रंग माझा वेगळा

#क्रीडाजगत #वर्णद्वेष #संकल्पनाविषयक #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

रंग माझा वेगळा

क्रिकेटपटू क्रोम हेंड्रिक्स आणि गोल्फपटू शिवशंकर (पापवा) शिवगुलाम

- संजीव साठे

सन २००२च्या रोम स्टॅच्यूएटनुसार, आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये वर्णभेद (apartheid) हा मानवतेच्या विरुद्ध गुन्हा मानला जाऊ लागला आहे. वर्णभेदाची व्याख्या तेव्हा, 'कुठल्याही एका वंशाच्या लोकांना इतर मुख्य प्रवाहातून वेगळे ठेवून, त्यांना त्यांच्या राजकीय व कायदेशीर हक्कांपासून वंचित करणे, आणि अशी राज्यव्यवस्था राबविण्यासाठी कायदे करणे' अशी केली गेली होती. जगातल्या जवळजवळ सर्वच राष्ट्रांमध्ये या प्रकारचे भेदभाव, त्यावरून होणारे तंटे, वांशिक दंगली, मतभेद, वाद इत्यादी अस्तित्वात आहेत. पण वर्णभेदावर आधारित कायदे करून ते राबविणारे दक्षिण आफ्रिका हे पहिले राष्ट्र. कालांतराने इस्रायलनेही असा कायदा केला. बाकी राष्ट्रांत (यांत भारतही अंतर्भूत आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच) हे भेदभाव अलिखित नियमांच्या व रूढींच्या माध्यमाने केले जातात, परंतु त्याला संवैधानिक स्वरूप दिले जात नाही.

त्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने १९४८मध्ये आपल्या देशात वर्णभेद कायदेशीर केला. आपल्याला ढोबळमानाने हे कायदे म्हणजे 'गौरेतरांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करून त्यांचे शोषण करणे' या एकमेव हेतूने केले गेलेले होते असे माहीत आहे. परंतु, या वर्णभेदामुळे कितीतरी गुणी क्रीडापटूंना त्यांचे गुण दाखविण्याची संधी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर सोडाच, परंतु देशांतर्गत स्पर्धांतही त्यांना संधी न देता, त्यांच्या कामगिरीची दखल न घेता, त्यांना सतत अनुल्लेखाने मारले गेले; हे खूपच कमी जणांना माहीत आहे. 'बेसिल डी ऑलिव्हेरा'सारख्या एखाद्याच खेळाडूला यातून बाहेर पडून, इंग्लंडकडून खेळून स्वतःचे क्रीडाकौशल्य आजमावता आले; त्याचा योग्य उपयोग करून, पैसे कमावून चांगले जीवन जगता आले. पण त्याच्या आधीचे खेळाडू इतके नशीबवान नव्हते.

क्रिकेटपटू क्रोम हेंड्रिक्स आणि गोल्फपटू शिवशंकर (पापवा) शिवगुलाम ही याची ठळक उदाहरणे होत.

