रामायण व महाभारत - भाग ३

रामायण व महाभारत – दोन कथांतील पात्रे

सुधीर भिडे

मागील भाग इथे.

विषयाची मांडणी
रावण आणि धृतराष्ट्र
सीता आणि द्रौपदी
बिभीषण आणि कृष्ण
दुर्दैवी पात्रे –
कर्ण, उर्मिला, कुंभकर्ण आणि द्रोणाचार्य
एक निराळेच पात्र – युधिष्ठिर
ऋषी मुनी – कुलगुरू
व्यास, वाल्मिकी, अगस्ती
परशुराम
इंद्र आणि सूर्य
---

रावण आणि धृतराष्ट्र
रावण रामायणातील खलनायक आहे तर धृतराष्ट्र महाभारतातील. काहींना असे वाटते महाभारत हे कृष्ण आणि धृतराष्ट्र यांच्यातील संघर्ष आहे आणि महाभारताचा खलनायक आहे शकुनी.

रावण आणि धृतराष्ट्र या दोघांच्या जन्मकथा विचित्र आहेत.

विश्वरवा हा लंकेचा राजा होता. विश्वरवा हा ब्रम्हदेवाचा नातू. विश्वरवाचा मुलगा कुबेर.
माली आणि सुमाली हे दंडकारण्यात राज्य करीत. कैकसी ही सुमालीची मुलगी. कुंती प्रमाणे लग्नाआधी विश्वरवापासून नियोगाने तिला चार मुले झाली – रावण, बिभीषण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा. अशा प्रकारे रावण हा ब्रह्मदेवाचा पणतू.

रावण इतका पराक्रमी निघाला की विश्वरवाने आपल्या अनौरस पुत्रास – रावणास – लंकेचे राज्य दिले आणि आपल्या लग्नाच्या पुत्रास – कुबेराला – निराळे राज्य दिले . बिभीषण आणि कुंभकर्ण आपल्या भावाबरोबर लंकेस गेले आणि बहीण शूर्पणखा आईबरोबर दंडकारण्यात राहिली.

त्यानंतर कैकसीने एका राक्षसाबरोबर लग्न केले. या लग्नातून तिला दोन मुले झाली – खर आणि दूषण. रामांच्या वेळी हे दोघे जण दंडकारण्यात राज्य करीत होते. हे दोघे रावणाचे सावत्र भाऊ.

धृतराष्ट्राचा जन्म पण नियोगाने झाला. राजा विचित्रवीर्य हा मुलांना जन्म न देता मरण पावला. मग भीष्मांनी व्यासांना बोलावून नियोगाने धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर – ही मुले करवली.

रावणाने आपल्या पराक्रमाने राज्य मिळविले तर धृतराष्ट्र योगायोगाने अंधळा असून राजा होतो. राज्यकारभारासाठी तो भीष्म आणि विदुर यांच्यावर अवलंबून असतो. रावण आणि धृतराष्ट्र आपल्या सल्लागारांचा सल्ला न मानता युद्धात पडतात. बिभीषण रावणाला सल्ला देतो की सीतेला परत करून युद्ध टाळावे. विदुर पण धृतराष्ट्राला युद्ध न करण्याचा सल्ला देतो. कथेच्या शेवटी दोघेही एकटे पडलेले असतात – त्याच्या सर्व योद्ध्यांचा मृत्यू झालेला असतो. दोन्ही सल्लागार – बिभीषण आणि विदुर जिवंत राहतात.


Ravana slaughtering Jatayu the vulture, while an abducted Sita looks away in horror. Raja Ravi Varma.
जटायुवध - राजा रवि वर्मा नक्कल प्रत

सीता आणि द्रौपदी

सीता आणि द्रौपदी यांचा जन्म नैसर्गिक नाही. सीता शेतात मिळाली तर द्रौपदीचा जन्म यज्ञात झाला. राजवाडे अशा जन्मांना अयोनिज असे म्हणतात. ऋग्वेदात योनीचा अर्थ घर असा होतो. या दोघींची गर्भधारणा घराबाहेर झाली – ज्या प्रकारे व्यासांच्या आईची गर्भधारणा होडीत झाली – पराशर आणि मत्स्यगंधा यांच्या संबंधातून.

