रामायण व महाभारत - भाग ४

महाभारत आणि रामायणकालीन समाज

सुधीर भिडे

मागील भाग इथे.

विषयाची मांडणी
वर्ण
स्त्रियांची स्थिती
नियोग
कुटुंब
राजकीय संस्था
धर्म
शेती प्रधान अर्थव्यवस्था
जुगार
गुलामी
युद्धे
---
या दोन महाकाव्यांतील कथेचा काल उपनिषदकालानंतर आणि बुद्धापर्यंत यामधला असावा. त्या काव्यांची रचना बुद्धानंतर पुराणकालापर्यंत असावी. दोन्ही गोष्टींतून समाजाचे वेगळे चित्र पुढे येते.

वर्णव्यवस्था
समाजात ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन प्रमुख वर्ण दिसतात. वैश्य आणि शूद्र हे वर्ण येत नाहीत. आर्यांशिवाय या देशात राहणाऱ्या लोकांच्या काही जाती वर्णिलेल्या आहेत. राम जेव्हा वनवासाला जातात तेव्हा ते निषाद राज्यात येतात, जे आर्य नाहीत. राक्षस या जातीविषयी निराळा विचार करू. महाभारत कालानंतर चार वर्ण प्रामुख्याने अस्तित्वात आले असे दिसते. बुद्धाच्या काळात वैश्य आणि शूद्र प्रामुख्याने अस्तित्वात होते.

माधवराव चितळ्यांच्या मताप्रमाणे भारतीय कथाकारांनी मनोरंजनासाठी वानर या शब्दाचे विकृत स्वरूप उभे केले. वानर या शब्दाचा अर्थ वनावर उपजीविका करणारे. वाल्मिकीच्या रामायणात या समाजाविषयी काय माहिती मिळते? सामाजिकदृष्ट्या हा समाज प्रगत होता. या समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था नव्हती. वालीचे वर्णन शूर असे आहे, क्षत्रिय असे नाही.


Vali, Company School, 19th century
वाली, कंपनी स्कूल, १९वे शतक.

मारुती स्तोत्रात ही ओळ येते - वनारी अंजनी सुता रामदुता प्रभंजना – येथे हनुमान वनात राहणार्‍या अंजनीचा मुलगा असे वर्णन आहे.
अरण्यकांडात (सर्ग ४९ ते ५६) रावण आपल्या राज्याची बढाई मारत असताना सीतेला सांगतो की मी १० कोटी राक्षस आणि २० कोटी इतर अशा लोकसंख्येचा राजा आहे. वाल्मिकी इतर लोकवस्तीला वनवासी म्हणतात, ज्यात वानर आले.

आपण ३० कोटी जनसंख्येची सत्यता थोडी बाजूस ठेवू. रामायणात बरेच आकडे असे अतिशयोक्तीचे आहेत. त्या काळच्या जनतेत दोन तृतीयांश वनवासी / आदिवासी लोक होते. आदिवासी हे भारतात ५०,००० वर्षांपूर्वी आलेले मूळचे भारतीय. मग हे एक तृतीयांश राक्षस कोण? मूळ आदिवासींनंतर भारतात इराणमधून लोक आले. ते १०,००० वर्षांपूर्वी आले. येथील लोक आणि नवे भारतीय यांनी सिंधू सरस्वती संस्कृती वसविली. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर हे लोक भारतभर पसरले. पण त्यांना राक्षस निश्चितच म्हणता येणार नाही. कारण ते लोक आर्यांपेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त प्रगत होते.

राक्षस हा उल्लेख रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येतो. यांचे वर्णन नरमांसभक्षक असे केले जाते. ते क्रूर आणि संस्कृतिहीन असे वर्णन येते. रावण क्रूर होता पण संस्कृतिहीन नव्हता. या दोन्ही काव्यांतून सुमारे ३००० वर्षांपूर्वीच्या समाजाचे चित्र येते. या समाजात हे राक्षस कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो. का असे समजायचे की आदिवासींपैकी काही राक्षस समाजाचे होते?

स्त्रियांचे स्थान
दोन्ही गोष्टीत स्त्रिया घटनांना दिशा दाखवतात असे दिसत नाही. तसे पाहिले तर दोन्ही गोष्टीत स्त्रियांचे आयुष्य दु:खात जाते. महाभारतामध्ये स्त्रियांनी होमहवन केल्याचा उल्लेख नाही. रामायणात कौसल्येने होम केला आहे. सीतेने संध्या केली असाही उल्लेख आहे. महाभारतकालीन स्त्रिया या प्रकारची धार्मिक कृत्ये करीत नसत. वेदात स्त्रियांनी होमहवन केल्याचे उल्लेख आहेत.

दशरथ कैकेयीला 'तू विधवा होऊन राज्य कर' असे सांगतो. स्त्रियांनी राज्य करण्याची कल्पना महाभारतकाली उरली नव्हती. महाभारतात स्त्रिया युद्धावर गेल्याचे वर्णन नाही. कैकेयी युद्धावर गेल्याचे वर्णन आहे. वेदामध्येही स्त्रिया युद्धावर गेल्याचे वर्णन आहे. सतीची चाल महाभारतात दिसते. पांडू निवर्तल्यावर माद्री सती गेली. रामायणात मात्र सतीची प्रथा कोठेही दिसत नाही.