क्रोम हेंड्रिक्स पापवा शिवगुलाम
क्रोम हेंड्रिक्स पापवा शिवगुलाम

क्रोम हेंड्रिक्स हा काही निव्वळ 'बरा' क्रिकेटपटू नव्हता, तर त्याची गोलंदाजी खेळलेल्या व पाहिलेल्या काही इंग्रज फलंदाजांनी त्याची तुलना तत्कालीन थोर गोलंदाज फ्रेड स्पॉफर्थ, चार्ली टर्नर, जे. जे. फेरिस, जॉर्ज लोमन आदींशी केली आहे. परंतु, क्रोम हेंड्रिक्सबद्दल लिखित मजकूर फारच मुश्किलीने सापडतो. काही जुन्या सामन्यांची स्कोरकार्ड्स व उतारवयातल्या एका फोटोवरून कल्पना करून, १९३०मध्ये बेला फोरसाय या चित्रकाराने काढलेल्या त्याच्या पोर्ट्रेटव्यतिरिक्त या उपेक्षित, तरीही गुणी क्रिकेटपटूबद्दल काहीही लिखित किंवा दृश्य माहिती उपलब्ध नाही; इतक्या थराला जाऊन तत्कालीन दक्षिण आफ्रिकन सरकारने क्रोम हेंड्रिक्सबद्दलची माहिती, आणि त्याचे एकूण जीवनच दडपून टाकले आहे. क्रोम या शब्दाचा आफ्रिकान्स भाषेत अर्थ होतो 'वेडावाकडा'. हे त्याचे टोपणनाव असावे, किंवा त्याला उपहासाने बोलविण्याकरिता गौरवर्णीय दक्षिण आफ्रिकन्सनी हे नाव ठेवले असावे. किंबहुना, त्याने टाकलेले चेंडू वेडेवाकडे स्विंग व कट होत असल्यानेही त्याला हे नाव दिले गेले असावे. पण १८९० ते १९०० ह्या दशकात क्रोम हेंड्रिक्स हा दक्षिण आफ्रिकेतला सर्वांत वेगवान गोलंदाज होता असे खूप खेळाडूंनी नमूद करून ठेवलेले आहे. त्याने खेळलेले काही तुरळक सामने, ज्यांची स्कोरकार्ड्स पहावयास मिळतात, त्यातली आकडेवारी पाहून याची खात्री पटते. १८९२मध्ये, गोऱ्यांच्या क्लेरमाउंट संघाविरुद्ध खेळलेल्या एका सामन्यात क्रोम हेंड्रिक्सचे गोलंदाजीचे पृथक्करण ९ षटके, ९ निर्धाव आणि ९ बळी असे होते. यावरून फलंदाज त्याची गोलंदाजी किती घाबरून खेळत होते याची कल्पना येईल. क्रोम हेंड्रिक्सचा जन्म १८५७ सालचा. म्हणजे १८९२मध्ये तो पस्तिशीचा होता. या वयात जर फलंदाजांना घाबरवून सोडण्याची त्याची क्षमता अशी होती, तर भरात असताना त्याला कुणीही खेळू शकले नसते. परंतु त्याचा वर्ण चुकीचा होता. त्याचा वर्ण गोरा नव्हता; आणि वर्णद्वेष्ट्या, गोऱ्या दक्षिण आफ्रिकनांना त्याला देशाकडून खेळू न देण्यास तेवढे कारण पुरेसे होते. सामने हरलो तरी बेहत्तर, पण गौरेतर खेळाडू संघात असता काम नये असे तत्कालीन दक्षिण आफ्रिकन राजवटीचे धोरण होते.

क्रोम हेंड्रिक्स हा मलय वंशाचा होता. हा जनसमूह पोर्तुगीज, दक्षिण आशियाई, भारतीय, तुर्की, इत्यादी वंशाच्या लोकांच्या वर्णसंकरातून निर्माण झाला होता. ख्रिश्चन वा मुसलमान धर्माचे हे लोक असत. फ्रँक रोरो, अहमद दिदिये, बेसिल डि ओलिव्हेरा, ओमार हेनरी हे या वंशाचे प्रमुख क्रिकेट खेळाडू.

१८९६ सालात लॉर्ड हॉक इंग्लंडचा संघ घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आला होता. संघात टॉम हेवर्ड (जॅक हॉब्सचा गुरु), सी. बी. फ्राय, सॅमी वूड्स, ह्यु ब्रोमले डेव्हनपोर्ट इत्यादी प्रथितयश फलंदाजांचा भरणा होता. या खेळाडूंच्या सरावाकरता केपटाऊनमध्ये नेट्समध्ये गोलंदाजी टाकण्याची कामगिरी क्रोम हेंड्रिक्स आणि इतर काही अश्वेत गोलंदाजांवर सोपविण्यात आली. परंतु या गोलंदाजांनी कितीही चांगली गोलंदाजी टाकली, तरीही राष्ट्रीय संघाकरिता त्यांचा विचार होणार नव्हता ही काळ्या दगडावरची रेघ होती. पण आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमोर गोलंदाजी टाकण्याची ही एकमेव संधी असेल कदाचित, म्हणून क्रोम हेंड्रिक्सने चाळिशीच्या उंबरठ्यावर असतानाही जीव तोडून गोलंदाजी टाकली. दौरा संपताना टॉम हेवर्डला "या दौऱ्यावर तुम्हाला कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक त्रास दिला?", असे विचारले असता हेवर्ड म्हणाला, "कसोटी सामन्यांत एकही गोलंदाजाला खेळताना मला तीळमात्रही सायास पडले नाहीत. परंतु नेट्समध्ये क्रोम हेंड्रिक्सने मात्र आम्हा फलंदाजांची पाचावर धारण बसविली होती."