दोघींच्या स्वयंवरात शिवधनुष्याचा पण असतो. अर्जुनाला शिवधनुष्याने मत्स्यभेद करायचा असतो, रामाला फक्त प्रत्यंचा चढवायची असते. दोघी माहेरी लाडात वाढलेल्या असतात. लग्नानंतरचे दोघींचे आयुष्य दुःखद असते. तसे पाहिले तर दोन्ही गोष्टीतील बायकांचे आयुष्य दुःखद असते. रामायणातील – कौसल्या, सुमित्रा आणि महाभारतातील कुंती आणि गांधारी.

जसे राम आणि कृष्ण यांचे व्यक्तित्व निराळे आहे तसेच सीता आणि द्रौपदी यांचे व्यक्तित्व अगदी निराळे आहे. द्रौपदीचा दरबारात दुर्योधनाने जो अपमान केला आहे त्याचा सूड द्रौपदीला हवा आहे – कसा? दुर्योधनाच्या रक्ताने तिला वेणी बांधायची आहे. सीता असा भयंकर सूड घेण्याचा विचारही करू शकणार नाही. रावणाने तिचा असाच अपमान केला आहे. तिला माहीत आहे की राम येऊन रावणाला शिक्षा देतील. त्याहून तिची काही अपेक्षा नाही. जेव्हा अयोध्यावासी तिच्या शीलावर संशय घेतात तेव्हा शांतपणे ती अयोध्यावासींना माफ करून वनात जाते.


Sita in Exile
वनवासात सीता - राजा रवि वर्मा शैली

धैर्य, धीर आणि योग्य वागणूक याचे सीतेला भान आहे. हनुमान लंकेत अशोकवाटिकेत पोचतो. हनुमान सांगतो की तो सीतेला आकाशमार्गे परत नेऊ शकतो. परंतु ती नकार देते. राम लंकेत येऊन रावणाला मारल्यानंतरच ती परतेल. रामाच्या दृष्टीने रावणाचा वध तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढे सीतेला परत आणणे.

द्रौपदीची वागणूक एकदम उलटी आहे. ती पांडवांना परत परत आठवण करून देते की दुर्योधनाचा वध महत्त्वाचा आहे. जनमानसात सीतेला देवीचे स्थान आहे. द्रौपदी देवता नाही, तिचे देऊळ नाही.

सीतेविषयी एक गोष्ट पाहा. रावण पंचवटीत येऊन सीतेचे हरण करणार आहे हे रामांना आधीच माहीत होते. एके दिवशी लक्ष्मण लाकडे आणण्यास बाहेर गेलेला असताना रामांनी हे रहस्य सीतेला सांगितले आणि असे सुचविले की सीतेने अग्निदेवाच्या आश्रयाला जावे आणि एक मायावी सीता आश्रमात राहील. रामांच्या सांगण्याप्रमाणे सीता अग्निदेवाच्या आश्रयाला गेली आणि तिची प्रतिकृती पंचवटीच्या आश्रमात राहिली. पुढची गोष्ट आपल्याला माहीत असते.

लंकेतील युद्धात रावणाचा वध केल्यावर सीतेला रामांकडे आणण्यात येते. राम सीतेला अग्नीतून जाऊन बाहेर येण्यास सांगतात. अग्नीत मायावी प्रतिकृती जाते आणि अग्नीतून खरी सीता बाहेर येते. हे दृश्य पाहणाऱ्या लोकांना असे वाटते की रामांनी सीतेकडून अग्निदिव्य करून घेतले आणि तिची शुद्धता पाहिली.

ही गोष्ट सर्व प्रथम कूर्मपुराणात येते, जे सहाव्या शतकात लिहिले गेले. त्यानंतर लिहिलेल्या रामायणाच्या संस्करणामध्येही गोष्ट येते. रामचरित मानस या ग्रंथापासून ते थेट रामानंद सागर यांच्या टीव्ही मालिकेत ही कथा येते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वाल्मिकी रामायणात या गोष्टीचा उल्लेख नाही.

वरील माहितीचा कसा अर्थ लावावा? हिंदू धर्मात अवताराची कल्पना रामायण आणि महाभारत येथून सुरू झाली. यानंतर लगेचच पुराणांची रचना सुरू झाली. रामभक्तांच्या नजरेत रामाची फसवणूक होऊन सीतेचे हरण होणे आणि पवित्र सीतेला राक्षसाने पकडून उचलून रथात ठेवणे हे भयंकर वाटले असावे. त्यामुळे ही गोष्ट लिहिण्यात आली असावी.