आपण पहिल्या भागात असे प्रमेय केले की महाभारतकालीन समाज रामायणाच्या आधीचा वाटतो. वरची माहिती त्या प्रमेयाच्या उलट जाते.

पुरुषांची नावे ‘या आईचा मुलगा’ अशी घेतलेली दिसतात जसे की रामायणात सौमित्र आणि महाभारतात कौन्तेय. व्यक्तीची आई निश्चित असते पित्याविषयी सांगता येत नाही. (अमेरिकेत शाळेत प्रवेशासाठी फक्त आईचे नाव लागते.)

दोन्ही गोष्टींत समाज पूर्णपणे पुरुषप्रधान होता. स्त्रियांना सामाजिक किंवा राजकीय महत्त्वाचे स्थान नव्हते.

तृतीयपंथी व्यक्तींकडे समाज इतक्या क्षुद्रपणे पाहत नसे, जी आज स्थिती आहे. शिखंडी दृपदाचा मुलगा. तो तृतीयपंथी होता आणि महारथी होता. त्याची कुचेष्टा झालेली आपण पाहत नाही. पांडवांच्या शिबिरात युद्धस्थितीचा विचार करण्यासाठी ज्या बैठका होत त्यात शिखंडी भाग घेत असे.
‘अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा’ या पाच स्त्रिया प्रात:स्मरणीय आहेत असे सांगण्यात येते. यातील द्रौपदी सोडता इतर चार स्त्रिया रामायणातील आहेत. पतीची सेवा करणे आणि दिलेली शिक्षा भोगणे यापेक्षा जास्त काही त्यांनी केल्याचे दिसत नाही. द्रौपदी मात्र निराळी आहे.

नियोग

एखाद्या स्त्रीला वैवाहिक संबंधातून पुत्र होत नसेल तर नियोगाचा वापर केला जाई. मनुस्मृतीत याविषयी वचने आहेत. पांडव आणि कौरवांचे पिता पांडू आणि धृतराष्ट्र यांचा जन्म नियोगाने झाला आहे. पांडवांचा जन्मही नियोगाने झाला आहे.

रामायणात नियोगाचा उल्लेख नाही.

मनुस्मृती या दोन महाकाव्यांच्या आधी लिहिली गेली. मनुस्मृतीत नियोगाचे नियम सांगितले आहेत.

लग्ने आणि कुटुंब

महाभारतात कुरु घराण्यात मुलांचा जन्म कसा झाला याला काही महत्त्व दिसत नाही. सत्यवतीचा अनौरस पुत्र ज्याला तिने तिच्या लग्नाआधी जन्म दिला, तो पुढे महर्षी व्यास झाला. विदुर हा दासीचा पुत्र पण तो पांडू आणि धृतराष्ट्र यांचा भाऊ समजला गेला. व्यास आणि एका दासीपासून झालेल्या मुलाचा कुरु कुळाशी काही जैविक संबंध नाही आणि तरी त्यास आदराने वागविले गेले. पांडवांचा जन्म नियोगासारख्या क्रियेने झाला.
रामायणात लग्नसंस्थेला महत्त्व आहे. दशरथ आणि रावण यांना एकापेक्षा जास्त बायका आहेत परंतु रामाचे एकपत्नीव्रत आहे. रामाच्या भावांच्या पण एकेकच बायका आहेत. संसारात स्त्रीला समान स्तर नाही. स्त्रीचे पहिले कर्तव्य म्हणजे पतीची सेवा हे परत परत सांगितले जाते. सीता रामाला हेच सांगते आणि राम आपल्या आईला हेच सांगतो. ज्या स्त्रिया असे वागत नाहीत त्यांना स्वर्गात स्थान नाही असे सांगितले जाते.

राम आणि सीता दोघेही मद्य पित असत असे वाल्मिकी लिहितो. महाभारतकाली स्त्रिया दारू पिताना दिसत नाहीत. कृष्ण आणि अर्जुन दारू पिऊन बेभान झाल्याचे व्यास वर्णन करतात.

जर रामायण महाभारतानंतर लिहिले गेले, तर असे म्हटले पाहिजे की महाभारत काळात सामाजिक आणि कौटुंबिक नीतिमत्तेचा ऱ्हास झाला.

राजकीय व्यवस्था

लहान लहान राज्ये अरण्याने वेढलेली होती. ताकदवान राज्ये बाजूच्या राज्यांवर आधिपत्य गाजवत परंतु प्रदेश गिळंकृत करून एकछत्री साम्राज्य स्थापणे, (जे पुढे मौर्यांच्या काळात झाले), अशी कल्पना नव्हती. रामाने अश्वमेध यज्ञ केला. युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. याचा अर्थ एवढाच होता की बाजूच्या राज्यांनी त्यांचे श्रेष्ठत्व मानले. राज्यात लहान लहान नगरपदे असत. नगरपदांचे स्वत:चे शासन असे.