१८८९मध्ये दक्षिण आफ्रिका त्यांचा पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळली. त्या सुमारास विल्यम मिल्टन दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचे सर्वेसर्वा होता. त्याचे देशभरातील उत्तम क्रिकेटखेळाडूंवर निश्चितच लक्ष असावे. क्रोम हेंड्रिक्सची तुफानी गोलंदाजी त्याच्या नजरेतून नक्कीच सुटली नसावी. मिल्टन तत्कालीन केप कॉलनीचे पंतप्रधान सेसिल ऱ्होड्स, यांचा उजवा हात होता. सध्याच्या झिम्बाब्वेचे स्वातंत्र्यापूर्वीचे, ऱ्होडेशिया हे नाव, त्याच्यावरूनच ठेवलेले होते. गौरवर्णीय हे इतर सर्व वंशाच्या लोकांपेक्षा वरचढ आहेत ही सेसिल ऱ्होड्सची उद्दाम धारणा होती, आणि गौरेतरांना कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा मिळू नये याची पुरेपूर काळजी सेसिल ऱ्होड्स घेत असे. १८९२-९३च्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका एक डाव आणि १८९ धावा इतक्या मोठ्या फरकाने हरली. त्यानंतर केपटाऊनच्या मलय संघाबरोबर इंग्लिश संघ एक सराव सामना खेळला. स्थानिक दक्षिण आफ्रिकन गोऱ्यांना जरी गौरेतर लोकांबरोबर खेळणे 'अब्रह्मण्यम!' वाटत असले, तरी इंग्रजांना त्याचे वावडे नसावे. या सामन्यात क्रोम हेंड्रिक्सने तुफानी गोलंदाजी टाकत ५० धावांत चार बळी घेतले. फलंदाज जॉर्ज हर्नने त्याला दक्षिण आफ्रिकेतला सर्वात वेगवान गोलंदाज म्हटले होते.

१८९४मध्ये दक्षिण आफ्रिकन संघाने इंग्लंड दौरा करण्याचे घाटत असताना क्रोम हेंड्रिक्सचा समावेश राष्ट्रीय संघात असावा असे वाटणाऱ्या हॅरी कॅडवाल्डेर या पत्रकाराने यासाठी एक शक्कल लढविली. त्याला गौरवर्णीयांची श्रेष्ठता सिद्ध करण्यापेक्षा, आपला राष्ट्रीय संघ खेळात वरचढ असावा असे वाटत होते. क्रोम हेंड्रिक्सला दक्षिण आफ्रिकन संघाबरोबर इंग्लंडला बॅगेज मास्टर (म्हणजेच साध्या शब्दात हमाल) म्हणून न्यावे आणि सामन्यांत खेळवावे अशी कल्पना त्याने मांडली.

पण स्वाभिमानी क्रोम हेंड्रिक्सने त्याची ही कल्पना हाणून पाडली. हमाल म्हणून संघाबरोबर जाण्यास त्याने 'केप टाईम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट नकार दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या त्याच्या आशा संपुष्टात आल्या. पण याहून विलक्षण बाब म्हणजे त्याने स्वतःचे अश्वेत असणेही नाकारले. डच वंशाचा बाप आणि सेंट हेलेनामधील आई असल्यामुळे आपण गौरवर्णीयच आहोत असेही तो म्हणाला. सेंट हेलेनातल्या गोऱ्या लोकांचा वर्ण उन्हाने रापल्यासारखा, काहीसा गडद असतो; त्यामुळे माझा वर्ण इतर गोऱ्या लोकांइतका उजळ नाही असेही प्रतिपादन त्याने केले. या मानी क्रिकेटपटूची कायम मानखंडना होत राहिली, आणि त्याने आपला मूळ वंशही नाकारण्यास सुरुवात केली. अनेक वर्तमानपत्रांना, व गोऱ्या लोकांच्या क्लब्सना पत्रे लिहून, तो गोऱ्या क्लब्सकडून खेळण्यास पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत राहिला, परंतु त्याला कधी यश आले नाही. मलय व इतर अश्वेत क्लब्स कडून तो खेळत राहिला, परंतु त्या सामन्यांचा व त्यातील त्याच्या कामगिरीचा काहीही तपशील मिळत नाही.

परंतु स्वतःला युरोपीय सिद्ध करण्याच्या त्याच्या प्रयत्नात त्याला मृत्यूनंतर यश आले असावे. त्याला व त्याच्या पत्नीला युरोपियन दफनभूमीत दफन करण्यात आले. यामुळे क्रोम हेंड्रिक्सभवतीचे रहस्याचे वलय आणखीनच गडद होत गेले. जॉन्टी विंच, आंद्रे ओडेनडाल व गुलाम वाहेद या क्रिकेट इतिहासकारांनी हेंड्रिक्सचे 'टू ब्लॅक टू वेयर व्हाईट्स' नावाचे चरित्र लिहिले आहे, पण तुटपुंज्या माहितीच्या आधारे लिहिलेल्या त्या पुस्तकात अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिलेले आहेत.