बिभीषण आणि कृष्ण

राम आणि अर्जुन, हे दोघेही महायोद्धे होते. परंतु दोघांनाही त्यांच्या शत्रूला हरविणे शक्य झाले नसते जर त्यांना शत्रूविषयीची खास माहिती मिळाली नसती. बिभीषणाने जी विशेष माहिती पुरविली त्यामुळेच इंद्रजित, कुंभकर्ण आणि रावण यांचा वध शक्य झाला. त्याचप्रमाणे कृष्णाने दिलेल्या सूचनांमुळे भीष्म, कर्ण, द्रोण यांना मारणे शक्य झाले.

यावरून हे सुचविले जाते की शत्रूला हरविण्यासाठी केवळ शूर योद्धे पुरेसे होत नाहीत. शत्रूची खास बातमी हेरांकडून मिळविली पाहिजे.

दुर्दैवी पात्रे

दोन्ही कथांत काही दुर्दैवी पात्रे आहेत. त्यांची स्वतःची काही चूक नसताना त्यांना न्याय मिळत नाही. त्यांना कुटुंब आणि समाजाकडून योग्य वागणूक मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात गोष्टी सरळ घडत नाहीत.

महाभारतात दुर्दैवी पात्रे आहेत कर्ण, द्रोणाचार्य आणि शिखंडी.

महाभारतात कर्णाचे पात्र दुर्दैवी आहे. कर्णाला त्याच्या आईने जन्मतःच सोडून दिले आहे. त्यानंतर जवळजवळ पूर्ण आयुष्य कर्ण आपल्या मातापित्यांची माहिती नसताना जगतो. त्याच्या रंगरूपावरून तो ज्यांनी त्याला वाढविले त्यांचा पुत्र नाही हे स्पष्ट होते. कर्णाला पाठिंबा मिळतो तो एका वाईट व्यक्तीकडून – दुर्योधनाकडून. त्यामुळे आयुष्यभर कर्णाला दुर्योधनाच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हावे लागते. काही वेळा कर्ण दुर्योधनाला हे सांगतोही की हे कृत्य बरे नव्हे, परंतु लगेच बोलतो, “मित्रा तरी मी तुला मदत करीन”.

युद्धाचे ढग जेव्हा जमू लागतात तेव्हा कृष्ण कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगून अवसानघात करतो. त्यानंतर कुंतीही कर्णाची भेट घेऊन कर्ण तिचाच मुलगा आहे हे सांगते. कर्ण कुंतीला हे आश्वासन देतो की तिची पाच मुले युद्धानंतर जिवंत राहतील. युद्धात दोन वेळा कर्णाला भीम आणि अर्जुन यांना मारण्याची संधी आलेली असते, पण तो दोघांना सोडून देतो. आणि शेवटी युद्धाचे नियम तोडून अर्जुन कर्णाचा वध करतो. त्यानंतर कृष्ण पांडवांना कर्ण त्यांचा भाऊ असल्याचे सांगतो. यावर युधिष्ठिर कुंतीला सांगतो की हजारो माणसांच्या मृत्यूला तीच जबाबदार आहे.

राजा धृपद द्रोणाचार्यांचा अपमान करतो. त्याचा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्यांचे आयुष्य जाते. शेवटी पांडव त्यांच्यासाठी हे काम करतात. युद्धात द्रोणाचार्यांची कर्णासारखीच स्थिती आहे. दुर्योधनाची बाजू चुकीची आहे हे माहीत असूनही ते त्याच्याच बाजूने पांडवांविरुद्ध लढण्यास विवश आहेत. कारण कुरू कुलाचे त्यांच्यावर उपकार आहेत.