राजा मंत्र्यांच्या आणि कुलगुरूच्या मताला किंमत देत असे. दशरथाने जेव्हा रामाला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने मंत्र्यांची आणि नगरजनांची सभा बोलावून त्यांचे मत घेतले.

त्या काळात राज्याचे भौगोलिकदृष्ट्या चार भाग होते. नगरे आणि त्या जवळचा भाग राष्ट्र असे ओळखला जायचा. त्याशिवाय जनपदे, अरण्ये आणि आश्रमपदे असे भाग असत. हे आश्रम म्हणजे एक मोठी वस्ती असे, तेथे शिक्षण घेण्यास आलेले विद्यार्थी आणि तपस्या करणारे ऋषी असत. आश्रमाच्या जवळ, पण बाहेर, वानप्रस्थी असत.

भरत जेव्हा रामास भेटला तेव्हा रामाने हे गृहीत धरले की भरत राजा झाला आहे. रामाने राज्य कसे चालले आहे याची विचारणा करताना भरतास साठ प्रश्न केले. राज्यशास्त्राच्या पुस्तकात याचा समावेश केला पाहिजे. त्यापैकी काही निवडक प्रश्न -

  • चांगल्या लोकांशी विचारविनिमय करून राज्यव्यवहार करतोस ना?
  • गुपिते फुटून सगळ्यांना माहीत होत नाहीत ना?
  • चांगली कार्ये पूर्ण होत आली असताना लोकांना त्याबद्दल कळते ना? (आधीच उगीच गाजावाजा केला जात नाही)
  • गुणवान शोधून त्यांच्यावर काम सोपवितोस ना?
  • कारभारी अतिकठोर होऊन प्रजेला त्रास देत नाहीत ना?
  • सैनिकांचे पगार वेळेवर होतात ना?
  • अयोध्येचे तू नीट रक्षण करतोस ना?
  • राज्यातील शेती केवळ पावसावर अवलंबून नाही ना? (तलाव, पाटबंधारे यांची नीट व्यवस्था आहे ना?)
  • अयोध्येतील लोकांना स्वतः भेटतोस ना? जे कामगार आहेत त्यांना स्वतः भेटतोस ना?
  • महसूल चांगला आहे ना? खर्च कमी आहे ना? (खर्च महसुलापेक्षा जास्त नाही ना?)
  • गोडधोड जेवण एकटाच जेवत नाहीस ना?

धर्म
त्या काळात धर्म यज्ञांवर आधारित होता. मूर्तिपूजा नव्हती. टेलिव्हिजन मालिकांमध्ये दाखविल्याप्रमाणे देवळे नव्हती. रामायणात वर्णन केलेल्या देवता महाभारताहून निराळ्या आहेत. रामायणातील सर्व देवता ऋग्वेदकालीन आहेत – रुद्र , यम , इंद्र, मरुत, अग्नि, वसू, आदित्य, अश्विनीकुमार, वरुण – हे देव रामायणात पुजलेले दिसतात.

महाभारतात गणपती आहे. रामायणात गणपतीचा उल्लेख नाही.

अर्थव्यवस्था

शेती आणि गायींचे कळप पाळणे हे प्रमुख व्यवसाय होते. धातूची भांडी बनविण्याचे शास्त्र प्रस्थापित झाले नव्हते. मातीच्या भांड्यांचा वापर असे.
घरे विटा आणि लाकूड यांनी बनविली जात. रामायणात शरयू नदीच्या उत्तर काठावर यज्ञाच्या तयारीला सुरुवात होते. यज्ञनगरी वसवण्यात आली. या कामासाठी लाखो विटा तयार करा असे आदेश देण्यात आले.

लिहिण्याची कला
लिहिण्याच्या कलेची सुरुवात झालेली नव्हती . निरोप द्यायचा म्हणजे सेवक पाठविला जाई. बुद्धकाळानंतर लिहिण्याची कला आढळून येते. Asokan edicts (3rd century B.C.) are the earliest decipherable inscriptions, so far available in India (Antiquity of writing in India, Archaeological Survey of India)

जुगार
जुगार सामान्यपणे खेळला जाई. जुगार खेळण्याला नकार देणे म्हणजे क्षत्रिय धर्माच्या विरोधी समजले जाई. युधिष्ठिराचे जुगार खेळणे हे महाभारताच्या गोष्टीच्या मध्यभागी आहे. पांडव अज्ञातवासात विराट राजाच्या राजवाड्यात राहत असताना विराट राजा पण जुगाराचा व्यसनी दाखविला आहे.
रामायणात जुगार नाही.

गुलामगिरी
जेव्हा भीष्मांना ही जाणीव होते की दुसऱ्या दिवशीच्या युद्धात ते जायबंदी होणार आहेत तेव्हा ते त्यांच्या दोन सेवकांना गुलामगिरीतून मुक्त करतात. सेवकांना ते असे सांगत नाहीत की कामावरून त्यांना काढले आहे, किंवा उद्यापासून काम नाही. ते स्पष्टपणे त्यांना गुलामगिरीतून मुक्त केले आहे असे बोलतात.

रामायणात गुलामगिरीचा उल्लेख नाही.