क्रोम हेंड्रिक्सचे इतिहासातले स्थान मात्र पक्के आहे. वर्णाच्या निकषांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यास बंदी घातलेला तो ज्ञात इतिहासातला पहिलाच क्रीडापटू होय.

गोल्फपटू शिवसागर (पापवा) शिवगुलाम मात्र त्यामानाने खूपच नशीबवान. आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करून अजिंक्यपदसुद्धा त्याने मिळवले.

डर्बन कंट्री क्लब हा दक्षिण आफ्रिकेतला, डर्बन येथील, एक अत्यंत प्रतिष्ठित क्लब. गौरवर्णीय गोल्फपटू व त्यांचे भारतीय, मलय व कृष्णवर्णीय वंशाचे अनवाणी 'कॅडीज' यांची तिकडे कायम वर्दळ. १९६३ साली या क्लबच्या गोल्फ कोर्सवर एक अघटित घडले. ३४ वर्षांच्या भारतीय वंशाच्या शिवशंकर (पापवा) शिवगुलाम याला नाताळ ओपन गोल्फ स्पर्धेत गोऱ्या खेळाडूंसोबत बरोबरीने भाग घेण्याची संधी देण्यात आली. १९२८मध्ये या गोल्फकोर्सच्या जवळच एका टिनपाटाच्या पत्र्याच्या झोपडीत पापवाचा जन्म आला होता. अक्षरशत्रू असलेला पापवा मोठा होता होता गोल्फ कोर्सवरची बारीकसारीक कामे करून घरखर्चाला हातभार लावू लागला. गोल्फचे कोणतेही शिक्षण त्याला कुणीही दिलेले नव्हते. हरकाम्यापासून ते कॅडी बनण्याचा प्रवास त्याने आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीच्या बळावर केला होता. फावल्या वेळात तो इतर कॅडीजबरोबर गोल्फ खेळत असे. उसाच्या शेतात वेठबिगारी करणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याला पेरूच्या झाडाच्या काठीपासून गोल्फचा क्लबही बनवून दिला होता. पापवाची आई अंध होती.

हौशी गोल्फपटू ग्रॅहम वूल्फबरोबर एकदा पापवा कॅडी म्हणून काम करीत असता, पापवा त्याला कोणत्या होलसाठी कोणता क्लब वापरावा याबद्दल सल्ले देऊ लागला. पापवाचे अचूक सल्ले पाहून वूल्फला त्याच्या गोल्फच्या सखोल ज्ञानाची चुणूक दिसली, व १९५९मध्ये पापवाला वूल्फने डच खुल्या गोल्फ स्पर्धेत उतरवले, आणि अहो आश्चर्यम!, पापवा ती स्पर्धा जिंकून दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत अजिंक्यपद मिळवून देणारा पहिला गौरेतर गोल्फपटू ठरला. इतकेच नाही, तर त्याने १९६० आणि १९६३ सालीही ही स्पर्धा जिंकली. १९६१मध्ये दक्षिण आफ्रिकन खुल्या गोल्फ स्पर्धेत त्याला गोऱ्या खेळाडूंच्या बरोबरीने खेळू देण्यात आले. तरीही, तो ज्या क्लबमध्ये काम करीत असे, त्या क्लबने त्याला गोऱ्या खेळाडूंबरोबर १९६३ पर्यंत खेळू दिले नव्हते. त्याला धंदेवाईक खेळाडू म्हणून गोल्फ खेळण्याची परवानगीही दक्षिण आफ्रिकेत नव्हती. परिणामी, त्याला अनेकदा स्वखर्चाने, हौशी गोल्फपटू खेळत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत राहाव्या लागल्या, आणि त्यातून पैसाही फारसा मिळत नसे.

दक्षिण आफ्रिकेतील गोल्फ संघटनेची सूत्रे गौरवर्णीयांच्याच हातात होती. त्याचे पदाधिकारी आणि खेळाडू पापवाकडे काहीशा आश्चर्याने, व काहीशा शरमिंदेपणाने बघत असत. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषी सरकारच्या नजरेत मात्र पापवा हा बंडखोर, अश्वेत समाजकंटक होता. त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणे हे त्यांच्या दृष्टीने राज्यव्यवस्थेला आव्हान देण्यासारखे होते.