Shikhandi fights Kripa
शिखंडी आणि कृप यांची लढाई

महाभारतातील अजून एक दुर्दैवी पात्र म्हणजे अंबा / शिखंडी. अंबा आणि तिच्या बहिणी यांना स्वयंवरातून भीष्माने पळवून नेले. हस्तिनापुराला पोचल्यावर अंबेने भीष्मास सांगितले की तिचे दुसऱ्या राजाबरोबर प्रेम आहे. भीष्माने अंबेला तिच्या प्रियकराकडे पोचते केले. परंतु हरण केलेल्या स्त्रीबरोबर लग्न करण्यास तिच्या प्रियकराने नकार दिला. या दु:खास भीष्म जबाबदार आहे हे ती जाणते. पुढच्या जन्मात अंबा शिखंडी म्हणून धृपदाकडे जन्म घेते. शिखंडी तृतीयपंथी असल्याने भीष्म त्यांच्यावर बाण चालविणार नाही हे समजल्यावर शिखंडी अर्जुनाच्या रथावर चढला आणि अर्जुनाने भीष्मांचा वध केला. एक प्रश्न पडतो – शिखंडी स्वत: महारथी आहे मग तोच भीष्मांचा वध का करत नाही? शिखंडीकडून मरण हे भीष्मांना जास्त त्रासदायक झाले असते?

रामायणातील दुर्दैवी पात्रे आहेत उर्मिला आणि कुंभकर्ण.

जनकाला सीता शेतात सापडली. राजवाड्यांच्या मते सीतेच्या मातेची गर्भधारणा शेतात झाली. उर्मिला ही जनकाची दुसरी मुलगी. जेव्हा रामाचे सीतेबरोबर लग्न ठरते तेव्हा असे ठरविण्यात येते की उर्मिलेचे लक्ष्मणाबरोबर लग्न करून द्यायचे. सीतेकरता स्वयंवर पण उर्मिलेकरता स्वयंवर नाही.

लग्नानंतर लवकरच वनवासाचा प्रसंग येतो. सीता रामाला सांगते की ती रामाबरोबर वनवासाला जाणार. कारण विवाहित स्त्रीची जागा नवऱ्याबरोबर आहे. परंतु हा तर्क उर्मिलेला लागू नाही. एक सासरा आणि तीन सासवा यांच्या सेवेसाठी तिला अयोध्येत राहावे लागणार. रामाची आई, कौसल्या रामाबरोबर वनात जाऊ इच्छिते. राम आपल्या आईला हे सांगतो की पत्नीने पतीच्या सेवेत राहिले पाहिजे. पण जे सीतेला आणि कौसल्येला लागू आहे ते उर्मिलेला नाही.

स्वत: वाल्मिकीसुद्धा उर्मिलेला न्याय देत नाहीत. सीता रामाला पटवून देत आहे की ती वनात येणार. या विषयावर पन्नास श्लोक आहेत. पण एका श्लोकातच लक्ष्मण उर्मिलेला नाही असे सांगतो.

कुंभकर्ण

कुंभकर्ण रावणाचा धाकटा भाऊ होता. जेव्हा रावणाने सीतेस पळवून आणले तेव्हा हा झोपलेला होता. जेव्हा जरूर पडली तेव्हा रावणाने त्यास उठविले. जेव्हा परिस्थिती समजली तेव्हा कुंभकर्ण रावणास सांगतो की त्याने दुष्कृत्य केले आहे. तरी पण तो रावणासाठी लढण्यास तयार होतो आणि मृत्युमुखी पडतो. येथे मूल्यांचा संघर्ष आहे. कुंभकर्ण जाणतो की रामाची बाजू नैतिकदृष्ट्‍या बरोबर आहे. परंतु रावणाला मदत न करणे म्हणजे आपला देश आणि आपले लोक यांच्याविरुद्ध जाणे. हा देशद्रोह कुंभकर्णाला जास्त वाईट वाटतो. ही गोष्ट तो बिभीषणालाही सांगतो.

एक निराळेच पात्र युधिष्ठिर.

आपल्या मनात युधिष्ठिराविषयी चीड येते. व्यक्तिमत्व, तेज, पराक्रम या गुणांचा त्याच्यात अभाव दिसतो. धर्म अधर्माच्या विचारात सदैव गोंधळलेली ही व्यक्ती आहे.

युधिष्ठिराचे द्यूतप्रेम पांडवांच्या दुःखाचे मूळ आहे. द्यूताच्या निर्णयात तो भावांचे मत घेत नाही, आणि वेळ येते तेव्हा त्यांनाच पणाला लावतो. द्रौपदी जेव्हा हा प्रश्न उपस्थित करते की ‘स्वतः हरलेला मनुष्य आपल्या बायकोला पणाला कसे लावू शकतो?’ – या प्रश्नाचे धर्मराजाकडे उत्तर नाही.