युद्धशास्त्र

युद्धात वापरण्यात आलेली शस्त्रे दोन्ही महाकाव्यात एकच आहेत. धनुष्य-बाण, गदा, तलवार, भाला ही शस्त्रे वापरलेली दिसतात. मोठे योद्धे रथात उभे राहून युद्ध करतात.

तलवार, बाण, भाला आणि गदा ही शस्त्रे धातूची बनलेली होती का? याचे उत्तर अवघड आहे.

तमिळनाडू मध्ये Mayiladumparai या गावी झालेल्या उत्खननात जी लोखंडाची अवजारे आणि लोखंड बनविण्याच्या भट्टीचे अवशेष सापडले आहेत त्या अवजारांचा काल ४२०० वर्षांपूर्वीचा असावा असे कार्बन डेटिंगवरून ध्यानात आले आहे. – इंडियन एक्स्प्रेस १४/९/२३


Mayiladumparai Iron Tools

Virudhunagar megalithic iron smelting

The beginning of iron technology in the middle Ganga plain suggested on the premise of findings is that the early and mid 2nd millennium BC. (Calibrated C14 date at Dadupur, near Lucknow - 1700 BC)
Ancient Indian History and Archaeology University of Lucknow, Dr. Anil Kumar, Professor Ancient Indian History and Archaeology University of Lucknow

वरील दोन संदर्भांवरून असे म्हणता येईल की भारतात साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोखंड बनविणे चालू झाले होते. एके काळी जगात सर्वोत्तम लोखंड भारतात बनत असे. भारतातून दमास्कसला लोखंड निर्यात होई, जिथे त्याचा वापर तलवारी बनविण्यासाठी होत असे. खनिजापासून लोखंड मिळविण्यासाठी लाकडी कोळशाचा वापर होई. ज्वलनाला हवा मिळण्यासाठी भात्याचा वापर होई. या सर्वांचे अवशेष उत्खननात मिळाले आहेत.

ज्या प्रकारच्या भट्ट्या वापरल्या जायच्या त्याचे चित्र खाली दिले आहे.


Ancient Iron Furnace

शस्त्रे बनविण्यासाठी जे लोखंड वापरले जाई त्यास वूत्झ स्टील असे नाव आहे. वूत्झ हा शब्द दक्षिण भारतीय भाषांपासून आला आहे.
आपण हे पाहिले की दोन्ही काव्यात ज्या समाजाचे वर्णन आहे तो समाज तीन हजार वर्षांपूर्वीचा होता. यावरून असे सांगता येईल की जर कथानकाचा काल साडेतीन हजार वर्षांपूर्वीचा नसेल तर युद्धात लोखंडाची हत्यारे वापरली गेली असतील.

ज्या काळात ही काव्ये लिहिली गेली, दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात, त्या काळात निश्चितच लोखंड बनविण्याची कला / शास्त्र प्रगत झाले होते आणि तलवारी बनत होत्या. सातवाहनकालीन उत्खननात लोखंडाची शस्त्रे मिळाली आहेत. महाकाव्य लेखनाचा काल हा सातवाहनांचा काल होता.
महाभारत युद्धात हत्तींचा वापर केलेला दिसतो. रामायण युद्धात हत्तींचा वापर दिसत नाही. हे जरा आश्चर्याचे वाटते कारण आजही लंकेत मोठ्या प्रमाणावर हत्ती आहेत. रावणाच्या सैन्यातही हत्ती वापरलेले दिसत नाहीत .

---
(क्रमशः)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

महाभारतात गणपती आहे. रामायणात गणपतीचा उल्लेख नाही.

मौर्य साम्राज्याच्या विघटना नंतरचा आणि गुप्त साम्राज्याच्या उदयापूर्वीचा - मधला जो साधारण ५०० वर्षांचा काळ आहे, तो मोठ्या राजकीय उलथा-पालथीचा काळ आहे. बदलत्या राजकीय घडामोडींचा प्रभाव साहित्य आणि संस्कृतीत पडला असला पाहिजे. आर्यांचे आणि मगध साम्राज्याचे जे वायव्येकडचे टोक आहे ते म्हणजे गंधार. तक्षशिला सारखे विद्यापिठ याच भागात होते. तिथेच पाणिनीने व्याकरणावर (इ.स. पू. ३५०) आणि चाणक्याने राज्यशास्त्र-अर्थशास्त्रावर संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिले. त्यामुळे सहाजिक वाटते की आजूबाजूच्या प्रदेशातली (कंबोज, बहिलिका वा बॅक्ट्रिया) भाषा आणि काही प्रमाणात संस्कृती फार वेगळी नसावी. सीमेपलिकडे इंडो-ग्रीक राज्य होते, आणि भारतातून जाणार्‍या "उत्तरपथ" मार्गे थेट ग्रीक पर्यंत व्यापार होत होता. मौर्य काळात चंद्रगुप्त ने राजकारणाचा (matrimonial alliances) भाग म्हणून सेल्युकसच्या मुलीबरोबर लग्न केले होते. पण जसे सम्राट अशोक नंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली तसे बंड होऊन मगध आणि गंगेच्या खोर्‍यात शुंग वंशाच्या राज्यांची सत्ता आली. दक्षिणेत सातवाहन साम्राज्य उदयाला आले. उत्तरेत मथुरेपर्यंत प्रथम इंडो-ग्रीक यांनी (राजा मणेंदर किंवा मिलिंदा) त्यानंतर शाक/क्षत्रप (Indo-Scythians, राजा  रुद्रदमन, संस्कृतमधला सगळ्यात जुना स्तंभ, जुनागडमधला याच्या राजवटीतला आहे) यांनी आणि शेवटी कुषाण वंशीयांनी (राजा कनिष्क) सत्ता स्थापन केली. हे कुषाण वंशीय शैवपूजक होते आणि वैदिककाळ पूर्वार्धात त्यांची वस्ती प्रथम युशी नंतर बॅक्ट्रीया इथे होती. त्यांच्या काळात उत्तर भारतात सोन्याची नाणी चलनात होती. त्यापैकी काही नाण्यांवर प्रचलित शंकराच्या जवळ जाणारे चित्र दिसते (अर्थात बुद्ध आणि ग्रीक देवतांचीही नाणी दिसतात) . ॠग्वेदात जे रुद्राचे वर्णन येते त्याच्या वर्णनामध्ये आणि प्रचलित शंकरामध्ये वर्णना मध्ये फरक आहे.  गणेशाची कथा येते ती मत्स्यपुराणात जी लिहिली गेली इ.स. दुसर्‍या-तिसर्‍या शतकात. हा योगायोग नक्कीच नसावा. या कुषाणांना गुप्त राजांनी पुन्हा बॅक्ट्रीया पर्यंत माघार घ्यायला लावली.