पण तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यावर डर्बन कंट्री क्लबचे पदाधिकारी काहीसे वरमले असावेत, व त्यांनी नाताळ ओपन स्पर्धेची कवाडे पापवासाठी खुली केली. त्याच्या ड्रेसिंग रूमसाठी एका मिनी व्हॅनमध्ये सोय करण्यात आली, आणि त्याने इतर गौरेतर कॅडीजबरोबर स्पर्धेदरम्यान जेवण घ्यावे असे ठरले. (आपल्याकडेही जातिभेदामुळे, पंचरंगी सामन्यांमध्ये हिंदूंकडून १९०६ ते १९२० खेळणाऱ्या महार समाजातील बाळू पालवणकर यांना इतर खेळाडूंबरोबर जेवण-चहा न घेता, ड्रेसिंग रूमच्या बाहेरील व्हरांड्यात/ पायरीवर बसून वेगळ्या भांड्यांमध्ये जेवण- चहा देण्यात येत असे, तसेच.) १९६५मध्ये, गॅरी प्लेयरसारख्या आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या प्रोफेशनल खेळाडूला हरवून पापवा ही स्पर्धा जिंकला. परंतु बक्षीस समारंभासाठी क्लबच्या हॉलमध्ये पापवाला प्रवेश नव्हता. का तर, क्लबचे आपल्या बारमध्ये मद्य विकण्याचे लायसन्स, क्लबमध्ये गौरेतर माणसास प्रवेश दिल्यास रद्द केले जात असे. स्पर्धा संपताच धो-धो पाऊस कोसळू लागला. तरीही विजेत्याला इमारतीच्या आडोश्यात पारितोषिक देता येणार नव्हते. शेवटी पापवाला पावसात उभे राहून पारितोषिक स्वीकारावे लागले. निर्विवाद विजेता ठरूनही पापवाच्या वाट्याला अशी मानहानीच आली.

पापवा शिवगुलाम पारितिषिक स्वीकारताना

तरीही खचून न जाता पापवाने १९६६ सालीही ही स्पर्धा जिंकली. १९६७मध्ये याने डच ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात पीटर टाऊन्सएंडकडून त्याने पराभव पत्करला.

इतक्या स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवूनही पापवाची दारिद्र्यावस्था दूर झालीच नाही. गोल्फ कोर्सवर शेवटपर्यंत तुटपुंज्या महिना ३५ रँड पगारावर तो कॅडीचे काम करीत राहिला. त्यातून मुश्किलीने त्याचा महिन्याचा खर्च भागत असे. हा दक्षिण आफ्रिकेचा, आंतरराष्ट्रीय खुल्या गोल्फ स्पर्धेत एक काळ गाजविलेला जगज्जेता, वयाच्या अवघ्या एक्कावन्नाव्या वर्षी कष्ट उपसत, खंगून मरण पावला.

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवट उलथून पडल्यावर पापवाला उशिरा का होईना, गौरवले गेले. मरणोपरांत त्याला २००३मध्ये पंतप्रधान थाबो म्बेकी यांनी 'ऑर्डर ऑफ इखामंगा'ने गौरवले. डर्बनमधल्या महानगरपालिकेच्या गोल्फ कोर्सलाही 'पापवा शिवगुलाम म्युनिसिपल गोल्फ कोर्स' असे नाव देण्यात आले. २००५मध्ये त्याच्या आयुष्यावर एक चित्रपट काढण्यात आला, आणि २०१५ साली मॅक्सिम पेज यांनी त्याचे चरित्रही लिहिले आहे.

या दोन्ही असामान्य गुणवत्ता असलेल्या खेळाडूंच्या वाट्याला दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेष्ट्या राजवटीत मानहानी, उपेक्षा सोडून काहीही आले नाही. मृत्यूनंतर मात्र त्यांचे पोवाडे गायले जात आहेत.

पापवा शिवगुलाम गोल्फ कोर्स

मला दिलीप प्रभावळकरांच्या हसवाफसवी नाटकातले, हृदयाला कायमची जखम करून गेलेले एक वाक्य या दोघांच्या आयुष्यांकडे बघून आठवते, "अहो, मेलेल्या माणसाचे पुतळे उभारण्यापेक्षा, जिवंत माणसाचे सत्कार करणे जास्त महत्त्वाचे नाही का?"

field_vote: 
0
No votes yet