अर्जुनाने द्रौपदी जिंकली त्या वेळी युधिष्ठिर द्रौपदीवर अधिकार सांगतो. पण त्याआधी जेव्हा भीमाबरोबर हिडिंबेचे लग्न ठरते तेव्हा हा आपला अधिकार का सांगत नाही?

सबंध वनवासात हा भीम आणि अर्जुन यांच्या आधारावर जगतो. युद्धात हा काहीही करत नाही. युद्धाच्या शेवटी कृष्ण त्याला सरळच बोलतात – तू युद्धात काहीही केले नाहीस आता युद्ध संपल्यातच जमा आहे. आता तरी शल्याला मार. तेव्हा शल्याला हा कपटाने मारतो.

ऋषी आणि मुनी
रामाचे इक्ष्वाकू कूळ आणि पांडव / कौरवांचे कुरु कूळ या दोन्ही कुलांचे कुलगुरू वशिष्ठ आणि कृपाचार्य यांचा या कथानकात भाग आहे.

वशिष्ठ एक आदरणीय, मान्यवर भूमिका वठवतात. ते अयोध्येबाहेर राहतात आणि बोलावणे आल्यास अयोध्येत जातात. प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात त्यांचा सल्ला घेतला जातो.

कृपाचार्य हस्तिनापुरात राहतात. कृपाचार्यांचे महत्त्व कमी आहे. दुर्योधन त्यांचा अपमान करतो तेव्हा ते गप्प राहतात. कृपाचार्य कौरवांच्या बाजूने लढतात आणि युद्ध संपल्यावर जिवंत राहतात. युद्धाचे नियम तोडून रात्रीच्या वेळी पांडवांच्या मुलांची हत्या करण्याच्या कटात ते सहभागी होतात.
व्यास आणि वाल्मिकी हे महाभारत आणि रामायणाचे लेखक आहेत आणि दोन्ही गोष्टीत त्यांचा सहभाग आहे.

व्यास हे सत्यवतीचे लग्नाआधीचे पुत्र. सत्यवतीचे शंतनू या कुरु राजाशी लग्न होते. त्यांचा मुलगा विचित्रवीर्य हा मुलाचा जन्म होण्याआधी मरतो. तेव्हा सत्यवती आपला पुत्र व्यास यांना बोलावून सुनांपासून मुले नियोगाने करविते. अशा प्रकारे कौरव आणि पांडव हे व्यासांचे नातू होतात.

त्यानंतर महाभारताच्या गोष्टीत व्यास वेळोवेळी येत राहतात, पण केवळ एक त्रयस्थ म्हणून.

वाल्मिकी हे अनार्य होते. त्यांचा रामायणाच्या कथेच्या शेवटी संदर्भ येतो. लोकापवादामुळे अयोध्या सोडून सीता वनात जाते आणि वाल्मिकींच्या आश्रमात राहते. लव आणि कुश तेथेच वाढतात.

ज्या काळाचे हे वर्णन आहे त्या काळात व्यक्तीच्या कुलाला, जन्माला महत्त्व नव्हते. वर्णव्यवस्था सुनिश्चित झालेली नव्हती असे दिसते.

अगस्ती ऋषींचा उल्लेख रामायणात बऱ्याच वेळा येतो. अगस्ती आणि लोपामुद्रा यांचा आश्रम दंडकारण्यात गोदावरीकाठी होता. आर्यांचा धर्म विंध्याच्या दक्षिणेला अगस्ती ऋषींनी नेला. तमिळ व्याकरणाचे लेखक अशी त्यांची ओळख आहे.

अगस्ती ऋषी राम आणि लक्ष्मण यांना अस्त्रे देतात. रामायणात सुरुवातीला असा उल्लेख येतो की विश्वामित्र रामाला अस्त्रे देतात. महाभारतात द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांचे शिक्षण करतात त्यात अस्त्रविद्या पण येते. असे दिसते की त्या वेळच्या आश्रमात केवळ धार्मिक शिक्षणच दिले जात होते असे नाही तर शस्रविद्या पण शिकवली जाई.

तमिळनाडूत आर्य ब्राह्मण गुप्तकालानंतर पोचले असा संदर्भ आहे. यावरूनही या दोन गोष्टींचा काल तीन हजार वर्षांपेक्षा जास्त जुना नसावा.
महाभारतात अगस्तींचा उल्लेख केवळ एक इतिहास काळातील व्यक्ती असा येतो.