त्या काळात धर्म यज्ञांवर आधारित होता. मूर्तिपूजा नव्हती.

अभ्यासकांच्या मते यापैकी बहुतेक साम्राज्यावर ग्रीक, बुद्धीझम यांचाही प्रभाव आहे (किंवा व्यापारी वर्गाला जवळ ठेवण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला असावा) उदा. मणेंदर १ किंवा मिलिंदा याचे पाली मधले मिलिंदपन्हो, कनिष्क चे स्तुप. त्यांनीच ग्रीकांची हेलनीस्टीक शैली भारतात आणली असावी (ग्रेको बुद्धिस्ट आर्ट). त्यामुळे ग्रीक शैलीसारख्या मूर्त्या (खास करून बुद्धाच्या) बनू लागल्या. आणि त्याचा प्रभाव शेवटी आर्य संस्कृतीवरही झाला. त्याअगोदर काही अभ्यासकांच्या मते आर्यांमध्ये मूर्तीपूजा वा मंदिरे असण्याची शक्यता कमी आहे. 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामायणात जुगार नाही

१)अयोध्या कांडात कैकई जेंव्हा रामाला वनवासात पाठवा असे राजा दशरथाला सांगते तेंव्हा हा श्लोक आढळतो:;अयोध्यायां नरेन्द्राणां निवासो नात्र संशयः । अयोध्या नाम नगरी नाम्ना तस्यां वसाम्यहम् ॥ अयोध्यां त्यजतो मे त्वं रामं चारण्यमाश्रितम् । किं नु खेलसि द्यूतेन दुर्बुद्धे विपरीतया ॥

२) किष्किंधा कांडात हनुमान जेंव्हा लंकेला जाऊन येतो आणि रामाला भेटतो तेंव्हा असे सांगतो:द्यूतेनापहृतप्रभो रावणो राक्षसाधिपः । अयोध्यां त्यजतो मां च वनं चारण्यमाश्रितः ॥

अशा पद्धतीने रामायणात जुगार खेळण्याचा संदर्भ येतो परंतु जुगार खेळून राज्य पणाला लावण्या इतपत द्युत बदनाम झालेले नव्हते जे महाभारतात झालेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाभारतात गणपती आहे. रामायणात गणपतीचा उल्लेख नाही.

गोकर्णमहाबळेश्वराची कहाणी काय भाव? की, तिची विल्हेवाट (सोयिस्करपणे) ‘प्रक्षिप्त’ म्हणून लावायची?

समाजात ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन प्रमुख वर्ण दिसतात. वैश्य आणि शूद्र हे वर्ण येत नाहीत.

महाभारत कालानंतर चार वर्ण प्रामुख्याने अस्तित्वात आले असे दिसते. बुद्धाच्या काळात वैश्य आणि शूद्र प्रामुख्याने अस्तित्वात होते.

मग ‘वर्णसंकर होऊन अनाचार माजेल’ असे श्रीकृष्ण गीतेत जो बोंबलून बोंबलून सांगत असतो, त्याची काय वाट? फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा संकर झाला, तरी इतकी दुरवस्था?

रामायणात गुलामगिरीचा उल्लेख नाही.

हे रोचक आहे. आणि, या परिप्रेक्ष्यात, नंतरच्या काळांत ‘रामदास’, (मॉरिशसचे माजी पंतप्रधान श्री. शिवसागर) ‘रामगुलाम’ अशी नावे दिली-घेतली गेली, हा निव्वळ दैवदुर्विलास आहे.

आपण ३० कोटी जनसंख्येची सत्यता थोडी बाजूस ठेवू. रामायणात बरेच आकडे असे अतिशयोक्तीचे आहेत.

