्ती दूर करता आली तर बरे.)

एक वेळेस सौंदर्यदृष्टी प्रयासाने विकसित करून घेता येते. तथापि अशी ही वरवरची सौंदर्यदृष्टी कुचकामी ठरू शकते. सुंदर, पण व्यामिश्र वास्तवातले सत्य शोधणे दुरापास्त असते. फॅसिस्ट शक्तींना व्यामिश्रतेची भीती वाटते : एक धर्म, एक भाषा, आणि एक संस्कृती अशी बाळबोध मांडणी केली की संदिग्ध, न पेलवणाऱ्या सत्यांकडे दुर्लक्ष करता येते. विरोधी मतांतले सत्य शोधणे अवघड असते – त्यापेक्षा सर्वोच्च महानेत्याचा जयघोष करत त्याचा शब्द प्रमाण मानणे हे सोपे असते. व्यक्ती-माहिती-घटनांचा परस्परसंबंध जाणून त्यांतील समान तत्त्वे शोधायला, वेगवेगळ्या संस्कृतींची आणि परंपरांची बलस्थाने ओळखायला, प्रश्नांच्या खाचाखळग्यांतून सत्याचे अन्वेषण करायला बौद्धिक परिश्रम तर लागतातच, पण मानवी जीवनावर विलक्षण निष्ठाही असावी लागते. तेवढा वेळ हल्ली कोणाकडे असतो?

सध्या सांस्कृतिक-भाषिक-धार्मिक सपाटीकरण ज्या वेगाने चालू आहे ते पाहता समाजाचे वैचारिक नेतृत्व किंकर्तव्यमूढ होणे साहजिक आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या 'निबंधमाले'ला जवळजवळ १५० वर्षे झाली, तरी आता मनू पूर्णपणे पालटला आहे असे म्हणणे धार्ष्ट्याचे होईल (नाहीतरी काही न्यायालयीन निवाड्यांतून मनुस्मृतीचे पुनरागमन झाले आहेच!). अशा स्थितिशील वातावरणात विचारलकव्याने पीडित न होता खोपकरांसारख्या कृतिशील सत्यशोधकाने सहिष्णुतेचा मार्ग निवडलेला दिसतो.

सहिष्णुता म्हणजे निव्वळ परधर्म आणि परसंस्कृतींना सहन करणे नव्हे. सहिष्णुता ही इतरांतील चांगले ओळखण्याचे व शक्य तेवढे आत्मसात करणे करण्याची जीवनदृष्टी आणि जीवनशैली आहे. सहिष्णू व्यक्ती सौंदर्य आणि सत्य यांची भोक्ती असते – मग ते स्वधर्मातील असो किंवा परसंस्कृतीतील, आणि स्वतःच्या संस्कृतीतील समर्थस्थळांबद्दल परिचित असल्यामुळे विलक्षण सुरक्षित असते.

म्हणूनच खोपकर 'पर्शियन मिनिएचर' या लेखात अक्षांश-रेखांशांच्या कृत्रिम रेषा ओलांडून थेट इराणमधील इस्फाहान शहरातील नागरी सभ्यतेचा आनंद घेऊ शकतात आणि त्याच सहजतेने पर्यटकांच्या दृष्टीपलीकडल्या पॅरिसमध्ये रमतात. पाश्चात्त्य संस्कृती म्हणजे केवळ अँग्लोअमेरिकन संस्कृती नसल्याची सकर्मक जाणीव त्यांच्या फ्रेंच, जर्मन आणि रशियन भाषांच्या अभ्यासातून दिसते. विविध संस्कृतींतील सौंदर्यांचे नाते शोधता त्यांना जपानी चहापान समारंभाचे सौंदर्य प्रतीत होते आणि मग वात्स्यायनाच्या लेखनाची आठवण येते. विसाव्या शतकातील सर्गेई आयझेनश्टाईनसारख्या महान रशियन सिनेदिग्दर्शकाच्या सिनेविचारांचे प्रतिध्वनी त्यांना नवव्या आणि दहाव्या शतकातील आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त सारख्या काश्मिरी शैव तंत्रिकांच्या कलाविचारांत ऐकू येतात.

सहिष्णुवृत्तीने सौंदर्य शोधत आणि पारलौकिक सत्याचे अंतःसेचन करत खोपकारांची विश्वदृष्टी विकसित झाली आहे. सत्योत्तरी समाजात सत्याचा ध्यास घेणे; बटबटीत, बत्थड सभोवतालात सौंदर्याचा शोध घेणे, आणि सध्याच्या धश्चोट वातावरणात सहिष्णुता जपणे, या साऱ्यांसाठी धैर्य लागते. मराठी समाजाच्या सध्याच्या मूलभूत समस्या वैचारिक निबंधांनी संपणार नाहीत. पण खोपकरांची ही विश्वदृष्टी - आणि विश्वश्रुती - आत्मसात करणाऱ्या वाचकाला त्याच्या स्वतःच्या वास्तवाचे सखोल आकलन करून घ्यायची प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)