रामायणात ब्राह्मण आणि ऋषी त्यांच्या रक्षणासाठी क्षत्रियांवर अवलंबून असतात. महाभारतात तीन ब्राह्मण व्यक्ती युद्धात सामील होतात – द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. रामायण काळापर्यंत वर्णव्यवस्था दृढ झाली होती असे दिसते.

दोन्ही गोष्टीत परशुरामाचा उल्लेख येतो. प्रत्यंचा लावताना राम शिवधनुष्य तोडतो. खवळून परशुराम लढाई करण्यास येतो. राम त्याला हरवितात. महाभारतात अंबा परशुरामाकडे भीष्माची तक्रार घेऊन जाते. परशुराम भीष्मास अंबेशी लग्न करण्यास सांगतात. भीष्म नाही म्हणतो. मग युद्ध होते ज्यात परशुराम हरतात.

सध्याच्या ब्राह्मणांना परशुराम वंदनीय वाटतात. परशुरामांनी क्षत्रियांचा संहार केला असा पुराणात उल्लेख येतो. रामायण आणि महाभारताचे लेखक ब्राह्मण नव्हते. राम आणि भीष्म क्षत्रिय होते. या दोघांनी परशुरामाला हरविले. दोन्ही गोष्टींत परशुरामाचे पात्र काही गौरवास्पद दाखविलेले नाही.

इंद्र आणि सूर्य


Indra - Thanjavur style
तंजावर शैलीतील इंद्राचे चित्र

दोन्ही गोष्टींत इंद्र आणि सूर्य यांना महत्त्वाची भूमिका आहे.

रावणाला भ्रमित करण्यासाठी इंद्र रंभेला रावणाकडे पाठवितो पण रावण बधत नाही आणि रागावून इंद्रावर हल्ला करतो. रावण इंद्राला पराजित करून लंकेत बंदी म्हणून आणतो. मेघनाद यांच्याबरोबर समेट करून ब्रह्मा इंद्राची सुटका करतात.

रामायणाच्या गोष्टीत रावणाला मारण्यासाठी इंद्र विष्णूला पृथ्वीवर अवतार घेण्यास सांगतो. रामाचे जेव्हा रावणाशी युद्ध होते तेव्हा इंद्र आपला रथ रामाला देतो.

महाभारतात इंद्र अर्जुनाचा पिता आहे. वनवासात असताना अर्जुन इंद्रलोकात विशेष अस्त्रे मिळविण्यासाठी जातो. युद्ध सुरू होण्याआधी इंद्र कर्णाकडून कवचकुंडले चलाखीने घेतो ज्यामुळे कर्ण अवध्य राहत नाही.

दोन्ही गोष्टींत इंद्राचा सहभाग पाहून असे वाटते की आपल्या समाजाचे साधारण एकाच काळातील वर्णन या दोन गोष्टी करतात. इंद्रायणी सावकार यांच्या मते इंद्र ही एक व्यक्ती नसून ते एका अधिकाराचे नाव आहे. योग्य कारभार न झाल्यास ब्रह्मा, विष्णू आणि महेश ती व्यक्ती बदलतात.
महाभारतात कर्णाचे वडील सूर्य असतात तर अर्जुनाचे इंद्र. रामायणात वालीचे वडील इंद्र असतात तर सुग्रीवाचे सूर्य.

---
(पुढील भाग)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

इंद्र ही एक व्यक्ती नसून ते एका अधिकाराचे नाव आहे.

इंद्राविषयी नेहमीच संभ्रम निर्माण होतो. एकीकडे पुराणकथात -जे सगळ्यात नंतर आले (वैदिककाळ उत्तरार्ध)- तो विलासी, भोगी, स्त्रीलंपट दिसतो. याउलट ऋग्वेदात जे सगळ्यात प्राचीन आहे (वैदिककाळ पूर्वार्ध), तिथे इंद्राची स्तुती दिसते. मी ऋग्वेदाच्या इंग्रजी भाषांतराचा वर्डक्लाउड काढला होता तेव्हा मला त्यात इंद्र हा शब्ध सगळ्यात मोठा दिसला होता.