किंवा, त्या ३० ‘कोटी’ जनसंख्येचा अर्थ (३३ कोटी देवांप्रमाणे) ३० ‘प्रकारची’ लोकसंख्या असा तर नसेल ना?

——————————

असो. तूर्तास (तरी) इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुगल करून गोकर्णमहाबळेश्वरची कथा इथे वाचली. त्यात गणेशाचाही उल्लेख आहे. पण त्याचा संदर्भ गुरुचरित्र असा दिला आहे जे खूप मागाहून आलेले आहे. त्यामुळे हे उपकथानक मूळ वाल्मिकी रामायणात आहे का नाही ते जाणकारच सांगतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि रामेश्वरमची अशीच काहीतरी कथा आहे ना?

रावण शंकराची पिंडी लंकेला घेउन जात असतो त्याला ती नेता येउ नये म्हणून गणपती "काहीतरी आयडिया" करतो. आणि नंतर लंकेला जाण्याकरता समुद्र पार करायचा असतो तेव्हा श्रीराम तिथे पुजा करतात.

ही कथा बऱ्याचवेळा ऐकलेली आहे, त्याचे मूळ माहिती नाही.

का बाळगोपाळांच्या मनोरंजनाकरता ती रचलेली आहे? माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

रामचरितमानस मधला हा दोहा पहा:

बिलपहिं बिकल दास अरु दासी। घर घर रुदनु करहिं पुरबासी॥
अँथयउ आजु भानुकुल भानू। धरम अवधि गुन रूप निधानू॥3॥

दास आणि-दासी व्याकूळ होऊन विलाप करत आहेत. नगरातील लोकं रडत आहेत. एक धर्मात्मा, रूप आणि गुणाचे भांडार सूर्य कुळाच्या सूर्याचा अस्त झाला आहे.
या दोह्यातील दास आणि दासी म्हणजे गुलाम नव्हेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामायणात नियोगाचा उल्लेख नाही.

रामयणात मुले व्हावीत म्हणुन दशरथ यद्न्य करतो ते कशाचे प्रतिक आहे? मला तरी पुत्रकामेष्टी यद्न्य म्हणजे यद्न्यकर्त्या ऋषि बरोबर नियोग असेच वाटत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

युद्धात वापरण्यात आलेली शस्त्रे दोन्ही महाकाव्यात एकच आहेत.

रामायणात राम लक्श्मण धनुश्य वापरतात. पण इतर वानर योद्धे दगड धोंडे वापरतात. गदायुद्धा चा उल्लेख रामायणात नाही.( गदेचा आहे पण गदा युद्धाचा नाही) तसेच रामाने रथात बसून युद्ध केले नाही. रथ हे रावणाकडुन वापरले गेले होते.
रामायणातली शस्त्रे ही महाभारतातील शस्त्रांहून थोडी अप्रगत आहेत.( फेकून मारणे किंवा हातानी मारणे यासारखी) महाभारतातील शस्त्रे ही यंत्रे वापरून ( सुदर्शन चक्र / धनुष्य ) फेकली जात होती.
सर्वात महत्वाचे म्हणजे महाभारतातली लढाई ही जमीनीसाठी झालेली आहे. रामायणात शेतीचे उल्लेख आहेत पण लोक स्वत:च्या मालकीची जमीन राखत होते असे कोठेच उल्लेख नाहीत्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(फेकून मारणे किंवा हातानी मारणे यासारखी) महाभारतातील शस्त्रे ही यंत्रे वापरून ( सुदर्शन चक्र / धनुष्य ) फेकली जात होती.

ठळकीकृत अधोरेखिताकरिता माझ्या कल्पनेप्रमाणे ‘अस्त्र’ असा शब्द आहे.

जे हातात धरून (हातात/अंगावर ठेवूनच) वापरायचे, ते शस्त्र. जे (कोणत्याही मार्गाने) फेकून मारायचे, ते अस्त्र.

(असा फरक मला माझ्या तीर्थरूपांनी लहानपणी शिकविला होता. याकरिता ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ याहून अधिक संदर्भ वा आधार तूर्तास मजजवळ नाही; सापडल्यास अवश्य डकवेन.)

थोडक्यात:

तलवार हे शस्त्र. सुदर्शनचक्र हे अस्त्र.

धनुष्य हे शस्त्र. मात्र, धनुष्यातून सुटणारा बाण हे अस्त्र.

बंदूक, झालेच तर बंदुकीला जोडलेली संगीन (bayonet, जिचा उपयोग वेळप्रसंगी गोळ्या संपल्यास वगैरे शत्रूस भोसकण्यासाठी करता येतो) ही शस्त्रे; मात्र, बंदुकीतून सुटणारी गोळी हे अस्त्र.

(त्याच न्यायाने, तोफ हे शस्त्र, मात्र तोफगोळा हे अस्त्र.)

गदा हे शस्त्र. (मात्र, गदेचा उपयोग कोणी जर ओबेलिक्स-स्टाइलीत कोणावर फेकून मारण्याकरिता केला, तर त्या परिस्थितीपुरते मात्र गदेला अस्त्र म्हणावे लागेल.)