तमिळनाडूत आर्य ब्राह्मण गुप्तकालानंतर पोचले

दक्षिण भारताच्या इतिहासाची शृंखला खूपच तुटक आहे. (तुटक म्हणण्यापेक्षा जवळजवळ नाहीच). त्यात उत्खननाच्या साईट्स पण मर्यादीत आहेत. आणि साहित्यिक पुरावे (लिटररी एव्हिडंस) सुरु होतात ते संगम साहित्यापासून जे इ. पू. ३ शतकाच्या नंतरचे आहे. त्याअगोदरचा लेखी संदर्भ काही मिळत नाहीत. जसे रामायण आहे तसे दक्षिणेत संगम साहित्यात शिलप्पदिकारम हे समकालीन महाकाव्य आहे. ज्यात उल्लेख येतो तो कन्नकीच्या कथेचा. सितेत आणि तिच्यात खूप साम्य दिसते. दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत तिला देवी म्हणून पूजतात. गुप्तकालाच्या अगोदर मौर्य काळात, मौर्य साम्राज्याची सीमा तामिळनाडूच्या जरा वर आहे. तिथपर्यंत अशोकाचे शिलालेख, स्तंभ आहेत. अशोकाच्या समकालीन साहित्यात चोल, पांड्या, चेरा यांचे उल्लेख येतात. जैन आणि बौद्ध साहित्यानुसार, आर्य ब्राह्मण, बौद्ध आणि जैन साधक राजाश्रयासाठी प्रयत्न करताना दिसतात. उत्तर भारतात तुटक का होईना इतिहासाच्या शृखंला सापडतात. पण दक्षिण भारताबाबत मात्र सगळे कोडेच आहे. रावण, लंका याचा मेळ लागत नाही. शिवाय दक्षिण भारतातल्या देवता उत्तर भारतापेक्षा अगदी वेगवेगळ्या दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीतेविषयी एक गोष्ट पाहा. रावण पंचवटीत येऊन सीतेचे हरण करणार आहे हे रामांना आधीच माहीत होते. एके दिवशी लक्ष्मण लाकडे आणण्यास बाहेर गेलेला असताना रामांनी हे रहस्य सीतेला सांगितले आणि असे सुचविले की सीतेने अग्निदेवाच्या आश्रयाला जावे आणि एक मायावी सीता आश्रमात राहील. रामांच्या सांगण्याप्रमाणे सीता अग्निदेवाच्या आश्रयाला गेली आणि तिची प्रतिकृती पंचवटीच्या आश्रमात राहिली. पुढची गोष्ट आपल्याला माहीत असते.

पांचटपणाची हद्द आहे, म्हंजे ती खरी सीता नव्हतीच तर? मग आम्ही उगाच तिला पतिव्रता, सोशिक, धैर्य, विवेक याची पवित्र मूर्ती वगैरें समजून राहिलो. बिचारीची लै कुत्तरओढ झाली वगैरे वाटलं, तिच्यावेळी आजच्यागत कौटुंबिक न्यायालयं असती तर तिची फारच सोय झाली अस्ती नै, पर नाही गड्या, खरी सीतामाय तर अग्नीदेवाच्या FireBnB मंदी ( किंवा अग्नीदेवाच्या व्हॉईड मंदी (TGP मधल्या जेनेटच्या व्हॉइड प्रमाणे) ) आरामाsत राहत होती.. तिला ह्या समद्या नाटुकल्याची लाईव्ह टेलिकास्ट बघण्याची सोय रामदेवानं केली होती.. आणि ती fire-proof (अग्नी-रोधक) वाडग्यातून Netflix & Chill'd खात आरामात ते बघत राहिली. आणि "आता तुमची येण्ट्री बरका, ऍक्शन! " म्हंटल्याबरोबर एक सोशिक, धैर्य, विवेक याची पवित्र मूर्ती असल्यागत आगीतून बाहेर आली.. वाह वाह.. नाय म्हंजी तुम्हास्नी (म्हणजी मूळ लिवणार्यासनी) पुरस्कारच द्याया पाहिजे. नाय म्हंजे, एखाद्या चांगली गोष्टीत नकोते ट्विस्ट घालून त्याचं वांग कसं कराव हे तवापासून बरका.. तुम्हाला काय वाटलं ते फकस्त बॉलीवूडलाच जमतंय ? अरेरे, रामायनाट्यातल्या फक्त एका पात्रविषयीं थोडा आदर होता आज तोही निसटला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0