भाला हे सामान्यतः अस्त्र. मात्र, भाला हातात धरून त्याचा उपयोग कोणाला भोसकण्याकरिता केल्यास ते शस्त्र.

सुरी, चाकू वगैरेंचा उपयोग कोणास भोसकण्याकरिता (किंवा कदाचित सफरचंद कापण्याकरिता, किंवा पेन्सिल तासण्याकरिता) केल्यास ती शस्त्रे; कोणाला फेकून मारल्यास ती अस्त्रे.

बाँब हे अस्त्रच. (बाँबचा उपयोग कोणी हातात धरून कोणाच्या टाळक्यात घालण्याकरिता करेल, असे वाटत नाही; त्यामुळे, तसे काही झाल्याखेरीज त्यास शस्त्र म्हणता येणार नाही.)

Missiles (मराठीत: क्षेपणास्त्रे) तथा त्यांचे payload ही (व्याख्येनेच) अस्त्रे.

(‘क्षेपणास्त्रे’ ही द्विरुक्ती ठरावी काय? म्हणजे, कोठलेही अस्त्र हे फेकायचे म्हणजे त्याचे क्षेपणच करायचे ना? मग नुसतीच ‘अस्त्रे’ का म्हणू नये? ‘क्षेपणास्त्रे’ कशासाठी?)

Nuclear weaponsकरिता (इंग्रजीत जरी त्यांना weapons म्हटलेले असले, तरीही) मराठी तर्जुमा अण्वस्त्रे असा आहे (अणुशस्त्रे असा नव्हे), तो सकारण आहे.

दगडफेकीत वापरले जाणारे दगड ही अस्त्रे; कोणाच्या टाळक्यात घालायचा धोंडा हे मात्र शस्त्र.

(सभेत) खुर्च्या किंवा (दंगलींत) सोडावॉटरच्या बाटल्या या जर एकमेकांच्या टाळक्यात घातल्या गेल्या, तर ती शस्त्रे; त्यांची फेकाफेक झाल्यास ती अस्त्रे. (सभेत फेकले जाणारे टोमॅटो तथा कुजकी अंडी, झालेच तर दंगलींत क्वचित्प्रसंगी वापरली जाणारी मोलोटोव्ह कॉकटेले, ही मात्र सदैव अस्त्रेच.)

चप्पल ही कोणाला फेकून मारल्यास ते अस्त्र, मात्र, चपलेखाली कोणाला चिरडल्यास (चप्पल हातात धरलेली असली किंवा पायात घातलेली असली, तरीही) ते शस्त्र.

सरतेशेवटी, मराठीत ‘शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा’ असे एक बोधवाक्य आहे. त्यामागील विचार जरी तत्त्वतः स्तुत्य (परंतु व्यवहारात आणण्यास प्रसंगी तितकाच अवघड) असला, तरी तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचे आहे; ते ‘शब्द हे अस्त्र आहे, जपून वापरा’ असे पाहिजे. पण लक्षात कोण घेतो?

(अतिअवांतर: हे बोधवाक्यास्त्र आमच्या लहानपणी आमच्या आजूबाजूस पुष्कळच फेकलेले आढळे. जसे, शाळेतल्या फळ्याच्या वरच्या बाजूस, झालेच तर पीएमटीच्या (सध्याची पीएमपीएमएल) बसेसच्या भिंतींवर (जेथे त्यामागील विचाराकडे सर्वपक्षीय दुर्लक्षाचा प्रघात असे.), वगैरे. यावरून, या बोधवाक्याचा उद्गम आमच्या जन्माअगोदरचा असावा, अशा निष्कर्षाप्रत कोणीही पोहोचू शकेल. मात्र, कंटेंपररी (मराठी प्रतिशब्द?) समकालीन मराठी (किंबहुना, हिंदू) मनुष्याचा कोणतेही काम करताना विचारपूर्वक करण्यामागील स्वारस्याचा (किंवा एकंदरीतच स्वतंत्र विचार करण्यामागील स्वारस्याचा) सर्वसाधारण अभाव, तथा त्यास आपल्या परंपरांचा पडत चाललेला विसर, , या दोहोंचा मनोहर संगम लक्षात घेता, हे बोधवाक्य तितकेही जुने नसावे — किंबहुना, विसाव्या शतकात (नि त्यातही बहुधा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात) ते जन्मास आले असावे — असा कयास बांधण्यास मुबलक जागा आहे. असो चालायचेच.)

——————————

परंपरा त्याज्य असल्या, तर त्या अवश्य त्यागाव्यात; नव्हे, त्यागल्याच पाहिजेत. (चांगल्या असल्यास त्या पाळाव्यात किंवा कसे, की दुसऱ्या कोणत्यातरी पाळाव्यात, की कोणत्याही पाळू नयेत, की स्वतःच्या निर्माण कराव्यात, की यांपैकी सर्व, हा ज्याचातिचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु हे विषयांतर झाले; असो.) मात्र, गेला बाजार ‘आपल्या परंपरा (चांगल्या किंवा वाईट) या अशाअशा होत्या’ याची माहिती अवश्य असावी. (अन्यथा, एक तर कोणीही ‘आपल्या उज्ज्वल हिंदू/मराठी/भारतीय परंपरां’च्या नावाखाली आपल्याला *त्या बनवू शकतो, किंवा, दुसऱ्या टोकाला, ‘In the good old days of Ramrajya, when Hindus, Muslims, Sikhs, and Christians used to live together in Peace and Harmony’ असली (दिवंगत पंतप्रधान श्री. राजीव गांधी-छाप) विधाने तरी ऐकावयास मिळतात. चालायचेच.)

या दुसऱ्या दोषाचे आम्हीही बव्हंशी बळी आहोत, हे कबूल करणे येथे प्राप्त आहे. (शेवटी, I, too, am a product of my times. आणि, तसेही, नशिबाचे भोग कोणाला चुकलेत?) असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वात महत्वाचे म्हणजे महाभारतातली लढाई ही जमीनीसाठी झालेली आहे. रामायणात शेतीचे उल्लेख आहेत पण लोक स्वत:च्या मालकीची जमीन राखत होते असे कोठेच उल्लेख नाहीत्

रामाने अश्वमेध यज्ञ केला होता. त्यामुळे, रामायणाच्या काळात जमिनीसाठी लढाई होत नव्हती असे वाटत नाही. एनसीआरटीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकात वैदिककाळ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केले होते. पूर्वार्धाचा काळ हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. आणि ऋग्वेदाचा अभ्यास करून अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला होता की, जरी शेतीची/पिकांची माहिती असली, तरी पूर्वार्धात जमीन (लँड) ही प्रमुख संपत्ती आहे असे वाटत नाही. मुख्य संपत्ती हे पशू आहे. दानही पशू / दासी म्हणून दिले जाते होते. यावरून ती एक pastural economy असावी असा तर्क आहे. पुढे लोखंडाचा शोध लागल्यावर सिंधू खोर्‍यातून गंगेच्या खोर्‍यात विस्तार होत गेला असावा. कारण आता लोखंडाच्या कुर्‍हाडीने जंगल तोडून शेती करता येते. नांगरणी करता येते. जे ब्रॉन्झएजमध्ये शक्य नव्हते. सध्याच्या (गेल्या वर्षीच्या) एनसीआरटी च्या पुस्तकात वैदिक काळ हा कालखंडच पाठ्यपुस्तकातून काढून टाकलेला आहे. वास्तविक जिथे तज्ञांमध्ये मतभेद आहेत ते मतभेदाचे मुद्दे सांगून (वा गाळून) जिथे जिथे एकमत आहे तो भाग ठेवता आला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम शूद्र शंबुकाची हत्या करतो, आणि शुद्रांचा उल्लेख नाही असे कसे ?
वैश्य येत नाहीत हे कसे ? त्यावेळी लोकं खातपित नव्हते का ? की नुसते युद्ध आणि पौरोहित्य ? शेती, गोपालन हे वैश्यांचे काम. महाभारतात गाई चोरणे आहे, खुद्द कृष्ण गुराख्याच्या घरात राहायचा.
भगवत गीतेत चारही वर्ण आहेत की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

…(नंतर वाल्मीकि झालेला) वाल्या कोळी कोण होता? (बोले तो, नक्की कोठली कॅटेगरी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाल्मिकी ब्राम्हणच होता. वाल्या कोळीच्या गोष्टीतही वाल्मिकी जन्माने ब्राम्हणच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाल्मिकी ब्राम्हणच होता

हे कसं काय? कोळी म्हणजे मासेमारी करणारा ना? म्हणजे तो जरी वाटमारी करत होता तरी पिढीजात व्यवसाय मासेमारी असेल ना?
कदाचित वाटमारी हा त्याचा जोडव्यवसाय असू शकेल, पण ब्राम्हण? मग कोळी हे त्याचे अडनाव होते की काय? तरीही नाहीच. ब्राम्हणांमधे (बहुतेक) कोळी अडनाव नसते. (आणि त्या काळी कोणी अडनाव लावितही नसावे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

"वाल्या कोळी" मराठी गोष्टीत "कोळी" भाग कुठून आला सापडले नाही. पण, वाल्मिकीच्या विकी वर त्याच्या दरोडेखोर असण्याबद्दल स्कंद पुराणाचा संदर्भ दिला आहे. त्यातही तो जन्माने ब्राम्हण आहे, पण गरिबीमुळे वाटमारी करू लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे प्रकरण रोचक दिसते आहे. जमल्यास सवडीने काही (विकीआधारित) निरीक्षणे/शंका मांडीन. तोवर रुमाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामायण काल्पनिक आहे असा जीव तोडून दावा करणारे त्याच रामायण वर का लिहितात.

हिंदू रामायण खरेच मानतात आणि डावे,पुरोगामी ह्यांच्या काल्पनिक रामायण (त्यांच्या मते) वर बुध्दी भ्रष्ट झाल्या सारखे विवेचन करणाऱ्या पोस्ट हिंदू कधीच खरे मानत नाहीत.
एकी कडे कल्पनिक म्हणायचे आणि दुसरीकडे नको ते दावे करायचे .
हे लोकांच्या सहज लक्षात येते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0